वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 १/१५ पृ. १५-२०
  • निष्ठावान हात वर करून प्रार्थना करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • निष्ठावान हात वर करून प्रार्थना करा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • प्रार्थना करण्याआधी विचार करा
  • देवापुढे आदरपूर्वक या
  • नम्र अंतःकरणाने प्रार्थना करा
  • मनापासून प्रार्थना करा
  • उपकारस्तुती करावयास विसरू नका
  • दोषभावनेमुळे प्रार्थना करण्याचे कधीच सोडू नका
  • सांत्वनासाठी प्रार्थना करा
  • निष्ठावान जन प्रार्थनेत तत्पर राहतील
  • तुमच्या प्रार्थना तुमच्याविषयी काय सांगतात?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • निरंतर प्रार्थना का केली पाहिजे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • इतरासमोर नम्र हृदयाने प्रार्थना करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • तुम्हाला देवाजवळ कसे येता येईल
    सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 १/१५ पृ. १५-२०

निष्ठावान हात वर करून प्रार्थना करा

“प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग व विवाद सोडून निष्ठावान हात वर करून प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे.”—१ तीमथ्य २:८, NW.

१, २. (अ) यहोवाच्या लोकांच्या प्रार्थनांच्या संदर्भात, १ तीमथ्य २:८ हे वचन कशाप्रकारे उपयुक्‍त आहे? (ब) आता आपण कोणते विषय विचारात घेणार आहोत?

यहोवा आपल्या लोकांकडून अशी अपेक्षा करतो, की त्यांनी त्याला आणि एकमेकांनाही निष्ठावान राहावे. निष्ठेचा प्रार्थनेशी संबंध आहे हे दाखवताना प्रेषित पौलाने लिहिले: “प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग व विवाद सोडून निष्ठावान हात वर करून प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे.” (१ तीमथ्य २:८) येथे पौल ख्रिस्ती लोक एकत्र येतात त्या “प्रत्येक ठिकाणी” केल्या जाणाऱ्‍या जाहीर प्रार्थनेच्या संदर्भात बोलत होता. मंडळीच्या सभेत देवाच्या लोकांच्या वतीने कोणी प्रार्थना करावी असे पौल सांगत होता? केवळ पवित्र, नीतिमान, आदरणीय आणि बायबलमध्ये सांगितल्यानुसार देवाप्रती आपल्या सर्व जबाबदाऱ्‍या पूर्ण करण्यात दक्ष असणाऱ्‍या पुरुषांनीच या प्रार्थना करावयाच्या होत्या. (उपदेशक १२:१३, १४) आध्यात्मिक आणि नैतिक दृष्ट्या त्यांचे आचरण शुद्ध असणे आणि यहोवा देवाला त्यांनी निर्विवादपणे समर्पित असणे अगत्याचे होते.

२ मंडळीच्या वडिलांनी तर खासकरून ‘निष्ठावान हात वर करून प्रार्थना’ केली पाहिजे. मनापासून केलेल्या प्रार्थनांतून ते देवाला असलेली आपली निष्ठा प्रगट करतात आणि या प्रार्थनांमुळेच त्यांना राग व विवाद टाळणे शक्य होते. खरे तर, ख्रिस्ती मंडळीच्या वतीने चारचौघांत प्रार्थना करण्याचा बहुमान ज्या कोणाला मिळतो, त्या प्रत्येकाने राग, कलुषितपणा यांपासून दूर राहिले पाहिजे आणि यहोवाला व त्याच्या संघटनेला त्याने सदैव निष्ठावान राहिले पाहिजे. (याकोब १:१९, २०) इतरांच्या वतीने चारचौघांत प्रार्थना करण्याचा बहुमान प्राप्त असलेल्यांच्यासाठी बायबलमध्ये आणखी कोणते मार्गदर्शन सापडते? तसेच, आपल्या वैयक्‍तिक आणि कौटुंबिक प्रार्थनांमध्ये बायबलची कोणती तत्त्वे आपण उपयोगात आणली पाहिजेत?

प्रार्थना करण्याआधी विचार करा

३, ४. (अ) चारचौघांत प्रार्थना करण्याआधी त्यावर विचार करणे कशाप्रकारे उपयोगी आहे? (ब) प्रार्थना किती लांब असाव्यात याविषयी बायबल काय सांगते?

३ आपल्याला लोकांपुढे प्रार्थना करायला सांगितले जाते तेव्हा प्रार्थना करण्याआधी आपल्याला निदान थोडा वेळ तरी विचार करता येईल. असे केल्यामुळे लांबलचक, रटाळ प्रार्थना न करता, सुयोग्य अशा महत्त्वाच्या मुद्द्‌यांचा उल्लेख आपल्याला प्रार्थनेत करता येईल. एकान्तात केलेल्या आपल्या वैयक्‍तिक प्रार्थना देखील आपण मोठ्याने करू शकतो. या प्रार्थनांना वेळेचे बंधन नाही. येशूने आपले १२ प्रेषित निवडले, त्याआधी तो रात्रभर प्रार्थना करत होता. पण तेच, त्याने आपल्या मृत्यूच्या स्मारक विधीची सुरवात करून दिली तेव्हा मात्र भाकर आणि द्राक्षरसावर त्याने अगदीच थोडक्यात प्रार्थना केल्याचे आपल्याला आढळते. (मार्क १४:२२-२४; लूक ६:१२-१६) आणि येशूच्या या थोडक्यात केलेल्या प्रार्थना देखील देवाला पूर्णपणे स्वीकार्य होत्या यात शंकाच नाही.

४ आपल्याला कधीकधी जेवणाआधी एखाद्या कुटुंबाच्या वतीने प्रार्थना करण्याचा बहुमान मिळतो. अशा प्रसंगी अगदी थोडक्यात प्रार्थना केली तरी चालण्यासारखे आहे—पण त्या प्रार्थनेत अन्‍नाबद्दल आभार मानायला विसरू नका. ख्रिस्ती सभा सुरू होण्याआधी किंवा त्या संपल्यावर मंडळीपुढे प्रार्थना करताना बऱ्‍याच मुद्द्‌यांचा उल्लेख करून, लांबलचक प्रार्थना करण्याची गरज नाही. येशूने शास्त्र्यांना दोषी ठरवले कारण ते “ढोंगाने लांबलचक प्रार्थना” करायचे. (लूक २०:४६, ४७) अर्थात, देवाला निष्ठावान असणारा कोणीही मुद्दामहून असे करणार नाही. काही प्रसंगी, लोकांपुढे प्रार्थना करतानाही काहीशी लांब प्रार्थना करणे योग्य असते. उदाहरणार्थ, एखाद्या संमेलनाच्या समारोपाची प्रार्थना करण्यासाठी नेमलेला वडील बऱ्‍याच निरनिराळ्या गोष्टींचा आपल्या प्रार्थनेत उल्लेख करू शकतो आणि यासाठी त्याने त्या मुद्द्‌यांचा प्रार्थना करण्याआधी विचार केला पाहिजे. पण ही प्रार्थनासुद्धा खूप लांबलचक असू नये.

देवापुढे आदरपूर्वक या

५. (अ) लोकांपुढे प्रार्थना करताना आपण कोणती गोष्टी आठवणीत ठेवली पाहिजे? (ब) प्रार्थनेत आदरपूर्वक आणि अदबीने बोलणे का महत्त्वाचे आहे?

५ लोकांपुढे प्रार्थना करताना आपल्याला त्या लोकांना उद्देशून बोलायचे नाही हे आपण आठवणीत ठेवले पाहिजे. उलट आपण पापी मनुष्य असून सर्वात महान प्रभू यहोवापुढे याचना करत असतो. (स्तोत्र ८:३-५, ९; ७३:२८) त्यामुळे, देवाला आवडणार नाही असे काहीही आपण आपल्या प्रार्थनेत म्हणू नये आणि त्याला आवडणार नाही अशाप्रकारेही काही बोलू नये म्हणून एक आदरयुक्‍त भय आपण बाळगले पाहिजे. (नीतिसूत्रे १:७) दाविदाने आपल्या एका भजनात म्हटले: “मी तर तुझ्या अपार कृपेने तुझ्या घरात येईन; तुझी भीड धरून तुझ्या पवित्र मंदिराकडे तोंड करून दंडवत घालीन.” (स्तोत्र ५:७) अशीच आपलीही मनोवृत्ती असेल, तर आपल्याला यहोवाच्या साक्षीदारांच्या सभेत सर्वांपुढे प्रार्थना करायला सांगितले जाते, तेव्हा आपण कशाप्रकारे बोलू? एखाद्या मानवी राजासोबत आपण बोलत आहोत असे समजा, साहजिकच आपण त्यांच्या उच्च पदाचा मान राखून त्याच्यापुढे मोठ्या अदबीने बोलू. मग “सनातन राजा,” यहोवा याला प्रार्थना करतेवेळी आपण आणखी किती मान राखून, अदबीने बोलायला पाहिजे, नाही का? (१ तीमथ्य १:१७) त्याअर्थी, “कसे काय, यहोवा,” “सप्रेम नमस्कार,” किंवा, “बराय मग,” यांसारखी वाक्ये आपण प्रार्थनेत म्हणू नये. देवाचा एकुलता एक पुत्र, येशू ख्रिस्त देखील कधी आपल्या स्वर्गातील पित्याशी अशाप्रकारे बोलल्याचे आपल्याला बायबलमध्ये कोठे आढळत नाही.

६. ‘अपात्री कृपेच्या राजासनाजवळ जाताना’ आपण काय आठवणीत ठेवले पाहिजे?

६ पौलाने म्हटले: “आपण धैर्याने कृपेच्या [“अपात्री कृपेच्या,” NW] राजासनाजवळ जाऊ.” (इब्री लोकांस ४:१६) येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवल्यामुळे आपण पापी असूनही “धैर्याने” यहोवाला प्रार्थना करू शकतो. (प्रेषितांची कृत्ये १०:४२, ४३; २०:२०, २१) पण “धैर्याने” बोलू शकतो म्हणून काही आपण देवासोबत गप्पा मारू शकत नाही; त्याचा अनादर होईल असेही काही आपण कधीच बोलू नये. आपल्या जाहीर प्रार्थना यहोवाने स्वीकाराव्यात असे जर आपल्याला वाटते, तर आपण त्याच्या महान पदाचा मान राखून, आदरपूर्वक प्रार्थना केल्या पाहिजे; त्याअर्थी, कोणत्याही घोषणा करण्यासाठी, विशिष्ट व्यक्‍तीची चूक लक्षात आणून देण्यासाठी किंवा ऐकणाऱ्‍या लोकांची कानउघडणी करण्यासाठी प्रार्थनांचा उपयोग करणे योग्य ठरणार नाही.

नम्र अंतःकरणाने प्रार्थना करा

७. यहोवाच्या मंदिराच्या समर्पण प्रसंगी प्रार्थना करताना शलमोनाने नम्रपणा कसा दाखवला?

७ केव्हाही प्रार्थना करताना, मग ती सर्वांपुढे असो की एकान्तात असो, बायबलमध्ये सांगितलेले एक महत्त्वाचे तत्त्व आपण आठवणीत ठेवले पाहिजे आणि ते म्हणजे, आपल्या प्रार्थनांतून आपण नम्र मनोभावाने त्या करत आहोत हे दिसून आले पाहिजे. (२ इतिहास ७:१३, १४) जेरुसलेममध्ये बांधलेल्या यहोवाच्या मंदिराच्या समर्पण प्रसंगी सर्व लोकांपुढे शलमोनाने अतिशय विनम्रभावाने प्रार्थना केली. शलमोनाने नुकतेच बांधून पूर्ण केलेले हे मंदिर पृथ्वीवर असलेल्या सर्वात शानदार इमारतींपैकी एक होते. पण तरीही तो प्रार्थनेत नम्रपणे म्हणतो: “देव या भूतलावर खरोखर वास करील काय? आकाश व नभोमंडळ यात तुझा समावेश होणे नाही; तर हे मंदिर मी बांधिले आहे यात तो कसा व्हावा?”—१ राजे ८:२७.

८. चारचौघांत प्रार्थना करताना कोणत्या काही गोष्टींतून नम्रपणा दाखवता येतो?

८ शलमोनाप्रमाणे, आपणही इतरांच्या वतीने सार्वजनिक प्रार्थना करतो तेव्हा ती नम्र अंतःकरणाने करावी. नम्रपणा हा आपल्या आवाजाच्या पट्टीवरूनही दिसून येतो; अर्थात आपण फुकटच धार्मिकतेचा आव आणून बोलतो आहे असे आपल्या आवाजावरून वाटता कामा नये. विनम्र प्रार्थना या कधीही दिखाऊ किंवा नाटकी वाटत नाहीत. त्या प्रार्थना करणाऱ्‍या व्यक्‍तीकडे नव्हे, तर ज्याला प्रार्थना केली जाते त्या देवाकडे लक्ष वेधतात. (मत्तय ६:५) याशिवाय, आपण प्रार्थनेत कोणत्या गोष्टींचा उल्लेख करतो, त्यावरूनही आपला नम्रपणा दिसून येतो. आपल्या बोलण्यावरून असे वाटू नये की काही गोष्टी आपल्याच मताप्रमाणे व्हाव्यात म्हणून जणू आपण देवाला फर्मावत आहोत. उलट आपण यहोवाला नम्रपणे अशी याचना करावी की तुझ्या पवित्र इच्छेनुसार जे आहे तेच होवो. याबाबतीत स्तोत्रकर्त्याची मनोवृत्ती अनुकरण करण्यासारखी आहे; त्याने यहोवाला कशी कळकळीने याचना केली ते पाहा: “हे परमेश्‍वरा, आम्ही तुला विनवितो की, आमचे तारण कर. हे परमेश्‍वरा, आम्ही तुला विनवितो की, आमचा उत्कर्ष कर.”—स्तोत्र ११८:२५; लूक १८:९-१४.

मनापासून प्रार्थना करा

९. मत्तय ६:७ यात येशूने दिलेले कोणते चांगले मार्गदर्शन आपल्याला मिळते आणि आपण त्याचा कसा उपयोग करू शकतो?

९ आपल्या कोणत्याही प्रार्थना, चारचौघांमध्ये केलेल्या असो की एकान्तात केलेल्या असो, त्या यहोवाच्या पसंतीस उतराव्यात असे जर आपल्याला वाटते, तर आपण त्या मनापासून केल्या पाहिजेत. त्याअर्थी आपण विचार न करता काही ठरलेले शब्द सवयीप्रमाणे पुन्हा पुन्हा बोलू नये. डोंगरावरील प्रवचनात येशूने याविषयी मार्गदर्शन देताना म्हटले: “तुम्ही प्रार्थना करिता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका, आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते.” दुसऱ्‍या शब्दांत सांगायचे झाल्यास येशू म्हणत होता: निरर्थक बडबड करू नका; अर्थहीन गोष्टी वारंवार म्हणू नका.—मत्तय ६:७; तळटीप, NW.

१०. एखाद्या गोष्टीबद्दल वारंवार प्रार्थना करणे का योग्य आहे?

१० अर्थात, काही विषयांबद्दल आपल्याला कदाचित वारंवार प्रार्थना करावी लागेल. पण हे चुकीचे नाही कारण स्वतः येशूने असे करण्याचे प्रोत्साहन दिले होते: “मागत राहा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधत राहा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोकत राहा म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल.” (मत्तय ७:७, NW) उदाहरणार्थ, यहोवाच्या आशीर्वादाने तुमच्या क्षेत्रात बरीच वाढ झाल्यामुळे कदाचित नव्या किंग्डम हॉलची गरज भासू लागली असेल. (यशया ६०:२२) या विशिष्ट गरजेविषयी आपल्या वैयक्‍तिक प्रार्थनांमध्ये किंवा यहोवाच्या लोकांच्या सभांमध्ये प्रार्थना करताना वारंवार उल्लेख करीत राहणे योग्यच ठरेल. याला “व्यर्थ बडबड” म्हणता येणार नाही.

उपकारस्तुती करावयास विसरू नका

११. वैयक्‍तिक आणि सार्वजनिक प्रार्थनांच्या संदर्भात फिलिप्पैकर ४:६, ७ या वचनात आपण काय शिकतो?

११ बरेच लोक प्रार्थना करतात ते केवळ देवाकडे काही मागण्यासाठीच; पण यहोवा देवावर आपले प्रेम असेल तर आपोआपच आपण आपल्या वैयक्‍तिक आणि जाहीर प्रार्थनांमध्ये त्याचे उपकार मानू आणि त्याची स्तुती करू. पौलाने लिहिले: “कशाविषयीहि चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.” (फिलिप्पैकर ४:६, ७) तेव्हा, प्रार्थना आणि विनंत्या करण्यासोबतच आपण यहोवाने आपल्याला दिलेल्या आध्यात्मिक आणि इतर आशीर्वादांबद्दल त्याचे आभार मानले पाहिजेत. (नीतिसूत्रे १०:२२) स्तोत्रकर्ता एका भजनात म्हणतो: “देवाला आभाररूपी यज्ञ कर; परात्परापुढें आपले नवस फेड.” (स्तोत्र ५०:१४) आणि दाविदाच्या दुसऱ्‍या एका प्रार्थनास्तोत्रात आपण हे भावपूर्ण शब्द वाचतो: “गीत गाऊन मी देवाच्या नावाचे स्तवन करीन. त्याचे उपकारस्मरण करून त्याचा महिमा वर्णीन.” (स्तोत्र ६९:३०) आपल्या वैयक्‍तिक आणि जाहीर प्रार्थनांतून आपणही असे करायला नको का?

१२. स्तोत्र १००:४, ५ आज कशाप्रकारे पूर्ण होत आहे आणि त्यामुळे आपण देवाची कशाबद्दल उपकारस्तुती करू शकतो?

१२ स्तोत्रकर्ता आपल्या भजनात म्हणतो: “[परमेश्‍वराचे] उपकारस्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा; त्याचे उपकारस्मरण करा; त्याच्या नावाचा धन्यवाद करा. कारण परमेश्‍वर चांगला आहे; त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यान्‌पिढ्या टिकते.” (स्तोत्र १००:४, ५) आज देशोदेशीचे लोक यहोवाच्या मंदिराच्या अंगणांत प्रवेश करत आहेत, यासाठी आपण त्याची उपकारस्तुती करू शकतो. तुमच्या मंडळीच्या किंग्डम हॉलसाठी तुम्ही देवाचे उपकार मानता का, आणि देवावर प्रेम करणाऱ्‍या लोकांसोबत नियमित येथे एकत्रित होऊन तुम्हाला त्यासाठी किती कदर आहे हे दाखवून देता का? शिवाय, सभांमध्ये आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याची उपकारस्तुती करण्यासाठी तुम्ही आनंदाने आणि उत्साहाने गीत गाता का?

दोषभावनेमुळे प्रार्थना करण्याचे कधीच सोडू नका

१३. दोषभावनेमुळे, आपण प्रार्थना करण्याच्या लायकीचे नाही असे जरी आपल्याला वाटले तरीही आपण यहोवाला प्रार्थना करण्याचे थांबवू नये हे बायबलमधल्या कोणत्या उदाहरणावरून दिसून येते?

१३ आपल्या हातून काहीतरी वाईट घडते, तेव्हा प्रार्थना करण्याच्या आपण लायकीचे नाही असे कदाचित आपल्याला वाटेल, पण तरीसुद्धा आपण देवाला कळकळीची प्रार्थना केली पाहिजे. यहुदी लोकांनी विदेशी स्त्रियांशी लग्न करून देवाविरुद्ध पाप केले तेव्हा एज्राने गुडघे टेकून देवापुढे निष्ठावान हात पसरून नम्र अंतःकरणाने प्रार्थना केली: “हे माझ्या देवा, मला लाज वाटते. मला तुझ्यापुढे तोंड वर करण्यास शरम वाटते, कारण आमचे अपराध वाढून आमच्या डोक्यावरून गेले आहेत व आमचे दोष वाढून गगनास जाऊन पोहंचले आहेत. आमच्या पूर्वजांच्या काळापासून आजपर्यंत आम्ही अतिशयित अपराधी आहो; आणि आमच्या अधर्मांमुळे आम्ही, . . . विपत्तीत पडलो आहो; आज आमची स्थिति अशीच आहे. . . . आमच्या अपराधास योग्य असलेल्या शिक्षेहून, हे देवा, तू आम्हास कमी शासन केले व आमच्यातल्या इतक्या लोकांस बचावून अवशेष ठेविले, तर आम्ही पुनः तुझ्या आज्ञा मोडून अमंगळ कृत्ये करणाऱ्‍या ह्‍या लोकांशी सोयरीक करावी काय? अशाने तू आम्हावर कोपायमान होऊन आम्हास भस्म करिशील आणि आमचा कोणी अवशेष उरू देणार नाहीस, असे नाही का तू करणार? हे परमेश्‍वरा, इस्राएलांच्या देवा, तू न्यायी आहेस, आम्ही केवळ निभावलेले अवशेष आहो; आज आमची स्थिति अशीच आहे; आम्ही तुजपुढे अपराधी आहो; यामुळे तुझ्यासमोर कोणास उभे राहता येत नाही.”—एज्रा ९:१-१५; अनुवाद ७:३, ४.

१४. एज्राच्या काळात स्पष्ट झाल्याप्रमाणे, देवाने आपल्याला क्षमा करण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

१४ पाप कबूल करण्यासोबतच आपल्याला जर त्याबद्दल पश्‍चात्ताप झाला आणि “पश्‍चात्तापास योग्य अशी फळे” आपल्यांत दिसून आली, तरच देव आपल्याला क्षमा करील. (लूक ३:८; ईयोब ४२:१-६; यशया ६६:२) एज्राच्या काळात, त्या यहुदी लोकांनी पश्‍चात्ताप करण्यासोबतच आपल्या विदेशी बायकांना त्यांच्या देशी परत पाठवून, केलेली चूक सुधारण्यासाठी पावले देखील उचलली होती. (एज्रा १०:४४; पडताळा २ करिंथकर ७:८-१३.) तशाचप्रकारे आपल्या हातून घडलेल्या गंभीर पापाची देवाने क्षमा करावी असे जर आपल्याला वाटत असेल, तर आपण प्रार्थनेत नम्रपणे आपले पाप कबूल करून पश्‍चात्तापाला योग्य अशी फळे उत्पन्‍न केली पाहिजेत. आपल्याठायी ही पश्‍चात्तापी वृत्ती आणि केलेली चूक सुधारण्याची इच्छा असेल तर आपण आपोआपच ख्रिस्ती वडिलांकडे जाऊन आध्यात्मिक साहाय्य मागायला प्रवृत्त होऊ.—याकोब ५:१३-१५.

सांत्वनासाठी प्रार्थना करा

१५. प्रार्थनेतून आपल्याला सांत्वन मिळू शकते हे हन्‍नाच्या उदाहरणावरून कसे दिसते?

१५ काही कारणामुळे आपण कष्टी असतो, तेव्हा आपल्याला प्रार्थनेतून सांत्वन मिळू शकते. (स्तोत्र ५१:१७; नीतिसूत्रे १५:१३) देवाला एकनिष्ठ असणाऱ्‍या हन्‍नाला हाच अनुभव आला. तिच्या काळात इस्राएलमध्ये कुटुंबे सहसा मोठी असायची, पण तिला मात्र मुलेच झाली नव्हती. तिचा पती एलकाना याला पनिन्‍ना या त्याच्या दुसऱ्‍या बायकोकडून पुत्र आणि कन्या झाल्या होत्या; पण पनिन्‍ना हन्‍नाला वांझोटी म्हणून नेहमी हिणवत असे. हन्‍नाने देवाला कळकळीची प्रार्थना केली; तिने देवाला वचन दिले की त्याने तिला एक पुत्र दिला तर ‘आयुष्यभर त्याने यहोवाची सेवा करावी म्हणून ती त्यास समर्पण करील.’ या प्रार्थनेमुळे आणि महायाजक एली याने दिलेल्या दिलास्यामुळे हान्‍ना ‘उदास राहिली नाही.’ कालांतराने तिला मुलगा झाला, तिने त्याचे नाव शमुवेल ठेवले. नंतर तिने त्याला यहोवाच्या मंदिरात सेवा करण्यासाठी देऊन टाकले. (१ शमुवेल १:९-२८) देवाने तिच्यावर केलेल्या दयेबद्दल आभार मानण्यासाठी तिने उपकारस्तुतीची प्रार्थना केली—आणि त्या प्रार्थनेत तिने यहोवा किती अद्वितीय देव आहे असे म्हणून त्याची स्तुती केली. (१ शमुवेल २:१-१०) हन्‍नाप्रमाणे आपणही प्रार्थनेतून सांत्वन मिळवू शकतो आणि खात्री बाळगू शकतो की देवाच्या इच्छेला अनुसरून असलेल्या आपल्या सर्व विनंत्या तो पुऱ्‍या करील. त्याच्याजवळ आपले मन मोकळे केल्यानंतर, आपण ‘उदास राहू नये,’ कारण तो एकतर आपल्यावर असलेला भार काढून टाकेल किंवा तो वाहण्यास आपल्याला सशक्‍त करील.—स्तोत्र ५५:२२.

१६. याकोबाप्रमाणे, आपल्यालाही भीती किंवा काळजी वाटते तेव्हा आपण प्रार्थना का केली पाहिजे?

१६ एखाद्या विशिष्ट परिस्थितीत आपल्याला भीती वाटत असेल, किंवा आपण दुःखी अथवा चिंताक्रांत असू; अशावेळेस आपण प्रार्थना करून देवाकडे सांत्वन मागायला कधीही मागेपुढे पाहू नये. (स्तोत्र ५५:१-४) आपला दुरावलेला भाऊ, एसाव याला भेटायला जाताना याकोबाला भीती वाटू लागली. तरीसुद्धा, त्याने प्रार्थना केली: “हे परमेश्‍वरा, माझे वडील अब्राहाम व इसहाक यांच्या देवा, तू मला सांगितले की, तू आपल्या देशी, आपल्या भाऊबंदांत परत जा; मी तुझे कल्याण करीन. तू करुणा व सत्यता दाखवून आपल्या दासासाठी जे काही केले आहे त्याला मी पात्र नाही; मी फक्‍त आपली काठी घेऊन ही यार्देन उतरून गेलो होतो, आणि आता माझ्या दोन टोळ्या झाल्या आहेत. मला माझा भाऊ एसाव याच्या हातातून सोडीव अशी मी प्रार्थना करितो; मला भीति वाटते की तो येऊन मला व मायलेकरांना मारून टाकील. तू मला वचन दिले आहे की, मी तुझे निश्‍चित कल्याण करीन, आणि तुझी संतति समुद्राच्या वाळूसारखी संख्येने अगणित करीन.” (उत्पत्ति ३२:९-१२) एसावाने याकोब आणि त्याच्यासोबतच्या माणसांवर हल्ला केला नाही. अशारितीने त्याप्रसंगी यहोवाने याकोबाचे ‘कल्याण केले.’

१७. स्तोत्र ११९:५२ नुसार, आपण कठीण परीक्षेतून जात असतो तेव्हा प्रार्थना आपल्याला कशाप्रकारे सांत्वनदायक ठरू शकते?

१७ प्रार्थना करताना, आपल्याला कदाचित देवाच्या वचनातून काही विशिष्ट गोष्टींची आठवण होऊन, त्यांतून आपल्याला सांत्वन मिळेल. सर्वात मोठ्या स्तोत्रात—म्हणजे संगीताच्या साथीने गावयाच्या सुमधुर प्रार्थनेत, जी कदाचित राज हिज्कियाने लिहिली असावी—तो म्हणतो: “हे परमेश्‍वरा, तुझे पुरातन निर्णय आठवून माझे समाधान [“सांत्वन,” NW] झाले आहे.” (स्तोत्र ११९:५२) एखाद्या अतिशय कठीण परीक्षेला तोंड देताना आपण विनम्र प्रार्थना करतो, तेव्हा आपल्याला कदाचित बायबलमधल्या अशा विशिष्ट तत्त्वाची किंवा नियमाची आठवण होईल की ज्यामुळे आपल्याला आपल्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेनुसार असलेल्या सरळ मार्गाने चालत राहण्यासाठी मदत मिळू शकेल; आणि आपण आपल्या स्वर्गीय पित्याची इच्छा पूर्ण करत आहोत या जाणिवेने आपल्याला सांत्वन मिळेल.

निष्ठावान जन प्रार्थनेत तत्पर राहतील

१८. ‘प्रत्येक निष्ठावान जन देवाची प्रार्थना करील’ असे का म्हणता येईल?

१८ यहोवा देवाला निष्ठावान असणारे सर्व ‘प्रार्थनेत तत्पर राहतील.’ (रोमकर १२:१२) दाविदाने ३२ व्या स्तोत्रात वर्णन केले आहे की पापाची क्षमा न मागितल्यामुळे त्याला किती यातना झाल्या आणि मग पश्‍चात्ताप करून देवापुढे आपले पाप कबूल केल्यावर त्याला किती हायसे झाले; हे स्तोत्र कदाचित बथशेबा हिच्यासोबत पाप केल्यानंतर दाविदाने लिहिले असावे. या भजनात दावीद पुढे म्हणतो: “ह्‍यासाठी [यहोवा केवळ मनापासून पश्‍चात्ताप करणाऱ्‍यांनाच क्षमा करतो म्हणून] तू पावण्याची संधी आहे तोच प्रत्येक निष्ठावान जन तुझी प्रार्थना करील.”—स्तोत्र ३२:६, NW

१९. आपण निष्ठावान हात वर करून प्रार्थना का केली पाहिजे?

१९ यहोवा देवासोबतचे आपले नाते जर आपल्याला महत्त्वाचे आणि मोलवान वाटत असेल, तर आपण त्याला येशूच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर आपल्याला दया दाखवण्याची भीक मागू. विश्‍वासाच्यायोगे आपण देवाच्या अपात्री कृपेच्या सिंहासनासमोर धैर्याने येऊन दयेची आणि गरजेच्या वेळी साहाय्याची याचना करू शकतो. (इब्री लोकांस ४:१६) खरोखर प्रार्थना करण्यासाठी किती असंख्य कारणे आहेत! तेव्हा आपण ‘निरंतर प्रार्थना’—आणि खासकरून वारंवार देवाची मनःपूर्वक उपकारस्तुती करूया. (१ थेस्सलनीकाकर ५:१७) रात्रंदिवस, निष्ठावान हात वर करून प्रार्थना करूया.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

◻ चारचौघांत प्रार्थना करण्याआधी त्यावर विचार करणे का चांगले असते?

◻ प्रार्थना करताना आपण आदरपूर्वक आणि अदबीने का बोलले पाहिजे?

◻ प्रार्थना करताना आपली मनोवृत्ती कशी असावी?

◻ प्रार्थना करताना आपण उपकारस्तुती करायला का विसरू नये?

◻ प्रार्थना सांत्वनदायक ठरू शकते हे बायबलमधून कसे दिसून येते?

[१७ पानांवरील चित्र]

यहोवाच्या मंदिराच्या समर्पण प्रसंगी शलमोन राजाने सर्व लोकांपुढे प्रार्थना करताना विनम्रपणा दाखवला

[१८ पानांवरील चित्रं]

हन्‍नाप्रमाणे, तुम्हाला देखील प्रार्थनेतून सांत्वन मिळू शकते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा