वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ५/१ पृ. १३-१९
  • कोणाला ‘तारले’ जाईल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कोणाला ‘तारले’ जाईल?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • भविष्यवाणीच्या दोन पूर्णता
  • यहोवाच्या नावाचा धावा आपण कसा करावा?
  • आध्यात्मिक परादीस
  • व्यवस्थीकरणाचा अंत
  • उत्तरेकडून हल्ला!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • परीक्षांमुळे यहोवावरील आमचा भरवसा आणखी वाढला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • यहोवाचा दिवस ध्यानात असू द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • संदेष्ट्यांचे अनुकरण करा—योएल
    आमची राज्य सेवा—२०१३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ५/१ पृ. १३-१९

कोणाला ‘तारले’ जाईल?

‘जो कोणी यहोवाच्या नावाने धावा करील तो तरेल.’—प्रेषितांची कृत्ये २:२१.

१. पेन्टेकॉस्ट सा.यु. ३३ हा दिवस जागतिक इतिहासाला कलाटणी देणारा का होता?

सा.यु. ३३ पेन्टेकॉस्ट हा दिवस जागतिक इतिहासाला कलाटणी देणारा होता. का? कारण त्या दिवशी नव्या राष्ट्राचा जन्म झाला. सुरवातीला, हे फार मोठे राष्ट्र नव्हते—जेरुसलेममधील एका माडीवरील खोलीत जमलेले येशूचे केवळ १२० शिष्य होते. परंतु आज, त्या काळातील बहुतेक राष्ट्रांचे विस्मरण झालेले असताना त्या वरच्या खोलीत जन्माला आलेले राष्ट्र अद्यापही आपल्यासोबत आहे. ही वास्तविकता आपल्या सर्वांकरता फार महत्त्वाची आहे कारण मानवजातीसमोर आपले साक्षीदार व्हावे म्हणून स्वतः देवाने या राष्ट्राला नियुक्‍त केले आहे.

२. नवीन राष्ट्राचा जन्म झाला तेव्हा कोणत्या वैभवी घटना घडल्या?

२ हे नवीन राष्ट्र अस्तित्वात येण्यास सुरू झाले तेव्हा योएलच्या भविष्यवाणीची पूर्णता करणाऱ्‍या अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. प्रेषितांची कृत्ये २:२-४ येथे आपण या घटनांविषयी वाचतो: “अकस्मात मोठ्या वाऱ्‍याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एकएक अशा बसल्या. तेव्हा ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.” अशाप्रकारे ते १२० विश्‍वासू स्त्री-पुरुष एक आत्मिक राष्ट्र बनले, या राष्ट्राच्या पहिल्या सदस्यांना प्रेषित पौलाने नंतर ‘देवाचे इस्राएल’ असे संबोधले.—गलतीकर ६:१६.

३. पेन्टेकॉस्ट सा.यु. ३३ या दिवशी योएलची कोणती भविष्यवाणी पूर्ण झाली?

३ ‘मोठ्या वाऱ्‍याचा सुसाट्यासारखा नाद’ कशामुळे झाला हे जाणण्यासाठी लोकसमुदाय जमा झाला आणि प्रेषित पेत्राने त्यांना स्पष्ट केले, की योएलने केलेल्या एका भविष्यवाणीची ती पूर्णता होत होती. कोणती भविष्यवाणी? त्याने काय म्हटले ते ऐका: “देव म्हणतो, शेवटल्या दिवसात असे होईल की, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन; तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरुणांस दृष्टांत होतील, व तुमच्या वृद्धांस स्वप्ने पडतील; आणखी त्या दिवसात मी आपल्या दासांवर व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन; म्हणजे ते संदेश देतील; आणि वर आकाशात अद्‌भुते, व खाली पृथ्वीवर चिन्हे, म्हणजे रक्‍त अग्नि व धुम्ररूप वाफ अशी मी दाखवीन; परमेश्‍वराचा महान व प्रसिद्ध दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्‍तमय होईल; तेव्हा असे होईल की, जो कोणी परमेश्‍वराच्या नावाने त्याचा धावा करील तो तरेल.” (प्रेषितांची कृत्ये २:१७-२१) पेत्राने उद्धृत केलेले शब्द योएल २:२८-३२ मध्ये पाहण्यास मिळतात आणि यहुदी राष्ट्राची घटका भरली असा त्या शब्दांच्या पूर्णतेचा अर्थ होता. “परमेश्‍वराचा महान आणि प्रसिद्ध दिवस,” अविश्‍वासू इस्राएलाचा झाडा घेण्याचा काळ जवळ होता. परंतु कोणाला वाचवण्यात येईल किंवा कोणाला तारले जाईल? आणि हे कशाचे पूर्वचिन्ह होते?

भविष्यवाणीच्या दोन पूर्णता

४, ५. होणाऱ्‍या घटनांना लक्षात घेता, पेत्राने कोणता सल्ला दिला आणि तो सल्ला त्याच्या दिवसांनंतरही का लागू होतो?

४ सा.यु. ३३ नंतरच्या वर्षांमध्ये, देवाच्या आत्मिक इस्राएलाची भरभराट झाली, पण इस्राएलाच्या भौतिक राष्ट्राची मात्र तशी भरभराट झाली नाही. सा.यु. ६६ मध्ये भौतिक इस्राएलाचे रोमसोबत युद्ध चालू होते. सा.यु. ७० मध्ये इस्राएल जवळजवळ नामशेष झाले होते आणि जेरुसलेमला त्यातील मंदिरासह अग्नीने भस्म करण्यात आले होते. सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टमध्ये, पेत्राने येणाऱ्‍या विपत्तीला पाहून एक उत्तम सल्ला दिला. पुन्हा एकदा योएलचा अहवाल उद्धृत करत त्याने म्हटले: “जो कोणी परमेश्‍वराच्या [“यहोवाच्या,” NW] नावाने त्याचा धावा करील तो तरेल.” प्रत्येक यहुदी व्यक्‍तीला यहोवाच्या नावाचा धावा करण्याचा व्यक्‍तिगत निर्णय घ्यायचा होता. यामध्ये पेत्राच्या पुढील सूचनांकडे लक्ष देणे समाविष्ट होते: “पश्‍चात्ताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या.” (प्रेषितांची कृत्ये २:३८) पेत्राचे ऐकणाऱ्‍यांनी येशूला मशीहा म्हणून स्वीकारायचे होते; राष्ट्र या नात्याने इस्राएलाने त्याचा धिक्कार केला होता.

५ योएलच्या त्या भविष्यसूचक शब्दांचा पहिल्या शतकातील नम्र लोकांवर मोठा प्रभाव पडला. तथापि, त्या शब्दांचा प्रभाव पहिल्यापेक्षा आता अधिक आहे कारण २० व्या शतकाच्या घटनांवरून दिसून येते, की योएलच्या भविष्यवाणीची दुसरी पूर्णता झाली आहे. कशी ते आपण पाहू या.

६. सन १९१४ जवळ येता, देवाच्या इस्राएलची ओळख होण्यास कशाप्रकारे सुरवात झाली?

६ प्रेषितांच्या मृत्यूनंतर, देवाचे इस्राएल खोट्या ख्रिस्ती धर्माच्या निदणाखाली दडपले गेले होते. तथापि, अंतसमयात, ज्याची १९१४ मध्ये सुरवात झाली, या आत्मिक राष्ट्राची ओळख पुन्हा एकवार स्पष्ट झाली. हे सर्व येशूच्या गहू आणि निदणाच्या दाखल्याच्या पूर्णतेनुसार झाले होते. (मत्तय १३:२४-३०, ३६-४३) सन १९१४ जवळ आले तसे, अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी स्वतःला अविश्‍वासू ख्रिस्ती धर्मजगतापासून वेगळे करण्यास सुरवात केली; त्यांनी मोठ्या धैर्याने त्याच्या खोट्या धर्मतत्त्वांना धिक्कारले आणि “परराष्ट्रीयांची सद्दी” संपेल, असा प्रचारही त्यांनी केला. (लूक २१:२४) परंतु सन १९१४ मध्ये सुरू झालेल्या पहिल्या जागतिक युद्धाने काही असे वादविषय उभे केले ज्यास तोंड देण्याकरता अभिषिक्‍त लोकांची तयारी झालेली नव्हती. जबर दबाव आल्यानंतर त्यांपैकी अनेक लोक मंद झाले आणि काही जनांनी समझोता देखील केला. सन १९१८ पर्यंत त्यांचे प्रचार कार्य जवळजवळ बंदच झाले होते.

७. (अ) पेन्टेकॉस्ट सा.यु. ३३ मध्ये झालेल्या घटनेप्रमाणे सन १९१९ मध्ये कोणती घटना घडली? (ब) सन १९१९ पासून, यहोवाच्या सेवकांवर देवाचा आत्मा ओतण्याचा कोणता परिणाम झाला आहे?

७ तथापि, हे जास्त काळ चालले नाही. सन १९१९ पासून यहोवाने त्याच्या लोकांवर अशाप्रकारे पवित्र आत्मा ओतण्यास सुरवात केली ज्यामुळे सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टची आठवण झाली. अर्थातच, सन १९१९ मध्ये, निरनिराळ्या भाषांत बोलणे आणि मोठ्या वाऱ्‍याचा सुसाट्यासारखा झालेला नाद यांसारखे काही झाले नाही. १ करिंथकर १३:८ येथील पौलाच्या शब्दांवरून आपल्याला समजते, की चमत्कार घडण्याचा काळ केव्हाच संपला होता. तथापि, सन १९१९ मध्ये देवाच्या आत्म्याचा स्पष्ट पुरावा मिळाला; सीडर पॉईंट ओहायो, अमेरिका येथील एका अधिवेशनामध्ये विश्‍वासू ख्रिश्‍चनांनी पुन्हा एकदा आवेशाने राज्याचा प्रचार करण्याच्या कार्यास नव्याने सुरवात केली. सीडर पॉईंट येथे सन १९२२ मध्ये ते पुन्हा एकदा जमले आणि पुढील अपील ऐकून उत्तेजित झाले: “राजाची आणि त्याच्या राज्याची घोषणा करा, घोषणा करा, घोषणा करा.” पहिल्या शतकात झाले होते त्याचप्रमाणे देवाचा आत्मा ओतल्यामुळे झालेल्या परिणामांची नोंद घेण्यास या जगाला भाग पाडण्यात आले. प्रत्येक समर्पित ख्रिस्ती—स्त्री-पुरुष, वृद्ध-बालक—“भविष्यवाणी” करू लागले अर्थात “देवाची महत्कृत्ये” घोषित करू लागले. (प्रेषितांची कृत्ये २:११) पेत्राप्रमाणे त्यांनी नम्र लोकांना आर्जवले: “ह्‍या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या.” (प्रेषितांची कृत्ये २:४०) प्रतिक्रिया दाखवणाऱ्‍यांना हे करणे कसे शक्य होते? योएल २:३२ येथील योएलच्या शब्दांचे पालन करण्याद्वारे: “जो कोणी परमेश्‍वराचा [यहोवाचा] धावा करील तो तरेल.”

८. सन १९१९ पासून, देवाच्या इस्राएलाच्या कार्यहालचाली कशाप्रकारे वाढत गेल्या आहेत?

८ त्या सुरवातीच्या वर्षांपासून, देवाच्या इस्राएलाच्या कार्यहालचाली वाढतच गेल्या आहेत. अभिषिक्‍त लोकांवर शिक्का मारण्याचे काम फार पुढे गेले आहे आणि पृथ्वीची आशा असणाऱ्‍या नम्र लोकांचा मोठा लोकसमुदाय १९३० च्या दशकापासून दृष्टिपथात आला आहे. (प्रकटीकरण ७:३, ९) सर्वांना तातडीची जाण आहे कारण योएल २:२८, २९ येथील शब्दांची दुसरी पूर्णता दाखवून देते, की आपण यहोवाच्या आणखी एका अधिक भयंकर दिवसाच्या समीप आहोत; त्यावेळी जगव्याप्त धार्मिक, राजकीय आणि व्यापारी व्यवस्थीकरणांचा नाश करण्यात येईल. यहोवा आपल्याला वाचवेल या पूर्ण आत्मविश्‍वासानिशी ‘त्याच्या नावाचा धावा’ करण्याचे आपल्याकडे सबळ कारण आहे!

यहोवाच्या नावाचा धावा आपण कसा करावा?

९. यहोवाच्या नावाचा धावा करण्यात कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत?

९ यहोवाच्या नावाचा धावा करण्यात काय समाविष्ट आहे? योएल २:२८, २९ चा संदर्भ आपल्याला या प्रश्‍नाचे उत्तर देण्यास मदत करतो. उदाहरणार्थ, धावा करणाऱ्‍या प्रत्येक व्यक्‍तीचे यहोवा ऐकतोच असे नाही. यशया नामक आणखी एका संदेष्ट्याद्वारे यहोवाने इस्राएल राष्ट्राला म्हटले: “तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्यापुढे डोळे झाकितो; तुम्ही कितीहि विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही.” यहोवा त्याच्या स्वतःच्या राष्ट्राचे ऐकण्यास का नाही म्हणतो? तो स्वतः त्याचे उत्तर देतो: “तुमचे हात रक्‍ताने भरले आहेत.” (यशया १:१५) रक्‍तदोषी असणाऱ्‍यांकडे किंवा पाप आचरणाऱ्‍यांकडे यहोवा कान देणार नाही. यास्तव, पेत्राने पेन्टेकॉस्टच्या दिवशी यहुदी लोकांना पश्‍चात्ताप करण्याचे सांगितले. योएल २:२८, २९ येथील संदर्भावरून आपल्याला दिसून येते, की योएलसुद्धा पश्‍चात्ताप करण्यावर जोर देत होता. उदाहरणार्थ, योएल २:१२, १३ येथे आपण वाचतो: “आता तरी परमेश्‍वराचे वचन ऐका; मनपूर्वक मजकडे वळा; उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा. आपली वस्त्रे नव्हे, तर आपले हृदय फाडा आणि परमेश्‍वर तुमचा देव याजकडे वळा, कारण तो कृपाळू, कन्हवाळू, मंदक्रोध, दयासागर आहे.” सन १९१९ च्या सुरवातीपासूनच अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी या शब्दांच्या एकवाक्यतेत कार्य केले आहे. त्यांनी त्यांच्या चुकांबद्दल पश्‍चात्ताप व्यक्‍त केला आणि पुन्हा कधीही हातमिळवणी न करण्याचा किंवा मंद न होण्याचा निर्धारही केला. यामुळे देवाचा आत्मा ओतण्यास मार्ग मोकळा झाला. यहोवाच्या नावाचा धावा करण्याची आणि तो धावा यहोवाने ऐकावा अशी इच्छा बाळगणाऱ्‍या प्रत्येकाने असेच करण्यास हवे.

१०. (अ) खरा पश्‍चात्ताप म्हणजे काय? (ब) यहोवा खऱ्‍या पश्‍चात्तापाप्रती कशी प्रतिक्रिया दाखवतो?

१० हे लक्षात असू द्या, की “मला क्षमा करा,” इतकेच म्हणणे म्हणजे खरा पश्‍चात्ताप व्यक्‍त करणे नव्हे. इस्राएल लोक त्यांच्या भावनांतील तीव्रता व्यक्‍त करण्यासाठी स्वतःचे कपडे फाडत असत. पण यहोवा म्हणतो: ‘आपली वस्त्रे नव्हे, तर आपले हृदय फाडा.’ खरा पश्‍चात्ताप हृदयातून, आपल्या आतून येतो. खऱ्‍या पश्‍चात्तापामध्ये अपराधाचा त्याग करणे समाविष्ट आहे; आपण यशया ५५:७ येथे वाचतो: “दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्‍वराकडे वळो.” येशूने पापाची ज्याप्रकारे घृणा केली अगदी तशाप्रकारे पापाची घृणा करणे यात समाविष्ट आहे. (इब्री लोकांस १:९) तर मग, खंडणी बलिदानाच्या आधारावर क्षमा मिळावी म्हणून आपण यहोवावर भरवसा ठेवू शकतो कारण यहोवा “कृपाळू, कन्हवाळू, मंदक्रोध, दयासागर आहे.” तो आपल्या उपासनेचा स्वीकार करील, आपल्या आत्मिक अन्‍नार्पणाचा आणि पेयार्पणाचा तो स्वीकार करील. आपण त्याच्या नावाचा धावा करू तेव्हा तो आपले ऐकेल.—योएल २:१४.

११. खऱ्‍या उपासनेला आपल्या जीवनात कोणते स्थान मिळण्यास  हवे?

११ डोंगरावरील प्रवचनात येशूने आणखी एका गोष्टीकडे आपले लक्ष वेधले. त्याने तेव्हा म्हटले: “तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा.” (मत्तय ६:३३) आपण आपल्या उपासनेला हलके समजता कामा नये; आपल्या विवेकाची बोचणी कमी करण्यासाठी केवळ नाममात्र उपासना आपण करू नये. आपल्या जीवनात देवाच्या सेवेस प्रथम स्थान असण्यास हवे. यास्तव, योएलद्वारे यहोवा पुढे असे म्हणतो: “सियोनात कर्णा वाजवा; . . . लोकांस जमवा, मंडळी शुद्ध करा, वडिलांस जमवा, मुले व स्तनपान करणारी अर्भके यांसहि एकत्र करा; वर आपल्या खोलीतून व वधू आपल्या मंडपातून बाहेर येवोत.” (योएल २:१५, १६) नवविवाहित लोकांकरता लक्ष विचलित होणे हे स्वाभाविक आहे; त्यांचे केवळ एकमेकांकडेच लक्ष असते. परंतु त्यांच्याकरता सुद्धा यहोवाची सेवा करणे पहिल्या स्थानावर येते. आपण उपासनेत देवाजवळ एकत्र होऊन त्याच्या नावाचा धावा करावा याशिवाय इतर कोणत्याही गोष्टीला प्रथम स्थान मिळता कामा नये.

१२. मागील वर्षाच्या स्मारक विधीच्या अहवालात कोणती संभाव्य वाढ दिसून येते?

१२ ही गोष्ट लक्षात ठेवून आपण यहोवाच्या साक्षीदारांच्या १९९७ सेवा वर्षात दाखवलेल्या आकडेवारीचा विचार करू या. मागील वर्षी ५५,९९,९३१ हे राज्य प्रचारकांचे शिखर होते—खरोखरच स्तुतिकर्त्यांचा मोठा लोकसमुदाय! स्मारक विधीची उपस्थिती १,४३,२२,२२६ होती—प्रचारकांच्या संख्येपेक्षा जवळजवळ ८५ लाख जास्त. या आकड्यांवरून संभाव्य वाढ दिसून येते. या ८५ लाख लोकांपैकी अनेक आस्था दाखवणारे किंवा बाप्तिस्मा घेतलेल्या पालकांची मुले यहोवाच्या साक्षीदारांसोबत अभ्यास करत आहेतच. सभांना पहिल्यांदाच उपस्थित राहिलेल्या लोकांची संख्या सुद्धा फार मोठी होती. त्यांच्या उपस्थितीमुळे यहोवाच्या साक्षीदारांना एक उत्तम संधी मिळाली ज्यामुळे त्यांना त्या लोकांशी चांगल्याप्रकारे परिचित होता आले आणि आणखीन प्रगती करण्यासाठी त्यांना मदत करता आली. याशिवाय, काही लोक असे होते जे केवळ स्मारक विधीला उपस्थित राहतात आणि कदाचित काही सभांनाही येतात परंतु ते पुढे प्रगती करत नाहीत. अर्थात, अशा लोकांचे सभांसाठी हार्दिक स्वागत केले जाते. परंतु आम्ही त्यांना आर्जवतो, की त्यांनी योएलच्या भविष्यसूचक वचनांवर विचारपूर्वक मनन करावे आणि पुढील पावले उचलण्याचा विचार करावा ज्यामुळे त्यांना खात्री पटेल, की जेव्हा ते यहोवाच्या नावाचा धावा करतील तेव्हा यहोवा त्यांचे ऐकेल.

१३. आपण यहोवाच्या नावाचा धावा करत असल्यास, इतरांप्रती आपली कोणती जबाबदारी आहे?

१३ देवाच्या नावाचा धावा करण्याच्या आणखी एका पैलूवर प्रेषित पौलाने जोर दिला. रोमकरांना लिहिलेल्या आपल्या पत्रात त्याने योएलचे भविष्यसूचक शब्द उद्धृत केले: “जो कोणी प्रभुचे [यहोवाचे] नाव घेऊन धावा करील त्याचे तारण होईल.” त्यानंतर त्याने असा तर्क केला: “ज्याच्यावर त्यांनी विश्‍वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करितील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्‍वास कसा ठेवतील? आणि घोषणा करणाऱ्‍यांवाचून ते कसे ऐकतील?” (रोमकर १०:१३, १४) होय, अद्याप यहोवाचे नाव माहीत नसलेल्या अनेक लोकांना त्याच्या नावाचा धावा करण्याची गरज आहे. ज्यांना यहोवाविषयी आधीच माहीत झाले आहे त्यांच्यावर अशा लोकांना प्रचार करण्याची, एवढेच नव्हे, तर प्रयत्न करून त्यांना साहाय्य करण्याचीही जबाबदारी आहे.

आध्यात्मिक परादीस

१४, १५. यहोवाला आनंद होईल अशा पद्धतीने त्याचे नाव घेतल्यामुळे यहोवाचे लोक कोणत्या परादीसमय आशीर्वादांचा आनंद घेत आहेत?

१४ हा अभिषिक्‍त लोकांचा आणि दुसऱ्‍या मेंढरांचा दृष्टिकोन आहे आणि परिणामी यहोवा त्यांना आशीर्वादित करतो. “परमेश्‍वराने आपल्या देशाविषयी ईर्ष्या धरिली, तो आपल्या लोकांविषयी कळवळला.” (योएल २:१८) सन १९१९ मध्ये यहोवाने त्याच्या लोकांना पुनःस्थापित करण्याद्वारे आणि त्यांना त्याच्या आध्यात्मिक क्रियाशीलतेच्या क्षेत्रात आणण्याद्वारे त्यांच्याप्रती आवेश दाखवला आणि त्यांच्यावर करुणा केली. ते खरोखरच आध्यात्मिक परादीस आहे; योएलने या परादीसाचे वर्णन पुढील शब्दांत केले: “अगे भूमि, भिऊ नको, उल्लास कर, हर्ष कर, कारण परमेश्‍वराने महत्कृत्ये केली आहेत. वनपशूंनो, भिऊ नका, कारण वनातली कुरणे हिरवी होत आहेत, झाडे फळे देत आहेत, अंजिरांचे झाड व द्राक्षीचा वेल आपले सत्व देत आहेत. सीयोनपुत्रहो, परमेश्‍वर तुमचा देव याच्या ठायी उल्लास करा; हर्ष करा; कारण तुम्हास हितकर होईल इतका आगोटीचा पाऊस तो देतो; तो पहिली पर्जन्यवृष्टि म्हणजे आगोटीचा व वळवाचा पाऊस पाडितो. मग खळी गव्हाने भरून जातील, कुंडे नव्या द्राक्षरसाने व तेलाने उपळून जातील.”—योएल २:२१-२४.

१५ किती मोहक वर्णन! इस्राएलाच्या जीवनाचे तीन प्रमुख अन्‍नपदार्थ—धान्य, जैतुनाचे तेल आणि द्राक्षारस—यांचा भरपूर साठा होता आणि त्यासोबत प्राण्यांचे खूप कळप होते. आपल्या दिवसांतही हे भविष्यसूचक शब्द आध्यात्मिकरीत्या खरे झाले आहेत. आवश्‍यक असलेले सर्व आध्यात्मिक अन्‍न यहोवा आपल्याला देतो. देवाकडून येणाऱ्‍या या सुबत्तेमुळे आपल्याला आनंद होत नाही का? खरोखर, मलाखीने भाकीत केल्याप्रमाणे, देवाने ‘आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद आपल्याकरता वर्षावला आहे.’—मलाखी ३:१०.

व्यवस्थीकरणाचा अंत

१६. (अ) आपल्या काळाकरता यहोवाचा आत्मा ओतण्याचा काय अर्थ होतो? (ब) भविष्यात काय होणार आहे?

१६ देवाच्या लोकांच्या परादीसमय परिस्थितीबद्दल भाकीत केल्यानंतर योएल, यहोवाचा आत्मा ओतण्याविषयीची भविष्यवाणी करतो. पेत्राने पेन्टेकॉस्टच्या दिवशी भविष्यवाणी उद्धृत केली तेव्हा त्याने म्हटले, की ही भविष्यवाणी “शेवटल्या दिवसांत” पूर्ण झाली होती. (प्रेषितांची कृत्ये २:१७) त्यावेळी देवाचा आत्मा ओतण्याचा अर्थ यहुदी व्यवस्थीकरणाचा शेवटल्या काळात प्रवेश असा झाला होता. २० व्या शतकात देवाच्या इस्राएलावर देवाचा आत्मा ओतण्याचा अर्थ आहे, की आपण जगव्याप्त व्यवस्थीकरणाच्या शेवटल्या काळात जगत आहोत. ह्‍या गोष्टीला लक्षात घेता, भविष्यात काय होणार आहे? योएलची भविष्यवाणी आपल्याला पुढे असे म्हणते: “मी आकाशात व पृथ्वीवर रक्‍त, अग्नि व धुराचे लोळ अशी चिन्हे दाखवीन. परमेश्‍वराचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्‍तमय होईल.”—योएल २:३०, ३१.

१७, १८. (अ) यहोवाचा कोणता भयंकर दिवस जेरुसलेमवर आला? (ब) यहोवाच्या येणाऱ्‍या भयंकर दिवसाची खात्री आपल्याला काय करण्यास प्रेरित करते?

१७ सा.यु. ६६ या वर्षी, यहुदामध्ये हे भविष्यसूचक शब्द खरे होऊ लागले तेव्हा घटना अथकपणे सा.यु. ७० मध्ये यहोवाच्या भयंकर दिवसाच्या कळसास पोहंचू लागल्या. त्यावेळी यहोवाच्या नावाची स्तुती न करणाऱ्‍या लोकांमध्ये असणे किती भयावह होते! आज, अशाचप्रकारच्या घटना होणार आहेत, त्यावेळी या संपूर्ण जगाचे व्यवस्थीकरण यहोवाच्या हातांनी नाश केले जाईल. तरी देखील, त्यातून सुटका होणे शक्य आहे. भविष्यवाणी पुढे म्हणते: “तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्‍वराचा [यहोवाचा] धावा करील तो तरेल; कारण परमेश्‍वराने म्हटल्याप्रमाणे निभावलेले सीयोन डोंगरावर व यरुशलेमेत राहतील आणि परमेश्‍वराने ज्यांना बोलाविले ते बाकी उरलेल्यात राहतील.” (योएल २:३२) यहोवाचे साक्षीदार, यहोवाचे नाम जाणल्यामुळे खरोखरच कृतज्ञ आहेत आणि ते जेव्हा त्याचे नाव घेतात तेव्हा यहोवा त्यांचे नक्की तारण करील, असा त्यांचा पूर्ण विश्‍वास आहे.

१८ परंतु, यहोवाचा तो महान आणि प्रसिद्ध दिवस त्याच्या पूर्ण क्रोधासह या जगावर येईल, तेव्हा काय होईल? याची चर्चा शेवटच्या अभ्यास लेखात करण्यात येईल.

तुम्हाला आठवते का?

◻ यहोवाने त्याच्या लोकांवर पहिल्यांदा केव्हा त्याचा आत्मा ओतला?

◻ यहोवाच्या नावाचा धावा करण्यात कोणत्या काही गोष्टींचा समावेश होतो?

◻ यहोवाचा महान आणि प्रसिद्ध दिवस भौतिक इस्राएलावर केव्हा आला?

◻ यहोवा आज त्याच्या नावाचा धावा करणाऱ्‍यांना कशाप्रकारे आशीर्वादित करतो?

[१५ पानांवरील चित्र]

पेन्टेकॉस्ट सा.यु. ३३ मध्ये एका नवीन राष्ट्राचा जन्म झाला

[१७ पानांवरील चित्र]

या शतकाच्या सुरवातीस यहोवाने, योएल २:२८, २९ च्या पूर्णतेत पुन्हा एकदा त्याच्या लोकांवर त्याचा आत्मा ओतला

[१८ पानांवरील चित्र]

यहोवाच्या नावाचा धावा करण्यास लोकांना मदत देण्यास हवी

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा