येशूचे जीवन व उपाध्यपण
शब्बाथ दिवशी काय करणे योग्य आहे?
हा दुसरा शब्बाथ आहे. यावेळी गालील समुद्राजवळ असलेल्या सभास्थानास येशू भेट देतो. येथे उजवा हात वाळलेला एक मनुष्य आहे. येशू या माणसाला बरे करतो की काय हे पाहण्यासाठी शास्त्री व परुशी टपून बसले आहेत. सरतेशेवटी ते विचारतातः “शब्बाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय?”
यहुदी धार्मिक पुढाऱ्यांचे असे मत आहे की जर जीवन धोक्यात आहे तरच बरे करणे ही कायदेशीर गोष्ट ठरते. उदाहरणादाखल, त्यांची शिकवण अशी आहे की शब्बाथ दिवशी हाडाची किंवा मुरगळलेल्या भागाची मलमपट्टी करता येणार नाही. यासाठीच परुशी व शास्त्री येशूवर काही आरोप आणावा यासाठी तो प्रश्न करीत आहेत.
तरीपण येशूला त्यांची विचारसरणी कळते. याचवेळेला, त्यांनी शब्बाथ दिवसाच्या नियमात काम न करण्याबद्दल जे सांगण्यात आले होते त्याचा केवढा विपर्यास करुन घेतला होता आणि अशास्त्रीय दृष्टीकोन बाळगला होता तेही त्याच्या लक्षात येते. अशाप्रकारे एका नाट्यमय घटनेची सुरुवात येशू करुन देतो व त्यासाठी तो वाळलेल्या हाताच्या मनुष्याला म्हणतोः “उठ व मध्ये उभा राहा.”
आता, शास्त्री व परुश्यांकडे वळून येशू त्यांना म्हणतोः “तुम्हामध्ये असा कोण मनुष्य आहे की ज्याचे एकच मेंढरु असून ते शब्बाथ दिवशी खाचेत पडले तर तो त्याला उचलून बाहेर काढणार नाही?” वस्तुतः त्या काळी मेंढरु हे आर्थिक ठेव या अर्थी मानले जात असल्यामुळे कोणीही त्याला दुसऱ्या दिवसापर्यंत खाचेत पडून राहू देणार नव्हता कारण तसे केले तर कदाचित ते मेंढरु आजारी होण्याची व त्याद्वारे त्याचे मोल गमाविले जाण्याची शक्यता होती. तसेच शास्त्रवचने आणखी असे म्हणतातः “धार्मिक मनुष्य आपल्या पशुच्या जिवाकडे लक्ष देतो.”
या उदाहरणांची समांतरता लक्षात आणून येशू म्हणतोः “तर मेंढरांपेक्षा माणसाचे मोल किती मोठे आहे! ह्यास्तव, शब्बाथ दिवशी सत्कृत्य करणे योग्य आहे.” अशी ही तर्कशुध्द व सहानुभूतिपूर्वक विचारधारा खोडता न आल्यामुळे ते धार्मिक पुढारी गप्प बसतात.
आता येशू त्यांच्या अंतःकरणाच्या कठीणतेमुळे खिन्न होऊन रागाने सभोवार बघतो. यानंतर तो त्या माणसाला म्हणतोः “हात लांब कर.” तो हात लांब करतो व तत्काळ बरा होतो.
त्या माणसाचा हात बरा झाला आहे हे बघून आनंद करण्याऐवजी परुशी तेथून निघतात व येशूला कसे ठार मारावे याकरता हेरोदाच्या अनुयायांसोबत सल्ला मसलत करावयाला जातात. त्या राजकीय गोटात सदुकी या धर्मपंथीयांचा समावेश होता. प्रत्यक्षात हा राजकीय गट व परुशी यांच्यात उघड मतभेद आहेत, पण येशूला विरोध करण्यात मात्र ते दोघेही एकमताचे आहेत. मत्तय १२:९-१४; मार्क ३:१-६; लूक ६:६-११; नीतीप्तूत्रे १२:१०; निर्गम २०:८-१०.
◆ येशू व यहुदी धर्मपुढारी यामध्ये नाट्यमय घटनेचा आरंभ कसा झाला?
◆ शब्बाथ दिवशी बरे करण्याबद्दल यहुद्यांची धारणा कोणती होती?
◆ त्यांचे चुकीचे दृष्टीकोन खोडून टाकण्यासाठी येशूने कोणते उदाहरण वापरले?