“तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये”
“तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा.”—योहान १४:१.
१. येशूचे योहान १४:१ मधील शब्द अगदी समयोचित का होते?
तो इ. स. ३३ मधील निसान १४ हा दिवस होता. यरूशलेमात सूर्यास्तानंतर एका माडीवरील खोलीत पुरुषांचा एक लहानसा गट एकत्रित झाला होता. त्यांचा नेता त्यांना समारोपाची सूचना व उत्तेजन देत होता. थोडक्यात तो म्हणाला: “तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये.” (योहान १४:१) त्याचे ते शब्द समयोचित होते कारण लवकरच ताटातूट घडवून आणणाऱ्या घटना घडणार होत्या. त्या रात्री त्याला धरले गेले, त्याची चौकशी झाली व शेवटास त्याला मरण दंडास पात्र आहे असे ठरविले गेले.
२. तो दिवस इतका बिकट का होता आणि कशाने शिष्यांना मदत मिळाली?
२ तो दिवस इतिहासातील अत्यंत बिकट, सबंध मानवजातीच्या भवितव्यावर परिणाम करणारा होता असे मानण्यास उत्तम कारण आहे. नेता येशू याच्या यज्ञार्पित मरणाने कित्येक प्राचीन भविष्यवादांची पूर्णता केली आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवतील अशांच्या सार्वकालिक जीवनास्तव आधार पुरविला. (यशया ५३:५–७; योहान ३:१६) तरीपण त्या रात्रीच्या क्लेशकारक घटनांनी प्रेषितांना विस्मित मतिगुंग केले; ते गोंधळले व भयभीत झाले. पेत्राने सुद्धा येशूला नाकारले. (मत्तय २६:६९–७५) तथापि, विश्वासू प्रेषितांना वचन दिलेला मदतनीस, पवित्र आत्मा मिळाला तेव्हा ते धैर्यवान व खंबीर बनले. (योहान १४:१६, १७) अशाप्रकारे पेत्र व योहानाला कटु विरोधाचा सामना करावा लागला व त्यांना अटकेत ठेवले त्यावेळी त्यांनी देवाकडे त्याचे वचन “पूर्ण धैर्याने” बोलता यावे म्हणून मदतीसाठी प्रार्थना केली. त्यांची प्रार्थना ऐकली गेली.—प्रे. कृत्ये ४:१–३, २९–३१.
३. आज बहुतेक लोक इतके अस्वस्थ का झाले आहेत?
३ आज आम्ही अत्यंत त्रासलेल्या जगात राहात आहोत. या जुन्या व्यवस्थीकरणाचा नाश अत्यंत जलदपणे समीप येत आहे. (२ तिमथ्यी ३:१–५) कौटुंबिक जीवन व नैतिक दर्जे यात असणारी गंभीर अधोगति; विचित्र आजार, राजकारणी अस्थैर्यता, बेकारी, अन्नटंचाई, दहशतवाद आणि अण्वस्त्र युद्धाची भीती यातील धक्कादायक वाढ या गोष्टींनी लाखो लोक व्यक्तिगतपणे परिणामित झालेले व वैचारिक दृष्ट्या त्रासलेले बनले आहेत. भविष्याची भीती वाटूनच बरीच अंतःकरणे अस्वस्थ झाली आहेत. येशूने भाकित केल्यानुसार ‘राष्ट्रे घाबरी होऊन पेचात पडली आहेत, तसेच भयाने व जगावर कोसळणाऱ्या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे मरणोन्मुख होत आहेत.’—लूक २१:२५, २६.
४. कोणत्या गोष्टी ख्रिश्चनांना अस्वस्थ होण्यास कारणीभूत ठरू शकतात?
४ अशा या अस्वस्थ गोष्टींमुळे ख्रिश्चनांवर सुद्धा गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यांना धर्म अहंभाव किंवा नातेवाईक, शेजारी, सोबतचे कर्मचारी, शाळकरी मित्र व सरकारी अधिकारी यांच्या मार्फतच्या दबावाशी सामना करावा लागत असेल. (मत्तय २४:९) अशा या अडचणीच्या काळात आम्हाला शांत व न त्रासलेले असे कसे राहता येईल? आमचे पुढे जाणे खडतर बनत जाते त्यावेळी मनाची शांती कशी टिकवून ठेवता येईल? आम्हाला भविष्याचा सामना आत्मविश्वासाने कसा करता येईल? सर्वत्र भेडसावून सोडणाऱ्या चिंतेशी सामना करण्यामध्ये काय आम्हाला मदतगार ठरेल? आम्ही सध्या अशा वातावरणात आहोत ज्याविषयी येशूने योहान १४:१ मध्ये उत्तम सल्ला दिला. या कारणास्तव आपण त्याचे जवळून परीक्षण करू या.
आम्हाला चिंतेवर कशी मात करता येईल?
५. कोणता प्रोत्साहनदायक सल्ला शास्त्रवचने आम्हास देतात?
५ “तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देउ नये” हे प्रेमळ उत्तेजन दिल्यावर येशूने आपल्या प्रेषितांना म्हटले: “देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरहि विश्वास ठेवा.” (योहान १४:१) प्रेरित शास्त्रवचने आम्हाला या सारखेच काही आर्जवितात: “तू आपला भार यहोवावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल.” “आपला जीवितक्रम यहोवावर सोपूवन दे, त्याच्यावर भाव ठेव म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील.” (स्तोत्रसंहिता ५५:२२; ३७:५) पौलाने फिलिप्पैकरांना हा खडतर सल्ला दिला: “कशाविषयीही चिताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंति करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलिकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार . . . राखील.”—फिलिप्पैकर ४:६, ७.
६, ७. (अ) दबावास कमी करण्याचा एक मार्ग कोणता? (ब) आम्ही यहोवासोबत जवळचे नातेसंबंध कसे वाढवू शकतो?
६ समस्या वा गहन जबाबदाऱ्या या मुळे निर्माण होणारी चिंता किंवा काळजी आमची आरोग्य तसेच आमचा भाव यावर परिणाम करू शकते. तथापि एक वैद्यकीय तज्ज्ञ त्यांच्या डोन्ट पॅनिक या पुस्तकात म्हणतात: “ज्या वेळी लोक त्यांना प्रिय वाटणाऱ्या कोणाशी आपल्या समस्या बोलून दाखवितात . . . , त्यावेळी दबावाचा भार मोठ्या प्रमाणात उतरतो.” कोणा दुसऱ्या मानवाशी विचारविनिमय करण्याद्वारे असे घडू शकते तर मग देवासोबत बोलण्याद्वारे केवढी मोठी मदत मिळू शकते! यहोवा शिवाय आणखी प्रीतीवान असा दुसरा आम्हाला कोण आहे?
७ याच कारणास्तव त्याच्या सोबतचे व्यक्तिगत जिव्हाळ्याचे नाते आज ख्रिश्चनांना खूपच महत्वपूर्ण आहे. यहोवाच्या प्रौढ सेवकांना याची जाणीव आहे, त्यामुळेच या नातेसंबंधास कमकुवत करणाऱ्या जगातील लोकांचा सहवास किंवा गतकालीन मौजमजा टाळण्याची ते दक्षता घेतात. (१ करिंथकर १५:३३) दिवसातून एकदा किंवा दोनदा नव्हे तर वेळोवेळी प्रार्थनेद्वारे देवाचा संपर्क साधणे किती महत्वाचे आहे हे ते जाणतात. तरूण किंवा नव्या ख्रिश्चनांनी देवाच्या वचनाचा नियमित अभ्यास व मनन तसेच ख्रिस्ती सहवास व सेवा या करवी हे जिव्हाळ्याचे नाते उभारण्याचे खास जरूरीचे आहे. आम्हाला आर्जविले आहे: “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल.”—याकोब ४:८.
येशूने दिलेला सल्ला
८, ९. आर्थिक समस्यांच्या बाबतीत आम्हाला कोणता सरळ सल्ला अनुसरता येईल?
८ कित्येक देशात बेकारी व आर्थिक अडचणी या उद्विग्नतेच्या कारण आहेत. या चिंताच्या बाबतीत येशूने अत्यंत सरळ सल्ला दिला: “आपण काय खावे व काय प्यावे अशी आपल्या जिवाविषयी आणि आपण काय पांघरावे अशी आपल्या शरीराविषयी चिंता करीत बसू नका. अन्नापेक्षा जीवन व वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही?” (मत्तय ६:२५) होय, जीवन आणि शरीर किंवा सबंध व्यक्ति ही अन्न व वस्त्रापेक्षा महत्वाची आहे. आपल्या मुलभूत गरजा मिळविण्यामध्ये देव आपल्याला मदत देईल याची त्याचे सेवक खातरी बाळगू शकतात. यासाठीच येशूने हे उदाहरण दिलेः “आकाशातील पाखरांकडे निरखून पहा. ती पेरणी करीत नाही, कापणी करीत नाहीत की कोठारात साठवीत नाही. तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो तुम्ही त्या पेक्षा श्रष्ठ आहा की नाही?” (मत्तय ६:२६) देव पाखरांसाठी सर्व तरतुदी देतो मात्र तो मानवासंबंधाने, जो प्रत्यक्षात त्याला स्वतःला प्रिय आहे व ज्याच्यासाठी ख्रिस्ताने आपले जीवन दिले त्याच्याकडे दुर्लक्ष करतो असा विचार साजेसा वाटत नाही.
९ यावर अधिक भर म्हणून येशूने रानातील भूकमळांकडे निर्देश केला. ती कष्ट करीत नाहीत व सूतही कातीत नाही; तरीपण “शलमोन . . . आपल्या सर्व वैभवात त्यातला एकासारखा सजला नव्हता.” शलमोन राजाची कारकीर्द त्याच्या वैभवाखातर प्रसिद्ध होती. येशूने, तद्नंतर अगदी सांत्वनयुक्तपणे विचारले: “तो [देव] विशेषेकरून तुम्हाला पोषाख घालणार नाही काय?”—मत्तय ६:२८–३२; गीतरत्न ३:९, १०.
१०. (अ) येशूचे सांत्वनदायक शब्द कोणाला अनुलक्षून होते? (ब) भविष्यासंबंधाने त्याने कोणता सल्ला दिला?
१० तथापि, येशू पुढे जाऊन दाखवितो की हे सर्व काही “पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतीमत्व मिळविण्यास झट”णाऱ्यांसाठीच केवळ उपलब्ध आहे. जगभरात असे खरे ख्रिस्ती देवाचे राज्य खरेखुरे आहे अशी जाणीव बाळगून आहेत व त्याला ते आपल्या जीवनात प्रथम स्थानावर ठेवून आहेत. त्यांच्यासाठी येशूने दिलेला हा सल्ला लागू होतो: “ह्यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला. ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे.” (मत्तय ६:३३, ३४) दुसऱ्या शब्दात म्हणायचे तर प्रत्येक समस्या उद्भवते तशी हाताळा आणि भविष्याविषयी अवास्तव चिंता करू नका.
११, १२. काही ख्रिश्चनांना, आपल्या प्रार्थनेस अनुसरून यहोवाने मदत दिली हे कसे प्रत्ययास आले?
११ तरीपण बहुतेक लोकांना भविष्याविषयी चिंता वाटतेच. खासपणे घडत असलेल्या गोष्टी वाईट असतील तर नक्कीच वाटते. तथापि ख्रिश्चन यहोवापाशी विश्वासाने येऊ शकतात व त्यांनी आलेच पाहिजे. इलीनोरच्या प्रकरणाचा जरा विचार करा. तिचा पति खूपच आजारी होता आणि वर्षभर काम करू शकला नाही. तिला दोन लहान मुले व म्हाताऱ्या बापाचे संगोपन करायचे होते त्यामुळे तिला पूर्ण वेळेची नोकरी जमत नव्हती. त्यांनी मिळून यहोवाकडे मदतीसाठी प्रार्थना केली. हे झाल्यावर लगेच एके सकाळी त्यांना आपल्या दरवाज्यामागे एक पाकीट आढळले. त्यात मोठी रक्कम होती व ती, तिचा पती बरा होऊन पुन्हा कामाला जाईपर्यंत पुरेल इतकी निघाली. या समयोचित मदतीमुळे त्यांना मोठी कृतज्ञता वाटली. अर्थातच, गरजवंत असणाऱ्या प्रत्येक ख्रिश्चनाच्या बाबतीत अशीच गोष्ट घडू शकेल असे मानण्यास शास्त्रवचनीय आधार नाही, परंतु यहोवा आमचा आक्रोश ऐकेल व तो विविध मार्गाने आम्हाला मदत करण्याची क्षमता राखून आहे याची खात्री मात्र आम्हाला राखता येईल.
१२ दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या एका ख्रिस्ती विधवेला आपल्या दोन तरूण मुलांच्या उपजिविकेसाठी काम शोधावे लागले. तरीपण तिची ही अत्यंत इच्छा होती की तिला अर्ध्या दिवसाचे काम मिळावे म्हणजे उरलेला दिवस तिला आपल्या मुलांसाठी देता येईल. तिला काम मिळाल्यावर तिच्या मालकाने तिला राजीनामा देण्यास भाग पाडले कारण पूर्णवेळेचा काम करणारा कर्मचारी असावा हा निश्चय त्याने केला. आता परत काम नाही म्हणून या भगिनीने अत्यंत कळकळीने यहोवाकडे मदतीसाठी प्रार्थना केली. सुमारे तीन आठवड्यांनी तिच्या पूर्वीच्या मालकाने अर्ध्या दिवसाच्या कामावर येण्यासाठी तिला बोलावणे पाठविले. ती केवढी आनंदी झाली! आपल्या प्रार्थनांना यहोवाने उत्तर दिले आहे हे तिला सातत्याने जाणवले.
यहोवास विनंती करा
१३. (अ) “विनंती” याचा काय अर्थ होतो? (ब) विनंति करण्याविषयीची कोणती शास्त्रवचनीय उदाहरणे आहेत?
१३ “कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका” हा सल्ला दिल्यावर पौलाने पुढे जे म्हटले त्याची दखल घ्या. तो म्हणतो: “सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा.” (फिलिप्पैकर ४:६) येथे “विनंती”चा उल्लेख का? त्या शब्दाचा अर्थ, “कळकळीची याचना” किंवा “याचनाकारक प्रार्थना” असा होतो. मोठा त्रास किंवा संकटकाळी देवाला अत्यंत कळकळीने गयावया करणे हे त्यात समाविष्ट आहे. कैदेत असताना पौलाने आपल्या सहख्रिश्चनांना त्याच्या संबंधाने याचना करायला लावली म्हणजे त्याला “बेड्या पडलेला वकील” या अर्थी सुवार्तेची निर्भिड घोषणा करता येईल. (इफिसकर ६:१८–२०) रोमी लष्करी सुभेदार कर्नेल्य याने सुद्धा “देवाची नित्य याचना केली.” पण जेव्हा दिव्यदूताने त्याला म्हटले: “तुझ्या प्रार्थना व तुझे दानधर्म देवासमोर स्मरणार्थ आले आहे” तेव्हा त्याला किती शहारल्यासारखे वाटले असेल! शिवाय, पवित्र आत्म्याकरवी अभिषेक झालेला पहिला विदेशी अशी गणना होण्यात देखील त्याला किती धन्यता वाटली असेल!—प्रे. कृत्ये १०:१–४, २४, ४४–४८.
१४. यहोवास याचनायुक्त प्रार्थना केवळ एकदाच करायची असते की काय ते आपल्याला कसे कळेल?
१४ यहोवास केलेली ही याचनायुक्त प्रार्थना केवळ एकदाच करायची नसते हे लक्षात घेतले पाहिजे. येशूने डोंगरावरील आपल्या प्रसिद्ध प्रवचनात असे म्हटले: “मागत रहा म्हणजे तुम्हास दिले जाईल. शोधत रहा म्हणजे तुम्हास सापडेल. ठोकत रहा म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल.” (मत्तय ७:७) कित्येक पवित्र शास्त्र आवृत्या [मराठीप्रमाणे] हे वचन असे देतात: “मागा . . . शोधा . . . ठोका.” तथापि येथे असणारा मूळ ग्रीक शब्द ती कृति सतत चालू आहे या अर्थाचा विचार देतो.a
१५. (अ) अर्तहशश्त राजाला द्राक्षारस देताना नेहम्या का उदास होता? (ब) त्रोटक प्रार्थना सादर करण्याशिवाय नेहम्याने आणखी काय केले होते?
१५ पारसाचा राजा अर्तहशश्त याच्या दरबारी प्यालेबरदार म्हणून नेहम्या काम करीत होता त्यावेळी राजाने त्याला, तो इतका उदास का दिसतो याची विचारणा केली. नेहम्याने म्हटले की यरूशलेम उध्वस्त व ओसाड स्थितीत पडले आहे हे त्याला कळाले म्हणून तो उदास आहे. तेव्हा राजाने त्याला विचारले: “तुझी विनंति काय आहे?” तेव्हा नेहम्याने लागलेच यहोवाकडे मदतीसाठी प्रार्थना केली जी बहुधा त्रोटक व स्तब्ध असावी. यानंतर त्याने राजाला, यरूशलेमाकडे जाऊन आपले प्रिय शहर उभारण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंति केली. त्याची विनंति मान्य झाली. (नेहम्या २:१–६) तथापि त्या खडतर मुलाखतीच्या आधी नेहम्याने कित्येक दिवस यहोवाकडे मदतीकरता याचनायुक्त प्रार्थना व विनंत्या केल्या होत्या ते लक्षात घ्या. (नेहम्या १:४–११) तर या मध्ये तुम्हाला स्वतःसाठी काही धडा आढळतो का?
यहोवा उत्तर देतो
१६. (अ) अब्राहामाने कोणता खास हक्क अनुभविला? (ब) आमच्या प्रार्थनांना उत्तर देण्यास समर्थ ठरणारी अशी कोणती सामर्थ्ययुक्त साधने आम्हापाशी आहेत?
१६ यहोवा देवाबरोबर दूतांच्या मध्यस्थीने दळणवळण राखण्याचा आनंद अब्राहामाला वेळोवेळी मिळाला. (उत्पत्ती २२:११–१८; १८:१–३३) हे असे आज जरी घडत नसले तरी आम्हापाशी आज अशी सामर्थ्ययुक्त साधने आहेत जी अब्राहामापाशी नव्हती. यापैकीचे एक संपूर्ण पवित्रशास्त्र—जे मार्गदर्शन व सांत्वनाचा अक्षय स्रोत आहे. (स्तोत्रसंहिता ११९:१०५; रोमकर १५:४) बहुतेकदा, पवित्र शास्त्र आपल्याला गरज आहे ते मार्गदर्शन वा उत्तेजन देते; यहोवा आम्हाला ते इच्छित उतारे आठवून देण्यात मदत करतो. वेळोवेळी एखादी सूचि किंवा देवाने आपल्या संस्थेद्वारे पुरविलेल्या पवित्र शास्त्रीय प्रकाशनातील एखादे आम्हास हवे असणारे उत्तर देते. या प्रकाशनांची सविस्तर व कार्यक्षम सूचि ही आवश्यक असणारी माहिती शोधून काढण्यातील महत्वपूर्ण ठेवा आहे.
१७. आणखी इतर कोणत्या मार्गी यहोवा आमच्या प्रार्थनेचे उत्तर देईल, आणि दयावंत व समंजस ख्रिस्ती कशी मदत देऊ शकतात?
१७ आम्ही समस्येने, वाईट भावनेने त्रासलेले वा निराश झालेलो असलो तर आमच्या प्रार्थनांचे उत्तर इतर मार्गानेही येऊ शकते. उदाहरणार्थ, यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीतील किंवा अधिवेशनातील एखादे पवित्र शास्त्रीय भाषण आम्हाला गरज आहे ते “औषध” देईल. इतर वेळी कोणा ख्रिश्चनांबरोबर केलेले बोलणे आम्हाला जरुरीची गोष्ट पुरवू शकेल. कित्येकदा मंडळीतील वडील उत्तेजन व सल्ला देऊ शकतील. इतकेच काय पण प्रौढ, दयाळू व समजदार तसेच चांगले ऐकून घेणाऱ्या कोणा ख्रिस्ती बांधवाकडे आम्ही आपले अंतःकरण मोकळे केले तर त्यामुळे सुद्धा आम्हाला बरे वाटू लागेल. आमच्या बरोबर बोलणी करणारा पवित्र शास्त्रीय विचार प्रवर्तित करणारा असेल तर ते खास मदतीचे ठरते. अशाप्रकारची ही देवाणघेवाण आमचे मन व अंतःकरण यावरील मोठा भार दूर सारू शकते.—नीतीसूत्रे १२:२५; १ थेस्सलनीकाकर ५:१४.
१८. कोणते खास कार्य ख्रिश्चनांना उदासीन काळावर मात करण्यास मदत देतात व हे एका तरूण पायनियरला कसे साहाय्यक ठरले?
१८ सध्याच्या ‘शेवटल्या दिवसांच्या कठिण काळात’ उदासीनतेचे वेगवेगळे प्रकार दिसतात. (२ तिमथ्यी ३:१) अनेक कारणास्तव लोक निराश व धिक्कारीत बनतात. हे ख्रिश्चनांनाही घडू शकते. तो खराच दुःखद अनुभव असतो. तरीपण पुष्कळांना हे आढळले आहे की सुवार्तेचा प्रचार केल्यामुळे त्यांना या उदासीनतेच्या तत्कालिक तऱ्हेला दूर लोटता आले.b तुम्ही तसा प्रयत्न केला आहे का? कधी कधी काहीसे उदास वाटायला लागते त्यावेळी राज्य कार्याच्या एकाद्या प्रकारात सहभागी होण्याचा प्रयत्न करा. देवाच्या राज्याविषयी इतरांसोबत बोलणी केल्यामुळे तुमची नकारात्मक मनोवृत्ती सरळ होण्यास मदत मिळेल. यहोवाविषयी बोलणे व त्याच्या वचनाचा वापर करणे हे तुम्हाला त्याच्या आत्म्याची फलप्राप्ती—आनंद—देऊ शकेल व मग तुम्हाला वेगळेच वाटू लागेल. (गलतीकर ५:२२) एका तरूण पायनियरला आढळले की राज्य कार्यात स्वतःला मग्न ठेवल्यामुळे “इतरांच्या तुलनेत [तिच्या] समस्या खूपच लहान व तात्कालिक वाटतात.”
१९. ढासळते आरोग्य असणाऱ्या एका ख्रिश्चनाने नकारात्मक विचारांवर कशी मात केली?
१९ कधी कधी ढासळती आरोग्य स्थिति ज्यात काळज्या व समस्या यांचीही जोड असते ती नैराश्य प्रवृत्तीस वाढीस लावते. यामुळे कदाचित रात्रीच एकदम दचकून चिंतेने जाग येते. अशी ही गोष्ट ढासळते आरोग्य असणाऱ्या एका मध्यमवयीन ख्रिस्ती पुरुषाच्याबाबतीत घडत होती. पण त्याला, अंतःकरण ओतून केलेली प्रार्थना खरे सहाय्य देते हे आढळले. ज्या ज्या वेळी तो नैराश्याने जागा होई त्यावेळी तो यहोवास शांतपणे प्रार्थना करी. त्यामुळे त्याला बरे वाटू लागले. त्याचप्रमाणे आपल्या स्मरणाने २३व्या स्तोत्रासारखे सांत्वनदायक उतारे म्हणणे हेही आराम देणारे ठरल्याचे आढळले. प्रार्थनेच्या वा देवाच्या वचनाच्या प्रतिसादात कार्य करणारा यहोवाचा आत्मा नैराश्य मनस्थिती बदलून ती आनंदी बनवितो. कालांतराने त्या गृहस्थाला आपल्या समस्येचे तौलनिक व शांतरितीने परीक्षण करता आले व त्यावर कशी मात करावी आणि त्या सहन करण्यासाठी कसे दृढ व्हावे ते दिसले.
२०. प्रार्थनेस प्रतिसाद मिळण्यास कधी कधी विलंब लागत आहे असे का दिसते?
२० प्रार्थना कशी प्रतिक्रिया घडवून आणते त्याचे हे उदाहरण आहे. तथापि कधी कधी उपाय मिळण्यात विलंब लागत आहे असे वाटायला लागते. ते का? कदाचित त्या उत्तराला देवाची नियुक्त वेळ येईपर्यंत थांबून रहावे लागत असेल. काही प्रकरणात असे दिसते की देव त्याच्या याचकांना त्यांना केवढी चिंता वाटते, त्यांची इच्छा किती उत्कट आहे आणि निष्ठा किती अस्सल आहे ते दाखविण्याची अनुज्ञा देत असतो. एका स्तोत्रकर्त्याला असा हा अनुभव आला!—स्तोत्रसंहिता ८८:१३, १४; पडताळा २ करिंथकर १२:७–१०.
२१. यहोवाच्या साक्षीदारांपैकी एक असणे हे आज मोठा हक्क का आहे व या विषयीची रसिकता आम्ही कशी दाखवू शकतो?
२१ काहीही झाले तरी सर्वसमर्थ देवाशी प्रार्थनेद्वारा दळणवळण ठेवणे हा असा विश्वासास उभारक ठरणारा अनुभव आहे जो आम्हाला नैराश्यापासून आत्मविश्वासात आणतो. देव प्रार्थना ऐकतो व त्यांचे उत्तर देतो हे जाणणे किती सांत्वनदायक आहे बरे! फिलिप्पैच्या मंडळीला पौलाने लिहीले त्याप्रमाणे आम्ही आमच्या प्रार्थना व विनंत्या “आभार प्रदर्शना सह” सादर केल्या पाहिजेत. (फिलिप्पैकर ४:६) होय, आम्ही यहोवापुढे आमची अंतःकरणे कृतज्ञतेने व “सर्व स्थितीत उपकार स्तुती” द्वारे उघडी करावीत. (१ थेस्सलनीकाकर ५:१८) यामुळे जवळीकीचे उबदार बंध निर्माण होऊन आम्हाला शांती मिळेल. हे सध्याच्या त्रासिक व धोक्याच्या काळात यहोवाच्या सेवकांसाठी किती महत्वपूर्ण आहे हे आमचा पुढचा लेख दाखवितो.
[तळटीपा]
a न्यू वर्ल्ड ट्रान्स्लेशन ऑफ दी होली स्क्रिपचर्सच्या सहमतात चार्ल्स बी. विल्यम्स या वचनाचे भाषांतर असे देतात: “मागत राहा . . . शोधत राहा . . . ठोकत राहा म्हणजे तुम्हाला दार उघडले जाईल.”—दी न्यू टेस्टमेंट: ए ट्रान्स्लेशन इन द लँग्वेज ऑफ द पीपल.
b तात्कालिक दुःखी आविर्भाव दीर्घकालिन, गंभीर नैराश्या पेक्षा अगदी भिन्न असतो. नैराश्य ही भावनेची किंवा मानसिक स्थितीची अति गंभीर व गुंतागुंतीची पातळी असतो. पहा ऑक्टोबर २२, १९८७ चा अवेक! पृष्ठ ३–१६.
तुमचे उत्तर कसे असले?
◻ कोणकोणत्या गोष्टींमुळे ख्रिश्चनांना त्रास ओढावू शकतो?
◻ चिंतेवर मात करण्यास आम्हाला कशामुळे मदत मिळेल?
◻ देव ख्रिश्चनांच्या मुलभूत गरजा पुरविण्यात त्यांची मदत करील अशी खात्री ते का धरू शकतात?
◻ “विनंती” याचा अर्थ काय होतो व याला यहोवा कसा प्रतिसाद देतो त्याविषयीची गतकालीन उदाहरणे काय सांगतात?
◻ यहोवा आमच्या प्रार्थनांचे उत्तम कोणत्या विविध मार्गांनी देतो?
[१२ पानांवरील चित्रं]
‘तुमचा स्वर्गीय पिता पक्षांना भरवितो, तुम्ही त्यांच्या पेक्षा श्रेष्ठ नाही का?’