धडा ३१
देवाचं राज्य काय आहे?
देवाचं राज्य हा बायबलचा एक महत्त्वाचा विषय आहे. कारण या राज्याद्वारेच देव पृथ्वीसाठी असलेला त्याचा मूळ उद्देश पूर्ण करणार आहे. पण हे राज्य काय आहे? हे राज्य सुरू झालंय हे आपण कशावरून म्हणू शकतो? देवाच्या राज्याने आजपर्यंत कायकाय केलंय? आणि भविष्यात ते काय करणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं, आपण या आणि पुढच्या दोन धड्यांमध्ये पाहणार आहोत.
१. देवाचं राज्य काय आहे आणि त्याचा राजा कोण आहे?
देवाचं राज्य एक खरोखरचं सरकार आहे. ते यहोवा देवाने स्थापन केलंय. त्याचा राजा येशू ख्रिस्त आहे आणि तो स्वर्गातून राज्य करतो. (मत्तय ४:१७; योहान १८:३६) देवाच्या राज्याचा राजा या नात्याने, येशू पृथ्वीवरच्या सर्व लोकांवर राज्य करेल. बायबल म्हणतं की “तो राजा म्हणून . . . सदासर्वकाळ राज्य करेल.”—लूक १:३२, ३३.
२. येशूसोबत कोण राज्य करतील?
येशू एकटाच राज्य करणार नाही. तर “प्रत्येक वंश, भाषा, लोकसमूह आणि राष्ट्र यांतून” निवडलेले काही लोक त्याच्यासोबत “राजे या नात्याने पृथ्वीवर राज्य करतील.” (प्रकटीकरण ५:९, १०) येशूसोबत किती जण राज्य करतील? येशू पृथ्वीवर आला होता, तेव्हापासून आजपर्यंत लाखो लोक त्याचे अनुयायी बनले आहेत. पण त्यांच्यापैकी फक्त १,४४,००० जण स्वर्गात जाऊन त्याच्यासोबत राज्य करतील. (प्रकटीकरण १४:१-४ वाचा.) देवाच्या इच्छेप्रमाणे वागणारे बाकीचे सगळे लोक या राज्याची प्रजा म्हणून पृथ्वीवर राहतील.—स्तोत्र ३७:२९.
३. देवाचं राज्य मानवी सरकारांपेक्षा चांगलंय, असं का म्हणता येईल?
काही मानवी नेते लोकांचं भलं करायचा प्रयत्न करतात. पण इच्छा असूनही त्यांना बऱ्याच गोष्टी करता येत नाहीत. कारण त्यांच्याजवळ तितकी ताकद नसते. काही वर्षांनी त्यांच्या जागी दुसरे नेते येतात; पण त्यांतले बरेच जण स्वार्थी असतात आणि त्यांना लोकांच्या हिताची काहीच काळजी नसते. याउलट, देवाच्या राज्याचा राजा येशू याची जागा दुसरं कोणीही घेणार नाही. कारण देवाने एक ‘असं राज्य स्थापन केलंय, ज्याचा कधीही नाश होणार नाही.’ (दानीएल २:४४) येशू संपूर्ण पृथ्वीवर राज्य करेल. आणि तो लोकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही. कारण तो प्रेमळ, दयाळू आणि न्यायी आहे. शिवाय, तो लोकांनाही एकमेकांशी अशाच प्रकारे म्हणजे प्रेमाने, दयाळूपणे आणि न्यायाने वागायला शिकवेल.—यशया ११:९ वाचा.
आणखी जाणून घेऊ या
देवाचं राज्य कोणत्याही मानवी सरकारापेक्षा चांगलं का आहे, यावर विचार करू या.
४. देवाचं राज्य संपूर्ण पृथ्वीवर शासन करेल
आजपर्यंत होऊन गेलेल्या कोणत्याही मानवी शासकापेक्षा, येशू ख्रिस्ताजवळ राज्य करायचा जास्त अधिकार आहे. मत्तय २८:१८ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
कोणत्याही मानवी शासकापेक्षा येशूजवळ जास्त अधिकार आहे, असं का म्हणता येईल?
मानवी सरकारं नेहमी बदलत असतात. आणि फक्त ठरावीक क्षेत्रावरच त्यांचा अधिकार असतो. पण देवाच्या राज्याबद्दल काय? दानीएल ७:१४ वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
देवाच्या “राज्याचा कधीही नाश होणार नाही.” यामुळे आपल्याला काय फायदा होईल?
या राज्याचा पृथ्वीच्या काही भागावर नाही तर संपूर्ण पृथ्वीवर अधिकार असेल. यामुळे आपल्याला काय फायदा होईल?
५. मानवी सरकारं आपल्या समस्या सोडवू शकत नाहीत
मानवी सरकारं आपल्या समस्या सोडवू शकत नाहीत असं का म्हणता येईल? व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्नावर चर्चा करा.
माणसं राज्य करत असल्यामुळे काय परिणाम झाला आहे?
उपदेशक ८:९ वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
मानवी सरकारांच्या जागी देवाचं राज्य आलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? आणि कशामुळे असं वाटतं?
६. देवाच्या राज्यात राज्य करणारे आपल्या भावना समजू शकतात
आपला राजा येशू, मानव म्हणून या पृथ्वीवर राहिला. त्यामुळे तो आपल्या “दुर्बलतांबद्दल सहानुभूती” दाखवू शकतो. (इब्री लोकांना ४:१५) तसंच, येशूसोबत १,४४,००० विश्वासू स्त्री आणि पुरुषही राज्य करतील. यहोवाने त्यांना “प्रत्येक वंश, भाषा, लोकसमूह आणि राष्ट्र यांतून” निवडलंय.—प्रकटीकरण ५:९.
येशूला आणि त्याच्यासोबत राज्य करणाऱ्यांना माणसांच्या भावनांची आणि समस्यांची जाणीव आहे, हे कळल्यावर तुम्हाला कसं वाटतं? आणि का?
यहोवाने वेगवेगळ्या देशांतल्या आणि संस्कृतींतल्या स्त्रीपुरुषांना येशूसोबत राज्य करण्यासाठी निवडलंय
७. मानवी कायद्यांपेक्षा देवाच्या राज्याचे कायदे खूप चांगले आहेत
प्रत्येक सरकार आपल्या नागरिकांच्या फायद्यासाठी आणि संरक्षणासाठी काही कायदे बनवतं. देवाच्या राज्याचेही काही नियम आणि कायदे आहेत. आणि त्याच्या नागरिकांनी ते पाळणं गरजेचं आहे. १ करिंथकर ६:९-११ वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
जर सगळ्यांनी देवाचे नियम पाळले, तर हे जग कसं असेल?a
देवाच्या राज्याच्या नागरिकांनी हे नियम पाळले पाहिजेत अशी जी अपेक्षा यहोवा करतो, ती तुम्हाला योग्य वाटते का? आणि का योग्य वाटते?
आज काही लोक या नियमांप्रमाणे वागत नसले तरी ते पुढे बदलू शकतात हे कशावरून दिसून येतं?—११ वं वचन पाहा.
प्रत्येक सरकार आपल्या नागरिकांच्या फायद्यासाठी आणि संरक्षणासाठी काही कायदे बनवतं. पण देवाच्या राज्यातले कायदे कोणत्याही मानवी सरकाराच्या कायद्यांपेक्षा खूप चांगले आहेत
कदाचित कोणी विचारेल: “देवाचं राज्य म्हणजे नेमकं काय?”
तुम्ही काय उत्तर द्याल?
थोडक्यात
देवाचं राज्य एक खरोखरचं सरकार आहे. ते स्वर्गात आहे आणि ते पूर्ण पृथ्वीवर राज्य करेल.
उजळणी
देवाच्या राज्यात कोण राज्य करतील?
देवाचं राज्य कोणत्याही मानवी सरकारापेक्षा चांगलं आहे असं का म्हणता येईल?
देवाच्या राज्याच्या नागरिकांकडून यहोवा काय अपेक्षा करतो?
हेसुद्धा पाहा
देवाचं राज्य कुठे असेल याबद्दल येशूने काय शिकवलं ते जाणून घ्या.
यहोवाचे साक्षीदार मानवी सरकाराऐवजी देवाच्या राज्याला एकनिष्ठ का राहतात?
येशूसोबत राज्य करणाऱ्या १,४४,००० जणांबद्दल बायबल काय सांगतं ते जाणून घ्या.
फक्त देवच अन्याय कायमचा काढू शकतो याची खातरी तुरुंगात असलेल्या एका स्त्रीला कशी पटली?