वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ८/१५ पृ. १५-२०
  • देव कार्य करील तेव्हा तुमचा बचाव होईल का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देव कार्य करील तेव्हा तुमचा बचाव होईल का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • येशूने काय भाकीत केले व ते कसे पूर्ण झाले
  • मनुष्ये निभावली—ते कसे?
  • तुमचे भवितव्य तुमच्यासाठी काय राखून आहे?
  • “असे होणे अवश्‍य आहे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • मोठ्या संकटातून जिवंत वाचवलेले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • “आपल्या उपस्थितीचे चिन्ह काय?”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ८/१५ पृ. १५-२०

देव कार्य करील तेव्हा तुमचा बचाव होईल का?

“ते दिवस कमी केले नसते तर कोणाहि मनुष्याचा निभाव लागला नसता; परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जातील.”—मत्तय २४:२२.

१, २. (अ) आपल्या भवितव्याबद्दलची आस्था बाळगणे साहजिक का आहे? (ब) स्वाभाविक आस्था कदाचित कोणत्या महत्त्वपूर्ण प्रश्‍नांमध्ये गोवलेली असेल?

तुम्ही केवढ्या प्रमाणात स्वकेंद्रित आहात? अनेकजण आज अतिशय स्वकेंद्रित होऊन स्वार्थाच्या टोकाला पोहंचतात. तरीही, आपल्यावर परिणाम करणाऱ्‍या गोष्टीबद्दल योग्य आस्था बाळगण्यास बायबल खंडन करीत नाही. (इफिसकर ५:३३) त्यामध्ये, आपल्या भवितव्याविषयी आस्था बाळगणे समाविष्ट आहे. यास्तव, तुमचे भवितव्य तुमच्यासाठी काय राखून आहे हे जाणावेसे वाटणे तुमच्याकरता साहजिक असेल. तुम्हाला ते जाणण्यास आवडेल का?

२ येशूच्या प्रेषितांना त्यांचे भवितव्य जाणून घेण्याची अशीच आवड होती याची आपण खात्री बाळगू शकतो. (मत्तय १९:२७) बहुधा, याच कारणास्तव त्यांच्यातील चौघे जण येशूसोबत जैतुनांच्या डोंगरावर असावेत. त्यांनी विचारले: “ह्‍या गोष्टी कधी घडतील? आणि ह्‍या सर्व गोष्टी पूर्ण होण्याच्या सुमारास आल्या म्हणजे काय चिन्ह होईल हे आम्हाला सांगा.” (मार्क १३:४) भवितव्य जाणून घेण्याच्या—त्यांच्या आणि आपल्या नैसर्गिक आस्थेकडे येशूने कानाडोळा केला नाही. भवितव्याच्या घटनांचा परिणाम त्याच्या अनुयायांवर कसा होईल व शेवटी काय परिणाम होईल ते त्याने वारंवार ठळकपणे सांगितले.

३. येशूने दिलेल्या उत्तराचा संबंध आपण आपल्या काळाशी का जोडतो?

३ येशूने दिलेले उत्तर, आपल्या काळात मोठ्या प्रमाणात पूर्ण होणारी एक भविष्यवाणी होती. हे आपण, आपल्या शतकातील जागतिक युद्धे व इतर झगडे, अगणित जीवनज्योती मालवणारे भूमिकंप, आजार व मृत्यू ओढवणारी अन्‍नटंचाई तसेच १९१८ मध्ये सुरु झालेल्या स्पॅनिश इन्फ्लूएन्झापासून सध्याच्या एड्‌ससारख्या अरिष्टांपर्यंतच्या—साथी यांद्वारे पाहतो. परंतु येशूच्या उत्तराच्या बहुतांश भागाची पूर्णता, सा. यु. ७० मध्ये रोमी सैन्याने जेरुसलेमवर आणलेल्या नाशाप्रत नेणाऱ्‍या काळात तसेच नाश झाला त्या काळात झाली. येशूने त्याच्या शिष्यांना इशारा दिला: “ते तुम्हाला न्यायसभांच्या स्वाधीन करितील सभास्थानांमध्ये तुम्हाला मार देतील आणि सुभेदार व राजे ह्‍यांच्यापुढे तुम्ही साक्ष द्यावी म्हणून तुम्हाला माझ्याकरिता त्यांच्यासमोर उभे राहावे लागेल.”—मार्क १३:९.

येशूने काय भाकीत केले व ते कसे पूर्ण झाले

४. येशूच्या उत्तरामध्ये कोणते इशारे गोवलेले आहेत?

४ येशूच्या शिष्यांना इतर जण कसे वागवतील केवळ याबद्दलच त्याने भाकीत केले नाही; तर त्यांनी स्वतः कसे वागले पाहिजे याविषयीही त्याने त्यांना सावध केले. उदाहरणार्थ: “जेथे ओसाडीचा अमंगळ पदार्थ नसावा तेथे तो उभा असलेला तुम्ही पाहाल (वाचकाने हे समजून घ्यावे), तेव्हा जे यहूदीयात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे.” (मार्क १३:१४) लूक २१:२० मधील समान अहवाल म्हणतो: “यरुशलेमेस सैन्यांचा वेढा पडत आहे असे पाहाल तेव्हा.” ही गोष्ट पहिल्या पूर्णतेत कशारीतीने अचूक ठरली?

५. सा. यु. ६६ मध्ये यहुदीयातील यहुद्यांमध्ये काय झाले?

५ द इंटरनॅशनल स्टॅन्डर्ड बायबल एन्सायक्लोपिडिआ (१९८२) आपल्याला सांगतो: “यहुदी लोक रोमी नियंत्रणाखाली अतिशय हट्टी होते आणि गुमास्ते अतिशय हिंसक, क्रूर व बेईमान होते. इ. स. ६६ मध्ये खुल्यारीतीने बंडाळीचा उद्रेक झाला. झीलॉट्‌सनी मसादावर ताबा मिळवला आणि मग मेनाहेमच्या नेतृत्वाखाली जेरुसलेमवर चढाई केली तेव्हा युद्धाला सुरवात झाली. त्याच वेळी शासकाचे अधिपत्य असलेल्या सिझेरियाच्या शहरातील यहुद्यांची कत्तल करण्यात आली व या अघोरी कृत्याची बातमी संपूर्ण राष्ट्रात पसरली. नवीन नाण्यांवर बंडाळीचे एक ते पाच वर्षे कोरण्यात आले.”

६. यहुदी बंडाळीमुळे रोमी सैन्याने कोणता प्रतिसाद दिला?

६ सेस्टीयस गॅलियसच्या अधिकाराखालील बारावे रोमी सैन्याने सीरियापासून कूच करत जाऊन, गॅलिली व ज्यूडियाचा नाश केला आणि मग राजधानीवर हल्ला चढवला, तसेच ‘पवित्र नगर यरुशलेमच्या’ वरील भागावर देखील कब्जा मिळवला. (नहेम्या ११:१; मत्तय ४:५; ५:३५; २७:५३) तेथील घडामोडींचा सारांश देताना, जेरुसलेमवरील रोमी कब्जा (इंग्रजी) हा खंड म्हणतो: “पाच दिवसांपर्यंत रोमी लोकांनी जेरुसलेमच्या भिंतीवर चढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना वारंवार हटवले जात होते. कालांतराने, क्षेपणास्त्रांच्या जोरदार माऱ्‍यांपुढे यहुदी संरक्षकांना हार मानावी लागली. कूर्मव्यूह—स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सामूहिकपणे डोक्यावर ढाली धरून चालण्याची पद्धत—रचून रोमी सैनिकांनी भिंतीखाली सुरुंग लावून फाटकाला आग लावण्याचा प्रयत्न केला. संरक्षक भयंकर घाबरून गेले.” शहराच्या आत असलेल्या ख्रिस्ती लोकांना, ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्र स्थानी उभा आहे या येशूच्या शब्दांची आठवण झाली.a परंतु शहराला वेढा असताना हे ख्रिस्ती लोक येशूने दिलेल्या सूचनेप्रमाणे तेथून पळ कसा काढू शकत होते?

७. सा. यु. ६६ मध्ये जेव्हा रोमी सैन्याला जवळजवळ विजय मिळालाच होता तेव्हा त्यांनी काय केले?

७ इतिवृत्तकार फ्लेवियस जोसीफस सांगतात: “सेस्टीयस [गॅलियसला] कोंढलेल्यांची निराशा किंवा लोकांच्या भावनांची जाणीव नव्हती, त्याने अचानक आपल्या सैनिकांना मागे फिरण्यास सांगितले, त्याचा पराभव झाला नसला तरी त्याने विजयाची आशा सोडून दिली व शहाणपणाच्या विरुद्ध कृती करून शहरातून निघून गेला.” (यहुदी युद्ध, II, ५४० [xix, ७]) गॅलियसने माघार का घेतली? कारण काहीही असो, त्याने माघार घेतल्यामुळे ख्रिस्ती लोक येशूची आज्ञा पाळू शकले व संरक्षणासाठी डोंगरावर पळून जाऊ शकले.

८. जेरुसलेमविरुद्ध रोमी सैन्याच्या प्रयत्नाचा दुसरा टप्पा कोणता होता, व बचावलेल्यांनी काय अनुभवले?

८ आज्ञाधारकता जीवनरक्षक ठरली. लगेचच रोमी सैन्य बंडाळीला जमीनदोस्त करण्यास निघाले. जनरल टायटसच्या अधिकाराखालची मोहिम सा. यु. ७० एप्रिल ते ऑगस्टपर्यंत जेरुसलेमवर झालेल्या हल्ल्याद्वारे समाप्त झाली. यहुद्यांनी कशाप्रकारे छळ सहन केला त्याचे जोसीफस यांनी दिलेले वर्णन रक्‍त गोठवून टाकणारे आहे. रोमी लोकांशी लढत असताना ज्यांची कत्तल करण्यात आली त्यांच्याव्यतिरिक्‍त, प्रतिस्पर्धी यहुद्यांनी इतर यहुद्यांची कत्तल केली आणि उपासमारी इतकी वाढली, की ती नरभक्षणाच्या थराला पोहंचली. रोमी सैन्याला विजय मिळण्याच्या काळापर्यंत ११,००,००० यहुदी बळी पडले होते.b ९७,००० शेषांपैकी काहींना लगेचच मृत्यूदंड देण्यात आला; इतरांना दास म्हणून नेण्यात आले. जोसीफस म्हणतात: “सतरापेक्षा अधिक वयाच्या लोकांना बेड्या घालून सक्‍त मजुरीसाठी ईजिप्तला पाठवण्यात आले, तर टायटसने इतर पुष्कळांना तलवारीने किंवा जंगली श्‍वापदांद्वारे मारून टाकण्यासाठी प्रेक्षकागृहांच्या हवाली केले.” अशा प्रकारे त्यांचा अंतिम परिणाम ठरवत असताना देखील ११,००० कैदी उपासमारीमुळे मृत्युमुखी पडले.

९. यहुद्यांना ज्या परिणामाला तोंड द्यावे लागले त्याचा ख्रिश्‍चनांना का अनुभव घ्यावा लागला नाही, पण कोणते प्रश्‍न बाकी राहतात?

९ ख्रिश्‍चन आभार व्यक्‍त करू शकले असते, की त्यांनी प्रभूने दिलेला इशारा मानला व रोमी सैन्य परतण्याआधी शहराबाहेर ते डोंगरावर पळून गेले. अशाप्रकारे, जेरुसलेमवर “जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही, व पुढे कधीहि येणार नाही असे मोठे संकट” येणार असे येशूने जे सांगितले त्याच्या एका भागापासून ते बचावले. (मत्तय २४:२१) येशूने पुढे म्हटले: “ते दिवस कमी केले नसते तर कोणाहि मनुष्याचा निभाव लागला नसता; परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जातील.” (मत्तय २४:२२) त्या वेळी त्याचा काय अर्थ होता व आता काय आहे?

१०. मत्तय २४:२२ चे विश्‍लेषण आपण आधी कसे दिले आहे?

१० ‘मनुष्यांचा निभाव लागेल’ ही संज्ञा, सा. यु. ७० मध्ये जेरुसलेमवर कोसळलेल्या संकटातून बचावलेल्या यहुद्यांना सूचित होत होती याचे स्पष्टीकरण मागे देण्यात आले होते. ख्रिस्ती जन पळून गेल्यामुळे देव, रोमी सैन्याला त्वरित नाश आणण्यास अनुमती देऊ शकला. म्हणजेच, ‘निवडलेले लोक’ सुरक्षित होते या वस्तुस्थितीमुळे, काही यहुदी ‘मनुष्यांना’ वाचण्याची संधी देऊन संकटाचे दिवस कमी करता आले. तेव्हा असे वाटले, की बचावलेले यहुदी आपल्या दिवसामध्ये येणाऱ्‍या मोठ्या संकटातून वाचणाऱ्‍यांना पूर्वसूचित करत होते.—प्रकटीकरण ७:१४.

११. मत्तय २४:२२ च्या स्पष्टीकरणाचा पुनर्विचार करणे जरूरीचे का वाटते?

११ परंतु हे स्पष्टीकरण, सा. यु. ७० मध्ये जे काही घडले त्याच्या एकवाक्यतेत आहे का? येशूने म्हटले, की या संकटातून ‘मनुष्यांचा निभाव’ लागावयाचा होता. ९७,००० बचावलेल्यांतील हजारो जण लगेचच उपासमारीमुळे मरण पावले किंवा प्रेक्षकागृहात त्यांची कत्तल करण्यात आली या वस्तुस्थितीला ध्यानात ठेवून ‘निभावतील’ या शब्दाचा उपयोग त्यांचे वर्णन करण्याकरता तुम्ही कराल का? सिझेरियातील एका प्रेक्षकागृहाबद्दल जोसीफस सांगतात: “जंगली श्‍वापदांबरोबर, एकमेकांबरोबर झगडत असताना मृत पावलेल्यांची किंवा जिवंत जाळण्यात आलेल्यांची संख्या २,५०० पेक्षा अधिक होती.” जेरुसलेमवर झालेल्या हल्ल्यात ते बळी पडले नसले तरी ते मुळीच ‘निभावले’ नाहीत. शिवाय येशू अशांची तुलना, येणाऱ्‍या ‘मोठ्या संकटातून’ बचावणाऱ्‍या आनंदी उत्तरजीवी लोकांसोबत करील का?

मनुष्ये निभावली—ते कसे?

१२. देवाला ज्यांच्यामध्ये आस्था होती असे पहिल्या शतकातील ‘निवडलेले’ कोण होते?

१२ सा. यु. ७० पर्यंत, देवाने स्वाभाविक यहुद्यांना आपले निवडलेले लोक असे लेखण्याचे सोडून दिले. देवाने त्या राष्ट्राचा त्याग केला व त्याच्या राजधानीचा, मंदिराचा आणि उपासनेच्या व्यवस्थेचा अंत होऊ देण्यास तो परवानगी देणार होता हे येशूने दाखवून दिले. (मत्तय २३:३७–२४:२) देवाने नव्या इस्राएलला अर्थात आध्यात्मिक इस्राएलला निवडले. (प्रेषितांची कृत्ये १५:१४; रोमकर २:२८, २९; गलतीकर ६:१६) हे, सर्व राष्ट्रांतून निवडलेल्या स्त्री पुरुषांनी बनलेले होते ज्यांचा आत्म्याने अभिषेक झाला होता. (मत्तय २२:१४; योहान १५:१९; प्रेषितांची कृत्ये १०:१, २, ३४, ३५, ४४, ४५) सेस्टीयस गॅलियसने हल्ला करण्याच्या काही वर्षांआधी पेत्राने, ‘देवपित्याच्या पूर्वज्ञानानुसार, आत्म्याच्या द्वारे पवित्र झालेल्या निवडलेल्यांना’ लिहिले. हे आत्म्याने अभिषिक्‍त झालेले, “निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र,” होते. (१ पेत्र १:१, २; २:९) देव अशा निवडलेल्यांना येशूबरोबर राज्य करण्यासाठी स्वर्गामध्ये नेणार होता.—कलस्सैकर १:१, २; ३:१२; तीत १:१; प्रकटीकरण १७:१४.

१३. मत्तय २४:२२ मधील येशूच्या शब्दांचा कोणता अर्थ असावा?

१३ निवडलेल्यांची ही ओळख पटणे लाभदायक आहे कारण, संकटाचे दिवस “निवडलेल्यांसाठी” कमी केले जातील, असे येशूने भाकीत केले होते. भाषांतरीत केलेला ग्रीक शब्द ‘साठी’ याचे, “च्या करिता” किंवा “. . .मुळे” असाही अनुवाद केला जाऊ शकतो. (मार्क २:२७; योहान १२:३०; १ करिंथकर ८:११; ९:१०, २३; ११:९; २ तीमथ्य २:१०; प्रकटीकरण २:३) तेव्हा येशू कदाचित, “ते दिवस कमी केले नसते तर कोणाहि मनुष्याचा निभाव लागला नसता; परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जातील,” असे म्हणत असावा.c (तिरपे वळण आमचे.) (मत्तय २४:२२) जेरुसलेममध्ये अडकून राहिलेल्या निवडलेल्या ख्रिश्‍चनांच्या लाभास्तव किंवा त्यांच्या‘साठी’ काही घडले का?

१४. सा. यु. ६६ मध्ये जेव्हा रोमी सैन्याने अचानकपणे माघार घेतली तेव्हा ‘मनुष्यांचा’ निभाव कसा लागला?

१४ आठवण करा, सा. यु. ६६ मध्ये रोमी सैन्य देशात आले, त्यांनी जेरुसलेमच्या वरील भागावर कब्जा मिळवला आणि मग भिंतीखाली सुरुंग लावू लागले. जोसीफस म्हणतात: “जर त्यांनी तो हल्ला आणखी थोड्या वेळासाठी तसाच राहू दिला असता तर लगेचच शहरावर कब्जा मिळवला असता.” स्वतःस विचारा, ‘पण मग, शक्‍तिशाली रोमी सैन्याने अचानकपणे त्यांची मोहीम थांबवून व शहाणपणाच्या विरुद्ध कृती करून शहरातून निघून का जावे बरे?’ सैनिकी इतिहासाचा अर्थ सांगणारे तज्ज्ञ, रुपर्ट फर्नो असे विवेचन मांडतात: “कोणताही इतिवृत्तकार, गॅलियसच्या या विचित्र व हानीकारक निर्णयाचे कसलेही पुरेसे कारण देऊ शकलेला नाही.” कारण काहीही असो, परिणाम असा झाला, की संकटाचे दिवस कमी करण्यात आले. रोमी सैन्य माघारी गेले आणि जात असताना यहुद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. अडकून राहिलेल्या ‘निवडलेल्या’ अभिषिक्‍त ख्रिस्तीजनांचे काय झाले? हल्ला चढवण्याचे थांबवण्यात आले याचा अर्थ, संकटादरम्यान ज्याची भीती होती त्या कोणत्याही कत्तलीपासून त्यांना वाचवण्यात आले होते. यास्तव, सा. यु. ६६ मधील संकटाचे दिवस कमी केल्यामुळे ज्या ख्रिश्‍चनांना लाभ झाला त्यांचा उल्लेख मत्तय २४:२२ मध्ये निभावलेली ‘मनुष्ये’ असा केला आहे.

तुमचे भवितव्य तुमच्यासाठी काय राखून आहे?

१५. आपल्या दिवसांमध्ये मत्तयाचा २४ वा अध्याय आस्थेचा असावा असे तुम्ही का म्हणाल?

१५ कोणी एखादा तुम्हाला विचारेल, ‘येशूच्या शब्दांच्या या स्पष्ट समजुतीमध्ये मी खास आस्था का घ्यावी?’ कारण, सा. यु. ७० पर्यंत आणि त्या दरम्यान जे काही घडले त्याच्या पलिकडे, येशूच्या भविष्यवाणीची अधिक पूर्णता होणार होती, असा निष्कर्ष काढण्यासाठी पुष्कळ कारण आहे.d (पडताळा मत्तय २४:७; लूक २१:१०, ११; प्रकटीकरण ६:२-८.) अनेक दशकांसाठी, यहोवाचे साक्षीदार असा प्रचार करत आले आहेत, की आपल्या काळात होणारी मोठी पूर्णता, लवकरच मोठ्या प्रमाणात होणाऱ्‍या मोठ्या संकटाची आपण अपेक्षा करू शकतो, हे शाबीत करते. त्यादरम्यान, मत्तय २४:२२ मधील भविष्यसूचक शब्दांची पूर्णता कशी होईल?

१६. जवळ येणाऱ्‍या मोठ्या संकटाबद्दल प्रकटीकरण कोणती उत्तेजनपर वस्तुस्थिती पुरवते?

१६ जेरुसलेमवरील संकटाच्या सुमारे दोन दशकांनंतर प्रेषित योहानाने प्रकटीकरणाचे पुस्तक लिहिले. मोठे संकट भवितव्यात येणार असल्याची त्या पुस्तकाने खात्री दिली. आपल्यावर व्यक्‍तिगतपणे काय परिणाम होतो यामध्ये आपल्याला रस असल्यामुळे, या येणाऱ्‍या मोठ्या संकटातून मनुष्ये बचावतील अशी प्रकटीकरण भविष्यसूचकपणे खात्री देते, हे जाणल्यामुळे आपण निश्‍चिंत होऊ शकतो. योहानाने ‘सर्व राष्ट्रे, वंश, लोक व भाषा यांमधून आलेल्या एका मोठ्या लोकसमुदायाबद्दल’ भाकीत केले. हे कोण आहेत? स्वर्गातून एक वाणी उत्तरते: “मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत.” (प्रकटीकरण ७:९, १४) होय, हे उत्तरजीवी असतील! येणाऱ्‍या मोठ्या संकटाच्या वेळी घटना कशा घडतील व मत्तय २४:२२ ची पूर्णता कशी घडेल यावरील सूक्ष्मदृष्टी देखील प्रकटीकरण आपल्याला पुरवते.

१७. मोठ्या संकटाच्या पहिल्या टप्प्यात कशाचा समावेश असेल?

१७ या संकटाच्या पहिल्या टप्प्यात, “मोठी बाबेल” म्हटलेल्या एका लाक्षणिक वेश्‍येवर हल्ला होईल. (प्रकटीकरण १४:८; १७:१, २) ती, खोट्या धर्माच्या विश्‍वव्यापी साम्राज्याला चित्रित करते ज्यामध्ये ख्रिस्ती धर्मजगतावर सर्वात जास्त दोष आहे. प्रकटीकरण १७:१६-१८ मधील शब्दांनुसार देव, या लाक्षणिक वेश्‍येवर हल्ला करण्याची कल्पना राजकीय घटकांच्या अंतःकरणात घालील.e देवाच्या अभिषिक्‍त ‘निवडलेल्यांना’ आणि त्यांच्या सहकार्यांना म्हणजेच ‘मोठ्या लोकसमुदायाला’ तो हल्ला कसा वाटेल याचा विचार करा. धर्मावरील हा नाशकारक हल्ला वाढत जातो तेव्हा तो, सर्व धार्मिक संघटनांचा व यहोवाच्या लोकांचा देखील नाश करील असे कदाचित भासेल.

१८. मोठ्या संकटाच्या पहिल्या टप्प्यादरम्यान कोणाही ‘मनुष्याचा’ निभाव लागणार नाही असे कदाचित का वाटेल?

१८ याच समयी मत्तय २४:२२ मध्ये आढळणाऱ्‍या येशूच्या शब्दांची मोठ्या प्रमाणात पूर्णता होईल. जेरुसलेममधील देवाचे निवडलेले लोक ज्याप्रमाणे संकटात अडकल्यासारखे वाटत होते त्याचप्रमाणे, धर्मावर होणाऱ्‍या हल्ल्यादरम्यान यहोवाच्या सेवकांचा समूळ नाश होण्याचा धोका असल्यासारखे वाटेल, जणू काय तो हल्ला देवाच्या लोकांतील सर्व ‘मनुष्यांचा’ उच्छेद करील. तरीही, मागे सा. यु. ६६ मध्ये काय झाले त्याची आपण आठवण ठेवू या. रोमी सैन्याने आणलेले संकट कमी करण्यात आले ज्यामुळे देवाच्या अभिषिक्‍त जनांना तेथून पळ काढून जिवंत राहण्यासाठी पुष्कळ संधी मिळाली. अशाच प्रकारे, धर्मावर येणाऱ्‍या नाशकारक हल्ल्याला, खऱ्‍या उपासकांच्या विश्‍वव्यापी मंडळीचा नाश करण्याची परवानगी दिली जाणार नाही याची आपण खात्री बाळगू शकतो. ते लागलीच, म्हणजे जणू काय “एका दिवशीच” होईल. त्या हल्ल्याचे दिवस कमी करण्यात येतील आणि तरीसुद्धा त्याला आपला उद्देश साध्य करण्याची अनुमती दिली जाणार नाही, जेणेकरून देवाच्या लोकांचा बचाव होऊ शकतो.—प्रकटीकरण १८:८.

१९. (अ) मोठ्या संकटाच्या पहिल्या भागानंतर काय स्पष्ट होईल? (ब) त्यामुळे काय होईल?

१९ त्यानंतर दियाबल सैतानाच्या पार्थिव संघटनेचे इतर घटक, त्यांच्या जुन्या धार्मिक जारिणीसोबतच्या व्यवहाराच्या हानीवर दुःख करीत काही काळ राहतील. (प्रकटीकरण १८:९-१९) एका विशिष्ट समयी ते, देवाच्या सेवकांना ‘निर्भयपणे राहत असल्याचे, कोणालाही कोट नसल्याचे’ पाहतील व ते अगदी सहज भक्ष्य आहेत असे त्यांना भासेल. परंतु, त्यांच्याकरता एक धक्कादायक गोष्ट राखून ठेवलेली आहे! देवाच्या सेवकांविरुद्धच्या वास्तविक किंवा भयजनक आक्रमणाला प्रतिसाद देताना तो मोठ्या संकटाच्या शेवटल्या टप्प्यात त्याच्या शत्रूंचा न्याय करण्यास उठेल.—यहेज्केल ३८:१०-१२, १४, १८-२३.

२०. मोठ्या संकटाचा दुसरा टप्पा देवाच्या लोकांना धोक्यात का घालणार नाही?

२० मोठ्या संकटाचा हा दुसरा टप्पा, सा. यु. ७० मध्ये रोमी सैन्याने जेरुसलेम आणि तिच्या रहिवाश्‍यांवर केलेल्या दुसऱ्‍या हल्ल्याच्या समांतरात असेल. ते, “जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही, व पुढे कधीहि येणार नाही असे मोठे संकट” ठरेल. (मत्तय २४:२१) परंतु, आपण याची पूर्ण खात्री बाळगू शकतो की देवाचे निवडलेले लोक आणि त्यांचे सहकारी संकट-क्षेत्रात नसतील, त्यांना ठार होण्याची भीती नसेल. पण त्यांना कोणत्याही भौगोलिक ठिकाणी पळून जावे लागणार नाही. जेरुसलेममधील पहिल्या शतकातील ख्रिस्ती जॉर्डनपलिकडे असलेल्या पेल्ला नावाच्या डोंगर क्षेत्रात पळून जाऊ शकत होते. पण भवितव्यामध्ये देवाचे विश्‍वासू साक्षीदार संपूर्ण विश्‍वभरात असतील, यास्तव सुरक्षितता व संरक्षण हे भौगोलिक ठिकाणावर अवलंबून नसेल.

२१. शेवटल्या लढाईत कोण लढेल, व त्याचा परिणाम काय होईल?

२१ हा नाश रोमच्या सैन्याद्वारे किंवा इतर कोणत्याही मानवी माध्यमाद्वारे नसेल. त्याऐवजी, अंमलबजावणी करणारे सैन्य स्वर्गातील असेल असे प्रकटीकरणाचे पुस्तक वर्णन करते. होय, मोठ्या संकटाचा तो शेवटला भाग कोणत्याही मानवी सैन्याद्वारे नव्हे तर, “देवाचा शब्द,” राजा येशू ख्रिस्त ‘स्वर्गातील सैन्य’ तसेच पुनरुत्थित अभिषिक्‍त ख्रिस्ती यांच्या मदतीने पार पाडला जाईल. “प्रभूंचा प्रभु आणि राजांचा राजा,” सा. यु. ७० मध्ये रोमी सैन्याने आणलेल्या न्यायदंडापेक्षा कितीतरी पटीने पूर्ण स्वरुपाचा न्यायदंड बजावेल. तो, देवाचे सर्व मानवी विरोधक—राजे, सैनिकी कमांडर, स्वतंत्र नागरिक व दास, लहान व थोर या सर्वांचा समूळ नाश करील. सैतानी जगाच्या मानवी संघटनांना देखील धुळीस मिळवले जाईल.—प्रकटीकरण २:२६, २७; १७:१४; १९:११-२१; १ योहान ५:१९.

२२. आणखी कोणत्या अर्थाने ‘मनुष्ये’ बचावली जातील?

२२ संकटाच्या पहिल्या टप्प्यात मोठ्या बाबेलचा जलदगतीने व पूर्णपणे नाश होईल तेव्हा अभिषिक्‍त शेषांतील आणि ‘मोठ्या लोकसमुदायातील’ ‘मनुष्यांचा,’ निभाव आधीच लागलेला असेल याची आठवण करा. त्याचप्रमाणे, संकटाच्या शेवटल्या टप्प्यात, यहोवाच्या बाजूने आलेल्या ‘मनुष्यांचा’ निभाव लागेल. सा. यु. ७० मधील बंडखोर यहुद्यांवर जे अनिष्ट कोसळले त्याच्या हे किती विपरीत असेल!

२३. बचावणारी ‘मनुष्ये’ आणखी कशाची वाट पाहू शकतात?

२३ तुमच्या व तुमच्या प्रियजनांच्या भवितव्याच्या शक्यतांचा विचार करताना प्रकटीकरण ७:१६, १७ मध्ये काय अभिवचन देण्यात आले आहे ते जरा पाहा: “ते ह्‍यापुढे भुकेले असे होणार नाहीत, व तान्हेलेहि होणार नाहीत; त्यास सूर्य किंवा कोणतीहि उष्णता बाधणार नाही; कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्‍याजवळ नेईल; आणि देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील.” निश्‍चितच विस्मयकारक, चिरकाल अर्थाने त्यास ‘निभावणे’ असे म्हटले जाऊ शकते.

[तळटीपा]

a टेहळणी बुरूज जून १, १९९६, पृष्ठे १४-१९ पाहा.

b जोसीफस म्हणतात: “टायटसने जेव्हा शहरात प्रवेश केला तेव्हा त्या शहराची बळकटता पाहून तो चाट पडला . . . त्याने मोठ्याने असे म्हटले: ‘देव आमच्या बाजूने आहे; या किल्लेकोटांतून देवानेच यहुद्यांना आमच्या हाती दिले; कारण अशा बुरुजांविरुद्ध मानवी हात किंवा शस्त्र काय करू शकले असते?’”

c मनोवेधक गोष्ट अशी, की शेम-टोब यांचा मत्तय २४:२२ चा पाठ, अवूर हा इब्री शब्द वापरतो, ज्याचा अर्थ “च्या करिता, साठी, जेणेकरून,” असा होतो.—आधीचा लेख पाहा, पृष्ठ १३.

d टेहळणी बुरुज फेब्रुवारी १, १९९४, पृष्ठे २१ आणि २२ तसेच पृष्ठे २४ व २५ वरील मत्तय २४ वा अध्याय, मार्क १३ वा अध्याय व लूक २१ वा अध्याय यांत सापडणाऱ्‍या येशूच्या भविष्यसूचक उत्तराला समानांतर रकान्यांमध्ये दाखवणारा तक्‍ता पाहा.

e वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ इंडियाने प्रकाशित केलेल्या प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे! पुस्तकातील पृष्ठे २३५-५८ पहा.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

◻ रोमी सैन्याने जेरुसलेमवर केलेल्या हल्ल्याचे कोणते दोन टप्पे होते?

◻ सा. यु. ७० मध्ये बचावलेले ९७,००० यहुदी मत्तय २४:२२ मध्ये उल्लेखलेली ‘मनुष्ये’ आहेत हे असंभवनीय का आहे?

◻ कशाप्रकारे जेरुसलेमवरील संकटाचे दिवस कमी करण्यात आले व त्यामुळे ‘मनुष्ये’ कशी बचावण्यात आली?

◻ येणाऱ्‍या मोठ्या संकटाचे दिवस कसे कमी करण्यात येतील व ‘मनुष्ये’ कसे निभावतील?

[१६ पानांवरील चित्रं]

बंडाळीनंतर बनवलेले नाणे. त्यावरील इब्री अक्षरे “वर्ष दोन” असे म्हणतात, याचा अर्थ त्यांच्या स्वायत्ततेचे दुसरे वर्ष, अर्थात सा. यु. ६७

[१७ पानांवरील चित्रं]

सा. यु. ७१ मध्ये बनवलेले रोमी नाणे. डाव्या बाजूला सशस्त्र रोमी सैनिक; उजव्या बाजूला शोक करणारी एक यहुदी स्त्री. त्यावरील “युदीअ काप्ट” या शब्दाचा अर्थ “बंदिस्त ज्युडिया”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा