तुमचे मृत प्रियजन त्यांना तुम्ही पुन्हा पाहू शकाल का?
जॉनची आई वारली तेव्हा तो केवळ नऊ वर्षांचा होता. नंतर, मृत व्यक्तीला ठेवण्याच्या खोलीत काय घडले याची आठवण करून तो सांगतो: “मी तिच्यासाठी एक चित्र काढलं आणि त्यावर असे लिहिले की आम्ही सर्व जण येऊपर्यंत तू आमच्यासाठी स्वर्गात थांबून राहा. मी ती चिठ्ठी शवपेटीमध्ये ठेवण्यासाठी माझ्या वडिलांना दिली. माझी आई जरी मेलेली होती तरी, तिला माझ्याकडून हा शेवटचा संदेश मिळाला असे मला साहजिकपणे वाटले.”—एका पालकाचा मृत्यू होतो तेव्हा कसे वाटते (इंग्रजी), लेखिका, जिल क्रेमेन्टझ.
जॉन त्याच्या आईवर जीवाभावाने प्रेम करत होता यात काहीच शंका नाही. तिच्या चांगल्या गुणांचे वर्णन केल्यानंतर, तो म्हणाला: “कदाचित मला वाईट गोष्टींची आठवण करायची नाही, परंतु मी तिच्याविषयी काही वाईट असा विचार देखील करू शकत नाही. माझ्या सबंध जीवनात मी तिच्यासारखी देखणी स्त्री पाहिली नाही.”
जॉनप्रमाणेच, अनेकांना त्यांच्या प्रियजनांच्या प्रिय आठवणी आहेत व त्यांना पुन्हा पाहण्याची मानसिक गरज आहे हे ते कबूल करतात. एडीथ, जिचा २६ वर्षीय मुलगा कर्करोगामुळे मरण पावला, म्हणाली: “माझा मुलगा अजूनही कोठेतरी जिवंत आहे, असे मला वाटत राहते, परंतु तो कोठे आहे हे मला माहीत नाही. मी त्याला पुन्हा पाहू शकेन का? मला याचे उत्तर माहीत नाही, पण मी तशी आशा करते.”
निश्चितच, मानवाचा प्रेमळ निर्माणकर्ता, मानवाच्या या स्वाभाविक इच्छेला समजून न घेण्याइतका भावनारहित नाही. यासाठीच त्याने असे अभिवचन दिले आहे की अशी एक वेळ येणार आहे, जेव्हा लाखो लोकांचे त्यांच्या मृत प्रियजनांसोबत पुनर्मिलन घडेल. देवाच्या वचनात, मृत लोकांच्या होणाऱ्या पुनरूत्थानाच्या अभिवचनाचे अनेक संदर्भ आहेत.—यशया २६:१९; दानीएल १२:२, १३; होशेय १३:१४; योहान ५:२८, २९; प्रकटीकरण २०:१२, १३.
कोणाचे स्वर्गासाठी पुनरुत्थान होते?
जॉनची प्रिय आई स्वर्गामध्ये त्याची वाट पाहत आहे, या त्याच्या आशेविषयीचा आपण विचार करू या. चर्चला जाणाऱ्या अनेकांची ही आशा किंवा विश्वास आहे. अशा प्रकारच्या दृष्टिकोनाला पाठिंबा देण्याच्या प्रयत्नात, पाळकवर्ग आणि सामाजिक कार्यकर्ते पवित्र शास्त्रातील वचनांचा गैरवापर करतात.
उदाहरणार्थ, दुःखित झालेल्यांना मदत करणारी एक तज्ज्ञ, डॉ. एलिझाबेथ क्युब्लर-रॉस मुले व मृत्यू यांच्याबद्दल (इंग्रजी) या तिच्या पुस्तकात असे म्हणते: “मरणोन्मुख होणे म्हणजे, आम्ही ज्या प्रकारे आमचा जुना, जीर्ण झालेला पोशाख काढून टाकतो, किंवा एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जातो तसेच, आमच्या शरीराला फेकून देणे होय. उपदेशक १२:७ मध्ये आपण वाचतो: ‘तेव्हा माती पूर्ववत मातीस मिळेल; आणि देवाने दिलेला आत्मा त्याजकडे परत जाईल.’ येशूने म्हटले: ‘मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो, म्हणजे जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे.’ आणि क्रुसावरील चोराला म्हटले: ‘तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील.’”
आमचे मृत प्रिय जन जिवंत आहेत व आमच्यासाठी स्वर्गात थांबून आहेत, असा या वरील शास्त्रवचनांचा अर्थ होतो का? आम्ही त्या वचनांचे बारकाईने परीक्षण करू या. पहिल्यांदा उपदेशक १२:७ पासून सुरवात करू. ज्या सुज्ञ माणसाने हे शब्द लिहिले त्याचा, त्याच पुस्तकात त्याने जे आधीच लिहिले होते त्याच्या विरोधात काही लिहिण्याचा हेतू नव्हता हे स्पष्ट आहे, जसे की: “आपणास मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळत असते; पण मृतास तर काहीच कळत नाही.” (उपदेशक ९:५) तो सर्वसामान्यपणे मानवजातीच्या मृत्यूविषयी बोलत होता. सर्व कट्टर नास्तिकवादी आणि कठोर गुन्हेगार त्यांच्या मृत्यूनंतर देवाकडे पुन्हा जातात असा विश्वास करणे तर्कशुद्धतेचे आहे का? मुळीच नाही. वास्तविक पाहता, ही गोष्ट आम्ही स्वतःला चांगले किंवा वाईट समजले तरी, आमच्या कोणाच्याही बाबतीत म्हणता येणार नाही. आमच्यातील कोणीच स्वर्गात देवासोबत नव्हता तर मग, आम्ही त्याच्याकडे पुन्हा जातो असे कसे म्हणता येईल बरे?
मग, मेल्यावर ‘देवाने दिलेला आत्मा त्याजकडे पुन्हा जातो’ असे पवित्र शास्त्र लेखकाच्या म्हणण्याचा काय अर्थ होता? “आत्मा” असे ज्याचे भाषांतर झाले आहे त्या इब्री शब्दाचा उपयोग करताना तो, एका मानवापासून दुसऱ्या मानवात वेगळेपणा दर्शवणाऱ्या कोणत्या तरी असामान्य गोष्टीला संबोधित नव्हता. उलटपक्षी, तोच पवित्र शास्त्र लेखक उपदेशक ३:१९ मध्ये म्हणतो की, मानव आणि प्राणी या “सर्वांचा प्राण [आत्मा, NW] सारखाच आहे.” त्याचा बोलण्याचा अर्थ असा झाला की, तो “आत्मा” मनुष्य आणि प्राण्यांच्या शरीरातील पेशींमधील जीवन शक्ती आहे हे स्पष्ट आहे. हा आत्मा आम्हाला थेटपणे देवाकडून मिळालेला नाही. तो आम्हाला, आमच्या मानवी पालकांकडून आमची गर्भधारणा होऊन आम्ही जन्मलो तेव्हा मिळाला. याशिवाय, हा आत्मा मेल्यानंतर शब्दशः अर्थाने अंतराळातून प्रवास करून देवाकडे पुन्हा जात नाही. ‘देवाने दिलेला आत्मा त्याजकडे पुन्हा जातो’ हा वाक्प्रचार भाषालंकार आहे, आणि त्याचा अर्थ असा होतो की, एखाद्या मृत व्यक्तीची भवितव्यातील आशा देवावर अवलंबून आहे. तो कोणाची आठवण करील व शेवटी पुनरूत्थान करील याचा केवळ तोच निर्णय घेऊ शकतो. हीच गोष्ट पवित्र शास्त्र स्तोत्रसंहिता १०४:२९, ३० मध्ये स्पष्टपणे कशी दाखवते याची तुम्ही स्वतःच नोंद घ्या.
यहोवा देवाने, ख्रिस्ताच्या शिष्यांची केवळ एक मर्यादित संख्या, म्हणजे १,४४,००० लोक देवाचे आत्मिक पुत्र म्हणून स्वर्गीय जीवनासाठी पुनरूत्थित होतील असे उद्देशिले आहे. (प्रकटीकरण १४:१, ३) पृथ्वीवरील मानवजातीला आशीर्वाद देण्यासाठी यांचे मिळून ख्रिस्तासोबत स्वर्गीय सरकार बनते.
या विषयी पहिल्यांदा शिकणारे येशूचे विश्वासू प्रेषित होते. त्याने त्यास म्हटले: “माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत; नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते; मी तुम्हांसाठी जागा तयार करावयास जातो; आणि मी जाऊन तुम्हांसाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईन; ह्यासाठी की, जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे.” (योहान १४:२, ३) ते प्रेषित आणि इतर सुरवातीचे ख्रिस्ती मरण पावले व त्यांना स्वर्गीय पुनरूत्थान देण्यासाठी येशूच्या आगमनापर्यंत बेशुद्ध अवस्थेत थांबून राहावे लागले. यासाठीच आम्ही वाचतो की पहिला ख्रिस्ती हुतात्मा, स्तेफनस, ‘मरणात झोपी गेला.’—प्रे. कृत्ये ७:६०; १ थेस्सलनीकर ४:१३.
पृथ्वीवरील जीवनासाठी पुनरूत्थान
परंतु, येशूच्या शेजारी मरण पावलेल्या गुन्हेगाराला त्याने दिलेल्या अभिवचनाबद्दल काय? त्या काळच्या अनेक यहुद्यांप्रमाणेच, या माणसाचा देखील असा विश्वास होता की देव मशीहाला पाठवेल, जो एक राज्य प्रस्थापित करील आणि पृथ्वीवर यहुदी राष्ट्राला शांती आणि सुरक्षितता पूर्ववत देईल. (१ राजे ४:२०-२५ लूक १९:११; २४:२१ आणि प्रे. कृत्ये १:६ सोबत पडताळा.) शिवाय, त्या गुन्हेगाराने येशू हाच केवळ देवाने निवडलेला राजा आहे असा विश्वास व्यक्त केला. परंतु, त्या क्षणी, येशूला दोषी ठरवून, त्याच्या अगदी जवळ येऊन ठेपलेल्या मृत्यूने ही गोष्ट असंभवनीय अशी भासवली. याचकारणास्तव, येशूने त्या गुन्हेगाराला त्याचे असे अभिवचन देऊन खात्री दिली की: “मी तुला खचित सांगतो आज, तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील.”—लूक २३:४२, ४३, NW.
जे पवित्र शास्त्र अनुवाद, “आज” ह्या शब्दाच्या आधी स्वल्पविराम चिन्ह घालतात ते, येशूच्या शब्दांना समजून घेणाऱ्यांसमोर समस्या निर्माण करतात. त्याच दिवशी येशू कोणत्याही नंदनवनात गेला नाही. उलट, देवाने त्याला पुनरूत्थित करीपर्यंत तीन दिवसांसाठी तो मरणात बेशुद्ध होता. येशूच्या पुनरूत्थानानंतर आणि स्वर्गात स्वर्गारोहण झाले तरी, त्याला मानवजातीवर राजा म्हणून राज्य करण्याची वेळ येईपर्यंत, त्याच्या पित्याच्या उजव्या हाताच्या बाजूला थांबून राहायचे होते. (इब्रीकर १०:१२, १३) लवकरच, येशूचे राज्यशासन मानवजातीची सुटका करील आणि संपूर्ण पृथ्वीचे नंदनवनात रूपांतर करील. (लूक २१:१०, ११, २५-३१) मग, तो त्या गुन्हेगाराचे पृथ्वीवर पुनरूत्थान करून त्याला दिलेले अभिवचन पूर्ण करील. तसेच येशू मनुष्यासोबत असेल म्हणजेच, तो मानवाच्या सर्व गरजांना पूर्ण करण्यात मदत करील. यामध्ये त्याला देवाच्या नीतीमान नियमांच्या सुसंगतीत आपले जीवनक्रम आणण्याची गरज समाविष्ट आहे.
अनेकांचे पुनरूत्थान
त्या पश्चातापी गुन्हेगाराप्रमाणेच, बहुतेक मानवांचे पुनरूत्थान येथे पृथ्वीवर होईल. हे, मानवांना निर्माण करण्याच्या देवाच्या उद्देशाच्या सुसंगतीत आहे. पहिला पुरूष आणि स्त्री यांना नंदनवनासारख्या बागेमध्ये ठेवले होते व संपूर्ण पृथ्वीला सत्तेखाली आणण्यास सांगितले होते. ते देवाच्या आज्ञेत राहिले असते तर कधीच म्हातारे होऊन मरण पावले नसते. देवाच्या नियुक्त समयी, संपूर्ण पृथ्वी सत्तेखाली आली असती. आदाम आणि त्याच्या परिपूर्ण वंशजांद्वारे विश्वव्यापी नंदनवन बनवले असते.—उत्पत्ती १:२८; २:८, ९.
परंतु, आदाम आणि हव्वेने बुद्धिपुरस्सर पाप केल्यामुळे, त्यांनी स्वतःवर आणि त्यांच्या भावी अपत्यांवर मरण ओढवून घेतले. (उत्पत्ती २:१६, १७; ३:१७-१९) याच कारणास्तव, पवित्र शास्त्र म्हणते: “एका माणसाच्या [आदाम] द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.”—रोमकर ५:१२.
पापाच्या वारशापासून मुक्त असा केवळ एक मानव जन्मला होता. तो देवाचा परिपूर्ण पुत्र येशू ख्रिस्त होता, ज्याचे जीवन स्वर्गातून मेरी नावाची एक यहुदी कुमारिका हिच्या गर्भात स्थलांतरीत केले होते. येशू हा शेवटपर्यंत निष्पाप राहिला व मरणास पात्र नव्हता. यास्तव, त्याच्या मृत्युमध्ये ‘जगाच्या पापासाठी’ खंडणीचे मोल आहे. (योहान १:२९; मत्तय २०:२८) याच कारणास्तव, येशू म्हणू शकला: “पुनरूत्थान व जीवन मीच आहे; जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल.”—योहान ११:२५.
होय, खरंच, तुम्ही तुमच्या प्रियजनांना मिळण्याची आशा मनी बाळगू शकता, परंतु यासाठी तुम्हाला, येशू तुमचा तारणारा आहे असा विश्वास धरावा लागेल व देवाचा नियुक्त राजा म्हणून त्याच्या आज्ञेत राहावे लागेल. लवकरच देवाचे राज्य या पृथ्वीवरची सर्व दुष्टाई पुसून टाकील. जे मानव त्या राज्याच्या अधीन होण्यास नाकारतात अशा सर्वांचा नाश केला जाईल. परंतु, देवाच्या राज्याची प्रजा वाचेल आणि या पृथ्वीचे नंदनवनात रूपांतर करण्याच्या कामात स्वतःला कार्यव्यग्र करील.—स्तोत्र ३७:१०, ११; प्रकटीकरण २१:३-५.
नंतर, पुनरूत्थान सुरु होण्याचा तो रोमांचकारी समय येईल. मृतांचे स्वागत करण्यासाठी तुम्ही तेथे हजर असाल का? हे सर्व, तुम्ही आता जे काही करता त्यावर अवलंबून आहे. आज जे यहोवाच्या राज्याचा राजा, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शासनाच्या अधीन होतात त्यांच्यासाठी अनेक आश्चर्यकारक आशीर्वाद वाट पाहून आहेत.