वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ४/१५ पृ. ९-१४
  • सार्वकालिक जीवनाचा एकमेव मार्ग

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सार्वकालिक जीवनाचा एकमेव मार्ग
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • येशू ख्रिस्ताची भूमिका
  • अभिवचन दिलेली संतती
  • खंडणीमुळे काय साध्य होते
  • वैभवी आशा
  • देवाच्या अपेक्षा पूर्ण करणे
  • येशू ख्रिस्त—देवाने पाठवलेला?
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • येशू तारण करतो—कसे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • मानवजातीचे रक्षण करण्यासाठी देवाने काय केले
    सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
  • ख्रिस्ताची खंडणी तारण साधण्याचा देवाचा मार्ग
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ४/१५ पृ. ९-१४

सार्वकालिक जीवनाचा एकमेव मार्ग

“मार्ग, सत्य व जीवन मीच आहे.”—योहान १४:६.

१, २. येशूने सार्वकालिक जीवन मिळण्याच्या मार्गाची तुलना कशाशी केली आणि त्याच्या दृष्टान्ताचा अर्थ काय आहे?

येशूने त्याच्या सुप्रसिद्ध डोंगरावरील प्रवचनात सार्वकालिक जीवनाची तुलना एक अशा मार्गाशी केली ज्यावरून जाण्याकरता पहिल्यांदा एका दरवाजातून जावे लागते. याकडे लक्ष द्या, की येशूने अगदी जोर देऊन सांगितले, की त्या मार्गावर चालणे इतके सोपे नाही. तो म्हणतो: “अरुंद दरवाजाने आत जा; कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत; परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत.”—मत्तय ७:१३, १४.

२ तुम्हाला हा दृष्टान्त समजला का? यावरून हे स्पष्ट होत नाही का, की जीवनाकडे नेणारा रस्ता किंवा मार्ग एकच आहे आणि त्या मार्गापासून विचलित होऊ नये म्हणून आपल्याला खूप सावध राहावे लागेल? तर मग, सार्वकालिक जीवनाकडे नेणारा हा एकमेव मार्ग कोणता आहे?

येशू ख्रिस्ताची भूमिका

३, ४. (अ) आपल्या तारणाकरता येशूची एक महत्त्वपूर्ण भूमिका आहे, हे बायबल कसे सांगते? (ब) मानवजातीला सार्वकालिक जीवन मिळू शकते हे देवाने पहिल्यांदा केव्हा सांगितले?

३ हे स्पष्ट आहे, की जीवनाच्या त्या मार्गाच्या संदर्भात येशूची एक महत्त्वपूर्ण भूमिका आहे कारण प्रेषित पेत्राने म्हटले: “तारण दुसऱ्‍या कोणाकडून नाही; कारण जेणेकरून आपले तारण होईल असे [येशू शिवाय] दुसरे कोणतेहि नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही.” (प्रेषितांची कृत्ये ४:१२) त्याचप्रमाणे प्रेषित पौलानेही म्हटले: “देवाचे कृपादान आपल्या प्रभु येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.” (रोमकर ६:२३) स्वतः येशूनेही सांगितले, की सार्वकालिक जीवनाचा मार्ग केवळ त्याच्यापासून प्राप्त होईल. त्याने म्हटले: “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे.”—योहान १४:६.

४ त्यामुळे हे अत्यंत अगत्याचे आहे, की सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याकरता येशूच्या भूमिकेचा आपण स्वीकार करावा. तर मग, आपण त्याच्या भूमिकेचे बारकाईने परीक्षण करू या. तुम्हाला हे माहीत आहे का, की आदामाने पाप केल्यानंतर मनुष्याला सार्वकालिक जीवन मिळू शकते असे यहोवा देवाने केव्हा सुचवले? आदामाने पाप केल्यानंतर लगेचच. तर मग आपण याचे परीक्षण करू या, की मानवजातीचा तारणकर्ता या नात्याने येशू ख्रिस्ताच्या व्यवस्थेविषयी पहिल्यांदा कसे भाकीत करण्यात आले होते.

अभिवचन दिलेली संतती

५. हव्वेला फसविणाऱ्‍या सर्पाला आपण कसे ओळखू शकतो?

५ यहोवा देवाने अभिवचन दिलेल्या तारणकर्त्याची ओळख करून देण्याकरता लाक्षणिक भाषेचा उपयोग केला. हव्वेशी संभाषण करून तिला मना केलेले फळ खाण्याकरता फुसलावणाऱ्‍या ‘सर्पाला’ देवाने शिक्षा केली तेव्हा त्याने तारणकर्त्याची ओळख करून दिली. (उत्पत्ति ३:१-५) अर्थात, तो काही खरोखरचा साप नव्हता. तो एक शक्‍तिशाली आत्मिक प्राणी होता ज्यास बायबलमध्ये ‘जुनाट साप, दियाबल व सैतान’ असे म्हणण्यात आले आहे. (प्रकटीकरण १२:९) हव्वेला फसविण्याकरता सैतानाने या सर्पाकरवी तिच्यासोबत संभाषण केले. त्यामुळे देवाने सैतानाला शिक्षा फर्मावताना असे म्हटले: “तू व स्त्री, तुझी संतति व तिची संतति यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती [स्त्रीची संतती] तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडिशील.”—उत्पत्ति ३:१५.

६, ७ (अ) ‘संततीला’ जन्म देणारी स्त्री कोण आहे? (ब) अभिवचन देण्यात आलेली संतती कोण आहे आणि ती काय करते?

६ सैतानाशी वैर किंवा शत्रुत्व असलेली ही “स्त्री” कोण आहे? प्रकटीकरणाच्या १२ व्या अध्यायात ‘जुनाट सापाची’ ओळख करून देण्यात आली त्यासोबतच त्याचे वैर असलेल्या स्त्रीविषयी देखील सांगण्यात आले आहे. पहिल्या वचनात काय सांगण्यात आले आहे त्याकडे लक्ष द्या. ती स्त्री “सूर्यतेज पांघरलेली होती आणि तिच्या पायाखाली चंद्र व तिच्या मस्तकावर बारा ताऱ्‍यांचा मुगूट होता.” ही स्त्री देवाच्या एकनिष्ठ देवदूतांनी बनलेल्या स्वर्गीय संघटनेस सूचित करते आणि ती ज्या ‘पुसंतानाला’ प्रसवते ते देवाचे राज्य असून त्याचा राजा येशू आहे.—प्रकटीकरण १२:१-५.

७ तर मग, उत्पत्ति ३:१५ येथे सांगण्यात आलेली स्त्रीची “संतती” किंवा वारस कोण आहे जी सैतानाचे “डोके” फोडून त्याला ठेचून काढणार आहे? ती संतती स्वतः येशू होता, एका कुमारीच्या उदरी त्याने अद्‌भुतरित्या जन्म घेण्याकरता देवाने त्याला स्वर्गातून पाठवले. (मत्तय १:१८-२३; योहान ६:३८) प्रकटीकरणाचा १२ वा अध्याय सांगतो, की पुनरुत्थित स्वर्गीय राजा या नात्याने ही संतती अर्थात येशू ख्रिस्त, सैतानावर विजय मिळवण्याकरता आगेकूच करील आणि प्रकटीकरण १२:१० मध्ये सांगितल्यानुसार ‘देवाचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार’ स्थापन होईल.

८. (अ) देवाने त्याचा आरंभीचा उद्देश पूर्ण करण्याकरता कोणती नवी तरतूद केली? (ब) देवाच्या नवीन राज्यसरकारात कोणाकोणाचा समावेश असेल?

८ देवाने येशू ख्रिस्ताला दिलेले हे राज्य एक नवी व्यवस्था आहे आणि याद्वारे मनुष्यास या पृथ्वीवर सार्वकालिक जीवन, हा देवाचा आरंभीचा उद्देश पूर्ण होईल. सैतानाने बंड केल्यानंतर, यहोवाने दुष्टतेचे सर्व दुष्परिणाम काढून टाकण्याकरता लगेचच नवीन राज्यसरकाराची व्यवस्था केली. पृथ्वीवर असताना येशूने सांगितले, की या सरकारात तो एकटा शासन करणार नाही. (लूक २२:२८-३०) राज्य करण्याकरता बाकीच्यांना मनुष्यांमधून निवडण्यात येऊन ते स्वर्गीय येशूसोबत राज्य करतात आणि अशाप्रकारे स्त्रीच्या संततीचा साहाय्यकारी भाग होतात. (गलतीकर ३:१६, २९) येशूसोबत राज्य करणाऱ्‍या या सर्वांना पापमय मनुष्यांमधून निवडण्यात येते आणि त्यांची संख्या १,४४,००० इतकी आहे असे बायबल सांगते.—प्रकटीकरण १४:१-३.

९. (अ) येशूला एका मनुष्याच्या स्वरूपात पृथ्वीवर का यावे लागले? (ब) येशूने कशाप्रकारे सैतानाचे कार्य फोल केले?

९ पण त्या राज्याचा कारभार सुरू होण्यापूर्वी संततीचा मुख्य भाग, येशू ख्रिस्त याला पृथ्वीवर प्रकट होणे आवश्‍यक होते. का? कारण यहोवा देवाने त्याला ‘सैतानाची कृत्ये नष्ट [किंवा फोल] करण्यासाठी’ नियुक्‍त केले होते. (१ योहान ३:८) या कृत्यांपैकी एक म्हणजे त्याने आदामाला पाप करण्याकरता फुसलावले आणि त्यामुळे आदामाच्या सर्व संततीवर पाप आणि मृत्यूची शिक्षा ओढावली. (रोमकर ५:१२) येशूने त्याचे जीवन खंडणी देऊन सैतानाचे हे काम फोल केले. अशाप्रकारे मानवजातीला पाप आणि मृत्यूच्या शिक्षेतून सोडवण्याकरता आणि सार्वकालिक जीवनाचा मार्ग खुला करण्याकरता त्याने पाया घातला.—मत्तय २०:२८; रोमकर ३:२४; इफिसकर १:७.

खंडणीमुळे काय साध्य होते

१०. येशू आणि आदाम कशाप्रकारे समान होते?

१० येशूचे जीवन स्वर्गातून एका स्त्रीच्या गर्भात स्थानांतरीत करण्यात आले त्यामुळे एका परिपूर्ण मनुष्याच्या स्वरूपात त्याचा जन्म झाला, आदामापासून आलेल्या पापाची त्याच्यावर कोणतीही छाया नव्हती. तो पृथ्वीवर सार्वकालिक जीवन जगण्यास पूर्ण लायक होता. अशाचप्रकारे, आदामाला एका परिपूर्ण मनुष्याच्या स्वरूपात बनविण्यात आले होते जेणेकरून त्याने पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाचा आनंद लुटावा. येशू आणि आदाम या दोघांतील समानता लक्षात ठेवून प्रेषित पौलाने लिहिले: “पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला. शेवटला आदाम [येशू ख्रिस्त] जिवंत करणारा आत्मा असा झाला. पहिला मनुष्य भूमीतून म्हणजे मातीचा आहे, दुसरा मनुष्य स्वर्गातून आहे.”—१ करिंथकर १५:४५, ४७.

११. (अ) आदाम आणि येशू यांचा मानवजातीवर काय परिणाम झाला? (ब) येशूच्या बलिदानाविषयी आपला कोणता दृष्टिकोन असला पाहिजे?

११ पृथ्वीवर आजपर्यंत जन्मास आलेल्या मनुष्यांपैकी फक्‍त आदाम आणि येशू हे दोघेच परिपूर्ण होते. ही गोष्ट बायबलमधील वचनातून स्पष्ट होते. कारण येशूने ‘सर्वांसाठी मुक्‍तीचे मोल [“जुळणारी खंडणी,” NW] म्हणून स्वतःला दिले.’ (१ तीमथ्य २:६) येशू कोणाशी जुळत होता? परिपूर्ण आदामाशी! पहिल्या आदामाच्या पापामुळे संपूर्ण मानवी कुटुंबाला मृत्यूची शिक्षा मिळाली. ‘शेवटल्या आदामाच्या’ बलिदानामुळे पाप आणि मृत्यूपासून सुटका देणारा मार्ग मोकळा झाला जेणेकरून आपल्याला सर्वकाळ जगता यावे. येशूचे बलिदान किती अनमोल आहे! प्रेषित पेत्राने म्हटले: “सोने रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, तर निष्कलंक व निर्दोष कोंकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान रक्‍ताने तुम्ही मुक्‍त झाला आहा.”—१ पेत्र १:१८, १९.

१२. मृत्यूच्या शिक्षेतून आपली सुटका होण्याविषयी बायबल काय म्हणते?

१२ मानवी कुटुंबाची मृत्यूच्या शिक्षेतून कशाप्रकारे सुटका होईल याविषयी बायबल अगदी स्पष्टपणे सांगते. ते म्हणते: “जसे एकाच अपराधामुळे [आदामाच्या] सर्व माणसांना दंडाज्ञा होते, तसे नीतिमत्वाच्या एकाच निर्णयाने [येशूच्या मृत्यूपर्यंतच्या सचोटीपूर्ण जीवनामुळे] सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्त्व प्राप्त होते. कारण जसे त्या एकाच [आदामाच्या] मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले होते, तसे ह्‍या एकाच [येशूच्या] मनुष्याच्या आज्ञापालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील.”—रोमकर ५:१८, १९.

वैभवी आशा

१३. काही लोकांना सार्वकालिक जीवन का नको आहे?

१३ देवाने केलेली ही व्यवस्था पाहून आपण किती आनंदी होण्यास हवे! एका तारणकर्त्याची व्यवस्था करण्यात आली हे जाणून तुम्ही रोमांचित होत नाही का? अमेरिकेच्या एका प्रमुख शहरात एका वर्तमानपत्राने केलेल्या पाहणीत, “तुम्हाला सर्वकाळ जगायला आवडेल का?” हा प्रश्‍न विचारण्यात आला. तेव्हा ६७.४ टक्के लोकांनी “नाही” असे म्हटले. त्यांना सार्वकालिक जीवन का नको होते? आजचे जीवन समस्यांनी ग्रस्त आहे आणि हेच कदाचित त्यांच्या नकारार्थी उत्तराचे कारण असावे. एका व्यक्‍तीने म्हटले: “मी २०० वर्षांचा म्हातारा आहे ही कल्पनाच मला नकोशी वाटते.”

१४. सार्वकालिक जीवन ही पुरेपूर आनंदाची गोष्ट का आहे?

१४ आजारपण, वृद्धत्व आणि बाकीच्या समस्यांनी व्यापलेल्या जगात सर्वकाळ जगण्याविषयी बायबल सांगत नाही. निश्‍चितच नाही. कारण देवाच्या राज्याचा राजा या नात्याने येशू, सैतानाद्वारे आलेल्या सर्व समस्या कायमच्या काढून टाकील. बायबलमध्ये सांगण्यात आल्याप्रमाणे देवाचे राज्य सर्व दुष्ट राज्यांचे “चूर्ण करून त्यांस नष्ट करील.” (दानीएल २:४४) त्यावेळी, येशूने आपल्या अनुयायांना शिकवलेल्या प्रार्थनेच्या उत्तरात ‘देवाची इच्छा जशी स्वर्गात पूर्ण होते तशी पृथ्वीवरही होईल.’ (मत्तय ६:९, १०) पृथ्वीवरील सर्व दुष्टता काढल्यानंतर, देवाच्या नवीन जगात लोकांना येशूच्या बलिदानाचा पूर्ण लाभ मिळेल. होय, जे लोक त्या जगात जगण्यास पात्र ठरतील ते शारीरिकरीत्या पूर्णपणे सुदृढ असतील!

१५, १६. देवाच्या राज्यात परिस्थिती कशी असेल?

१५ देवाच्या नवीन जगात जगणाऱ्‍या लोकांच्या बाबतीत बायबलमधील एक गोष्ट पूर्ण होईल: “मग त्याचे शरीर बालकाच्यापेक्षा टवटवीत होते; त्याचे तारुण्याचे दिवस त्याला पुन्हा प्राप्त होतात.” (ईयोब ३३:२५) तेव्हा बायबलमधील दुसरे एक अभिवचन देखील पूर्ण होईल: “अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्‍याचे कान खुले होतील. तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील.”—यशया ३५:५, ६.

१६ जरा विचार करा: तेव्हा आपले वय ८०, ८०० किंवा त्यापेक्षा जास्त असले तरी आपण पूर्णपणे निरोगी असू. बायबलमधील अभिवचनानुसार हे असेल: “मी रोगी आहे असे एकहि रहिवासी म्हणणार नाही.” त्यावेळी पुढील अभिवचनाचीही पूर्णता झालेली असेल: “तो [देव] त्यांच्या डोळ्यांचे ‘सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी’ होऊन गेल्या.”—यशया ३३:२४; प्रकटीकरण २१:३, ४.

१७. देवाच्या नवीन जगात लोक कोणकोणती कामे करू शकतील?

१७ आपल्या निर्माणकर्त्याने शिकण्याची अमर्याद पात्रता असलेला जो मेंदू बनविला आहे त्याचा उपयोग देवाच्या नवीन जगात पूर्णपणे करता येईल. जरा विचार करा, त्यावेळी आपल्याला किती अद्‌भुत गोष्टी करता येतील! अपरिपूर्ण मानवाने या पृथ्वीवरील घटकांचा उपयोग करून कितीतरी वस्तू तयार केल्या आहेत. उदाहरणार्थ, सेल्युलर फोन, मायक्रोफोन, घड्याळे, पेजर, संगणक, विमान वगैरे. यांपैकी कोणतीही वस्तू त्यांना विश्‍वातल्या एखाद्या दूरच्या ठिकाणाहून आणावी लागली नाही. येणाऱ्‍या नवीन जगातील आपले जीवन कधी संपणार नाही त्यामुळे नवनवीन वस्तू तयार करण्याची आपली पात्रता कायमस्वरूपी राहील!—यशया ६५:२१-२५.

१८. देवाच्या नव्या जगात जीवन कधीही नीरस का होणार नाही?

१८ नव्या जगातील जीवन निरस नसेल! आजपर्यंत आपण हजारो वेळा जेवण केले आहे पण तरी प्रत्येक जेवणाच्या वेळी आपण आतुर असतोच. आपण जेव्हा परिपूर्ण होऊ तेव्हा पृथ्वीवरील स्वादिष्ट गोष्टींचा आपल्याला आणखीनच पुरेपूर स्वाद घेता येईल. (यशया २५:६) आपण पृथ्वीवरील प्राण्यांची देखरेख करण्याचा, मनोवेधक सूर्यास्त, डोंगरदऱ्‍या, नदीनाले या सृष्टिसौंदर्याचा निरंतर आनंद घेऊ. खरोखरच, देवाच्या नवीन जगातील जीवन कधीही कंटाळवाणे होणार नाही!—स्तोत्र १४५:१६.

देवाच्या अपेक्षा पूर्ण करणे

१९. देव देत असलेले जीवनाचे बक्षीस प्राप्त करण्याकरता आपल्याला काही अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील, हे योग्य का आहे?

१९ परादीसमध्ये सार्वकालिक जीवनाचे देव देत असलेले महान बक्षीस कोणत्याही प्रयत्नाविना मिळेल अशी आपण अपेक्षा करू शकतो का? देवाने आपल्याकडून काही अपेक्षा करावी हे योग्य नाही का? ते योग्यच आहे. खरे तर, देव हे बक्षीस आपल्याकडे फेकत नाही. यहोवा ते बक्षीस आपल्याकडे सोपवतो, त्यामुळे आपण पुढाकार घेऊन ते स्वीकारले पाहिजे. होय, त्याकरता प्रयत्नांची आवश्‍यकता आहे. त्या अधिपतीने येशूला जो प्रश्‍न विचारला तोच प्रश्‍न कदाचित तुमच्याही समोर असेल: “मला सार्वकालिक जीवन वतन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे?” किंवा फिलिप्पैमधील बंदिशाळेच्या नायकाने प्रेषित पौलाला जो प्रश्‍न विचारला तोच प्रश्‍न तुम्ही विचारला असेल: “माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे?”—मत्तय १९:१६; प्रेषितांची कृत्ये १६:३०.

२०. सार्वकालिक जीवनाकरता कोणती अत्यावश्‍यक अपेक्षा आहे?

२० येशूचा मृत्यू होण्याच्या एका रात्रीआधी त्याने त्याच्या स्वर्गीय पित्याला प्रार्थना केली आणि या प्रार्थनेद्वारे त्याने सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी पूर्ण करावयाची एक मूलभूत अपेक्षा कोणती हे दाखवून दिले: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.” (योहान १७:३) सार्वकालिक जीवनाची तरतूद करणाऱ्‍या यहोवाचे आणि आपल्याकरता मृत्यूला कवटाळणाऱ्‍या येशू ख्रिस्ताचे ज्ञान घेण्याची अपेक्षा करणे योग्य नाही का? अर्थात, त्यांचे ज्ञान घेण्याखेरीज आपल्याकडून आणखी काही अपेक्षा केली जाते.

२१. विश्‍वासानुसार चालण्याची अपेक्षा आपण पूर्ण करत आहोत हे आपण कसे दाखवतो?

२१ बायबल असेही म्हणते: “जो पुत्रावर विश्‍वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे.” त्यानंतर बायबल पुढे म्हणते: “परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही; पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो.” (योहान ३:३६) स्वतःच्या जीवनात बदल करण्याद्वारे आणि ते देवाच्या इच्छेप्रमाणे व्यतीत करण्याद्वारे तुम्ही हे दाखवून देता, की तुमचा त्याच्या पुत्रावर विश्‍वास आहे. करत असलेली वाईट कामे तुम्ही आता थांबवण्यास हवीत आणि देवाला आनंद देणारी अशी कामे करण्याकरता पावले उचलण्यास हवीत. प्रेषित पेत्राने दिलेली आज्ञा तुम्ही पाळण्यास हवी: “तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्‍चात्ताप करा व वळा; अशासाठी की, विश्रांतीचे समय प्रभूजवळून यावे.”—प्रेषितांची कृत्ये ३:१९.

२२. येशूच्या पावलांवर पाऊल ठेवण्यात कोणत्या गोष्टींचा समावेश होतो?

२२ येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवल्यानेच आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होऊ शकते हे आपण कधीही विसरता कामा नये. (योहान ६:४०; १४:६) येशूच्या “पावलावर पाऊल ठेवून” चालण्याद्वारे तुम्ही हे दाखवून देता, की तुमचा त्याच्यावर विश्‍वास आहे. (१ पेत्र २:२१) तसे करण्यात कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? देवाला प्रार्थना करताना येशूने म्हटले: “पाहा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.” (इब्री लोकांस १०:७) येशूच्या पावलावर पाऊल ठेवून देवाची इच्छा करण्याकरता स्वेच्छेने पुढे येणे आणि यहोवाला तुमच्या जीवनाचे समर्पण करणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर तुमच्या समर्पणाचे प्रतीक म्हणून तुम्हाला पाण्याचा बाप्तिस्मा घेण्याची आवश्‍यकता आहे; येशूनेही बाप्तिस्मा घेतला होता. (लूक ३:२१, २२) अशाप्रकारची पावले उचलणे पूर्णपणे योग्य आहे. प्रेषित पौलाने म्हटले: “ख्रिस्ताची प्रीति आम्हाला गळ घालते.” (२ करिंथकर ५:१४, १५, पं.र.भा.) कोणत्या प्रकारे? येशू, प्रेमामुळे स्वतःचे जीवन देण्याकरता प्रेरित झाला. हे जाणल्यामुळे आपण येशूवर विश्‍वास ठेवण्यास प्रवृत्त होऊ नये का? होय, दुसऱ्‍यांना मदत करण्याकरता स्वतःला वाहून घेण्याद्वारे त्याचे अनुकरण करण्याकरता त्याच्या प्रेमाने आपल्याला प्रवृत्त करण्यास हवे. ख्रिस्त देवाची इच्छा पूर्ण करण्याकरताच जगला; आपणही त्याच्याप्रमाणे करावे, येथून पुढे स्वतःपुरते जगू नये.

२३. (अ) ज्यांना जीवन प्राप्त होते त्यांची कशात भर पडते? (ब) ख्रिस्ती मंडळीतील लोकांकडून कशाची अपेक्षा केली जाते?

२३ इतकेच सर्वकाही नाही. बायबल म्हणते, की पेन्टेकॉस्ट, सा.यु. ३३ मध्ये ३,००० जणांचा बाप्तिस्मा झाला आणि त्यांच्यात “भर पडली.” कशात भर पडली? लूक म्हणतो: “ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात . . . तत्पर असत.” (प्रेषितांची कृत्ये २:४१, ४२) होय, ते बायबल अभ्यासाकरता आणि एकमेकांशी सहवास राखण्याकरता एकत्र येत आणि अशाप्रकारे ख्रिस्ती मंडळीमध्ये भर पडली किंवा ते मंडळीचे भाग झाले. आरंभीचे ख्रिस्ती आध्यात्मिक सूचनांकरता सभांना नियमितपणे उपस्थित राहत. (इब्री लोकांस १०:२५) आजही यहोवाचे साक्षीदार हेच करतात आणि त्यांच्यासह तुम्हीही सभांना उपस्थित राहावे अशी त्यांची इच्छा आहे.

२४. “खरे जीवन” काय आहे आणि ते, कसे आणि केव्हा वास्तवात उतरेल?

२४ आज लाखो लोक सार्वकालिक जीवनाकडे नेणाऱ्‍या अरुंद मार्गावर आहेत. या कठीण मार्गावर कायम राहण्याकरता खरोखर प्रयत्नांची गरज आहे! (मत्तय ७:१३, १४) पौलाने दिलेल्या अपीलकारक सूचनेवरून हे स्पष्ट होते: “विश्‍वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर, युगानुयुगाच्या जीवनाला बळकट धर; त्यासाठीच तुला पाचारण झाले आहे.” या संघर्षाकरता ‘खऱ्‍या जीवनाला बळकट धरण्याची’ आवश्‍यकता आहे. (१ तीमथ्य ६:१२, १९) ते जीवन आदामाच्या पापाद्वारे आलेल्या आजच्या दुःखद, यातनामय आणि क्लेषकारक जीवनासारखे नाही. तर, देवाच्या नवीन जगातील ते जीवन आहे; या व्यवस्थीकरणाच्या नाशानंतर यहोवा देवावर आणि त्याच्या पुत्रावर प्रेम करणाऱ्‍या लोकांना ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाचा लाभ मिळेल तेव्हा खऱ्‍या अर्थाने देवाच्या नवीन जगातील जीवन अनुभवता येईल. आपण सर्वांनी देवाच्या वैभवी जगातील जीवनाची—“खऱ्‍या जीवनाची”—सार्वकालिक जीवनाची निवड करावी.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

◻ उत्पत्ति ३:१५ येथील सर्प, स्त्री आणि संतान कोण आहेत?

◻ येशू आदामाशी कसा जुळतो आणि खंडणीमुळे काय शक्य झाले?

◻ देवाच्या नवीन जगात कोणत्या गोष्टीचा आनंद लुटण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहता?

◻ देवाच्या नवीन जगात जीवन व्यतीत करण्याकरता आपल्याला कोणत्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत?

[१०पानांवरील चित्र]

सर्वांना—लहानग्यांना आणि मोठ्यांना अंतहीन जीवन मिळवण्याकरता येशू हा एकमेव मार्ग आहे

[११ पानांवरील चित्र]

देवाच्या नियुक्‍त वेळी, वृद्ध त्यांच्या तारुण्यात परततील

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा