येशूचे जीवन व उपाध्यपण
पुष्कळ शिष्य येशूचा त्याग करतात
कफर्णहूम येथील सभास्थानात येशू शिक्षण देत आहे. तो, स्वर्गातून आलेली खरी भाकर या नात्याने त्याच्या भूमिकेविषयी बोलत आहे. त्याच्या या भाषणाची सुरवात खरे पाहता, लोकांना तो गालील समुद्राच्या पूर्व भागात परतीच्या वेळी आढळला तेव्हापासून झाली होती. येथे त्याने आधी भाकरी व मासे याकरवीच्या अद्भुत चमत्काराने लोकांना भरविले होते.
येशूने आपले भाषण पुढे चालवून तेच पुन्हा म्हटलेः “जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.” दोन वर्षाआधीच, म्हणजे इ. स. ३० च्या वसंतऋतुत येशूने निकदेम याला म्हटले होते की, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला पुत्र त्यांच्यासाठी तारणकर्ता असा दिला. येशू आता येथे हे दाखवून देत आहे की, या जगातील कोणीही, तो लवकरच देत असलेल्या खंडणीवर आपला विश्वास प्रकट करून लाक्षणिकपणे त्याचे शरीर खातो, तर त्याला सार्वकालिक जीवनाची प्राप्ती होईल.
लोक मात्र, येशूच्या या वक्तव्यावर अडखळतात. “हा मनुष्य आपले शरीर कसे काय खाण्यास देणार?” असे ते विचारतात. शरीराचे खाणे हे लाक्षणिकरित्या असणार असे श्रोत्यांनी समजावून घ्यावे असे येशूला वाटत असते. याकरता, तो यावर अधिक जोर देण्यासाठी असे काही बोलतो जे शब्दशः आक्षेपार्ह असेच आहे.
“तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही, तर” येशू म्हणतो, “तुम्हामध्ये जीवन नाही. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन; कारण माझा देह खरे खाद्य व माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो.”
येशू आपल्या वक्तव्याद्वारे जर नरभक्षकता सूचवीत होता तर ते त्याचे बोलणे निश्चितपणे गुन्हा ठरले असते. तथापि, येशू अर्थातच शब्दशः खाणे व रक्त पिण्याविषयी समर्थन करीत नव्हता. तो केवळ या गोष्टीवर जोर देत आहे की, सार्वकालिक जीवन ज्यांना हवे आहे त्यांनी त्याच्या बलिदानावर विश्वास ठेवावा. आपले परिपूर्ण मानवी शरीर देऊन व जीवनी रक्त ओतून तो हे बलिदान लवकरच देणार होता. तथापि, त्याचे पुष्कळ शिष्य त्याच्या या शिकवणीचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करीत नाहीत. ते आक्षेप घेतात व म्हणतातः “हे वचन कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो?”
आपले पुष्कळ शिष्य कुरकुरत आहेत हे पाहून येशू म्हणतोः “यामुळे तुम्ही अडखळता काय? मनुष्याचा पुत्र पूर्वी जेथे होता तेथे तुम्ही त्याला चढताना पहाल तर? . . . मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहेत. तरी विश्वास ठेवीत नाहीत असे तुम्हामध्ये कित्येक आहेत.”
येशू पुढे म्हणतोः “ह्याच कारणास्तव मी तुम्हाला सांगितले की, पित्याने कोणाही मनुष्याला तशी देणगी दिल्याशिवाय तो माझ्याकडे येऊ शकत नाही.” हे ऐकून पुष्कळ शिष्य त्याला सोडून निघून जातात व ते परत पुन्हा त्याला अनुसरीत नाहीत. मग, येशू आपल्या बारा शिष्यांकडे वळतो व विचारतोः “तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे काय?”
पेत्र उत्तर देतोः “प्रभुजी आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपल्याजवळ आहेत. आम्ही विश्वास ठेवला आहे व ओळखले आहे की, देवाचा पवित्र तो पुरुष आपणच आहा.” पेत्र व इतर शिष्यांना येशूची ती शिकवण पूर्णपणे लक्षात आली नसेल तरी एकनिष्ठ असण्याचे हे केवढे सुंदर वक्तव्य पेत्राने केले!
येशूला त्याच्या उत्तराने प्रसन्नता वाटते, तरी तो पुढे म्हणतोः “तुम्हा बारा जणांस मी निवडून घेतले नाही काय? तरी तुम्हातील एक जण निंदक आहे.” हे तो यहुदा इस्कर्योतबद्दल बोलतो. कदाचित या वेळेपासून येशूने यहुदाच्या मनाचा कल वाईट मार्गाकडे झुकल्याची “सुरवात” किंवा आरंभाची लक्षणे बघितली असावीत.
येशूला लोक राजा बनवू पाहात होते पण अलिकडेच येशूने त्यांना प्रतिकार दर्शवून नाराज केले होते. तेव्हा त्यांना असे वाटत असावे की, ‘हा जर मशीहाचा योग्य दर्जा घेऊ इच्छित नाही तर तो मशीहा कसा असू शकेल?’ ती घटना कदाचित लोकांच्या लक्षात ताजी असावी. योहान ६:५१-७१; ३:१६.
◆ येशू कोणासाठी आपले शरीर देत आहे, व ते त्याचे शरीर कसे ‘खाऊ’ शकतात?
◆ येशूच्या कोणत्या शब्दांनी लोकांना धक्का बसतो, तरी तो कशावर जोर देतो?
◆ पुष्कळजण येशूला सोडून जातात तरी पेत्राची प्रतिक्रिया काय आहे?