प्रकरण २१
न्यायाचा दिवस व त्यानंतर
१. न्यायाच्या दिवसाबद्दल सर्वसाधारण कल्पना काय आहे?
तुमच्या मनःचक्षुपुढे न्यायाच्या दिवसाचे कोणते चित्र उभे राहते? एका मोठ्या सिंहासनापुढे पुनरुत्थान झालेल्यांची लांब रांग काहींच्या मनात येते. न्यायाधिशापाशी असलेल्या पुस्तकात प्रत्येकाने केलेली सर्व कामे असतात व जसजसा एकएक जण त्याच्या सिंहासनापुढे येतो तसतसा आपापल्या कर्मानुसार त्याचा न्याय होतो; आणि त्या कर्मानुसार त्याला स्वर्गास किंवा प्रज्वलित नरकात पाठवण्यात येते.
२. (अ) न्यायाच्या दिवसाची योजना कोणी केली आहे? (ब) त्याने कोणाला न्यायाधीश नेमले आहे?
२ परंतु, पवित्र शास्त्रात न्यायाच्या दिवसाचे अगदी वेगळेच चित्र नजरेस येते. तो दिवस काही थरकाप उडविणारा नाही. देवाविषयी पवित्र काय म्हणते ते बघाः “त्याने असा एक दिवस नेमला आहे की, ज्या दिवशी तो, आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतीमत्त्वाने करणार आहे.” (प्रे. कृत्ये १७:३१) देवाने नेमलेला हा न्यायाधीश अर्थात येशू ख्रिस्त आहे.
३. (अ) ख्रिस्त सचोटीने न्यायदान करील याची खात्री आपण का बाळगू शकतो? (ब) लोकांचा न्याय कशावर आधारीत असेल?
३ ख्रिस्ताचे न्यायदान निःपक्षपाती व न्यायी असेल याची आपण खात्री बाळगू शकतो. त्याच्याबद्दल यशया ११:३, ४ मध्ये दिलेली भविष्यवाणी आपल्याला ती खात्री देते. वर दिलेली जी सर्वसामान्य कल्पना आहे त्याविरुद्ध म्हणजे, लोकांच्या भूतकाळाच्या पापांना अनुलक्षून तो न्याय करणार नाही. त्यातील अनेक पापे अज्ञानामुळेही झाली असतील. मरण पावल्यावर पूर्वी केलेल्या पापापासून व्यक्ती मुक्त होते असे पवित्र शास्त्र सांगते. ते म्हणतेः “जो कोणी मेला तो पापाच्या दोषातून मुक्त होऊन नीतीमान ठरला आहे.” (रोमकर ६:७) याचा अर्थ माणसाचे पुनरुत्थान झाल्यावर, मरणापूर्वीच्या कर्मानुसार नव्हे, तर न्यायाच्या दिवसातील कर्मानुसार त्याचा न्याय होईल.
४. (अ) न्यायाच्या दिवसाची मुदत केवढी असेल? (ब) ख्रिस्तासह कोण न्यायाधीश असतील?
४ तेव्हा न्यायाचा दिवस हा शब्दशः २४ तासांचा दिवस नव्हे. येशू ख्रिस्तासह न्याय करणाऱ्यांचा उल्लेख करताना पवित्र शास्त्र वरील गोष्ट स्पष्ट करते. (१ करिंथकर ६:१-३) पवित्र शास्त्र लेखक म्हणतोः “मी राजासने पाहिली. त्यावर कोणी बसले होते. त्यांना न्यायनिवाडा करण्याचा अधिकार दिला होता.” पवित्र शास्त्रात पुढे म्हटल्याप्रमाणे जे “जिवंत झाले आणि त्यांनी ख्रिस्ताबरोबर एक हजार वर्षे राज्य केले” असे न्यायाधीश, येशू ख्रिस्ताचे विश्वासू व अभिषिक्त अनुयायी होत. याचा अर्थ हा न्यायाचा दिवस १,००० वर्षांचा असेल. “नव्या पृथ्वी”वर “नवीन आकाश” म्हणून ख्रिस्त व त्याचे १,४४,००० विश्वासू व अभिषिक्त अनुयायी जी १,००० वर्षे राज्य करणार आहेत तोच हा कालावधी होय.—प्रकटीकरण २०:४, ६; २ पेत्र ३:१३.
५, ६. (अ) पवित्र शास्त्रातील एका स्तोत्रकर्त्याने न्यायाच्या दिवसाचे कसे वर्णन केले आहे? (ब) न्यायाच्या दिवसाच्या काळातील पृथ्वीवरील जीवन कसे असेल?
५ या पानांकडे पहा. मानवजातीसाठी न्यायाचा दिवस किती चांगला असेल याची थोडी कल्पना त्यामधून येते. स्तोत्रकर्त्याने त्या उज्वल काळाबद्दल म्हटलेः “शेत व त्यातील सर्वकाही उत्सव करोत; मग वनातील सर्व झाडे यहोवासमोर आनंदाचा गजर करतील. कारण तो आला आहे; पृथ्वीचा न्याय करावयाला तो आला आहे. तो न्यायीपणाने जगाचा व सत्यतेने लोकांचा न्याय करील.”—स्तोत्रसंहिता ९६:१२, १३.
६ हर्मगिदोनातून वाचणारे लोक न्यायाच्या काळी या पृथ्वीचे नंदनवन करण्यासाठी काम करतील. अशा त्या नंदनवनात मृत परत जिवंत होऊन येतील. त्यांचे स्वागत करण्यात येईल. (लूक २३:४३) मृत्युमुळे दुरावलेली कुटुंबे पुन्हा एकत्र आल्यावर किती आनंदी-आनंद होईल! होय, शांतीत जगणे, उत्तम स्वास्थ्याचा उपभोग घेणे व देवाच्या उद्देशांबद्दल सूचना प्राप्त करणे किती सुखदायक असेल! पवित्र शास्त्र म्हणतेः “तुझी न्यायकृत्ये पृथ्वीवर होतात तेव्हा जगात राहणारे धार्मिकता शिकतात.” (यशया २६:९) न्यायाच्या दिवसात सर्व लोक यहोवाबद्दल शिकतील. यहोवा देवाशी आज्ञाधारक राहून त्याची सेवा करण्याच्या सर्व संधि त्यांना दिल्या जातील.
७. देवाची सेवा पसंत करणाऱ्यांचे व नापसंत करणाऱ्यांचे न्यायाच्या दिवशी काय होईल?
७ अशा या नंदनवनात येशू ख्रिस्त व त्याचे १,४४,००० सहशास्ते मानवजातीचा न्यायनिवाडा करतील. यहोवाची सेवा करण्याचे जे स्विकारतात ते लोक सार्वकालिक जीवनास पात्र ठरतील. परंतु अशा अत्यंत अनुकूल परिस्थितीतही काही लोक यहोवाची सेवा करण्यास नकार देतील. शास्त्रवचनात म्हटल्याप्रमाणे, “दुर्जनांवर कृपा केली तरी तो नीती शिकावयाचा नाही. धर्मराज्यात देखील तो अधर्म करील.” (यशया २६:१०) तेव्हा, आपले मार्ग बदलण्यास व धार्मिकता शिकण्यास सर्व संधि दिल्यावर अशा दुष्ट लोकांचा नाश केला जाईल. काहींना तर न्यायाचा दिवस संपुष्टात येण्याआधी मृत्युदंड मिळेल. (यशया ६५:२०) नंदनवन बनलेल्या पृथ्वीला भ्रष्ट करण्याची अथवा बिघडविण्याची परवानगी त्यांना दिली जाणार नाही.
८. सदोमच्या लोकांची नैतिक स्थिती कशी होती?
८ यहोवाच्या या मोठ्या न्यायाच्या दिवसात पृथ्वीवर पुनरुत्थान होऊन सामोरे येण्याचा हक्क मोठा विलोभनीय आहे. तरीपण पवित्र शास्त्र दाखविते की असा हा हक्क सर्वांना अनुभवण्यास मिळणार नाही. उदाहरणार्थ, प्राचीन सदोमातील लोक विचारात घ्या. पवित्र शास्त्र म्हणते की सदोमच्या लोकांनी, लोटकडे पाहुणे म्हणून आलेल्या “पुरुषां”सोबत लैंगिक समागम करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा दुराचार इतका अतिरेकी होता की, त्यांना अद्भूतरित्या अंधत्व आले तरी ते, लोटाकडे आलेल्या पाहुण्यांशी समागम करता यावा म्हणून त्याचे ‘घर शोधून शोधून थकले.’—उत्पत्ती १९:४-११.
९, १०. सदोमातील दुष्ट लोकांचे पुनरुत्थान होण्याच्या संभाव्यतेविषयी शास्त्रवचने कोणता संकेत दाखवितात?
९ तर अशा या भयंकर दुष्ट माणसांना न्यायाच्या दिवसात पुनरुत्थान मिळणार का? त्यांना ते मिळणार नाही असा शास्त्रवचने संकेत देतात. उदाहरणादाखल पाहू जाता, येशूच्या प्रेरित शिष्यांपैकी एक यहुदा याने, प्रथम स्वर्गातून आपले पद सोडून देऊन मानवकन्यांसोबत लैंगिक समागम साधणाऱ्या देवदूतांविषयी माहिती दिली. यानंतर त्याने म्हटलेः “त्यांच्याप्रमाणेच सदोम व गमोरा आणि त्यांच्या सभोवतालची नगरे ह्यांनी त्यांच्यासारखे जारकर्म करुन अन्यकोटीतील अंगांशी संग केला; ती नगरे सार्वकालिक अग्निदंडाची शिक्षा पावलेली अशी एकीकडे उदाहरणादाखल पुढे ठेवली आहेत.” (यहुदा ६, ७; उत्पत्ती ६:१, २) होय, आपल्या अतिरेकी अनाचारामुळेच सदोम व त्याच्या सभोवताली असणाऱ्या शहरातील लोकांना असा नाश मिळाला की, ज्यापासून त्यांचे कधीच पुनरुत्थान होऊ शकणार नाही.—२ पेत्र २:४-६, ९, १०अ.
१० सदोमी लोकांचे पुनरुत्थान होणार नाही असे येशूने सुद्धा सुचित केले. त्याने जेथे आपले चमत्कार संपन्न केले त्या शहरापैकी एक अशा कफर्णहूमाविषयी बोलताना तो म्हणालाः “तुझ्यामध्ये [कफर्णहूमात] जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सदोमात घडली असती तर ते आजपर्यंत राहिले असते. पण मी सांगतो की, न्यायाच्या दिवशी सदोमास तुझ्यापेक्षा सोपे जाईल.” (मत्तय ११:२२-२४) येथे येशू कफर्णहूमाच्या लोकांचा दोष किती मोठा आहे ते जोर देऊन सांगत असता म्हणाला की, न्यायाच्या दिवशी पुनरुत्थान होण्यास सर्वथा अपात्र आहेत असा इस्राएलांनी ज्यांच्याविषयी आपल्या मनात विचार राखला होता त्या प्राचीन सदोमाला अधिक सोपे जाणार होते.
११. न्यायाच्या दिवशी “अधार्मिक” लोकांपेक्षा “धार्मिक” लोकांना अधिक सोपे का जाणार?
११ तेव्हा, आपल्याला पुनरुत्थान मिळवावयाचे आहे तर आपण आपले जीवन योग्यपणे जगण्याचा हरप्रयत्न केला पाहिजे. पण असेही विचारले जाऊ शकते की, पुनरुत्थान लाभलेल्या काहींना इतरांपेक्षा धार्मिकता शिकून ती आचरण्याचे अवघड जाईल का? आता हे विचारात घ्याः अब्राहाम, इसहाक, ईयोब, दबोरा, रुथ आणि दानीएल यासारखी “धार्मिक” माणसे मृत्यु पावण्याआधी त्या सर्वांनी आपले लक्ष मशीहाच्या येण्याकडे लावले होते. तर मग, न्यायाच्या दिवशी, हाच मशीहा आता स्वर्गातून राज्य करीत आहे हे समजल्यामुळे ते किती आनंदी होतील बरे! यामुळेच या “धार्मिक’ लोकांना, ज्या “अधार्मिक” लोकांचे पुनरुत्थान होईल त्यांच्यापेक्षा धार्मिकता आचरणे त्या काळी अधिक सोयीचे होईल.—प्रे. कृत्ये २४:१५.
“जीवना”चे व “न्याया”चे पुनरुत्थान
१२. योहान ५:२८-३० अनुसार कोणाला “जीवनाचे पुनरुत्थान” व कोणाला “न्यायाचे पुनरुत्थान” मिळेल?
१२ न्यायाच्या दिवसाच्या परिस्थितीचे वर्णन करताना येशू म्हणालाः “कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील; आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील. . . . जसे मी ऐकतो तसा न्यायनिवाडा करतो, आणि माझा निवाडा यथार्थ आहे. कारण स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावयाला पाहतो.” (योहान ५:२८-३०) हे “जीवनाचे पुनरुत्थान” व “न्यायाचे पुनरुत्थान” म्हणजे काय? व ते कोणाला मिळते?
१३. “जीवनाचे पुनरुत्थान” मिळण्याचा अर्थ काय?
१३ आपण आधीच पाहिले आहे की, कबरेतून मृत परत येतील तेव्हा त्यांच्या पूर्वकर्मानुसार त्यांचा न्याय होत नाही. उलट, न्यायाच्या दिवसातील कालावधीतील त्यांच्या कामानुसार त्यांचा न्याय होतो. तेव्हा, “ज्यांनी सत्कर्मे केली” व “ज्यांनी दुष्कर्मे केली” असे येशू म्हणाला त्यावेळी तो न्यायाच्या दिवसाच्या कालावधीत लोकांनी केलेल्या चांगल्या व वाईट कृत्यांचा उल्लेख करीत होता. पुनरुत्थान झालेल्यापैंकी अनेक लोक, त्यांच्या सत्कृत्यांमुळे १,००० वर्षांच्या न्यायाच्या दिवसाच्या शेवटी परिपूर्ण मानवी जीवनाकडे प्रगति करतील. अशारितीने, त्यांचे मृतातून परतणे “जीवनाचे पुनरुत्थान” ठरेल. कारण त्यांना पापमुक्त परिपूर्ण जीवन प्राप्त होईल.
१४. “न्यायाचे पुनरुत्थान” मिळण्याचा अर्थ काय?
१४ याउलट, न्यायाच्या दिवसात ‘ज्यांनी वाईट वा दुष्ट कामे केली’ त्यांचे काय होईल? त्यांचे मृतातून परतणे “न्यायाचे पुनरुत्थान” ठरेल. याचा अर्थ काय? मृत्युदंड अथवा मरणाची शिक्षा असा त्याचा अर्थ होय. यासाठीच अशा व्यक्तींचा न्यायाच्या दिवसाच्या अवधीमध्ये वा शेवटी नाश केला जाईल. याचे कारण म्हणजे ते वाईट गोष्टी करतात; सद्वर्तन शिकण्यास व करण्यास दुराग्रही नकार देतात.
न्यायाच्या दिवसाची सुरवात जेव्हा होते
१५. न्यायाचा दिवस सुरु होण्याच्या तात्काळ आधी काय घडते?
१५ न्यायाच्या दिवसाच्या तात्काळ आधी काय घडते ते प्रेषित योहानाने दृष्टांतात पाहिले. तो लिहितोः “एक मोठे पांढरे राजासन आणि त्यावर जो बसलेला त्याला मी पाहिले. त्याच्या तोंडापुढून पृथ्वी व आकाश ही पळाली. . . . मग, मृत झालेल्या लहानथोरांना मी राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. . . . मृतांचा न्याय . . . ठरविण्यात आला.” (प्रकटीकरण २०:११, १२) याचा अर्थ हा की, न्यायाच्या दिवसाची सुरवात होण्याआधी सध्याच्या व्यवस्थीकरणाची “पृथ्वी व आकाश” ही नाहीशी होतील. हर्मगिदोनात दुष्टांचा नाश होईल आणि केवळ देवाची सेवा करणारे वाचतील.—१ योहान २:१७.
१६. (अ) मृतांव्यतिरिक्त आणखी कोणाचा न्याय न्यायाच्या दिवशी होईल? (ब) त्यांचा न्याय कशाला अनुसरुन असेल?
१६ अशाप्रकारे, पुनरुत्थान झालेल्या “मृतां”चाच न्याय त्यावेळी होईल असे नव्हे. हर्मगिदोनातून वाचलेल्या “जिवंत” लोकांचा व त्यांना झालेल्या मुलांचाही न्याय होईल. (२ तीमथ्य ४:१) या दृष्टांतामध्ये, त्यांचा न्याय कसा झाला ते योहानाने पाहिले. तो लिहितोः “पुस्तके उघडली गेली. . . . आणि त्या पुस्तकांमध्ये जे लिहिले होते त्यावरुन मृतांचा न्याय त्यांच्या कृत्यांवरुन करण्यात आला. तेव्हा समुद्राने आपल्यामधील मृत मनुष्यांस बाहेर सोडले; मृत्यु व अधोलोक ह्यांनी आपल्यातील मृतांस बाहेर सोडले; आणि ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरविण्यात आला.”—प्रकटीकरण २०:१२, १३.
१७. “जिवंत” व “मृतांना” ज्यातून न्याय मिळेल ती “पुस्तके” म्हणजे काय?
१७ ज्यामधून “मृत” तसेच “जिवंत” लोकांचा न्याय करण्यात आला ती “पुस्तके” कोणती आहेत? ती, आपल्या सध्याच्या पवित्र शास्त्रात पडलेली भर असेल हे उघड आहे. ते प्रेरित लेखन म्हणजेच यहोवाच्या आज्ञा व नियमांची पुस्तके असतील. ती वाचल्याने पृथ्वीवरील सर्वांना देवाची इच्छा समजेल. मग या “पुस्तकां”मधील नियम व आज्ञांच्या आधाराने पृथ्वीवरील प्रत्येकाचा न्याय होईल. त्यातील गोष्टी पाळणाऱ्यांना येशूच्या बलिदानाचे फायदे मिळतील आणि ते हळुहळू मानवी पूर्णतेत पोहंचतील.
१८. (अ) न्यायाच्या दिवसाच्या शेवटी कशी परिस्थिती असेल? (ब) १,००० वर्षांच्या शेवटी “मृतांना” कोणत्या अर्थाने जीवन प्राप्त होते?
१८ १,००० वर्षांच्या न्यायाच्या दिवसाच्या शेवटी, पृथ्वीवरील कोणीही व्यक्ती आदामाच्या पापामुळे मरणोन्मुख स्थितीत नसेल. प्रत्येकजण खरोखरच पूर्ण अर्थाने जिवंत झालेला असेल. याविषयीचा निर्देश करताना पवित्र शास्त्र म्हणतेः “मृतांपैकी बाकीचे [स्वर्गाला जाणाऱ्या १,४४,००० लोकांना सोडून] लोक ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत जिवंत झाले नाहीत.” (प्रकटीकरण २०:५) “मृतांपैकी बाकीचे लोक” असे म्हणण्याचा अर्थ, १,००० वर्षांचा न्यायाचा दिवस संपल्यावर काहींचे पुनरुत्थान होते, असा नव्हे. याउलट सर्व लोक जिवंत झाले म्हणजे त्यांना शेवटी मानवी पूर्णता लाभली असा तो अर्थ आहे. आदाम व हव्वा एदेन बागेमध्ये असताना ज्या पूर्ण अवस्थेत होते त्याच पूर्ण अवस्थेत हे लोकही असतील. त्यानंतर काय होईल?
न्यायाच्या दिवसानंतर
१९. न्यायाच्या दिवसाच्या शेवटी ख्रिस्त काय करतो?
१९ देवाने दिलेले सर्व कार्य पूर्ण केल्यावर येशू ख्रिस्त “देवपित्याला राज्य सोपून देईल.” हे १,००० वर्षीय न्यायाच्या दिवसाच्या शेवटी घडते. तोपर्यंत सर्व शत्रूंचा नाश करण्यात येईल. त्यातील शेवटला शत्रू म्हणजे आदामापासून अनुवंशिकतेने आलेला मृत्यु. त्याचा नाश केला जाईल! त्यानंतर ते राज्य यहोवा देवाच्या मालकीचे होईल व राजा या नात्याने प्रत्यक्ष तोच शासन करील.—१ करिंथकर १५:२४-२८.
२०. (अ) “जीवनाच्या पुस्तकात” कोणाचे नाव लिहावे ते ठरविण्यासाठी यहोवा काय करील? (ब) मानवजातीची शेवटची परिक्षा यथार्थ का आहे?
२० कोणाची नावे “जीवनाच्या पुस्तकात” लिहावीत ते यहोवा कसे ठरवील? (प्रकटीकरण २०:१२, १५) त्यासाठी मानवजातीची एक परिक्षा घेतली जाईल. अशा परिक्षेमध्ये, आदाम व हव्वा कसे अपयशी झाले व ईयोबाने आपले सत्व कसे टिकवले, याची आठवण करा. परंतु, १,००० वर्षांच्या शेवटपर्यंत जगलेल्या माणसांमधील बहुतेकांच्या विश्वासाची परिक्षा कधीही झालेली नसेल. त्यांचे पुनरुत्थान होण्यापूर्वी यहोवाच्या उद्देशांबद्दल त्यांना माहिती नव्हती. ते सैतानाच्या दुष्ट व्यवस्थेत सहभागी होते; ते “अनीतीमान” होते. पुनरुत्थानानंतर सैतानाच्या विरोधापासून मुक्त अशा नंदनवनात राहिल्याने यहोवाची सेवा करणे त्यांना सोपे जाईल. परंतु, यहोवाची सेवा बंद करण्यास सैतानाला संधि दिली गेल्यास, हे, पूर्णत्वाला पोहंचलेले लाखो लोक, ती सेवा करतच राहतील का? सैतानाने आदाम व हव्वेला जे केले तेच तो याही लोकांना करु शकेल का?
२१. (अ) यहोवा मानवजातीची परिक्षा कशी घेईल? (ब) परिक्षा संपल्यावर त्यामध्ये गोवलेल्या सर्वांचे काय होईल?
२१ अशा प्रश्नांच्या उत्तरासाठी, १,००० वर्षे अथांग डोहात असलेल्या सैतान व त्याच्या दुरात्म्यांना यहोवा मोकळे करील. याचा परिणाम काय दिसेल? पवित्र शास्त्र दाखविते की, यहोवाची सेवा करण्यापासून काहींना परावृत्त करण्यात सैतान यशस्वी होईल. त्यांची संख्या “समुद्राच्या वाळूसारखी” म्हणजे अनिश्चित आहे. परिक्षा संपल्यावर सैतान, त्याचे दुरात्मे व परिक्षेत अयशस्वी झालेल्या सर्वांना सांकेतिक “अग्नीच्या सरोवरात” टाकले जाईल. म्हणजेच त्यांना दुसरे (कायमचे) मरण येईल. (प्रकटीकरण २०:७-१०, १५) परंतु ज्यांची नावे “जीवनाच्या पुस्तकात” सापडतील ते पृथ्वीवरील उज्वल नंदनवनात राहतील. “जीवनाच्या पुस्तकात” नाव असणे याचा अर्थ यहोवाच्या दृष्टीने त्यांची हृदये, मने व शरीरे पूर्णपणे नीतीमान असतील. आणि म्हणूनच पृथ्वीवरील नंदनवनातील अनंतकाल जीवनास ते पात्र असतील.
आजचा न्यायाचा दिवस
२२. न्यायाचा दिवस व मानवजातीची शेवटची परिक्षा पाहण्यासाठी जगण्यास आपण आज कशातून वाचले पाहिजे?
२२ पवित्र शास्त्र १,००० वर्षांच्या पुढे काय होईल त्याची माहिती देते तसेच भविष्याची भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे ते दर्शविते. परंतु, प्रश्न असा आहे की, यहोवाने भविष्यात निश्चित केलेल्या गोष्टींचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही जिवंत राहाल का? आधीच येणाऱ्या एका न्यायाच्या दिवसातून तुम्ही वाचलात तरच ते शक्य आहे. हा न्यायाचा दिवस म्हणजे सध्याचा “न्यायनिवाड्याचा व भक्तीहीन लोकांच्या नाशाचा दिवस” होय.—२ पेत्र ३:७.
२३. (अ) आज लोकांना कोणत्या दोन गटात विभागले जात आहे? (ब) प्रत्येक गटाचे काय होईल व का?
२३ होय, ख्रिस्त परत येऊन आपल्या स्वर्गीय सिंहासनावर बसल्यापासून सर्व मानवजातीचा न्याय होत आहे. हा वर्तमान “न्यायाचा दिवस” त्या १,००० वर्षांच्या न्यायाच्या दिवसाच्या आरंभापूर्वी येतो. या सध्याच्या न्यायामध्ये, ख्रिस्ताच्या डाव्या हाताला “शेरडे” व उजव्या हाताला “मेंढरे” असे लोक विभागले जात आहेत. ख्रिस्ताच्या अभिषिक्त “बंधूं”ना देवाच्या सेवेमध्ये मदत करण्यात उणे पडल्यामुळे “शेरडां”चा नाश केला जाईल. ही “शेरडे” पश्चाताप न झालेले पापी, दुष्ट व अनीतीमान कामांमध्ये गढलेले लोक असल्याचे कालांतराने उघड होते. उलटपक्षी, ख्रिस्ताच्या “बंधूं”ना हरप्रकारे मदत केल्याने “मेंढरां”ना राज्याच्या अधिपत्याखाली जीवनाचा आशीर्वाद मिळेल.—मत्तय २५:३१-४६.
[१७८ पानांवरील चित्रं]
न्यायाच्या दिवशी सदोमास अधिक सोपे जाईल असे येशू का म्हणाला?