सुवर्ण नियम—तो काय आहे?
“पाहा! मी माझ्या शेजाऱ्यांना कसलाही त्रास देत नाही. जेवढा माझा संबंध येतो ते पाहता, ते त्यांना हवे ते करू शकतात. पण, ते कोणा अडचणीत असले तर माझ्याकडून होईल तेवढी मदत मी जरूर करीन.” हेच आपलेही मत आहे का? जेव्हा एखादा अनर्थ गुदरतो त्यावेळी दयेची कृत्ये करणे व निःस्वार्थपणे मदत पुरविणे यांना पूर येतो, आणि तो काही वेळा अनेकांठायी कुतुहल निर्माण करतो. पण एवढेच पुरे का?
आपण जर पालक आहात तर यात काय संशय की, तुम्ही तुमच्या मुलांना, सोबतच्या सवंगड्यांना चिरडीस आणण्याचे टाळण्याची ताकीद दिली असेल. आम्हापैकी अनेकांनी तरुण वयात या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे झालेल्या गोष्टीचे घाव आपल्या शरीरावर वागविले आहेत. होय, आम्ही पौर्वात्य तत्त्ववेते कन्फुशियसचे हे मत शिकलो की, “जे काही तुम्हाला केले जाऊ नये असे वाटते ते इतरांना करू नका.” पण तुम्ही हे ध्यानात आणले आहे का की, हे, ज्याला सुवर्ण नियम म्हणतात त्याचे नकारार्थी रुप आहे?
विधायक नियम
वेबस्टर यांची न्यू कॉलेजिएट डिक्शनरी, “सुवर्ण नियम” या संज्ञेविषयी म्हणतेः “तो एक नीतीविषयक वागणूकीबाबतचा नियम आहे, जो [मत्तय] ७:१२ आणि [लूक] ६:३१ मध्ये लिखित आहे व तो हे सांगतो की, कोणी दुसऱ्यासाठी असे काही करीत राहावे की, ज्याची अपेक्षा तो इतरांकडून स्वतःकरिता करीत असतो.” या पानाच्या तळाशी दिलेल्या चौकटीवर दृष्टीक्षेप टाका व हे विचारात घ्या की, पवित्र शास्त्राची निरनिराळी भाषांतरे मत्तयाचा ७ वा अध्याय व १२ व्या वचनातील मार्गदर्शक तत्त्वाच्या तेजास कसे चमकवीत आहेत.
कृपया हेही लक्षात घ्या की, एका भाषांतरापासून दुसऱ्याची शब्दरचना जरी वेगवेगळी असली तरी नियम विधायकतेत आहे. वास्तविकपणे, येशूने आधी डोंगरावरील प्रवचनात अगदी रास्तपणे म्हटले होतेः “सतत मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल; शोधत राहा म्हणजे तुम्हास सापडेल; ठोकत राहा म्हणजे तुम्हास उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधितो त्याला ते सापडते व जो ठोकितो त्यास उघडले जाते.” (मत्तय ७:७, ८) मागणे, शोधणे, व ठोठावणे या सर्व विधायक हालचाली आहेत. “याकरिता,” येशूने पुढे म्हटलेः “लोकांनी जसे तुम्हाबरोबर वर्तन करावे म्हणून तुमची इच्छा आहे, तसेच तुम्ही त्यांच्याबरोबर वर्तन करा.”—मत्तय ७:१२.
पवित्र शास्त्र हे दाखविते की, याच नियमानुसार आपल्या जीवनास वळण द्यावे असा उपदेश येशूचे शिष्य करीत होते. (रोमकर १५:२; १ पेत्र ३:११; ३ योहान ११) तरीपण, हे दुःखाने म्हणावे लागते आहे की, बहुतांशी लोक, मग ते नामधारी ख्रिस्ती असोत किंवा नसोत, या नियमाचे पालन करीत नाहीत असे मानवी नातेसंबंधातील स्थिती साक्ष देत आहे. याचा असा अर्थ होतो का की, नैतिकविषयक वागणूकीचा हा नियम बंधनकारक राहिलेला नाही? तो कालबाह्य झाला आहे का?
[३ पानावरील चौकट]
“जे सर्व काही तुम्हाकरिता इतरांनी करावे असे वाटते ते त्यांच्यासाठी तुम्ही करा.”—द होली बायबल, अनुवादक आर. ए. नॉक्स.
“इतरांनी जसे तुम्हास वागवावे असे अपेक्षिता तसे त्यांना तुम्ही वागवा.”—द न्यू टेस्टमेंट इन मॉडर्न इंग्लिश, जे. बी. फिलिप्सतर्फे.
“इतरांनी जे करावे व तुम्हासाठी जसे करावे असे इच्छिता तसेच तुम्ही करा व त्यांच्यासाठी करा.”—द ॲम्प्लीफाईड न्यू टेस्टमेंट.
“तुम्हाकरिता ज्या सर्व गोष्टी इतरांनी कराव्यात असे तुम्हास वाटते, त्या सर्व तुम्ही त्यांच्याकरिता करा.”—द न्यू टेस्टमेंट इन द लँग्वेज ऑफ टुडे, डब्ल्यु. एफ. बेकद्वारा लिखित.
“तर मग, सर्व गोष्टीत सहमानवांनी जसे तुम्हास वागवावे असे तुम्हास वाटते तसेच तुम्ही त्यांनाही वागवावे.”—द फोर गॉस्पल्स्, ई. वी. रियूद्वारे अनुवादित.
“इतरांनी जसा तुम्हाबरोबर व्यवहार करावा असे तुम्हास वाटते तसा त्यांच्याबरोबर करण्याची स्वतःला सवय लावा.”—द न्यू टेस्टमेंट, सी. बी. विल्यम्स्द्वारा.