धडा २८
यहोवाने आणि येशूने तुमच्यासाठी जे केलंय त्याबद्दल कदर दाखवा
तुमचा एखादा मित्र तुम्हाला एक सुंदरशी भेटवस्तू देतो, तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? नक्कीच तुम्हाला खूप आनंद होतो. आणि ती भेटवस्तू तुम्हाला मनापासून आवडली हे तुम्ही आपल्या मित्राला दाखवायचा प्रयत्न करता. खंडणीची व्यवस्था करून यहोवाने आणि येशूने आपल्यासाठी जे केलंय, ते कोणत्याही भेटवस्तूपेक्षा खूप जास्त मौल्यवान आहे. आपण त्यासाठी त्यांचे आभारी आहोत हे कसं दाखवू शकतो?
१. देवाने आणि ख्रिस्ताने आपल्यासाठी जे केलंय, त्याबद्दल कदर दाखवायचा एक मार्ग कोणता आहे?
बायबल सांगतं, “जो कोणी [येशूवर] विश्वास ठेवतो” तो कायम जगू शकेल. (योहान ३:१६) पण विश्वास ठेवणं याचा काय अर्थ होतो? येशू आपल्यासाठी मरण पावला हे मानणं, एवढाच त्याचा अर्थ होतो का? नाही. तर आपण जीवनात जे काही निर्णय घेतो आणि जे काही करतो त्यावरून हा विश्वास दाखवून देणं गरजेचं आहे. (याकोब २:१७) आपल्या वागण्या-बोलण्यातून जेव्हा आपण हा विश्वास दाखवतो, तेव्हा येशू आणि त्याचा पिता यहोवा यांच्यासोबत आपली मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत जाते.—योहान १४:२१ वाचा.
२. आणखी कोणत्या खास मार्गाने आपण यहोवाच्या आणि येशूच्या प्रेमाबद्दल कदर दाखवू शकतो?
येशूचा मृत्यू झाला त्याच्या आदल्या संध्याकाळी, त्याने शिष्यांना त्याच्या बलिदानाबद्दल कदर दाखवायचा आणखी एक मार्ग सांगितला. त्या वेळी त्याने एका खास विधीची सुरुवात केली. बायबलमध्ये या विधीला “प्रभूचं सांजभोजन” असं म्हटलंय. आपण त्याला ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी असंही म्हणतो. (१ करिंथकर ११:२०) प्रेषितांनी आणि पुढे सगळ्याच खऱ्या ख्रिश्चनांनी आपल्या बलिदानाची आठवण ठेवावी, म्हणून येशूने या विधीची सुरुवात केली होती. त्याने अशी आज्ञा दिली: “माझी आठवण म्हणून हे करत राहा.” (लूक २२:१९) स्मारकविधीला उपस्थित राहून तुम्ही दाखवता, की यहोवाने आणि येशूने तुमच्यासाठी जे प्रेम दाखवलंय, त्याची तुम्ही मनापासून कदर करता.
आणखी जाणून घेऊ या
यहोवाने आणि येशूने दाखवलेल्या अपार प्रेमाबद्दल आपण आणखी कोणत्या मार्गांनी कदर दाखवू शकतो हे जाणून घेऊ या. तसंच, ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी किती महत्त्वाचा आहे, हेही पाहू या.
३. मनापासून असलेली कदर कामांतून दिसून येईल
कल्पना करा की तुम्ही नदीत बुडत आहात आणि कोणीतरी तुम्हाला वाचवतं. मग तुम्ही त्याचे उपकार विसरून जाल का? की त्याने तुमच्यासाठी जे केलंय, त्याबद्दल तुम्ही त्याचे किती आभारी आहात, हे दाखवायचा प्रयत्न कराल?
यहोवाच्या दयेमुळेच आपल्याला कायमचं जीवन जगण्याची संधी मिळाली आहे. १ योहान ४:८-१० वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
येशूने आपल्यासाठी दिलेलं बलिदान इतकं खास का आहे?
यहोवाने आणि येशूने तुमच्यासाठी जे केलंय, त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं?
यहोवाने आणि येशूने आपल्यासाठी जे केलंय त्याबद्दल आपण आपली कदर कशी दाखवू शकतो, हे जाणून घेण्यासाठी २ करिंथकर ५:१५ आणि १ योहान ४:११; ५:३ वाचा. प्रत्येक वचन वाचल्यावर या प्रश्नावर चर्चा करा:
या वचनाप्रमाणे, आपण आपली कदर कशी दाखवू शकतो?
४. येशूसारखं वागायचा प्रयत्न करा
आपली कदर दाखवायचा आणखी एक मार्ग म्हणजे, येशूसारखं वागायचा प्रयत्न करणं. १ पेत्र २:२१ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
कोणकोणत्या बाबतींत तुम्ही येशूच्या पावलांचं जवळून अनुकरण करू शकता?
येशूला देवाचं वचन वाचायला खूप आवडायचं; तो आनंदाच्या संदेशाचा प्रचार करायचा आणि इतरांना मदत करायचा
५. ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारकविधीला हजर राहा
प्रभूच्या सांजभोजनाचा विधी पहिल्यांदा कसा पाळला गेला, हे जाणून घेण्यासाठी लूक २२:१४, १९, २० वाचा. मग या प्रश्नांवर चर्चा करा:
प्रभूच्या सांजभोजनाचा विधी कसा पाळला गेला?
भाकर आणि द्राक्षारस कशाला सूचित करतात?—१९ आणि २० ही वचनं पाहा.
येशूची अशी इच्छा होती की त्याच्या शिष्यांनी सांजभोजनाचा विधी वर्षातून एकदाच, म्हणजे त्याच्या मृत्यूच्या दिवशी पाळावा. म्हणूनच यहोवाचे साक्षीदारसुद्धा वर्षातून एकदा ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी साजरा करण्यासाठी एकत्र येतात. ते येशूने सांगितल्याप्रमाणे हा विधी पाळतात. या महत्त्वाच्या सभेबद्दल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा. मग खाली दिलेल्या प्रश्नावर चर्चा करा.
स्मारकविधीची सभा कशी असते?
भाकर आणि द्राक्षारस ही चिन्हं आहेत. भाकर येशूने आपल्यासाठी अर्पण केलेल्या त्याच्या परिपूर्ण मानवी शरीराला सूचित करते. तर द्राक्षारस त्याच्या रक्ताला सूचित करतो
काही जण म्हणतात: “फक्त येशूवर विश्वास ठेवा, म्हणजे तुमचं तारण होईल.”
येशूवर विश्वास ठेवण्यासोबतच आणखीही काही करण्याची गरज आहे, हे तुम्ही योहान ३:१६ आणि याकोब २:१७ या वचनांतून कसं सांगाल?
थोडक्यात
येशूने आपल्यासाठी जे केलंय, त्याबद्दल कदर दाखवण्यासाठी आपण त्याच्यावर असलेला आपला विश्वास आपल्या वागण्या-बोलण्यातून दाखवला पाहिजे आणि त्याच्या मृत्यूच्या स्मारकविधीला हजर राहिलं पाहिजे.
उजळणी
येशूवर विश्वास ठेवणं म्हणजे नेमकं काय?
यहोवाने आणि येशूने तुमच्यासाठी जे केलंय त्याबद्दल तुम्ही कदर कशी दाखवाल?
ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारकविधीला हजर राहणं इतकं महत्त्वाचं का आहे?
हेसुद्धा पाहा
येशूचं बलिदान आपल्याला काय करायची प्रेरणा देतं?
विश्वास म्हणजे काय आणि आपण तो कसा दाखवू शकतो?
“देवाच्या अभिवचनांवर विश्वास ठेवा” (टेहळणी बुरूज, ऑक्टोबर २०१६)
ख्रिस्ताने आपल्यासाठी जे केलंय त्याची जाणीव झाल्यावर एका स्त्रीचं जीवन कसं सुधारलं ते “आता मला स्वतःची किळस वाटत नाही, आणि मी खूप आनंदी आहे,” असं शीर्षक असलेल्या अनुभवात वाचा.
स्मारकविधीच्या चिन्हांचं सेवन मोजकेच लोक का करतात हे जाणून घ्या.
“यहोवाचे साक्षीदार प्रभुभोजनाचा विधी चर्चपेक्षा वेगळ्या पद्धतीने का पाळतात?” (वेबसाईटवरचा लेख)