येशू तुमच्या जीवनात फरक कसा पाडू शकतो?
जवळजवळ २,००० वर्षांपूर्वी पॅलेस्टाईनमध्ये येशू ख्रिस्त थोर शिक्षक होता. त्याच्या बालपणाबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे. परंतु सुमारे ३० वर्षांचा असताना येशूने “सत्याविषयी साक्ष” देण्याच्या त्याच्या सेवेची सुरवात केली हे पुराव्यानिशी सिद्ध करण्यात आले आहे. (योहान १८:३७; लूक ३:२१-२३) त्याच्या जीवनावर अहवाल लिहिणारे चार शिष्य पुढील साडेतीन वर्षांवर भर देतात.
येशू ख्रिस्ताने आपल्या सेवेदरम्यान आपल्या शिष्यांना अशी एक आज्ञा दिली जी जगाच्या अनेक समस्यांवर उपाय ठरू शकते. कोणती आज्ञा? येशू म्हणाला: “मी तुम्हास नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीति करावी; जशी मी तुम्हावर प्रीति केली तशी तुम्हीहि एकमेकांवर प्रीति करावी.” (योहान १३:३४) होय, मानवजातीच्या अनेक समस्यांवरील उपाय आहे प्रीती. दुसऱ्या एका प्रसंगी येशूला जेव्हा कोणती आज्ञा सर्वात मोठी आहे असे विचारले गेले तेव्हा त्याने उत्तर दिले: “‘तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीति कर.’ हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की, ‘तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीति कर.’”—मत्तय २२:३७-४०.
देव आणि सहमानवांवर कशाप्रकारे प्रीती करावी हे येशूने बोलण्याद्वारे व कृतीद्वारे दाखवले. आपण काही उदाहरणांचा विचार करू या व येशूकडून आपल्याला काय शिकायला मिळते ते पाहू या.
त्याच्या शिकवणी
इतिहासातील सर्वात प्रसिद्ध प्रवचनांत येशू ख्रिस्ताने आपल्या अनुयायांना सांगितले: “कोणीहि दोन धन्याची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीति करील; अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही.” (मत्तय ६:२४) पैशाने सर्व समस्या सुटू शकतात असा अनेक लोकांचा विश्वास असताना, आपल्या जीवनात देवाला प्रथम स्थान देण्याविषयी येशूची शिकवण आजही व्यावहारिक आहे का? हे खरे आहे, की जगण्याकरता आपल्याला पैशाची गरज आहे. (उपदेशक ७:१२) पण आपण ‘धनाला’ आपला धनी होऊ दिले तर “द्रव्याचा लोभ” आपल्यावर कब्जा मिळवेल, आपल्या जीवनावर वर्चस्व गाजवेल. (१ तीमथ्य ६:९, १०) या पाशात पडलेल्या अनेकांनी आपले कुटुंब, आपले आरोग्य इतकेच नव्हे तर आपले जीवन देखील गमावले आहे.
दुसऱ्या बाजूला पाहता, आपला धनी म्हणून आपण देवावर लक्ष केंद्रित केल्यास आपल्या जीवनाला अर्थ मिळेल. निर्माणकर्ता या नात्याने तो जीवनाचा उगम आहे व म्हणून तोच आपल्या उपासनेच्या पात्र आहे. (स्तोत्र ३६:९; प्रकटीकरण ४:११) त्याचे गुण शिकून घेणारे व त्याच्यावर प्रीती करणारे त्याच्या आज्ञांचे पालन करण्यास प्रवृत्त होतात. (उपदेशक १२:१३; १ योहान ५:३) असे केल्याने आपला फायदा होतो.—यशया ४८:१७.
सहमानवांना प्रीती कशी दाखवायची हेही येशूने आपल्या शिष्यांना डोंगरावरील प्रवचनात शिकवले. तो म्हणाला: “ह्याकरिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.” (मत्तय ७:१२) येशूने येथे “लोकांनी” हा जो शब्द वापरला आहे तो एखाद्याच्या शत्रूंना देखील लागू होतो. त्याच प्रवचनात तो म्हणतो: “तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीति करा आणि जे तुमचा छळ करितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.” (मत्तय ५:४३, ४४) आज आपण ज्या अनेक समस्यांचा सामना करीत आहोत त्या सर्व समस्या अशाप्रकारच्या प्रीतीने सुटणार नाहीत का? भारतीय नेता मोहनदास गांधी यांना असेच वाटले. त्यांनी एकदा असे म्हटल्याचे सांगितले जाते: “ख्रिस्ताने डोंगरावरील प्रवचनामध्ये दिलेल्या शिकवणींबद्दल जेव्हा . . . [आपले] एकमत होईल तेव्हा आपण . . . सर्व जगाचे प्रश्न सोडवलेले असतील.” प्रीतीविषयी असलेल्या येशूच्या शिकवणींचा अवलंब केल्यास मानवजातीच्या अनेक समस्यांचे निरसन होऊ शकते.
त्याची कार्ये
प्रीती कशी दाखवायची याविषयीच्या गहन सत्याचे फक्त धडेच येशूने शिकवले नाहीत तर त्याने जे शिकवले ते स्वतः आचरले. जसे की, त्याने स्वतःच्या इच्छेपेक्षा इतरांच्या इच्छेला प्राधान्य दिले. एकदा येशू आणि त्याचे शिष्य लोकांना मदत करण्यात इतके गुंग होते, की त्यांना जेवायलासुद्धा वेळ नव्हता. आपल्या शिष्यांना आता विश्रांतीची आवश्यकता आहे हे येशूने जाणले व त्याने त्यांना एकांत ठिकाणी नेले. पण तेथे गेल्यावर लोकांचा एक समूह त्यांची वाट पाहत उभा होता. आपल्याला आता थोडा आराम हवा आहे असे आपल्याला वाटत असते, पण तुमच्याकडून कामाची अपेक्षा करणारा समूह तुम्ही पाहता तेव्हा तुमची लागलीच प्रतिक्रिया काय असेल? येशूला “त्यांचा कळवळा आला; आणि तो त्यांना बऱ्याच गोष्टींविषयी शिक्षण देऊ लागला.” (मार्क ६:३४) इतरांबद्दल अशाप्रकारच्या काळजीमुळे येशू प्रत्येकवेळा त्यांना मदत करण्यास प्रवृत्त झाला.
येशूने लोकांना फक्त शिकवलेच नाही. त्याने त्यांना व्यावहारिक मदतही केली. उदाहरणार्थ, एकदा त्याने संध्याकाळपर्यंत त्याचे प्रवचन ऐकत बसलेल्या ५,००० पेक्षा अधिक लोकांना जेवू घातले. त्यानंतर पुन्हा एकदा त्याने, तीन दिवसांपासून त्याचे प्रवचन ऐकत बसलेल्या व खाण्यासाठी काही नसलेल्या दुसऱ्या एका मोठ्या समुहाला—या वेळेला तर ४,००० पेक्षा अधिक लोकांना—जेवू घातले. पहिल्या प्रसंगी त्याने पाच भाकरी आणि दोन मासे, तर दुसऱ्या प्रसंगी सात भाकरी आणि काही मासे, यांचा उपयोग केला. (मत्तय १४:१४-२२; १५:३२-३८) चमत्कार वाटतो ना? होय, तो चमत्कार करणारा होता.
येशूने अनेक रोग्यांना देखील बरे केले. त्याने अंधळ्यांना, लंगड्यांना, कुष्ठरोग्यांना व बहिऱ्यांना बरे केले. इतकेच नव्हे तर त्याने मेलेल्यांनासुद्धा जिवंत केले! (लूक ७:२२; योहान ११:३०-४५) एकदा एक कुष्ठरोगी त्याच्याजवळ आला आणि त्याने त्याला विनंती केली: “आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहा.” यावर येशूची प्रतिक्रिया काय होती? “तेव्हा त्याला त्याचा कळवळा आला. त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो.” (मार्क १:४०, ४१) अशा चमत्कारांद्वारे येशूने पीडितांबद्दल आपले प्रेम व्यक्त केले.
येशूच्या चमत्कारांवर तुमचा विश्वास नाही का? काहींचा नाही. पण पाहा, येशूने त्याचे चमत्कार लोकांच्या देखत केले. पदोपदी त्याच्यात चुका शोधणाऱ्या त्याच्या विरोधकांनाही ही गोष्ट नाकारता आली नाही की तो चमत्कार करणारा होता. (योहान ९:१-३४) शिवाय, चमत्कार करण्यामागे त्याचा एक हेतू होता. चमत्कारांमुळे लोक त्याला देवाने पाठवलेला म्हणून ओळखू शकत होते.—योहान ६:१४.
चमत्कार करताना येशू स्वतःकडे लक्ष आकर्षित करत नव्हता. तर त्याने त्याच्या शक्तीचा उगम असलेल्या देवाचा गौरव केला. कफर्णहूममध्ये एकदा तो लोकांनी खच्चून भरलेल्या एका घरात होता. पक्षघात झालेल्या एका मनुष्याला आत घेऊन जायचे होते पण आत जायला मार्गच नव्हता. म्हणून त्या मनुष्याच्या मित्रांनी छप्परातून त्याची खाट खाली सोडली. त्यांचा इतका विश्वास पाहून येशूने त्या मनुष्याला बरे केले. परिणामतः, लोकांनी “देवाचे गौरव” केले व ते म्हणाले: “आम्ही असे कधीच पाहिले नव्हते.” (मार्क २:१-४, ११, १२) येशूच्या चमत्कारांमुळे यहोवा देवाची स्तुती झाली व गरजूंना मदत मिळाली.
परंतु, चमत्कारिकपणे बरे करणे हा येशूच्या सेवेचा मुख्य हेतू नव्हता. ज्याने येशूच्या जीवनाबद्दल लिहिले त्याने असे स्पष्टीकरण दिले: “येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा, आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे, म्हणून ही लिहिली आहेत.” (योहान २०:३१) होय, विश्वासू मानवांना जीवन मिळावे म्हणून येशू पृथ्वीवर आला.
त्याचे बलिदान
तुम्ही म्हणाल, ‘येशू धरतीवर आला?’ ‘तो कोठून आला?’ स्वतः येशूनेच याचे उत्तर दिले: “मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे.” (योहान ६:३८) देवाचा एकुलता एक पुत्र म्हणून मानवप्रकृती पूर्वी तो अस्तित्वात होता. मग ज्याने त्याला धरतीवर पाठवले त्याची काय इच्छा होती? शुभवर्तमान लेखकांपैकी एक अर्थात योहान याने लिहिले: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१६) हे कसे शक्य होते?
मृत्यू हा मानवजातीचा टाळता न येण्याजोगा अनुभव कसा बनला त्याचे स्पष्टीकरण बायबल देते. पहिल्या मानवी दांपत्याला देवाकडून अनंतकाळ जगण्याच्या आशेसह जीवन मिळाले. परंतु त्यांनी आपल्या निर्माणकर्त्याविरुद्ध बंड करण्याचे निवडले. (उत्पत्ति ३:१-१९) या कार्यामुळे, अर्थात पहिल्या मानवी पापामुळे आदाम आणि हव्वेच्या संततीला मृत्यूचा नको असलेला वारसा प्राप्त झाला. (रोमकर ५:१२) मानवजातीला खरे जीवन देण्याकरता आधी पाप आणि मृत्यूला काढून टाकणे आवश्यक होते.
कोणताही शास्त्रज्ञ कसल्याही आनुवंशिकी अभियांत्रिकीद्वारे मृत्यू काढून टाकू शकत नाही. पण, मानवजातीच्या निर्माणकर्त्याकडे आज्ञाधारक मानवांना परिपूर्णत्वाप्रत आणण्याचे साधन आहे जेणेकरून ते अनंतकाळ जगू शकतील. बायबलमध्ये या तरतुदीला खंडणी असे म्हटले आहे. पहिल्या मानवी दांपत्याने स्वतःला आणि त्यांच्या संतानाला पाप आणि मृत्यूच्या दास्यत्वाला विकून टाकले. देवाच्या आज्ञेत राहून परिपूर्ण मानव म्हणून जगण्याच्या बदल्यात त्यांनी देवापासून स्वतंत्र जीवन जगणे पसंत केले; बरोबर काय आणि चूक काय हे ठरवण्याचा निर्णय आपल्या हातात घेतला. परिपूर्ण मानवी जीवन पुन्हा विकत घेण्याकरता, आपल्या पहिल्या पालकांनी गमावलेल्या परिपूर्ण मानवी जीवनाची समतुल्य असलेली किंमत भरावी लागणार होती. अपरिपूर्णतेचा वारसा मिळाल्यामुळे मानव ती किंमत भरण्याच्या पात्र नव्हते.—स्तोत्र ४९:७.
त्यासाठी यहोवा देवाने मदत करण्यास हस्तक्षेप केला. त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राच्या परिपूर्ण जीवनाचे एका कुमारिकेच्या गर्भाशयात स्थलांतर केले; या कुमारिकेने येशूला जन्म दिला. दशकांआधी तुम्ही कुमारिकेच्या पोटी जन्म, ही कल्पना नाकारली असेल. पण आज शास्त्रज्ञांनी, सस्तन प्राण्यांचे प्रतिरूप (क्लोन) तयार केले आहे व एका प्राण्यातून दुसऱ्या प्राण्यात जीन्स अर्थात गुणसूत्रे घातले आहेत. तेव्हा, गर्भधारणा आणि जन्म यासाठी दुसऱ्या पद्धतीचा उपयोग निर्माणकर्ता करू शकत नाही असे म्हणण्याची कोणाची हिंमत होईल का?
एक परिपूर्ण मानवी जीवन आता अस्तित्वात आल्यामुळे, मानवजातीला पाप आणि मृत्यूपासून सोडवण्यासाठी किंमत मिळाली. पण, पृथ्वीवर बाळ म्हणून जन्माला आलेल्या येशूला, मानवजातीच्या समस्यांवरील “औषध” पुरवण्याकरता “डॉक्टर” होण्यासाठी त्याला मोठे व्हायचे होते. एक परिपूर्ण, निष्पाप जीवन जगण्याद्वारे त्याने तसे केले. पापाच्या ओझ्याखाली दबलेल्या मानवजातीची यातनाच फक्त येशूने पाहिल्या नाहीत तर मनुष्य या नात्याने असलेल्या शारीरिक मर्यादा देखील अनुभवल्या. यामुळे तर तो आणखीनच दयाळू डॉक्टर झाला. (इब्री लोकांस ४:१५) पृथ्वीवरील त्याच्या जीवनात चमत्कारिकरीत्या त्याने बरे केले त्यावरून त्याला आजाऱ्यांना बरे करण्याची इच्छा आणि शक्ती दोन्ही असल्याचे सिद्ध झाले.—मत्तय ४:२३.
पृथ्वीवर साडेतीन वर्षे सेवा केल्यानंतर येशूला त्याच्या विरोधकांनी ठार मारले. सर्वात मोठ्या परिक्षेतही परिपूर्ण मानव निर्माणकर्त्याच्या आज्ञेत राहू शकतो हे त्याने दाखवून दिले. (१ पेत्र २:२२) त्याने बलिदान केलेले परिपूर्ण मानवी जीवन खंडणीची किंमत ठरले ज्यामुळे मानवजातीला पाप आणि मृत्यूपासून सोडवता आले. येशू ख्रिस्त म्हणाला: “आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा कोणाची प्रीति मोठी नाही.” (योहान १५:१३) मृत्युनंतर तिसऱ्या दिवशी येशूचे पुनरुत्थान झाले; त्याला आत्मिक जीवन बहाल करण्यात आले व काही आठवड्यांनंतर तो खंडणीची किंमत यहोवा देवापुढे सादर करायला स्वर्गात गेला. (१ करिंथकर १५:३, ४; इब्री लोकांस ९:११-१४) असे करण्याद्वारे येशू, जे कोणी त्याचे अनुकरण करतील त्यांना त्याच्या खंडणी बलिदानाचे मूल्य लागू करू शकला.
अशाप्रकारच्या आध्यात्मिक, भावनिक व शारीरिक रोगांपासून बरे होण्याच्या मार्गाचा फायदा करून घेण्यास तुम्ही इच्छुक आहात का? यासाठी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. तेव्हा तुम्ही स्वतःच या डॉक्टरकडे का जात नाही? हे तुम्ही येशू ख्रिस्ताविषयी आणि विश्वासू मानवजातीला वाचवण्यात त्याच्या भूमिकेविषयी शिकून घेण्याद्वारे करू शकता. यहोवाच्या साक्षीदारांना तुम्हाला मदत करायला आनंद वाटेल.
[५ पानांवरील चित्र]
आजाऱ्यांना बरे करण्याची येशूची इच्छाही आहे व त्याच्याजवळ ती शक्तीही आहे
[७ पानांवरील चित्र]
येशूच्या मृत्यूचा तुमच्यावर कसा प्रभाव पडतो?