वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w10 ७/१५ पृ. ३-७
  • यहोवाचा दिवस काय प्रकट करेल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाचा दिवस काय प्रकट करेल?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • कोणते आकाश व पृथ्वी नाहीशी होईल?
  • “सृष्टितत्त्वे . . . लयास जातील”
  • “पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील”
  • “नवे आकाश व नवी पृथ्वी”
  • यहोवाच्या महान दिवसाकरता स्वतःस तयार करा
  • तारण करणाऱ्‍या देवावर भरवसा ठेवा
  • यहोवाच्या दिवसाची सतत अपेक्षा करीत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
w10 ७/१५ पृ. ३-७

यहोवाचा दिवस काय प्रकट करेल?

“चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल, . . . आणि पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील.”—२ पेत्र ३:१०.

१, २. (क) सध्याच्या दुष्ट जगाचा कशा प्रकारे नाश होईल? (ख) आपण कोणत्या प्रश्‍नांवर विचार करणार आहोत?

सध्याचे दुष्ट जग हे मुळातच एका खोट्या दाव्यावर आधारलेले आहे. मनुष्य यहोवापासून स्वतंत्र राहूनही यशस्वी रीत्या या पृथ्वीचा कारभार चालवू शकतो असा तो दावा आहे. (स्तो. २:२, ३) पण, असत्यावर आधारलेली कोणतीही गोष्ट फार काळ टिकू शकते का? मुळीच नाही! तेव्हा, सैतानाच्या जगाचा नाश हा ठरलेला आहे. पण, सैतानाचे जग आपोआप कोलमडून पडेपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार नाही. कारण, देवाच्या नियुक्‍त वेळी, व त्याला योग्य वाटेल त्या प्रकारे तो स्वतः सैतानाच्या जगाचा नाश करेल. या दुष्ट जगाविरुद्ध यहोवाने केलेल्या कारवाईवरून यहोवाचा न्याय व प्रीती परिपूर्ण रीत्या प्रकट होईल.—स्तो. ९२:७; नीति. २:२१, २२.

२ पेत्राने लिहिले, “चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल; त्या दिवशी आकाश मोठा नाद करीत नाहीसे होईल, सृष्टितत्त्वे तप्त होऊन लयास जातील, आणि पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील.” (२ पेत्र ३:१०) येथे उल्लेख केलेले “आकाश” व “पृथ्वी” कशास सूचित करतात? “सृष्टितत्त्वे तप्त होऊन लयास जातील” याचा काय अर्थ होतो? आणि “पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील” असे पेत्राने कोणत्या अर्थाने म्हटले? या प्रश्‍नांची उत्तरे मिळवल्याने निकट भविष्यात घडणार असलेल्या भयप्रेरक घटनांसाठी स्वतःला तयार करण्यास आपल्याला साहाय्य मिळेल.

कोणते आकाश व पृथ्वी नाहीशी होईल?

३. दुसरे पेत्र ३:१० यात ज्या ‘आकाशाचा’ उल्लेख केला आहे ते कशास सूचित करते आणि ते कशा रीतीने नाहीसे होईल?

३ बायबलमध्ये “आकाश” हा शब्द लाक्षणिक अर्थाने वापरण्यात येतो, तेव्हा तो सहसा प्रजेवर वर्चस्व करणाऱ्‍या राजकीय शक्‍तींना सूचित करतो. (यश. १४:१३, १४; प्रकटी. २१:१, २) त्याअर्थी, ‘आकाश नाहीसे होईल’ या वाक्यांशातील आकाश, अधार्मिक समाजावर सत्ता चालवणाऱ्‍या मानवी शासनाला सूचित करते. हे आकाश “मोठा नाद करीत” नाहीसे होईल यावरून त्याचा किती झटक्यात सर्वनाश होईल हे सूचित होते.

४. “पृथ्वी” काय आहे आणि तिचा कशा प्रकारे नाश केला जाईल?

४ “पृथ्वी” देवापासून दुरावलेल्या मानवांच्या जगाला सूचित करते. नोहाच्या काळातही अशा प्रकारचे जग अस्तित्वात होते आणि देवाच्या आज्ञेने त्या जगाचा जलप्रलयात नाश झाला. “आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहेत; म्हणजे न्यायनिवाड्याचा व भक्‍तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली आहेत.” (२ पेत्र ३:७) जलप्रलयाने सर्व अधार्मिक जनांचा एकाच वेळी अंत केला होता. पण येणारा नाश हा ‘मोठ्या संकटादरम्यान’ टप्प्याटप्प्याने होईल. (प्रकटी. ७:१४) मोठ्या संकटाच्या पहिल्या टप्प्यात, देव या जगाच्या राजकीय शासकांना ‘मोठ्या बाबेलीचा’ नाश करण्यास प्रवृत्त करेल आणि अशा रीतीने खोट्या धर्मांनी बनलेल्या त्या कलावंतिणीबद्दल आपली घृणा व्यक्‍त करेल. (प्रकटी. १७:५, १६; १८:८) यानंतर, मोठ्या संकटाच्या शेवटल्या टप्प्यात म्हणजेच हर्मगिदोनाच्या लढाईत यहोवा स्वतः सैतानाच्या जगाचे जे काही उरले असेल त्याचा सर्वनाश करेल.—प्रकटी. १६:१४, १६; १९:१९-२१.

“सृष्टितत्त्वे . . . लयास जातील”

५. लाक्षणिक मूलतत्त्वांत कशाकशाचा समावेश होतो?

५ ही ‘लयास जाणारी सृष्टितत्त्वे’ काय आहेत? “सृष्टितत्त्वे” असे भाषांतर केलेल्या शब्दासाठी मूळ भाषेत “मूलतत्त्वे” या अर्थाचा शब्द वापरण्यात आला होता. एका बायबल शब्दकोशानुसार “मूलतत्त्वे” या शब्दाचा अर्थ “प्राथमिक तत्त्वे” किंवा “मूळ घटक” असा होतो. या शब्दकोशानुसार हा शब्द “वर्णमालेतील अक्षरांच्या संदर्भात वापरला जात असे, जी भाषेची मूलतत्त्वे असतात.” त्याअर्थी, पेत्राने ‘मूलतत्त्वांचा’ उल्लेख केला तेव्हा तो या अधार्मिक जगाची ओळख करून देणाऱ्‍या मनोवृत्तींबद्दल, मार्गांबद्दल आणि ध्येयांबद्दल बोलत होता. या ‘मूलतत्त्वांत’ “जगाचा आत्मा” देखील समाविष्ट आहे, जो ‘आज्ञा मोडणाऱ्‍या लोकांत कार्य करतो.’ (१ करिंथ. २:१२; इफिसकर २:१-३ वाचा.) हा आत्मा, आपण श्‍वास घेतो त्या हवेप्रमाणे सैतानाच्या सबंध जगाला व्यापतो. तो लोकांना आपल्या विचारांत, योजनांत, तसेच वागण्याबोलण्यात “अंतरिक्षातील राज्याचा अधिपति” असणाऱ्‍या सैतानाच्या गर्विष्ठ व विद्रोही मानसिकतेचे अनुकरण करण्यास प्रवृत्त करतो.

६. जगाचा आत्मा कोणत्या गोष्टींतून दिसून येतो?

६ त्यामुळे, ज्यांची बुद्धी व अंतःकरण कळत नकळत जगाच्या या आत्म्याने दूषित झाले आहे, ते सैतानाची विचारसरणी व मनोवृत्ती प्रतिबिंबित करतात. परिणामस्वरूप, ते देवाची इच्छा काय आहे याची पर्वा न करता आपल्या मनात येईल तसे वागतात. त्यांच्या वागण्याबोलण्यातून गर्विष्ठपणा किंवा स्वार्थीपणा दिसून येतो. अधिकाराविरुद्ध बंड करण्याची वृत्ती त्यांच्यात असते. आणि ते अगदी स्वैरपणे ‘देहाच्या व डोळ्यांच्या वासनेच्या’ आहारी जातात.—१ योहान २:१५-१७ वाचा.a

७. आपण ‘आपल्या अंतःकरणाचे रक्षण’ का केले पाहिजे?

७ तर मग, मित्र निवडताना, वाचनाचे साहित्य किंवा मनोरंजन निवडताना, तसेच इंटरनेटवर कोणत्या वेबसाईट्‌स पाहाव्यात हे ठरवताना देवाच्या सुज्ञ मार्गदर्शनाचे पालन करण्याद्वारे ‘आपल्या अंतःकरणाचे रक्षण’ करणे किती महत्त्वाचे आहे! (नीति. ४:२३) प्रेषित पौलाने लिहिले: “ख्रिस्ताप्रमाणे नसलेले, तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्त्वज्ञान व पोकळ भुलथापा ह्‍यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या.” (कलस्सै. २:८) यहोवाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसे या सल्ल्याचे पालन करणे अधिकच निकडीचे ठरते, कारण देवाच्या क्रोधाग्नीचा तो दिवस येईल तेव्हा सैतानाच्या जगाची सर्व “मूलतत्त्वे” “तप्त” होऊन विरून जातील. त्या अग्नीपुढे टिकाव धरण्याची क्षमता त्यांमध्ये नाही हे त्या दिवशी सिद्ध होईल. यावरून मलाखी ४:१ यातील शब्दांची आपल्याला आठवण होते: “भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे; सर्व गर्विष्ठ व सर्व दुराचारी धसकट बनतील; तो येणारा दिवस त्यांस जाळून टाकील.”

“पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील”

८. “पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील” याचा काय अर्थ होतो?

८ “पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील” असे जे पेत्राने म्हटले त्याचा काय अर्थ होतो? पेत्र असे सांगत होता, की यहोवा मोठ्या संकटात सैतानाच्या जगाचा पर्दाफाश करेल. सैतानाचे जग हे देवाच्या व त्याच्या राज्याच्या विरोधात आहे आणि त्यामुळे ते नाशास पात्र आहे हे यहोवा सर्वांपुढे प्रकट करेल. त्या काळाविषयी भाकीत करताना यशया २६:२१ असे म्हणते: “परमेश्‍वर पृथ्वीवरील रहिवाश्‍यांना त्यांच्या पापास्तव शासन करण्यास आपल्या स्थानाहून निघाला आहे. शोषलेले रक्‍त पृथ्वी प्रगट करील, वधिलेल्यांस ती यापुढे झाकून ठेवावयाची नाही.”

९. (क) आपण कोणत्या गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे आणि का? (ख) आपण काय उत्पन्‍न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि का?

९ यहोवाचा दिवस येईल तेव्हा, ज्यांच्या बुद्धीवर व अंतःकरणावर या दुष्ट जगाचा व त्याच्या आत्म्याचा प्रभाव पडला आहे त्यांचे खरे स्वरूप प्रकट होईल. ते एकमेकांना जिवे मारण्यासही कमी करणार नाहीत. किंबहुना, आजच्या जगात अतिशय लोकप्रिय असलेले निरनिराळ्या प्रकारचे हिंसक मनोरंजन जणू लोकांचे मन त्या काळाकरता तयार करत आहे, जेव्हा “प्रत्येकाचा हात त्याच्या शेजाऱ्‍याच्या हाताविरुद्ध उठेल.” (जख. १४:१३, पं.र.भा.) तर मग अशी कोणतीही गोष्ट जिच्यामुळे आपल्यामध्ये गर्विष्ठपणा किंवा हिंसाचाराची आवड यांसारखे देवाला घृणास्पद वाटणारे गुण उत्पन्‍न होतील—मग ती चित्रपटाच्या, पुस्तकांच्या, व्हिडिओ गेम्सच्या किंवा इतर माध्यमांच्या रूपात असो—अशा सर्व गोष्टींपासून आपण दूर राहणे किती महत्त्वाचे आहे! (२ शमु. २२:२८; स्तो. ११:५) त्याऐवजी, आपण देवाच्या आत्म्याचे फळ उत्पन्‍न करण्याचा प्रयत्न करू या. कारण, देवाच्या क्रोधाचा अग्नी सैतानाच्या दुष्ट जगावर येईल तेव्हा हे गुण सैतानाच्या जगातील मूलतत्त्वांप्रमाणे भस्म होणार नाहीत, तर ते अविनाशी ठरतील.—गलती. ५:२२, २३.

“नवे आकाश व नवी पृथ्वी”

१०, ११. “नवे आकाश” आणि “नवी पृथ्वी” कशास सूचित करतात?

१० दुसरे पेत्र ३:१३ वाचा. “नवे आकाश” म्हणजे देवाचे स्वर्गीय राज्य. १९१४ साली “परराष्ट्रीयांची सद्दी” संपली तेव्हा हे राज्य स्थापन झाले. (लूक २१:२४) या राज्याचे सरकार ख्रिस्त येशू आणि त्याच्या १,४४,००० सहराजांनी बनलेले असून, या सहराजांपैकी बहुतेकांना त्यांचे स्वर्गीय प्रतिफळ मिळाले आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकात या निवडलेल्यांचे वर्णन ‘देवापासून स्वर्गातून उतरणारी, नवऱ्‍यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजविलेली पवित्र नगरी, नवी यरुशलेम,’ असे करण्यात आले आहे. (प्रकटी. २१:१, २, २२-२४) ज्याप्रमाणे पृथ्वीवरील जेरूसलेम शहर हे प्राचीन इस्राएलच्या सरकाराचे केंद्रस्थान होते, त्याचप्रमाणे नव्या जगाचे सरकार हे नवी जेरूसलेम आणि तिचा वर, यांचे मिळून बनलेले आहे. ही दिव्य नगरी ‘स्वर्गातून उतरते’ ते या अर्थाने की ती पृथ्वीकडे आपले लक्ष वळवते.

११ “नवी पृथ्वी” एका नव्या मानवसमाजाला सूचित करते, ज्यातील सदस्यांनी देवाच्या राज्याच्या अधीन राहण्यास इच्छुक असल्याचे प्रदर्शित केलेले असेल. सध्याच्या या दुष्ट जगातही देवाचे लोक एका आध्यात्मिक नंदनवनाचा आनंद लुटत आहेत. पण ‘भावी जगात’ ते या आध्यात्मिक नंदनवनाचा एका स्वच्छ व सुंदर पृथ्वीवर, खरोखरच्या नंदनवनात उपभोग घेतील. (इब्री २:५) त्या नव्या जगात आपण कशा प्रकारे सहभागी होऊ शकतो?

यहोवाच्या महान दिवसाकरता स्वतःस तयार करा

१२. यहोवाचा दिवस येईल तेव्हा जगातील लोकांना धक्का का बसेल?

१२ पौल व पेत्र या दोघांनीही यहोवाचा दिवस ‘रात्री चोर येतो तसा’ अगदी अनपेक्षितपणे येईल असे भाकीत केले होते. (१ थेस्सलनीकाकर ५:१, २ वाचा.) त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहणारे खरे ख्रिस्ती देखील त्याच्या अकस्मात येण्याने चकित होतील. (मत्त. २४:४४) पण जगातील लोक फक्‍त चकित होणार नाहीत. पौलाने लिहिले: “शांति आहे, निर्भय आहे असे ते [यहोवापासून दुरावलेले लोक] म्हणतात तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात्‌ वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात्‌ नाश होतो, आणि ते निभावणारच नाहीत.”—१ थेस्सलनी. ५:३.

१३. “शांति आहे, निर्भय आहे!” या अफवेला बळी पडण्याचे आपण कसे टाळू शकतो?

१३ “शांति आहे, निर्भय आहे!” ही घोषणा सैतानाच्या दुरात्म्यांनी पसरवलेली नुसतीच एक अफवा असेल; पण यहोवाचे सेवक मात्र या अफवेला बळी पडणार नाहीत. पौलाने लिहिले: “त्या दिवसाने चोरासारखे तुम्हास गाठावे असे तुम्ही अंधारात नाही. कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहा.” (१ थेस्सलनी. ५:४, ५) म्हणूनच, आपण नेहमी प्रकाशात राहण्याचा, सैतानाच्या जगातील अंधकारापासून दूर राहण्याचा प्रयत्न करू या. पेत्राने लिहिले: “प्रियजनहो, ह्‍या गोष्टी तुम्हाला पूर्वीपासून कळत आहेत, म्हणून तुम्ही अनीतिमान्‌ लोकांच्या [ख्रिस्ती मंडळीतून येणाऱ्‍या खोट्या शिक्षकांच्या] भ्रांतिप्रवाहांत सापडून आपल्या स्थिरतेतून ढळू नये ह्‍यासाठी जपून राहा.”—२ पेत्र ३:१७.

१४, १५. (क) यहोवाने कशा प्रकारे आपल्याबद्दल आदर दाखवला आहे? (ख) कोणत्या देवप्रेरित शब्दांकडे आपण गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे?

१४ पण, यहोवा आपल्याला “जपून राहा” असे फक्‍त सांगत नाही. तर भविष्यात काय घडणार आहे हे आपल्याला ‘पूर्वीपासून कळावे’ म्हणून, त्याने प्रेमळपणे भविष्यातील घटनांची एक रूपरेषा देण्याद्वारे आपल्याबद्दल आदर दाखवला आहे.

१५ पण दुःखाची गोष्ट म्हणजे काही जण जागृत राहण्याविषयीच्या सल्ल्याबद्दल उडवाउडवीची, शंकेखोर वृत्ती दाखवू लागले आहेत. ‘किती वर्षांपासून हेच ऐकत आहोत,’ असे कदाचित ते म्हणत असतील. पण असे म्हणणाऱ्‍यांनी आठवणीत ठेवावे की अशा प्रकारची विधाने करण्याद्वारे ते फक्‍त विश्‍वासू व बुद्धिमान दासवर्गावरच नव्हे, तर यहोवा देवावर आणि त्याच्या पुत्रावर देखील शंका घेत आहेत. कारण यहोवाने स्वतः म्हटले होते की “वाट पाहा.” (हब. २:३) तसेच, येशूनेही म्हटले: “जागृत राहा; कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभु येईल हे तुम्हास ठाऊक नाही.” (मत्त. २४:४२) शिवाय, पेत्राने लिहिले: “पवित्र वर्तणुकीत व सुभक्‍तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे?” (२ पेत्र ३:११, १२) विश्‍वासू दासवर्ग आणि त्याचे नियमन मंडळ या आर्जवपूर्वक शब्दांप्रती कधीही बेफिकीर वृत्ती दाखवणार नाही!

१६. आपण कशा प्रकारची मनोवृत्ती टाळली पाहिजे आणि का?

१६ येशूने दिलेल्या दृष्टांतात धनी येण्यास विलंब लागत आहे असा निष्कर्ष काढणारा हा खरेतर “दुष्ट दास” आहे. (मत्त. २४:४८) हा दुष्ट दास २ पेत्र ३:३, ४ यात वर्णन केलेल्या एका गटाचा भाग आहे. तेथे पेत्राने असे म्हटले की ‘स्वतःच्याच वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसांत थट्टा करीत येतील’ आणि जे आज्ञाधारकपणे यहोवाच्या दिवसाची वाट पाहत आहेत त्यांची टर उडवतील. हे थट्टेखोर लोक देवाच्या राज्याच्या हिताचा विचार करण्याऐवजी स्वतःवर आणि स्वतःच्या स्वार्थांवर लक्ष केंद्रित करतात. देवाच्या आज्ञांकडे दुर्लक्ष करण्याची अशी धोकेदायक वृत्ती कधीही आपल्यात येऊ नये म्हणून आपण सांभाळले पाहिजे! भविष्यातील घटना केव्हा घडतील हे यहोवालाच अचूक माहीत असल्यामुळे आपण त्याबद्दल अवाजवी चिंता करू नये. त्याऐवजी, ‘आपल्या प्रभूची सहनशीलता तारणच आहे असे समजून’ आपण राज्याच्या प्रचाराच्या आणि शिष्य बनवण्याच्या कार्यात आपला जास्तीत जास्त वेळ खर्च केला पाहिजे.—२ पेत्र ३:१५; प्रेषितांची कृत्ये १:६, ७ वाचा.

तारण करणाऱ्‍या देवावर भरवसा ठेवा

१७. जेरूसलेममधून पळ काढण्याविषयी येशूने जे सांगितले होते त्याला विश्‍वासू ख्रिश्‍चनांनी कसा प्रतिसाद दिला आणि का?

१७ सा.यु. ६६ मध्ये रोमी सैन्याने यहूदीयावर चढाई केली तेव्हा विश्‍वासू ख्रिश्‍चनांनी संधी मिळताच, येशूने सांगितल्याप्रमाणे जेरूसलेममधून पळ काढला. (लूक २१:२०-२३) ते मागेपुढे न पाहता अशा प्रकारे तातडीने पाऊल का उचलू शकले? नक्कीच त्यांनी येशूची ताकीद गांभीर्याने घेतली असेल. अर्थात, असा निर्णय घेतल्यामुळे, ख्रिस्ताने आधीच सांगितल्याप्रमाणे आपल्याला काही अडचणींना तोंड द्यावे लागेल याची त्यांना कल्पना होती. तरीसुद्धा, यहोवा आपल्या एकनिष्ठ उपासकांना कधीही वाऱ्‍यावर सोडणार नाही याची त्यांना पूर्ण खात्री होती.—स्तो. ५५:२२.

१८. लूक २१:२५-२८ यांतील येशूचे शब्द विचारात घेता, येणाऱ्‍या मोठ्या संकटाविषयी तुम्हाला काय वाटते?

१८ आपणही यहोवावर पूर्ण भरवसा ठेवला पाहिजे कारण सध्याच्या या जगावर मानव इतिहासातील सर्वात मोठे संकट येईल तेव्हा केवळ यहोवाच आपले तारण करण्यास समर्थ असेल. मोठे संकट सुरू झाल्यावर—पण, यहोवाने या जगातील इतर सर्व गोष्टींवर न्यायदंड बजावण्याअगोदर—एक अशी वेळ येईल जेव्हा “भयाने व जगावर कोसळणाऱ्‍या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे मरणोन्मुख होतील.” पण देवाचे शत्रू भीतीने थरथरत असताना, यहोवाच्या एकनिष्ठ सेवकांना मात्र भीती वाटणार नाही. उलट, ते आनंद करतील कारण लवकरच आपली सुटका होणार हे त्यांना माहीत असेल.—लूक २१:२५-२८ वाचा.

१९. पुढील लेखात कशाविषयी चर्चा केली आहे?

१९ खरोखर, जे सैतानाच्या जगापासून आणि त्यातील ‘मूलतत्त्वांपासून’ अलिप्त राहतात त्यांच्याकरता किती रोमांचक भवितव्य राखून ठेवले आहे! पण ते भवितव्य मिळवायचे असल्यास, पुढील लेखात स्पष्ट केल्याप्रमाणे वाईट गोष्टींपासून फक्‍त दूर राहणे पुरेसे नाही. तर, त्यासोबतच यहोवाला संतुष्ट करणारे गुण विकसित करणे आणि त्याच्या वचनाच्या अनुरूप असणारी कार्ये करणेही अतिशय महत्त्वाचे आहे.—२ पेत्र ३:११.

[तळटीप]

a ज्यांतून जगाचा आत्मा प्रकट होतो अशा गुणलक्षणांबद्दल अधिक माहितीकरता देवाच्या प्रेमात टिकून राहा या पुस्तकातील पृष्ठे ५९-६२ वरील परिच्छेद ७-१० पाहा.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

• पुढील गोष्टी कशास सूचित करतात . . .

सध्याचे “आकाश व पृथ्वी”?

“मूलतत्त्वे”?

“नवे आकाश व नवी पृथ्वी”?

• आपण देवावर पूर्ण भरवसा का ठेवतो?

[५ पानांवरील चित्र]

तुम्ही कशा प्रकारे ‘आपल्या अंतःकरणाचे रक्षण’ करून जगापासून अलिप्त राहू शकता?

[६ पानांवरील चित्र]

आपण ‘आपल्या प्रभूच्या सहनशीलतेस तारण समजतो’ हे आपण कसे दाखवू शकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा