जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
७-१३ मार्च
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | १ शमुवेल १२-१३
“गर्विष्ठ होऊन मर्यादा ओलांडल्यामुळे अपमान होतो”
गर्व झाला की अप्रतिष्ठा आलीच
१७ हा उतारा वाचताना, शौलाची काही चूक नव्हती असे कदाचित आपल्याला वाटेल. कारण देवाचे लोक ‘पेचात सापडले’ होते, त्यांच्यावर “संकट” आले होते व त्यांना मदत करणे आवश्यक होते. (१ शमुवेल १३:६, ७) अर्थात, कोणाला मदत करण्यासाठी पुढाकार घेणे चुकीचे नाही. पण यहोवा आपले अंतःकरण जाणतो हे लक्षात ठेवा; आपल्या अगदी आतल्या भावना, आपल्या मनातले हेतू तो जाणतो. (१ शमुवेल १६:७) बायबलमध्ये याविषयी स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही, पण शौलाच्या मनातल्या भावना यहोवाने ओळखल्या असतील. उदाहरणार्थ, शौलाने असंयमीपणे केलेली ही कृती गर्वामुळे होती हे कदाचित यहोवाने ओळखले असेल. इस्राएल राष्ट्राचा मी राजा असून हा म्हातारा संदेष्टा मला इतके दिवस थांबायला लावतो काय? या विचाराने शौलाला राग आला असेल. शमुवेलाने उशीर लावल्यामुळे आता आपल्याला होमार्पण करण्याचा हक्क आहे असा शौलाने विचार केला. आणि म्हणून त्याला देण्यात आलेल्या स्पष्ट सूचनांचे त्याने उल्लंघन केले. याचा परिणाम काय झाला? शमुवेलाने शौलाच्या कृतीची प्रशंसा केली नाही. उलट त्याने शौलाला शिक्षा सुनावली: “तुझे राज्य कायम राहावयाचे नाही . . . कारण परमेश्वराने तुला केलेली आज्ञा तू पाळिली नाही.” (१ शमुवेल १३:१३, १४) अशारितीने पुन्हा एकदा, गर्विष्ठपणे मर्यादा ओलांडल्यामुळे अप्रतिष्ठा पदरी पडली.
तुमच्या आज्ञापालनाने यहोवाला आनंद वाटतो
८ शौल राजाविषयीचा बायबलमधील अहवाल, आज्ञापालन किती महत्त्वाचे आहे हे दाखवतो. सुरुवातीला शौल हा एक नम्र व निराभिमानी, “आपल्या दृष्टीने क्षुद्र” असा शासक होता. पण कालांतराने तो गर्विष्ठपणा व अयोग्य तर्कवादाच्या प्रभावात येऊन निर्णय घेऊ लागला. (१ शमुवेल १०:२१,२२; १५:१७) एकदा शौलाला युद्धात पलिष्टी लोकांचा सामना करायचा होता. शमुवेलाने त्याला आपण येऊन यहोवाला यज्ञ अर्पण करीपर्यंत व पुढील सूचना देईपर्यंत थांबून राहण्यास सांगितले. पण शमुवेल हा अपेक्षित वेळेच्या आत आला नाही. हळूहळू लोक पांगू लागले. हे पाहून शौलाने “स्वतःच होम केला.” यहोवाला ही गोष्ट मुळीच आवडली नाही. शेवटी शमुवेल आला तेव्हा शौल राजा आपण केलेल्या आज्ञाभंगाबद्दल सबब देऊ लागला. त्याने म्हटले की शमुवेलाला उशीर झाल्यामुळे ‘परमेश्वराचा प्रसाद मागण्याकरता माझ्या मनाविरुद्ध वागणे भाग पडून मी होम केला.’ शमुवेलाने येऊन यज्ञ देईपर्यंत थांबून राहण्याची जी आज्ञा देण्यात आली होती तिचे पालन करण्यापेक्षा राजा शौलाला तो यज्ञ अर्पण करणे जास्त महत्त्वाचे वाटले. शमुवेल त्याला म्हणाला: “तू मूर्खपणा केला; तुझा देव परमेश्वर याने तुला केलेली आज्ञा तू मानिली नाही.” यहोवाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्यामुळे शौलाला आपले राजपद गमवावे लागले.—१ शमुवेल १०:८; १३:५-१३.
आध्यात्मिक रत्नं शोधा
तुम्ही यहोवाच्या प्रेमळ मार्गदर्शनावर चालणार का?
१५ मानवी राजा यहोवापेक्षा जास्त खरा व भरवशालायक असेल असा त्या लोकांनी विचार केला असावा का? असे असल्यास ते एका ‘अवास्तविक गोष्टीच्या’ मागे जात होते! आणि यामुळे सैतानापासून असणाऱ्या इतर अनेक ‘अवास्तविक गोष्टींच्या’ मागे लागण्याचा त्यांना धोका होता. मानवी राजे त्यांना सहजपणे मूर्तींची पूजा करायला लावू शकत होते. मूर्तिपूजक असा चुकीचा विचार करतात की, लाकूड किंवा दगडांपासून बनवलेल्या मूर्ती, सर्व काही निर्माण करणाऱ्या अदृश्य यहोवा देवापेक्षा जास्त खऱ्या व भरवशालायक आहेत. पण प्रेषित पौलाने सांगितल्याप्रमाणे मूर्ती ही “काहीच नाही.” (१ करिंथ. ८:४, पं.र.भा.) मूर्ती पाहू शकत नाहीत, बोलू शकत नाहीत किंवा काहीही करू शकत नाहीत. आपण त्यांना पाहू शकतो व स्पर्श करू शकतो हे खरे आहे, पण त्यांची उपासना केल्यास आपण एका अवास्तविक गोष्टीच्या मागे जात असू ज्यामुळे आपल्यावर संकट ओढवेल.—स्तो. ११५:४-८.
१४-२० मार्च
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | १ शमुवेल १४-१५
“बलिदानापेक्षा आज्ञा पाळणं चांगलं”
तुमच्या आज्ञापालनाने यहोवाला आनंद वाटतो
४ आपल्याजवळ जे काही आहे ते सृष्टिकर्ता या नात्याने यहोवाच्याच मालकीचे आहे. तेव्हा, आपण त्याला काही देऊ शकतो का? होय, आपण अतिशय मौल्यवान असे काहीतरी त्याला देऊ शकतो. ते काय? यहोवानेच दिलेल्या पुढील आदेशावरून आपण या प्रश्नाचे उत्तर मिळवू शकतो: “माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणाऱ्यास मी प्रत्युत्तर देईन.” (नीतिसूत्रे २७:११) तर आपण देवाला जी गोष्ट देऊ शकतो ती म्हणजे आपले आज्ञापालन. आपली परिस्थिती व पार्श्वभूमी वेगवेगळी असली तरीसुद्धा, मानव कठीण परिस्थितीत देवाला निष्ठावान राहणार नाहीत हा सैतानाचा द्वेषपूर्ण दावा आपण आज्ञाधारक राहण्याद्वारे खोटा ठरवू शकतो. खरे तर हा आपल्याकरता किती मोठा बहुमान आहे!
इन्साइट-२ ५२१ ¶२
आज्ञा पाळणं
आपण देवाची आज्ञा मोडली आणि चूक भरून काढण्यासाठी काही चांगल्या गोष्टी केल्या, तर ते योग्य आहे असा विचार करणं चुकीचं आहे. अशा व्यक्तीवर यहोवा कधीच खूश होत नाही. आणि हीच गोष्ट शमुवेलनेसुद्धा शौलला सांगितली. तो म्हणाला: “यहोवाची आज्ञा पाळल्याने यहोवाला जितका आनंद होतो, तितका होमार्पणांनी आणि बलिदानांनी होतो का? पाहा! बलिदानापेक्षा आज्ञा पाळणं चांगलं, आणि एडक्यांच्या चरबीपेक्षा ऐकणं चांगलं.“ (१शमु १५:२२) आपण जेव्हा यहोवाची आज्ञा पाळत नाही तेव्हा खरंतर त्यातून हे दिसून येतं, की आपला यहोवावर आणि तो जे काही सांगतो त्यावर भरवसा नाही. आणि म्हणूनचं अशा व्यक्तीची तुलना बायबलमध्ये जादूटोणा आणि मूर्तिपूजा करणाऱ्यासोबत केली आहे. (१शमु १५:२३; रोम ६:१६ पडताळून पाहा.) आपण जर एखादी गोष्ट करणार नसलो, तर फक्त नावापुरतं ‘हो मी करेन’ असं म्हणण्याला काही अर्थ नाही. आपल्याला एखादी गोष्ट करायला सांगितली आणि आपण ती करत नाही, तेव्हा आपण हे दाखवतो की आपल्याला त्या व्यक्तीवर भरवसा नाही आणि आपण तिचा आदर करत नाही.—मत्त २१:२८-३२.
आध्यात्मिक रत्नं शोधा
टेहळणी बरूज१७.०९ १० ¶१०
यहोवाच्या कनवाळूपणाचं अनुकरण करा
कनवाळूपणा दाखवणं नेहमीच योग्य नाही. उदाहरणार्थ, शौल राजाला कदाचित असं वाटलं असावं, की अमालेकचा राजा, अगाग याचा जीव वाचवून आपण कनवाळूपणा दाखवत आहोत. पण, मुळात अगाग राजा हा देवाच्या लोकांचा शत्रू होता. तसंच, यहोवाने खरंतर शौलला अमालेकी लोकांसह त्यांच्या सर्व पशूंचाही नाश करायला सांगितलं होतं. पण, शौलने अमालेकी लोकांच्या पशूंचा नाश केला नाही. शौलने यहोवाची आज्ञा मोडल्यामुळे यहोवाने त्याला राजा म्हणून नाकारलं. (१ शमु. १५:३, ९, १५) यहोवा सर्वात नीतिमान न्यायाधीश असून तो लोकांची मने ओळखू शकतो. त्यामुळे, कनवाळूपणा केव्हा दाखवायचा आणि केव्हा नाही हे त्याला चांगलं माहीत आहे. (विलाप. २:१७; यहे. ५:११) त्याच्या आज्ञांचं पालन न करणाऱ्या लोकांचा तो लवकरच नाश करेल; दुष्टांना दयामाया दाखवण्याची ती वेळ नसेल. (२ थेस्सलनी. १:६-१०) उलट दुष्टांचा नाश करण्याद्वारे, यहोवा नीतिमान लोकांवर करुणाच करेल.
२१-२७ मार्च
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | १ शमुवेल १६-१७
“हे युद्ध यहोवाचे आहे”
टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१६, क्र.४ ११ ¶२-३
“हे युद्ध परमेश्वराचे आहे”
दावीद गल्याथाशी लढू शकतो असा शौलाला भरवसा व्हावा, यासाठी दाविदाने तो सिंहासोबत आणि अस्वलासोबत कसा लढला हे शौलाला सांगितलं. दावीद स्वतःबद्दल बढाई मारत होता का? नाही, कारण दाविदाला दोन्ही वेळा तो कसा जिंकला हे माहीत होतं. तो म्हणाला: “ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडवले तोच मला या पलिष्ट्यांच्या हातातून सोडवेल.” शेवटी नाइलाजाने शौल त्याला म्हणाला: “जा, परमेश्वर तुझ्याबरोबर असो.”—१ शमुवेल १७:३७.
तुमच्याकडेही दाविदासारखा विश्वास असावा असं तुम्हाला वाटतं का? दाविदाचा विश्वास, ही फक्त त्याच्या मनातली कल्पना नव्हती. तर ज्ञानामुळे आणि अनुभवामुळे त्याचा देवावर विश्वास होता. यहोवा प्रेमळ संरक्षक आणि दिलेली वचनं पाळणारा देव आहे हे त्याने अनुभवलं होतं. आपल्यालाही जर असा विश्वास हवा असेल, तर आपल्याला बायबलमधून देवाबद्दल शिकत राहिलं पाहिजे. आपण जे शिकतो ते जीवनात लागू केल्याने आपल्याला त्याचा फायदा होतो. त्यामुळे आपलादेखील विश्वास बळकट होतो.—इब्री लोकांस ११:१.
टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१६, क्र.४ ११-१२
“हे युद्ध परमेश्वराचे आहे”
दाविदाने त्याला दिलेलं उत्तर आजही विश्वासाचं प्रतीक आहे. कल्पना करा हा तरुण मुलगा गल्याथाला हाक मारून म्हणतो: “तू तलवार, भाला व बरची घेऊन मजवर चढून आला आहेस; पण इस्राएली सैन्यांच्या देवाला तू तुच्छ लेखले आहेस; त्या सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुजकडे आलो आहे.” दाविदाला माहीत होतं की माणसाची शक्ती आणि शस्त्रं काही कामाची नाहीत. गल्याथाने यहोवाला अनादर दाखवला होता आणि यहोवा त्याला उत्तर देणार होता. म्हणूनच दावीद म्हणाला: “हे युद्ध परमेश्वराचे आहे.”—१ शमुवेल १७:४५-४७.
दाविदाला गल्याथ किती अवाढव्य आहे आणि त्याच्याकडे किती शस्त्रं आहेत हे माहीत होतं. पण या गोष्टींना दावीद घाबरला नाही. जी चूक शौल आणि त्याच्या सैन्याने केली ती त्याने केली नाही. त्याने स्वतःची तुलना गल्याथासोबत केली नाही तर, यहोवाच्या तुलनेत गल्याथ कसा आहे हे पाहिलं. साडे नऊ फूटाच्या गल्याथाच्या तुलनेत बाकी माणसं फार छोटी दिसत असली तरी, यहोवासमोर गल्याथ केवढा होता? इतर कोणत्याही माणसाप्रमाणेच फक्त एका किटकासारखा. असा किटक ज्याचा यहोवा लवकरच नाश करणार होता!
टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१६, क्र. ४ १२ ¶४
“हे युद्ध परमेश्वराचे आहे”
आज देवाचे सेवक जीवघेण्या युद्धांमध्ये भाग घेत नाहीत. युद्ध करण्याचा काळ निघून गेला आहे. (मत्तय २६:५२) तरीदेखील आपल्याला दाविदाच्या विश्वासाचं अनुकरण करण्याची गरज आहे. दाविदासारखाच आपल्यासाठी देखील यहोवा खराखुरा असला पाहिजे. आपण त्याचीच सेवा केली पाहिजे आणि त्याचंच आदरयुक्त भय मानलं पाहिजे. कधीकधी आपल्या समस्या आपल्याला खूप मोठ्या वाटतील पण यहोवाच्या अफाट शक्तीपुढे त्या फार छोट्या आहेत. जर आपण यहोवाला आपला देव म्हणून निवडलं आणि त्याच्यावर दाविदासारखा विश्वास दाखवला तर कुठलीही समस्या, कुठलाही प्रश्न आपल्याला सतावणार नाही. कारण यहोवा कशावरही मात करू शकतो!
आध्यात्मिक रत्नं शोधा
नियमशास्त्रातून यहोवाचं प्रेम आणि न्याय कसा दिसून आला?
धडे: यहोवा एका व्यक्तीचं फक्त बाह्यस्वरूपच पाहत नाही, तर ती व्यक्ती आतून कशी आहे, तिचं मन कसं आहे हेही तो पाहतो. (१ शमु. १६:७) आपल्या मनातील कोणताही विचार, कोणतीही भावना, कोणतेही कार्य आपण यहोवापासून लपवू शकत नाही. यहोवा आपल्यामधल्या चांगल्या गोष्टी पाहतो आणि चांगलं करत राहण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन देतो. पण त्याची इच्छा आहे की आपण आपल्या मनातील चुकीचे विचार ओळखावे आणि आपल्या हातून एखादी चूक घडण्याआधीच त्या विचारांवर नियंत्रण करावं.—२ इति. १६:९; मत्त. ५:२७-३०.
२८ मार्च–३ एप्रिल
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | १ शमुवेल १८-१९
“यहोवाच्या सेवेत आपण चांगलं करत असलो तरी नम्र राहिलं पाहिजे”
जीवनातल्या चढउतारांना तोंड देताना पवित्र आत्म्यावर विसंबून राहा
४ लवकरच हा लहानगा मेंढपाळ राष्ट्रीय ख्याती मिळवणार होता. त्याला राजासमोर हजर राहून त्याच्याकरता संगीतवादन करण्याकरता बोलावणे आले. इस्राएलचे अनुभवी सैनिक देखील ज्याला तोंड देण्यास धजत नव्हते त्या गल्याथ नावाच्या एका क्रूर राक्षसी शत्रूला त्याने जिवे मारले. दाविदाला योद्ध्यांवर नेमण्यात आले तेव्हा त्याने पलिष्ट्यांवर विजय मिळवला. त्याने लोकांचे मन जिंकले होते. ते गीत रचून त्याची स्तुती करत. काही काळाआधी शौल राजाच्या एका सेवकाने दाविदाचे वर्णन करताना, तो “वादनकलेत निपुण” आहे असे म्हणण्यासोबतच तो “प्रबळ व युद्धकुशल वीर आहे, तसाच तो चांगला वक्ता असून रूपवान आहे,” असेही म्हटले.—१ शमुवेल १६:१८; १७:२३, २४, ४५-५१; १८:५-७.
लोकांमधला फरक ओळखा
६ सौंदर्य, लोकप्रियता, संगीताचं कौशल्य, ताकदवान असणं किंवा इतरांनी केलेलं कौतुक यांमुळे काही लोकांमध्ये गर्व येतो. दावीदकडे या सर्व गोष्टी होत्या, पण तरी तो आयुष्यभर नम्र राहिला. उदाहरणार्थ, गल्याथला मारल्यानंतर शौल राजाने दावीदला म्हटलं की त्याच्या मुलीसोबत तो लग्न करू शकतो. त्यावर त्याने म्हटलं: “राजाचा जावई व्हावे असा मी कोण? माझे जीवित ते काय? आणि इस्राएलात माझ्या बापाचे कूळ ते काय?” (१ शमु. १८:१८) दावीदला नम्र राहण्यास कशामुळे मदत झाली? त्याला माहीत होतं की त्याच्या क्षमता, गुण आणि त्याला मिळालेली कामगिरी ही खरंतर देवाकडून आहे. तसंच, देव स्वतः नम्र असल्यामुळे आणि देवाची कृपादृष्टी असल्यामुळेच त्याला हे शक्य झालं आहे याची जाणीव त्याला होती. (स्तो. ११३:५-८) दावीदला माहीत होतं की त्याच्या जीवनात ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या यहोवानेच पुरवल्या आहेत.—१ करिंथकर ४:७ पडताळून पाहा.
७ आज यहोवाचे सेवकसुद्धा दावीदसारखं नम्र बनण्याचा प्रयत्न करतात. यहोवा इतका महान असूनही इतका नम्र आहे, या गोष्टीने आपलं मन भरून येतं. (स्तो. १८:३५) बायबल सांगतं: “करुणा, दयाळूपणा, प्रेमळपणा, नम्रता, सौम्यता आणि सहनशीलता परिधान करा.” हा सल्ला आपण लागू करण्याचा प्रयत्न करतो. (कलस्सै. ३:१२) आपल्याला हेदेखील माहीत आहे, की प्रेम “बढाई मारत नाही, गर्वाने फुगत नाही.” (१ करिंथ. १३:४) आपली नम्रता पाहून इतरांनाही यहोवाबद्दल जाणून घ्यायची इच्छा होऊ शकते. ज्या प्रकारे एक अविश्वासू पती आपल्या ख्रिस्ती पत्नीच्या चांगल्या वागण्यामुळे यहोवाकडे येऊ शकतो, त्या प्रकारे यहोवाच्या सेवकांमध्ये नम्रता पाहून लोकदेखील यहोवाजवळ येऊ शकतात.—१ पेत्र ३:१, २.
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट-२ ६९५-६९६
संदेष्टे
यहोवाची पवित्र शक्ती एखाद्या संदेष्ट्यावर कार्य करायची तेव्हाच तो संदेष्ट्यांसारखा संदेश सांगायचा. (यहे ११:४, ५; मीख ३:८) पवित्र शक्तीमुळे संदेष्टे अद्भूत कामं करायचे आणि प्रभावीपणे बोलायचे. कधीकधी त्यांचं वागणं सामान्य लोकांपेक्षा खूप वेगळं असायचं. त्यामुळेच बायबलमध्ये काही जण ‘संदष्ट्यांसारखं वागत राहिले’ असं का म्हटलं आहे ते आपल्याला कळतं. (१ शमु १०:६-११; १९:२०-२४; यिर्म २९:२४-३२; पडताळून पाहा प्रेका २:४, १२-१७; ६:१५; ७:५५.) शौल जेव्हा संदेष्ट्यांसारखा वागू लागला तेव्हा ‘त्याने आपले कपडे काढून टाकले आणि तो संपूर्ण दिवस आणि रात्र तिथे तसाच उघडा पडून राहिला.’ (१ शमु १९:१८-२०:१) याचा अर्थ असा नाही की संदेष्टे नेहमीच उघडे राहायचे. याउलट, बायबल जेव्हा संदेष्ट्यांबद्दल सांगतं तेव्हा त्यांनी कपडे घातलेले असायचे. मग शौल उघडा राहिला असं का म्हटल आहे? बायबलमध्ये याबद्दल स्पष्टपणे सांगितलेलं नाही. पण यामागे बरीच कारणं असू शकतात. एक म्हणजे, शाही पोषाखाविना तो सर्वसाधारण माणूस आहे हे दिसून आलं. किंवा दुसरं म्हणजे, तो यहोवाच्या अधिकारासमोर आणि शक्तीसमोर किती कमजोर व हतबल आहे हे दिसून आलं. तसंच, यहोवा त्याच्यासोबत जसं पाहिजे तसं करू शकतो हेही दिसून आलं.
४-१० एप्रिल
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | १ शमुवेल २०-२२
“आपण चांगले मित्र कसे बनू शकतो?”
अंत येण्याआधी भाऊबहिणींसोबत आपली मैत्री घनिष्ठ करा
१८ आज आपल्या भाऊबहिणींना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. उदाहरणार्थ, अनेकांना नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा मानवांमुळे दुःख भोगावं लागतं. अशी परिस्थिती उद्भवल्यावर आपण भाऊबहिणींना आपल्या घरी राहायला बोलवू शकतो. तसंच, इतर जण त्यांना आर्थिक मदत करू शकतात. आपल्याला या गोष्टी करणं शक्य नसल्या तरी आपण सगळेच आपल्या भाऊबहिणींसाठी प्रार्थना मात्र नक्कीच करू शकतो. आपले भाऊबहीण निराश झाल्याचं आपल्याला कळतं, तेव्हा आपण काय बोलावं किंवा करावं हे कदाचित त्या वेळी आपल्याला सुचणार नाही. पण असं असलं तरी आपण सगळेच मदत करू शकतो. उदाहरणार्थ, आपण आपल्या मित्राला वेळ देऊ शकतो. तो आपल्याशी बोलत असतो तेव्हा आपण त्याचं लक्ष देऊन ऐकू शकतो. तसंच, आपण त्याला एखादं सांत्वन देणारं आपलं आवडतं वचनही सांगू शकतो. (यश. ५०:४) मित्रांना आपली गरज असते, तेव्हा आपण त्यांच्यासोबत असणं, हीच खरंतर त्या वेळी खूप महत्त्वाची गोष्ट असते.—नीतिसूत्रे १७:१७ वाचा.
यहोवाच्या मार्गांनी चाला
७ आपण भरवसालायक मित्र असले पाहिजे, अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो. (नीति. १७:१७) राजा शौलाचा पुत्र योनाथान दाविदाचा मित्र होता. दाविदाने गल्याथाला ठार मारल्याची बातमी योनाथाने ऐकली तेव्हा “योनाथानाचे मन दाविदाच्या मनाशी इतके जडले की तो त्याला प्राणाप्रमाणे प्रिय झाला.” (१ शमु. १८:१, ३) शौल जेव्हा दाविदाला ठार मारू पाहत होता तेव्हा योनाथानाने त्याला सावधही केले. दावीद जेव्हा पळून गेला तेव्हा योनाथान त्याला भेटला आणि त्याच्याशी त्याने एक आणभाक केली. शौलाबरोबर दाविदाच्या वतीने बोलल्यामुळे, योनाथान मरता मरता वाचला. पण हे दोन मित्र पुन्हा भेटले आणि त्यांची मैत्री आणखी गहिरी झाली. (१ शमु. २०:२४-४१) त्यांच्या शेवटल्या भेटीच्यावेळी योनाथानाने “देवाच्या ठायी [दाविदाचा] भरवसा दृढ करून त्याच्या हाताला त्याने बळकटी दिली.”—१ शमु. २३:१६-१८.
प्रेमरहित जगात मैत्री टिकवून ठेवणे
११ एकनिष्ठ राहा. शलमोनाने लिहिले, “मित्र सर्व प्रसंगी प्रेम करितो, आणि विपत्कालासाठी तो बंधु म्हणून निर्माण झालेला असतो.” (नीति. १७:१७) शलमोनाने कदाचित आपला पिता दावीद आणि योनाथान यांची मैत्री लक्षात ठेवून हे शब्द लिहिले असावेत. (१ शमु. १८:१) शौल राजाला आपला पुत्र योनाथान इस्राएलच्या सिंहासनावर बसावा अशी इच्छा होती. पण, राजा होण्यासाठी यहोवाने दाविदाची निवड केली आहे ही वस्तुस्थिती योनाथानाने मान्य केली. शौलाप्रमाणे त्याने दाविदाचा मत्सर केला नाही. लोकांनी दाविदाची स्तुती केली तेव्हा त्याला त्याचा हेवा वाटला नाही. तसेच, शौलाने दाविदाविषयी खोटे सांगितले तेव्हा योनाथानाने डोळे मिटून त्यावर विश्वास ठेवला नाही. (१ शमु. २०:२४-३४) आपण योनाथानासारखे आहोत का? आपल्या मित्रांना काही विशेषाधिकार मिळाल्यास आपल्याला आनंद होतो का? त्यांच्यावर कठीण प्रसंग येतात तेव्हा आपण त्यांना सांत्वन व आधार देतो का? कोणी आपल्या मित्राची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्यास आपण लगेच त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो का? की योनाथानाप्रमाणे आपण एकनिष्ठपणे आपल्या मित्राचे समर्थन करतो?
आध्यात्मिक रत्नं शोधा
पहिले शमुवेल पुस्तकातील ठळक मुद्दे
२१:१२, १३. जीवनात उद्भवणाऱ्या कठीण प्रसंगांना तोंड देताना आपण आपल्या बौद्धिक क्षमता व कौशल्यांचा उपयोग करावा अशी यहोवा अपेक्षा करतो. त्याने आपल्याला त्याचे प्रेरित वचन दिले आहे ज्यातून आपल्याला चातुर्य, ज्ञान व चाणाक्षपण मिळू शकते. (नीतिसूत्रे १:४) तसेच आपल्याला ख्रिस्ती वडिलांचीही मदत उपलब्ध आहे.
१८-२४ एप्रिल
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | १ शमुवेल २३-२४
“धीर धरा आणि यहोवावर भरवसा ठेवा”
जीवनातल्या चढउतारांना तोंड देताना पवित्र आत्म्यावर विसंबून राहा
८ दाविदाने शौलाला कोणत्याही प्रकारे इजा करण्यास नकार दिला. त्याने विश्वास व संयम दाखवला व सर्व गोष्टी स्वखुषीने यहोवाच्या हाती सोपवल्या. राजा गुहेतून बाहेर पडल्यावर दावीदाने त्याला हाक मारून म्हटले: “परमेश्वर माझ्यातुमच्यामध्ये न्याय करो आणि परमेश्वरच मजबद्दल आपले शासन करो; पण माझा हात आपणावर पडावयाचा नाही.” (१ शमुवेल २४:१२) शौलाचे चुकले आहे हे माहीत असूनही दाविदाने सूड उगवला नाही; शिवाय, तो शौलाशी किंवा त्याच्याविषयी इतर कोणाशी अपमानास्पद रितीने बोलला देखील नाही. यानंतर आणखी कित्येक प्रसंगी, दाविदाने सूड उगवण्याची संधी मिळूनही स्वतःवर ताबा ठेवला. त्याऐवजी, यहोवाच्या न्यायाकरता तो त्याच्यावरच विसंबून राहिला.—१ शमुवेल २५:३२-३४; २६:१०, ११.
तुमच्या परिस्थितींचे तुमच्या जीवनावर वर्चस्व आहे का?
तिसरी गोष्ट म्हणजे, आपल्या परिस्थिती बदलण्यासाठी गैरशास्त्रीय मार्ग अवलंबण्याऐवजी आपण यहोवावर भरवसा ठेवावा. शिष्य याकोबाने लिहिले: “धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, ह्यासाठी की, तुम्ही कशातहि उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी.” (याकोब १:४) एखादे संकट उद्भवते तेव्हा गैरशास्त्रीय मार्गाने त्याचा अंत करण्याऐवजी त्या संकटात निभावण्याद्वारे धीराला “आपले कार्य पूर्ण करू” दिले पाहिजे. तेव्हा आपला विश्वास पारखला व शुद्ध केला जाईल आणि त्याची टिकून राहण्याची ताकद दिसून येईल. अशाप्रकारचा धीर योसेफ आणि दावीद या दोघांकडे होता. त्यांनी देवाला नाखूष करू शकणारा उपाय शोधून काढला नाही. उलट, त्यांनी आपल्या परिस्थितीचा होता होईल तितका फायदा करून घेतला. त्यांनी यहोवावर भरवसा ठेवला आणि याचे किती आशीर्वाद त्यांना मिळाले! यहोवाने त्या दोघांनाही आपल्या लोकांची सुटका करण्यासाठी व त्यांचे नेतृत्व करण्यासाठी वापरले.—उत्पत्ति ४१:३९-४१; ४५:५; २ शमुवेल ५:४, ५.
आपल्यासमोर देखील अशा परिस्थिती येतील जेव्हा गैरशास्त्रीय उपाय काढण्याचा मोह आपल्याला होईल. उदाहरणार्थ, तुम्हाला अद्याप एखादा उचित विवाहसोबती मिळालेला नाही म्हणून तुम्ही खचला आहात का? तसे असल्यास, ‘केवळ प्रभूमध्ये लग्न करा’ या आज्ञेचे उल्लंघन करण्याचा कोणताही मोह टाळायचा प्रयत्न करा. (१ करिंथकर ७:३९) तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या आहेत का? मग, जगाप्रमाणे विभक्त होण्याचा व घटस्फोट घेण्याचा विचार करण्याऐवजी दोघेही मिळून या समस्यांचा सामना करण्याचा प्रयत्न करा. (मलाखी २:१६; इफिसकर ५:२१-३३) आर्थिक परिस्थितीमुळे तुम्हाला आपल्या कुटुंबाची काळजी घेणे जड जात आहे का? यहोवावर भरवसा ठेवणे म्हणजे पैसा मिळवण्याचे सर्व संशयास्पद व बेकायदेशीर मार्ग टाळणे. (स्तोत्र ३७:२५; इब्री लोकांस १३:१८) होय, आपण सर्वांनी आपल्या परिस्थितींचा होता होईल तितका फायदा करून घेतला पाहिजे आणि यहोवाकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. असे करत असताना, आपण सर्वात उत्तम उपायासाठी यहोवावर भरवसा ठेवण्याचा दृढनिश्चय करू या.—मीखा ७:७.
आध्यात्मिक रत्नं शोधा
कोणत्याही गोष्टीमुळे आपलं बक्षीस गमावू नका
११ मनापासून प्रेमळ आणि दयाळू असण्याचा प्रयत्न केल्यास आपल्याला इतरांबद्दल लगेच हेवा किंवा ईर्ष्या वाटणार नाही. बायबल म्हणतं: “प्रेम सहनशील आणि दयाळू असते. प्रेम हेवा करत नाही.” (१ करिंथ. १३:४) हेव्याची किंवा ईर्ष्येची भावना मनात मूळ धरू नये म्हणून आपण यहोवासारखा दृष्टिकोन बाळगला पाहिजे. आणि आपले बंधुभगिनी एकाच शरीराचा, अर्थात मंडळीचा भाग आहेत या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. बायबल म्हणतं: “एका अवयवाचा सन्मान झाला, तर बाकीच्या सर्व अवयवांना आनंद होतो.” (१ करिंथ. १२:१६-१८, २६) बंधुभगिनींपैकी एखाद्याचं भलं झालं तर आपण त्याचा हेवा करणार नाही; उलट, त्याच्या आनंदात सहभागी होऊ. या बाबतीत, शौल राजाचा मुलगा योनाथान याने किती चांगलं उदाहरण मांडलं होतं याचा विचार करा. योनाथानच्या जागी दावीदला राजा म्हणून निवडण्यात आलं तेव्हा योनाथानने त्याचा द्वेष केला नाही. उलट, त्याने दावीदला धीर आणि आधार दिला. (१ शमु. २३:१६-१८) योनाथानप्रमाणेच आपल्यालासुद्धा प्रेम आणि दयाळूपणा दाखवता येईल का?
२५ एप्रिल–१ मे
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | १ शमुवेल २५-२६
“तुम्ही विचार न करता तडकाफडकी निर्णय घेता का?”
ती समंजसपणे वागली
१० मग, हे योद्धे नाबालाच्या मेढपाळांशी कसे वागायचे? खरंतर, जगण्यासाठी धडपड करणारे हे योद्धे अधूनमधून कळपातल्या एखाद्या मेंढरावर सहज हात मारू शकले असते. पण, या मेहनती योद्ध्यांनी कधीच असं केलं नाही. उलट, त्यांनी नाबालाच्या कळपाचं आणि त्याच्या चाकरांचं संरक्षण केलं. (१ शमुवेल २५:१५, १६ वाचा.) त्या काळी, मेंढरांच्या आणि मेंढपाळांच्या जिवाला खूप धोका असायचा. कारण त्या प्रदेशात भरपूर हिंस्र प्राणी होते; शिवाय, इस्राएलची दक्षिण सरहद्द अगदी जवळ असल्यामुळं बाहेरून येणाऱ्या लुटारूंच्या टोळ्यांकडून नेहमीच हल्ले व्हायचे.
११ अरण्यात इतक्या सगळ्या माणसांच्या खाण्यापिण्याची सोय करणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. त्यामुळे एकदा दाविदानं नाबालाकडे आपली दहा माणसं पाठवून त्याच्याकडून काही मदत मागितली. त्यासाठी दाविदानं जी वेळ निवडली ती अगदी विचारपूर्वक निवडली होती. कारण तो लोकर कातरण्याचा काळ होता. या काळात लोक सहसा उत्सव करायचे आणि नेहमीपेक्षा जास्त उदारता दाखवायचे. तसंच, दाविदानं आपल्या माणसांच्या हाती नाबालाला जो निरोप पाठवला त्यातले शब्दही त्यानं विचारपूर्वक निवडले होते. त्यानं प्रेमळ आणि आदरयुक्त शब्द वापरले. कदाचित नाबालाच्या वयाबद्दल आदर दाखवण्यासाठीच त्यानं स्वतःचा उल्लेख, “आपला पुत्र दावीद” असा केला असावा. मग, दाविदाचा निरोप ऐकल्यावर नाबालाची काय प्रतिक्रिया होती?—१ शमु. २५:५-८.
१२ तो रागानं पेटून उठला! सुरुवातीला जो तरुण मनुष्य अबीगईलकडे वाईट बातमी घेऊन आला होता त्याच्या शब्दांत सांगायचं झालं तर नाबाल, “त्यांच्या अंगावर ओरडला.” नाबाल हा अतिशय कंजूष होता; आणि मी “माझे अन्न, माझे पाणी आणि माझ्या कातरणाऱ्यांसाठी मारलेल्या पशूंचे मांस” देणार नाही, असं तो मोठमोठ्यानं ओरडून म्हणाला. तसंच, त्यानं दाविदाला तुच्छ लेखलं आणि पळपुटा दास म्हणून त्याची थट्टा केली. दाविदाचा द्वेष करणाऱ्या शौलासारखाच नाबालाचाही दृष्टिकोन असावा. नाबाल आणि शौल या दोघांचा दृष्टिकोन यहोवासारखा नव्हता. कारण यहोवाच्या दृष्टीनं दावीद हा पळून जाणारा दास नव्हे, तर त्याचा विश्वासू सेवक आणि इस्राएलचा भावी राजा होता.—१ शमु. २५:१०, ११, १४.
ती समंजसपणे वागली
१८ आपल्या पतीमुळं निर्माण झालेल्या समस्येची पूर्ण जबाबदारी तिनं स्वतःवर घेतली आणि त्यानं केलेल्या चुकीबद्दल क्षमासुद्धा मागितली. नाबाल त्याच्या नावाप्रमाणेच अक्कलशून्य आहे ही गोष्ट तिनं मान्य केली. याद्वारे तिला कदाचित हे सुचवायचं असेल, की नाबालाची कसलीच लायकी नसल्यामुळे त्याला धडा शिकवण्यात दाविदानं आपला वेळ वाया घालवू नये. तसंच, दावीद हा यहोवाचा प्रतिनिधी असून तो “परमेश्वराच्या लढाया” लढत आहे, या गोष्टीवर तिनं आपला भरवसा व्यक्त केला. याशिवाय, यहोवा दाविदाला “इस्राएलाचा अधिपती” म्हणून नेमेल असंही तिनं म्हटलं. यावरून दावीद आणि त्याचं राज्यशासन यासंबंधी यहोवानं दिलेल्या अभिवचनाची तिला कल्पना असल्याचंही तिनं दाखवून दिलं. पुढं तिनं दाविदाला आर्जवलं की त्यानं असं कोणतंही कृत्य करू नये ज्यामुळे त्याच्यावर विनाकारण रक्तपात केल्याचा दोष लागेल किंवा कुणाचा सूड उगवल्याचा त्याला “पस्तावा” होईल. (१ शमुवेल २५:२४-३१ वाचा.) खरंच, किती प्रेमळ आणि हृदयस्पर्शी शब्द होते ते!
आध्यात्मिक रत्नं शोधा
ती समंजसपणे वागली
१६ मग याचा अर्थ, अबीगईलनं आपल्या पतीच्या मस्तकपदाचा अनादर केला असा होतो का? मुळीच नाही. नाबाल यहोवाच्या एका अभिषिक्त सेवकाशी अतिशय दुष्टपणे वागला होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नाबालाच्या या कृत्यामुळे त्याच्या घराण्यातल्या कित्येक निरपराध लोकांचा मृत्यू झाला असता. अबीगईलनं वेळीच पावलं उचलली नसती, तर आपल्या पतीच्या अपराधात तीही सामील आहे असाच याचा अर्थ झाला नसता का? पण या विशिष्ट प्रसंगी, आपल्या पतीपेक्षा देवाला अधीनता दाखवणं जास्त महत्त्वाचं आहे, हे तिनं ओळखलं.