वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ६/८ पृ. १८-१९
  • माससंबंधी ख्रिश्‍चनांचा दृष्टिकोन काय असावा?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • माससंबंधी ख्रिश्‍चनांचा दृष्टिकोन काय असावा?
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मास—बायबलवर आधारित?
  • ख्रिस्ताचे बलिदान—कितीदा?
  • यहोवाचे साक्षीदार प्रभुभोजनाचा विधी चर्चपेक्षा वेगळ्या पद्धतीने का पाळतात?
    यहोवाच्या साक्षीदारांबद्दल सहसा विचारले जाणारे प्रश्‍न
  • सर्वांसाठी उपलब्ध असणारी “जीवनाची भाकर”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • प्रभूच्या भोजनाचे तुमच्याकरता फार महत्त्व आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
सावध राहा!—१९९९
g99 ६/८ पृ. १८-१९

बायबलचा दृष्टिकोन

माससंबंधी ख्रिश्‍चनांचा दृष्टिकोन काय असावा?

दन्यू यॉर्क टाईम्स वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, पोप जॉन पॉल दुसरे यांनी अलीकडेच “यास दुजोरा दिला, की एखाद्या कॅथलिकाने मास चुकवणे हे चर्चच्या दृष्टिकोनातून पाप आहे.” आणि अनेक श्रद्धाळू कॅथलिक याच्याशी पूर्णपणे सहमत आहेत. पण मास म्हणजे नेमके काय? त्याबाबतीत चर्चचे आणि बायबलचे एकमत आहे का?

थिंग्स कॅथलिक्स आर आस्क्ड अबाउट या पुस्तकात कॅथलिक पाळक मार्टिन जे. स्कॉट यांनी मासची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे: “मास म्हणजे ख्रिस्ताच्या शरीराचे आणि रक्‍ताचे, रक्‍तहीन बलिदान. कॅलव्हरी म्हणजे ख्रिस्ताचे बलिदान, ज्यात प्रत्यक्ष रक्‍त सांडले गेले. मूलतः, मासच्या आणि क्रूसाच्या बलिदानात काहीच फरक नाही. ही काही अलंकारिक, रूपकात्मक भाषा किंवा अतिशयोक्‍तीही नाही.” त्यांनी असेही म्हटले की, “मासच्या वेळी, आपण देवाच्या पुत्राला आपल्या वेद्यांवर उतरवतो आणि बलिदानाच्या स्वरूपात त्यास परमेश्‍वराला अर्पण करतो.”

मास—बायबलवर आधारित?

मासचा विधी बायबलच्या शिकवणुकीवर आधारित आहे असे प्रांजळ कॅथलिक मानतात. आणि त्यासाठी पुरावा म्हणून ते, येशूच्या शब्दांचा उल्लेख करतात; येशूने हे शब्द, सामान्यपणे संबोधल्या जाणाऱ्‍या अखेरच्या सांजभोजनाच्या वेळी उद्‌गारले होते. आपल्या प्रेषितांना भाकर आणि द्राक्षारस देत असताना भाकरीच्या संदर्भात येशूने म्हटले: “हे माझे शरीर आहे.” मग द्राक्षारसाच्या संदर्भात तो म्हणाला: “हे माझे रक्‍त आहे.” (मत्तय २६:२६-२८)a कॅथलिक लोकांचे असे म्हणणे आहे, की येशूने हे शब्द उद्‌गारले तेव्हा त्याने खरोखरच भाकरीचे आणि रक्‍ताचे रूपांतर त्याच्या शरीरात आणि रक्‍तात केले. पण, यावर नवीन कॅथलिक विश्‍वकोश (१९६७) (इंग्रजी) अशी ताकीद देतो: “‘हे माझे शरीर आहे’ किंवा ‘हे माझे रक्‍त आहे.’ . . . या शब्दांचा आपण अवास्तव शाब्दिक अर्थ लावून घेता कामा नये. कारण, ‘कापणी ही युगाची समाप्ती आहे,’ (मत्त. १३:३९) ‘मीच खरा द्राक्षवेल आहे,’ (योहा. १५:१) यांसारख्या उदाहरणांतील [“असणे” या क्रियापदाचा] अर्थ केवळ सूचित करणे किंवा चित्रित करणे असा होतो.” अशाप्रकारे वरील विश्‍वकोश देखील कबूल करतो, की अखेरच्या सांजभोजनाच्या वेळी भाकरीचे आणि द्राक्षारसाचे रूपांतर शाब्दिक अर्थाने येशूच्या शरीरात किंवा रक्‍तात झाले होते असे मत्तय २६:२६-२८ मधील मजकूर सिद्ध करत नाही.

पण, “स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे; . . . जो माझा देह खातो व माझे रक्‍त पितो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे” हे येशूने एकदा उद्‌गारलेले शब्द काहींना कदाचित आठवतील. (योहान ६:५१, ५४) येशूचे हे शब्द ऐकणाऱ्‍या काही लोकांनी त्याच्या उद्‌गारांचा शाब्दिक अर्थ लावून घेतला आणि त्यामुळे त्यांना जबरदस्त धक्का बसला. (योहान ६:६०) मग, त्या प्रसंगी येशूने खरोखरच आपल्या देहाचे रूपांतर भाकरीत केले होते का, असे विचारता येईल. मुळीच नाही! तो केवळ लाक्षणिक अर्थाने बोलत होता. त्याने स्वतःची तुलना भाकरीशी केली कारण त्याच्या बलिदानाद्वारे सबंध मानवजातीला जीवदान मिळणार होते. योहान ६:३५, ४० अगदी सुस्पष्टपणे सूचित करते, की देह खाणे आणि रक्‍त पिणे हे येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवण्याद्वारे होणार होते.

मास हा कॅथलिक चर्चचा एक प्रमुख विधी असल्यामुळे त्यास बायबल जरूर पुष्टी देत असेल असे एखाद्याला वाटेल. पण, बायबलमध्ये त्यास कोणताही आधार नाही. याचे कारण सांगताना द कॅथलिक विश्‍वकोश (१९१३ ची आवृत्ती) म्हणतो: “आमच्या या सिद्धान्ताचा मुळारंभ परंपरेतून झालेला असून . . . पापांची क्षमेसाठी [क्षमा याचनेसाठी] मासचे बलिदान किती महत्त्वपूर्ण आहे हे सुरवातीपासूनच परंपरा जाहीर करते.” तेव्हा, रोमन कॅथलिक मास हा बायबलवर नव्हे, तर रूढीपरंपरेवर आधारित आहे.

एखादी परंपरा किती का प्रांजळपणे पाळली जावो, ती जर बायबलच्या एकवाक्यतेत नसेल तर देवाला ती स्वीकृत नाही. म्हणूनच, येशूने त्याच्या काळातील धार्मिक पुढाऱ्‍यांची असे म्हणून टीका केली: “तुम्ही आपल्या परंपरेमुळे देवाचे वचन फोल ठरवले आहे.” (मत्तय १५:६) येशूच्या दृष्टिकोनात देवाचे वचन अतिशय महत्त्वपूर्ण होते; त्यामुळे माससंबंधीच्या शिकवणुकीचे परीक्षण आपण पवित्र बायबलच्याच दृष्टिकोनातून करू या.

ख्रिस्ताचे बलिदान—कितीदा?

कॅथलिक चर्चच्या शिकवणुकीनुसार, जितक्यांदा मास विधी पाळला जातो तितक्यांदा येशूचे बलिदान चढवले जाते; पण त्याच वेळी त्यांचे असेही म्हणणे आहे, की या विधीत तो खरोखरच मरत नाही, तर त्याचे हे बलिदान रक्‍तहीन बलिदान असते. या दृष्टिकोनाशी बायबल सहमत आहे का? इब्री लोकांस १०:१२, १४ काय म्हणते त्याकडे लक्ष द्या: “पापाबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पूण [येशू] देवाच्या उजवीकडे बसला आहे. पवित्र होणाऱ्‍यांना त्याने त्या एकाच अर्पणाने सर्वकाळचे पूर्ण केले आहे.”

पण, तरीही एखादा प्रांजळ कॅथलिक कदाचित असा आक्षेप घेईल: ‘आपण सर्वच अनेकदा पाप करतो. त्यामुळे येशूला वारंवार स्वतःचे अर्पण द्यावे लागणार नाही का?’ याचे उत्तर बायबलमध्ये इब्री लोकांस ९:२५, २६ या ठिकाणी नमूद केलेले आहे; ते म्हणते: “[ख्रिस्ताला] वारंवार स्वतःचे अर्पण करावे लागत नाही. . .  आता तो एकदाच युगाच्या समाप्तीस आत्मयज्ञ करून पापे नाहीशी करण्यासाठी प्रगट झाला आहे.” ख्रिस्ताला “वारंवार स्वतःचे अर्पण करावे लागत नाही,” याची नोंद घ्या. आणि याचे कारण रोमकर ५:१९ या वचनात प्रेषित पौल देतो: “जसे एकाच मनुष्याच्या [आदामाच्या] आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले होते, तसे एकाच मनुष्याच्या [येशूच्या] आज्ञापालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील.” आदामाच्या केवळ एका आज्ञाभंजक कृत्यामुळे आपण सर्वजण मृत्यूच्या आधीन झालो; तर खंडणी देण्याच्या येशूच्या केवळ एका कृतीमुळे त्याच्या बलिदानावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या आपणा सर्वांच्या पापांची आज क्षमा होण्यासाठी तसेच भवितव्यात सार्वकालिक जीवनाचा आनंद घेण्यासाठी एक आधार मिळाला आहे.

पण येशूचे बलिदान, एकदा चढवले काय आणि अनेकदा चढवले काय, काही फरक पडतो का? हा खरे तर, येशूच्या बलिदानी मूल्याबद्दल आपल्याला किती कदर आहे त्याचा प्रश्‍न आहे. येशूचे बलिदान हे आजवर आपल्याला मिळालेले सर्वश्रेष्ठ दान आहे; ते इतके अनमोल, इतके परिपूर्ण दान आहे की त्याची पुन्हा कधीच पुनरावृत्ती करावी लागणार नाही.

अर्थात, येशूचे बलिदान स्मरण करण्याजोगे आहे. पण, एखाद्या घटनेचे स्मरण करणे आणि त्याची पुनरावृत्ती करणे यात बराच फरक असतो. उदाहरणार्थ, आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करणारे एखादे दांपत्य आपला विवाह कोणत्या दिवशी झाला हे, विवाह सोहळा पुन्हा पार न पाडताही आठवणीत ठेवू शकतात. त्याचप्रमाणे, दर वर्षी यहोवाचे साक्षीदार येशूचा मृत्युदिन पाळतात आणि येशूने आज्ञा दिल्याप्रमाणे ते—येशूच्या बलिदानार्थ नव्हे तर त्याच्या “स्मरणार्थ” हा दिवस पाळतात. (लूक २२:१९) या शिवाय, वर्षभर आपले जीवन, आपली कार्ये आणि आपले विश्‍वास पवित्र बायबलच्या एकमतात आणून ते येशू ख्रिस्तामार्फत यहोवा देवाबरोबर एक घनिष्ट नातेसंबंध जोपासण्याचा यत्न करतात.

असे करण्यासाठी पुष्कळदा त्यांना त्यांच्या विचारसरणीत बदल करावा लागला. पण, मानवी परंपरेऐवजी आपण निष्ठावानपणे देवाच्या वचनाचा पुरस्कार केल्यास आपल्याला आशीर्वाद मिळतील हे माहीत असल्यामुळे ते आनंदी आहेत. तसेच, जवळजवळ दोन हजार वर्षांपूर्वी सर्वकाळासाठी एकदाच सांडलेल्या येशूच्या यज्ञार्पित रक्‍तावर विश्‍वास ठेवल्याने त्यांच्या सर्व पापांचे क्षालनही होईल.—१ योहान १:८, ९.

[तळटीपा]

a या लेखात उद्धृत केलेली सर्व शास्त्रवचने कॅथलिक न्यू जेरुसलेम बायबल यातून घेतलेली आहेत.

[१८ पानांवरील चित्र]

सेंट गाईल्सचा मास (प्रतिकृती)

[चित्राचे श्रेय]

Erich Lessing/Art Resource, NY

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा