आपल्या मोलवान विश्वासाला धरून राहू!
“आमच्यासारखा मोलवान् विश्वास मिळालेल्या लोकांना.”—२ पेत्र १:१.
१. येशूने आपल्या प्रेषितांना कोणती ताकीद दिली, पण पेत्राने कशी फुशारकी मारली?
येशूच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी संध्याकाळी त्याने म्हटले की त्याचे सर्व प्रेषित त्याचा त्याग करतील. त्यांपैकी एक, म्हणजे पेत्र, फुशारकी मारीत म्हणाला: “आपणाविषयी सर्व अडखळले तरी मी कधीहि अडखळणार नाही.” (तिरपे वळण आमचे.) (मत्तय २६:३३) पण, याउलटच घडणार हे येशूला माहीत होते. म्हणूनच त्याने त्याच वेळी पेत्राला सांगितले: “तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे; आणि तू वळलास म्हणजे तुझ्या भावांस स्थिर कर [“बळ दे,” NW].”—लूक २२:३२.
२. पेत्राला फाजील आत्मविश्वास होता, पण त्याचा विश्वास हा दुर्बल होता हे त्याच्या कोणत्या कृतींवरून उघड झाले?
२ आपल्या विश्वासासंबंधाने फाजील खात्री बाळगून बसलेल्या पेत्राने त्याच रात्री येशूला नाकारले. चक्क तीन वेळा त्याने ख्रिस्ताची ओळखही असल्याचे नाकबूल केले! (मत्तय २६:६९-७५) तो ‘वळला’ तेव्हा ‘तुझ्या भावांस बळ दे,’ हे त्याच्या धन्याचे शब्द त्याच्या मनात मोठ्याने आणि स्पष्टपणे निनादले असतील. या आदेशाचा पेत्राच्या उर्वरित आयुष्यावर जबरदस्त प्रभाव पडला; बायबलमध्ये जतन करून ठेवलेल्या त्याच्या दोन पत्रांवरून याचा पुरावा मिळतो.
पेत्राच्या पत्रांचे प्रयोजन
३. पेत्राने त्याचे पहिले पत्र का लिहिले?
३ येशूच्या मृत्यूनंतर साधारण ३० वर्षांनी, पेत्राने पंत, गलतिया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया येथील बांधवांना उद्देशून आपले पहिले पत्र लिहिले; हे प्रदेश आता उत्तर आणि पश्चिम तुर्कस्थानाचे भाग आहेत. (१ पेत्र १:१) पेत्राने ज्यांना उद्देशून हे पत्र लिहिले, त्यांमध्ये निश्चितच यहुद्यांचा समावेश होता; या यहुद्यांत, सा.यु. पेन्टेकॉस्ट ३३ रोजी ख्रिस्ती बनलेले देखील काही असतील. (प्रेषितांची कृत्ये २:१, ७-९) शिवाय, विरोधकांच्या हातून भयंकर परीक्षांना तोंड देत असलेले बरेचसे गैरयहुदीही होते. (१ पेत्र १:६, ७; २:१२, १९, २०; ३:१३-१७; ४:१२-१४) या कारणास्तव, पेत्राने या बांधवांना प्रोत्साहनात्मक पत्र लिहिले. त्यांनी ‘विश्वासाचे पर्यवसान म्हणजे आपल्या जिवांचे तारण’ प्राप्त करावे म्हणून त्यांना साहाय्य करण्याचा पेत्राचा उद्देश होता. यामुळे निरोपाचा सल्ला देताना, त्याने त्यांना आवर्जून म्हटले: “[दियाबलाविरुद्ध] विश्वासांत दृढ असे उभे राहा.”—१ पेत्र १:९; ५:८-१०.
४. पेत्राने त्याचे दुसरे पत्र का लिहिले?
४ नंतर, पेत्राने या ख्रिस्तीजनांना आणखी एक पत्र लिहिले. (२ पेत्र ३:१) का? कारण त्यावेळी पूर्वीपेक्षाही मोठा धोका उपस्थित झाला होता. अनैतिक लोकांकडून सत्य मानणाऱ्यांमध्ये अशुद्ध वर्तनाचे प्रोत्साहन दिले जाण्याची आणि अशारितीने त्यांच्यापैकी काहींची दिशाभूल होण्याची भीती होती! (२ पेत्र २:१-३) शिवाय, पेत्राने थट्टेखोरांविषयीही ताकीद दिली. “सर्वांचा शेवट जवळ आला आहे,” असे त्याने आपल्या पहिल्या पत्रात लिहिले होते आणि आता काहीजण या कल्पनेचा उपहास करीत होते. (१ पेत्र ४:७; २ पेत्र ३:३, ४) पेत्राच्या दुसऱ्या पत्राचे परीक्षण करून, विश्वासात दृढ राहण्याकरता त्याने बांधवांना कशाप्रकारे बळ दिले हे आपण पाहू या. या पहिल्या लेखात, आपण २ पेत्र अध्याय १ विचारात घेऊ.
पहिल्या अध्यायाचा उद्देश
५. समस्यांविषयी चर्चा करण्यापूर्वी पेत्र कशाप्रकारे आपल्या वाचकांची मानसिक तयारी करतो?
५ गंभीर प्रश्नांकडे पेत्र लगेचच वळत नाही. उलटपक्षी, तो या समस्यांची चर्चा करण्यासाठी मार्ग मोकळा व्हावा या उद्देशाने, ख्रिस्ती बनल्यावर आपल्याला जे प्राप्त झाले त्याविषयी त्याच्या वाचकांची कदर वाढवतो. तो त्यांना देवाच्या अद्भुत अभिवचनांची आणि बायबलच्या भविष्यवाण्यांच्या विश्वासार्हतेची आठवण करून देतो. आणि यासाठीच राज्य गौरवातील येशूचा, रूपांतराचा जो दृष्टान्त त्याला स्वतःला झाला होता त्याविषयी तो त्यांना सांगतो.—मत्तय १७:१-८; २ पेत्र १:३, ४, ११, १६-२१.
६, ७. (अ) पेत्राने ज्याप्रकारे आपल्या पत्राची सुरवात केली, त्यावरून आपण काय शिकू शकतो? (ब) कोणालाही मार्गदर्शन देतेवेळी, काही प्रसंगी काय कबूल करणे मदतदायक ठरू शकेल?
६ पेत्राने आपल्या पत्राची ज्याप्रकारे सुरवात केली त्यावरून आपण काही शिकू शकतो का? कोणाला मार्गदर्शन देण्यापूर्वी, आपल्याप्रमाणे त्यांना देखील मोलवान वाटणाऱ्या अद्भुत राज्य आशेच्या वेगवेगळ्या पैलूंविषयी त्यांच्यासोबत चर्चा केल्यास ते मार्गदर्शन स्वीकारणे त्यांना अधिक सोपे जाणार नाही का? एखादा वैयक्तिक अनुभव अशाप्रसंगी सांगता येईल का? कदाचित येशूचा मृत्यू झाल्यावरच, राज्य गौरवातील येशूचा दृष्टान्त पाहिल्याचे पेत्राने अनेकदा सांगितले होते.—मत्तय १७:९.
७ शिवाय, हेही लक्षात असू द्या की पेत्राने त्याचे दुसरे पत्र लिहिले तोपर्यंत मत्तयाचे शुभवर्तमान आणि प्रेषित पौलाचे गलतीकरांस लिहिलेले पत्र सर्वत्र वितरीत झाले असल्याची दाट शक्यता आहे. म्हणून पेत्राच्या स्वाभाविक कमतरता आणि त्याच्या विश्वासाचा तेव्हापर्यंतचा हवाला त्याच्या समकालीन लोकांमध्ये सर्वश्रुत असावा. (मत्तय १६:२१-२३; गलतीकर २:११-१४) पण यामुळे स्वतःला व्यक्त करताना त्याचे धैर्य खचले नाही. उलट, स्वतःच्या कमतरतांची जाणीव असलेल्या लोकांना तर त्याचे पत्र आणखीनच अपीलकारक वाटले असावे. हे लक्षात घेता, ज्यांना समस्या आहेत अशांना मदत करताना आपल्या हातूनही चूक होऊ शकते हे आपण कबूल केल्यास ते प्रभावकारक ठरणार नाही का?—रोमकर ३:२३; गलतीकर ६:१.
बळ देणारे अभिवादन
८. पेत्राने “विश्वास” या शब्दाचा कोणत्या अर्थाने उपयोग केला असल्याची शक्यता आहे?
८ आता पेत्राचे अभिवादन लक्षात घ्या. तो लगेच विश्वासाच्या विषयाकडे वळतो; येथे तो आपल्या वाचकांना ‘आमच्यासारखा मोलवान् विश्वास मिळालेले लोक’ असे म्हणून संबोधतो. (२ पेत्र १:१) या ठिकाणी “विश्वास” या शब्दाचा अर्थ कदाचित “आग्रहाने मन वळविले जाणे” असा असून तो एकंदर ख्रिस्ती विश्वास आणि शिकवणुकी यांच्या संदर्भात वापरण्यात आला आहे ज्यांस कधी कधी शास्त्रवचनांत “सत्य” म्हणून संबोधण्यात येते. (गलतीकर ५:७; २ पेत्र २:२; २ योहान १) एखाद्या व्यक्तीवर किंवा गोष्टीवर असलेला भरवसा किंवा खात्री या सर्वसामान्य अर्थबोधाऐवजी, “विश्वास” हा शब्द कित्येकदा वरील अर्थाने वापरण्यात येतो.—प्रेषितांची कृत्ये ६:७; २ करिंथकर १३:५; गलतीकर ६:१०; इफिसकर ४:५; यहुदा ३.
९. पेत्राच्या अभिवादनाने खासकरून गैरयहुदी लोकांची मने का जिंकली असावीत?
९ पेत्राच्या या अभिवादनाने नक्कीच गैरयहुदी वाचकांचे मन जिंकले असेल. यहुदी लोक गैरयहुद्यांपासून अगदीच फटकून राहात असत, त्यांना अगदी तुच्छ लेखत; आणि गैरयहुद्यांविषयी ही पक्षपाती भावना, जे यहुदी ख्रिस्ती बनले होते त्यांमध्येही कायम राहिली. (लूक १०:२९-३७; योहान ४:९; प्रेषितांची कृत्ये १०:२८) परंतु, यहुदी घराण्यात जन्मलेला आणि येशूचा प्रेषित असलेला पेत्र मात्र असे म्हणतो की त्याचे वाचक—मग ते यहुदी असोत वा गैरयहुदी—त्यांनाही त्याच्यासारखाच विश्वास मिळाला आहे आणि त्याच्याबरोबरीचा विशेषाधिकार लाभला आहे.
१०. पेत्राच्या अभिवादनातून आपल्याला कोणते धडे शिकायला मिळतात?
१० पेत्राच्या या अभिवादनातून आपल्याला आजच्या काळाकरता समर्पक असणारे कोणकोणते चांगले धडे मिळतात ते पाहा. देव पक्षपाती नाही; तो कोणत्याही विशिष्ट जातीच्या किंवा राष्ट्राच्या लोकांना इतरांपेक्षा अधिक पसंत करतो असे नाही. (प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५; ११:१, १७; १५:३-९) येशूने शिकविले त्यानुसार, सर्व ख्रिस्तीजन एकमेकांचे बांधव आहेत, आणि आपल्यापैकी कोणीही स्वतःला इतरांपेक्षा वरचढ समजू नये. याशिवाय, पेत्राच्या अभिवादनातून हा मुद्दा आणखी बळकट होतो, की आपण सर्वजण खरोखर एका जगव्याप्त बंधुसमाजात सहभागी असून, पेत्र आणि त्याचे सहप्रेषित ‘यांच्यासारखा मोलवान विश्वास मिळालेले लोक’ आहोत.—मत्तय २३:८; १ पेत्र ५:९.
ज्ञान आणि देवाची अभिवचने
११. अभिवादन केल्यावर, पेत्र कोणत्या आवश्यक गोष्टींवर जोर देतो?
११ या अभिवादनानंतर, पेत्र लिहितो: “तुम्हांला कृपा व शांति विपुल मिळो.” आपल्याला कृपा व शांती वैपुल्याने कशी मिळतात? पेत्र उत्तर देतो, “देव व आपला प्रभु येशू ह्यांच्या ओळखीने [“अचूक ज्ञानाने,” NW].” पुढे तो म्हणतो: “ईश्वरी सामर्थ्याने, जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत.” पण या अत्यावश्यक गोष्टी आपल्याला कशा प्राप्त होतात? तर “ज्याने तुम्हांआम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले त्याच्या ओळखीच्या [“अचूक ज्ञानाच्या,” NW] द्वारे.” अशारितीने पेत्र दोनवेळा यावर जोर देतो, की देव आणि त्याचा पुत्र यांचे अचूक ज्ञान आवश्यक आहे.—२ पेत्र १:२, ३; योहान १७:३.
१२. (अ) अचूक ज्ञानाच्या महत्त्वावर पेत्र का जोर देतो? (ब) देवाच्या अभिवचनांचा लाभ प्राप्त करण्यासाठी आपण आधी काय करणे आवश्यक आहे?
१२ ज्यांच्याविषयी पेत्र २ ऱ्या अध्यायात ताकीद देतो ते “खोटे शिक्षक” ख्रिश्चनांना फसवण्याच्या उद्देशाने “बनावट गोष्टी” उपयोगात आणतात. या प्रकारे ते त्यांना फुसलावून परत त्याच अनैतिकतेत नेऊ पाहतात जिच्यातून त्यांची सुटका झाली होती. “प्रभु व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या [“अचूक,” NW] ज्ञानाच्या द्वारे,” तारण झाल्यावर जे अशाप्रकारच्या बनावट गोष्टींना बळी पडतात, त्यांना याचे विपत्तीजनक परिणाम भोगावे लागतात. (२ पेत्र २:१-३, २०) अर्थात, याच समस्येविषयी नंतर ऊहापोह करण्याचा मार्ग मोकळा करीत, पेत्र आपल्या पत्राच्या अगदी प्रस्तावनेलाच देवासमोर निष्कलंक स्थिती कायम राखण्यात अचूक ज्ञानाची कोणती भूमिका आहे त्यावर जोर देतो. पेत्र असा मुद्दा मांडतो की देवाने ‘मोलवान् व अति महान् अशी वचने आपल्याला दिली आहेत, ह्यासाठी की, त्यांच्या द्वारे आपण ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे.’ तरीसुद्धा, आपल्या विश्वासाशी अविश्लेष्यपणे जोडलेल्या या अभिवचनांचा लाभ प्राप्त करण्यासाठी, पेत्र म्हणतो की आपण आधी ‘वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवली पाहिजे.’—२ पेत्र १:४.
१३. अभिषिक्त ख्रिश्चन आणि “दुसरी मेंढरे” यांचा, कोणत्या गोष्टीला धरून राहण्याचा संकल्प आहे?
१३ देवाच्या अभिवचनांविषयी तुम्ही कशाप्रकारचा दृष्टिकोन बाळगता? तुमचा दृष्टिकोन अभिषिक्त ख्रिश्चनांच्या शेषवर्गासारखा आहे का? ७५ वर्षांपासून सातत्याने पूर्ण वेळेची सेवा केल्यावर १९९१ साली, वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष फ्रेड्रिक फ्रान्झ यांनी ख्रिस्तासोबत राज्य करण्याची आशा असलेल्यांच्या भावना पुढील शब्दांत मांडल्या: “अगदी या घटकेपर्यंतही आम्ही आमचा विश्वास धरून ठेवला आहे, आणि देव आपली ‘मोलवान् व अति महान् अशी वचने’ वास्तविकतः खरी आहेत हे सिद्ध करीत नाही तोपर्यंत आम्ही तो धरणार आहोत.” स्वर्गीय पुनरुत्थानाविषयीच्या देवाच्या अभिवचनांबद्दल बंधू फ्रान्झ विश्वस्त होते आणि वयाच्या ९९ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला तोपर्यंत ते आपल्या विश्वासाला धरून राहिले. (१ करिंथकर १५:४२-४४; फिलिप्पैकर ३:१३, १४; २ तीमथ्य २:१०-१२) त्यांच्यासारखेच लाखो लोक विश्वासाला धरून राहतात, आणि सर्व लोक पृथ्वीवर सर्वदा आनंदाने राहू शकतील असे पार्थिव परादीस आणण्याविषयीच्या देवाच्या अभिवचनावर आपले मनःचक्षू खिळवून ठेवतात. तुम्हीही त्यांच्यापैकी एक आहात का?—लूक २३:४३ २ पेत्र ३:१३ प्रकटीकरण २१:३, ४.
देवाच्या अभिवचनांना प्रतिसाद
१४. विश्वासात भर घालावयाच्या गुणांमध्ये पेत्र सर्वप्रथम सात्विकतेचा उल्लेख का करतो?
१४ देवाने दिलेल्या अभिवचनांबद्दल आपण कृतज्ञ आहोत का? पेत्राने असा युक्तिवाद केला की आपण कृतज्ञ असलो तर ते प्रदर्शित करू. “ह्याच कारणास्तव” (देवाने आपल्याला अति मोलवान वचने दिली या कारणास्तव), आपण कृती करण्यासाठी खरोखर खटपट केली पाहिजे. केवळ विश्वासात असल्याने किंवा बायबल सत्याविषयी थोडीफार माहिती असल्याने आपण समाधान मानता कामा नये. तेवढेच पुरेसे नाही! पेत्राच्या काळात मंडळ्यांतील काहीजण विश्वासाच्या लांबलचक गप्पा मारून स्वतःच अनैतिक वर्तनात सामील झाले असल्याची शक्यता आहे. त्यांचे आचरण सात्विक असणे आवश्यक होते, यामुळेच पेत्राने प्रोत्साहन दिले: ‘आपल्या विश्वासात सात्विकतेची भर घाला.’—२ पेत्र १:५; याकोब २:१४-१७.
१५. (अ) विश्वासात भर घालावयाच्या गुणांत सात्विकते पाठोपाठ ज्ञानाचा उल्लेख का केलेला आहे? (ब) आणखी कोणते गुण आपल्याला आपल्या विश्वासाला धरून ठेवण्यास सहायक ठरतील?
१५ सात्विकतेचा उल्लेख केल्यावर, पेत्राने आणखी सहा गुणांविषयी सांगितले ज्यांची आपल्या विश्वासात भर घालणे अर्थात विश्वासाच्या जोडीला जी विकसित करणे आवश्यक आहे. ‘विश्वासात स्थिर राहण्यासाठी’ यांपैकी प्रत्येक गुण असणे आवश्यक आहे. (१ करिंथकर १६:१३) धर्मत्यागी लोक ‘शास्त्रलेखांचा विपरीत अर्थ’ लावून “भुलवणाऱ्या शिकवणुकींचा” (NW) पुरस्कार करीत होते, यामुळे पेत्राने पुढे, ज्ञान आवश्यक असल्याचे सांगितले; तो म्हणाला: “सात्विकतेत ज्ञानाची [भर घाला].” तो पुढे सांगतो: “ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनात धीराची, धीरात सुभक्तीची, सुभक्तीत बंधुप्रेमाची व बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला.”—२ पेत्र १:५-७; २:१२, १३; ३:१६.
१६. पेत्राने उल्लेखलेल्या गुणांची विश्वासात भर घातल्यास काय होईल, पण असे न केल्यास काय घडेल?
१६ या सात गोष्टींची आपल्या विश्वासात भर घातल्यास काय होईल? पेत्र उत्तर देतो: “हे गुण तुम्हांमध्ये असून ते वाढते असले तर, आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्याच्या ओळखीविषयी [“अचूक ज्ञानाविषयी,” NW] तुम्ही निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही.” (२ पेत्र १:८) दुसरीकडे पाहता, पेत्र म्हणतो: “ज्याच्या अंगी ते नाहीत तो आंधळा आहे, अदूरदृष्टीचा आहे, त्याला आपल्या पूर्वीच्या पापांपासून शुद्ध झाल्याचा विसर पडला आहे.” (२ पेत्र १:९) पेत्राने आधी “तुम्हांमध्ये” आणि “आपला” हे शब्द वापरले पण त्याऐवजी आता त्याने “ज्याच्या,” “तो” आणि “त्याला” असे म्हटले हे लक्षात घ्या. खेदाची गोष्ट ही की काहीजण आंधळे, विसर पडू देणारे आणि अशुद्ध आहेत, पण तरीसुद्धा वाचकही यांपैकीचाच एक आहे असे सुचवण्याचे पेत्र मोठ्या समजूतदारपणे टाळतो.—२ पेत्र २:२.
बांधवांना बळ
१७. “ह्या गोष्टी” आचरण्याचा कोमल आर्जव करण्यासाठी पेत्राला कशाने प्रेरित केले असावे?
१७ खास करून नवीन लोक सहज भुलविले जाऊ शकतात हे ओळखून कदाचित पेत्र त्यांना मोठ्या कोमल शब्दांत प्रोत्साहन देतो: “बंधूनो, तुम्हांस झालेले पाचारण व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. असे तुम्ही केल्यास तुमचे पतन कधीहि होणार नाही.” (२ पेत्र १:१०; २:१८) आपल्या विश्वासात या सात गुणांची भर घालणाऱ्या अभिषिक्त ख्रिश्चनांना एक महान प्रतिफळ लाभेल; पेत्र त्याविषयी सांगतो: “आपला प्रभु व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या सार्वकालिक राज्यात जयोत्सवाने तुमचा प्रवेश होईल.” (२ पेत्र १:११) ‘दुसऱ्या मेंढरांना’ देवाच्या राज्याच्या पृथ्वीवरील राजवटीत एक अविनाशी वतन मिळेल.—योहान १०:१६; मत्तय २५:३३, ३४.
१८. आपल्या बांधवांना “नेहमी आठवण देण्याची” पेत्राने का काळजी घेतली?
१८ आपल्या बांधवांना असे हे महान प्रतिफळ मिळावे अशी पेत्राची प्रांजळ इच्छा आहे. “ह्या कारणास्तव,” तो लिहितो, “जरी तुम्हाला ह्या गोष्टी माहीत आहेत आणि . . . सत्यात तुम्ही स्थिर झालेले आहा तरी तुम्हाला त्यांची नेहमी आठवण देण्याची मी काळजी घेईन.” (२ पेत्र १:१२) येथे पेत्र स्टेरिझो हा ग्रीक शब्द वापरतो; याच शब्दाचे याठिकाणी “स्थिर झालेले आहा,” असे भाषांतर केले आहे तर याआधी येशूने पेत्राला दिलेल्या “तुझ्या भावांस [“बळ दे”]” या आदेशात त्यास “बळ दे” असे भाषांतरीत करण्यात आले आहे. (लूक २२:३२) प्रभूने त्याला दिलेला जोरदार आदेश पेत्राच्या आठवणीत होता असे या शब्दाचा वापर केल्यामुळे सूचित होऊ शकते. पेत्र आता म्हणतो: “मी ह्या मंडपांत [मानवी देहात] आहे तोपर्यंत तुम्हांस आठवण देऊन जागृत ठेवणे हे मला उचित वाटते; कारण मला ठाऊक आहे की . . . मला आपला मंडप लवकरच काढावा लागणार आहे;”—२ पेत्र १:१३, १४.
१९. आपल्याला आज कोणत्या गोष्टींच्या मदतीची गरज आहे?
१९ पेत्र आपल्या वाचकांना समंजसपणे ‘सत्यात स्थिर झालेले’ असे म्हणतो खरा, पण त्यांचे ‘विश्वासरूपी तारू फुटू’ शकते याची त्याला जाणीव आहे. (१ तीमथ्य १:१९) आपला मृत्यू लवकरच होणार असल्याचे त्याला माहीत असल्यामुळे, तो अशा गोष्टींचा उल्लेख करून आपल्या बांधवांना बळ देतो की ज्यांची नंतर आठवण करून ते स्वतःला आध्यात्मिकरित्या बळकट ठेवू शकतील. (२ पेत्र १:१५; ३:१२, १३) तशाचप्रकारे, आपल्याला देखील विश्वासात दृढ राहण्याकरता सातत्याने आठवण करून दिली जाण्याची गरज आहे. आपण कोणीही असलो आणि कितीही वर्षांपासून सत्यात असलो तरीसुद्धा, नियमित बायबल वाचन, वैयक्तिक अभ्यास, आणि मंडळीतील सभांना उपस्थित राहणे यांकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. सभांना न येण्यासाठी काहीजण, खूपच थकलो होतो किंवा सभांमध्ये तेच ते सांगितले जाते किंवा त्या नीट सादर केल्या जात नाहीत अशाप्रकारची निरनिराळी निमित्ते सांगतात, पण फाजील आत्मविश्वास बाळगला तर आपला विश्वास गमावून बसायला फार वेळ लागत नाही हे पेत्राला चांगले माहीत होते.—मार्क १४:६६-७२ १ करिंथकर १०:१२; इब्री लोकांस १०:२५.
आपल्या विश्वासासाठी भक्कम आधार
२०, २१. येशूच्या रूपांतरामुळे पेत्राचा, त्याच्या पत्राच्या वाचकांचा, आणि त्यांतच आज आपला देखील विश्वास कशाप्रकारे बळकट होतो?
२० आपला विश्वास निव्वळ चलाखपणे योजलेल्या कपोलकल्पित गोष्टींवर आधारित आहे का? पेत्र सडेतोड उत्तर देतो: “चातुर्याने कल्पिलेल्या कथांस अनुसरुन आम्ही आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य व आगमन ह्यांसंबंधाने तुम्हास कळविले असे नाही; तर आम्ही त्याचे ऐश्वर्य प्रत्यक्ष पाहणारे होतो.” पेत्र, याकोब व योहान यांनी येशूसोबत असताना त्याला राज्य सामर्थ्य मिळाले असल्याचे दृष्टान्तात पाहिले होते. पेत्र खुलासा करतो: “त्याला देवपित्यापासून सन्मान व गौरव मिळाले; तेव्हा ऐश्वर्ययुक्त गौरवाच्या द्वारे अशी वाणी झाली की, ‘हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.’ त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून आलेली ही वाणी आम्ही स्वतः ऐकली.”—२ पेत्र १:१६-१८.
२१ पेत्र, याकोब, आणि योहान यांनी तो दृष्टान्त पाहिला तेव्हा राज्य त्यांच्यासाठी निश्चितच वास्तविक बनले असावे! पेत्र याविषयी म्हणतो, “अधिक निश्चित असे संदेष्ट्याचे [भविष्यसूचक] वचन आम्हांजवळ आहे; . . . तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल.” खरोखर, पेत्राने लिहिलेल्या पत्रामुळे वाचकांना आणि आज आपल्यालाही देवाच्या राज्याविषयीच्या भविष्यवाण्यांकडे लक्ष देण्यासाठी एक सबळ कारण आहे. कोणत्या प्रकारे आपण लक्ष देणे आवश्यक आहे? पेत्र उत्तर देतो: “काळोख्या जागी प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे . . . तुमच्या अंतःकरणांत दिवस उजाडेपर्यंत व पहाटचा तारा उगवेपर्यंत.”—२ पेत्र १:१९; दानीएल ७:१३, १४; यशया ९:६, ७.
२२. (अ) आपली अंतःकरणे कशासंबंधाने जागरूक राहणे आवश्यक आहे? (ब) आपण कशाप्रकारे भविष्यसूचक वचनाकडे लक्ष दिले पाहिजे?
२२ देवाच्या भविष्यसूचक वचनाच्या प्रकाशाविना आपली अंतःकरणे काळोखातच असती. पण त्याकडे लक्ष दिल्यामुळे, “पहाटचा तारा” येशू ख्रिस्त याचा राज्य गौरवात उदय होतो तो दिवस उगवण्याच्या अपेक्षेत ख्रिश्चनांची अंतःकरणे जागरूक राहिली आहेत. (प्रकटीकरण २२:१६) आपण आज देवाच्या भविष्यसूचक वचनाकडे कशाप्रकारे लक्ष द्यावे? तर बायबलचा अभ्यास करण्याद्वारे, सभांची तयारी करून त्यांत सहभाग घेण्याद्वारे, तसेच ‘ह्या गोष्टींचा अभ्यास करण्याद्वारे व ह्यांत गढून जाण्याद्वारे.’ (१ तीमथ्य ४:१५) भविष्यसूचक वचन एका “अंधारलेल्या ठिकाणी” (आपल्या अंतःकरणांत) चमकणाऱ्या दिव्यासारखे व्हायचे असल्यास आपण स्वतःवर—आपल्या इच्छांवर, भावनांवर, प्रेरणांवर आणि ध्येयांवर त्याचा मोठा प्रभाव पडू दिला पाहिजे. आपण बायबलचे अभ्यासक असण्यास हवे कारण पेत्र पहिल्या अध्यायाच्या शेवटी म्हणतो: “शास्त्रांतील कोणत्याहि संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होत नाही. कारण संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही; तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे.”—२ पेत्र १:२०, २१.
२३. २ पेत्र यांतील पहिल्या अध्यायाने कशासाठी वाचकांची मानसिक तयारी केली आहे?
२३ पेत्राने आपल्या दुसऱ्या पत्राच्या प्रस्तावनेच्या अध्यायात, स्वतःच्या मोलवान विश्वासाला धरून राहण्याची आपल्याला जोरदार प्रेरणा दिली आहे. आता आपण पुढील गंभीर बाबींवर विचार करण्यास तयार आहोत. पुढील लेखांत २ पेत्र यांतील २ ऱ्या अध्यायाचा ऊहापोह करण्यात येईल; यात प्रेषित पेत्राने मंडळ्यांमध्ये प्रवेशलेल्या अनैतिक प्रभावांचे आव्हान विचारात घेतले आहे.
तुम्हाला आठवते का?
◻ पेत्र अचूक ज्ञानाच्या महत्त्वावर का जोर देतो?
◻ विश्वासात भर घालण्याच्या गुणांमध्ये सर्वप्रथम सात्विकतेचा उल्लेख होण्यामागे कोणते कारण असावे?
◻ आपल्या बांधवांना नेहमी आठवण देण्याची पेत्र का काळजी घेतो?
◻ पेत्र आपल्या विश्वासासाठी कोणता भक्कम आधार पुरवतो?
[९ पानांवरील चित्र]
आपल्या कमतरतांमुळे पेत्राने त्याचा विश्वास त्यागला नाही