येशूचे जीवन व उपाध्यपण
त्याच्या शिष्यांसाठी उच्च दर्जे
धार्मिक पुढारी येशूला देवाच्या नियमांचा भंग करणारा असे मानीत व त्याला कसे जिवे मारावे यासाठी त्यांनी अलिकडेच कट केला होता. यामुळेच येशू आपल्या डोंगरावरील प्रवचनात असे स्पष्ट करतोः “नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करावयास मी आलो आहे असे समजू नका. मी रद्द करावयास नव्हे तर पूर्ण करावयास आलो आहे.”
देवाच्या नियमांबाबत येशू उच्च विचार राखून होता व इतरांनाही तसेच राखण्यास तो उत्तेजन देत होता. वस्तुतः तो म्हणतोः “जो कोणी ह्या लहान आज्ञांतील एखादी रद्द करील व त्याप्रमाणे लोकांना शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी ‘लहान’ म्हणतील.” म्हणजेच अशी व्यक्ती देवाच्या राज्यात कदापीहि जाऊ शकणार नाही.
देवाच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे लांबच राहिले, पण ते मोडण्यासाठी ज्या प्रवृत्त्या हातभार लावतात त्यांचाहि तो निषेध करतो. “खून करु नको,” असे नियमशास्त्र म्हणते ते लक्षात आणल्यावर येशू पुढे म्हणतोः “जो कोणी आपल्या भावावर उगाच रागावतो तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र आहे.”
सोबत्याशी क्रुद्धपणा ठेवणे किती गंभीर आहे व ते खून करण्यापर्यंत निरवू शकते म्हणून एखादा शांती कशी स्थापू शकतो यासाठी येशू दाखला देऊन म्हणतोः “तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर.”
दहा आज्ञांतील सातव्या आज्ञेकडे लक्ष वेधवून येशू म्हणतोः “‘व्यभिचार करु नको’ म्हणून सांगितले होते ते तुम्ही ऐकले आहे.” तरी व्यभिचाराकडे वाहवत नेणाऱ्या प्रवृत्तीचाहि येशू निषेध करुन म्हणतोः “मी तर तुम्हास सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.”
येशू येथे नुसत्या ओझरत्या अनैतिक विचाराबाबत बोलत नाही तर ‘पहात राहणे’ याविषयी सांगत होता. अशा कामुक इच्छेकडे जादा लक्ष दिल्यामुळे कधी संधि मिळता व्यभिचार घडू शकतो. मग एखादी व्यक्ती हे घडण्यापूर्वी त्याला कशाप्रकारे आळा घालू शकते? यासाठी असणाऱ्या गरजेसंबंधाने येशू दाखल्याने हे सांगतोः “तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो उपटून टाकून दे. . . . तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाकून दे.”
आपले जीवन वाचवावे यासाठी लोक अक्षरशः रोगीष्ट अवयव त्यागण्यास तयार असतात. पण येशूच्या म्हणण्याप्रमाणे, अनैतिक विचार व कृतींकडे वळविणारी कोणतीही गोष्ट मग ती डोळा व हात या महत्वपूर्ण अवयवासारखी असली तरी ती टाकून देण्यात पुढे व्हावे हे यात समाविष्ठ आहे. तसे नसेल तर, येशू म्हणतो की, अशी व्यक्ती गेहेन्नामध्ये (यरुशलेमाजवळील अग्नीचा खंदक), जे सार्वकालिक नाशास संबोधिते त्यात टाकण्यात येईल.
अपराध वा इजा करणाऱ्या लोकांशी कसे वागावे यासंबंधीही येशू सांगतोः “दुष्टाला अडवू नको” हा त्याचा सल्ला आहे. “जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो त्याच्याकडे दुसरा गाल कर.” जर कोणावर अथवा त्याच्या कुटुंबावर हल्ला झाल्यास त्याचा प्रतिकार करू नये असा येशूचा या म्हणण्यामागील हेतू नव्हता. चापट ही शारीरिक इजा करण्यासाठी नव्हे तर अपमान करण्यासाठी मारली जाते. तद्वत, येथे येशू असे सांगत होता की, जर एखाद्याने भांडण करण्याच्या वा वाद घालण्याच्या निमित्ताने अक्षरशः हातांनी किंवा अपमानित शब्दांनी चापड मारली तर त्याच्याशी जशास तसे वागणे चुकीचे आहे.
शेजाऱ्यावर प्रीती करणे या देवाच्या नियमाकडे लक्ष वेधविल्यावर येशू सांगतोः “मी तर तुम्हास सांगतो की, तुम्ही वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.” असे करण्याचे बळकट कारण देताना तो सांगतोः “अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे; कारण तो वाइटांवर व चांगल्यावर आपला सूर्य उगवितो.”
येशू हा भाग याप्रकारे संपवितोः “जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हावे.” येशूच्या म्हणण्याचा अर्थ, लोक पूर्णार्थाने परिपूर्ण होतील असा नव्हता. त्याऐवजी, देवाच्या अनुकरणाने प्रेमाने ते त्यांच्या वैऱ्यांचा देखील स्विकार करू शकतील. येशूचे हे शब्द लूकाच्या अहवालाशी देखील एकरुप आहेतः “जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा.” मत्तय ५:१७-४८; लूक ६:३६.
◆ येशूने देवाच्या नियमशास्त्राविषयी उच्च आदर कसा दाखवून दिला?
◆ खून व व्यभिचार यास समूळ काढून टाकण्यास येशूने कोणते मार्गदर्शन पुरविले?
◆ दुसरा गाल समोर करावा हे सांगण्यात येशूचा कोणता अर्थ होता?
◆ देव पूर्ण आहे तसे आम्ही कसे पूर्ण होऊ शकतो?