धडा १६
पृथ्वीवर असताना येशूने काय केलं?
येशूचं नाव घेतल्यावर बऱ्याच लोकांच्या डोळ्यांसमोर एका लहानशा बाळाचं किंवा सुळावर चढवलेल्या माणसाचं चित्र येतं. इतर काही जण त्याला देवाचा संदेष्टा समजतात. पण पृथ्वीवर असताना येशूने कायकाय केलं, याची माहिती घेतल्यामुळे आपल्याला त्याला जास्त चांगल्या प्रकारे जाणून घेता येईल. तर या धड्यात, आपण येशूने केलेल्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टींपैकी काहींवर विचार करू या आणि त्यामुळे तुम्हाला काय फायदा होऊ शकतो हे पाहू या.
१. येशूसाठी कोणतं काम सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं?
“देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश घोषित” करणं येशूसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं. (लूक ४:४३ वाचा.) हा आनंदाचा संदेश म्हणजे, देव एक राज्य किंवा सरकार स्थापन करेल, जे मानवांच्या सगळ्या समस्या काढून टाकेल.a येशूने साडेतीन वर्षांपर्यंत खूप मेहनत घेऊन लोकांना हा आनंदाचा संदेश सांगितला.—मत्तय ९:३५.
२. येशूने केलेल्या चमत्कारांचा उद्देश काय होता?
बायबल आपल्याला सांगतं की देवाने येशूद्वारे “पुष्कळ अद्भुत कार्यं आणि चमत्कार” घडवून आणले. (प्रेषितांची कार्यं २:२२) देवाकडून मिळालेल्या शक्तीनेच येशूने हवामानावर नियंत्रण केलं, हजारो लोकांना खाऊ घातलं, आजारी लोकांना बरं केलं, इतकंच काय तर मेलेल्या लोकांनाही जिवंत केलं. (मत्तय ८:२३-२७; १४:१५-२१; मार्क ६:५६; लूक ७:११-१७) येशूच्या या चमत्कारांवरून स्पष्ट झालं, की देवानेच त्याला पाठवलंय. तसंच आपल्या सगळ्या समस्या सोडवायची ताकद यहोवाजवळ आहे, हेही या चमत्कारांवरून दिसून आलं.
३. आपण येशूकडून काय शिकू शकतो?
येशूने प्रत्येक प्रसंगात यहोवाची आज्ञा पाळली. (योहान ८:२९ वाचा.) लोकांनी त्याचा खूप विरोध केला, तरीसुद्धा तो त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या पित्याला विश्वासू राहिला. असं करून त्याने हे दाखवून दिलं, की कठीण परिस्थितींतही मानव देवाला विश्वासू राहू शकतात. खरंच, आपण येशूच्या “पावलांचं जवळून अनुकरण करावं,” म्हणून त्याने आपल्यासाठी “एक आदर्श घालून दिला” आहे.—१ पेत्र २:२१.
आणखी जाणून घेऊ या
येशूने कशा प्रकारे आनंदाचा संदेश सांगितला आणि चमत्कार केले, हे पाहू या.
४. येशूने लोकांना आनंदाचा संदेश सांगितला
जास्तीत जास्त लोकांना आनंदाचा संदेश सांगता यावा, म्हणून येशूने पुष्कळ मैल पायी प्रवास केला. लूक ८:१ वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
येशूने फक्त त्याच्याजवळ आलेल्या लोकांनाच आनंदाचा संदेश सांगितला का?
लोकांना आनंदाचा संदेश सांगण्यासाठी येशूने कशा प्रकारे मेहनत घेतली?
देवाने आपल्या संदेष्ट्याद्वारे सांगितलं होतं, की मसीहा आनंदाचा संदेश घोषित करेल. यशया ६१:१, २ वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
येशूने ही भविष्यवाणी कशी पूर्ण केली?
आजही लोकांना या आनंदाच्या संदेशाची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का?
५. येशूने लोकांना जीवनात उपयोगी पडतील अशा गोष्टी शिकवल्या
देवाच्या राज्याबद्दल सांगण्यासोबतच येशूने लोकांना व्यावहारिक सल्लेही दिले. त्याच्या डोंगरावरच्या उपदेशातून आपण याची काही उदाहरणं पाहू या. मत्तय ६:१४, ३४ आणि ७:१२ वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
या वचनांमध्ये येशूने कोणता व्यावहारिक सल्ला दिला आहे?
हा सल्ला आजही उपयोगी आहे असं तुम्हाला वाटतं का?
६. येशूने बरेच चमत्कार केले
यहोवाने येशूला वेगवेगळे चमत्कार करायची शक्ती दिली होती. याचं एक उदाहरण पाहण्यासाठी मार्क ५:२५-३४ वाचा किंवा व्हिडिओ पाहा. त्यानंतर खाली दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करा.
आजारी स्त्रीला कोणत्या गोष्टीची खातरी होती?
या घटनेबद्दल कोणती गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली?
योहान ५:३६ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
येशूने केलेल्या चमत्कारांनी त्याच्याबद्दल कोणत्या गोष्टीची ‘साक्ष दिली’ किंवा काय सिद्ध केलं?
तुम्हाला माहीत होतं का?
बायबलमधली मत्तय, मार्क, लूक आणि योहान ही चार पुस्तकं आपल्याला येशूबद्दल भरपूर माहिती देतात. यांना सहसा शुभवर्तमानाची पुस्तकं म्हटलं जातं. प्रत्येक शुभवर्तमान लिहिणाऱ्या लेखकाने येशूबद्दल काही खास माहिती दिली. ती सगळी माहिती वाचल्यावर आपल्या डोळ्यांसमोर येशूच्या जीवनाचं एक जिवंत चित्र उभं राहतं.
मत्तय
त्याने पहिलं शुभवर्तमानाचं पुस्तक लिहिलं. त्याने येशूच्या शिकवणींवर, खासकरून देवाच्या राज्याबद्दल येशूने जे शिकवलं त्यावर भर दिला.
मार्क
त्याचं शुभवर्तमानाचं पुस्तक सगळ्यात छोटं आहे. त्याने घटनांचं रोमांचक पद्धतीने वर्णन केलंय.
लूक
येशूसाठी प्रार्थना किती महत्त्वाची होती आणि तो स्त्रियांशी कसा वागला याचा लूकने खास उल्लेख केलाय.
योहान
येशू त्याच्या जवळच्या मित्रांसोबत आणि इतरांसोबत ज्या गोष्टी बोलला, त्यांबद्दल योहानने लिहिलंय. यावरून, एक व्यक्ती म्हणून येशू कसा होता हे समजायला आपल्याला मदत होते.
काही जण म्हणतात: “येशू फक्त एक सत्पुरुष होता.”
तुम्हाला याबद्दल काय वाटतं?
थोडक्यात
येशूने देवाच्या राज्याबद्दल लोकांना सांगितलं, चमत्कार केले आणि प्रत्येक प्रसंगात तो यहोवाच्या आज्ञेप्रमाणे वागला.
उजळणी
पृथ्वीवर असताना येशूने कोणत्या कामाला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं?
येशूने केलेल्या चमत्कारांवरून काय दिसून आलं?
येशूने लोकांना जीवनात उपयोगी पडतील अशा कोणत्या गोष्टी शिकवल्या?
हेसुद्धा पाहा
येशू कोणत्या विषयावर सगळ्यात जास्त बोलायचा?
“परमेश्वर का राज—यीशु के लिए क्या मायने रखता है?” (ऑनलाईन लेख)
येशूने खरोखर चमत्कार केले हे आपण कशावरून म्हणू शकतो ते पाहा.
“येशूचे चमत्कार—तुम्ही काय शिकू शकता?” (टेहळणी बुरूज, १५ जुलै, २००४)
येशूने लोकांसाठी किती त्याग केले हे समजल्यावर एका माणसाचं जीवन कसं बदललं ते पाहा.
येशूने पृथ्वीवर केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यांची क्रमवार यादी वाचा.