“मोठे संकट” येण्याआधी सुरक्षित स्थानाकडे पलायन
“यरुशलेमेस सैन्यांचा वेढा पडत आहे असे पाहाल तेव्हा . . . यहूदीयांत असतील त्यांनी डोंगरात पळून जावे.”—लूक २१:२०, २१.
१. अद्याप जगाचा भाग असलेल्यांकरता पलायन करणे निकडीचे का आहे?
सैतानाच्या जगाचा भाग असणाऱ्या सर्वांकरता पळ काढणे निकडीचे आहे. सद्य व्यवस्थीकरणाचा पृथ्वीवरून नायनाट केला जाईल तेव्हा त्यांना वाचायचे असल्यास, खंबीरपणे यहोवाच्या बाजूने आपली भूमिका घेतल्याचा व सैतान ज्या जगाचा शासक आहे त्याचा भाग नसल्याचा खात्री पटण्याजोगा पुरावा त्यांनी दिला पाहिजे.—याकोब ४:४; १ योहान २:१७.
२, ३. मत्तय २४:१५-२२ येथे नमूद केलेल्या येशूच्या शब्दांसंबंधाने आपण कोणत्या प्रश्नांची चर्चा करणार आहोत?
२ व्यवस्थीकरणाच्या समाप्तीविषयी असलेल्या मोठ्या भविष्यवाणीत, येशूने अशा पलायनाच्या महत्त्वपूर्ण गरजेवर जोर दिला. आपण वारंवार मत्तय २४:४-१४ येथे नमूद केलेल्या गोष्टींची चर्चा करतो; तरीही, त्यानंतर जे काही लिहिले आहे ते काही कमी महत्त्वाचे नाही. आम्ही तुम्हाला आता तुमचे बायबल उघडण्याचे व १५ ते २२ वचने वाचण्याचे उत्तेजन देतो.
३ त्या भविष्यवाणीचा काय अर्थ आहे? पहिल्या शतकात, “ओसाडीचा अमंगळ पदार्थ” कोणता होता? तो “पवित्रस्थानात” असल्याने काय चित्रित होते? त्या घडामोडीचे आपल्याकरता काय महत्त्व आहे?
“वाचकाने हे ध्यानात आणावे”
४. (अ) यहुद्यांनी मशीहाला नाकारल्यावर काय घडणार असे दानीएल ९:२७ मध्ये सांगितले होते? (ब) याचा संदर्भ देताना, “वाचकाने हे ध्यानात आणावे” असे स्पष्टतः येशूने का म्हटले?
४ मत्तय २४:१५ येथे, दानीएलाच्या पुस्तकात जे काही लिहिले होते त्याचा संदर्भ येशूने घेतला याकडे लक्ष पुरवा. त्या पुस्तकाच्या ९ व्या अध्यायात मशीहाचे येणे व त्याला नाकारल्यामुळे यहुदी राष्ट्रावर येणारा न्यायदंड यांचे भाकीत करणारी एक भविष्यवाणी आहे. २७ वचनाच्या उत्तरार्धात असे म्हटले आहे: “उध्वस्त करणारा अमंगलांच्या पंखांवर आरूढ होऊन येईल.” (तिरपे वळण आमचे.) प्रारंभिक यहुदी परंपरेने, दानीएलाच्या त्या भविष्यवाणीच्या भागाला, सा. यु. पू. दुसऱ्या शतकात चवथ्या एंटिओकसने केलेल्या जेरूसलेममधील यहोवाच्या मंदिराच्या दूषितीकरणास लागू केले. परंतु येशूने इशारा दिला: “वाचकाने हे ध्यानात आणावे.” चवथ्या एंटिओकसने मंदिर अपवित्र केले हे निश्चितच अमंगळ असले, तरी त्यामुळे जेरूसलेम, त्याचे मंदिर किंवा यहुदी राष्ट्र उद्ध्वस्त झाले नाही. अशाप्रकारे, याची पूर्णता गतकाळात नसून अद्याप भविष्यकाळात होणार होती असा सावधगिरीचा इशारा येशू स्पष्टतः त्याच्या ऐकणाऱ्यांना देत होता.
५. (अ) शुभवर्तमानांच्या अहवालांची तुलना केल्याने पहिल्या शतकातील ‘अमंगळ पदार्थाची’ ओळख पटण्यात आपली मदत कशी होऊ शकते? (ब) सेस्टीयस गॉलसने सा. यु. ६६ मध्ये जेरूसलेम येथे रोमन सैन्य त्वरित का आणले?
५ त्यांना ज्या ‘अमंगळ पदार्थावर’ लक्ष ठेवायचे होते तो कोणता होता? मत्तयचा अहवाल, “ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्रस्थानात उभा असलेला तुम्ही पाहाल” असे म्हणतो हे उल्लेखनीय आहे. (तिरपे वळण आमचे.) तथापि, लूक २१:२० मधील समांतर अहवाल म्हणतो: “यरुशलेमेस सैन्यांचा वेढा पडत आहे असे पाहाल तेव्हा ती ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे असे समजा.” (तिरपे वळण आमचे.) सा. यु. ६६ मध्ये, येशूने जे भाकीत केले होते ते जेरूसलेममध्ये राहणाऱ्या ख्रिश्चनांनी पाहिले. यहुदी व रोमन अधिकाऱ्यांमधील काही परस्पर विरोधी घटनांमुळे, जेरूसलेम रोमविरुद्ध बंड करण्याचे अनुकूल स्थान बनले. परिणामस्वरूप, यहूदीया, शोमरोन, गालील, देकापलीस आणि फेनिके, तसेच सीरियाच्या उत्तर भागात व इजिप्तच्या दक्षिण भागापर्यंत हिंसा भडकली. रोमन साम्राज्याच्या त्या भागात थोडीबहुत शांती पुनर्स्थापित करण्यासाठी, सेस्टीयस गॉलसने त्याचे लष्करी सैन्य सीरियामधून जेरूसलेम येथे त्वरित आणले ज्यास यहुदी लोक “पवित्र नगर” समजत होते.—नहेम्या ११:१; यशया ५२:१.
६. ओसाडीचा “अमंगळ पदार्थ” “पवित्रस्थानात उभा” राहिला ते कसे खरे होते?
६ रोमन लष्कराने निशाण अथवा ध्वज घेऊन जाणे सामान्य होते, ज्यास ते पवित्र समजत; परंतु यहुदी मात्र त्यास मूर्तिपूजक समजत असत. मनोरंजक गोष्ट अशी, की दानीएलाच्या पुस्तकात “अमंगळ पदार्थ” असा भाषांतरित केलेला इब्री शब्द प्रामुख्याने मूर्ती व मूर्तिपूजा यासंबंधाने वापरण्यात येतो.a (अनुवाद २९:१७) यहुद्यांनी प्रतिकार केला असतानाही, रोमन सैन्य आपल्या मूर्तिपूजक ध्वजांसह सा. यु. ६६ च्या नोव्हेंबरमध्ये जेरूसलेमात शिरले, व उत्तरेकडून मंदिराच्या भिंतीला धोका उत्पन्न करू लागले. यात काहीच शंका नव्हती की—जेरूसलेमला पूर्णतः उद्ध्वस्त करू शकणारा “अमंगळ पदार्थ” “पवित्रस्थानात उभा” होता! परंतु कोणालाही पळ काढणे कसे शक्य होते?
पलायन निकडीचे होते!
७. रोमन सैन्याने अनपेक्षितपणे काय केले?
७ अचानकपणे व मानवी दृष्टिकोनातून कोणतेही स्पष्ट कारण नसताना, जेरूसलेमवर सरशी करणे अतिशय सोपे आहे असे आढळल्यावर रोमी सैन्य मागे फिरले. यहुदी राजद्रोही लोकांनी माघारी जाणाऱ्या रोमी सैन्याचा जेरूसलेमपासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावरील अंतिपत्रिसापर्यंतच पिच्छा केला. त्यानंतर, ते मागे परतले. जेरूसलेममध्ये आल्यावर, पुढील लष्करी डावपेच आखण्यासाठी ते मंदिरात एकत्र झाले. तटबंदीला अधिक बळकट करण्यास व लष्करात सेवा करण्यास युवकांची भरती करण्यात आली. ख्रिस्ती यात गोवले जाणार होते का? ती टाळल्यावरही, रोमी सैन्य परतल्यावर ते धोक्याच्या क्षेत्रातच असणार होते का?
८. येशूच्या भविष्यसूचक शब्दांच्या अनुषंगाने ख्रिश्चनांनी कोणती तत्परतेची कार्यहालचाल केली?
८ जेरूसलेम व सर्व यहुदीयातील ख्रिश्चनांनी, येशू ख्रिस्ताने दिलेल्या भविष्यसूचक इशाऱ्यानुसार हालचाल केली व धोक्याच्या क्षेत्रामधून पळ काढला. पलायन निकडीचे होते! ते, उशीर होण्यापूर्वी डोंगराळ भागात गेले, व त्यातील काहीजण, बहुतेक पेरियाच्या प्रांतातील पेल्ला येथे स्थाईक झाले. ज्यांनी येशूचा इशारा मनावर घेतला ते आपली भौतिक मालमत्ता वाचवण्याच्या प्रयत्नात मूर्खपणाने मागे फिरले नाही. (पडताळा लूक १४:३३.) त्या परिस्थितीत निघून जाताना गर्भवती स्त्रियांना व अंगावर पाजणाऱ्या मातांना पायी प्रवास करणे निश्चितच कठीण वाटले. शब्बाथाच्या दिवसाच्या निर्बंधांमुळे त्यांचे पलायन थांबले नाही, आणि हिवाळा जवळ येऊन ठेपला असला, तरी तो अद्याप सुरू झालेला नव्हता. तातडीने पलायन करण्याचा येशूचा इशारा ज्यांनी मनावर घेतला ते लवकरच जेरूसलेम व यहूदीयाच्या क्षेत्राबाहेर सुरक्षित स्थानी पोहंचले होते. त्यांचे जीव यावरच अवलंबून होते.—पडताळा याकोब ३:१७.
९. रोमन सैन्य किती लवकर परतले, व त्याचा काय परिणाम झाला?
९ त्यानंतरच्या वर्षी लगेचच, म्हणजे सा. यु. ६७ मध्ये रोमन लोकांनी यहुद्यांविरुद्ध युद्धविषयक हालचालींचे नविनीकरण केले. पहिल्यांदा, गालीलावर कब्जा करण्यात आला. त्याच्या पुढील वर्षी, यहूदीयाला उद्ध्वस्त करण्यात आले. सा. यु. ७० या सालापर्यंत, रोमन सैन्याने खुद्द जेरूसलेमला घेरले. (लूक १९:४३) अत्यंत कडक दुष्काळ पडला. शहरात अडकलेल्यांनी एकमेकांवर हल्ला चढविला. पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची कत्तल करण्यात आली. त्यांनी जे अनुभवले ते येशूने म्हटल्याप्रमाणे “मोठे संकट” होते.—मत्तय २४:२१.
१०. ध्यानात ठेवून वाचन केल्यास आपण आणखी कशाची नोंद घेऊ?
१० यामुळे, येशूने जे भाकीत केले ते सर्वतोपरी पूर्ण झाले का? नाही, याहून अधिक घडणे बाकी होते. येशूने सल्ला दिल्याप्रमाणे, आपण ध्यानात ठेवून शास्त्रवचने वाचली, तर पुढे काय घडणार आहे त्याची नोंद घेण्याकडे आपण दुर्लक्ष करणार नाही. त्या शास्त्रवचनांचा आपल्या स्वतःच्या जीवनात काय अर्थ होतो याबद्दलही आपण गांभिर्याने विचार करू.
आधुनिक दिवसातील “अमंगळ पदार्थ”
११. दानीएल इतर कोणत्या दोन उताऱ्यांमध्ये ‘अमंगळ पदार्थाचा’ संदर्भ देतो, व तेथे कोणत्या काळाबद्दल चर्चा केली जात आहे?
११ आपण दानीएल ९:२७ मध्ये जे पाहिले त्या व्यतिरिक्त दानीएल ११:३१ व १२:११ मध्ये “ओसाडीचा अमंगळ पदार्थ” याचे आणखी संदर्भ दिले आहेत. या नंतरच्या एकाही अहवालात जेरूसलेमच्या विनाशाची चर्चा करण्यात आलेली नाही. खरे म्हणेज, दानीएल १२:११ मध्ये जे म्हटले आहे, ते ‘अंतसमयाच्या’ संदर्भाच्या केवळ दोन वचनांनंतरच आढळते. (दानीएल १२:९) आपण १९१४ पासून अशाच एका समयात जगत आहोत. यास्तव, आधुनिक दिवसातील ‘ओसाडीच्या अमंगळ पदार्थाला’ ओळखण्यास आपण जागृत असले पाहिजे व आपण धोक्याच्या क्षेत्रातून बाहेर पडण्याविषयी खात्रीशीर असले पाहिजे.
१२, १३. राष्ट्र संघ आधुनिक दिवसांतील “अमंगळ पदार्थ” असल्याचे वर्णन करणे उचित का आहे?
१२ आधुनिक दिवसातील तो “अमंगळ पदार्थ” काय आहे? पुरावा, राष्ट्र संघाकडे अंगुली दर्शवतो, जो १९२० पासून जगाने अंत समयात पदार्पण केल्यानंतर लगेचच क्रियाशील झाला. परंतु ते, “ओसाडीचा अमंगळ पदार्थ” कसे असू शकते?
१३ लक्षात घ्या, की “अमंगळ पदार्थ” यासाठी असलेला इब्री शब्द बायबलमध्ये प्रामुख्याने मूर्ती अथवा मूर्तिपूजक चालीरीती यांच्या संदर्भात वापरला आहे. लीगची मूर्तिपूजा करण्यात आली होती का? होय, निश्चितच! पाळकांनी त्यास ‘पवित्रस्थानी’ ठेवले व त्यांच्या अनुयायांनी त्यास उत्साहाने भक्ती बहाल केली. अमेरिकेतील ख्रिस्ताचे चर्च याच्या संघ परिषदेने, लीग “पृथ्वीवरील देव राज्याची राजकीय अभिव्यक्ती” असेल असे घोषित केले. संयुक्त संस्थानांच्या अधिसभेत, राष्ट्रांच्या लीगचा करार ठाम करण्यास आवर्जून सांगण्याकरता धार्मिक गटांकडून भरमसाट टपाल मिळाले. ब्रिटनमधील बॅप्टिस्ट, काँग्रीगेशनलीस्ट व प्रेस्बिटेरियन यांच्या अधिमंडळाने, “[पृथ्वीवर शांती] साध्य करण्यासाठी उपलब्ध असलेले एकमेव साधन” असे म्हणून त्याची स्तुती केली.—प्रकटीकरण १३:१४, १५ पाहा.
१४, १५. लीग व नंतर संयुक्त राष्ट्र “पवित्रस्थानात” कसे उभे राहिले?
१४ देवाचे मशीही राज्य १९१४ साली स्वर्गात स्थापन झाले होते, पण राष्ट्रे आपल्याच सार्वभौमत्वासाठी झगडत राहिले. (स्तोत्र २:१-६) राष्ट्र संघ प्रस्तुत करण्यात आले, तेव्हा नुकतेच पहिल्या महायुद्धात लढलेल्या राष्ट्रांनी तसेच आपल्या सैन्याला आशीर्वाद दिलेल्या पाळकांनी आधीच देवाच्या नियमाचा त्याग केल्याचे प्रदर्शित केले होते. ते ख्रिस्ताला राजा म्हणून मानत नव्हते. अशाप्रकारे, त्यांनी देव राज्याची भूमिका एका मानवी संघटनेला नेमून दिली; त्यांनी राष्ट्र संघाला “पवित्रस्थानात” ठेवले, व पात्र नसलेले स्थान त्यास देऊ केले.
१५ लीगचा उत्तराधिकारी या नात्याने संयुक्त राष्ट्र ऑक्टोबर २४, १९४५ मध्ये अस्तित्वात आले. नंतर, रोमच्या पोपने “सुसंगतता व शांती यांची अंतिम आशा” आणि “शांती व न्याय यांचे सर्वश्रेष्ठ माध्यम” असे संयुक्त राष्ट्राचे स्वागत केले. होय, राष्ट्र संघ व त्यासोबत त्याचा उत्तराधिकारी संयुक्त राष्ट्र हे देवाच्या व त्याच्या लोकांच्या नजरेत खरोखरच मूर्ती, अर्थात “अमंगळ पदार्थ” बनले.
कशामधून पलायन?
१६. आज नीतिमत्त्वतेच्या चाहत्यांनी कशामधून पळ काढणे आवश्यक आहे?
१६ त्यास ‘पाहिल्यावर,’ ती आंतरराष्ट्रीय संघटना काय आहे व तिची पूजा कशी केली जाते हे जाणल्यावर धार्मिकतेच्या चाहत्यांनी सुरक्षित स्थानी पलायन केले पाहिजे. कशामधून पलायन? अविश्वासू जेरूसलेमचा आधुनिक प्रतिनमुना, म्हणजेच, ख्रिस्ती धर्मजगतातून व खोट्या धर्माची जागतिक व्यवस्था, अर्थात संपूर्ण मोठ्या बाबेलीतून पलायन.—प्रकटीकरण १८:४.
१७, १८. आधुनिक दिवसांतील ‘अमंगळ पदार्थामुळे’ कोणती उद्ध्वस्तता होईल?
१७ पहिल्या शतकात, मूर्तिपूजक ध्वजांसहित रोमन सैन्याने यहुद्यांच्या पवित्र नगरात प्रवेश केला तेव्हा ते जेरूसलेम व त्याच्या उपासनेच्या व्यवस्थेला उद्ध्वस्त करण्यास तेथे आले होते, हे देखील आठवा. आपल्या दिवसांत, ही उद्ध्वस्तता मात्र एकाच शहरावर, अथवा केवळ ख्रिस्ती धर्मजगतावरच नव्हे, तर खोट्या धर्माच्या सबंध जागतिक व्यवस्थेवर येणार आहे.—प्रकटीकरण १८:५-८.
१८ प्रकटीकरण १७:१६ येथे, किरमिजी रंगाचे लाक्षणिक श्वापद, जे संयुक्त राष्ट्र असल्याचे सिद्ध झाले आहे ते वेश्यासमान मोठ्या बाबेलीवर उलटून तिचा हिंसकरित्या नाश करील. डोळ्यासमोर चित्र उभे करणाऱ्या भाषेत, ते म्हणते: “जी दहा शिंगे व जे श्वापद तू पाहिले ती कलावंतिणीचा द्वेष करितील व तिला ओसाड व नग्न करितील, तिचे मांस खातील व तिला अग्नीत जाळून टाकतील.” याचा काय अर्थ होईल त्याचा विचार करणे भयप्रेरक आहे. पृथ्वीवरील सर्व भागांतील प्रत्येक प्रकारच्या खोट्या धर्माचा अंत करण्यात ते परिणीत होईल. ते, मोठ्या संकटाची सुरवात झाल्याचे निश्चितच दाखवेल.
१९. संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेनंतर कोणते घटक त्याचे भाग बनले आहेत व हे महत्त्वपूर्ण का आहे?
१९ संयुक्त राष्ट्र १९४५ मध्ये क्रियाशील झाले तेव्हापासून नास्तिकवादी, धर्मविरोधी घटक आपल्या सदस्यपदावर अग्रभागी राहिले आहेत ही लक्षवेधक गोष्ट आहे. सबंध जगभरात वेगवेगळ्या समयी, असे आमूलाग्र घटक धार्मिक चालीरीतींवर एकतर कडक निर्बंध घालण्यास किंवा पूर्णपणे बंदी आणण्यास कारणीभूत ठरले आहेत. तथापि, गेल्या काही वर्षांमध्ये, अनेक ठिकाणी धार्मिक गटांवरील सरकारकडील दबाव कमी झाला आहे. धर्माला असणारा सर्व धोका नाहीसा झाल्याचे काही लोकांना भासेल.
२०. जगाच्या धर्मांनी स्वतःकरता कोणते नाव मिळवले आहे?
२० मोठ्या बाबेलचे धर्म जगामध्ये भंग करणारी हिंसक शक्ती आहे. बहुधा, वृत्तपत्रातील ठळक मथळे युद्ध करणाऱ्या गटांची व अतिरेक्यांच्या टोळींची ओळख, त्यांनी अंगीकारलेल्या धर्माच्या उल्लेखाद्वारे करतात. दंगे होणाऱ्या ठिकाणी कार्य करणाऱ्या पोलिसांना आणि सैनिकांना प्रतिद्वंद्वी धार्मिक गटांमधील हिंसा रोखण्यासाठी जबरदस्तीने मंदिरांमध्ये शिरकाव करावा लागला आहे. धार्मिक मंडळांनी राजकीय क्रांतीला पैसा पुरवला आहे. धार्मिक द्वेषामुळे, जातीय गटांमध्ये स्थिर नातेसंबंध राखण्याचे संयुक्त राष्ट्राचे प्रयत्न फोल ठरले आहेत. शांती व सुरक्षिततेचे ध्येय गाठताना, संयुक्त राष्ट्रातील घटकांनाच, त्यांच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही धार्मिक प्रभावाचा नायनाट झाल्याचे पाहण्यास आवडेल.
२१. (अ) मोठ्या बाबेलचा नाश केव्हा करावयाचा आहे हे कोण ठरवील? (ब) त्याआधी काय करणे निकडीचे आहे?
२१ विचारात घेण्याजोगा दुसराही एक महत्त्वपूर्ण घटक आहे. संयुक्त राष्ट्रातील लष्करी शिंगाचा उपयोग मोठ्या बाबेलचा नाश करण्यास केला जाईल, तरी तो नाश ईश्वरी न्यायदंडाची अभिव्यक्ती असेल. न्यायदंडाची अंमलबजावणी देवाच्या नियुक्त समयी होईल. (प्रकटीकरण १७:१७) या दरम्यान आपण काय केले पाहिजे? “तिच्यामधून निघा”—मोठ्या बाबेलमधून निघा—असे बायबल उत्तर देते.—प्रकटीकरण १८:४.
२२, २३. अशा पलायनामध्ये काय गोवलेले आहे?
२२ हे सुरक्षित ठिकाणचे पलायन, जेरूसलेम सोडून गेल्यावर यहुदी ख्रिश्चनांनी केले त्याप्रमाणे भौगोलिक स्थानांतर नव्हे. तर ते ख्रिस्ती धर्मजगताच्या धर्मांतून, होय, मोठ्या बाबेलच्या कोणत्याही भागातून करण्याचे पलायन आहे. त्याचा अर्थ, खोट्या धार्मिक संघटनांमधून स्वतःला पूर्णपणे वेगळे करणे इतकेच नव्हे, तर त्यांच्या रूढी व त्यांच्यामधून निर्माण होणाऱ्या आत्म्यापासून स्वतःला वेगळे करणे होय. ते यहोवाच्या ईश्वरशासित संघटनेमधील सुरक्षित स्थानी करण्याचे पलायन आहे.—इफिसकर ५:७-११.
२३ यहोवाच्या अभिषिक्त सेवकांना, पहिल्या महायुद्धानंतर, आधुनिक दिवसांतील अमंगळ पदार्थ, अर्थात राष्ट्र संघ याची प्रथम ओळख पटली तेव्हा साक्षीदारांची प्रतिक्रिया काय होती? त्यांनी आधीच ख्रिस्ती धर्मजगताच्या चर्चमधून त्यांचे सदस्यत्व काढून घेतले होते. परंतु, ते अद्याप ख्रिस्ती धर्मजगताच्या काही चालीरीती व रूढी जसे की, क्रुसाचा वापर आणि नाताळ तसेच इतर मूर्तिपूजक सुट्या पाळणे यांचे अनुसरण करत होते, असे त्यांना कालांतराने समजले. त्यांना या गोष्टींचे सत्य समजले तेव्हा त्यांनी तत्परतेने कार्य केले. यशया ५२:११ येथील सल्ला त्यांनी अनुसरला, जेथे म्हटले आहे: “निघा, निघा, तेथून निघून जा; अशुद्ध वस्तूला शिवू नका; त्याच्यामधून निघून जा; परमेश्वराची पात्रे वाहणाऱ्यांनो, तुम्ही आपणांस शुद्ध करा.”
२४. विशेषतः १९३५ पासून या पलायनात कोण सामील झाले आहेत?
२४ विशेषतः १९३५ पासून, इतरजणांचा वाढता समूह, ज्यांनी परादीस पृथ्वीवर अनंतकाळ जगण्याचे भवितव्य स्वीकारले ते अशाचप्रकारची कार्यहालचाल करू लागले. त्यांनी देखील ‘पवित्रस्थानात उभा असलेला अमंगळ पदार्थ पाहिला आहे’ व त्याचा काय अर्थ होतो हे त्यांना कळते. पळ काढण्याचा निर्णय घेतल्यावर, त्यांनी मोठ्या बाबेलचा भाग असणाऱ्या संघटनांमधील सदस्यत्वाच्या याद्यांमधून आपली नावे काढून टाकली आहेत.—२ करिंथकर ६:१४-१७.
२५. खोट्या धर्माशी एखाद्या व्यक्तीचे जे काही संबंध असतील ते संपुष्टात आणण्याखेरीज आणखी काय करणे जरूरीचे आहे?
२५ परंतु, मोठ्या बाबेलमधून पळ काढण्यामध्ये खोट्या धर्माचा त्याग करण्यापेक्षा अधिक काही समाविष्ट आहे. राज्य सभागृहातील एखाद दुसऱ्या सभांना उपस्थित राहणे किंवा महिन्यातून एकदा-दोनदा क्षेत्र सेवेत सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी बाहेर पडणे यापेक्षाही अधिक काही यात गोवलेले आहे. एखादा, मोठ्या बाबेलमधून शारीरिकरित्या बाहेर निघालेला असेल पण त्याने खरोखरच तिला सोडून दिले आहे का? मोठी बाबेल ज्या दुनियेचा प्रमुख भाग आहे त्या दुनियेतून त्याने स्वतःला अलिप्त केले आहे का? तिचा आत्मा—देवाच्या धार्मिक दर्जांचा अव्हेर करणारा आत्मा प्रदर्शित करणाऱ्या त्या गोष्टींना तो अद्यापही बिलगून राहतो काय? तो लैंगिक नैतिकता व वैवाहिक विश्वासूपणा यांकडे दुर्लक्ष करीत आहे का? तो आध्यात्मिक हितांपेक्षा व्यक्तिगत व भौतिक हितांवर अधिक जोर देतो का? त्याने स्वतःला या व्यवस्थीकरणाबरोबर समरूप होऊ देऊ नये.—मत्तय ६:२४; १ पेत्र ४:३, ४.
कोणत्याही गोष्टीला तुमच्या पलायनामधील अडथळा होऊ देऊ नका!
२६. आपल्याला, मात्र पलायन सुरू करण्यास नव्हे, तर ते यशस्वीपणे पूर्ण करण्याकरता काय मदत करील?
२६ सुरक्षित स्थानी पलायन करण्यामध्ये, मागे सोडलेल्या गोष्टींची इच्छा करू नये हे अत्यंत जरूरीचे आहे. (लूक ९:६२) आपल्याला देवाचे राज्य व त्याच्या नीतिमत्त्वतेवर आपली मने व अंतःकरणे केंद्रित करून ठेवण्याची गरज आहे. यहोवा आपल्या अशा विश्वासू मार्गक्रमणाला आशीर्वादित करील अशा भरवशासह या गोष्टी मिळवण्यास झटून विश्वास प्रदर्शित करण्याचा आपला निर्धार आहे का? (मत्तय ६:३१-३३) जगामधील महत्त्वपूर्ण घटना उलगडण्याची आपण उत्सुकतेने वाट पाहत असताना, शास्त्रवचनांवर आधारित असलेल्या आपल्या निश्चित मतांनी त्या ध्येयाप्रत पोहंचण्यास आपल्याला प्रोत्साहन दिले पाहिजे.
२७. येथे विचारलेल्या प्रश्नांविषयी गांभिर्याने विचार करणे महत्त्वपूर्ण का आहे?
२७ मोठ्या बाबेलच्या नाशासह ईश्वरी न्यायदंडाच्या अंमलबजावणीची सुरवात होईल. खोट्या धर्माचे वेश्यासमान साम्राज्य सर्वदासाठी अस्तित्वविरहित करण्यात येईल. तो समय अतिशय समीप आहे! तो महत्त्वाचा समय येईल तेव्हा आपल्या प्रत्येकाचा पवित्रा कोणता असेल? तसेच मोठ्या संकटाच्या कळसास, सैतानाच्या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या उर्वरित भागाचा नाश करण्यात येईल तेव्हा आपण कोणत्या बाजूला असल्याचे आढळून येईल? आपण आता आवश्यक ते पाऊल उचलल्यास, आपली सुरक्षितता निश्चित आहे. यहोवा आपल्याला सांगतो: “जो माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो.” (नीतिसूत्रे १:३३) या व्यवस्थीकरणाच्या समाप्तीमध्ये, यहोवाची निष्ठेने व हर्षाने सेवा करीत राहिल्यामुळे आपण यहोवाची सेवा नित्य करण्यास पात्र ठरू शकतो.
[तळटीपा]
a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी), खंड १, पृष्ठे ६३४-५ पाहा.
तुम्हाला आठवते का?
▫ आधुनिक दिवसांतील “अमंगळ पदार्थ” काय आहे?
▫ कोणत्या अर्थाने “अमंगळ पदार्थ . . . पवित्रस्थानात” उभा आहे?
▫ आता सुरक्षित ठिकाणी पलायन करण्यामध्ये काय गोवलेले आहे?
▫ अशी कार्यहालचाल निकडीची का आहे?
[१६ पानांवरील चित्रं]
बचावण्याकरता, येशूच्या अनुयायांना विलंब न करता पळ काढायचा होता