देवाचे नीतीमत्व व त्याचे राज्य मिळविण्यास झटत राहा
“तुम्ही प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवावयाची खटपट करीत राहा, म्हणजे याबरोबर इतर सर्व गोष्टी तुम्हास मिळतील.”—मत्तय ६:३३, न्यू.व.
१, २. वस्तुतः चांगली असणारी कृत्ये शास्त्री व परुशांनी आपल्या कृत्यांमुळे कशात बदलविली, आणि येशूने आपल्या शिष्यांना कोणता इशारा दिला?
शास्त्री व परुशांनी देवाच्या नव्हे तर, स्वतःच्या मार्गाने आपले नीतीमत्त्व मिळविण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर, जेव्हा जेव्हा ते चांगली कृत्ये करीत तेव्हा ती लोकांनी पाहावीत या दृष्टीने आचरल्यामुळे ती दांभिक ठरली. या कारणामुळे ते देवाची नव्हे तर आपली स्वतःचीच व्यर्थतेत सेवा करीत होते. अशा या खेळीबद्दल येशूने आपल्या शिष्यांना सावधानीचा इशारा दिला. तो म्हणालाः “मनुष्यांनी पहावे या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण त्यांच्यासमोर न करण्याविषयी जपा; केले तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हास प्रतिफळ नाही.”—मत्तय ६:१.
२ गरीबांस दानधर्म करणे हे यहोवाला आवडणारे आहे. पण परुशी ज्या पद्धतीने तो करीत ते त्याला आवडत नव्हते. असे अनुकरण करु नये म्हणून येशूने आपल्या शिष्यांना इशारा दिला. तो म्हणालाः “यास्तव, तू धर्म करतोस तेव्हा मनुष्यांनी आपली किर्ती वर्णावी म्हणून ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणापुढे कर्णा वाजवतात तसे करू नको. मी तुम्हास खचित सांगतो की, त्यांस आपले प्रतिफळ भरुन मिळाले आहे.”—मत्तय ६:२.
३. (अ) आपल्या दानधर्माबद्दल आपल्याला पूर्ण प्रतिफळ मिळाल्याची पोच शास्त्री व परुशांनी कशी दाखवली? (ब) पण दानधर्म करण्याबद्दल येशूची भूमिका कशी वेगळी होती?
३ ‘ते . . . भरुन पावले आहेत’ या शब्दसमूहासाठी असणारा ग्रीक शब्द (आ·पेʹखो) सर्वसाधारणपणे धंद्यातील पोचपावतीसाठी वापरण्यात येत असे. याचा डोंगरावरील प्रवचनात करण्यात आलेला उपयोग हे सूचवितो की, “ते आपले प्रतिफळ भरुन पावले आहेत,” म्हणजे “त्यांना आपल्या प्रतिफळाची पोचपावती मिळाली आहेः आपल्याला प्रतिफळ मिळणार याची त्यांना खात्री झाली आहे, व जणू ते मिळाले आहे याची ते आधीच पोच देत आहेत.” (ॲन एक्स्पोझिटरी डिक्शनरी ऑफ न्यू टेस्टमेंट वर्डस्, लेखक डब्ल्यू. ई. वाईन) गरीबांसाठी दानधर्म करण्याचे रस्त्यात जाहीरपणे प्रतिज्ञा घेऊन सांगितले जाई. सभास्थानात देणगीदारांची नावे जाहीर करीत. जे अधिक रक्कम देत अशांना भक्तीप्रसंगी रब्बींच्या जवळ बसण्याचा बहुमान मिळे. लोकांनी पहावे या हेतूने ते दान करीत; लोक त्यांना बघून त्यांची वाहवा करीत. यासाठीच, “आपण प्रतिफळ भरून पावलो आहोत” ही पोच ते जणू आधीच देत होते. पण येशूची भूमिका यापेक्षा केवढी वेगळी होती! तो म्हणालाः “तुझे धर्म करणे गुप्तपणे व्हावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल.”—मत्तय ६:३, ४; नीतीसूत्रे १९:१७.
देवाला संतुष्ट करणाऱ्या प्रार्थना
४. परुशांनी केलेल्या प्रार्थनांमुळे येशूने त्यांना ढोंगी म्हणण्यास का प्रवृत्त केले?
४ यहोवाला प्रार्थना आवडते, पण परुशांच्या पद्धतीच्या प्रार्थना त्याला पसंत नाहीत. येशूने आपल्या शिष्यांना म्हटलेः “तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यांसारखे होऊ नका. कारण मनुष्यांनी आपणास पहावे म्हणून सभास्थानात व चवाठ्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यांस आवडते. मी तुम्हास खचित सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरुन पावले आहेत.” (मत्तय ६:५) परुशी दररोज कितीतरी प्रार्थना म्हणत; ते असतील तेथे विशिष्ठ वेळी करीत. नियमाप्रमाणे त्यांनी त्या खाजगीपणात करायच्या होत्या, पण त्यांनी त्यांचा प्रकार बदलला. प्रार्थना करण्याची वेळ झाली म्हणजे लोकांनी आपल्याला चौकात बघावे म्हणून ते “चवाठ्यावर उभे राहून” प्रार्थना म्हणू लागले.
५. (अ) परुशांच्या आणखी कोणत्या आचरणामुळे त्यांच्या प्रार्थना देवापुढे फोल ठरल्या? (ब) नमुनेदार प्रार्थनेत येशूने कोणत्या गोष्टीला अग्रकम दिला, आणि आज लोक याबद्दल सहमत दर्शवीत आहेत का?
५ पवित्रतेचे दांभिक प्रदर्शन करण्यासाठी ते ‘लांबलांब प्रार्थना करीत.’ (लूक २०:४७) एक तोंडी सांप्रदाय सांगतोः “आपली तेफिला [प्रार्थना] म्हणण्याआधी भक्तीमान लोक तासभर थांबून राहत.” (मिश्ना) पण यामुळे प्रत्येकाला त्यांची भक्ती दिसे व त्याबद्दल त्यांचे नक्कीच कौतुक होई! पण त्या प्रार्थना त्यांच्या डोक्यापेक्षा अधिक उंच जात नव्हत्या. येशूने म्हटले की, प्रार्थना खाजगीपणात व त्याची वारंवार पुनरावृत्ती न करता करावी; याबद्दलचा एक नमुना त्याने आपल्या शिष्यांना दिला. (मत्तय ६:६-८; योहान १४:६, १४; १ पेत्र ३:१२) येशूच्या नमुनेदार प्रार्थनेत अग्रगण्य गोष्टींना अग्रस्थान आहेः “आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानिले जावो; तुझे राज्य येवो . . . तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” (मत्तय ६:९-१३) आज देवाचे नाव खूपच कमी लोकांना माहीत आहे व फारच थोडे त्याला पवित्र मानीत आहेत. याद्वारे ते त्याला नामविरहीत देव करतात. देवाचे राज्य यायलाच हवे का? ते तर काहींच्या मते आधीच, त्यांच्यामध्ये आहे. देवाच्या इच्छेप्रमाणे व्हावे अशी ते प्रार्थना करीत असतील, पण वस्तुतः ते आपल्या जीवनात स्वतःचीच इच्छा आचरतात.—नीतीसूत्रे १४:१२.
६. यहुद्यांचा उपास निरर्थक आहे या अर्थाने येशूने तो का धिक्कारला?
६ उपास यहोवाला मान्य आहे, पण तो परुशी आचरीत तसा नसावा. दानधर्म करणे व प्रार्थना याबाबतीत येशूने परुशांना जसे धिक्कारले त्याचप्रमाणे तो उपासाबद्दलची त्यांची निरर्थकता देखील अशी प्रकटवितोः “तुम्ही उपास करता तेव्हा ढोंग्यासारखे म्लानमुख होऊ नका. कारण आपणास उपास आहे असे मनुष्यांस दिसावे म्हणून ते आपले तोंड विरुप करतात. मी तुम्हास खचित सांगतो, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत.” (मत्तय ६:१६) परुशांचा सांप्रदाय दाखवतो की, उपासाच्या वेळी ते आपले डोके धूत नसत व त्याला तैलाभ्यंगही करीत नसत तर त्यावर ते राख पसरत. उपास नसतो तेव्हा यहुदी नियमाने अंघोळ करीत व आपल्या शरीराला तेल लावीत.
७. (अ) उपास करताना येशूच्या अनुयायांनी आपले वर्तन कसे ठेवावयाचे होते? (ब) यशयाच्या काळी, उपासाच्या अनुषंगाने यहोवा कोणती गोष्ट अपेक्षित होता?
७ उपासाबद्दल येशूने आपल्या शिष्यांना म्हटलेः “आपल्या डोक्यास तेल लाव व आपले तोंड धू. यासाठी की, तू उपास करतोस हे मनुष्यांस दिसावे म्हणून नव्हे तर तुझा गुप्तवासी पिता याला दिसावे; म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल.” (मत्तय ६:१७, १८) यशयाच्या काळी मार्गभ्रष्ट झालेल्या यहुद्यांना उपास करण्याचा आनंद वाटला होता. त्यांनी आपल्या जिवांस पीडा दिली, आपली डोकी लवविली, आणि गोणताट पांघरुन ते राखेत बसले. पण, जाचलेल्यांना मुक्त करावे, भुकेलेल्यांना अन्न द्यावे, बेघरांना घरे द्यावीत आणि उघड्यांना वस्त्रे द्यावीत ही तेव्हा यहोवाची त्यांच्याबाबत इच्छा होती.—यशया ५८:३-७.
स्वर्गीय संपत्ती साठवा
८. देवाची संमती कशी मिळवावी याकडे शास्त्री व परुशांचे कशामुळे दुर्लक्ष झाले, आणि पौलाने नंतर सांगितलेल्या कोणत्या तत्त्वाकडे त्यांनी दुर्लक्ष केले होते?
८ नीतीमत्तेचा शोध घेता घेता शास्त्री व परुशी, देवाची संमती कशी मिळवावी याचा दृष्टीकोण हरवून बसले व त्यांनी लोकांकडून मिळत असलेल्या कौतुकावर आपले लक्ष केंद्रित केले. ते मनुष्याच्या संप्रदायात इतके गढले की, त्यांनी देवाच्या लिखित वचनास बाजूला ठेवले. त्यांनी आपली अंतःकरणे स्वर्गीय धनापेक्षा भौतिक दर्जांवर संग्रहीत केली. त्यांनी एका साध्या सत्याकडे दुर्लक्ष केले, ज्याबद्दल नंतर, परुशामधून ख्रिस्ती धर्मात परिवर्तित झालेल्या एकाने असे लिहिलेः “जे काही तुम्ही करता ते मनुष्यांसाठी म्हणून नका, तर यहोवासाठी म्हणून जिवेभावे करा. यहोवापासून वतनरुप प्रतिफळ तुम्हास मिळेल हे तुम्हास माहीत आहे.”—कलस्सैकर ३:२३, २४.
९. भौतिक धनाला कोणते धोके आहेत, पण कशामुळे खरा ठेवा सुरक्षित राहू शकेल?
९ यहोवाला तुमच्या बँकेतील धनसंचयाच्या बाबतीत नव्हे, तर तुम्ही त्याची भक्ती कशी करता याबद्दल रस वाटतो. जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे अंतःकरण जडले आहे हे त्याला माहीत आहे. तुमचा ठेवा गंजून जाईल का, व त्याला वाळवी लागेल का? चोर त्याला चोरी करून नेऊ शकतील का? किंवा सध्याच्या आर्थिक अस्थैर्यतेच्या काळात महागाई तुमचे खरेदीचे सामर्थ्य कमी करील किंवा सराफ बाजारातील उलाढाली त्याला शून्य करतील? वाढती गुन्हेगारी तुमच्या धनाला चोरुन नेतील का? तुमचा डोळा, जो तुमच्या सबंध शरीराचा दिवा आहे, साधा व देवाचे राज्य आणि त्याचे नीतीमत्त्व यावर केंद्रित असल्यास असे घडणार नाही. धन गायब होण्याचे मार्ग आहेत. “धनवान होण्यासाठी धडपड करु नको. आपले चातुर्य एकीकडे ठेव. जे पाहता पाहता नाहीसे होते, त्याकडे तू नजर लावावी काय? कारण गगनात उडणाऱ्या गरुडासारखे पंख धन आपणास लावते.” (नीतीसूत्रे २३:४, ५) धनामुळे आपल्या निद्रेचा भंग का करावा? “धनिकाची धनाढ्यता त्याला झोप येऊ देत नाही.” (उपदेशक ५:१२) येशूचा इशारा लक्षात घ्याः “तुमच्याने देवाची आणि धनाचीही सेवा करवत नाही.”—मत्तय ६:१९-२४.
काळजी नाहीशी करणारा विश्वास
१०. भौतिक धनसंपदेपेक्षा देवावर आपला विश्वास ठेवणे का महत्त्वाचे आहे, आणि येशूने कोणता सल्ला दिला?
१० आपण आपला विश्वास भौतिक धनावर नव्हे तर, यहोवावर ठेवावा असे त्याला वाटते. “विश्वासावाचून [देवाला] संतोषविणे अशक्य आहे. कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे आणि त्याजकडे धाव घेणाऱ्याला तो प्रतिफळ देणारा होतो.” (इब्रीयांस ११:६) येशूने म्हटलेः “कोणाला पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही.” (लूक १२:१५) बँकेतील लक्षावधी पैसे आजारी फुप्फुसांना तसेच थकलेल्या हृदयाला चालवीत राहू शकणार नाही. “यास्तव,” येशू डोंगरावरील प्रवचनात पुढे म्हणाला, “मी तुम्हास सांगतो की, आपल्या जिवाविषयी, म्हणजे आपण काय खावे, काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे अशी काळजी करु नका. अन्नापेक्षा जीव व वस्त्रापेक्षा शरीर विशेष आहे की नाही?”—मत्तय ६:२५.
११. येशूला आपली उदाहरणे बहुधा कोठे आढळली, व हे डोंगरावरील प्रवचनात कसे दिसून आले?
११ येशू शाब्दिक उदाहरणे देण्यात प्रवीण होता. जेथे जेथे त्याने निरिक्षण केले तेथील गोष्टी त्याने विचारात घेतल्या. कोणी स्त्री दिवा लावून दिवठणीवर ठेवत असल्याचे त्याने बघितले व त्याचे उदाहरण त्याने आपल्या भाषणात घेतले. त्याने मेंढपाळाला आपल्या कळपात शेरडे व मेंढरे वेगळी करीत असल्याचे पाहिले व त्याचे त्याने उदाहरण घेतले. त्याने बाजारात मुलांना खेळताना बघितले व ते एक उदाहरण घेतले. हेच डोंगरावरील प्रवचनातही होते. शारीरिक गरजांविषयी चिंतातुर असण्याबद्दल त्याने बोलणी केली तेव्हा आकाशातील पाखरांचे आणि वनातील फुलांचे उदाहरण येथे योग्यपणे लागू होत आहे हे त्याला दिसले. पाखरे पेरणी व कापणी करतात का? नाही. देवाने त्यांना घडविले व तो त्यांची काळजी करतो. तथापि, तुम्ही पक्षी व फुले यापेक्षा कितीतरी अधिक आहात. (मत्तय ६:२६, २८-३०) त्याने आपला पुत्र तुम्हासाठी दिला, त्यांच्यासाठी नव्हे.—योहान ३:१६.
१२. (अ) येशूने पाखरांचे व फुलांचे जे उदाहरण दिले त्याचा अर्थ त्याच्या शिष्यांना काम करण्याची जरुरी नाही असा आहे का? (ब) काम व विश्वास याबद्दल येशू येथे कोणता मुद्दा स्पष्ट करीत होता?
१२ येशू येथे आपल्या अनुयायांना खाण्यासाठी व वस्त्रासाठी काम करण्याची जरुरी नाही असे सांगत नव्हता. (पहा उपदेशक २:२४; इफिसकर ४:२८; २ थेस्सलीनकाकर ३:१०-१२.) डोंगरावरील प्रवचनाच्या त्या वसंत ऋतुतील सकाळी पक्षी आपला आहार शोधीत होते, आपल्या सोबत्यांबरोबर खेळत होते, घरटी बांधीत होते, अंड्यांना उब देत होते आणि पिलांना भरवीत होते. ते काम करीत होते, पण त्यांना चिंता नव्हती. वनातील फुलेही आपली मुळे पसरुन पाण्याचा व खताचा शोध घेत होती, आणि आपली पालवी सूर्यप्रकाश घेण्यासाठी वर उचांवत होते. त्यांना आपली वाढ करुन फुलणे होते आणि सुकण्याआधी आपले बीज बाहेर द्यायचे होते. ती देखील आपली कामे काळजीविना करीत होती. देव पक्षी व फुलांची तरतूद करीत होता. तर ‘अहो अल्पविश्वासी, तो विशेषेकरुन तुमची तरतूद करणार नाही काय?’—मत्तय ६:३०.
१३. (अ) आपल्या जीवनाचा कालावधी वाढविण्याबद्दलची बोलणी करीत असता येशूने “हातभर” प्रमाणाचा वापर करावा हे का योग्य होते? (ब) तुम्हाला तुमचे जीवन जणू लाखो मैलभर कसे वाढविता येईल?
१३ यास्तव विश्वास बाळगा. चिंतातुर होऊ नका. चिंता कोणताही बदल घडवून आणू शकत नाही. “काळजी करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास तुम्हातील कोण समर्थ आहे?” असा येशूने प्रश्न केला. (मत्तय ६:२७) पण येशूने, हातभर हे शारीरिक प्रमाण जीवनातील काळाकरता का लागू केले? ते कदाचित, पवित्र शास्त्र, मानवी जीवनकाळास एका प्रवासासमान उल्लेखित असल्यामुळे असावे. याबद्दलचे उदाहरण म्हणून, ‘पापी जनांचा मार्ग,’ ‘धार्मिकांचा मार्ग,’ ‘नाशाकडे जाणारा पसरट मार्ग, व ‘जीवनाकडे नेणारा संकोचित मार्ग,’ याकडे लक्ष द्या. (स्तोत्रसंहिता १:१; नीतीसूत्रे ४:१८; मत्तय ७:१३, १४) दैनंदिन गरजांबद्दल चिंतातुर राहणे हे माणसाचे आयुष्य जणू “हातभर” किंवा काही अंशीही वाढवू शकत नाही. पण तुमच्या आयुष्याचा मार्ग जणू न संपणाऱ्या लाखो मैलांनी वाढविण्याचा एक उपाय आहे. तो म्हणजे, “काय खावे?” किंवा “काय प्यावे?” वा “काय पांघरावे?” ही काळजी करीत बसण्याने नव्हे. तर येशूने जे करायला सांगितले आहे त्यावर विश्वास ठेवून ते करण्याने. तो म्हणालाः “तर तुम्ही प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवावयाची खटपट करीत राहा, म्हणजे याबरोबर इतर सर्व गोष्टी तुम्हास मिळतील.”—मत्तय ६:३१-३३.
देवाचे राज्य व त्याची नीतीमत्ता मिळविणे
१४. (अ) डोंगरावरील प्रवचनाचा विषय कोणता आहे? (ब) शास्त्री व परुशांनी कोणत्या चुकीच्या मार्गाने देवाचे राज्य व त्याच्या नीतीमत्तेचा शोध घेतला?
१४ डोंगरावरील प्रवचनाच्या प्रास्ताविकतेत येशूने म्हटले की, जे आध्यात्मिक गरजांविषयी जाणीव राखतात अशांना स्वर्गाचे राज्य आहे. चवथ्या वाक्यात त्याने म्हटले की, नीतीमत्तेसाठी क्षुधित व तान्हेले असणाऱ्यांना तृप्त करण्यात येईल. या ठिकाणी येशू, देवाचे राज्य तसेच यहोवाची नीतीमत्ता या दोन्ही गोष्टींना प्रधान जागी ठेवतो. या दोन गोष्टी त्याच्या डोंगरावरील प्रवचनाचा विषय आहेत. सबंध मानवजातीच्या गरजांचे उत्तर याच दोन्ही गोष्टी आहेत. पण, देवाचे राज्य आणि देवाची नीतीमत्ता कोणत्या आधारावर मिळू शकतील? आम्ही त्यासाठी कसे झटत राहू शकतो? शास्त्री व परुशांसारखे नव्हे. त्यांनी राज्याचा व नीतीमत्तेचा शोध मोशाच्या नियमशास्त्राधारे केला. त्यात तोंडी संप्रदाय देखील आहेत असा त्यांचा दावा होता. कारण देवाने मोशाला सिनाय पर्वतावर नियमशास्त्र व तोंडी संप्रदाय दिले असा त्यांचा विश्वास होता.
१५. (अ) यहुद्यांच्या मते त्यांचे तोंडी संप्रदाय केव्हा सुरु झाले, आणि त्यांनी ते मोशेच्या लिखित नियमांपेक्षाही कसे उंचावले? (ब) पण खरेपणाने हे संप्रदाय केव्हा सुरु झाले, आणि याचा मोशेच्या नियमशास्त्रावर कसा परिणाम झाला?
१५ याबद्दल त्यांचा संप्रदाय म्हणतोः “मोशेला सिनायवर मिळालेले नियमशास्त्र [तळटीप, “तोंडी नियम,”] त्याने यहोशवाला सोपून दिले; ते त्याने वडीलांना, वडिलांनी संदेष्ट्यांना, संदेष्ट्यांनी थोर सभास्थानाच्या लोकांना सोपवून दिले.” कालांतराने त्यांच्या तोंडी नियमांनी नियमशास्त्राच्या लिखित नियमांवर प्राबल्य केलेः “त्याने नियमशास्त्राच्या [लिखित] शब्दांचे उल्लंघन केले तर तो अपराधी नाही,” पण “त्याने शास्त्रांच्या नियमावलीत [तोंडी संप्रदाय] भर घातली तर तो अपराधी आहे.” (मिश्ना) त्यांचे तोंडी संप्रदाय सिनाय येथे सुरु झाले नाही. खरे म्हणजे, ख्रिस्ताच्या आधी दोन शतकांपासून त्यांची अधिक भर पडू लागली. यांनी मोशेच्या लिखित नियमात भर घातली, त्यांना कमी केले आणि निरर्थक बनवले.—पडताळा अनुवाद ४:२, १२:३२.
१६. मानवजातीला देवाचे नीतीमत्त्व कसे मिळू शकते?
१६ देवाचे नीतीमत्त्व नियमशास्त्राने नव्हे तर त्याच्याऐवजात येतेः “त्याजसमोर कोणी मनुष्य नियमशास्त्रातील कर्मांनी नीतीमान ठरणार नाही. कारण नियमशास्त्राच्या द्वारे पापाचा बोध होतो. आता नियमशास्त्र विरहीत असे जे देवाचे नीतीमत्त्व ते प्रकट झाले आहे. त्यास नियमशास्त्राची व संदेष्ट्यांची साक्ष आहे. हे देवाचे नीतीमत्त्व येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे . . . आहे.” (रोमकर ३:२०-२२) अशाप्रकारे देवाचे नीतीमत्त्व हे येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे मिळते—याला ‘नियमशास्त्र व संदेष्टे यांची’ भरपूर साक्ष आहे. येशूमध्ये मशीही भविष्यवाद पूर्ण झाले. त्याने नियमशास्त्राचीही पूर्णता केली. ते त्याच्या वधस्तंभावर खिळण्याच्या रुपाने नाहीसे झाले.—लूक २४:२५-२७, ४४-४६; कलस्सैकर २:१३, १४; इब्रीयांस १०:१.
१७. यहुद्यांना देवाचे नीतीमत्त्व का कळू शकले नाही याबद्दल पौलाने कोणती स्पष्टता केली?
१७ या कारणास्तव, यहुद्यांना नीतीमत्त्व संपादित करण्यात का अपयश आले त्याबद्दलचे कारण प्रेषित पौलाने स्पष्ट केले. तो म्हणालाः “मी त्यांजविषयी साक्ष देतो की, त्यांस देवाविषयी आस्था आहे, परंतु ती परिपूर्ण ज्ञानाला धरुन नाही. कारण त्यांना देवाच्या नीतीमत्त्वाची जाणीव नसल्यामुळे व ते आपलेच नीतीमत्त्व स्थापावयास पाहत असल्यामुळे ते देवाच्या नीतीमत्त्वाला वश झाले नाहीत. प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला नीतीमत्त्व प्राप्त होण्यासाठी ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती असा आहे.” (रोमकर १०:२-४) पौलाने येशू ख्रिस्ताबद्दल आणखी असे लिहिलेः “ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्याआमच्याकरिता पाप असे केले; यासाठी की आपण त्याच्याठायी देवाचे नीतीमत्त्व असे व्हावे.”—२ करिंथकर ५:२१.
१८. यहुदी सांप्रदायिक लोकांना, ग्रीक तत्त्ववेत्यांना आणि “पाचारण झालेल्यां”ना “वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त” कसा वाटला?
१८ मरत असलेल्या मशीहाबद्दल यहुद्यांना फारसे असे काही वाटले नाही. ग्रीक तत्त्ववेत्यांना तर असा मशीहा मूर्खतेचा वाटला. तथापि, पौलाने हे जाहीर केलेः “यहूदी चिन्हे मागत असता व हेल्लेणी ज्ञानाचा शोध करीत असता आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो. हा यहुद्यांस अडखळण व हेल्लेण्यांस मूर्खपण आहे. परंतु पाचारण झालेल्या यहुदी व हेल्लेणी अशा दोघांसही तो देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान असा ख्रिस्त आहे. कारण देवाची जी मूर्खपणाची कृति ती मनुष्यांपेक्षा ज्ञानाची आहे; आणि देवाची जी अशक्तपणाची कृति ती मनुष्यांपेक्षा शक्तीची आहे.” (१ करिंथकर १:२२-२५) ख्रिस्त येशू हा देवाचे सामर्थ्य व ज्ञान यांचे प्रकटीकरण आहे व तोच आज्ञाधारक मानवजातीस नीतीमत्त्व व सार्वकालिक जीवन प्रदान करण्यासाठी देवाचे माध्यम आहे. “तारण दुसऱ्या कोणाकडून नाही; जेणेकरून आपले तारण व्हावयाचे असे दुसरे नाम आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही.”—प्रे. कृत्ये ४:१२.
१९. पुढील लेख कशाची चर्चा करील?
१९ आम्हाला येत असलेला नाश टाळायचा आहे व सार्वकालिक जीवनाची प्राप्ती करायची आहे तर देवाचे राज्य व त्याचे नीतीमत्त्व मिळविण्याचा सतत यत्न केला पाहिजे. यामध्ये केवळ येशूचे ऐकण्याचाच नव्हे तर त्याने सांगितलेल्या वचनांप्रमाणे आचरण करण्याचाही कार्यभाग येतो.
उजळणी प्रश्न
◻ दानधर्म करणे, प्रार्थना व उपास या गोष्टी यहुदी धर्मनेत्यांनी कशामध्ये बदलविल्या?
◻ आपले धन साठविण्याचे सुरक्षित स्थळ कोणते?
◻ आमच्या भौतिक गरजांच्या बाबतीत आम्ही चिंता करण्याचे का टाळावे?
◻ आपल्या तोंडी संप्रदायाच्या मूळारंभाबद्दल यहुद्यांनी कोणता खोटा दावा केला?
◻ देवाचे राज्य व त्याच्या नीतीमत्तेची प्राप्ती कोणत्या माध्यमाने येते?
[१६ पानांवरील चित्रं]
जेथे लोक पाहू शकतील अशा रस्त्याच्या कडेला उभे राहून प्रार्थना करणे परुशांना आवडत होते