येशूचे जीवन व उपाध्यपण
अत्यंत प्रसिद्ध असलेले प्रवचन
पवित्र शास्त्राच्या इतिहासातील सर्वात लक्षात राहणारे ते दृश्य आहेः येशू डोंगर कपारीत बसून त्याचे प्रसिद्ध डोंगरावरील प्रवचन देत आहे. हे ठिकाण गालील समुद्रानजीक, म्हणजेच कर्फणहुमाजवळ आहे. येशूने संपूर्ण रात्र देवाला प्रार्थना करण्यात घालविली व लगेच पहाटे त्याच्या १२ शिष्यांना त्याचे प्रेषित म्हणून निवडिले. या सर्वांना बरोबर घेऊन तो या डोंगराच्या सपाटीला येतो.
तुम्हाला वाटतच असेल की येशू आता खूप थकलेला असणार व त्याला विश्रांतीची गरज आहे. पण ६० ते ७० मैलांवरून (१०० ते ११० कि. मी.) म्हणजे यहुदा व यरूशलेमाहून मोठा लोकसमुदाय त्याच्याकडे आलेला आहे. तसेच उत्तरेकडील सोर व सीदोनच्या समुद्र किनाऱ्यावरून देखील खूप लोक आलेले आहेत. ते सर्वजण येशूचे शिक्षण श्रवण करावयास व आपले रोग बरे करून घ्यावयास आले आहेत. त्यांच्यामध्ये दुरात्म्यांनी पिडलेल्या व्यक्तीही आहेत.
येशू खाली येताच आजारी लोक त्याला स्पर्श करावयास त्याच्याजवळ येतात, आणि तो त्या सर्वांना बरे करतो. त्यानंतर तो डोंगराच्या उंचवट्यावर बसतो व त्याच्यासमोर बसलेल्या लोकसमुदायाला शिक्षण देऊ लागतो. विचार करा! तेथे बसलेल्या श्रोत्यांपैकी आता कोणीही गंभीररित्या आजारी नाही!
ज्याने आत्ताच इतके आश्चर्यकारक चमत्कार घडविले होते त्या शिक्षकाचे ऐकावयाला लोक उत्सुक आहेत. तथापि, येशू हे प्रवचन खास करुन त्याच्याजवळ बसलेल्या शिष्यांच्या फायद्यास्तव देतो. तरीपण, आम्हास याचा फायदा व्हावा या हेतूने मत्तय व लूक यांनी ते प्रवचन आपापल्या शुभवर्तमानात नमूद केले आहे.
मत्तयाने नमूद केलेला प्रवचनाचा संदर्भ हा लूकने घेतलेल्या संदर्भापेक्षा चारपटीने अधिक आहे. याशिवाय, मत्तयाने संदर्भित केलेला काही भाग लूकने येशूच्या नंतरच्या उपाध्यपणाच्या वेळेस त्याने म्हटल्याचे दाखविला आहे. हे आम्हास, मत्तय ६:९-१३ हे लूक ११:१-४ आणि मत्तय ६:२५-३४ हे लूक १२:२२-३१ याच्या पडताळ्याने समजू शकेल. तथापि, हे आश्चर्यकारक वाटू देता कामा नये. येशूने काही गोष्टी एकापेक्षा अधिक वेळा शिकविल्या हे उघड आहे; आणि लूकने यातील काही शिकवणी वेगळ्या परिस्थितीत संदर्भित करण्याचे पसंद केले.
येशूचे हे प्रवचन इतके मोलवान का आहे ते, त्यामध्ये केवळ आध्यात्मिक सखोल ज्ञान समाविष्ठ आहे म्हणून नव्हे तर स्पष्ट व सोप्या रितीने सत्याला त्याने प्रगट केले म्हणून अधिक महत्वाचे आहे. त्याने सर्वसाधारण अनुभवाद्वारे व लोकांना ठाऊक असणाऱ्या गोष्टींचा वापर करून सांगितल्यामुळे ज्यांना देवाच्या मार्गाने चांगले जीवन जगावयाचे होते त्यांना त्याचे विचार सहजरितीने समजू शकले. या पुढील काही अंकात त्याने सांगितलेल्या काही गोष्टींचे आपण परिक्षण करून पाहणार आहोत. लूक ६:१२-२०; मत्तय ५:१, २.
◆ येशूचे स्मरणीय प्रवचन कोठे दिले गेले, तेथे कोण उपस्थित होते, आणि ते देण्याआधी काय घडले?
◆ लूकने प्रवचनातील काही भाग वेगळ्या परिस्थितीत संदर्भित केले हे आश्चर्यकारक का नाही?
◆ येशूचे हे प्रवचन कशामुळे मोलवान बनते?