येशूचे जीवन व उपाध्यपण
खरे आनंदी कोण आहेत?
प्रत्येकजण आनंदी असण्याची अपेक्षा धरतो. हे ओळखूनच, येशू डोंगरावरील प्रवचनाची सुरुवात कोण खरे आनंदी आहे ते सांगून करतो. यामुळे थोड्याच वेळात त्याच्या प्रचंड श्रोत्यांचे लक्ष आकर्षिले जाते याची आम्ही कल्पना करू शकतो. तथापि, पुष्कळांना त्याचे प्रास्ताविक शब्द विसंगत वाटतात.
त्याच्या शिष्यांना संबोधून येशू सांगतोः “अहो दीनांनो, तुम्ही धन्य; कारण देवाचे राज्य तुमचे आहे. अहो, जे तुम्ही आता भुकेले आहा ते तुम्ही धन्य; कारण तुम्ही तृप्त व्हाल. अहो, जे तुम्ही आता रडता ते तुम्ही धन्य; कारण तुम्ही हसाल. लोक तुमची निंदा करतील तेव्हा तुम्ही धन्य! त्या दिवशी आनंदीत होऊन उड्या मारा; कारण पहा, स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे.”
येशूच्या प्रवचनाची लूकने केलेली ही प्रस्तावना आहे. पण मत्तयाच्या अहवालाप्रमाणे येशू, जे सौम्य, जे दयाळू, जे अंतःकरणाचे शुद्ध, जे शांती करणारे ते धन्य! असेही सांगतो. ते धन्य आहेत कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील, त्यांच्यावर दया होईल, ते देवाला पाहतील आणि त्यांना देवाची मुले म्हणतील.
आनंदी असणे याचा येशूने केलेला अर्थ म्हणजे एखादा विनोद करतो त्यावेळी केवळ प्रसन्न किंवा आनंदित होणे हा नाही. तर अंतःकरणपूर्वक समाधानी व जीवनात परिपूर्ण व यशस्वी असणे यात खरा आनंद समाविष्ठ आहे.
येशू दाखवितो की, जे आपली आध्यात्मिक गरज ओळखतात व आपल्यावर असलेली पापी परिस्थिती जाणून देवाला ओळखतात व त्याची सेवा करतात तेच खरे आनंदी लोक आहेत. नंतर जरी देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यात त्यांचा द्वेष करण्यात आला अथवा छळ करण्यात आला तरी आपण देवास संतुष्ट करीत आहोत हे ते जाणतात व याच्या मोबदल्यात त्यांना सार्वकालिक जीवन मिळते.
येशूच्या बहुतेक श्रोत्यांप्रमाणे आज देखील असे लोक आहेत जे असा विश्वास बाळगतात की सुखसंपन्न असणे व विषयसुख भोगणे म्हणजे खरे आनंदी असणे होय. येशू हे जाणून होता. म्हणूनच परस्परातील फरक चित्रित करून श्रोत्यांना आश्चर्यचकित करणारे बोल तो सांगतोः
“तुम्हा धनवानांची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही आपले सांत्वन भरून पावलाच आहा. अहो, जे तुम्ही आता तृप्त झाला आहा त्या तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्हाला भूक लागेल. अहो, जे तुम्ही आता हसता त्या तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही शोक कराल व रडाल. जेव्हा सर्व लोक तुम्हास बरे म्हणतील तेव्हा तुमची केवढी दुर्दशा होणार! त्यांचे पूर्वज खोट्या संदेष्ट्यांस असेच म्हणत असत.”
येशूच्या असे म्हणण्यामागील काय अर्थ होत होता? धनवान, तृप्त झालेले व हसणारे यांची दुर्दशा का होणार होती? कारण जेव्हा मनुष्य ह्या गोष्टींना महत्व देतो तेव्हा, ज्यात खरा आनंद समाविष्ठ आहे अशी देवाची सेवा करण्याची संधी त्याच्या जीवनातून तो वगळतो. याचवेळेस येशूच्या म्हणण्याचा अर्थ असाही नव्हता की, जे दीन, भुकेले व दुःखी ते आनंदी असतात. तरीपण अशा प्रतिकुल स्थितीत असणाऱ्या व्यक्ती येशूच्या शिकवणीला दाद देतात, त्याचा स्विकार करतात व खऱ्या आनंदाने आशीर्वादित होतात.
नंतर, त्याच्या शिष्यांना उद्देशून येशू म्हणतोः “तुम्ही पृथ्वीचे मीठ आहा.” याचा अर्थ असा केव्हाही नाही की ते अक्षरशः मीठ आहेत. तर मीठ हे संरक्षणदायी आहे. यहोवाच्या मंदिरातील याजक अर्पणासाठी याचा वापर करीत म्हणून वेदीजवळ याचा खूप मोठा साठा असे.
येशूचे शिष्य हे “पृथ्वीचे मीठ” आहेत ते या अर्थाने की ते लोकांचे नैतिक बळ सुरक्षित ठेवतात. त्यांच्या संदेशामुळे जे योग्य प्रतिसाद देतात त्यांचे जीवन सुरक्षित राहू शकते! ह्यामुळे त्या व्यक्तीचे जीवन हे स्थिरता, निष्ठा व विश्वासूपणा या गुणांनी भरते व त्यामुळे आध्यात्मिक व नैतिक गुणांचा नाश होण्यापासून प्रतिबंध होतो.
“तुम्ही जगाचे प्रकाश आहा,” असे येशू त्याच्या शिष्यांना सांगतो. “दिवा लावून कोणी मापाखाली ठेवीत नाहीत,” असे तो म्हणतो, म्हणून, “तुमचा प्रकाश लोकांसमोर पडू द्या.” जाहीर साक्ष देऊन व पवित्र शास्त्राच्या तत्वाप्रमाणे आचरणाचे उत्तम उदाहरण राखून येशूचे शिष्य हे काम करत आहेत. लूक ६:२०-२६; मत्तय ५:३-१६.
◆ कोण खरे आनंदी आहेत व का?
◆ कोणाची दुर्दशा होणार व का?
◆ येशूचे शिष्य कशाप्रकारे “पृथ्वीचे मीठ” व “जगाचा प्रकाश” आहेत?