वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ११/१ पृ. ९-१५
  • यहोवा—आमचा कनवाळू पिता

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा—आमचा कनवाळू पिता
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ईश्‍वरी दयेची मर्यादा
  • आपल्या नावासाठी दया
  • दयाळूपणाची सर्वश्रेष्ठ अभिव्यक्‍ती
  • येशूला कळवळा आला तेव्हा
  • दयाळूपणाची स्पष्टता करणारे दाखले
  • यहोवा दयेने राज्य करतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • कनवाळू व्हा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • यहोवाच्या कनवाळूपणाचं अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • आपले दयाशील सेवाकार्य
    आमची राज्य सेवा—२००६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ११/१ पृ. ९-१५

यहोवा—आमचा कनवाळू पिता

“यहोवा फार करुणामय व दयाळू आहे.”—याकोब ५:११, NW, तळटीप.

१. लीन जन यहोवा देवाकडे आकर्षित का होतात?

हे विश्‍व इतके विशाल आहे की, खगोलशास्त्रज्ञांना त्यातील सर्व आकाशगंगांची मोजणी करता येत नाही. जवळची आमची आकाशगंगा, इतकी विशाल आहे की, मानवाला तिच्यातील तारे मोजताच येऊ शकत नाही. काही ॲन्टार्ससारखे तारे आमच्या सूर्यापेक्षा हजारो पटीने मोठे व प्रकाशमान आहेत. तर मग, विश्‍वातील सर्व ताऱ्‍यांचा महान निर्माणकर्ता किती शक्‍तिशाली असेल बरे! निश्‍चितच, तो “त्यांच्या सैन्याची मोजणी करुन त्यांस बाहेर आणितो; तो त्या सर्वांस नावांनी हाका मारितो.” (यशया ४०:२६) तरीही, हाच भयप्रद देव ‘फार करुणामय व दयाळू’ देखील आहे. हे ज्ञान, विशेषपणे छळ, आजारपण, निराशा, किंवा इतर खडतर परिस्थितींचा सामना करीत असलेल्या यहोवाच्या लीन सेवकांसाठी किती उत्साहवर्धक आहे बरे!

२. या जगातील लोकांच्या दृष्टिकोनातून कळवळ्याच्या भावना अनेकदा कशा आहेत?

२ अनेक जण, ख्रिस्ताच्या ‘करुणामय व दयाळूपणा’ यासारख्या मृदू भावनांकडे ते दोष असल्याप्रमाणे पाहतात. (फिलिप्पैकर २:१) ते उत्क्रांती तत्त्वज्ञानाच्या प्रभावामुळे, इतरांच्या भावनांना तुडवावे लागले तरी स्वतःपुरतेच पाहण्याचे उत्तेजन लोकांना देतात. मनोरंजनातील व खेळातील अनेक जण नैपुण्य दाखवून हल्ला करणारे आहेत जे अश्रू गाळत नाहीत किंवा करुणा दाखवत नाहीत. काही राजकीय पुढारी अशाचरीतीने वागतात. क्रूर सम्राट निरोला प्रशिक्षण दिलेला एक स्टोईक तत्त्वज्ञानी, सेनिका यांनी ते स्पष्ट केले की, “दया ही दुर्बलता आहे.” मॅक्लीनटॉक व स्ट्राँग्स्‌ यांचा विश्‍वकोश सांगतो: “सध्याच्या काळातही लोकांच्या मनात . . . स्टोईसिझमचा प्रभाव आहे.”

३. यहोवाने स्वतःचे वर्णन मोशेला कसे केले?

३ याच्या अगदी उलट, मानवजातीच्या निर्माणकर्त्याचे व्यक्‍तिमत्त्व हर्षदायक आहे. मोशेला त्याने स्वतःचे वर्णन: “परमेश्‍वर [यहोवा, NW], परमेश्‍वर [यहोवा], दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर, . . . अन्याय, अपराध व पाप ह्‍यांची क्षमा करणारा, (पण अपराधी जनांची) मुळीच गय न करणारा,” या शब्दात केले. (निर्गम ३४:६, ७) हे खरे आहे की, यहोवाने स्वतःबद्दलच्या या वर्णनाचा समारोप, आपल्या न्यायाला ठळक मांडण्याद्वारे केला. तो हेकेखोर पाप्याला शिक्षा दिल्यावाचून राहणार नाही. असे असले तरी, त्याने स्वतःबद्दलचे वर्णन, सर्व प्रथम तो दयेचा देव आहे असे केले ज्याचा शब्दशः अर्थ, “दयेने पूर्ण” असा होतो.

४. बहुतेक वेळा “दया” असा अनुवाद केलेल्या इब्री शब्दाचा कोणता हर्षदायक अर्थ आहे?

४ कधीकधी “दया” या शब्दाचा विचार, भावनाशून्य, न्यायदानाच्या अर्थाने शिक्षा देण्याचे नाकारणे, असा केला जातो. तथापि बायबल अनुवादांची तुलना, रॅ·खमʹ क्रियापदापासून आलेल्या इब्री विशेषणाचा समृद्ध अर्थ देतात. काही विद्वानांच्या मतानुसार त्याचा मूळ अर्थ “सौम्य असणे,” हा आहे. जुन्या करारातील समानार्थ (इंग्रजी) हे पुस्तक “रॅखम,” याबद्दल स्पष्टता देते की, तो “अशक्‍तपणा किंवा आपले प्रियजन सहन करीत असलेला त्रास वा त्यांना आपली मदत हवी असल्याचे दिसताच अधिक कळवळ्याची भावना व्यक्‍त करतो.” या इष्ट गुणाच्या इतर हर्षदायक व्याख्या शास्त्रवचनांवरील सुक्ष्मदृष्टी, (इंग्रजी), खंड २, पृष्ठे ३७५-९ मध्ये मिळू शकतात.

५. मोशेच्या नियमशास्त्रात दया स्पष्टपणे कशी दिसली?

५ देवाने इस्राएल राष्ट्राला दिलेल्या नियमाशास्त्रात त्याचा कनवाळूपणा स्पष्टपणे दिसून येतो. विधवा, अनाथ, व गरीब असणाऱ्‍या प्रतिकूल परिस्थितीतील लोकांना दयाळूपणे वागवायचे होते. (निर्गम २२:२२-२७; लेवीय १९:९, १०; अनुवाद १५:७-११) विश्रामाच्या साप्ताहिक शब्बाथाचा फायदा, दास व प्राण्यांसमवेत सर्वांनी घ्यावयाचा होता. (निर्गम २०:१०) याशिवाय देवाने, लीन जणांना प्रेमळपणे वागविणाऱ्‍या लोकांची दखल घेतली. नीतीसूत्रे १९:१७ सांगते: “जो दरिद्र्‌यावर दया करितो तो परमेश्‍वराला [यहोवा, NW] उसने देतो; त्याच्या सत्कृत्याची फेड तो करील.”

ईश्‍वरी दयेची मर्यादा

६. यहोवाने आपल्या लोकांकडे संदेष्टे व दूतांना का पाठविले?

६ इस्राएलांना देवाच्या नावाची ओळख होती व ते ‘परमेश्‍वर [यहोवा, NW] याच्या नामाप्रीत्यर्थ एक घर’ असलेल्या जेरुसलेमातील मंदिरात त्याची भक्‍ती करीत होते. (२ इतिहास २:४; ६:३३) तथापि कालांतराने, त्यांनी अनैतिकता, मूर्तीपूजा, व खून या गोष्टींना अनुमती देण्याद्वारे यहोवाच्या नावावर मोठी निंदा आणली. देवाने आपल्या दयाळू व्यक्‍तिमत्त्वाच्या एकवाक्यतेत, संपूर्ण राष्ट्रावर विपत्ती आणण्याऐवजी या वाईट परिस्थितीला सुधरवण्याचा प्रयत्न केला. तो “आपल्या दूतांच्या हस्ते त्यास आदेश पाठवी, कारण त्याची आपल्या प्रजेवर व आपल्या निवासस्थानावर करुणा होती; पण ते देवाच्या दूतांची टेर उडवून त्यांची वचने तुच्छ मानीत व त्याच्या संदेष्ट्यांची निर्भर्त्सना करीत; शेवटी परमेश्‍वराचा [यहोवा, NW] कोप त्याच्या लोकांवर भडकला व त्यांचा बचाव करण्याचा काही उपाय राहिला नाही.”—२ इतिहास ३६:१५, १६.

७. यहोवाच्या दयेने तिची मर्यादा गाठली, तेव्हा यहुदाच्या राज्याचे काय झाले?

७ यहोवा दयाळू व मंदक्रोध असला, तरी आवश्‍यक ठिकाणी तो आपला धार्मिक क्रोध व्यक्‍त करत असतो. गतकाळात ईश्‍वरी दयेने तिची मर्यादा गाठली, तेव्हा त्याच्या परिणामांबद्दल आपण वाचतो: “त्याने [यहोवा] त्यांजवर खास्द्यांच्या राजाची स्वारी आणिली; त्याने त्यांच्या तरुण पुरुषांस त्यांच्याच पवित्रभुवनात तरवारीने वधिले; त्याने तरुणांवर किंवा कुमारीवर, वृद्धांवर किंवा वयातीतांवर दया केली नाही; परमेश्‍वराने [यहोवा, NW] सर्वांस त्याच्या हाती दिले.” (२ इतिहास ३६:१७) अशाप्रकारे जेरुसलेम व त्याच्या मंदिराचा नाश झाला व त्या राष्ट्राला बंदिवान करुन बॅबिलॉनला घेऊन गेले.

आपल्या नावासाठी दया

८, ९. (अ) आपल्या नावास्तव दया दाखवील असे यहोवाने का म्हटले? (ब) यहोवाचे शत्रू कसे शांत झाले?

८ या विपत्तीमुळे सभोवतालच्या राष्ट्रांनी आनंद केला. त्यांनी थट्टा करुन म्हटले: “हे परमेश्‍वराचे [यहोवा, NW] लोक आहेत, हे त्याच्या देशातून बाहेर निघाले आहेत.” असा बट्टा लावल्याच्या संवेदनाक्षम भावनेमुळे यहोवाने म्हटले: “मी आपल्या पवित्र नामास जपलो. . . . माझ्या थोर नामास . . . पवित्र मानतील असे मी करीन, . . . तेव्हा राष्ट्रांस समजेल की मी परमेश्‍वर [यहोवा, NW] आहे.”—यहेज्केल ३६:२०-२३.

९ आपले राष्ट्र ७० वर्षांपर्यंत बंदिवासात राहिल्यानंतर, दयाळू देव, यहोवाने त्यांना मुक्‍त केले व जेरुसलेमात जाण्याची व तेथे मंदिराचे पुनर्वसन करण्याची अनुमती त्यांना दिली. यामुळे सभोवतालची रा गप्प झाली व ती आश्‍चर्याने पाहातच राहिली. (यहेज्केल ३६:३५, ३६) तथापि, इस्राएल राष्ट्र पुन्हा एकवार वाईट आचारात पडले हे दुःखाचे आहे. या परिस्थितीला सुधारण्यासाठी, नहेम्या या विश्‍वासू यहुद्याने मदत केली. त्याने सार्वजनिक प्रार्थनेत, यहोवाने राष्ट्राला दाखविलेल्या दयाळू व्यवहाराची उजळणी असे म्हणत केली:

१०. नहेम्याने यहोवाच्या दयेला कसे स्पष्ट केले?

१० “आपल्या विपत्काळी त्यांनी तुझा धावा केला; तो तू स्वर्गातून ऐकला व तुझ्या दयेच्या बहुत कृत्यांस अनुसरून त्यांस त्यांच्या शत्रूंच्या हातून सोडविण्यासाठी तू त्यांस सोडविणारे दिले; पण जेव्हा जेव्हा त्यांस स्वास्थ्य मिळे तेव्हा तेव्हा ते तुझ्यासमोर दुष्कर्म करीत; यामुळे तू त्यांस शत्रूंच्या हाती देत असस; व ते त्याजवर सत्ता चालवीत; तरी ते तुजकडे वळून तुझा धावा करीत तो तू स्वर्गांतून ऐकत असस, आणि तुझ्या दयेच्या कृत्यांस अनुसरुन तू त्यांस अनेक वेळा मुक्‍त केले. . . . . तू पुष्कळ वर्षे त्यांची गय केली.”—नहेम्या ९:२६-३०; तसेच यशया ६३:९, १० हेही पाहा.

११. यहोवा व मानवांच्या देवांमध्ये कोणता विपर्यास आहे?

११ सरतेशेवटी, यहूदी राष्ट्राने देवाच्या प्रिय पुत्राला क्रूरपणे नाकारल्यावर आपल्या विशेषाधिकाराचे स्थान सर्वकाळाकरता गमावले. देवाचा त्यांच्याबरोबर असलेला निष्ठावंत संबंध १,५०० वर्षांपर्यंत टिकला. निश्‍चितच यहोवा, दयेचा देव आहे या वस्तुस्थितीची ही चिरकालिक साक्ष आहे. ही गोष्ट, पापी मानवांनी घडवलेल्या क्रूर देव व निष्ठुर देवतांच्या किती उलट आहे बरे!—पृष्ठ ८ पाहा.

दयाळूपणाची सर्वश्रेष्ठ अभिव्यक्‍ती

१२. देवाच्या दयेची सर्वश्रेष्ठ अभिव्यक्‍ती कोणती होती?

१२ देवाने त्याच्या प्रिय पुत्राला पृथ्वीवर पाठविले, तेव्हा ही त्याच्या दयाळूपणाची सर्वश्रेष्ठ अभिव्यक्‍ती होती. येशूच्या सचोटीच्या जीवनाने यहोवाला अधिक आनंद दिला, हे खरे आहे. याद्वारे त्याने दियाबलाच्या खोट्या दाव्याला उचित उत्तर पुरविण्यास यहोवाला साहाय्य केले. (नीतीसूत्रे २७:११) तथापि, त्याचवेळी आपल्या प्रिय पुत्राला क्रूर यातना होत असल्याचे तसेच मानखंडना करणारा मृत्यू पाहिल्याने कोणाही मानवी पालकांना कधीही सहन करावे लागले नसेल, त्यापेक्षा अधिक दुःख यहोवाला झाले. हे मानवजातीच्या तारणासाठी मार्ग उघडा करुन देणारे फारच प्रेमळ बलिदान होते. (योहान ३:१६) बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाचे वडील, जखऱ्‍याने भाकीत केल्याप्रमाणे, ‘आपल्या देवाची परम दया’ स्पष्टपणे दिसली.—लूक १:७७, ७८.

१३. येशूने आपल्या पित्याच्या व्यक्‍तिमत्त्वाला कोणत्या महत्त्वपूर्ण मार्गाने प्रतिबिंबित केले?

१३ देवाच्या पुत्राला पृथ्वीवर पाठविण्याद्वारे, मानवजातीला यहोवाच्या व्यक्‍तिमत्त्वाची स्पष्ट झलक दिसली. कशाप्रकारे बरे? येशूने लीन जणांना विशेष कनवाळूपणाने वागविले, तेव्हा त्याने त्याच्या पित्याचे व्यक्‍तिमत्त्व हुबेहूब प्रतिबिंबित केले! (योहान १:१४; १४:९) यासंबंधी मत्तय, मार्क व लूक या तीन शुभवर्तमान लेखकांनी स्प्लॅग·ख्निʹझो·माई या ग्रीक क्रियापदाचा वापर केला. ते क्रियापद, “आंतडी” यासाठी असलेल्या ग्रीक शब्दापासून येते. बायबल विद्वान विल्यम बार्कले स्पष्टता देतात की, “त्याच्या युत्पत्तीपासूनच, ते क्रियापद केवळ साधारण कृपा किंवा दया याचे वर्णन करत असल्याचे दिसत नाही, तर एखाद्या व्यक्‍तीला भावनाविवश होण्यास प्रेरणा देते. ग्रीकमध्ये दयाळूपणाबद्दल हा फारच जोरदार शब्द आहे.” त्याचा विविध प्रकारे अनुवाद केला आहे जसे की, “कळवळा वाटणे” किंवा “कळवळा येणे.”—मार्क ६:३४; ८:२.

येशूला कळवळा आला तेव्हा

१४, १५. गालील शहरात, येशूला कशाप्रकारे कळवळा आला व ही गोष्ट काय स्पष्ट करते?

१४ हे दृश्‍य गालील शहरातील आहे. “कुष्ठरोगाने भरलेला” मनुष्य कोणताही इशारा न देता येशूजवळ येतो. (लूक ५:१२) देवाच्या नियमशास्त्रात दिल्याप्रमाणे, “अशुद्ध, अशुद्ध” असे न ओरडल्यामुळे येशूने कठोरपणे त्याची खरटपट्टी काढली का? (लेवीय १३:४५) नाही. याउलट, येशू या मनुष्याची दयनीय याचना ऐकतो: “आपली इच्छा असली तर मला शुद्ध करा.” ‘कळवळा येऊन,’ येशू हात पुढे करुन व स्पर्श करुन त्यास म्हणतो, “माझी इच्छा आहे, तू शुद्ध हो.” त्या मनुष्याचे स्वास्थ्य लगेच पूर्ववत होते. अशाप्रकारे, येशू त्याला देवाने दिलेल्या चमत्काराच्या सामर्थ्याचेच नव्हे तर प्रेरणा देणाऱ्‍या अशा सामर्थ्याचा वापर करण्यास कनवाळू भावनांना प्रदर्शित करतो.—मार्क १:४०-४२.

१५ येशूने दयेची भावना दाखविण्याआधीच त्याच्याकडे जाणे जरुरीचे आहे का? नाही. काही काळानंतर, नाईन शहरातून प्रेतयात्रा येत असल्याचे त्याच्या दृष्टीस पडते. येशूने पूर्वी अनेक प्रेतयात्रा पाहिल्या असतील यात काही संशय नाही, पण ही विशेष शोकांतिकेची होती. मेलेला मुलगा विधवेचा एकुलता एक पुत्र आहे. येशूला तिचा “कळवळा आला,” व तो तिच्याजवळ जाऊन म्हणतो: “रडू नको.” मग तिच्या मुलाला परत जीवन देण्याद्वारे तो उल्लेखनीय चमत्कार करतो.—लूक ७:११-१५.

१६. येशूला स्वतःच्या मागे येत असलेल्या लोकसमुदायाची दया का आली?

१६ वरील प्रसंगातून एक नाट्यमय धडा शिकावयास मिळतो तो म्हणजे येशूला ‘कळवळा येतो,’ तेव्हा मदत करण्यासाठी तो काही सकारात्मक गोष्टी करतो. त्यानंतरच्या एके प्रसंगी आपल्या मागे येत असलेल्या मोठ्या लोकसमुदायाला तो पाहतो. मत्तय याचा अहवाल देतो, “त्यांचा त्याला कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले व पांगलेले होते.” (मत्तय ९:३६) सामान्य लोकांची आध्यात्मिक भूक शमविण्यासाठी परुशी लोक फारच कमी प्रयत्न करीत. उलटपक्षी, लीन जनांवर त्यांनी अनेक अनावश्‍यक नियम लादले. (मत्तय १२:१, २; १५:१-९; २३:४, २३) त्यांचा सामान्य लोकांविषयी असलेला दृष्टिकोन येशूचे ऐकणाऱ्‍यांबद्दल त्यांनी हे म्हटले, तेव्हा दिसून आला: “हा जो लोकसमुदाय नियमशास्त्र जाणत नाही तो शापित आहे.”—योहान ७:४९.

१७. येशूला लोकसमुदायाबद्दल वाटणाऱ्‍या दयेने कसे प्रवृत्त केले व तेथे तो कोणते उत्कृष्ट मार्गदर्शन देतो?

१७ उलटपक्षी, येशू लोकसमुदायाच्या वाईट आध्यात्मिक स्थितीमुळे तीव्रतेने प्रवृत्त होतो. परंतु असे कितीतरी आस्थेवाईक लोक आहेत त्या प्रत्येकाची काळजी त्याला घ्यावयाची आहे. यामुळे तो आपल्या शिष्यांना अधिक कामकरी पाठविण्यासाठी प्रार्थना करण्यास सांगतो. (मत्तय ९:३५-३८) अशा प्रार्थनांच्या एकवाक्यतेत, येशू त्याच्या प्रेषितांना: “देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे,” हा संदेश देऊन पाठवतो. त्या प्रसंगी दिलेल्या निर्देशनाने, सध्याच्या दिवसात देखील बहुमोलाच्या मार्गदर्शकाप्रमाणे ख्रिश्‍चनांसाठी कार्य केले आहे. मानवजातीची आध्यात्मिक भूक शमविण्यासाठी येशूला दयाळूपणाच्या भावनेने चालना दिली यात काही संशय नाही.—मत्तय १०:५-७.

१८. एकांतात असताना अतिक्रमण करणाऱ्‍या लोकसमुदायाला येशूने प्रतिक्रिया कशी दाखवली व यापासून आपण कोणता धडा शिकतो?

१८ आणखी एके प्रसंगी, येशूला लोकसमुदायाच्या आध्यात्मिक गरजांबद्दल पुन्हा एकवार काळजी वाटते. या प्रसंगी तो आणि त्याचे प्रेषित प्रचारकार्याच्या व्यग्र दौऱ्‍यामुळे थकलेले आहेत व विश्रांती घेण्यासाठी ते जागा शोधतात, परंतु लोक त्यांना लगेच शोधून काढतात. त्यांच्या एकांताच्या ठिकाणी अतिक्रमण केल्यामुळे येशूला चीड येण्याऐवजी, त्याला त्यांचा “कळवळा आला,” असा अहवाल मार्क देतो. येशूच्या तीव्र भावनांचे कारण कोणते होते? “ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते.” येशू पुन्हा एकवार आपल्या भावना व्यक्‍त करतो व लोकसमुदायाला “देवाच्या राज्याविषयी” शिकवण्यास आरंभ करतो. होय, त्यांच्या आध्यात्मिक भूकेमुळे तो इतका प्रभावित झाला की, जेणेकडून शिकवण्यासाठी त्याने आपल्या विश्रांतीचा त्याग केला.—मार्क ६:३४; लूक ९:११.

१९. येशूचा लोकसमुदायाबद्दलचा कळवळा, त्यांच्या आध्यात्मिक गरजांपेक्षाही कशाप्रकारे अधिक होता?

१९ येशूला लोकांच्या आध्यात्मिक गरजांबद्दल प्रमुख काळजी होती तरी, त्याने त्यांच्या मूलभूत शारीरिक गरजांकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. त्याच प्रसंगी, “ज्यांना बरे होण्याची जरुरी होती त्यांना” त्याने बरे केले. (लूक ९:११) त्या नंतरच्या प्रसंगी, लोकसमुदाय त्याच्यासोबत अधिक काळ होता व घरापासून ते फार दूरवर होते. येशूने त्यांच्या शारीरिक गरजेची जाणीव ओळखून त्याच्या शिष्यांना म्हटले: “मला लोकांचा कळवळा येतो, कारण ते आज तीन दिवस माझ्याजवळ आहेत आणि त्यांच्याजवळ खावयास काहीहि नाही; कदाचित ते वाटेत कासावीस होतील; म्हणून त्यांस उपाशी लावून द्यावे अशी माझी इच्छा नाही.” (मत्तय १५:३२) आता येशू संभवनीय त्रास टाळण्यासाठी काहीतरी करतो. तो सात भाकरी व काही लहान मासे यापासून चमत्कार करुन हजारो पुरूष, स्त्रिया, व मुलांना अन्‍न पुरवतो.

२०. येशूला कळवळा येण्याबद्दल नमूद केलेल्या शेवटल्या प्रसंगापासून आपण काय शिकतो?

२० येशूला कळवळा येऊन प्रवृत्त होण्याविषयी नमूद करण्यात आलेली शेवटली घटना म्हणजे, जेरुसलेमचा त्याचा शेवटचा प्रवास होय. वल्हांडण सण साजरा करण्यासाठी मोठा लोकसमुदाय त्याच्याबरोबर प्रवास करत आहे. यरीहो जवळच्या रस्त्यावर दोन अंध भिकारी ओरडत आहेत: “हे प्रभो . . . आम्हावर दया करा.” लोकसमुदाय त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात, पण येशू त्यांना बोलावून आपण काय करावे अशी त्यांची इच्छा आहे, असे विचारतो. ते याचना करतात, “प्रभुजी आमचे डोळे उघडावे.” त्याला “कळवळा येऊन” तो त्यांच्या डोळ्यांस स्पर्श करतो व त्यांना दिसू लागते. (मत्तय २०:२९-३४) यापासून आपण किती महत्त्वाचा धडा शिकतो! येशू आपल्या पार्थिव सेवकपणाच्या शेवटल्या आठवड्यात पदार्पण करत आहे. सैतानाच्या प्रतिनिधींच्या हातून क्रूर मृत्यू सोसण्याआधी त्याला बऱ्‍याच काही गोष्टी उरकावयाच्या आहेत. तरीही, तो मानवांच्या कमी महत्त्वाच्या गरजांसाठी, दयाळूपणाच्या भावनेला काढून टाकण्यास या महत्त्वपूर्ण प्रसंगाच्या दबावाला अनुमती देत नाही.

दयाळूपणाची स्पष्टता करणारे दाखले

२१. स्वामी आपल्या दासाचे मोठे कर्ज माफ करतो, ही गोष्ट काय स्पष्ट करते?

२१ येशूच्या जीवनातील अहवालात वापरलेले स्प्लॅग·ख्निʹझो·माई हे ग्रीक क्रियापद, येशूच्या तीन दाखल्यांमध्ये देखील वापरण्यात आले आहे. एका गोष्टीत, एक दास आपले मोठे कर्ज फेडण्यास त्याला वेळ द्यावा म्हणून याचना करतो. स्वामीला त्याचा ‘कळवळा येऊन’ तो त्याचे कर्ज माफ करतो. ही गोष्ट यहोवा देवाने, येशूच्या खंडणी यज्ञार्पणावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या प्रत्येक ख्रिश्‍चनाच्या पापाचे मोठे कर्ज माफ केल्याचे स्पष्ट करते.—मत्तय १८:२७; २०:२८.

२२. उधळ्या पुत्राचा दृष्टांत काय स्पष्ट करतो?

२२ मग उधळ्या पुत्राची एक गोष्ट आहे. हा स्वच्छंदी पुत्र घरी परततो तेव्हा काय होते याची आठवण करा: “तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले.” (लूक १५:२०) ही गोष्ट, स्वच्छंदी झालेल्या पण खरा पश्‍चात्ताप दाखवलेल्या ख्रिश्‍चनाची यहोवाला दया येईल व तो पुन्हा आल्याबद्दल प्रेमळपणे त्याचा स्वीकार करील असे दाखवते. याप्रकारे, या दोन दाखल्यांद्वारे येशूने, यहोवा आपला पिता “फार करुणामय व दयाळू” असल्याचे दाखविले.—याकोब ५:११, NW, तळटीप.

२३. शेजारधर्माला जागणाऱ्‍या शोमरोनी मनुष्याबद्दल येशूने दिलेल्या दाखल्यापासून आपण कोणता धडा शिकतो?

२३ स्प्लॅग·ख्निʹझो·माई याचा तिसरा उदाहरणोपयोगी वापर, दयाळू शोमरोनी मनुष्याबद्दल आहे. त्याला, चोरांनी लुटून अर्धमेला करुन सोडलेल्या एका यहुद्याचा “कळवळा आला” होता. (लूक १०:३३) या शोमरोनी मनुष्याने आपल्या भावनेमुळे कार्य करताना, या अनोळखी मनुष्याला मदत करण्यासाठी होता होईल तितके केले. ही गोष्ट, खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी कळवळा व दया दाखविण्यामध्ये यहोवा देव व येशू यांच्या उदाहरणांचे अनुसरण करावे अशी अपेक्षा ते करत असल्याचे दाखवते. हे आपण ज्या काही मार्गांनी करु शकतो त्याची चर्चा पुढील लेखात केली जाईल.

उजळणीसाठी प्रश्‍न

▫ दयाळू असण्याचा अर्थ काय आहे?

▫ यहोवाने आपल्या नावासाठी दया कशी दाखवली?

▫ दयेची सर्वात सर्वश्रेष्ठ अभिव्यक्‍ती कोणती आहे?

▫ येशू आपल्या पित्याच्या व्यक्‍तिमत्त्वाला कोणत्या उल्लेखनीय मार्गाने प्रतिबिंबित करतो?

▫ येशूच्या कनवाळू कार्यापासून तसेच त्याच्या दाखल्यांपासून आपण काय शिकतो?

[१० पानांवरील चित्रं]

ईश्‍वरी दयेने तिची मर्यादा गाठली, तेव्हा यहोवाने आपल्या स्वच्छंदी लोकांवर विजय मिळवण्यास बॅबिलॉनच्या लोकांना अनुमती दिली

[११ पानांवरील चित्रं]

आपला प्रिय पुत्र मरत असल्याचे पाहताना, कोणाला कधी सहन करावे लागले नसेल असे दुःख यहोवाला झाले असेल

[१५ पानांवरील चित्रं]

येशूने आपल्या पित्याच्या दयाशील व्यक्‍तिमत्त्वाला पूर्णपणे प्रतिबिंबित केले

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा