‘स्वर्गातल्या धान्याचा’ फायदा करून घेणे
इजिप्ततून चमत्कारिकरित्या सुटका झाल्यानंतर काही काळातच इस्राएली लोकांनी आपल्याला सोडवणाऱ्या यहोवावर धडधडीत अविश्वास व्यक्त केला. यामुळे, यहोवाने त्यांना ४० वर्षे सिनाय अरण्यात भटकायला लावले. पण या सबंध काळात इस्राएली लोकांना आणि त्यांच्यासोबत आलेल्या परदेशी लोकांच्या ‘मोठ्या मिश्र समुदायाला’ खाण्यापिण्याच्या बाबतीत काहीच कमी पडले नाही. (निर्गम १२:३७, ३८) हे कसे शक्य झाले ते स्तोत्र ७८:२३-२५ येथे सांगितले आहे: “त्याने [यहोवाने] वरती आभाळास आज्ञा केली, व आकाशद्वारे उघडली. खाण्याकरिता त्याने त्यांच्यावर मान्न्याचा वर्षाव केला; आणि त्यांस स्वर्गातले धान्य दिले. दिव्यदूतांची भाकर मानवांनी खाल्ली; पुरून उरेल इतके अन्न त्याने त्यांस दिले.”
मान्ना खाणाऱ्यांमध्ये मोशे देखील होता आणि त्याने या आगळ्यावेगळ्या खाद्य पदार्थाचे वर्णन केले. त्याने लिहिले की सकाळी “दंव सुकून गेले तेव्हा त्या रानातील सर्व भूमीवर खवल्यासारखे हिमकणाएवढे बारीक कण पसरलेले नजरेस पडले. इस्राएल लोक ते पाहून एकमेकांस म्हणाले, हे काय?” किंवा हिब्रू भाषेत, “मान हू?” इस्राएली लोकांनी त्या खाद्याला “मान्ना” असे जे नाव दिले ते यावरूनच असावे. मोशे सांगतो: “ते धण्यासारखे पांढरे असून त्याची चव मध घालून केलेल्या पोळीसारखी होती.”—निर्गम १६:१३-१५, ३१, तळटीप, NW.
काहींचे असे म्हणणे आहे की मान्ना हे नैसर्गिकरित्या आढळणारे खाद्य होते, पण हे खरे नाही. मान्ना एका अलौकिक शक्तीद्वारे पुरवला जात होता. उदाहरणार्थ, तो कोणत्या एकाच ठिकाणी अथवा एकाच ऋतूत मिळत नव्हता. सकाळपर्यंत ठेवला तर त्यात किडे पडून त्यातून दुर्गंध येऊ लागायचा; पण तेच, दर आठवड्यात शब्बाथाच्या आदल्या दिवशी प्रत्येक कुटुंब जेव्हा दुप्पट मान्ना गोळा करायचे तेव्हा मात्र तो सकाळपर्यंत ठेवूनही खराब व्हायचा नाही; त्यामुळे शब्बाथाच्या दिवशी तो खाता येत होता—कारण शब्बाथाच्या दिवशी मान्ना मिळायचा नाही. खरोखर, मान्नाची तरतूद चमत्कारिकच होती.—निर्गम १६:१९-३०.
स्तोत्र ७८ ‘बलधाऱ्यांचा’ किंवा ‘दिव्यदूतांचा’ उल्लेख करते; यावरून असे सूचित होते की यहोवाने आपल्या दिव्यदूतांच्या माध्यमाने मान्ना पुरवला असावा. (स्तोत्र ७८:२५, तळटीप, NW) कोणत्याही परिस्थितीत, देवाच्या या दयेबद्दल त्याचे आभार मानण्याचे इस्राएली लोकांचे कर्तव्य होते. परंतु, त्यांपैकी बहुतेकांनी मिसर देशातून त्यांना सोडवणाऱ्याच्या प्रती कृतघ्न मनोवृत्ती दाखवली. यहोवाच्या प्रेमळ-दयेवर मनन न केल्यास कदाचित आपणही त्याच्या तरतुदी गृहित धरू लागू किंवा आपलीही त्यांच्यासारखी कृतघ्न मनोवृत्ती होण्याची शक्यता आहे. म्हणूनच, इस्राएलाच्या सुटकेचा आणि त्यानंतर घडलेल्या घटनांचा अहवाल यहोवाने पवित्र शास्त्रवचनांत “आपल्या शिक्षणाकरिता” राखून ठेवला यासाठी आपण त्याचे आभार मानले पाहिजेत.—रोमकर १५:४.
इस्राएलांना मिळालेला धडा ख्रिश्चनांकरताही उपयुक्त
मान्ना पुरवण्यामागचा यहोवाचा हेतू, त्या तीस लाख इस्राएली लोकांची केवळ शारीरिक भूक भागवण्यापुरताच नव्हता. त्याला त्यांना ‘लीन करून कसोटीस लावायचे होते,’ जेणेकरून त्यांची सुधारणा व्हावी व त्यांच्या हिताचे शिक्षण त्यांना मिळावे.’ (अनुवाद ८:१६; यशया ४८:१७) त्या सुधारणुकीला व शिक्षणाला त्यांनी प्रतिसाद दिल्यास यहोवा त्यांना वचनयुक्त देशात शांती, सुबत्ता आणि सौख्यानंद देऊन ‘शेवटी त्यांचे कल्याण’ करणार होता.
एक महत्त्वाची गोष्ट जी त्यांना शिकायची होती ती म्हणजे, “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघाणाऱ्या प्रत्येक वचनाने [जगतो].” (अनुवाद ८:३) देवाने मान्ना पुरवला नसता तर त्या लोकांची उपासमार झाली असती—आणि हे त्यांनीही कबूल केले. (निर्गम १६:३, ४) इस्राएल लोकांपैकी जे लोक कृतज्ञ होते, त्यांना मान्नाच्या रूपाने रोज या गोष्टीची आठवण व्हायची की त्यांचे जीवन संपूर्णतः यहोवावर अवलंबून होते; या जाणिवेने त्यांना नम्र केले. वचनयुक्त देशात जाऊन सर्वकाही विपुल प्रमाणात मिळाल्यावरही त्यांना यहोवाचा, आणि आपले जीवन कसे त्याच्यावरच अवलंबून आहे या गोष्टीचा सहजासहजी विसर पडला नसता.
इस्राएली लोकांप्रमाणेच ख्रिश्चनांनी नेहमी याची जाणीव ठेवली पाहिजे, की जीवनाच्या सर्व गरजांच्या पूर्तीसाठी—मग त्या शारीरिक गरजा असोत वा आध्यात्मिक, त्यांसाठी आपण पूर्णपणे देवावरच अवलंबून आहोत. (मत्तय ५:३; ६:३१-३३) दियाबलाने आणलेल्या परीक्षांपैकी एका परीक्षेत येशूने अनुवाद ८:३ येथे अभिलिखित असलेल्या मोशेच्या शब्दांत त्याला उत्तर दिले: “‘मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल,’ असा शास्त्रलेख आहे.” (मत्तय ४:४) बायबलमधून यहोवाची वचने वाचण्याद्वारे देवाच्या खऱ्या उपासकांचे भरणपोषण होते हे अगदी खरे आहे. शिवाय, देवासमागमे चालताना व त्याच्या राज्याला आपल्या जीवनात प्राथमिकता देताना जेव्हा ते या वचनांमुळे आपल्या जीवनावर होणारा चांगला परिणाम पाहतात तेव्हा त्यांचा विश्वास अधिकच मजबूत होतो.
पण मनुष्य हा अपरिपूर्ण आहे; काही गोष्टींची सवय झाली, की त्याला त्यांची तितकी कदर राहात नाही—आणि हे यहोवाच्या प्रेमळ कृपेने मिळणाऱ्या गोष्टींच्याबाबतीतही घडू शकते. उदाहरणार्थ, इस्राएली लोकांना सुरवातीला मान्नाविषयी खूप आश्चर्य आणि कृतज्ञता वाटली, पण नंतर त्यांच्यापैकी बरेच जण कुरकुर करू लागले. देवाच्या तरतुदीचा अनादर करीत, ते उसासे टाकू लागले, “ह्या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहो.” “जिवंत देवाला सोडून [देण्याचे]” हे त्यांचे पहिले पाऊल होते. (गणना ११:६; २१:५; इब्री लोकांस ३:१२) तेव्हा, त्यांचे उदाहरण “जे आपण युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोहचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी” आहे.—१ करिंथकर १०:११.
या इशारेवजा उदाहरणाकडे आपण कसे लक्ष देऊ शकतो? याचा एक मार्ग म्हणजे, बायबलच्या शिकवणुकींबद्दल किंवा विश्वासू व बुद्धिमान दासांमार्फत केल्या जाणाऱ्या तरतुदींबद्दल आपला दृष्टिकोन कधीही असा होऊ नये, की यात काय विशेष, हे तर नेहमीचेच आहे. (मत्तय २४:४५) कारण, एकदा का आपण यहोवाच्या देणग्यांना मामुली समजू लागलो किंवा त्यांना कंटाळवाण्या समजू लागलो की मग हळूहळू आपण त्याच्यापासून दुरावतच जातो.
म्हणूनच तर, यहोवा आपल्यावर नवनव्या अद्भुत गोष्टींची एकसाथ बरसात करत नाही. उलट, तो आपल्या वचनावर हळूहळू, क्रमाक्रमाने प्रकाश टाकतो. (नीतिसूत्रे ४:१८) यामुळे त्याच्या लोकांना या गोष्टी आत्मसात करून त्यांप्रमाणे वागणे सोपे जाते. येशूनेही आपल्या पहिल्या शिष्यांना शिकवताना आपल्या पित्याच्या आदर्शाचे अनुकरण केले. तो “त्यांच्या ग्रहणशक्तीप्रमाणे” किंवा काही अनुवादांप्रमाणे, “त्यांना समजू शकेल अशाप्रकारे” देवाच्या वचनाचा त्यांना खुलासा करून सांगत असे.—मार्क ४:३३; पडताळा योहान १६:१२.
देवाच्या तरतुदींबद्दल वाटणारी कदर आणखी वाढवा
येशूच्या शिकवण्याच्या पद्धतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वारंवार सांगणे. एखादा मुद्दा—उदाहरणार्थ बायबलचे एखादे तत्त्व—आपल्या डोक्यात लगेच बसते, पण ते अंतःकरणात उतरवून ख्रिस्ती ‘नव्या मनुष्यात’ रुजवायला वेळ लागतो; विशेषतः जुने जगीक आचारविचार आणि प्रवृत्त्या आपल्या मनात मुळावलेल्या असतात तेव्हा. (इफिसकर ४:२२-२४) गर्वावर विजय मिळवून नम्रपणाचा गुण वाढवण्याच्या बाबतीत येशूच्या शिष्यांची हीच स्थिती होती. नम्रपणाविषयी येशूला त्यांना कित्येकदा बोध द्यावा लागला; प्रत्येकवेळी तोच मुद्दा तो वेगळ्या प्रकारे सादर करायचा, या उद्देशाने की ही गोष्ट त्यांच्या मनात उतरून अगदी पक्की बसावी, आणि असे घडलेही.—मत्तय १८:१-४; २३:११, १२; लूक १४:७-११; योहान १३:५, १२-१७.
विशिष्ट विषयांची पुनरावृत्ती करण्याच्या येशूच्या याच आदर्शाचे आधुनिक समयांत, ख्रिस्ती सभा आणि वॉचटावर संस्थेची प्रकाशने यांत विचारपूर्वक अनुकरण केले जाते. तेव्हा ही देखील देवाच्या प्रेमळ कृपेचीच अभिव्यक्ती समजून आपण कदर बाळगावी आणि इस्राएली लोकांना मान्नाचा कंटाळा आला तसे आपण देवाच्या तरतुदींना कंटाळवाण्या समजू नये. यहोवा ज्या गोष्टींची आपल्याला वारंवार आठवण करून देतो त्या गोष्टी लक्षपूर्वक आत्मसात केल्यास आपल्याला आपल्या जीवनात त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. (२ पेत्र ३:१) अशा कदर बाळगण्याच्या मनोवृत्तीतून आपण दाखवून देतो की, आपल्याला देवाचे वचन वरवर नव्हे तर अंतःकरणापासून ‘समजत’ आहे. (मत्तय १३:१५, १९, २३) आणि या बाबतीत, आपल्यापुढे दाविदाचे फार चांगले उदाहरण आहे; आज आपल्याला जसे निरनिराळ्या माध्यमांतून आध्यात्मिक अन्न मिळते तसे त्याला उपलब्ध नव्हते, तरीसुद्धा त्याने यहोवाच्या नियमांचे वर्णन “मधापेक्षा, मोहोळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड” असे केले!—स्तोत्र १९:१०.
सार्वकालिक जीवन देणारा “मान्ना”
येशूने यहुद्यांना सांगितले, “मीच जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला तरी ते मेले. . . . स्वर्गांतून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे; ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल; जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.” (योहान ६:४८-५१) खरोखरची भाकर किंवा मान्ना यांमुळे सार्वकालिक जीवन मिळाले नाही आणि मिळूही शकत नाही. पण येशूच्या खंडणी बलिदानावर जे विश्वास दाखवतात अशांना शेवटी सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद प्राप्त होईल.—मत्तय २०:२८.
येशूने दिलेल्या खंडणीमुळे ज्या सर्वांना लाभ होतो त्यांपैकी अधिकांश, पृथ्वीवरील परादिसात सार्वकालिक जीवनाचा उपभोग घेतील. इजिप्तमधून इस्राएली लोकांसोबत परदेशी लोकांचा जो “मोठा मिश्र समुदाय” बाहेर पडला होता, त्याचे आधुनिक प्रतिरूप असणारा हा “मोठा लोकसमुदाय”—येणाऱ्या त्या ‘मोठ्या संकटातून’ बचावेल ज्यात पृथ्वीवरील सर्व दुष्टाईचा समूळ नाश होईल. (प्रकटीकरण ७:९, १०, १४; निर्गम १२:३८) शिवाय, जे खुद्द इस्राएली लोकांचे आधुनिक प्रतिरूप आहेत अशांना तर याहूनही भव्य प्रतिफळ मिळेल. या एकूण १,४४,००० जणांना पौलाने देवाचे आध्यात्मिक इस्राएल म्हटले. मृत्यू होताच त्यांना स्वर्गीय जीवनाच्या पुनरुत्थानाचे प्रतिफळ मिळते. (गलतीकर ६:१६; इब्री ३:१; प्रकटीकरण १४:१) स्वर्गात गेल्यानंतर येशू त्यांना एक खास प्रकारचा मान्ना देईल.
‘गुप्त राखलेला मान्न्याचा’ अर्थ
पुनरुत्थित येशूने आध्यात्मिक इस्राएलांना सांगितले, “जो विजय मिळवितो त्याला गुप्त राखलेल्या मान्न्यातून मी देईन.” (प्रकटीकरण २:१७) या लाक्षणिक गुप्त मान्न्यावरून आपल्याला आठवण होते की देवाने मोशेला पवित्र कराराच्या कोशात एका सुवर्णपात्रात मान्ना ठेवण्याची आज्ञा दिली होती. कराराचा हा कोश निवासमंडपाच्या परमपवित्रस्थान म्हटलेल्या मंडपात होता. याठिकाणी हा मान्ना सर्वांच्या नजरेआड, गुप्त ठेवला होता. स्मरणचिन्ह म्हणून जपून ठेवलेला हा मान्ना निवासमंडपात होता तोपर्यंत खराब झाला नाही; त्यामुळे हा मान्ना एका अविनाशी खाद्य पुरवठ्याचे अगदी साजेसे प्रतीक होता. (निर्गम १६:३२; इब्री लोकांस ९:३, ४, २३, २४) १,४४,००० जणांना गुप्त मान्ना देण्याचा असा अर्थ होतो, की येशू त्यांना देवाचे आत्मिक पुत्र म्हणून अविनाशीपण व अमरत्व बहाल करण्याची हमी देतो.—योहान ६:५१; १ करिंथकर १५:५४.
स्तोत्रकर्ता म्हणतो: “जीवनाचा झरा तुझ्याजवळ [यहोवाजवळ] आहे.” (स्तोत्र ३६:९) मान्न्याची तरतूद—अक्षरार्थ आणि लाक्षणिक—याच मूलभूत सत्याला पुष्टी देत नाही का? देवाने प्राचीन काळी इस्राएलांना दिलेला मान्ना, येशूच्या शरीराच्या रूपात त्याने आपल्या लाभाकरता पुरवलेला लाक्षणिक मान्ना आणि येशूच्या द्वारे त्याने १,४४,००० जणांना देऊ केलेला लाक्षणिक गुप्त मान्ना यांमुळे आपल्या सर्वांना ही आठवण करून दिली जाते की आपले जीवन पूर्णपणे देवावर अवलंबून आहे. (स्तोत्र ३९:५, ७) आणि आपण हे नम्र अंतःकरणाने सदोदीत मान्य केले पाहिजे. असे केल्यास, यहोवा ‘शेवटी आपले कल्याण करील.’—अनुवाद ८:१६.
[२६ पानांवरील चित्रं]
सार्वकालिक जीवन मिळवण्याकरता, सर्व मनुष्ये ‘स्वर्गांतून उतरलेल्या जिवंत भाकरीवर’ अवलंबून आहेत
[२८ पानांवरील चित्र]
प्रत्येक ख्रिस्ती सभेला उपस्थित राहण्याद्वारे आपण दाखवून देतो की यहोवा ज्या गोष्टींची आपल्याला आठवण करून देतो त्या गोष्टींबद्दल आपल्याला कदर आहे