अध्याय ३
मार्ग तयार करणाऱ्याचा जन्म
अलीशिबेच्या गर्भारपणाचे दिवस पूर्ण होत आले. गेले तीन महिने मरीया तिच्याबरोबर राहात आहे. परंतु आता मरीयेला अलीशिबेचा निरोप घेऊन, नासरेथला, आपल्या घरी जाण्याची वेळ झाली आहे. जवळजवळ सहा महिन्यात तिलाही मूल होईल.
मरीया गेल्यावर लवकरच अलीशिबा प्रसूत होते. प्रसूती यशस्वी झाली तसेच अलीशिबा व बालक सुखरुप असल्याने किती आनंदीआनंद होतो! अलीशिबा ते बालक शेजाऱ्यांना व नातेवाईकांना दाखवते तेव्हा ते सर्व तिच्या आनंदात सहभागी होतात.
देवाच्या नियमानुसार, इस्राएलमध्ये, मुलाच्या जन्मानंतर आठव्या दिवशी त्याची सुंता केली पाहिजे. या प्रसंगी मित्रमंडळी व नातेवाईक भेटीला येतात. त्याच्या वडिलांच्या नावावरुन मुलाचेही नाव जखऱ्या ठेवावे असे ते म्हणतात. परंतु अलीशिबा म्हणते, “मुळीच नाही! याचे नाव योहान ठेवायचे आहे.” मुलाला हेच नाव दिले पाहिजे असे गब्रीएल देवदूताने सांगितलेले लक्षात घ्या.
परंतु त्यांचे मित्र म्हणतातः “ह्या नावाचा तुझ्या नातलगात कोणी नाही.” मग, मुलाचे नाव काय ठेवायचे असे ते मुलाच्या वडीलाला खुणावून विचारतात. एक पाटी मागवून “ह्याचे नाव योहान आहे,” असे जखऱ्या लिहितो तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटते.
याचबरोबर जखऱ्याची जीभ आश्चर्यकारकपणे मोकळी होते. अलीशिबेला मुलगा होईल या देवदूताच्या बोलण्यावर विश्वास न ठेवल्यामुळे तो मुका झाल्याचे तुम्हाला आठवत असेलच. जखऱ्या बोलू लागल्यावर शेजारपाजारच्या लोकांना आश्चर्य वाटते व ते आपसात म्हणतातः “हे बालक होणार तरी कोण?”
आता जखऱ्या पवित्र आत्म्याने परिपूर्ण होतो व आनंदाने म्हणतोः “इस्राएलाचा देव यहोवा धन्यवादित असो. कारण त्याने आपल्या लोकांकडे लक्ष देऊन त्याची खंडणी भरून सुटका केली आहे. आणि आपल्यासाठी त्याने आपला बाप दावीद याच्या घराण्यात बलवान उद्धारक प्रस्थापित केला आहे.” हा “बलवान उद्धारक” म्हणजे अजून जन्माला येणारा प्रभू येशू आहे. जखऱ्या म्हणतो की, येशूच्या मार्फत ‘आपण आपल्या शत्रूंच्या हातून सुटून [देवा]समोर पवित्रतेने व नीतीने आयुष्यभर [देवाची] सेवा निर्भयपणे करू असे देव करील.’
मग, जखऱ्या योहान या आपल्या मुलासंबंधी भाकित करतोः “हे बालका, तुला परात्पराचा संदेष्टा म्हणतील, कारण यहोवाचा मार्ग सिद्ध करण्याकरता तू त्याच्या पुढे चालशील. ह्यासाठी की, त्याच्या लोकांस त्यांच्या पापाच्या क्षमेने तारणाचा अनुभव द्यावा. आपल्या देवाच्या परम दयेने हे झाले आहे. तिच्यायोगे उदयप्रकाश वरून आमच्याकडे येईल. ह्यासाठी की त्याने, अंधारात व मृत्युछायेत बसलेल्यांना प्रकाश द्यावा आणि आमचे पाय शांतीच्या मार्गी लावावे.”
अजून अविवाहित असलेली मरीया ह्या वेळेपावेतो नासरेथमधील आपल्या घरी येऊन पोहंचली आहे. ती गर्भवती असल्याचे उघडकीस येईल तेव्हा काय होईल? लूक १:५६-८०; लेवीय १२:२, ३.
▪ योहान येशूपेक्षा वयाने किती मोठा आहे?
▪ योहान आठ दिवसाचा असताना कोणत्या गोष्टी घडतात?
▪ देवाने आपल्या लोकांकडे कसे लक्ष दिले आहे?
▪ योहान कोणते काम करील असे भाकित केले आहे?