यहोवा पुष्कळ पुत्रांना गौरवात आणतो
“पुष्कळ पुत्रांना गौरवात आणताना त्यांच्या तारणाचा जो उत्पादक त्याला दुःखसहनाच्या द्वारे परिपूर्ण करावे हे त्याला [देवाला] उचित होते.”—इब्री लोकांस २:१०.
१. मानवजातीकरता असलेला यहोवाचा उद्देश पूर्ण होईल, याची आपण खात्री का बाळगू शकतो?
परिपूर्ण मानवी कुटुंबाला अनंत जीवनाचा आनंद त्यांच्या कायमच्या घरात लुटता यावा म्हणून यहोवाने या पृथ्वीची निर्मिती केली. (उपदेशक १:४; यशया ४५:१२, १८) हे खरे आहे, की आपल्या आद्यपित्याने अर्थात आदामाने पाप केले आणि अशा प्रकारे पाप व मरण त्याच्या संततीपर्यंत येऊन पोहंचले. पण मानवजातीकरता असलेला देवाचा उद्देश त्याचे अभिवचनयुक्त संतान अर्थात येशू ख्रिस्ताद्वारे पूर्ण होईल. (उत्पत्ति ३:१५; २२:१८; रोमकर ५:१२-२१; गलतीकर ३:१६) मानवजातीच्या जगावरील प्रेमाने प्रेरित होऊन यहोवाने त्याचा “एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१६) प्रेमामुळे “पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास” येशू प्रेरित झाला. (मत्तय २०:२८) हे “सर्वांसाठी मुक्तीचे मोल” आदामाने गमावलेले अधिकार आणि भवितव्य पुन्हा विकत घेते तसेच त्यामुळे सार्वकालिक जीवन देखील शक्य होते.—१ तीमथ्य २:५, ६; योहान १७:३.
२. येशूच्या खंडणी यज्ञार्पणाचा अनुप्रयोग वार्षिक प्रायश्चित्त दिनाच्या प्रतिरूपाने कशा प्रकारे दाखवण्यात आला?
२ येशूच्या खंडणी यज्ञार्पणाचा अनुप्रयोग वार्षिक प्रायश्चित्त दिनाच्या प्रतिरूपाने दाखवण्यात आला होता. त्या दिवशी, इस्राएलचा महायाजक पापार्पणाचा गोऱ्हा अर्पण करत असे आणि त्याचे रक्त निवासमंडपाच्या परम पवित्र स्थानातील पवित्र कोशावर व नंतर मंदिरात सादर केले जात असे. स्वतःकरता, स्वतःच्या घराण्याकरता आणि लेवी वंशांकरता असे करण्यात येत असे. त्याचप्रमाणे येशू ख्रिस्ताने त्याच्या रक्ताचे मोल प्रथम त्याच्या आत्मिक ‘बांधवांची’ पातके झाकण्यासाठी देवाला सादर केले. (इब्री लोकांस २:१२; १०:१९-२२; लेवीय १६:६, ११-१४) प्रायश्चित्त दिनाच्या वेळी महायाजक पापार्पणाकरता बकरा सुद्धा अर्पण करून त्याचे रक्त परम पवित्र स्थानात सादर करत असे; अशा प्रकारे इस्राएलमधील गैरयाजकीय १२ वंशांच्या पातकांचे प्रायश्चित्त केले जात असे. त्याचप्रमाणे महायाजक, येशू ख्रिस्त त्याच्या जीवनी रक्ताचा अनुप्रयोग त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या मानवजातीकरता करून त्यांची पातके पुसून टाकील.—लेवीय १६:१५.
गौरवात आणणे
३. इब्री लोकांस २:९, १० नुसार, १,९०० वर्षांपासून देव काय करत आला आहे?
३ देव १,९०० वर्षांपासून येशूच्या ‘बांधवांसंबंधाने’ काहीतरी विलक्षण करत आला आहे. याबद्दल प्रेषित पौलाने लिहिले: “देवाच्या कृपेने प्रत्येकाकरिता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून ज्याला देवदूतांपेक्षा किंचितकाल कमी केले होते, तो येशू मरण सोसल्यामुळे गौरव व थोरवी ह्यांनी मुकुटमंडित केलेला असा आपण पाहतो. कारण ज्याच्यासाठी सर्व काही आहे, व ज्याच्याद्वारे सर्व काही आहे, त्याने पुष्कळ पुत्रांना गौरवात आणताना त्यांच्या तारणाचा जो उत्पादक त्याला [“प्रमुख प्रतिनिधीला,” NW] दुःखसहनाच्या द्वारे परिपूर्ण करावे हे त्याला [यहोवा देवाला] उचित होते.” (इब्री लोकांस २:९, १०) हा तारणाचा प्रमुख प्रतिनिधी येशू ख्रिस्त आहे जो पृथ्वीवर मानव म्हणून जगत असताना दुःख सहन करण्याद्वारे पूर्ण आज्ञाधारकपणा शिकला. (इब्री लोकांस ५:७-१०) देवाचा आत्मिक पुत्र या नात्याने येशूला पहिल्यांदा उत्पन्न करण्यात आले.
४. देवाचा आत्मिक पुत्र या नात्याने येशूला केव्हा आणि कसे उत्पन्न करण्यात आले?
४ आपला आत्मिक पुत्र या नात्याने येशूला उत्पन्न करण्यासाठी यहोवाने पवित्र आत्म्याचा किंवा कार्यकारी शक्तीचा उपयोग केला जेणेकरून त्याला स्वर्गीय गौरवात आणता यावे. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानासोबत एकटा असताना, देवाला केलेल्या स्वतःच्या सादरीकरणाचे द्योतक म्हणून येशू पूर्णपणे पाण्यात बुडाला. लूकच्या शुभवर्तमानाचा अहवाल असे म्हणतो: “सर्व लोकांनी बाप्तिस्मा घेतला व येशूहि बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करीत असता असे झाले, की आकाश उघडले गेले, पवित्र आत्मा देहरूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला, आणि आकाशातून अशी वाणी झाली की, तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.” (लूक ३:२१, २२) पवित्र आत्मा येशूवर आल्याचे योहानाने पाहिले तसेच यहोवाने प्रिय पुत्र असे म्हणून येशूला दिलेली उघड मान्यताही त्याने ऐकली. त्यावेळी आणि पवित्र आत्म्याद्वारे यहोवाने ‘पुष्कळ पुत्रांना गौरवात आणणाऱ्यांपैकी’ येशूला पहिल्यांदा उत्पन्न केले.
५. येशूच्या यज्ञार्पणाचा सर्वात पहिल्यांदा कोणाला फायदा मिळतो आणि त्यांची संख्या किती आहे?
५ येशूच्या ‘बांधवांना’ त्याच्या यज्ञार्पणाचा सर्वात पहिल्यांदा फायदा मिळतो. (इब्री लोकांस २:१२-१८) प्रेषित योहानाने दृष्टान्तात पाहिले, की येशूचे बांधव आधीच कोकऱ्यासोबत अर्थात पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्तासोबत स्वर्गीय सीयोन डोंगरावर गौरवात आहेत. योहानाने त्यांची संख्या सुद्धा सांगितली, तो म्हणतो: “मी पाहिले, तो पाहा, कोकरा सीयोन डोंगरावर उभा राहिलेला दृष्टीस पडला; त्याच्याबरोबर त्याचे नाव व त्याच्या पित्याचे नाव कपाळावर लिहिलेले एक लक्ष चव्वेचाळीस हजार इसम होते. . . . ते देवासाठी व कोकऱ्यासाठी प्रथमफळ असे माणसांतून विकत घेतलेले आहेत. त्यांच्या तोंडांत असत्य आढळले नाही; ते निष्कलंक आहेत.” (प्रकटीकरण १४:१-५) ‘पुष्कळ पुत्रांना स्वर्गात गौरवण्यात’ येते त्यांची एकूण संख्या १,४४,००१ इतकी आहे—येशू आणि त्याचे आत्मिक बांधव.
“देवापासून जन्मलेला”
६, ७. ‘देवापासून जन्मलेले’ कोण आहेत आणि याचा त्यांच्यासाठी कोणता अर्थ होतो?
६ यहोवापासून उत्पन्न झालेले लोक ‘देवापासून जन्मलेले’ आहेत. अशांचा उल्लेख करताना प्रेषित योहानाने लिहिले: “जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही; कारण त्याचे [यहोवाचे] बीज त्याच्यामध्ये राहते; त्याच्याने पाप करवत नाही, कारण तो देवापासून जन्मलेला आहे.” (१ योहान ३:९) हे “बीज” देवाचा पवित्र आत्मा होय. देवाच्या वचनासोबत कार्य करून पवित्र आत्म्याने स्वर्गीय आशेसाठी १,४४,००० लोकांतील प्रत्येकाला “पुन्हा जन्म” दिला आहे.—१ पेत्र १:३-५, २३.
७ परिपूर्ण मनुष्य आदाम “देवाचा पुत्र” होता त्याप्रमाणे येशू सुद्धा मानव म्हणून जन्माला आल्यापासून देवाचा पुत्र होता. (लूक १:३५; ३:३८) तथापि, याचा पुरावा येशूच्या बाप्तिस्म्यानंतर यहोवाने घोषणा केली तेव्हा मिळाला: “तू माझा पुत्र, मला परमप्रिय आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.” (मार्क १:११) या घोषणेच्या वेळी आलेल्या पवित्र आत्म्याद्वारे हे स्पष्ट झाले, की देवाने येशूला त्याचा आत्मिक पुत्र या नात्याने उत्पन्न केले होते. तेव्हा, देवाचा आत्मिक पुत्र या नात्याने स्वर्गात पुन्हा एकदा जीवन प्राप्त होण्याच्या अधिकारासह येशूला लाक्षणिकरीत्या “पुन्हा जन्म” देण्यात आला होता. त्याच्याप्रमाणे, त्याच्या १,४४,००० आत्मिक बांधवांचा “पुन्हा जन्म” झाला आहे. (योहान ३:१-८; पाहा टेहळणी बुरूज (इंग्रजी), नोव्हेंबर १५, १९९२, पृष्ठे ३-६.) देवाने येशूप्रमाणे त्यांचा देखील अभिषेक केला आहे आणि सुवार्तेची घोषणा करण्याचे काम त्यांना सांगितले आहे.—यशया ६१:१, २; लूक ४:१६-२१; १ योहान २:२०.
उत्पन्न झाल्याचा पुरावा
८. आत्म्यापासून उत्पन्न झाल्याचा पुरावा (अ) येशूबाबत (ब) त्याच्या आरंभीच्या शिष्यांबाबत कोणता होता?
८ येशू आत्म्याद्वारे उत्पन्न झाल्याचा पुरावा होता. येशूवर स्वर्गातून आत्मा उतरल्याचे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने पाहिले होते आणि नव्याने अभिषेक केलेल्या मशीहाच्या आत्मिक पुत्रत्वाची देवाने केलेली घोषणाही त्याने ऐकली होती. पण आपल्याला आत्म्याद्वारे उत्पन्न केले आहे, हे येशूच्या शिष्यांना कसे कळणार होते? स्वतःचे स्वर्गारोहण होण्याच्या दिवशी येशूने म्हटले: “योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा; पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल.” (प्रेषितांची कृत्ये १:५) सा. यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी येशूच्या शिष्यांचा ‘पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा’ झाला. त्यांच्यावर आत्मा ओतण्यात आला तेव्हा “मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला” आणि प्रत्येक शिष्यावर “अग्नीच्या जिभांसारख्या जिभा” बसल्या. सर्वात विलक्षण गोष्ट म्हणजे “आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.” अशा प्रकारे, देवाचे पुत्र या नात्याने ख्रिस्ताच्या अनुयायांकरता स्वर्गीय गौरवात नेण्याचा मार्ग खुला करण्यात आल्याचा पुरावा पाहायला आणि ऐकायला मिळाला.—प्रेषितांची कृत्ये २:१-४, १४-२१; योएल २:२८, २९.
९. शोमरोनी, कर्नेल्य आणि पहिल्या शतकातील इतर जन आत्म्याद्वारे उत्पन्न झाले होते याचा कोणता पुरावा होता?
९ या घटनेच्या काही काळानंतर फिलिप्प नामक सुवार्तिकाने शोमरोनात प्रचार केला. शोमरोनी लोकांनी त्याचा संदेश स्वीकारला आणि बाप्तिस्मा घेतला खरा, पण आपल्याला देवाने त्याचे पुत्र या नात्याने उत्पन्न केले आहे, या गोष्टीचा सबळ पुरावा त्यांच्याकडे नव्हता. प्रेषित पेत्राने आणि योहानाने प्रार्थना करून या विश्वास ठेवणाऱ्या लोकांवर हात ठेवले तेव्हा “त्यांना पवित्र आत्मा मिळाला;” पाहणाऱ्यांकरता हा एका अर्थाने पुरावाच होता. (प्रेषितांची कृत्ये ८:४-२५) देवाचे पुत्र या नात्याने विश्वास ठेवणाऱ्या शोमरोनी लोकांना आत्म्याद्वारे उत्पन्न करण्यात आले होते, याचा हा पुरावा होता. त्याचप्रमाणे सा. यु. ३६ मध्ये कर्नेल्य आणि इतर परराष्ट्रीयांनी देवाचे सत्य स्वीकारले. पेत्राबरोबर आलेल्या यहुदी विश्वास ठेवणाऱ्यांना “परराष्ट्रीयांवरहि पवित्र आत्म्याच्या दानाचा वर्षाव झाला आहे असे पाहून . . . आश्चर्य वाटले; कारण त्यांनी त्यांना अनेक भाषांतून बोलताना व देवाची थोरवी गाताना ऐकले.” (प्रेषितांची कृत्ये १०:४४-४८) पहिल्या शतकातील अनेक ख्रिश्चनांना “आत्म्याचे दान” प्राप्त झाले होते, उदाहरणार्थ अनेक भाषांत बोलणे. (१ करिंथकर १४:१२ NW, ३२) आपल्याला आत्म्याद्वारे उत्पन्न करण्यात आले आहे, या गोष्टींचा त्यांच्याकडे स्पष्ट पुरावा होता. पण आपल्याला आत्म्याद्वारे उत्पन्न करण्यात आले आहे किंवा नाही, हे नंतरच्या ख्रिश्चनांना कसे समजणार होते?
पवित्र आत्म्याची साक्ष
१०, ११. ख्रिस्ताचे सहवारीस असणाऱ्यांसोबत आत्मा साक्ष देतो, असे तुम्ही रोमकर ८:१५-१७ च्या आधारावर कसे म्हणू शकता?
१० आपल्याकडे देवाचा आत्मा आहे, याचा पूर्ण पुरावा सर्व १,४४,००० अभिषिक्त ख्रिश्चनांकडे आहे. याविषयी पौलाने लिहिले: “ज्याच्या योगे आपण अब्बा, बापा, अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची मुले आहो; आणि जर मुले तर वारीसहि आहो; म्हणजे देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर सोबतीस वारीस असे आहो; आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगित असलो तरच.” (रोमकर ८:१५-१७) स्वर्गीय पित्याप्रती अभिषिक्त ख्रिश्चनांकडे संतानीय आत्मा अर्थात पुत्रत्वाची प्रबळ जाणीव आहे. (गलतीकर ४:६, ७) स्वर्गीय राज्यात ख्रिस्ताचे सहवारीस या नात्याने आत्मिक पुत्रत्व प्राप्त होण्यासाठी देवाने आपल्याला उत्पन्न केले आहे, हे त्यांना पूर्णपणे ठाऊक आहे. यात, यहोवाचा पवित्र आत्मा निश्चित भूमिका पार पाडतो.
११ देवाच्या पवित्र आत्म्याच्या प्रभावाधीन अभिषिक्त जनांचा अशा प्रकाराचा आत्मा किंवा प्रबळ मनोवृत्ती स्वर्गीय आशेबद्दल देवाचे वचन जे सांगते त्यास सकारात्मक प्रतिक्रिया दाखवण्यास त्यांना प्रवृत्त करते. उदाहरणार्थ, यहोवाच्या आत्मिक पुत्रांविषयी शास्त्रवचने काय म्हणतात हे जेव्हा ते वाचतात तेव्हा ते शब्द आपल्यासाठी असल्याचे ते अंतःस्फूर्तीने मान्य करतात. (१ योहान ३:२) “ख्रिस्त येशूमध्ये” आणि त्याच्या मरणात आपला “बाप्तिस्मा” झाला आहे, हे त्यांना माहीत आहे. (रोमकर ६:३) आपण देवाचे आत्मिक पुत्र असून येशूप्रमाणे आपलेही मरणानंतर स्वर्गीय गौरवात पुनरुत्थान होईल, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.
१२. अभिषिक्त ख्रिश्चनांमध्ये देवाच्या आत्म्याने काय निर्माण केले आहे?
१२ आत्मिक पुत्रत्वाकरता उत्पन्न होणे ही विकसित केलेली इच्छा नाही. सध्या पृथ्वीवर असणाऱ्या दुःखांनी जेरीस आल्यामुळे आत्म्याने उत्पन्न झालेल्यांना स्वर्गात जावेसे वाटत नाही. (ईयोब १४:१) उलटपक्षी, सामान्यतः मानवांकरता असामान्य असलेली आशा आणि आकांक्षा वास्तविक अभिषिक्त जनांमध्ये यहोवाच्या आत्म्याने निर्माण केली आहे. परादीस पृथ्वीवरील मानवी परिपूर्णतेतील आनंदी कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत सार्वकालिक जीवन रम्य असेल, हे आत्म्याने उत्पन्न झालेल्यांना माहीत आहे. तथापि, अशा प्रकारचे जीवन ही त्यांच्या मनांतील प्रमुख इच्छा नाही. अभिषिक्त लोकांची स्वर्गीय आशा इतकी प्रबळ आहे, की पृथ्वीवरील सर्व भवितव्ये आणि बंधने त्यागण्यास ते तयार असतात.—२ पेत्र १:१३, १४.
१३. २ करिंथकर ५:१-५ नुसार पौलाला कोणत्या गोष्टीची ‘अगदी उत्कंठा’ लागली होती आणि यातून आत्म्याने उत्पन्न झालेल्यांच्या संबंधाने काय सूचित होते?
१३ स्वर्गीय जीवनाची देव-प्रदत्त आशा या लोकांमध्ये इतकी प्रबळ आहे, की त्यांची मनोवृत्ती पौलाप्रमाणे असते, त्याने लिहिले: “आम्हाला ठाऊक आहे की, आमचे पृथ्वीवरील मंडपरूपी गृह मोडून टाकण्यात आले तर देवाने आम्हासाठी सिद्ध करून ठेवलेले आमचे निवासस्थान स्वर्गात आहे. ते हातांनी बांधलेले गृह नसून सार्वकालिक आहे. ह्या गृहात असताना आम्ही स्वर्गीय गृहरूप वस्त्र परिधान करण्याच्या उत्कंठेने कण्हतो; आम्ही अशा प्रकारे वस्त्र परिधान केलेले असलो म्हणजे आम्ही उघडे सापडणार नाही. कारण जे आम्ही ह्या मंडपात आहो ते आम्ही भाराक्रांत होऊन कण्हतो; वस्त्र काढून टाकावे अशी आमची इच्छा आहे असे नाही, तर ते परिधान करावे अशी इच्छा बाळगतो; ह्यासाठी की, जे मर्त्य आहे ते जीवनाच्या योगे ग्रासले जावे. ज्याने आम्हाला ह्याकरिताच सिद्ध केले तो देव आहे; त्याने आपला आत्मा आम्हास विसार म्हणून दिला आहे.” (२ करिंथकर ५:१-५) अमर्त्य आत्मिक प्राणी या नात्याने स्वर्गात पुनरुत्थान होण्याची पौलाला ‘अगदी उत्कंठा’ लागली होती. मानवी शरीराचा उल्लेख करताना त्याने मोडकळीस आलेल्या मंडपरूपी गृहाचे रूपक वापरले; अर्थात घराची तुलना करता अशा प्रकारचे ठिकाण भंगूर आणि तात्पुरते निवासस्थान असते. अभिषिक्त लोक मर्त्य, शारीरिक देहाने पृथ्वीवर सध्या जगत असले तरी, येणाऱ्या स्वर्गीय जीवनाचा विसार म्हणून पवित्र आत्मा प्राप्त झालेल्या या ख्रिस्ती लोकांची दृष्टी ‘देवाच्या निवासस्थानाकडे’ अर्थात अमर्त्य, अभ्रष्ट आत्मिक शरीराकडे लागलेली आहे. (१ करिंथकर १५:५०-५३) ते पौलाप्रमाणे मोठ्या आवेशाने म्हणू शकतात: “आम्ही धैर्य धरतो, आणि [मानवी] शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे हे आम्हास अधिक बरे वाटते.”—२ करिंथकर ५:८.
खास करारात घेण्यात आलेले
१४. स्मारकविधीची स्थापना करतेवेळी येशूने पहिल्यांदा कोणत्या कराराचा उल्लेख केला आणि आत्मिक इस्राएलांच्या संबंधाने तो करार कोणती भूमिका पार पाडतो?
१४ आपल्याला दोन खास करारांत घेण्यात आले आहे, हे आत्म्याने उत्पन्न झालेल्या ख्रिश्चनांना निश्चितपणे ठाऊक आहे. आपल्याला येणाऱ्या मरणाच्या स्मारकविधीची स्थापना करण्यासाठी येशूने बेखमीर भाकरीचा आणि द्राक्षारसाचा उपयोग केला तेव्हा त्याने एका कराराचा उल्लेख केला; त्याने द्राक्षारसाच्या प्याल्याविषयी म्हटले: “हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे. ते रक्त तुम्हासाठी ओतिले जात आहे.” (लूक २२:२०; १ करिंथकर ११:२५) या नव्या करारात कोणाचा समावेश होतो? यहोवा देवाचा आणि आत्मिक इस्राएलांच्या सदस्यांचा—यांस स्वर्गीय गौरवात आणण्याचा यहोवाचा उद्देश आहे. (यिर्मया ३१:३१-३४; गलतीकर ६:१५, १६; इब्री लोकांस १२:२२-२४) येशूने सांडलेल्या रक्ताद्वारे कार्यरत होऊन हा नवा करार यहोवाच्या नावास्तव लोकांना राष्ट्रांतून काढून घेतो आणि आत्म्याने उत्पन्न झालेल्या या ख्रिश्चनांना अब्राहामाच्या ‘संतानाचा’ भाग बनवतो. (गलतीकर ३:२६-२९; प्रेषितांची कृत्ये १५:१४) स्वर्गात अमर्त्य जीवनासाठी पुनरुत्थान करण्याद्वारे हा नवा करार सर्व आत्मिक इस्राएलांना गौरवात आणण्याची तरतूद करतो. ‘सर्वकाळच्या करारात’ असल्यामुळे त्याचे फायदे अनंतकाळ मिळत राहतील. सहस्र वर्षांदरम्यान किंवा त्यानंतर हा करार इतर प्रकारे आपली भूमिका बजावेल किंवा कसे हे काळच सांगेल.—इब्री लोकांस १३:२०.
१५. लूक २२:२८-३० च्या एकवाक्यतेत येशूच्या अभिषिक्त अनुयायांना कोणत्या दुसऱ्या करारात घेण्यास सुरवात झाली आणि केव्हा?
१५ ‘पुष्कळ पुत्रांना गौरवात आणण्याच्या’ यहोवाच्या उद्देशामुळे स्वर्गीय राज्यासाठी त्यांना व्यक्तिगतरीत्या देखील करारात घेण्यात आले आहे. येशू आणि त्याच्या पावलांचे अनुकरण करणाऱ्यांमधील कराराविषयी स्वतः त्याने असे म्हटले: “माझ्या परीक्षांमध्ये माझ्याबरोबर टिकून राहिलेले तुम्हीच आहा. जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले तसे मीहि तुम्हास नेमून देतो. ह्यासाठी की, तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे, आणि राजासनांवर बसून इस्राएलाच्या बारा वंशांचा न्याय करावा.” (लूक २२:२८-३०) सा. यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी येशूच्या शिष्यांचा पवित्र आत्म्याने अभिषेक झाला तेव्हा राज्याचा करार प्रस्थापित झाला होता. ख्रिस्त आणि त्याचे सहराजे यांच्यातील हा करार अनंतकाळ कार्यरत राहतो. (प्रकटीकरण २२:५) यामुळे आपण नव्या करारात आणि राज्याच्या करारात आहोत, याविषयी आत्म्याने उत्पन्न झालेल्या ख्रिश्चनांना पूर्ण खात्री आहे. यास्तव, प्रभूचे सांज भोजन साजरे करताना तुलनात्मकरीत्या फार कमी राहिलेले अभिषिक्त जन भाकरीमध्ये आणि द्राक्षारसामध्ये भाग घेतात; भाकरी येशूच्या निष्पाप शरीराला सूचित करते तर द्राक्षारस त्याच्या मृत्यूच्या वेळी सांडलेले परिपूर्ण रक्ताचे आणि नवा करार संमत होण्याचे प्रतिनिधीत्व करतो.—१ करिंथकर ११:२३-२६; पाहा टेहळणी बुरूज, फेब्रुवारी १, १९९०, पृष्ठे १७-२०.
पाचारण केलेले, निवडलेले व विश्वासू
१६, १७. (अ) गौरवात येण्यासाठी सर्व १,४४,००० जनांच्या बाबतीत कोणती गोष्ट खरी ठरली पाहिजे? (ब) “दहा राजे” कोण आहेत आणि ख्रिस्ताच्या ‘बांधवांच्या’ पार्थिव शेषासोबत ते कशा प्रकारे वागत आहेत?
१६ येशूच्या खंडणी यज्ञार्पणाच्या पहिल्या अनुप्रयोगामुळे १,४४,००० जनांना स्वर्गीय जीवनासाठी पाचारण करणे आणि देवाच्या आत्म्याद्वारे उत्पन्न करून निवडले जाणे शक्य होते. अर्थातच, गौरवात येण्यासाठी त्यांनी, ‘पाचारण व निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न’ केला पाहिजे तसेच त्यांनी मृत्यूपर्यंत विश्वासू राहिले पाहिजे. (२ पेत्र १:१०; इफिसकर १:३-७; प्रकटीकरण २:१०) अभिषिक्त जनांचा लहान शेष अद्यापही पृथ्वीवर असून ‘दहा राजांचा’ विरोध असतानाही आपली सचोटी राखून आहे; हे दहा राजे सर्व राजकीय शक्तींना सूचित करतात. देवदूताने म्हटले: “हे कोकऱ्याबरोबर लढतील, परंतु कोकरा त्यास जिंकील, कारण तो प्रभूंचा प्रभु आणि राजांचा राजा आहे; आणि जे त्याच्याबरोबर आहेत ते पाचारण केलेले, निवडलेले व विश्वासू आहेत.”—प्रकटीकरण १७:१२-१४.
१७ “राजांचा राजा,” अर्थात येशू ख्रिस्त स्वर्गात असल्यामुळे मानवी राज्यकर्ते त्याला काहीही करू शकत नाहीत. पण अद्यापही पृथ्वीवर असलेल्या त्याच्या बाकीच्या शेष ‘बांधवांशी’ ते शत्रुभाव दाखवतात. (प्रकटीकरण १२:१७) “राजांचा राजा” आणि त्याचे ‘बांधव’—“पाचारण केलेले, निवडलेले आणि विश्वासू” जण हर्मगिदोनाच्या देवाच्या युद्धात विजय मिळवतील तेव्हा हा शत्रुभाव संपुष्टात आलेला असेल. (प्रकटीकरण १६:१४, १६) तोपर्यंत, आत्म्याने उत्पन्न झालेले ख्रिस्ती फार कामात आहेत. यहोवाद्वारे गौरवात येण्यापूर्वी ते सध्या काय करत आहेत?
तुमचे उत्तर काय आहे?
◻ देव ‘स्वर्गीय गौरवात’ कोणाला आणतो?
◻ “देवापासून जन्मलेला” याचा काय अर्थ होतो?
◻ काही ख्रिश्चनांसोबत ‘आत्मा साक्ष देतो’ ते कशा प्रकारे?
◻ आत्म्याने उत्पन्न झालेल्यांना कोणत्या करारांत घेण्यात आले आहे?
[१५ पानांवरील चित्र]
सा. यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी स्वर्गीय गौरवात नेण्याचा मार्ग खुला करण्यात आल्याचा पुरावा देण्यात आला