वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 १२/१ पृ. १३-१८
  • ‘अनीतीकारक धनाने मित्र जोडा’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘अनीतीकारक धनाने मित्र जोडा’
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ‘यहोवाप्रीत्यर्थ वर्गण्या’
  • मंदिरासाठी वर्गण्या
  • ख्रिस्ती काळात संपत्तीचा योग्य वापर
  • विश्‍वासू कारभारी
  • उदारतेचा कित्ता
  • ‘अनीतीकारक धनाने मित्र जोडा’
  • खरं धन मिळवण्याचा प्रयत्न करा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • शुद्ध उपासनेच्या वाढीकरता केलेले स्वेच्छिक बलिदान
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • अनुदान केल्याने आनंद मिळतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 १२/१ पृ. १३-१८

‘अनीतीकारक धनाने मित्र जोडा’

“अनीतिकारक धनाने तुम्ही आपणासाठी मित्र जोडा; . . . जो अगदी थोडक्याविषयी विश्‍वासू तो पुष्कळाविषयीहि विश्‍वासू आहे.”—लूक १६:९, १०.

१. इजिप्तमधून सुटका झाल्यावर मोशे आणि इस्राएल पुत्रांनी यहोवाची स्तुती कशी केली?

चमत्काराने सुटका—किती विश्‍वास बळकट करणारा अनुभव! इजिप्तमधून इस्राएलाच्या निर्गमनाचे श्रेय सर्वशक्‍तिमान यहोवाखेरीज इतर कोणालाही दिले जाऊ शकणार नाही. यामुळे मोशे व इस्राएल लोकांनी जे गायन केले त्यात काही आश्‍चर्याचे नव्हते: “परमेश्‍वर [यहोवा, NW] माझे बल, माझा स्तोत्रविषय [माझी शक्‍ती] आहे, तो माझा उद्धारक झाला आहे, हाच माझा देव, स्तवनाने मी ह्‍याला सुशोभित करीन, हाच माझ्या पित्याचा देव मी ह्‍याचा महिमा गाईन.”—निर्गम १५:१, २; अनुवाद २९:२.

२. इजिप्त सोडताना यहोवाच्या लोकांनी आपल्यासोबत काय घेतले?

२ इस्राएलांना नव्याने मिळालेले स्वातंत्र्य, इजिप्तमधील त्यांच्या परिस्थितीपासून किती विपरीत होते! आता ते यहोवाची भक्‍ती कोणत्याही अडथळ्याविना करु शकत होते. शिवाय इजिप्तमधून ते रिकाम्या हाताने आले नव्हते. मोशे सांगतो: “इस्राएल लोकांनी . . . मिसरी [इजिप्त] लोकांपासून सोन्याचांदीचे दागिने व वस्रेप्रावरणे मागून घेतली. मिसरी लोकांची कृपादृष्टि इस्राएल लोकांवर होईल असे परमेश्‍वराने [यहोवा, NW] केले, म्हणून त्यांनी जे जे मागितले ते ते त्यांनी त्यांना दिले. अशाप्रकारे त्यांनी मिसरी लोकांना लुटिले.” (निर्गम १२:३५, ३६) पण त्यांनी इजिप्तच्या या धनाचा वापर कसा केला? याचा परिणाम ‘यहोवाची महिमा करण्यात’ झाला का? त्यांच्या उदाहरणापासून आपण काय शिकतो?—पडताळा १ करिंथकर १०:११.

‘यहोवाप्रीत्यर्थ वर्गण्या’

३. इस्राएलांनी खोट्या भक्‍तीत सोन्याचा वापर केल्याने यहोवाने काय प्रतिक्रिया दाखवली?

३ इस्राएल लोकांसाठी देवाचा बोध मिळवण्यास सीयोन पर्वतावरील ४० दिवसांच्या दीर्घ वास्तव्यादरम्यान, पायथ्याशी थांबलेले लोक अतिशय उतावीळ झाले. त्यांनी कानातली सोन्याची कुंडले काढून, भक्‍तीकरता एखादी मूर्ती करण्यासाठी अहरोनाला पुढे केले. अहरोनाने देखील त्यांच्यासाठी एक वेदी बनवली आणि दुसऱ्‍या दिवशी पहाटेच त्यांनी तेथे होमार्पणे अर्पिली. त्यांनी सोन्याचा अशाप्रकारे वापर केल्यामुळे त्यांच्या मुक्‍तीदात्याला ते प्रिय असे बनले का? मुळीच नाही! यहोवाने मोशेला म्हटले, “तर आता मला आड येऊ नको मी आपला कोप त्यांच्यावर भडकवून त्यांना भस्म करितो.” यहोवाने केवळ मोशेच्या विनवणीमुळे त्या राष्ट्राला वाचवले असले, तरी बंडखोर नायक देवाकडून आलेल्या विपत्तीने ठार झाले.—निर्गम ३२:१-६, १०-१४, ३०-३५.

४. “यहोवासाठी वर्गण्या” काय होत्या आणि त्या कोणी दिल्या?

४ नंतर इस्राएलांना आपल्या संपत्तीचा वापर अशारीतीने करण्याची संधी मिळाली ज्यामुळे यहोवा संतुष्ट झाला. त्यांनी ‘यहोवाप्रीत्यर्थ वर्गण्या’ गोळा केल्या.a सोने, चांदी, तांबे, निळ्या रंगाचे सूत, रंगवलेले विविध प्रकारचे साहित्य, मेंढ्याची कातडी, तहशाची कातडी, बाभळीचे लाकूड या वस्तू निवासमंडपाची बांधणी व सजावटीसाठी वर्गणी म्हणून दिल्या होत्या. हा अहवाल दान देणाऱ्‍यांच्या प्रवृत्तीकडे आपले लक्ष आकर्षित करतो. “अंतःकरणापासून इच्छुक असणाऱ्‍यांनी यहोवासाठी वर्गण्या आणाव्या.” (निर्गम ३५:५-९, NW) इस्राएलाने अत्याधिक प्रतिसाद दर्शवला. या कारणास्तव, एक विद्वान सांगतात त्यानुसार निवासमंडपाची इमारत “सुरेख व अत्युत्कृष्ट वैभवाची” होती.

मंदिरासाठी वर्गण्या

५, ६. मंदिराच्या बाबतीत, दाविदाने आपल्या धनाचा वापर कसा केला आणि इतरांनी कसा प्रतिसाद दिला?

५ शलमोन राजाने यहोवाच्या भक्‍तीसाठी कायम स्वरुपी मंदिराच्या बांधणीचे दिग्दर्शन केले असले, तरी त्याचा पिता, दावीद याने त्यासाठी पुष्कळ तयारी केली होती. दाविदाने मोठ्या प्रमाणात सोने, चांदी, तांबे, लोखंड, लाकूड आणि मौल्यवान रत्ने गोळा केले. दाविदाने आपल्या लोकांना म्हटले, “माझे चित्त माझ्या देवाच्या मंदिराकडे लागले आहे म्हणून पवित्र मंदिरासाठी जो मी संग्रह केला आहे त्याशिवाय आणखी माझा स्वतःचा सोन्यारुप्याचा निधि मी देवाच्या मंदिरास देतो. मंदिराच्या भिंती मढवण्यासाठी तीन हजार किक्कार . . . सोने व सात हजार किक्कार शुद्ध रुपे [चांदी] मी देतो.” दाविदाने इतरांना देखील उदार होण्याचे उत्तेजन दिले. पुष्कळ सोने, चांदी, तांबे, लोखंड आणि मौल्यवान रत्ने देऊन विपुल प्रतिसाद मिळाला. लोकांनी “संपूर्ण अंतःकरणाने यहोवाप्रीत्यर्थ स्वेच्छेने देणग्या दिल्या.”—१ इतिहास २२:५; २९:१-९, NW.

६ या स्वेच्छिक वर्गण्या देऊन इस्राएल लोकांनी यहोवाच्या भक्‍तीबद्दल गाढ गुणग्राहकता व्यक्‍त केली. दाविदाने नम्रपणे प्रार्थना केली: “आम्हास याप्रकारे स्वेच्छेने अर्पणे करिता [देणग्या देता] यावी असा मी कोण? व माझे लोक तरी कोण?” का बरे? कारण “तुझ्याच हातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत. . . . मी तर आपल्या सरळ हृदयाने या सर्व वस्तु तुला आनंदाने समर्पिल्या आहे.”—१ इतिहास २९:१४, १७.

७. आमोसच्या दिवसाबद्दल आपण कोणता इशारेवजा धडा शिकतो?

७ तरीही, यहोवाच्या भक्‍तीला आपल्या मनात व अंतःकरणात प्राथमिकता देण्यात इस्राएलाचे वंश अपयशी ठरले. सा. यु. पू. नवव्या शतकापर्यंत, आध्यात्मिक गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याबद्दल विभाजित इस्राएल दोषी ठरले. इस्राएलाच्या उत्तरेकडील दहा वंशाच्या राज्याविषयी, यहोवाने आमोसद्वारे सांगितले: “सीयोनेत सुखवस्तु असणारे व शोमरोनाच्या पर्वतावर निर्श्‍चित असणारे यास धिक्कार असो!” त्याने त्यांचे वर्णन, “हस्तीदंती पलंगावर निजता व मंचकांवर ताणून पडता; कळपातली कोंकरे व गोठ्यातली वासरे खाता; . . . घागरीच्या घागरी [चषकातून] द्राक्षारस पिता,” असे केले. पण त्यांची समृद्धी संरक्षण करणारी नव्हती. देवाने इशारा दिला: “ते आता बंदिवानांच्या अग्रभागी चालून बंदिवासात जातील; ख्यालीखुशाली करणाऱ्‍यांचा गोंगाट नाहीसा होईल.” सा. यु. पू. ७४० मध्ये इस्राएलाने अश्‍शुरीयाने आणलेल्या दुःखाचा अनुभव घेतला. (आमोस ६:१, ४, ६, ७) तसेच काही काळानंतर, दक्षिणेकडील यहुदाचे राज्य देखील भौतिकवादाला बळी पडले.—यिर्मया ५:२६-२९.

ख्रिस्ती काळात संपत्तीचा योग्य वापर

८. संपत्तीचा वापर करण्याविषयी, योसेफ आणि मरीया कोणते उत्तम उदाहरण पुरवतात?

८ उलटपक्षी नंतरच्या काळात, देवाच्या सेवकांची तुलनात्मकदृष्टया गरीब परिस्थिती खऱ्‍या भक्‍तीसाठी आवेश दाखविण्यास बाधा ठरली नाही. उदाहरणार्थ, मरीया आणि योसेफाचा विचार करा. कैसर औगुस्त याच्या आज्ञेवरुन ते त्यांची कौटुंबिक जन्मभूमी, बेथलेहेम येथे गेले. (लूक २:४, ५) तेथे येशूचा जन्म झाला. चाळीस दिवसांनंतर योसेफ आणि मरीया नेमून दिल्याप्रमाणे शुद्धिकरणाचे अर्पण वाहण्यासाठी जवळच असलेल्या जेरुसलेम येथील मंदिरात गेले. मरीयाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे ती पक्ष्यांची दोन पिले अर्पण करते. तिने किंवा योसेफानेही त्यांच्या गरीबीची सबब दिली नाही. याउलट, त्यांनी आज्ञाधारकपणे त्यांच्याजवळ असलेल्या मर्यादित संपत्तीचा वापर केला.—लेवीय १२:८; लूक २:२२-२४.

९-११. (अ) आपण आपला पैसा कसा वापरतो, याबद्दल मत्तय २२:२१ मधील येशूचे शब्द कोणते मार्गदर्शन देतात? (ब) विधवेने दिलेली अल्प वर्गणी व्यर्थ का गेली नाही?

९ नंतर परुशी आणि हेरोदाच्या सहकारी अनुयायांनी असे म्हणत येशूची चेष्टा करण्याचा प्रयत्न केला: “आपल्याला काय वाटते हे आम्हास सांगा. कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?” येशूच्या प्रत्युत्तरात त्याची समजबुद्धी दिसून आली. त्यांनी दिलेल्या नाण्याचा उल्लेख करत येशूने विचारले: “हा मुखवटा व हा लेख कोणाचा?” त्यांनी उत्तर दिले: “कैसराचा.” सुज्ञतेने त्याने समारोप केला: “तर मग, कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरा.” (मत्तय २२:१७-२१) नाणे बनविणारे अधिकारी कराची अपेक्षा करीत असल्याचे येशूला माहीत होते. पण येथे येशूने खरा ख्रिस्ती “देवाचे ते देवाला” देण्याचा प्रयत्न करतो, याची जाणीव आपल्या अनुयायांना त्याचप्रमाणे शत्रूंना देखील करुन देण्यात मदत दिली. यामध्ये एखाद्याच्या भौतिक ठेव्याचा उचित वापर करणे याचा समावेश आहे.

१० येशूने मंदिरात प्रत्यक्ष पाहिलेली घटना याला स्पष्ट करते. त्याने आताच ‘विधवांची घरे गिळंकृत करणाऱ्‍या’ लोभिष्ट शास्त्र्यांचा निषेध केला होता. “मग त्याने दृष्टि वर करून धनवानांना आपली दाने मंदिराच्या भांडारात टाकताना पाहिले,” असे लूक सांगतो. मग “त्याने [येशूने] एका दरिद्री विधवेलाहि तेथे दोन टोल्या टाकताना पाहिले. तेव्हा तो म्हणाला, ‘मी तुम्हाला खरे सांगतो, ह्‍या दरिद्री विधवेने सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे. कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून दानात टाकले; हिने तर आपल्या कमताईतून आपली सर्व उपजीविका टाकली आहे.’” (लूक २०:४६, ४७; २१:१-४) काही लोकांनी सांगितले, की मंदिर मौल्यवान रत्नांनी सुशोभित केलेले होते. येशूने प्रतिसाद दिला: “असे दिवस येतील की, जे तुम्ही पाहत आहा त्यातला पाडला जाणार नाही असा चिऱ्‍यावर चिरा राहणार नाही.” (लूक २१:५, ६) मग त्या विधवेची अल्प वर्गणी व्यर्थ जाणार होती का? निश्‍चितच नाही. यहोवाने त्या वेळी मंदिरात नेमलेल्या योजनेला तिने सहयोग दिला.

११ येशूने त्याच्या खऱ्‍या अनुयायांना सांगितले: “कोणत्याहि चाकराला दोन धन्यांची सेवाचाकरी करिता येत नाही; कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्‍यावर प्रीति करील; अथवा एकाला धरून राहील व दुसऱ्‍याला तुच्छ मानील. तुम्हाला देवाची आणि धनाची सेवाचाकरी करिता येत नाही.” (लूक १६:१३) यास्तव, आपण आपल्या भौतिक संपत्तीचा वापर करताना उचित संतुलन कसे प्रदर्शित करु शकतो?

विश्‍वासू कारभारी

१२-१४. (अ) ख्रिश्‍चन कोणत्या संपत्तीचे कारभारी आहेत? (ब) यहोवाचे लोक आज कोणत्या विशेष मार्गांनी आपल्या कारभाऱ्‍याचे काम विश्‍वासूपणे पूर्ण करतात? (क) देवाच्या कार्याला आज हातभार लावण्यासाठी पैसा कोठून येतो?

१२ यहोवाला आपण आपले जीवन समर्पित करतो, तेव्हा आपल्या सर्व संपत्तीसह आपल्याजवळ जे काही आहे ते वस्तुतः त्याच्या मालकीचे असल्याचे आपण म्हणतो. तर मग, आपल्याजवळ जे आहे त्याचा वापर आपण कसा केला पाहिजे? ख्रिस्ती सेवेबद्दल, मंडळीत चर्चा करताना वॉचटावर सोसायटीचे पहिले अध्यक्ष, बंधू सी. टी. रसेल यांनी लिहिले: “आपला वेळ, प्रभाव, पैसा इत्यादी गोष्टींचा कारभारी असण्यासाठी आपली नियुक्‍ती प्रभूकडून झाली आहे, असा प्रत्येकाने विचार करावा आणि स्वामीच्या स्तुतीस्तव प्रत्येकाने या ठेव्याचा उपयोग आपल्या क्षमतेच्या योग्यतेनुरूप करण्याचा प्रयत्न करावा.”—नवी निर्मिती, (इंग्रजी) पृष्ठ ३४५.

१३ “कारभारी म्हटला की, तो विश्‍वासू असला पाहिजे,” असे १ करिंथकर ४:२ सांगते. एक आंतरराष्ट्रीय संघटना या नात्याने यहोवाचे साक्षीदार ख्रिस्ती सेवेत आपल्या अधिकाधिक वेळेचा वापर करण्याचा प्रयत्न करुन व शिकवण्याच्या आपल्या गुणांचा काळजीपूर्वक विकास करुन त्या वर्णनाप्रमाणे राहण्याचा कसोशीने प्रयत्न करतात. शिवाय, भक्‍तीसाठी उत्तम सभागृह तयार करण्यासाठी प्रादेशिक बांधणी समित्यांच्या मार्गदर्शनानुसार स्वयंसेवकांचे संघ स्वेच्छेने आपला वेळ, शक्‍ती तसेच विशेष ज्ञान आणि नैपुण्य देऊन हातभार लावतात. या सर्वांमुळे यहोवा अधिक संतुष्ट होतो.

१४ शिकवण्याच्या या विस्तृत मोहीमेला तसेच बांधणी कार्याला हातभार लावण्यासाठी पैसा कोठून येतो बरे? निवासमंडपाच्या बांधणीच्या दिवसात होते त्याप्रमाणेच अंतःकरणापासून इच्छुक असलेल्या लोकांकडून. वैयक्‍तिकरित्या आमचा भाग आहे का? आपल्या आर्थिक गोष्टींचा वापर आपण ज्याप्रकारे करतो त्यावरुन यहोवाची सेवा अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे प्रदर्शित होते का? पैशांच्या बाबतीत आपण विश्‍वासू कारभाऱ्‍यांसारखे राहू या.

उदारतेचा कित्ता

१५, १६. (अ) पौलाच्या दिवसातील ख्रिश्‍चनांनी उदारता कशी दाखवली? (ब) आपण सध्याच्या चर्चेला कोणत्या दृष्टिकोनातून पाहावे?

१५ प्रेषित पौलाने मासेदोनिया व अखया येथील ख्रिश्‍चनांच्या उदारतेबद्दल लिहिले. (रोमकर १५:२६) ते स्वतःच पीडित असताना देखील त्यांनी आपल्या बांधवांच्या मदतीसाठी त्वरेने दान दिले. अशारीतीने आपल्या जवळ अधिक असलेल्या गोष्टींनी इतरांच्या कमताईची भरपाई उदारतेने करण्याचे उत्तेजन पौलाने करिंथमधील ख्रिश्‍चनांना दिले. पौल पिळवणूक करीत असल्याचा आरोप कोणीही योग्यपणे करु शकत नव्हता. त्याने लिहिले: “जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील; आणि जो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील; प्रत्येकाने आपआपल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे; दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो.”—२ करिंथकर ८:१-३, १४; ९:५-७, १३.

१६ आज जगव्याप्त राज्य कार्यासाठी उदार वर्गण्या देण्याद्वारे आमचे बांधव आणि आस्थेवाईक लोक या विशेषाधिकाराला किती उंचावून धरतात याची प्रचिती मिळते. परंतु पौलाने करिंथकरांना आठवण करुन दिल्याप्रमाणे या चर्चेचा विचार स्मरणिका म्हणून करणे बरे असेल.

१७. पौलाने देण्याच्या कोणत्या आदर्शाचे उत्तेजन दिले आणि याचा अवलंब आज केला जाऊ शकतो का?

१७ पौलाने बांधवांना आर्जवले, की त्यांनी आपल्या देण्यामध्ये सुव्यवस्थित योजनेचे अनुकरण करावे. त्याने म्हटले, “आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने जसे आपणाला यश मिळाले असेल त्या मानाने आपणाजवळ द्रव्य जमा करुन ठेवावे.” (१ करिंथकर १६:१, २) मंडळ्यांद्वारे अथवा वॉचटावर सोसायटीच्या जवळच्या शाखा दप्तराला थेट वर्गण्या पाठवल्या तर आपल्यासाठी तसेच आपल्या मुलांसाठी ते एक उदाहरण असू शकते. पूर्व आफ्रिकेतील शहरात प्रचार करण्याची नियुक्‍ती मिळालेल्या एका मिशनरी जोडप्याने आपल्यासोबत बायबल अभ्यास करण्यासाठी आस्थेवाईकांना आमंत्रित केले. ही पहिली सभा संपल्यावर, मिशनऱ्‍यांनी दूरदर्शीपणाने “राज्य कार्यासाठी वर्गण्या,” असे चिन्ह असलेल्या पेटीत काही नाणी टाकली. उपस्थित असलेल्या इतरांनी देखील तसेच केले. नंतर, या नवोदितांची मिळून एक ख्रिस्ती मंडळी तयार झाल्यावर, विभागीय पर्यवेक्षकांनी भेट दिली आणि त्यांच्या वर्गण्यांच्या नियमितपणाबद्दल त्यांनी बोलून दाखवले.—स्तोत्र ५०:१०, १४, २३.

१८. आपण, विपत्तीत असलेल्या आपल्या बांधवांची मदत कशी करु शकतो?

१८ आपल्या संपत्तीचा वापर, नैसर्गिक आपत्तीत बळी पडलेल्यांना तसेच युद्धामुळे जेरीस आलेल्यांना मदत करण्याची सुसंधी देखील आपल्याजवळ आहे. पूर्व युरोपाच्या या भागात आर्थिक व राजकीय क्रांती पसरलेली असताना, तेथे मदतीचा पुरवठा पाठवल्याबद्दलचे वाचन करताना आपले अंतःकरण कसे हेलावले होते! अडचणीत असलेल्या ख्रिश्‍चनांना वस्तू तसेच पैसा यांच्या वर्गण्या देण्याद्वारे आपल्या बांधवांनी उदारता आणि एकता प्रदर्शित केली.b—२ करिंथकर ८:१३, १४.

१९. पूर्ण वेळेच्या सेवेत असणाऱ्‍यांना मदत करण्यासाठी, कोणत्या व्यावहारिक गोष्टी आपण करु शकतो?

१९ पूर्ण वेळेच्या सेवेत, जसे की पायनियर, प्रवासी पर्यवेक्षक, मिशनरी आणि बेथेल स्वयंसेवक या नात्याने कार्य करीत असलेल्या आमच्या बांधवांचे कार्य आपण बहुमोलाचे समजतो, नाही का? आमची परिस्थिती अनुमती देते त्याप्रमाणे, आपण त्यांना थेट भौतिक मदत करु शकतो. उदाहरणार्थ, तुमच्या मंडळीत विभागीय पर्यवेक्षकांची भेट असताना, तुम्ही त्यांना राहण्याची, भोजनाची व्यवस्था किंवा प्रवासाचा खर्च देऊन त्यांची मदत करु शकता. अशा प्रकारची उदारता आपल्या स्वर्गीय पित्याच्या दृष्टिआड होत नाही, कारण आपल्या सेवकांची काळजी घेतली जावी असे तो इच्छितो. (स्तोत्र ३७:२५) काही वर्षांपूर्वी केवळ अल्पोपहार देण्याचीच ऐपत असणाऱ्‍या एका बांधवाने प्रवासी पर्यवेक्षक व त्यांच्या पत्नीला आपल्या घरी निमंत्रित केले. हे जोडपे सायंकाळच्या क्षेत्रसेवेसाठी निघाले, तेव्हा या बांधवाने आपल्या या पाहुण्यांना एक लिफाफा दिला. त्यात (अमेरिकेच्या एक डॉलर एवढ्या किंमतीची) एक नोट तसेच सोबत हस्ताक्षरात लिहिलेली एक लहान चिठ्ठी देखील होती: “चहापाण्यासाठी किंवा एक गॅलन पेट्रोलसाठी.” या नम्र वागणूकीत किती उत्तम गुणग्राहकता व्यक्‍त झाली!

२०. आपण कोणती सुसंधी तसेच जबाबदारी याकडे दुर्लक्ष करण्याचे अपेक्षू नये?

२० यहोवाचे लोक आध्यात्मिकरित्या आशीर्वादित आहेत! आपण आपल्या संमेलनात आणि अधिवेशनात नवीन प्रकाशने, उत्तम शिक्षण, तसेच व्यावहारिक सल्ले या आध्यात्मिक मेजवानीचा आनंद लुटतो. आपल्या आध्यात्मिक आशीर्वादांसाठी कृतज्ञतेने भरलेल्या आपल्या अंतःकरणासह, आपण जगभरात देवाच्या राज्याची आस्था वाढविण्यासाठी निधी देण्याचा विशेषाधिकार आणि जबाबदारी विसरत नाही.

‘अनीतीकारक धनाने मित्र जोडा’

२१, २२. लवकरच ‘अनीतिकारक धनाचे’ काय होईल, त्यामुळे आता आपल्याकडून कशाची अपेक्षा केली जात आहे?

२१ खरोखर, यहोवाच्या भक्‍तीला आपल्या जीवनात प्राधान्य देऊ शकतो हे दाखविण्याचे भरपूर मार्ग आहेत. हे दाखविण्याच्या विशेष मार्गात येशूच्या सल्ल्याकडे लक्ष देणे समाविष्ट आहे: “अनीतिकारक धनाने तुम्ही आपणांसाठी मित्र जोडा; ह्‍यासाठी की, ते नाहीसे होईल तेव्हा त्यांनी तुम्हास सार्वकालिक वस्तीत घ्यावे.”—लूक १६:९.

२२ येशू, अनीतिकारक धन नाहीसे होण्याविषयी बोलला, याकडे लक्ष द्या. होय, असे दिवस येतील जेव्हा या व्यवस्थिकरणातील पैसा कवडीमोलाचा होईल. यहेज्केलने भविष्यवाद केला, “ते आपले रुपे रस्त्यांवर फेकून देतील, त्यांस आपले सोने अमंगळ वाटेल; परमेश्‍वराच्या [यहोवा, NW] कोपाच्या दिवशी त्यांच्या सोन्यारुप्याने त्यांचा बचाव होणार नाही.” (यहेज्केल ७:१९) हे घडेपर्यंत, आपण आपल्या भौतिक ठेव्यांचा ज्यारीतीने वापर करतो त्याबद्दल सुज्ञता व समजबुद्धी प्रदर्शित केली पाहिजे. या कारणास्तव, येशूच्या इशाऱ्‍याकडे लक्ष न दिल्यामुळे आपण खेदाने मागे पाहणार नाही: “तुम्ही अनीतिकारक धनाविषयी विश्‍वासू झाला नाही तर जे खरे धन ते तुम्हाला कोण सोपवून देईल? . . . तुम्हाला देवाची आणि धनाची सेवाचाकरी करिता येत नाही.”—लूक १६:११-१३.

२३. आपण सुज्ञतेने कशाचा उपयोग करावा आणि आपले बक्षीस काय असेल?

२३ मग, आपण सर्वजण, यहोवाच्या सेवेला आपल्या जीवनात प्रथम स्थान देण्याकरता आणि आपल्या सर्व संपत्तीचा वापर सुज्ञतेने करण्याकरता या स्मरणिकांकडे विश्‍वासूपणे लक्ष देऊ या. अशाप्रकारे आपण यहोवा आणि येशू यांच्यासोबत मित्रता राखू. कारण ते अनीतिकारक धन नाहीसे होईल तेव्हा “सार्वकालिक वस्तीत,” आमचा स्वीकार करतील म्हणजे स्वर्गीय राज्यात किंवा नंदनवन पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाची आशा देतील याचे आश्‍वासन त्यांनी दिले आहे.—लूक १६:९.

[तळटीपा]

a “वर्गणी” यासाठी वापरलेला इब्री शब्द अशा क्रियापदापासून आला ज्याचा शब्दशः अर्थ, “उच्च असणे; उन्‍नत असणे; वर उचलणे,” असा होतो.

b वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क इंका. यांनी १९९३ मध्ये प्रकाशित केलेले यहोवाचे साक्षीदार—देवाच्या राज्याचे उद्‌घोषक (इंग्रजी), या पुस्तकाची पृष्ठे ३०७-१५ पहा.

तुम्हाला आठवते का?

▫ इस्राएलांनी निवासमंडप बांधण्यासाठी वर्गणी देण्याच्या यहोवाच्या निमंत्रणाला कसा प्रतिसाद दिला?

▫ विधवेची वर्गणी व्यर्थ का गेली नाही?

▫ ख्रिश्‍चन ज्याप्रकारे आपल्या संपत्तीचा वापर करतात याविषयी त्यांच्यावर कोणती जबाबदारी आहे?

▫ आपण पैशाचा वापर करण्याबद्दल खेद कसा टाळू शकतो?

[१५ पानांवरील चित्रं]

विधवेची वर्गणी अल्प होती तरी ती व्यर्थ गेली नाही

[१६, १७ पानांवरील चित्रं]

आपल्या वर्गण्या जगव्याप्त राज्यकार्यास हातभार लावतात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा