मानवजातीची चमत्कारिक रोगमुक्ती निकट आहे
“आम्ही असे कधीच पाहिले नव्हते.” येशूने एका पक्षघाती माणसाला चमत्कारिकरीत्या व तत्क्षणी बरे केल्यावर, तो चमत्कार पाहणाऱ्यांची अशी प्रतिक्रिया होती. (मार्क २:१२) येशूने व त्यांच्या शिष्यांनीही अंधळ्यांना, मुक्यांना व लंगड्यांना देखील बरे केले. कोणत्या शक्तीने येशूने हे सर्व केले? यामध्ये विश्वासाची कोणती भूमिका होती? पहिल्या शतकातील हे अनुभव आजच्या चमत्कारिक रोगमुक्तीवर कोणता प्रकाश पाडतात?—मत्तय १५:३०, ३१.
“तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे”
बारा वर्षांपासून असलेल्या रक्तस्रावाच्या त्रासातून बरे होण्यासाठी येशूकडे आलेल्या स्त्रीला उद्देशून त्याने जे काही म्हटले त्याचा उल्लेख आज रोगमुक्त करणाऱ्यांना करायला आवडतो: “तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” (लूक ८:४३-४८) येशूच्या बोलण्यावरून असे सूचित होते का, की तिचे बरे होणे तिच्या विश्वासावर अवलंबून होते? आज ज्याचा अवलंब केला जातो त्या “फेथ हिलिंगचे” ते उदाहरण होते का?
आपण बायबल वृत्तान्त काळजीपूर्वक वाचतो तेव्हा आपल्याला दिसून येते की, येशू आणि त्याच्या शिष्यांनी बहुतेक प्रसंगी रोग्यांकडून, त्यांनी बरे होण्याआधी आपला विश्वास असल्याचे घोषित करावे अशी अपेक्षा केली नाही. वर उल्लेखलेली स्त्री येशूजवळ आली आणि काहीही न म्हणता पाठीमागून गुपचूप तिने त्याच्या वस्त्राला स्पर्श केला व “लगेच तिचा रक्तस्राव थांबला.” दुसऱ्या एका प्रसंगी, येशूने एका मनुष्याला बरे केले जो त्याला अटक करायला आलेल्या लोकांपैकी होता. तसेच, येशू कोण होता याची कोणतीही कल्पना नसलेल्या एका माणसालाही त्याने बरे केले.—लूक २२:५०, ५१; योहान ५:५-९, १३; ९:२४-३४.
त्यावेळी विश्वासाची कोणती भूमिका होती? येशू आणि त्याचे शिष्य सोर व सीदोनच्या जिल्ह्यात होते तेव्हा एक कनानी बाई त्यांच्याकडे येऊन मोठ्याने म्हणू लागली: “हे प्रभो, दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भुताने फारच जर्जर केली आहे.” तिच्या निराशेची कल्पना करा जेव्हा तिने त्याला, “प्रभुजी, मला साहाय्य करा,” अशी विनंती केली! येशूला तिची खूप दया आली व त्याने उत्तर दिले: “बाई, तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ होवो.” तिची मुलगी “त्याच घटकेस” बरी झाली. (मत्तय १५:२१-२८) स्पष्टतः, यामध्ये विश्वास गोवलेला होता, पण कोणाचा विश्वास? येशूने ज्याची प्रशंसा केली तो त्या आजारी मुलीचा नव्हे तर आईचा विश्वास होता याकडे लक्ष द्या. आणि कशावर तिचा विश्वास होता? येशूला “प्रभो, दावीदाचे पुत्र” असे संबोधण्याद्वारे ती स्त्री उघडपणे कबूल करीत होती, की येशू वचनयुक्त मशीहा होता. ती अभिव्यक्ती देवावर किंवा बरे करणाऱ्याच्या शक्तीवर विश्वास प्रकट करणारी साधी अभिव्यक्ती नव्हती. येशूने जेव्हा म्हटले की: “तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे,” तेव्हा त्याच्या म्हणण्याचा अर्थ असा होता, की येशू मशीहा आहे असा विश्वास न धरता आजाराने पीडित व्यक्ती त्याच्याकडे बरे होण्यासाठी आलीच नसती.
या शास्त्रीय उदाहरणांवरून आपण पाहू शकतो, की येशूने केलेली रोगमुक्ती आज सर्वसामान्यपणे जे काही दिसते किंवा जो दावा केला जातो त्यापेक्षा फार वेगळी होती. तेथे लोकसमुहात ओरडणे, पुटपुटणे, आक्रोश करणे, बेशुद्ध पडणे ह्याप्रकारचे तीव्र भावनात्मक प्रदर्शने होत नव्हती किंवा येशू चित्तभ्रम झाल्याचे नाटक करीत नव्हता. शिवाय, आजाऱ्यांमध्ये विश्वासाची उणीव होती किंवा त्यांनी दिलेली वर्गणी उदार मनाने नव्हती अशी सबब सांगून येशूने त्यांना बरे करण्यास कधीच टाळले नाही.
देवाच्या सामर्थ्याने रोगमुक्ती
येशू आणि त्याच्या शिष्यांनी रोगमुक्ती कशाप्रकारे केली? “रोग बरे करण्यास प्रभूचे सामर्थ्य त्याच्या ठायी होते,” असे बायबल उत्तर देते. (लूक ५:१७) एका व्यक्तीला बरे केल्यावर “देवाचे हे महान् सामर्थ्य पाहून सर्व लोक थक्क झाले,” असे लूक ९:४३ म्हणते. उचितपणे, रोग बरे करणारा म्हणून येशूने स्वतःकडे लक्ष आकर्षित केले नाही. एकदा, दुरात्मिक छळापासून मुक्त केलेल्या एका माणसाला त्याने सांगितले: “आपल्या घरी स्वकीयांकडे जा; प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली व तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग.”—मार्क ५:१९.
येशू आणि प्रेषितांनी देवाच्या सामर्थ्याने रोगमुक्ती केल्यामुळे, बरे झालेल्या व्यक्तीला बरे होण्यासाठी नेहमीच विश्वासाची आवश्यकता भासली नाही हे आपण सहजपणे समजू शकतो. परंतु, बरे करणाऱ्याठायी दृढ विश्वासाची आवश्यकता होती. म्हणूनच, येशूच्या शिष्यांना खास शक्तिशाली असलेल्या एका दुरात्म्याला काढता आले नाही तेव्हा त्याने त्यांना त्याचे कारण सांगितले: “तुमच्या अल्पविश्वासामुळे.”—मत्तय १७:२०.
चमत्कारिक रोगमुक्तीचा उद्देश
येशूने त्याच्या पार्थिव सेवेदरम्यान बरे करण्याचे पुष्कळसे कार्य केले असले तरी तो प्रामुख्याने ‘बरे करण्याची सेवा’ करीत नव्हता. तो करत असलेले चमत्कारिक रोगमुक्तीचे कार्य—ज्याच्याबद्दल त्याने लोकांकडून कधी पैसे घेतले नाहीत किंवा कोणत्याही प्रकारच्या वर्गणीची विनंती केली नाही—“राज्याच्या सुवार्तेची घोषणा” करण्याच्या प्रमुख कार्याव्यतिरिक्त केले जाणारे दुसरे कार्य होते. (मत्तय ९:३५) अहवाल सांगतो की एकदा, “त्यांचे स्वागत करून तो त्यांच्याबरोबर देवाच्या राज्याविषयी बोलत होता, आणि ज्यांना बरे होण्याची जरूरी होती त्यांना तो बरे करीत होता.” (लूक ९:११) शुभवर्तमान अहवालांमध्ये, येशूला वारंवार “गुरूजी” असे संबोधण्यात आले, पण “बरे करणारा,” असे कधीच संबोधले नव्हते.
मग येशूने चमत्कारिक रोगमुक्ती का केली? खासकरून, आपण वचनयुक्त मशीहा आहोत अशी आपली ओळख स्थापित करण्याकरता. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला अन्यायीपणे कैदेत टाकले तेव्हा, देवाने त्याला जे साध्य करावयास पाठवले होते ते त्याने पूर्ण केल्याबद्दलची खातरी त्याला हवी होती. त्याने आपल्या स्वतःच्या शिष्यांना येशूकडे पाठवून विचारले: “जे येणार आहेत ते आपणच की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?” मग येशूने योहानाच्या शिष्यांना काय सांगितले ते पहा: “जे तुम्ही ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा; आंधळे पाहतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठविले जातात व गरिबांस सुवार्ता सांगण्यात येते.”—मत्तय ११:२-५.
होय, येशूने केलेली रोगमुक्ती आणि शुभवर्तमानांमध्ये लिहून ठेवण्यात आलेल्या इतर चमत्कारिक कार्यांच्या वस्तुस्थितीने, तोच ‘येणारा,’ अर्थात वचनयुक्त मशीहा असल्याची त्याची ओळख सिद्ध केली. ‘दुसऱ्या कोणाचीही वाट पाहण्याची’ त्यांना गरज नव्हती.
चमत्कारिक रोगमुक्ती आज?
आज, देवाने आपल्या शक्तीचा पुरावा अशा रोगमुक्तींद्वारे द्यावा अशी आपण अपेक्षा करावी का? नाही. देवाच्या सामर्थ्याने येशूने केलेल्या चमत्कारिक कार्यांद्वारे त्याने हे निशंकपणे शाबीत केले, की देवाने ज्याच्याबद्दलचे अभिवचन दिले होते तो मशीहा तोच होता. येशूने केलेली महत्कृत्ये आपण सर्वांनी वाचावीत म्हणून बायबलमध्ये नमूद करण्यात आली आहेत. प्रत्येक पिढीसमोर अशी कृत्ये वारंवार घडवून आपले सामर्थ्य शाबीत करण्याची देवाला गरज नाही.
रोगमुक्ती आणि इतर चमत्कारिक कृत्ये काही प्रमाणातच खात्री पटण्यालायक होते ही मनोरंजक गोष्ट आहे. येशूने केलेले चमत्कार प्रत्यक्ष पाहणाऱ्या काही लोकांचा सुद्धा यावर विश्वास बसत नव्हता की त्याला त्याच्या स्वर्गीय पित्याचा आधार होता. “त्याने त्यांच्यासमोर इतकी चिन्हे केली असताहि त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही.” (योहान १२:३७) म्हणूनच, पहिल्या शतकाच्या ख्रिस्ती मंडळीतील विविध सदस्यांना, भविष्यवाणी करणे, विविध भाषांमध्ये बोलणे, रोगमुक्त करणे आणि अशा प्रकारच्या देवाने दिलेल्या विभिन्न चमत्कारिक दानांची चर्चा केल्यावर प्रेषित पौलाला असे म्हणण्याची प्रेरणा झाली: “संदेश असेल तरी ते संपतील. भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील; आणि विद्या असली तरी ती संपेल. कारण आपल्याला केवळ अंशतः कळते, आणि अंशतः संदेश देता येतो; पण जे पूर्ण ते येईल तेव्हा अपूर्णता नष्ट होईल.”—१ करिंथकर १२:२८-३१; १३:८-१०.
अर्थातच, आपल्या कल्याणासाठी देवावर विश्वास असणे महत्त्वपूर्ण आहे. परंतु, रोगमुक्तीच्या खोट्या शपथांवर विश्वास ठेवल्यास निराशाच पदरी पडेल. शिवाय, अंतसमयाविषयी येशूने हा इशारा दिला: “खोटे ख्रिस्त व खोटे संदेष्टे उठतील व साधेल तर निवडलेल्यांस देखील फसवावे म्हणून मोठी चिन्हे व अद्भुते दाखवितील.” (मत्तय २४:२४) वैद्यकी ढोंग आणि लबाड्या यांशिवाय दुरात्मिक शक्तीची प्रदर्शने घडतील. त्यामुळे अवर्णनीय घटनांच्या दाव्यांमुळे आपल्याला आश्चर्य वाटण्याची गरज नाही व देवावर खरोखर विश्वास ठेवण्याकरता हे निश्चितच आधार नाहीत.
येशूप्रमाणे आज कोणीही रोगमुक्ती करीत नसल्यामुळे आपला काही तोटा होतो का? मुळीच नाही. खरे पाहता, येशूने ज्यांना बरे केले होते ते कालांतराने पुन्हा आजारी पडू शकत होते. ते म्हातारे होऊन मरून गेले. रोगमुक्तीमुळे त्यांना झालेला फायदा सापेक्षरीत्या तात्पुरता होता. पण, येशूने केलेली चमत्कारिक रोगमुक्ती, भावी आशीर्वादांना पूर्वसूचित करत होती.
म्हणूनच, देवाच्या वचनाचे अर्थात बायबलचे परीक्षण केल्यावर आधी उल्लेखलेल्या ऑलिशान्ड्रे व बेनडिटाने आधुनिक फेथ हिलिंग आणि दुरात्मिक रोगमुक्तीवर विश्वास करण्याचे सोडून दिले. त्यासोबतच त्यांना याची खातरी पटली, की चमत्कारिक रोगमुक्ती इतिहासात जमा झालेली गोष्ट नव्हे. त्यांना ही खातरी का पटली? जगभरातील इतर लाखो लोकांप्रमाणे तेही देवाच्या राज्यात रोगमुक्तीच्या आशीर्वादांची वाट पाहत आहेत.—मत्तय ६:१०.
आजारपण आणि मृत्यू नाहीसे होईल
आपण सुरवातीला पाहिल्याप्रमाणे, रोग्यांना बरे करणे व इतर चमत्कार करणे हा येशूच्या सेवेचा मुख्य हेतू नव्हता. उलट, त्याने देव राज्याच्या सुवार्तेच्या प्रचाराला त्याचे प्रमुख कार्य बनवले. (मत्तय ९:३५; लूक ४:४३; ८:१) मानवजातीची चमत्कारिक रोगमुक्ती साध्य करण्यासाठी तसेच पाप आणि अपरिपूर्णतेने मानवी कुटुंबाला जी हानी पोहंचवली ती हानी भरून काढण्यासाठी देव या राज्याचा साधन म्हणून उपयोग करणार आहे. तो हे कसे व कधी करणार आहे?
दूरवर असलेले भवितव्य भाकीत करताना, ख्रिस्त येशूने आपल्या एका प्रेषिताला अर्थात योहानाला एक भविष्यसूचक दृष्टान्त दाखवला: “आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही प्रगट झाली आहेत!” (प्रकटीकरण १२:१०) सर्व पुरावा दाखवून देतो, की १९१४ मध्ये देवाचा महान विरोधक सैतानाला पृथ्वीवर टाकण्यात आले व आता राज्य वास्तविकतेत कार्यरत आहे! येशूला मशिही राज्याचा राजा बनवण्यात आले आहे व तो पृथ्वीवर मोठ्या घडामोडी करण्यास सज्ज आहे.
नजीकच्या भवितव्यात, येशूचे स्वर्गीय सरकार धार्मिक नवीन मानवी समाजावर, अर्थात ‘नव्या पृथ्वीवर’ शासन करील. (२ पेत्र ३:१३) तेव्हा परिस्थिती कशासारखी असेल? येथे एक भव्य पूर्वझलक आहे: “नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिली; पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती. . . . [देव] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”—प्रकटीकरण २१:१, ४.
मानवजातीची चमत्कारिक रोगमुक्ती खरी ठरेल तेव्हा जीवन कसे असेल याची तुम्ही कल्पना करू शकता का? “‘मी रोगी आहे,’ असे एकहि रहिवासी म्हणणार नाही. तेथे राहणारे पातकाची क्षमा पावतात.” होय, फेथ हिलर्स जे करू शकले नाहीत ते देव साध्य करणार आहे. “तो मृत्यु कायमचा नाहीसा करितो.” होय, ‘सार्वभौम प्रभू यहोवा सर्वांच्या चेहऱ्यावरील अश्रू पुसेल.’—यशया २५:८; ३३:२४.
[७ पानांवरील चित्र]
देव राज्याखाली मानवजातीला चमत्कारिकरीत्या रोगमुक्त केले जाईल