स्वर्गीय नागरिकत्व असलेले ख्रिस्ती साक्षीदार
“आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे.”—फिलिप्पैकर ३:२०
१. काही मानवांबद्दल यहोवाचा कोणता अद्भुत उद्देश आहे?
मानव म्हणून जन्माला आलेले, स्वर्गामध्ये राजे व याजक या नात्याने राज्य करतील. होय ते देवदूतांवरही राज्य करतील. (१ करिंथकर ६:२, ३; प्रकटीकरण २०:६) किती आश्चर्यकारक ते सत्य आहे! तरीही, यहोवाने ते उद्देशिले आहे व तो त्याचा एकुलता एक पुत्र, येशू ख्रिस्त याच्याकरवी ते पूर्ण करतो. आपला निर्माणकर्ता असे का करतो? आणि याबद्दलच्या ज्ञानाचा एका ख्रिस्ती व्यक्तीवर कसा परिणाम झाला पाहिजे? बायबल या प्रश्नांची उत्तरे कशा रीतीने देते ते आपण पाहू या.
२. येशू कोणती नवी गोष्ट करील असे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने म्हटले व ही नवी गोष्ट कशाशी संबंधित होती?
२ बाप्तिस्मा करणारा योहान येशूसाठी मार्ग तयार करत होता तेव्हा येशू काहीतरी नावीन्यपूर्ण करणार आहे अशी त्याने घोषणा केली. अहवाल म्हणतो: “[योहान] घोषणा करून म्हणत असे, माझ्यापेक्षा समर्थ असा कोणी एक माझ्यामागून येत आहे; त्याच्या पायतणांचा बंद लवून सोडण्याची देखील माझी पात्रता नाही. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला आहे; तो तर तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे.” (मार्क १:७, ८) त्या काळाआधी कोणाचाही बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने झालेला नव्हता. ही एक नवी व्यवस्था होती ज्यामध्ये पवित्र आत्मा गोवलेला होता आणि तिचा संबंध स्वर्गीय आधिपत्यासाठी मानवांना तयार करणाऱ्या यहोवाच्या नुकत्याच प्रकट होणाऱ्या उद्देशासोबत होता.
‘नव्याने जन्म घेणे’
३. येशूने स्वर्गीय राज्याच्या कोणत्या नवीन गोष्टींची माहिती निकदेमाला दिली?
३ येशू एका प्रमुख परूशीसोबत गुप्तपणे बोलत होता तेव्हा त्याने या ईश्वरी उद्देशाबद्दल आणखी काही सांगितले. निकदेम नावाचा हा परूशी येशूकडे रात्री आला आणि येशू त्याला म्हणाला: “नव्याने जन्मल्यावाचून कोणालाहि देवाचे राज्य पाहता येत नाही.” (योहान ३:३) निकदेम परूशी असल्यामुळे त्याने इब्री शास्त्रवचनांचा अभ्यास केला असावा, म्हणूनच त्याला देवाच्या राज्याच्या महान सत्याविषयीची थोडीफार माहिती होती. हे राज्य ‘मानव पुत्रासारख्या’ कोणाला तरी आणि “देवाची प्रजा जे पवित्र जन त्यास” दिले जाईल असे दानीएलाच्या पुस्तकाने भविष्यवाणी केली. (दानीएल ७:१३, १४, २७) हे राज्य इतर सर्व राज्यांचे “चूर्ण करून . . . ते” सर्वकाळ टिकून राहणार होते. (दानीएल २:४४) कदाचित, या भविष्यवाण्या यहुदी राष्ट्राच्या बाबतीत पूर्ण होतील असा निकदेमने विचार केला असेल; परंतु ते राज्य पाहण्यासाठी एखाद्याला नव्याने जन्म घ्यावा लागेल असे येशूने त्याला सांगितले. निकदेमाला ते समजले नाही म्हणून येशू पुढे म्हणाला: “पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावाचून कोणी देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही.”—योहान ३:५.
४. पवित्र आत्म्यापासून जन्मलेल्यांचा यहोवाबरोबरचा त्यांचा नातेसंबंध कशा रीतीने बदलेल?
४ पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा घेण्याविषयी बाप्तिस्मा करणारा योहान बोलला होता. आता, देवाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी एखाद्याला पवित्र आत्म्यापासून जन्मले पाहिजे असे येशू म्हणतो. या अद्वितीय जन्माद्वारे, अपरिपूर्ण पुरुष आणि स्त्रियांचा यहोवा देवासोबत एक खास नातेसंबंध निर्माण होतो. ते त्याची दत्तक मुले होतात. आपण वाचतो: “जितक्यांनी [येशूचा] स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला; त्यांचा जन्म रक्त, अथवा देहाची इच्छा, अथवा मनुष्याची इच्छा ह्यांपासून झाला नाही; तर देवापासून झाला.”—योहान १:१२, १३; रोमकर ८:१५.
देवाची मुले
५. विश्वासू शिष्यांचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा कधी झाला व त्याच वेळी पवित्र आत्म्याशी संबंधित कोणत्या गोष्टी घडल्या?
५ येशू निकदेमाबरोबर बोलण्याआधीच, देवाच्या राज्याच्या भावी राजत्वासाठी येशूचा पवित्र आत्म्याने अभिषेक झाला होता आणि देवाने त्याला त्याचा पुत्र म्हणून जाहीरपणे कबूल केले होते. (मत्तय ३:१६, १७) सा. यु. ३३ पेन्टेकॉस्टच्या रोजी यहोवाची आणखी आध्यात्मिक मुले जन्मली. जेरूसलेममधील एका माडीवरील खोलीत एकत्र झालेल्या विश्वासू शिष्यांचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा झाला. त्याच वेळी देवाचे आध्यात्मिक पुत्र होण्यासाठी पवित्र आत्म्यापासून त्यांचा नव्याने जन्म झाला. (प्रेषितांची कृत्ये २:२-४, ३८; रोमकर ८:१५) शिवाय, एका भावी स्वर्गीय वारशासाठी त्यांचा पवित्र आत्म्याने अभिषेक करण्यात आला होता. त्या स्वर्गीय आशेच्या खात्रीचे सूचक म्हणून त्यांना पहिल्यांदा पवित्र आत्म्याने मुद्रांकित करण्यात आले होते.—२ करिंथकर १:२१, २२.
६. स्वर्गीय राज्याविषयी यहोवाचा काय उद्देश आहे आणि मानवांचा यामध्ये भाग असणे उचित का आहे?
६ राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी देवाने निवडलेल्या अपरिपूर्ण मानवांपैकी हे प्रथम होते. म्हणजेच, मृत्यू व पुनरुत्थानानंतर त्यांना मानव आणि देवदूत यांच्यावर राज्य करणाऱ्या त्या स्वर्गीय राज्य संघटनेचे भाग व्हावयाचे होते. या राज्याकरवी यहोवाचे महान नाव पवित्र केले जाईल व सर्व सृष्टीसमोर त्याच्या सार्वभौमत्वाचे समर्थन होईल असा त्याचा उद्देश आहे. (मत्तय ६:९, १०; योहान १२:२८) त्या राज्यात या मानवांचा एक भाग असणे किती उचित आहे! एदेन बागेमध्ये सैतानाने यहोवाच्या सार्वभौमत्वाविरुद्ध त्याचे पहिले आव्हान उपस्थित करण्यासाठी मानवांचा उपयोग केला आणि आता त्या आव्हानाचे उत्तर देण्यामध्ये मानव गोवले जातील असे यहोवा उद्देशितो. (उत्पत्ती ३:१-६; योहान ८:४४) त्या राज्यात राज्य करण्यासाठी निवडलेल्या व्यक्तींना प्रेषित पेत्राने लिहिले: “आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी, त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला; . . . तुम्हासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे.”—१ पेत्र १:३, ४.
७. पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा झालेले येशूसोबत कोणत्या अद्वितीय नातेसंबंधाचा आनंद लुटतात?
७ देवाचे दत्तक पुत्र या नात्याने, हे निवडलेले ख्रिस्ती येशू ख्रिस्ताचे भाऊ झाले. (रोमकर ८:१६, १७; ९:४, २६; इब्रीयांस २:११) येशू, अब्राहामाचे वचनदत्त संतान ठरल्यामुळे आत्म्याने अभिषिक्त झालेले हे ख्रिस्ती त्या संतानाचे सहकारी किंवा दुय्यम भाग आहेत. ते विश्वासू मानवजातीला आशीर्वाद प्रदान करील. (उत्पत्ती २२:१७, १८; गलतीकर ३:१६, २६, २९) कोणता आशीर्वाद? पापापासून मुक्त होऊन देवासोबत समेट करण्याची आणि आता व चिरकालासाठी त्याची सेवा करण्याची संधी. (मत्तय ४:२३; २०:२८; योहान ३:१६, ३६; १ योहान २:१, २) पृथ्वीवरील अभिषिक्त ख्रिस्ती, त्यांचा आध्यात्मिक भाऊ येशू ख्रिस्त आणि त्यांचा दत्तक पिता यहोवा देव या दोघांबद्दलची साक्ष देऊन सरळ अंतःकरणाच्या लोकांना या आशीर्वादाकडे निर्देशन करतात.—प्रेषितांची कृत्ये १:८; इब्रीयांस १३:१५.
८. आत्म्याने अभिषिक्त झालेल्या देवाच्या पुत्रांचे “प्रगट” होणे काय आहे?
८ बायबल, आत्म्याने अभिषिक्त झालेल्या देवाच्या या पुत्रांच्या “प्रगट” होण्याविषयी बोलते. (रोमकर ८:१९) येशूबरोबर या राज्यामध्ये सहराजे म्हणून प्रवेश केल्याने, सैतानाच्या जगाच्या व्यवस्थीकरणाचा नाश करण्यात तेही भाग घेतात. त्यानंतर, एक हजार वर्षांसाठी ते मानवजातीला खंडणी बलिदानाचे लाभ देण्यासाठी मदत करतात व अशा प्रकारे आदामाने गमावलेल्या परिपूर्णतेप्रत मानवजातीला आणतात. (२ थेस्सलनीकाकर १:८-१०; प्रकटीकरण २:२६, २७; २०:६; २२:१, २) त्यांच्या या प्रकटीकरणात या सर्व बाबी समाविष्ट आहेत. विश्वासू मानवजात आतुरतेने वाट पाहत असलेली ही गोष्ट आहे.
९. बायबल अभिषिक्त ख्रिश्चनांच्या जगव्याप्त वर्गाचा उल्लेख कसा करते?
९ अभिषिक्त ख्रिश्चनांचा हा जगव्याप्त वर्ग ‘स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांची मंडळी’ आहे. (इब्रीयांस १२:२३) येशूच्या खंडणी बलिदानापासून लाभ मिळवणारे हे प्रथम आहेत. शिवाय, ते “ख्रिस्ताचे शरीर” आहेत व यातून त्यांचा परस्परातील आणि येशूसोबतचा जवळचा नातेसंबंध दिसून येतो. (१ करिंथकर १२:२७) पौलाने लिहिले: “कारण जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे. कारण आपण यहुदी असू किंवा हेल्लेणी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे. आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचारित झालो आहो.”—१ करिंथकर १२:१२, १३; रोमकर १२:५; इफिसकर १:२२, २३; ३:६.
‘देवाचे इस्राएल’
१०, ११. पहिल्या शतकात नव्या इस्राएलची आवश्यकता का होती व हे नवे राष्ट्र कोणाचे मिळून बनले आहे?
१० येशू वचनदत्त मशीहा म्हणून येण्याच्या १,५०० पेक्षा अधिक वर्षांआधी, दैहिक इस्राएल राष्ट्र यहोवाचे खास लोक होते. वेळोवेळी स्मरणिका देऊनही ते संपूर्ण राष्ट्र अविश्वासू ठरले. येशू प्रकट झाला तेव्हा त्या राष्ट्राने त्याला नाकारले. (योहान १:११) म्हणूनच येशूने यहुदी धार्मिक नेत्यांना सांगितले: “देवाचे राज्य तुम्हापासून काढून घेतले जाईल व जी प्रजा त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल.” (मत्तय २१:४३) ‘राज्याचे फळ देणाऱ्या प्रजेला’ ओळखणे तारणासाठी महत्त्वपूर्ण आहे.
११ हे नवे राष्ट्र, सा. यु. ३३ पेन्टेकॉस्ट रोजी जन्मलेली अभिषिक्त ख्रिस्ती मंडळी आहे. तिचे प्रथम सदस्य येशूचे यहुदी शिष्य होते ज्यांनी त्याला आपला स्वर्गीय राजा म्हणून स्वीकारले. (प्रेषितांची कृत्ये २:५, ३२-३६) ते देवाच्या नव्या राष्ट्राचे सदस्य त्यांच्या यहुदी वंशामुळे नव्हे तर येशूवर प्रकट केलेल्या विश्वासाच्या आधारामुळे होते. म्हणूनच देवाचे हे नवे इस्राएल असामान्य होते—ते एक आध्यात्मिक राष्ट्र होते. बहुतांश यहुद्यांनी येशूला स्वीकारण्यास नकार दिला तेव्हा, त्या नव्या राष्ट्राचे भाग होण्याचे निमंत्रण शोमरोनी लोकांना आणि मग विदेश्यांना देण्यात आले. त्या नव्या राष्ट्राला ‘देवाचे इस्राएल’ असे संबोधण्यात आले.—गलतीकर ६:१६.
१२, १३. नवे इस्राएल यहुदी धर्माचा कोणताही पंथ नव्हता हे कसे स्पष्ट झाले?
१२ प्राचीन इस्राएलमध्ये गैर-यहुदी, यहुदीयमतानुसारी बनल्यावर त्यांना मोशेच्या नियमशास्त्राच्या अधीन व्हावे लागत होते व त्याचे द्योतक म्हणून पुरुषांना सुंता करावी लागत होती. (निर्गम १२:४८, ४९) देवाच्या इस्राएलमधील गैर-यहुद्यांकरताही हेच लागू झाले पाहिजे असे काही यहुदी ख्रिश्चनांना वाटत होते. परंतु, यहोवाच्या मनात काहीतरी वेगळे होते. पवित्र आत्म्याने प्रेषित पेत्राला विदेशी कर्नेल्याच्या घरी जाण्यास निर्देशित केले. कर्नेल्य आणि त्याच्या कुटुंबाने पेत्राच्या प्रचाराला प्रतिसाद दिल्यावर—पाण्याने बाप्तिस्मा होण्याआधीच त्यांना पवित्र आत्मा मिळाला. यावरून हे स्पष्टपणे दिसून आले, की यहोवाने या विदेश्यांना मोशेच्या नियमशास्त्राच्या अधीन होण्याची मागणी न करता देवाच्या इस्राएलचे सदस्य म्हणून स्वीकारले होते.—प्रेषितांची कृत्ये १०:२१-४८.
१३ ख्रिस्ती विश्वासातील काही लोकांना हे मानण्यास जरा कठीण गेले आणि लवकरच या बाबीची चर्चा जेरूसलेममधील प्रेषितांसोबत व वडिलांसोबत करावी लागली. त्या अधिकृत श्रेणीने, ख्रिस्ती विश्वासातील गैर-यहुद्यांवर पवित्र आत्मा सक्रिय कसा होता या सविस्तर माहितीशी संबंधित असलेली साक्ष ऐकून घेतली. हे, प्रेरित भविष्यवाणीच्या पूर्णतेच्या एकवाक्यतेत असल्याचे बायबलच्या संशोधनाने दाखवून दिले. (यशया ५५:५; आमोस ९:११, १२) त्या चर्चेनंतर एक उचित निर्णय घेण्यात आला: गैर-यहुद्यांना मोशेच्या नियमशास्त्राच्या अधीन राहण्याची काही गरज नव्हती. (प्रेषितांची कृत्ये १५:१, ६-२९) अशा प्रकारे आध्यात्मिक इस्राएल केवळ एक यहुदी पंथ नसून खरोखरच एक नवे राष्ट्र होते.
१४. याकोबाने ख्रिस्ती मंडळीला ‘बारा वंशातील पांगलेले लोक’ असे संबोधले तेव्हा त्यातून काय सूचित होते?
१४ याच्या सुसंगतेत, पहिल्या शतकातील अभिषिक्त ख्रिश्चनांना लिहिताना शिष्य याकोबाने त्याचे पत्र “बारा वंशातील पांगलेल्या लोकास” उद्देशून लिहिले. (याकोब १:१; प्रकटीकरण ७:३-८) अर्थात, नवीन इस्राएलाच्या नागरिकांना विशिष्ट वंशाचे म्हणून नेमण्यात आले नव्हते. दैहिक इस्राएलमध्ये होते त्याप्रमाणे आध्यात्मिक इस्राएलचे १२ विविध वंश असे विभाजन केले नव्हते. तरीसुद्धा, यहोवाच्या नजरेमध्ये देवाच्या इस्राएलने १२ वंशाच्या दैहिक इस्राएलची पूर्णपणे जागा घेतली होती हे याकोबाची प्रेरित अभिव्यक्ती सूचित करते. एखादा इस्राएली, नव्या राष्ट्राचा भाग झाला तर त्याच्या दैहिक कुळाला—मग तो यहुदा किंवा लेवीच्या वंशाचा असला तरी—काही महत्त्व नव्हते.—गलतीकर ३:२८; फिलिप्पैकर ३:५, ६.
नवा करार
१५, १६. (अ) यहोवा, देवाच्या इस्राएलमधील गैर-यहुदी सदस्यांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो? (ब) कोणत्या कायदेशीर आधारावर नव्या इस्राएलची स्थापन करण्यात आली होती?
१५ यहोवाच्या दृष्टिकोनामध्ये या नव्या राष्ट्राचे गैर-यहुदी सदस्य पूर्णपणे आध्यात्मिक यहुदी आहेत! प्रेषित पौलाने स्पष्टीकरण दिले: “जो बाह्यात्कारी यहूदी तो यहूदी नव्हे आणि देहाची बाह्यात्कारी सुंता ती सुंता नव्हे; परंतु जो अंतरी यहूदी तो यहूदी होय; आणि लेखाप्रमाणे व्हावयाची ती सुंता नव्हे तर आध्यात्मिकदृष्ट्या जी अंतःकरणाची व्हावयाची ती सुंता होय; अशाची प्रशंसा माणसाकडून नव्हे, तर देवाकडून होते.” (रोमकर २:२८, २९) देवाच्या इस्राएलचे भाग होण्याच्या आमंत्रणाला पुष्कळ विदेशांनी प्रतिसाद दिला व ह्या वाढीने बायबलच्या भविष्यवाणीला पूर्ण केले. उदाहरणार्थ, संदेष्टा होशेय याने लिहिले: “जी दया पावली नव्हती तिच्यावर मी दया करीन; आणि जे माझे लोक नव्हते त्यांना मी म्हणेन, तुम्ही माझे लोक आहा; आणि ते म्हणतील, तू माझा देव आहेस.”—होशेय २:२३, (पंडिता रमाबाई भाषांतर); रोमकर ११:२५, २६.
१६ आध्यात्मिक इस्राएली मोशेच्या नियमशास्त्र कराराच्या अधीन नव्हते तर कोणत्या आधारावर ते नव्या राष्ट्राचे भाग होते? यहोवाने या आध्यात्मिक राष्ट्रासोबत येशूद्वारे एक नवीन करार केला. (इब्रीयांस ९:१५) येशूने निसान १४, सा. यु. ३३ रोजी त्याच्या मृत्यूचा स्मारक सुरू केला तेव्हा त्याने त्याच्या ११ विश्वासू शिष्यांना भाकर आणि द्राक्षारस दिला व द्राक्षारस “कराराचे रक्त” याला चित्रित करते असे तो म्हणाला. (मत्तय २६:२८; यिर्मया ३१:३१-३४) लूकच्या अहवालात सांगितल्याप्रमाणे, द्राक्षारसाचा प्याला “नवा करार” याला चित्रित करतो असे येशूने म्हटले. (लूक २२:२०) येशूच्या शब्दांच्या पूर्णतेत, पेन्टेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा ओतला गेला व देवाच्या इस्राएलचा जन्म झाला तेव्हा, दैहिक इस्राएलांकडून राज्य काढून घेऊन नव्या, आध्यात्मिक इस्राएल राष्ट्राला देण्यात आले. दैहिक इस्राएलच्या जागी, हे नवे राष्ट्र आता यहोवाच्या साक्षीदारांचा मिळून बनलेला त्याचा दास होता.—यशया ४३:१०, ११.
“नवी यरूशलेम”
१७, १८. प्रकटीकरणाच्या पुस्तकात, अभिषिक्त ख्रिश्चनांसाठी जे वैभव राखून ठेवण्यात आले आहे त्याचे कोणते विवरण दिले आहे?
१७ स्वर्गीय बोलावण्याच्या विशेषाधिकारात सहभाग घेणाऱ्यांसाठी केवढे वैभव राखून ठेवले आहे! शिवाय, त्यांच्या भवितव्यात असलेल्या अजब गोष्टींविषयी शिकून घेणे किती आनंदविणारे आहे! प्रकटीकरणाचे पुस्तक आपल्याला त्यांच्या स्वर्गीय वारसाची रोमहर्षक झलक देते. उदाहरणासाठी, प्रकटीकरण ४:४ येथे आपण वाचतो: “[यहोवाच्या] राजासनाभोवती चोवीस आसने होती; आणि त्या आसनांवर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले व डोक्यांवर सोन्याचे मुगूट घातलेले चोवीस वडील बसलेले होते.” हे चोवीस वडील अभिषिक्त ख्रिस्ती आहेत ज्यांचे पुनरुत्थित होऊन यहोवाने त्यांना अभिवचन दिल्याप्रमाणे त्यांनी स्वर्गीय हुद्दा स्वीकारला आहे. त्यांचे मुकुट आणि आसने आपल्याला त्यांच्या राजत्वाची आठवण करून देतात. यहोवाच्या सिंहासनाभोवती सेवा करण्यास त्यांना मिळालेल्या आश्चर्यकारक उच्च विशेषाधिकाराचा देखील विचार करा!
१८ प्रकटीकरण १४:१ मध्ये आपण त्यांच्याविषयीची आणखी एक झलक पाहू शकतो: “नंतर मी पाहिले, तो पाहा, कोकरा सीयोन डोंगरावर उभा राहिलेला दृष्टीस पडला; त्याच्याबरोबर त्याचे नाव व त्याच्या पित्याचे नाव कपाळावर लिहिलेले एक लक्ष चव्वेचाळीस हजार इसम होते.” येथे आपण या अभिषिक्त जनांची—१,४४,००० ही सीमित संख्या पाहतो. ज्या अर्थी ते यहोवाचा सिंहासनाधिष्ठ राजा, “कोकरा” येशूसोबत उभे राहतात त्या अर्थी त्यांचे राजसी स्थान समजून येते. शिवाय, ते स्वर्गीय सियोन पर्वतावर आहेत. पार्थिव सियोन पर्वत इस्राएलची राजपुरी जेरूसलेम होते. स्वर्गीय सियोन पर्वत येशू आणि त्याच्या सहवारसांच्या उदात्त स्थानाचे प्रतिनिधीत्व करतो. आणि स्वर्गीय जेरूसलेम या लोकांचेच मिळून बनले आहे.—२ इतिहास ५:२; स्तोत्र २:६.
१९, २०. (अ) अभिषिक्त ख्रिस्ती कोणत्या स्वर्गीय संघटनेचे भाग होतील? (ब) यहोवाने, स्वर्गामध्ये नागरिकत्व मिळणाऱ्या सदस्यांची निवड कोणत्या काळात सुरू केली?
१९ याच्या सुसंगतेत, स्वर्गीय वैभवात असणाऱ्या या अभिषिक्तांना “नवी यरूशलेम” असेही म्हटले जाते. (प्रकटीकरण २१:२) पार्थिव जेरूसलेम “थोर राजाची नगरी” व मंदिराचे ठिकाण देखील होते. (मत्तय ५:३५) स्वर्गीय नवे जेरूसलेम राजसी राज्य संघटना आहे ज्याच्याद्वारे महान सार्वभौम, यहोवा आणि त्याचा नियुक्त राजा येशू आता राज्य करीत आहेत व ज्यामध्ये मानवजातीला बरे करण्यासाठी यहोवाच्या सिंहासनातून समृद्ध आशीर्वाद वाहत असताना याजकीय सेवा सादर केली जाते. (प्रकटीकरण २१:१०, ११; २२:१-५) दुसऱ्या एका दृष्टान्तात योहान, विश्वासू, पुनरुत्थित अभिषिक्त ख्रिश्चनांना ‘कोकऱ्याची नवरी’ असे संबोधल्याचे ऐकतो. येशूबरोबर ते ज्या जवळीकीचा आनंद उपभोगणार आहेत व स्वेच्छेने आज्ञाधारकता प्रदर्शित करतात त्याचे हे किती हृदयाला उब देणारे चित्रण करते! त्यांच्यापैकी शेवटला त्याचे स्वर्गीय बक्षीस मिळवतो तेव्हा स्वर्गामध्ये किती उल्हास असेल त्याची जरा कल्पना करा. आता “कोकऱ्याचे लग्न” एकदाचे होऊ शकते! ती राजसी स्वर्गीय संघटना तेव्हा पूर्ण होईल.—प्रकटीकरण १९:६-८.
२० होय, “आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे” असे पौलाने ज्यांच्याबद्दल म्हटले अशा लोकांसाठी अद्भुत आशीर्वाद राखून ठेवले आहेत. (फिलिप्पैकर ३:२०) जवळजवळ दोन हजार वर्षांपासून यहोवा त्याच्या आध्यात्मिक मुलांना निवडत आहे व त्यांना स्वर्गीय वारशासाठी तयार करत आहे. सर्व पुराव्यानिशी, हे निवडीचे आणि तयारीचे कार्य संपत आले आहे. परंतु, योहानाने त्याला झालेला जो दृष्टान्त प्रकटीकरणाच्या ७ व्या अध्यायात लिहून ठेवल्याप्रमाणे आणखी पुष्कळ गोष्टी पूर्ण होणार होत्या. तर आता आणखी एक ख्रिस्ती गट आहे जो आपले लक्ष वेधतो. त्या गटाविषयी आपण पुढील लेखात विचार करू या.
तुम्हाला आठवते का?
◻ स्वर्गीय वारसा मिळालेल्यांवर पवित्र आत्मा कोणते विविध कार्य करतो?
◻ अभिषिक्त लोक यहोवा आणि येशू या दोघांसोबत कोणत्या प्रकारच्या जवळीकीचा आनंद लुटतात?
◻ अभिषिक्त ख्रिश्चनांच्या मंडळीचे वर्णन बायबलमध्ये कशा प्रकारे करण्यात आले आहे?
◻ कोणत्या कायदेशीर आधारावर देवाच्या इस्राएलची स्थापण्यात करण्यात आली?
◻ अभिषिक्त ख्रिश्चनांसाठी कोणते स्वर्गीय विशेषाधिकार राखून ठेवण्यात आले आहेत?
[१० पानांवरील चित्रं]
जवळजवळ दोन हजार वर्षांच्या काळात यहोवाने स्वर्गीय राज्यात राज्य करणाऱ्यांना निवडले