वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • तणावापासून मुक्‍त होण्याचा—व्यवहार्य उपाय
    टेहळणी बुरूज—२००१ | डिसेंबर १५
    • जुवाखाली सापडलेले

      ९, १०. प्राचीन काळात, जू कशाचे सूचक होते आणि येशूने लोकांना त्याचे जू स्वीकारण्याचे निमंत्रण का दिले?

      ९ मत्तय ११:२८, २९ येथे येशूने म्हटले: “माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका.” या शब्दांकडे तुम्ही लक्ष दिले का? त्या काळातल्या सामान्य माणसाला कदाचित आपण एखाद्या जुवाखाली सापडलो आहोत असे वाटत असावे. प्राचीन काळापासून जुवाचे रूपक गुलामगिरीच्या किंवा दास्यत्वाच्या संदर्भात वापरण्यात आले आहे. (उत्पत्ति २७:४०; लेवीय २६:१३; अनुवाद २८:४८) येशूला भेटलेल्या कित्येक मजुरांना अक्षरशः खांद्यावरील जुवावर अवजड ओझी वाहून न्यावी लागत असे. जुवांची बनावट वेगवेगळ्या प्रकारची असल्यामुळे काही जू मानेवर व खांद्यावर वाहायला सोपे तर काही रुतणारे होते. येशू स्वतः एक सुतार असल्यामुळे कदाचित त्याला जू बनवण्याचाही अनुभव असावा आणि ते “सोयीचे” वाटावे म्हणून त्याची रचना कशी करावी हे देखील त्याला माहीत असावे. जू वाहण्यास जास्तीतजास्त सोपे जावे म्हणून ज्या ठिकाणी ते मानेवर किंवा खांद्यांवर घासण्याची शक्यता होती त्या ठिकाणी तो काहीतरी अस्तर लावत असेल.

      १० “माझे जू आपणावर घ्या” असे येशूने म्हटले तेव्हा कदाचित कामगारांच्या मानेला आणि खांद्यांना “सोयीचे” असलेले चांगल्या प्रतीचे जू पुरवणाऱ्‍याशी तो स्वतःची तुलना करत असावा. म्हणूनच त्याने पुढे म्हटले: “माझे ओझे हलके आहे.” याचा अर्थ, त्याचे जू त्रासदायक नव्हते आणि ते काम देखील गुलामगिरीचे नव्हते. ऐकणाऱ्‍यांना आपले जू स्वीकारण्याचे निमंत्रण देण्याद्वारे येशू त्यांना त्याकाळातील सर्व दुःसह परिस्थितीपासून लगेच मुक्‍ती मिळेल असे सुचवत नव्हता. पण त्याने दाखवलेली वेगळी मनोवृत्ती स्वीकारल्यामुळे त्या लोकांना विसावा मिळणार होता. शिवाय आपल्या जीवनशैलीत व आचरणात बदल केल्यामुळेही ते तणावमुक्‍त होणार होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांना एक जिवंत व निश्‍चित आशा मिळाल्यामुळे साहजिकच त्यांना त्यांचे जीवन तितके तणावपूर्ण भासणार नव्हते.

      तुम्हालाही विसावा मिळू शकतो

      ११. येशू एका जुवाच्या ऐवजात दुसरा घेण्याचे का सुचवत नव्हता?

      ११ लोक एका जुवाच्या ऐवजात दुसरा घेतील असे येशूने म्हटले नाही, याकडे लक्ष द्या. आज ख्रिस्ती लोक वेगवेगळ्या सरकारांच्या प्रभुत्वाखाली असलेल्या देशांत राहतात, त्याप्रमाणे त्या लोकांच्या देशावर रोमचे प्रभुत्व पुढेही राहणार होते. पहिल्या शतकात, रोमी लोकांनी लादलेले कर त्यांना कायम भरावे लागणार होते. आरोग्याच्या व आर्थिक समस्या देखील राहणार होत्या. अपरिपूर्णता व पाप पुढेही त्यांच्या जीवनावर परिणाम करणार होते. पण हे सर्व असूनसुद्धा, येशूच्या शिकवणुकींचा स्वीकार करण्याद्वारे त्यांना विसावा मिळू शकणार होता आणि आज आपल्याला देखील मिळू शकतो.

      १२, १३. विसावा मिळण्याकरता येशूने कशावर जोर दिला आणि काहींनी याला कसा प्रतिसाद दिला?

      १२ येशूने जुवाचे उदाहरण देण्याचा एक महत्त्वाचा अर्थ शिष्य बनवण्याच्या कार्याच्या संदर्भात स्पष्ट होतो. येशूचे सर्वात महत्त्वाचे कार्य इतरांना शिकवणे हेच होते यात शंका नाही व त्याने देवाच्या राज्यावर नेहमी भर दिला. (मत्तय ४:२३) त्यामुळे, “माझे जू आपणावर घ्या” असे त्याने म्हटले तेव्हा त्याने केलेल्या कार्याचे अनुसरण करण्याचा अर्थ त्यात निश्‍चितच गोवलेला होता. शुभवर्तमानाचा अहवाल दाखवतो की येशूने प्रांजळ मनोवृत्तीच्या लोकांना त्यांचा पेशा, जो साहजिकच त्यांच्या जीवनातील एक मुख्य प्रश्‍न असावा, तो बदलण्यास प्रेरित केले. पेत्र, आंद्रिया, याकोब व योहान यांना त्याने कसे बोलवले होते हे तुम्हाला आठवत असेल: “माझ्यामागे या म्हणजे तुम्ही माणसे धरणारे व्हाल, असे मी करीन.” (मार्क १:१६-२०) त्याने मासेमारी करणाऱ्‍या त्या चौघांना दाखवले की त्याने आपल्या जीवनात ज्या कार्याला प्राधान्य दिले होते ते कार्य त्यांनीही, त्याच्या मार्गदर्शनानुसार व त्याच्या साहाय्याने केले तर त्यांना किती समाधान प्राप्त होईल.

      १३ त्याचे ऐकणाऱ्‍यांपैकी काही यहूद्यांना त्याच्या शिकवणुकींचा अर्थ समजला व त्यांनी त्यांचे पालन केले. लूक ५:१-११ येथील वर्णनानुसार, समुद्रकिनाऱ्‍यावर घडलेल्या त्या घटनेचे दृश्‍य डोळ्यापुढे उभे करा. चार कोळ्यांना रात्रभर मेहनत करूनही काहीही हाती लागलेले नाही. आणि अचानक त्यांच्या जाळ्या माशांनी लदबदून गेल्या! हे काही आपोआप घडले नाही; तर येशूने ते घडवून आणले. समुद्रकिनाऱ्‍याकडे पाहिल्यावर त्यांना येशूचे उपदेश ऐकण्याकरता आसूसलेल्या लोकांच्या झुंडी दिसल्या. ‘येथून पुढे तुम्ही माणसे धरणारे व्हाल’ असे जे येशूने त्यांना म्हटले त्याचा काय अर्थ होता हे आता त्यांना समजले. मग त्यांची काय प्रतिक्रिया होती? “मचवे किनाऱ्‍याला लावल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले.”

      १४. (अ) आज आपल्याला कशाप्रकारे विसावा मिळू शकतो? (ब) येशूने विसावा देणाऱ्‍या कोणत्या सुवार्तेची घोषणा केली?

      १४ तुम्ही देखील अशाचप्रकारे प्रतिसाद देऊ शकता. लोकांना बायबलमधील सत्य शिकवण्याचे कार्य अद्याप सुरू आहे. जगभरात जवळजवळ ६० लाख यहोवाच्या साक्षीदारांनी “माझे जू आपणावर घ्या” या येशूच्या निमंत्रणाचा स्वीकार केला आहे; ते “माणसे धरणारे” बनले आहेत. (मत्तय ४:१९) काहीजण पूर्णवेळ हे कार्य करतात; इतरजण पूर्णवेळ नाहीतरी जमेल तितका वेळ या कार्याला देतात. या सर्वांना या कार्यामुळे एकप्रकारचा तजेला मिळतो आणि यामुळे त्यांचे जीवन पूर्वीइतके तणावग्रस्त राहात नाही. हे कार्य म्हणजे इतरांना एक चांगली बातमी, अर्थात “राज्याची सुवार्ता” सांगण्याचे कार्य आहे ज्यामुळे त्यांना आनंद मिळतो. (मत्तय ४:२३) कोणत्याही चांगल्या वार्तेविषयी इतरांना सांगणे आनंददायक असते पण ही तर एक खास सुवार्ता आहे. जीवनातला तणाव कमी करणे शक्य आहे हे लोकांना पटवून देण्यासाठी आवश्‍यक असलेली मूलभूत माहिती बायबलमध्ये आहे.—२ तीमथ्य ३:१६, १७.

      १५. येशूने दिलेल्या जीवनोपयोगी शिकवणुकींपासून तुम्हाला कशाप्रकारे फायदा होऊ शकतो?

      १५ काही प्रमाणात, ज्या लोकांनी अलीकडेच देवाच्या राज्याविषयी शिकण्यास सुरवात केली आहे त्यांना देखील येशूने दिलेल्या जीवनोपयोगी शिकवणुकींचा फायदा झाला आहे. बरेचजण प्रामाणिकपणे हे कबूल करू शकतात की येशूच्या शिकवणुकींनी त्यांना विसावा देऊन त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यास मदत केली आहे. येशूचे जीवन व सेवाकार्य यांविषयीच्या अहवालांत, खासकरून मत्तय, मार्क व लूक यांनी लिहिलेल्या शुभवर्तमानांत आढळणाऱ्‍या जीवनोपयोगी तत्त्वांचे परीक्षण करण्याद्वारे तुम्ही याची खात्री स्वतः करू शकता.

      विसावा मिळण्याचा मार्ग

      १६, १७. (अ) येशूच्या काही मुख्य शिकवणुकी तुम्हाला कोठे आढळतील? (ब) येशूच्या शिकवणुकींचे पालन केल्यामुळे आपल्याला विसावा मिळण्याकरता काय करण्याची गरज आहे?

      १६ सा.यु. ३१ साली येशूने दिलेले एक प्रवचन आजपर्यंत जगप्रसिद्ध आहे. याला सहसा डोंगरावरील प्रवचन म्हणतात. हे प्रवचन मत्तयाच्या ५ ते ७ अध्यायांत आणि लूक शुभवर्तमानातील ६ व्या अध्यायात सापडते आणि यात त्याच्या बहुतेक शिकवणुकींचे सार आहे. शुभवर्तमानातील इतर भागांत तुम्हाला येशूच्या इतर शिकवणुकी आढळतील. त्याने सांगितलेल्या बहुतेक गोष्टी समजायला सोप्या आहेत पण त्या वागणुकीत आणणे तितके सोपे नसेल. तुम्हाला या अध्यायांचे लक्षपूर्वक, विचारपूर्वक वाचन करायला आवडेल का? यातील विचारांच्या शक्‍तीचा तुमच्या विचारसरणीवर आणि मनोवृत्तीवर प्रभाव पडू द्या.

      १७ अर्थात, येशूच्या शिकवणुकींचे आपण वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण करू शकतो. आपण त्याच्या मुख्य शिकवणुकींचे अशाप्रकारे वर्गीकरण करू या, जेणेकरून महिन्याच्या प्रत्येक दिवशी त्याच्या एका शिकवणुकीचे आपल्या जीवनात पालन करण्याचे ध्येय आपल्याला ठेवता येईल. कशाप्रकारे? हे मुद्दे केवळ वरवर वाचू नका. “काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल?” असे येशूला विचारणाऱ्‍या श्रीमंत अधिकाऱ्‍याची आठवण करा. येशूने त्याला देवाच्या नियमशास्त्रातील मुख्य अपेक्षांची आठवण करून दिली तेव्हा त्या माणसाने आपण आधीच या सर्व गोष्टी करत असल्याचे सांगितले. पण त्याला जाणीव झाली की यापेक्षाही अधिक करण्याची गरज आहे. येशूने त्याला व्यावहारिक मार्गांनी देवाच्या तत्त्वांचा जीवनात अवलंब करण्याचा, अर्थात येशूचा सक्रिय शिष्य बनण्याचा अधिक प्रयत्न करण्यास सांगितले. पण हा माणूस तितकी तसदी घ्यायला तयार नव्हता. (लूक १८:१८-२३) आजही, ज्याला येशूच्या शिकवणुकी जाणून घ्यायच्या आहेत त्याने हे आठवणीत ठेवले पाहिजे की या शिकवणुकींशी सहमत होणे आणि जीवनातील तणाव कमी करण्याइतपत त्यांचा सक्रियरित्या अवलंब करणे वेगळे आहे.

      १८. सोबत दिलेल्या पेटीतील माहितीचा उपयोग कसा करता येईल याचे उदाहरण द्या.

      १८ येशूच्या शिकवणुकींचे परीक्षण आणि अवलंब करण्यास सुरवात करण्यासाठी सोबत दिलेल्या पेटीतल्या १ ल्या मुद्द्‌याकडे लक्ष द्या. हा मुद्दा मत्तय ५:३-९ या वचनांवर आधारित आहे. निश्‍चितच, आपल्यापैकी कोणीही या वचनांतील सुंदर सल्ल्याविषयी बराच वेळ मनन करू शकतो. पण या वचनांवर एकंदर विचार केल्यावर माणसाच्या मनोवृत्तीबद्दल तुम्ही कोणता निष्कर्ष काढू शकता? जर तुम्हाला जीवनातील अनावश्‍यक तणावाच्या दुष्परिणामांवर खरोखर मात करायची असेल तर कशामुळे मदत होईल? तुम्ही आध्यात्मिक गोष्टींकडे अधिक लक्ष दिले, आपल्या विचारांत आध्यात्मिक गोष्टींना अधिक वाव दिला तर तुमच्या परिस्थितीत कोणता चांगला परिणाम होईल? तुमच्या जीवनात अशा काही गोष्टी आहेत का ज्यांना कदाचित कमी महत्त्व देऊन त्यांऐवजी तुम्हाला आध्यात्मिक गोष्टींकडे अधिक लक्ष देता येईल? तुम्ही असे केल्यास यामुळे तुमच्या आनंदात नक्कीच भर पडेल.

      १९. अधिक ज्ञान व समज मिळण्याकरता तुम्ही काय करू शकता?

      १९ आता आणखी एक पाऊल पुढे जाऊ. या वचनांसंबंधी तुम्हाला देवाच्या सेवकांपैकी इतर कोणाशी उदाहरणार्थ, पती किंवा पत्नी, जवळचे नातेवाईक किंवा मित्र अथवा मैत्रिणीशी चर्चा करता येईल का? (नीतिसूत्रे १८:२४; २०:५) त्या श्रीमंत अधिकाऱ्‍याने दुसऱ्‍या व्यक्‍तीला, अर्थात येशूला एका समर्पक विषयावर प्रश्‍न केला हे लक्षात घ्या. येशूने दिलेल्या उत्तरामुळे आनंदी व सार्वकालिक जीवन मिळण्याची त्याची आशा अधिक बळकट होऊ शकली असती. तुम्ही ज्या सह उपासकासोबत या वचनांची चर्चा कराल तो येशूच्या तुल्य नसेल; पण तरीसुद्धा येशूच्या शिकवणुकींसंबंधी चर्चा केल्यामुळे तुम्हा दोघांना फायदा होईल. लवकरात लवकर हा प्रयोग करून पाहा.

      २०, २१. येशूच्या शिकवणुकी जाणून घेण्याकरता तुम्ही कोणत्या कार्यक्रमाचे पालन करू शकता आणि आपण किती प्रगती केली हे तुम्हाला कसे ठरवता येईल?

      २० “तुम्हाला सहायक ठरतील अशा शिकवणुकी” या पेटीकडे पुन्हा लक्ष द्या. या शिकवणुकी अशारितीने मांडण्यात आल्या आहेत की तुम्हाला दररोज निदान एक शिकवणुकीवर विचार करता येईल. आधी तुम्ही या वचनात येशूने काय म्हटले हे वाचू शकता. मग त्याच्या शब्दांवर विचार करा. जीवनात त्यांचे कशाप्रकारे पालन करता येईल यावर मनःपूर्वक विचार करा. आपण या तत्त्वांचे आधीच पालन करत आहोत असे वाटल्यास, देवाच्या या शिकवणुकीनुसार जगण्याकरता आणखी काय करता येईल याविषयी चिंतन करा. त्या अनुषंगाने दिवसभर प्रयत्न करा. ती विशिष्ट वचने समजण्यास किंवा त्यांचे कसे पालन करायचे हे समजण्यास कठीण जात असेल तर त्या मुद्द्‌याकरता आणखी एक दिवस द्या. पण, एका मुद्द्‌याचे पालन करण्यात यश आल्यावरच पुढचा मुद्दा विचारात घ्यायचा असा काही नियम नाही. पुढच्या दिवशी तुम्ही दुसऱ्‍या शिकवणुकीवर विचार करू शकता. आठवड्याच्या शेवटी येशूच्या चार किंवा पाच शिकवणुकींचे अवलंब करण्यात तुम्ही कितपत यशस्वी झाला आहात याची उजळणी करा. दुसऱ्‍या आठवड्यात दररोज एकेका शिकवणुकीची भर घालत राहा. एखाद्या शिकवणुकीचे पालन करण्यात आपण पुन्हा चुकलो असे लक्षात आल्यास निराश होऊ नका. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍तीला हा अनुभव येईल. (२ इतिहास ६:३६; स्तोत्र १३०:३; उपदेशक ७:२०; याकोब ३:८) तिसऱ्‍या व चवथ्या आठवड्यातही त्या शिकवणुकींचे पालन करणे सुरूच ठेवा.

      २१ एकदीड महिन्यात कदाचित तुम्ही सर्व ३१ मुद्दे संपवले असतील. परिणामस्वरूप, तुम्हाला कसे वाटेल? तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक आनंदी, अधिक तणावमुक्‍त नसाल का? तुम्ही थोडीशीच सुधारणा केली असली तरीसुद्धा तुम्हाला तुमचा तणाव कमी झाल्याचे जाणवेल, किंवा निदान तुम्ही तणावाला अधिक चांगल्याप्रकारे तोंड देण्यास समर्थ झाला असाल आणि पुढेही तसेच करत राहण्याची पद्धत तुम्हाला माहीत झालेली असेल. येशूच्या शिकवणुकींत, या यादीत नसलेल्या इतरही अनेक उत्तम मुद्द्‌यांचा समावेश आहे हे विसरू नका. त्या मुद्द्‌यांचा तुम्हाला स्वतःहून शोध घेऊन त्यांचा अवलंब करता येईल का?—फिलिप्पैकर ३:१६.

      २२. येशूच्या शिकवणुकींचे पालन केल्यामुळे काय परिणाम होऊ शकतो पण यासंदर्भात आणखी कोणता पैलू परीक्षण करण्याजोगा आहे?

      २२ तुम्हाला लक्षात आले असेल की येशूचे जू अजिबातच वजन नसलेले नाही तरीसुद्धा ते खरोखर सोयीचे आहे. त्याच्या शिकवणुकी आणि शिष्यत्वाचे ओझे हलके आहे. ६० वर्षांच्या वैयक्‍तिक अनुभवानंतर येशूचा प्रिय मित्र प्रेषित योहान याने असा निष्कर्ष काढला: “देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.” (१ योहान ५:३) तुम्ही देखील हाच भरवसा बाळगू शकता. येशूच्या शिकवणुकींचे तुम्ही जितका काळ पालन करत राहाल तितकेच तुम्हाला हे लक्षात येईल की लोकांना तणावदायक वाटणाऱ्‍या गोष्टींचा तुमच्यावर तितकासा परिणाम होत नाही. तुम्हाला बऱ्‍याच प्रमाणात विसावा मिळाल्याचे जाणवेल. (स्तोत्र ३४:८) पण येशूच्या जुवासंबंधी विचारात घेण्याजोगा आणखी एक पैलू आहे. येशूने आपण “सौम्य व लीन” असल्याविषयीही उल्लेख केला होता. येशूच्या शिकवणुकी आत्मसात करण्याशी व त्याचे अनुकरण करण्याशी हे कशाप्रकारे संबंधित आहे? पुढील लेखात आपण याविषयी पाहू या.—मत्तय ११:२९.

  • “माझ्यापासून शिका”
    टेहळणी बुरूज—२००१ | डिसेंबर १५
    • “माझ्यापासून शिका”

      “मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवास विसावा मिळेल.”—मत्तय ११:२९.

      १. येशूविषयी शिकणे हा एक आनंददायक आणि समृद्ध करणारा अनुभव का ठरू शकतो?

      येशू ख्रिस्त त्याच्या विचारांत, शिकवणुकींत आणि वागणुकीत कधीही चुकला नाही. तो पृथ्वीवर फार कमी काळ राहिला पण त्याला त्याच्या कामातून पुरेपूर समाधान व आनंद मिळाला. त्याने आपल्या शिष्यांना एकत्रित करून त्यांना देवाची उपासना कशी करावी, मानवजातीवर कशाप्रकारे प्रीती करावी आणि जगावर विजय कसा मिळवावा याविषयी शिकवले. (योहान १६:३३) त्याने त्यांच्या मनांत आशा उत्पन्‍न केली आणि “सुवार्तेच्या द्वारे जीवन व अविनाशिता ही प्रकाशित केली.” (२ तीमथ्य १:१०) तुम्ही स्वतःला त्याचे शिष्य समजत असल्यास, शिष्य असण्याचा काय अर्थ होतो असे तुम्हाला वाटते? येशूने शिष्यांविषयी काय म्हटले हे लक्षात घेतल्यास आपल्याला अधिक समृद्ध जीवन कसे जगता येईल हे समजेल. यात त्याच्या दृष्टिकोनाचा स्वीकार करून काही मूळ तत्त्वांचे पालन करणे समाविष्ट आहे.—मत्तय १०:२४, २५; लूक १४:२६, २७; योहान ८:३१, ३२; १३:३५; १५:८.

      २, ३. (अ) येशूचा शिष्य कोण आहे? (ब) ‘मी कोणाचा शिष्य बनलो आहे’ हे स्वतःला विचारणे का महत्त्वाचे आहे?

      २ ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत, “शिष्य” असे भाषांतर केलेल्या शब्दाचा मूलभूत अर्थ, जो एखाद्या गोष्टीवर आपले मन लावतो किंवा शिकतो, असा होतो. याच मूळ शब्दाशी संबंधित असलेला एक शब्द मत्तय ११:२९ या आपल्या मुख्य वचनात आढळतो: “मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवास विसावा मिळेल.” (तिरपे वळण आमचे.) होय, शिष्य म्हणजे शिकणारा. शुभवर्तमानांत “शिष्य” हा शब्द सहसा येशूच्या जवळच्या अनुयायांना, अर्थात तो प्रचार करण्याकरता फिरत असता जे त्याच्यासोबत प्रवास करत होते आणि ज्यांना तो उपदेश करत असे त्यांना सूचित करतो. काही लोकांनी सहज आणि काहींनी कदाचित गुप्तपणे येशूच्या शिकवणुकी स्वीकारल्या असतील. (लूक ६:१७; योहान १९:३८) शुभवर्तमान लेखकांनी “[बाप्तिस्मा करणाऱ्‍या] योहानाचे शिष्य व परूश्‍यांचे शिष्य” असाही उल्लेख केला. (मार्क २:१८) येशूने आपल्या अनुयायांना “परूशी . . . ह्‍यांच्या शिकवणीविषयी” सावध राहण्यास सांगितले, त्याअर्थी आपणही स्वतःला विचारू शकतो, ‘मी कोणाचा शिष्य बनलो आहे?’—मत्तय १६:१२.

      ३ आपण जर येशूचे शिष्य असू आणि जर आपण त्याचे शिक्षण आत्मसात केले असेल तर इतरांना आपल्या सान्‍निध्यात आध्यात्मिक विसावा मिळाला पाहिजे. आपण अधिक सौम्य व लीन बनलो आहोत हे त्यांना दिसून आले पाहिजे. जर आपण जबाबदार पदावर असू, पालक असू, किंवा ख्रिस्ती मंडळीत आपल्यावर कळपाच्या जबाबदाऱ्‍या असतील तर मग आपल्या देखरेखीखाली नेमलेल्यांना आपण, येशूने त्याच्या देखरेखीखाली असलेल्यांना जसे वागवले तसेच वागवतो असे वाटते का?

      येशू लोकांशी कसे वागत होता

      ४, ५. (अ) ज्यांच्या जीवनात समस्या होत्या अशा लोकांशी येशू कसे वागत होता हे जाणून घेणे कठीण का नाही? (ब) एका परूश्‍याच्या घरात जेवायला गेला असताना येशूला कोणता अनुभव आला?

      ४ येशू लोकांशी, विशेषतः जे गंभीर समस्यांत अडकलेले होते अशा लोकांशी कसा वागत होता हे आपण जाणून घेतले पाहिजे. हे कठीण नाही, कारण बायबलमध्ये येशू व त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांविषयी बरेच वृत्तान्त आहेत; या लोकांपैकी बरेच लोक दुःखी होते. अशा या लोकांशी, त्याकाळच्या धार्मिक पुढाऱ्‍यांची खासकरून परूशांची वागणूक कशी होती याकडेही आपण लक्ष देऊ. येशूच्या वागणुकीच्या तुलनेत त्यांची वागणूक किती वेगळी होती हे पाहिल्यामुळे आपल्याला बरेच काही शिकता येईल.

      ५ सा.यु. ३१ साली, येशू गालीलात प्रचार यात्रा करत असताना, “परूश्‍यातील कोणाएकाने [येशूला] आपल्या येथे भोजन करण्याची विनंती केली.” येशूने त्याचे आमंत्रण स्वीकारण्यास टाळाटाळ केली नाही. “तो त्या परूश्‍याच्या घरी जाऊन भोजनास बसला. तेव्हा पाहा, त्या गावात कोणीएक पापी स्त्री होती; तो परूश्‍याच्या घरात जेवावयास बसला आहे हे ऐकून ती सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली; आणि त्याच्या पायाशी मागे रडत उभी राहिली व आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली; तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले, त्याच्या पायांचे मुके घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले.”—लूक ७:३६-३८.

      ६. एक “पापी” स्त्री परूश्‍याच्या घरात का आली असावी?

      ६ तुम्ही त्या घटनेचे दृश्‍य डोळ्यापुढे उभे करू शकता का? एका संदर्भ ग्रंथात असे म्हटले आहे की “त्याकाळी अशाप्रकारच्या मेजवानीत उरलेसुरलेले भोजन घेण्यासाठी गोरगरिबांना येण्याची परवानगी होती. या स्त्रीने (३७ व्या वचनानुसार) या प्रथेचा फायदा उचलला.” निमंत्रण नसतानाही एखादी व्यक्‍ती येऊ शकत होती हे यावरून आपल्याला समजते. मेजवानी संपल्यावर आपल्याला काही मिळेल या आशेने कदाचित इतरजणही आले असावेत. पण या स्त्रीची वागणूक विलक्षण होती. ती पाहुण्यांचे जेवण कधी संपते याची वाटत पाहात उभी नव्हती. तिचे गावात वाईट नाव होते. ती “पापी” स्त्री आहे हे सर्वांना माहीत होते आणि त्यामुळे “हिची . . . पुष्कळ पापे आहेत,” हे येशूलाही माहीत होते.—लूक ७:४७.

      ७, ८. (अ) लूक ७:३६-३८ येथे वर्णन केलेल्या परिस्थितीत आपण असतो तर कदाचित आपली काय प्रतिक्रिया असती? (ब) शिमोनाची काय प्रतिक्रिया होती?

      ७ तुम्ही त्याकाळात जगत आहात आणि येशूच्या ठिकाणी आहात अशी कल्पना करा. या स्त्रीची वागणूक पाहून तुम्ही काय केले असते? ती आपल्याजवळ येत आहे हे पाहून तुम्ही काहीसे अस्वस्थ झाला असता का? या घटनेचा तुमच्यावर कसा परिणाम झाला असता? (लूक ७:४५) तुम्हाला धक्का बसला असता का?

      ८ तुम्ही जर इतर पाहुण्यांपैकी असता, तर तुमचे विचारही निदान थोडेफार शिमोन परुश्‍याप्रमाणेच असते का? “तेव्हा ज्या परूश्‍याने त्याला बोलाविले होते त्याने हे पाहून आपल्या मनात म्हटले, हा संदेष्टा असता तर आपल्याला शिवत असलेली स्त्री कोण व कशी आहे, म्हणजे ती पापी आहे, हे त्याने ओळखले असते.” (लूक ७:३९) येशू मात्र अतिशय सहानुभूतिशील होता. त्याला त्या स्त्रीची अवस्था कळली आणि तिचे दुःख त्याने जाणले. ही स्त्री पापी मार्गात कशी पडली हे आपल्याला सांगितलेले नाही. जर ती खरच एक वेश्‍या असेल, तर त्या गावातील पुरुषांनी, अर्थात धर्मपरायण यहुदी पुरुषांनी तिला निश्‍चितच मदत केली नव्हती.

      ९. येशूने काय उत्तर दिले आणि यामुळे कदाचित काय परिणाम घडून आला असावा?

      ९ पण येशूला तिला मदत करण्याची इच्छा होती. त्याने तिला म्हटले: “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” तसेच त्याने म्हटले, “तुझ्या विश्‍वासाने तुला तारिले आहे, शांतीने जा.” (लूक ७:४८-५०) येथे हा वृत्तान्त संपतो. कोणी कदाचित म्हणेल की येशूने तर तिच्यासाठी फारसे काही केले नाही. त्याने केवळ तिला आशीर्वाद देऊन पाठवले. ती पुन्हा आपल्या दुःखी जीवनशैलीकडे परतली असेल असे तुम्हाला वाटते का? याविषयी आपण खात्रीने काही म्हणू शकत नाही, पण लूक यानंतर काय सांगतो याकडे लक्ष द्या. तो सांगतो की येशू “देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी व गावोगावी फिरत होता.” लूक असेही सांगतो, की “कित्येक स्त्रिया” येशू व त्याच्या शिष्यांसोबत होत्या व “त्या आपल्या पैशाअडक्याने त्यांची सेवाचाकरी करीत असत.” ती पश्‍चात्तापी व कृतज्ञ स्त्री देखील आता त्यांच्या सोबत असेल आणि एका शुद्ध विवेकाने, जीवनात एका नव्या उमेदीने आणि देवाबद्दल पूर्वीपेक्षा अधिक प्रेमाने तिने त्याच्या इच्छेनुसार जगण्यास सुरवात केली असेल अशी शक्यता नाकारता येत नाही.—लूक ८:१-३.

      येशू व परुशी यांच्यातला फरक

      १०. शिमोनाच्या घरात येशू आणि पापी स्त्रीचा वृत्तान्त विचारात घेणे का उपयोगी आहे?

      १० या बोलक्या अहवालावरून आपण काय शिकतो? तो वाचताना आपल्या भावना उचंबळून येतात, नाही का? तुम्ही शिमोनाच्या घरात असल्याची कल्पना करा. तुम्हाला कसे वाटेल? तुमची प्रतिक्रिया येशूसारखी असेल, की काहीशी, त्याला मेजवानीला बोलवणाऱ्‍या परूश्‍यासारखी? येशू देवाचा पुत्र असल्यामुळे आपल्या भावना व कृती हुबेहूब त्याच्यासारख्या असू शकत नाही. पण त्याचवेळेस आपण शिमोन परूश्‍यासारखे आहोत असाही आपल्याला विचार करावासा वाटणार नाही. परूश्‍यांसारखे असायला कोणालाही आवडणार नाही.

      ११. आपल्याला परूश्‍यांसोबत गणले जाण्याची का इच्छा नाही?

      ११ बायबलमधील व इतर ऐतिहासिक पुराव्यावरून आपण अशा निष्कर्षावर येऊ शकतो की परूशी लोक स्वतःला समाजाच्या व राष्ट्राच्या कल्याणाचे ठेकेदार समजत होते आणि याविषयी त्यांना अतिशय घमंड होती. देवाचे नियमशास्त्र सुस्पष्ट आणि सर्वांना समजण्याजोगे आहे हे कबूल करायला ते तयार नव्हते. नियमशास्त्रात एखाद्या गोष्टीचा थेट उल्लेख केला नसेल तर ते स्वतःचे नियम व मर्यादा बनवून रिकाम्या जागा भरून काढण्याचा प्रयत्न करायचे; व्यक्‍तीला आपल्या विवेकबुद्धीचा वापर करण्याची त्यांनी गरजच ठेवली नाही. हे धर्मपुढारी एकूण एक, अगदी क्षुल्लक गोष्टीकरताही नियम बनवण्याचा प्रयत्न करायचे.a

      १२. परूश्‍यांचा स्वतःविषयी कसा दृष्टिकोन होता?

      १२ पहिल्या शतकातील यहूदी इतिहासकार जोसीफस स्पष्टपणे सांगतो की परूशी स्वतःला दयाळू, सौम्य, न्यायप्रिय आणि त्यांच्या कार्याकरता पूर्णपणे पात्र समजत होते. काहीजण बऱ्‍याच प्रमाणात असे असतीलही, यात शंका नाही. कदाचित तुम्हाला निकदेम आठवत असेल. (योहान ३:१, २; ७:५०, ५१) कालांतराने त्यांच्यापैकी काहींनी ख्रिस्ती मार्ग पत्करला. (प्रेषितांची कृत्ये १५:५) ख्रिस्ती प्रेषित पौल याने परूश्‍यांसारख्या काही यहूद्यांबद्दल लिहिले, की “त्यांना देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही.” (रोमकर १०:२) पण शुभवर्तमानांत मात्र, सामान्य माणूस त्यांना ज्या दृष्टीने पाहात होता त्यानुसारच त्यांचे चित्र रेखाटले आहे—घमंडी, मगरूर, फाजील धार्मिक, चुका काढणारे, दोषी ठरवणारे आणि इतरांना तुच्छ लेखणारे.

      येशूचा दृष्टिकोन

      १३. येशूने परूश्‍यांविषयी काय म्हटले?

      १३ येशूने शास्त्री व परूशी यांना ढोंगी म्हणून त्यांचा धिक्कार केला. “जड अशी ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यावर देतात, परंतु ती काढण्यास ते स्वतः बोटहि लावावयाचे नाहीत.” होय, लोकांच्या खांद्यांवरील ओझे जड होते, आणि त्यांच्यावर लादलेले जू क्लेशदायक होते. पुढे येशूने शास्त्री व परूशी यांना ‘मूर्ख’ म्हणून संबोधले. मूर्ख मनुष्य समाजातील लोकांना त्रासदायक असतो. येशूने शास्त्री व परूशी यांना ‘आंधळे वाटाडी’ म्हटले आणि “नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्‍वास ह्‍या तुम्ही सोडल्या आहेत” असे त्यांना ठासून सांगितले. येशूने आपल्याला परूश्‍यांमध्ये गणावे असे कोणाला वाटेल का?—मत्तय २३:१-४, १६, १७, २३.

      १४, १५. (अ) मत्तय लेवी याच्यासोबत येशूने ज्याप्रकारे व्यवहार केला त्यावरून परूश्‍यांविषयी काय दिसून येते? (ब) या अहवालातून आपण कोणते महत्त्वपूर्ण धडे शिकू शकतो?

      १४ शुभवर्तमानांचे वाचन करणाऱ्‍या कोणत्याही व्यक्‍तीला बहुतेक परूश्‍यांची टीकात्मक प्रवृत्ती लगेच लक्षात येईल. जकातदार असलेल्या मत्तय लेवी याला येशूने आपला शिष्य होण्याकरता बोलावले तेव्हा लेवीने त्याच्याकरता मोठी मेजवानी दिली. या घटनेच्या अहवालात असे म्हटले आहे: “तेव्हा परुशी व त्यांच्यातील शास्री हे त्याच्या शिष्यांच्या विरुद्ध कुरकुर करीत त्यांना म्हणाले, जकातदार व पापी लोक ह्‍यांच्याबरोबर तुम्ही का खाता पिता? येशूने त्यांस उत्तर दिले, . . . मी नीतिमानांस बोलावण्यास आलो नाही तर पापी लोकांस पश्‍चात्तापासाठी बोलावण्यास आलो आहे.”—लूक ५:२७-३२.

      १५ पण याच प्रसंगी येशूने आणखी काहीतरी म्हटले जे लेवीला समजले: “मला दया पाहिजे, यज्ञ नको ह्‍याचा अर्थ काय, हे जाऊन शिका.” (मत्तय ९:१३) परूशी लोक इब्री संदेष्ट्यांच्या लिखाणावर विश्‍वास ठेवत असल्याचा दावा करत होते, पण होशेय ६:६ येथे दिलेले हे विधान मात्र त्यांनी स्वीकारले नव्हते. त्यांनी काही चूक केली तरीही, ती संप्रदायाचे पालन करण्यासाठीच केली असे ते भासवायचे. प्रत्येकजण स्वतःला हा प्रश्‍न विचारू शकतो, ‘विशिष्ट नियमांच्या बाबतीत, उदाहरणार्थ, वैयक्‍तिक मत किंवा व्यवहारज्ञान यांवर आधारित असलेल्या गोष्टींच्या बाबतीत नियम करण्याची हेकेखोर वृत्ती असल्याची माझी ख्याती आहे का? की मुळात दयाळू आणि चांगला म्हणून लोक मला ओळखतात?’

      १६. परूशी सतत काय करायचे आणि आपण त्यांच्यासारखे होण्याचे कसे टाळू शकतो?

      १६ सदान्‌कदा इतरांच्या चुका शोधणे. परूश्‍यांना दुसरे कामच नव्हते. कोणतीही चूक—मग ती खरी असो वा काल्पनिक, ती त्यांच्या नजरेतून सुटणे शक्य नव्हते. त्यांच्या संपर्कात येणाऱ्‍या लोकांना ते, आता आपली काहीतरी चूक दाखवली जाणार या जाणीवेनेच वागायला लावायचे आणि त्यांना त्यांच्या चुकांची वारंवार आठवण करून द्यायचे. या परूश्‍यांना गर्व कशाचा होता, तर पुदिना, बडिशेप व जिरे यांसारख्या लहान वनस्पतींचाही दशमांश आपण देतो याचा. ते विशिष्ट प्रकारचे कपडे घालून आपल्या धार्मिकपणाचा टेंभा मिरवायचे आणि सबंध राष्ट्राचा कारभार आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करायचे. आपली वागणूक येशूच्या आदर्शानुसार असावी असे आपल्याला वाटत असल्यास, नेहमी इतरांच्या चुका शोधण्याची आणि त्या मोठ्या करून दाखवण्याची वृत्ती आपण टाळली पाहिजे.

      येशूने समस्या कशा हाताळल्या?

      १७-१९. (अ) ज्याचे अतिशय गंभीर परिणाम होऊ शकले असते असा एक प्रसंग येशूने कशाप्रकारे हाताळला? (ब) तो प्रसंग इतका नाजूक आणि असुखकारक का होता? (क) ती स्त्री येशूजवळ आली तेव्हा तुम्ही तेथे असता तर तुमची प्रतिक्रिया काय असती?

      १७ समस्या हाताळण्याची येशूची पद्धत परूश्‍यांपेक्षा फार वेगळी होती. उदाहरणार्थ एक असा प्रसंग विचारात घ्या, जो अतिशय गंभीर ठरू शकला असता; पण येशूने तो कसा हाताळला ते पाहा. या घटनेत एक स्त्री गोवलेली होती व तिला १२ वर्षांपासून रक्‍तस्राव होत होता. लूक ८:४२-४८ येथे तुम्ही हा वृत्तान्त वाचू शकता.

      १८ मार्कच्या अहवालात असे म्हटले आहे की ही स्त्री “भीत भीत व कापत कापत [येशूकडे] आली.” (मार्क ५:३३) का? साहजिकच कारण आपण देवाचा नियम मोडला आहे याची तिला जाणीव होती. लेवीय १५:२५-२८ यानुसार एखाद्या स्त्रीला अनैसर्गिक रक्‍तस्राव होत असला तर तिचे स्रावाचे सर्व दिवस शिवाय त्यानंतर आणखी एक आठवडा तिला अशुध्द समजले जायचे. ती जे काही शिवेल आणि ज्या कोणाला स्पर्श करेल तो देखील अशुद्ध झाला असे समजले जायचे. येशूजवळ येण्यासाठी या स्त्रीला गर्दीतून मार्ग काढणे भाग होते. आज २,००० वर्षांनंतर या स्त्रीचा अहवाल वाचताना आपल्याला त्या बिचारीची कीव आल्याशिवाय राहात नाही.

      १९ त्या काळात तुम्ही तेथे असता तर या घटनेकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले असते? तुम्ही काय म्हटले असते? येशूने या स्त्रीला किती दयेने, प्रेमाने आणि सहानुभूतीने वागवले याकडे लक्ष द्या. तिच्यामुळे निर्माण झालेल्या कोणत्याही अडचणीविषयी त्याने उल्लेख देखील केला नाही.—मार्क ५:३४.

      २०. लेवीय १५:२५-२८ यातील नियम आज ख्रिश्‍चनांकरता बंधनकारक असता तर आपल्याला कोणत्या आव्हानाला तोंड द्यावे लागले असते?

      २० या घटनेवरून आपण काही शिकू शकतो का? आज तुम्ही ख्रिस्ती मंडळीत वडील आहात अशी कल्पना करा. शिवाय, लेवीय १५:२५-२८ येथील नियम आज ख्रिस्ती लोकांकरता बंधनकारक आहे आणि एका स्त्रीने आपल्या त्रासामुळे कासावीस होऊन असहायपणे या नियमाचे उल्लंघन केले आहे अशी कल्पना करा. तुम्ही काय कराल? सर्वांसमोर तिची चूक दाखवून तुम्ही तिला खजील कराल का? तुम्ही म्हणाल “छे, मी असे कधीच करणार नाही! येशूच्या पावलावर पाऊल ठेवून मी दयाळू, प्रेमळ, विचारशील आणि सहानुभूतीशील रितीने वागण्याचा जमेल तितका प्रयत्न करेन.” अगदी उत्तम! पण वास्तवात असे करून दाखवणे, येशूच्या पावलावर पाऊल ठेवणे हे एक आव्हान आहे.

      २१. येशूने लोकांना नियमशास्त्राविषयी काय शिकवले?

      २१ या सर्वाचे तात्पर्य असे, की येशूच्या संपर्कात येणाऱ्‍या लोकांना विसावा, उभारी व प्रोत्साहन मिळायचे. ज्या बाबतीत देवाचे नियम अटळ होते त्या बाबतीत हे नियमशास्त्रातच स्पष्टपणे व्यक्‍त केलेले होते. आणि ज्या बाबतीत ते तितकेसे स्पष्ट नव्हते त्या बाबतीत प्रत्येक व्यक्‍तीने आपल्या विवेकबुद्धीचा वापर करायचा होता आणि आपल्या निर्णयांतून आपल्याला देवाबद्दल प्रेम असल्याचे दाखवायचे होते. नियमशास्त्राने लोकांना मुक्‍तपणे श्‍वास घेण्याची मुभा दिली होती. (मार्क २:२७, २८) देवाचे आपल्या लोकांवर प्रेम होते, तो सतत त्यांच्या भल्याकरता कार्य करत होता आणि त्यांच्या हातून चूक झाल्यास तो त्यांना दया दाखवण्यास तयार होता. येशू देखील असाच होता.—योहान १४:९.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा