वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ३/१५ पृ. ३-९
  • येशूच्या मानवी जीवनातला शेवटचा दिवस

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • येशूच्या मानवी जीवनातला शेवटचा दिवस
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • गुरुवार संध्याकाळ, निसान १४
  • खास सण
  • गेथशेमानेच्या बागेत
  • शुक्रवार सकाळ, निसान १४
  • यातनामय मृत्यू
  • पुन्हा जिवंत!
  • तुम्हाला कसे लागू होते
  • पृथ्वीवर येशूच्या शेवटल्या दिवसांच्या आठवणींना उजाळा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • येशू मारला जातो
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • ‘त्याची वेळ आली आहे!’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • येशू ख्रिस्ताचा वध केला जातो
    बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते?
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ३/१५ पृ. ३-९

येशूच्या मानवी जीवनातला शेवटचा दिवस

शुक्रवार निसान १४, ३३ सा.यु. चा दिवस आहे; दुपार सरत आली आहे. स्त्री-पुरुषांचा एक जमाव आपल्या एका मित्राला दफन करण्याची तयारी करत आहेत. त्यातल्या निकदेम नावाच्या मनुष्याने पुरण्याआधी प्रेताला सुगंधी द्रव्ये लावायला आणली आहेत. योसेफ नावाच्या आणखी एका गृहस्थाने मारून मारून जखमी झालेले प्रेत गुंडाळण्यासाठी एक स्वच्छ वस्त्र आणले आहे.

हे लोक कोण आहेत, ते कोणाला पुरत आहेत? या सर्व गोष्टी तुमच्यावर काही परिणाम करतात का? या प्रश्‍नांची उत्तरे प्राप्त करायला त्या अविस्मरणीय दिवसाच्या सुरवातीपासून काय झाले ते आपण पाहू या.

गुरुवार संध्याकाळ, निसान १४

पौर्णिमेच्या उगवत्या चंद्राच्या मंद प्रकाशात जेरूसलेम न्हाऊन निघाले आहे. दिवसाची दगदग संपल्यावर शहरातले लोक आता विश्रांती घेण्याच्या तयारीला लागले आहेत. आजच्या संध्याकाळी, मेंढीचे मटण भाजण्याचा सुवास सगळीकडे पसरला आहे. होय, हजारो लोक एका खास घटनेच्या तयारीला लागले आहेत—वर्षातून एकदा होणारा वल्हांडण सण साजरा करण्याच्या तयारीला.

पाहुण्यांसाठी असलेल्या एका मोठाल्या खोलीत येशू ख्रिस्त आणि त्याचे १२ प्रेषित भोजनाची तयारी करून ठेवलेल्या मेजापाशी बसले आहेत. नीट कान देऊन ऐका! येशू बोलत आहे. तो म्हणतो, “मी दुःख भोगण्यापूर्वी हे वल्हांडणाचे भोजन तुम्हाबरोबर करावे अशी माझी फार उत्कट इच्छा होती.” (लूक २२:१५) येशूला ठाऊक आहे की, त्याचे धार्मिक शत्रू त्याला ठार मारण्यासाठी नुसते टपून बसले आहेत. पण ते घडण्याआधी, आज संध्याकाळी एक अत्यंत महत्त्वाची घटना घडणार आहे.

वल्हांडण साजरा केल्यावर, येशू सर्वांना सांगतो: “तुमच्यातला एक जण मला धरून देईल.” (मत्तय २६:२१) हे ऐकून प्रेषितांना फार वाईट वाटते. तो कोण असू शकेल बरे? आणखी थोडे बोलल्यावर येशू, यहूदा इस्कार्योतला म्हणतो: “तुला जे करावयाचे आहे ते लवकर करून टाक.” (योहान १३:२७) इतरांच्या लक्षात आले नसले, तरी यहूदा हा विश्‍वासघातकी मनुष्य आहे. येशूविरुद्ध रचलेल्या कटात एक नीच भूमिका पार पाडायला तो बाहेर पडतो.

खास सण

येशू आता एक नवीन सण सुरू करतो—हा सण त्याच्या मृत्यूच्या स्मरणार्थ असेल. भाकरीचा तुकडा घेऊन येशू उपकारस्तुती करतो आणि ती सर्वांना वाटतो. “घ्या, खा,” तो म्हणतो. “हे माझे शरीर आहे; ते तुम्हासाठी दिले जात आहे.” प्रत्येकाने थोडी थोडी भाकर खाल्ल्यावर तो लाल द्राक्षारसाचा प्याला घेतो आणि उपकारस्तुती करतो. “तुम्ही सर्व ह्‍यातून प्या” असे सांगून येशू त्यांना समजावतो: “हा प्याला माझ्या रक्‍तात नवा करार आहे ते रक्‍त तुम्हासाठी ओतिले जात आहे.” उरलेल्या ११ विश्‍वासू प्रेषितांना तो सांगतो: “माझ्या स्मरणार्थ हे करा.”—मत्तय २६:२६-२८; लूक २२:१९, २०; १ करिंथकर ११:२४, २५.

त्या संध्याकाळी, पुढे जे घडणार आहे त्यासाठी येशू आपल्या निष्ठावान प्रेषितांच्या मनाची तयारी करून घेतो आणि त्याची त्यांच्यावर गाढ प्रीती आहे याचीही खात्री पटवून देतो. तो म्हणतो, “आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा ह्‍यापेक्षा कोणाची प्रीति मोठी नाही. मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहा.” (योहान १५:१३-१५) होय, या ११ प्रेषितांनी परीक्षांतही येशूला साथ देऊन त्याचे खरे मित्र असल्याचे सिद्ध केले आहे.

रात्री—कदाचित मध्यरात्र ओसरल्यावर—येशू एक अविस्मरणीय प्रार्थना करतो, त्यानंतर ते यहोवाला स्तुतीगीत गातात. नंतर, पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात ते शहराच्या बाहेर येऊन किद्रोन दरी पार करतात.—योहान १७:१–१८:१.

गेथशेमानेच्या बागेत

थोड्या वेळानंतर, येशू आणि त्याचे प्रेषित गेथशेमाने बागेत पोहंचतात. बागेच्या प्रवेशद्वाराजवळ आठ प्रेषितांना ठेवून येशू, पेत्र, याकोब आणि योहानाला सोबत घेऊन जैतूनांच्या झाडांमध्ये पुढे जातो. “माझ्या जिवाला मरणप्राय अति खेद झाला आहे,” असे तो त्या तिघांना म्हणतो. “तुम्ही येथे राहा व जागृत असा.”—मार्क १४:३३, ३४.

ते तीन प्रेषित तेथेच थांबतात आणि येशू प्रार्थना करायला बागेत आणखी आत जातो. मोठ्यांदा रडत आणि अश्रू गाळत तो विनवणी करतो: “हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर.” येशूच्या खांद्यावर भारी जबाबदारी आहे. यहोवाच्या एकुलत्या एका पुत्राला गुन्हेगाराप्रमाणे खिळले जाईल तेव्हा यहोवाचे शत्रू काय म्हणतील या विचारामुळे तो किती खिन्‍न झाला असावा! पण, आपण या वेदनामय परीक्षेत अयशस्वी ठरलो तर आपल्या प्रिय स्वर्गीय पित्यावर केवढा कलंक लागेल हा विचार येशूला त्याहूनही यातनामय वाटत होता. येशू इतक्या कळकळीने आणि विव्हळ होऊन प्रार्थना करतो की, त्याचा घाम रक्‍ताच्या थेंबांच्या रूपात जमिनीवर पडतो.—लूक २२:४२, ४४.

येशूने नुकतीच तिसऱ्‍यांदा प्रार्थना केली होती. एवढ्यात मशाली आणि कंदील घेऊन काही लोक तेथे येतात. जमावाच्या समोर असलेला मनुष्य यहूदा इस्कार्योतशिवाय आणखी कोणी नाही; तो थेट येशूकडे चालत येतो. “गुरुजी, सलाम!” असे म्हणून तो येशूचे हळूवारपणे चुंबन घेतो. त्यावर येशू त्याला म्हणतो, “यहूदा, चुंबन घेऊन मनुष्याच्या पुत्राला धरून देतोस काय?”—मत्तय २६:४९; लूक २२:४७, ४८; योहान १८:३.

अचानक, काय घडत आहे याचा प्रेषितांच्या डोक्यात प्रकाश पडतो. त्यांच्या प्रभूची अर्थात प्रिय मित्राची अटक होणार आहे! म्हणून पेत्र तलवार घेऊन प्रमुख याजकाच्या दासाचा कान कापून टाकतो. “एवढे होऊ द्या,” येशू पटकन म्हणतो. त्या दासाचा कान बरा करून तो पेत्राला म्हणतो: “तुझी तरवार परत जागच्या जागी घाल, कारण तरवार धरणारे सर्व जण तरवारीने नाश पावतील.” (लूक २२:५०, ५१; मत्तय २६:५२) मग अधिकारी आणि सैनिक येशूला धरून बांधतात. भयभीत होऊन आणि गोंधळून जाऊन येशूचे प्रेषित त्याला सोडून अंधारात पळून जातात.—मत्तय २६:५६; योहान १८:१२.

शुक्रवार सकाळ, निसान १४

मध्यरात्र सरली असून शुक्रवार पहाटेची वेळ आहे. येशूला प्रथम माजी प्रमुख याजक हन्‍ना याच्या घरी नेले जाते; हन्‍नाचा अजूनही तितकाच अधिकार आणि प्रभाव चालतो. हन्‍ना त्याला प्रश्‍न करतो आणि नंतर प्रमुख याजक कयफा याच्या घरी घेऊन जायला सांगतो; तेथे न्यायसभा भरलेली आहे.

धार्मिक पुढारी आता येशूविरुद्ध खोटा पुरावा देणारे साक्षीदार शोधत आहेत. परंतु, खोट्या साक्षीदारांची साक्षही जुळत नाही. तोपर्यंत येशू मात्र शांत राहतो. मग नवीन युक्‍ती लढवून कयफा विचारतो: “मी तुला जिवंत देवाची शपथ घालतो, तू देवाचा पुत्र ख्रिस्त असलास तर आम्हास सांग!” या वस्तुस्थितीला येशू नाकारू शकत नाही म्हणून तो धीटपणे उत्तर देतो: “मी आहे; आणि तुम्ही मनुष्याचा पुत्र सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेला व आकाशातील मेघांसह येत असलेला असा पाहाल.”—मत्तय २६:६३; मार्क १४:६०-६२.

“ह्‍याने दुर्भाषण केले आहे,” असे कयफा ओरडतो. “आम्हास साक्षीदारांची आणखी काय गरज?” यावर काहीजण येशूला तोंडावर मारतात आणि त्याच्यावर थुंकतात. इतरजण त्याला बुक्क्या मारतात आणि शिव्याशाप देऊ लागतात. (मत्तय २६:६५-६८; मार्क १४:६३-६५) रात्री भरवलेल्या बेकायदेशीर चौकशीला कायदेशीरपणाचे स्वरूप द्यायला कदाचित शुक्रवारी भल्या पहाटे न्यायसभा पुन्हा भरते. पुन्हा एकदा येशू धीटपणे प्रकट करतो की तो ख्रिस्त, देवाचा पुत्र आहे.—लूक २२:६६-७१.

त्यानंतर, मुख्य याजक आणि वडिलजन येशूला यहुदियाचा रोमी शासक, पंतय पिलात याच्याकडे चौकशीसाठी नेतात. येशू राष्ट्राला फितवणारा, कैसराला कर देण्याची मनाई करणारा आणि “स्वतः ख्रिस्त राजा आहे” असे म्हणणारा आहे हे आरोप त्याच्यावर लावले जातात. (लूक २३:२; पडताळा मार्क १२:१७.) येशूची चौकशी केल्यावर, पिलात म्हणतो: “मला ह्‍या मनुष्यात काही दोष आढळत नाही.” (लूक २३:४) येशू गालीलचा आहे हे ऐकल्यावर पिलात त्याला हेरोद अंतिपाकडे पाठवतो; तो गालीलचा राजा असून सध्या वल्हांडणासाठी जेरूसलेमेत आलेला आहे. हेरोदला न्याय देण्याची उत्सुकता नसते. येशूचा फक्‍त चमत्कार पाहण्याची त्याची इच्छा असते. त्याची इच्छा येशू तृप्त न करता शांत राहतो म्हणून हेरोद आणि त्याचे सैनिक त्याची टर उडवतात आणि त्याला पुन्हा पिलाताकडे पाठवतात.

“त्याने काय वाईट केले आहे?” असे पिलात पुन्हा एकदा विचारतो. “त्याच्याकडे मरणदंड होण्यासारखा काही दोष मला सापडला नाही; म्हणून मी ह्‍याला फटके मारून सोडून देतो.” (लूक २३:२२) म्हणून तो येशूला अनेक वाद्यांच्या चाबकाने फटके बसवतो; या फटक्यांमुळे येशूची पाठ सोलून निघते. मग, शिपाई त्याला काट्यांचा मुकूट चढवतात. ते त्याची टिंगल करतात आणि मजबूत वेताने त्याला मारतात; त्यामुळे काट्यांचा मुकूट त्याच्या डोक्यात आणखीनच खोल रुततो. अशी अवर्णनीय वेदना आणि अत्याचार सोसूनही येशूचा आत्मसन्मान आणि त्याचे मनोबल खचले नाही.

येशूला मारलेल्या अवस्थेत पाहून लोकांचे मन पाघळेल अशी आशा धरून पिलात त्याला पुन्हा लोकसमुदायापुढे आणतो. “पाहा!” पिलात उद्‌गारतो, “त्याच्या ठायी मला काही अपराध दिसत नाही हे तुम्हाला कळावे म्हणून मी त्याला तुमच्याकडे बाहेर आणितो.” पण मुख्य याजक आरेडतात: “ह्‍याला वधस्तंभावर खिळा! वधस्तंभावर खिळा!” (योहान १९:४-६) जमाव जास्तच आग्रह करू लागतो तेव्हा पिलात हार मानतो आणि येशूला वधस्तंभावर खिळायला जमावाकडे सोपवतो.

यातनामय मृत्यू

आतापर्यंत कदाचित मध्यान्हाची वेळ झाली आहे. येशूला जेरूसलेम शहराबाहेर गुलगुथा नावाच्या ठिकाणी नेले जाते. येशूच्या हातापायांतून खांबामध्ये मोठमोठाले खिळे ठोकून रोवले जातात. खांब उचलून सरळ केला जातो तेव्हा खिळे रोवलेल्या जखमा शरीराच्या ओझ्याने आणखीनच खेचल्या जातात; ही वेदना अवर्णनीय आहे. येशूला आणि दोन गुन्हेगारांना खिळत असताना लोकांचा घोळका जमतो. अनेकजण येशूबद्दल दुर्भाषण करतात. मुख्य याजक आणि बाकीचे थट्टा करतात, “त्याने दुसऱ्‍यांना वाचविले; त्याला स्वतःला वाचविता येत नाही!” शिपाई आणि खिळलेले दोन गुन्हेगारही येशूची टर उडवतात.—मत्तय २७:४१-४४.

अचानक दुपारी, येशूला खिळून काही वेळ झाल्यावर, त्या ठिकाणी तीन तासांसाठी दैवी उगमाचा एक भीषण अंधकार पसरतो.a कदाचित यामुळेच एक अपराधी दुसऱ्‍या अपराध्याला रागावतो. मग, येशूकडे वळून तो विनवणी करतो: “आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा.” लवकरच मृत्यू येणार असतानाही केवढा हा विलक्षण विश्‍वास! येशू त्याला उत्तर देतो, “आज मी तुला खचित सांगतो, तू माझ्यासोबत परादीसमध्ये असशील.”—लूक २३:३९-४३, NW.

दुपारी सुमारे तीन वाजता, आपले प्राण जाणार असे येशूला वाटते. “मला तहान लागली आहे,” असे तो म्हणतो. मग, मोठ्याने ओरडून तो म्हणतो: “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केला?” दावीदाच्या या शब्दांना उद्धृत करताना येशूला हे जाणवते की त्याच्या पित्याने त्याच्या निष्ठेची पूर्ण परीक्षा घेण्यासाठी जणू त्याच्यावरचे संरक्षण काढून घेतले आहे. कोणीतरी आंब भरलेला स्पंज येशूच्या तोंडाला लावतो. थोडासा आंब घेतल्यानंतर, येशू दम टाकत बोलतो: “पूर्ण झाले आहे!” मग तो उच्च स्वराने ओरडून म्हणतो, “हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो,” मान खाली टाकतो आणि प्राण सोडतो.—योहान १९:२८-३०; मत्तय २७:४६; लूक २३:४६; स्तोत्र २२:१.

दुपार सरत आल्यामुळे, सूर्यास्ताने सुरू होणाऱ्‍या शब्बाथाआधी (निसान १५) येशूला पुरण्यासाठी घाईघाईने तयारी केली जाते. अरिमथाईकर योसेफ हा न्यायसभेचा प्रसिद्ध सभासद येशूचा गुप्त शिष्य होता; तो त्याचा देह पुरण्याची परवानगी काढतो. न्यायसभेचा आणखी एक सभासद निकदेम ह्‍याने देखील येशूवर विश्‍वास असल्याचे गुप्तपणे कबूल केले आहे; तो ३३ रोमी किलोग्रॅम गंधरस आणि अगरु घेऊन येतो. जवळपासच्या एका कबरेत ते येशूचा देह काळजीपूर्वकतेने ठेवतात.

पुन्हा जिवंत!

रविवारी पहाटे अद्याप अंधार असताना, मरीया मग्दालिया आणि इतर स्त्रिया येशूच्या कबरेजवळ येतात. पण हे काय! कबरेसमोरचा दगड सरकवण्यात आला आहे. कबर तर रिकामीच आहे! मरीया मग्दालिया, पेत्र आणि योहानाला हे कळवायला धावतच जाते. (योहान २०:१, २) ती तिथून जाते न जाते तोच एक देवदूत इतर स्त्रियांसमोर प्रकट होतो. तो म्हणतो: “तुम्ही भिऊ नका.” तो असेही सांगतो: “लवकर जाऊन त्याच्या शिष्यास सांगा की, तो मेलेल्यांतून उठला आहे.”—मत्तय २८:२-७.

घाईघाईने जात असता, त्यांना कोण भेटावे तर खुद्द येशूच! “जा माझ्या भावांस सांगा,” असे तो त्यांना म्हणतो. (मत्तय २८:८-१०) नंतर, मरीया मग्दालिया कबरेपाशी रडत उभी असताना येशू तिला प्रकट होतो. त्याला पाहून तिचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि ती इतर शिष्यांना ही बातमी सांगायला घाईघाईने निघते. (योहान २०:११-१८) खरे तर, त्या अविस्मरणीय रविवारी येशू वेगवेगळ्या शिष्यांना पाच वेळा प्रकट होतो आणि त्यामुळे तो खरोखरच जिवंत झाला आहे यात काही शंका राहत नाही!

तुम्हाला कसे लागू होते

एक हजार नऊशे सहासष्ट वर्षांआधीच्या घटना, २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभे असताना तुमच्यावर कशा परिणाम करू शकतात? त्या घटनांचा एक प्रत्यक्ष साक्षीदार म्हणतो: “देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठविले आहे, ह्‍यासाठी की, त्याच्या द्वारे आपणांस जीवन प्राप्त व्हावे, ह्‍यावरून देवाची आपल्यावरील प्रीति प्रगट झाली. प्रीति म्हणावी तर हीच; आपण देवावर प्रीति केली असे नाही, तर त्याने तुम्हाआम्हावर प्रीति केली आणि तुमच्याआमच्या पापांचे प्रायश्‍चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठविले.”—१ योहान ४:९, १०.

ख्रिस्ताचा मृत्यू ‘प्रायश्‍चित्त करणारे बलिदान’ कसे आहे? ते प्रायश्‍चित्त करणारे आहे कारण त्यामुळे देवासोबत चांगला नातेसंबंध ठेवणे शक्य होते. पहिला मनुष्य आदाम, याने देवाविरुद्ध बंड केले आणि आपल्या संतानाला पाप आणि मृत्यूचा वारसा देऊ केला. दुसऱ्‍या बाजूला पाहता, मानवजातीच्या पाप आणि मृत्यूची किंमत भरण्यासाठी येशूने खंडणी या नात्याने आपले प्राण दिले; त्यामुळे देवाची दया आणि कृपा प्राप्त करून द्यायला आधार पुरवला. (१ तीमथ्य २:५, ६) पापाचे प्रायश्‍चित करणाऱ्‍या येशूच्या बलिदानावर विश्‍वास ठेवल्याने, पापी आदामाकडून वारशात मिळालेल्या शिक्षेतून तुम्ही मुक्‍त होऊ शकता. (रोमकर ५:१२; ६:२३) यामुळे, तुमचा प्रेमळ स्वर्गीय पिता, यहोवा देव याच्यासोबत व्यक्‍तिगत नातेसंबंध राखायची अद्‌भुत संधी तुम्हाला प्राप्त होते. थोडक्यात सांगायचे म्हणजे, येशूचे परम बलिदान तुमच्याकरता अनंत जीवन ठरू शकते.—योहान ३:१६; १७:३.

या तसेच संबंधित विषयांवर गुरुवार संध्याकाळी, एप्रिल १ रोजी, जगभरात हजारो ठिकाणी चर्चा केली जाईल जेथे येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचे स्मरण करण्यासाठी लाखो लोक जमा होतील. तुम्हालाही तेथे उपस्थित राहायला आमंत्रण आहे. तुमच्या भागातले यहोवाचे साक्षीदार तुम्हाला आनंदाने ठिकाण आणि वेळ सांगतील. यावेळी उपस्थित राहिल्याने, येशूच्या मानवी जीवनाच्या शेवटल्या दिवशी आपल्या प्रेमळ देवाने आणि त्याच्या प्रिय पुत्राने जे केले त्याबद्दल तुमची कृतज्ञता निश्‍चितच वाढेल.

[तळटीपा]

a हा अंधकार सूर्यग्रहणामुळे असू शकत नव्हता कारण येशूचा मृत्यू पौर्णिमेच्या वेळी झाला. शिवाय, सूर्यग्रहण फक्‍त काही मिनिटांसाठीच टिकत असते आणि अमावस्येच्या वेळी चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असतो तेव्हा होत असते.

[७ पानांवरील तक्‍ता/चित्रं]

येशूचा मृत्यू आणि पुनरुत्थान

निसान सा.यु. ३३ घटना सर्वश्रेष्ठ मनुष्यb

१४ गुरुवार वल्हांडणाचा सण; येशू ११३, परि. २ ते

संध्याकाळ आपल्या प्रेषितांचे पाय धुतो; ११७, परि. १

यहूदा येशूचा विश्‍वासघात

करायला बाहेर पडतो;

ख्रिस्त आपल्या मृत्यूचा स्मारक

विधी स्थापन करतो

(या वर्षी, गुरुवार, एप्रिल १ रोजी

सूर्यास्तानंतर पाळला जाईल);

तो जाणार असल्यामुळे त्याच्या

प्रेषितांची मनाची तयारी करण्यासाठी उत्तेजन

मध्यरात्रीपासून प्रार्थना आणि स्तुतीगीत ११७ ते १२०

पहाट गाऊन झाल्यावर येशू आणि प्रेषित

होण्याआधी गेथशेमाने बागेत जातात;

येशू मोठ्यांदा रडत,

अश्रू गाळत प्रार्थना करतो;

यहूदा इस्कार्योत मोठ्या जमावासोबत

येऊन येशूचा विश्‍वासघात करतो;

येशूला बांधून हन्‍नाकडे नेले जाते तेव्हा

प्रेषित तेथून पळून जातात; सभास्थानात

उपस्थित राहण्याकरता येशूला प्रमुख याजक

कयफाकडे नेले जाते; मृत्यूदंड सुनावला जातो;

थट्टा मस्करी करतात आणि मारतात;

पेत्र येशूला तीनदा नाकारतो

शुक्रवार पहाटे, येशू पुन्हा सभास्थानात १२१ ते १२४

सकाळ उपस्थित होतो; पिलाताकडे नेले जाते;

हेरोदाकडे पाठवले जाते;

पुन्हा पिलाताकडे पाठवले जाते;

येशूला चाबकांचा मार बसतो,

त्याचा अपमान केला जातो आणि त्याला मारले जाते;

दबावामुळे पिलात त्याला मृत्यूदंड

देण्यासाठी सोपवून देतो;

मृत्यूदंडासाठी मध्यान्ही गुलगुथा येथे नेले जाते

मध्यान्हापासून दुपार होण्याच्या काही १२५, १२६

भर दुपारी काळाआधीच खिळले जाते;

येशू मरतो तेव्हा दुपारपासून

सुमारे तीन वाजेपर्यंत अंधार;

जबरदस्त भूकंप; मंदिरातील पडदा दुभंगतो

दुपार शब्बाथाआधी एका बागेतल्या १२७, परि.१-७

सरत असताना कबरेत येशूला पुरले जाते

१५ शुक्रवार शब्बाथ सुरू होतो

संध्याकाळ

शनिवार येशूच्या कबरेवर पहारा १२७, परि.८-९

ठेवायला पिलात सैनिक पाठवायला कबूल होतो

१६ रविवार पहाटे येशूची कबर रिकामी १२७, परि. १० ते १२९, परि. १०

असल्याचे आढळते; पुनरुत्थित येशू

(१) स्त्री शिष्यांच्या समूहाला, सलोमी,

योहान्‍ना आणि याकोबाची आई मरीया;

(२) मरीया मग्दालिया; (३) क्लयपा

आणि त्याचा साथीदार; (४) शिमोन पेत्र;

(५) प्रेषित आणि इतर शिष्यांच्या जमावाला प्रकट होतो

[तळटीप]

b येथे दिलेले आकडे सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य या पुस्तकातल्या अध्यायांना सूचित करतात. येशूच्या शेवटल्या सेवेचा तपशीलवार शास्त्रवचनीय संदर्भांचा तक्‍ता पाहण्यासाठी ‘प्रत्येक शास्त्रलेख परमेश्‍वरप्रेरित आणि उपयोगी आहे,’ (इंग्रजी) पृष्ठ २९० पाहा. ही पुस्तके वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ इंडियाने प्रकाशित केली आहेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा