पती या नात्याने प्रेम व आदर दाखविणे
“तुम्हापैकी प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी.”—इफिसकर ५:३३.
१, २. (अ) आज जगात घटस्फोटाची समस्या केवढी व्याप्त आहे? (ब) उलटपक्षी, कोणती स्थिती अस्तित्वात आहे?
१९८० च्या मध्याला अमेरिकेत “दर वर्षी दहा लाखापेक्षा अधिक जोडप्यांची आशादायी स्वप्ने घटस्फोटात भंगतात; विवाह-जीवनाचा सरासरी काळ ९.४ इतका पडतो,” असे सायकॉलॉजी टुडे या मासिकाने कळविले. पुढे ते म्हणतेः “एकंदरीत असे दिसते की, तेथे कोणीही यशस्वी विवाहाचा आनंद घेऊ शकत नाही.” (जून १९८५) आपण जरा विचार केला तर वरील आकडेवारीनुसार एकाच राष्ट्रात विवाहभंगामुळे दरवर्षी ३०,००,००० प्रौढांना व बालकांना मोठा त्रास अनुभवावा लागतो. पण घटस्फोट ही जागतिक समस्या बनली आहे. त्यामुळे असे दिसते की, लाखो विवाहात प्रेम व आदर गायब झाली आहेत.
२ उलटपक्षी, “आणखी एक असा गट आहे, ज्याकडे सर्वसाधारणपणे दुर्लक्ष होत आहेः अशी जोडपी कशीतरी एकत्र राहतात, या आशेने की, एके दिवशी मरणातच त्यांच्या विवाहाचा अंत घडेल.” (सायकॉलॉजी टुडे) यावरुन हे दिसते की, अशी लाखो जोडपी आहेत जे आपला विवाह टिकून रहावा यासाठी बराच प्रयास करतात.
३. आम्ही कोणते प्रश्न स्वतःला विचारु शकतो?
३ तुमचा विवाह कसा आहे? पती व पत्नीमध्ये प्रेम व आदराची उबदार भावना खेळत आहे का? अशा स्वरुपाचे प्रेम तुमच्या कुटुंबात पालक व मुले यात आहे का? किंवा तुम्हाला कधीकधी रुसणे-फुगणे आणि अविश्वास यांचा सामना द्यावा लागतो? आम्ही कोणीही परिपूर्ण नाही त्यामुळे अशी कठीण स्थिती कोणाही घरात उद्भवू शकते; जेथे सर्व ख्रिस्ती राहण्याचा प्रयत्न करतात तेथे सुद्धा. कारण “सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत.”—रोमकर ३:२३.
४. आनंदी कुटुंब राखण्यात कोणाची भूमिका प्रमुख असते असे पौल व पेत्र सूचित करतात?
४ वस्तुतः कोणाही घरात समस्या उद्भवू शकत असल्यामुळे हे विचारात घेणे रास्त आहे की, कुटुंबाला शांतीमय वातावरणात व एकोप्याच्या मार्गावर राखण्याची प्रमुख भूमिका कोणाची असते? प्रेषित पौल व पेत्र हे दोघेही आपल्या पत्राकरवी याविषयीच्या थेट सूचना पुरवितात. पौलाने लिहिलेः “प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे; स्त्रीचे मस्तक पुरुष आहे, आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे.” त्याने असेही म्हटलेः “ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे, तसा पति पत्नीचे मस्तक आहे.” (१ करिंथकर ११:३; इफिसकर ५:२१-२३) याच अनुषंगाने, पेत्राने देखील लिहिलेः “तसेच [ख्रिस्ताच्या नमुन्याला अनुसरून], स्त्रियांनो, तुम्हीही आपापल्या पतीच्या अधीन असा.”—१ पेत्र २:२१–३:१.
ख्रिस्त—उत्साहवर्धक उदाहरण
५, ६. मस्तकपद चालविण्याच्या बाबतीत येशू ख्रिस्त कसा उदाहरण आहे?
५ वर नमूद केलेल्या सूचनेच्या अनुरोधाने पाहता पती हा शास्त्रवचनीय दृष्ट्या कुटुंबाचा मस्तक आहे. पण तो मस्तक कोणत्या अर्थाने आहे? मस्तकपद कसे आचरले पाहिजे? काही पती असे म्हणतील की, ‘मी घरचा मस्तक आहे आणि पवित्र शास्त्र देखील तसेच म्हणते’ आणि या कारणावरून ते सहजगत्या आदर मिळण्याचा अट्टाहास धरतील. पण ही गोष्ट ख्रिस्ताच्या उदाहरणाशी कशी जुळते? ख्रिस्ताने आपल्या अनुयायांकडून मोठ्या गर्वाने आदराची मागणी केली का? ‘मीच देवाचा पुत्र आहे ना? मग मला आदर दाखवा!’ असे त्याने दिमाखाने कधी म्हटल्याचा प्रसंग दिसतो का? उलटपक्षी, येशूने तो आदर मिळवून घेतला. तो कसा? आपली वागणूक, भाषा तसेच इतरांना दयाळूपणे वागविण्यात चांगले उदाहरण राखण्यामुळे.—मार्क ६:३०-३४.
६ अशाप्रकारे, पती व पिता या अर्थाने योग्य मस्तकपद आचरायचे आहे तर त्यासाठी येशू ख्रिस्ताच्या उदारहणाचे अनुसरण करावे लागेल. येशूचे लग्न झाले नाही, पण त्याने ज्या पद्धतीने आपल्या शिष्यांना वागविले ते पतींसाठी नमुना आहे. यामुळे कोणाही पतीसमोर आव्हानच उभे राहते, कारण येशू हा परिपूर्ण नमूना होता व आहे. (इब्रीयांस ४:१५; १२:१-३) तथापि, ख्रिस्ताच्या उदाहरणाचे एखादा पती जितक्या अधिक जवळून अनुकरण करतो तितक्या अधिकपणे त्याला प्रेम व आदर मिळत राहतो. यासाठीच, आपण येशू हा कोणत्या प्रकारातील व्यक्ती होता ते अधिक सूक्ष्मपणे तपासून बघू.—इफिसकर ५:२५-२९; १ पेत्र २:२१, २२.
७. येशूने आपल्या शिष्यांना काय देऊ केले, व कोणत्या उगमाकडून?
७ एके प्रसंगी, येशूने जमावास म्हटलेः “अहो, कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुमच्या जिवांस तजेला देईन. मी जो अंतःकरणाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व मजपासून शिका म्हणजे तुमच्या जिवांस तजेला मिळेल. कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.” तर, येशूने आपल्या शिष्यांना काय देऊ केले होते? तो होता, आध्यात्मिक तजेला वा टवटवीतपणा! पण हा तजेला कोणत्या दिशेने येणार होता? त्याने नुकतेच म्हटले होतेः “पुत्रावाचून व ज्या कोणास [पित्याला] प्रगट करावयाची पुत्राची इच्छा असेल, त्याच्यावाचून पित्याला कोणी ओळखीत नाही.” यावरुन हे दिसते की, आपल्या खऱ्या अनुयायांना येशू, पित्याविषयीचे प्रकटन करून त्यांना आध्यात्मिक तजेला देणार होता. पण येशूने केलेल्या निवेदनामुळे आणखी असे दिसते की, लोकांना हा तजेला येशूसोबत सहवास राखण्याकडून मिळणार होता, कारण येशूने म्हटलेच होते की, तो “अंतःकरणाचा सौम्य व लीन आहे.”—मत्तय ११:२५-३०.
तजेला पुरविणारे पती व पालक कसे बनावे
८. पती व पिता कोणकोणत्या मार्गाद्वारे तजेला देणारा होऊ शकतो?
८ येशूच्या शब्दांमुळे आपल्याला कळते की, ख्रिस्ती पतीने आपल्या कुटुंबासाठी आध्यात्मिक तसेच व्यक्तीगतपणे तजेला देणारे असावे. आपल्या सौम्य वृत्तीच्या उदाहरणामुळे आणि शिक्षणामुळे त्याने आपल्या कुटुंबाला स्वर्गीय पित्याविषयी चांगली समज मिळविण्यात मदत करावी. त्याच्या वागणूकीद्वारा देवाच्या पुत्राचे मन व आचरण प्रकट व्हावे. (योहान १५:८-१०; १ करिंथकर २:१६) अशा गृहस्थासोबत सहवास राखण्यामुळे कुटुंबाला तजेला मिळतो, कारण तो प्रेमळ पती, पिता आणि मित्र असतो. त्याने इतरांसोबत दळणवळणाचा मार्ग खुला ठेवला पाहिजे, आणि कोणी काही विचारण्यासाठी आलेच तर फार कामात आहोत असे दाखवून टाळाटाळ करू नये. खरे म्हणजे, नुसते ऐकण्यापेक्षा कसे ऐकावे हे त्याने जाणून घेण्यास हवे.—याकोब १:१९.
९. मंडळीतील वडीलांना कधीकधी कोणत्या समस्येला तोंड द्यावे लागते?
९ यामुळे, मंडळीतील वडील व त्यांच्या कुटुंबावर परिणाम करणारी एक समस्या आमच्या लक्षात येते. वडील बहुधा मंडळीतील आध्यात्मिक गरजांकडे लक्ष पुरविण्यात मग्न असतात. ख्रिस्ती सभा, उपाध्यपण आणि मेंढपाळकत्वाच्या कामाच्या बाबतीत त्यांनी चांगले उदाहरण राखावयास हवे. (इब्रीयांस १३:७, १७) पण काही वडीलांनी, तसे पाहता, मंडळीचा जणू भारच आपणावर घेतला आहे व यामुळे त्यांच्या कुटुंबाकडे त्यांचे दुर्लक्ष होत राहिले व मोठा भयंकर परिणाम घडला. एका प्रकरणात असे दिसले की, एका वडीलाला तर आपल्या मुलासोबत अभ्यास करण्यास वेळ नव्हता. हा अभ्यास त्याने दुसऱ्याने चालवावा अशी योजना करून घेतली!
१०. मंडळी तसेच घर यातील मस्तकपद सांभाळताना वडील कसा समतोल राखू शकतात?
१० हे उदाहरण कोणत्या गोष्टीवर जोर देते? याच की, पुरुषाने मंडळी तसेच बायको व कुटुंबाविषयीच्या जबाबदाऱ्यांमध्ये तोल राखावा. मंडळीची सभा संपल्यावर असे दिसते की, वडील साधारणतः काही समस्यांचे निरसन करण्यात वा काही गोष्टींची चर्चा करण्यात मग्न बनतात. अशा वेळी, शक्य आहे तर वडीलाने आपली बायको व मुले यांना तेथे तासन्तास वाट बघावयास न लावता कोणाबरोबर तरी घरी पाठवावयाची योजना करून दिली तर मग ते त्यांच्यासाठी तजेला आणणारे ठरणार नाही का? पवित्र शास्त्राच्या गरजांच्या अनुषंगाने पाहता असे म्हटले जाऊ शकते की, ‘मेंढपाळकत्व प्रथम घरापासून सुरु झाले पाहिजे.’ कोणी वडील जर आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करीत आहे तर त्यांना असणारी नेमणूक धोक्यात येण्याची शक्यता आहे. या कारणास्तव वडीलांनो, समंजसपणाने आपल्या कुटुंबाच्या भावनिक, आध्यात्मिक तसेच इतर गरजांचा विचार करा.—१ तीमथ्य ३:४, ५; तीतास १:५, ६.
११, १२. ख्रिस्ती पतीला आपल्या कुटुंबाचे सहकार्य कसे मिळू शकेल, यासाठीच प्रत्येक पतीने कोणते प्रश्न विचारण्याची गरज आहे?
११ तजेला देणारा ख्रिस्ती पती स्वायत्त किंवा जुलमी नसणार, तसेच तो आपल्या कुटुंबाचा सल्ला न घेता निर्णय घेणार नाही. कधी कधी नोकरीचा बदल, घराचे दुसरीकडे स्थलांतर किंवा मनोरंजन या साध्या विषयाच्या बाबतीत देखील निर्णय घ्यावे लागतात. वस्तुतः याचा घरातील सर्वांवर परिणाम होणार असल्याने त्यांचा याविषयीचा सल्ला घेणे हे सूज्ञतेचे व दयावंत नसणार का? त्यांच्याकडून विचारलेला परामर्श अधिक सूज्ञ तसेच विचारशील निर्णय घेण्यास साहाय्यक ठरू शकेल. तेव्हा कुटुंबातील इतरांना कुटुंबप्रमुखाला सहकार्य देण्यात अधिक सोयीचे वाटेल.—पडताळा नीतीसूत्रे १५:२२.
१२ वरील गोष्टींचा विचार करता, ख्रिस्ती पती व पिता हा घरात शिस्त लावत फिरणारी आकृती नाही. त्याने इतरांना तजेला पुरविणारे असावे. तर पतींनो व बापांनो, तुम्ही ख्रिस्तासारखे आहात का? तुम्ही आपल्या कुटुंबाला तजेला देता का?—इफिसकर ६:४; कलस्सैकर ३:२१.
सूज्ञानाने सहवास ठेवणे
१३. पेत्र पतींना कोणती सुंदर सूचना देतो?
१३ विवाहितांना पेत्र तसेच पौलाने कोणती सुंदर सूचना दिली ते आपण पाहिले आहेच. पेत्र स्वतः विवाहीत असल्यामुळे त्याने आपला अनुभव तसेच पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन या दोन्ही गोष्टींना अनुसरुन सल्ला दिला. (मत्तय ८:१४) त्याने सर्व पतींना हा थेट सल्ला दिलाः “पतींनो, तसेच तुम्हीही आपल्या स्त्रियांबरोबर, त्या अधिक नाजूक व्यक्ती आहेत म्हणून सूज्ञतेने सहवास ठेवा. . . . तुम्ही त्यांना मान द्या.” जे. सी. वाण्ड यांचे अनुवादात्मक भाषांतर असे वाचण्यात येतेः “पतींनीही याचप्रमाणे आपल्या बायकांच्या नातेसंबंधात ख्रिस्ती तत्त्वांचा अवलंब सूज्ञतेने करण्यास हवा.”—१ पेत्र ३:७.
१४. आता कोणते प्रश्न येतात?
१४ आता, ‘बायकोशी सूज्ञतेने सहवास ठेवणे’ किंवा “ख्रिस्ती तत्त्वांचा अवलंब सूज्ञतेने” करणे याचा काय अर्थ होतो? पती आपल्या बायकोस कसा मान देऊ शकतो? खरेच, ख्रिस्ती पतीने पेत्राच्या सल्ल्याचा कसा अर्थ घेण्यास हवा?
१५. (अ) काही विवाह का अपशयी ठरतात? (ब) विवाहात खरे आव्हान कशाचे असते?
१५ पुष्कळ विवाह शारीरिक ढब आणि लैंगिक आकर्षण याजमुळे घडतात. पण विवाहाची यशस्वीता ही केवळ सुंदरपणावर विसंबून नाही, कारण ती चिरकाल टिकत नाही. विवाह होऊन काही काळ लोटला तर लगेच पांढरे केस व चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. पण हे लक्षात घ्या की विवाह म्हणजे दोन मने, दोन भिन्न व्यक्तीमत्व, दोन वेगवेगळ्या पार्श्वभूमि व आध्यात्मिक मूल्ये तसेच दोन भाषा यांचे सुगम मिलन होय. यामुळे कितीतरी आव्हान उभे ठाकते. पण समंजसपणा आनंदी विवाहाचा पाया ठरतो.—नीतीसूत्रे १७:१; २१:९.
१६. ‘सूज्ञतेने सहवास ठेवणे’ यात काय काय समाविष्ट आहे?
१६ ख्रिस्ती पतीने आपल्या बायकोसोबत ‘सूज्ञतेने सहवास ठेवणे’ याचा अर्थ त्याने तिच्या गरजांची खरेपणाने जाण राखणे होय. या केवळ तिच्या शारीरिक गरजा नव्हेत, तर अधिक महत्त्वपूर्ण अशा भावनिक, मानसिक आणि आध्यात्मिक गरजा होत. पती तिच्यासोबत ‘सूज्ञतेने सहवास ठेवत’ असेल तर तो आपली देवनियोजित भूमिका समजू शकेल. याचा अर्थ हाही होतो की तो तिच्या स्त्रीत्वाच्या गुणलक्षणांचा आदर करील. हा दृष्टीकोण, पेत्राच्या काळी ज्ञेयवादी किंवा पाखंडी लोक धरून असलेल्या दृष्टीकोणापेक्षा भिन्न आहे, कारण ते, “स्त्रिया नीच, विषयासक्त आणि अशुद्ध” मानीत. (द अँकर बायबल) एक आधुनिक स्पॅनिश भाषांतरकार पेत्राचे शब्द या पद्धतीने भाषांतरीत करतोः “पतींच्या बाबतीतः तुम्ही सहभागी झालेल्या जीवनात चाणाक्षता राखा, स्त्रीच्या बाबतीत विचारशीलता राखा, कारण ती अधिक नाजूक प्रकृतीची आहे.” (न्यूवा बिब्लिआ एस्पानोला) हा एक सुंदर विचार आहे जो पती कधी कधी विसरतात.
१७. (अ) इतर गोष्टींसमवेत “अधिक नाजूक प्रकृती”त कशाचा समावेश आहे? (ब) पती कोणत्या एका मार्गाने पत्नीच्या गुणलक्षणांच्या बाबतीत आदर व्यक्त करू शकेल?
१७ बायको ही, “अधिक नाजूक प्रकृतीची” का आहे? इतरही गोष्टी आहेत पण यात तिला जी जननशक्तीची देणगी आहे ती अधिकपणे कारणीभूत आहे. तिच्या या प्रजननशक्तीक जीवनात मासिक पाळी येते तेव्हा काही दिवस तिला कसेतरी किंवा दबावाखाली असल्याचे वाटू लागते. पतीने ही गोष्ट लक्षात घेतली नाही व तो महिन्यात दररोज नेहमीचीच मागणी करीत राहिल्यास त्याला तिजविषयीचा आदर दाखविता येणार नाही. असे झाले तर तो तिच्याबरोबर सूज्ञतेने नव्हे तर निव्वळ स्वार्थी आकांक्षास्तव सहवास ठेवत आहे.—लेवीय १८:१९; १ करिंथकर ७:५.
अधिक नाजूक व्यक्ती म्हणून सन्मान देणे
१८. (अ) काही पती कोणत्या अनिष्ट सवयीत पडतात? (ब) ख्रिस्ती पतीने कसे वागावे?
१८ बायकोविषयी प्रेम व आदर दाखविण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे पतीने ती व तिजठायी असणाऱ्या गुणांच्या बाबतीत रसिकता दाखविणे व व्यक्त करणे. पतीला कदाचित बायकोविषयी मानहानीकारक शेरे देण्याची किंवा तिला विनोदाचा विषय बनविण्याची सवय असेल. यामुळे आपल्याला लोकांची वाहवा मिळते असे पतीला वाटत असेल. तरीपण, याचा परिणाम खरे पाहता विरुद्ध दिशेचा आहे. कारण जर तो आपल्या बायकोला सतत इतरांपुढे, तू किती मूर्ख दिसते, असे भासवीत असेल तर उघड प्रश्न आहे की, या पतीने या मूर्ख स्त्रीबरोबर लग्न तरी का केले? खरे म्हणजे, जो स्थैर्य राखीत नाही अशा पतीकडूनच असे हे शेरे ऐकायला मिळतील. वस्तुतः प्रेमळ पती आपल्या बायकोचा आदर करील.—नीतीसूत्रे १२:१८; १ करिंथकर १३:४-८.
१९. पतीने आपल्या बायकोची मानहानी करणे का योग्य नाही?
१९ काही देशात बायकोला कमीपणा दाखविण्याची प्रथा आहे. जसे की, जपानमध्ये एखादा पती बायकोची प्रस्तावना “गुशाय” म्हणजे ‘मूर्ख वा मंद बायको’ अशी करील; यात हेतू हा की, ज्याला ही प्रस्तवाना केली जाते त्याने तिच्याविषयी काही चांगले अभिप्राय द्यावेत. कोणी ख्रिस्ती पती जर याप्रकारे आपल्या बायकोची ओळख इतरांना करून देत आहे तर तो पेत्राच्या म्हणण्यानुसार आपल्या बायकोला ‘मान देतो’ का? दुसऱ्या बाजूने पाहिल्यास, तो आपल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोलत असतो का? आपली बायको मूर्ख आहे असे त्याला खरेपणाने वाटत असते का?—इफिसकर ४:१५, २५; ५:२८, २९.
२०. (अ) नवरा-बायकोत कोणती विरुद्ध स्वरुपाची परिस्थिती उद्भवू शकते? (ब) ती कशी टाळता येईल?
२० आपली बायको ही केवळ राज्य सभागृहातच नव्हे तर घरात आणि इतर सर्व प्रसंगी देखील ख्रिस्ती भगिनी असते हे विसरल्यामुळे पती तिजविषयी प्रेम व आदर दाखविण्यात उणा पडतो. राज्यसभागृहात दयावंत व सभ्य असणे पण तेच घरी उद्धट व बेमुर्वत असणे किती सोपे वाटते बरे! या कारणास्तव पौलाची सूचना किती योग्य आहे! तो म्हणतोः “शांतीला व परस्परांच्या वृद्धीला पोषक होणाऱ्या गोष्टींच्या मागे आपण लागावे.” “आपणापैकी प्रत्येक जणाने शेजाऱ्याची उन्नति होण्याकरता त्याचे बरे करून त्याच्या सुखाकडे पाहावे.” (रोमकर १४:१९; १५:२) नवरा किंवा बायको यापेक्षा जवळचा दुसरा शेजारी कोणी नाही.
२१. आपल्या बायकोस प्रोत्साहन लाभावे यासाठी पती काय करू शकेल?
२१ यामुळेच प्रेमळ ख्रिस्ती पती आपल्या बायकोसंबंधाने उक्ती व कृतीद्वारे देखील रसिकता व्यक्त करील. एका निनावी कवीने ती अशाप्रकारे दाखविलीः
“विवाह जीवनात आहे काळजी, त्रास जरी
आहे कामकाज, वाटे कष्ट जरी
लागे गोडी सहचरीची खरी—
सांगा तिजला मनापासूनी! . . .
आहे ती तुमची, केवळ तुमचीच;
वाटे तुम्हासही ती आपलीच;
नका थांबू मग, लिहूनी दाखवण्या—
सांगा तिजला मनापासूनी!”
या कवितेतील भावना प्राचीन राजा लमुवेलच्या आईठायी होत्या. तिनेच, सद्गुणी स्त्री कशी असते तिचे थोडक्यात असे वर्णन दिलेः “तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात, तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून म्हणतोः ‘बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखविले आहेत, पण तू त्या सर्वांहून वरचढ आहेस.’” (नीतीसूत्रे ३१:१, २८, २९) पतींनो, तुम्ही आपल्या बायकोची स्तुती करता का? किंवा ही स्तुतीसुमने प्रणयाराधनेच्या काळातच हरपली?
२२, २३. यशस्वी विवाह कशावर आधारलेला आहे?
२२ अशाप्रकारे या थोड्या विचारविनिमयात हे दिसले की, पतीला जर आपल्या वैवाहिक जीवनात प्रेम व आदर दाखवावयाचा आहे तर घरी नुसता पगार आणून देणे पुरेसे नाही. विवाहाची यशस्वीता ही प्रेमळ, निष्ठावंत आणि समंजस नातेसंबंधावर अवलंबून आहे. (१ पेत्र ३:८, ९) वर्षे निघून जातात तसतसे हे नाते अधिक दृढ व्हावयास हवे; पती व पत्नी दोघांनीही, एकमेकांचे सद्गुण, क्षमता याविषयी आवड वाढविली पाहिजे; आणि एकमेकांच्या अशक्तपणाकडे दुर्लक्ष करून क्षमाशील बनले पाहिजे.—इफिसकर ४:३२; कलस्सैकर ३:१२-१४.
२३ पतीने प्रेम व आदर दाखविण्यात पुढाकार घेतल्यास सबंध कुटुंबावर आशीर्वाद येऊ शकेल. पण या आनंदी कुटुंबात ख्रिस्ती पत्नीची भूमिका कोणती? याविषयी तसेच याजशी संबंधित असणाऱ्या इतर गोष्टींची चर्चा आपणास आमच्या एप्रिलच्या अंकात पहावयास मिळेल.
तुम्हाला आठवते का?
◻ आनंदी विवाहात प्रमुख भूमिका कोणाची असते व का?
◻ पती ख्रिस्ताच्या तजेला देणाऱ्या उदाहरणाचे कसे अनुकरण करू शकतात?
◻ मंडळी तसेच कुटुंबाच्या जबाबदारीमध्ये कोणता समतोल राखण्याची गरज आहे?
◻ पतीला ‘आपल्या बायकोशी सूज्ञतेने सहवास [कसा] ठेवता येईल’?
◻ ‘बायकोला नाजूक पात्र म्हणून मान देणे’ याचा काय अर्थ होतो?