धडा १७
एक व्यक्ती म्हणून येशू कसा आहे?
येशू पृथ्वीवर असताना लोकांशी जसं वागला-बोलला, ते जाणून घेतल्यामुळे आपल्याला त्याचे बरेच सुंदर गुण कळतील. आणि यामुळे आपण त्याच्या आणि त्याच्या पित्याच्या, म्हणजे यहोवाच्या आणखी जवळ येऊ. येशूचे काही सुंदर गुण कोणते आहेत? आणि आपण आपल्या जीवनात त्याच्यासारखं कसं वागू शकतो?
१. येशू कोणकोणत्या बाबतींत त्याच्या पित्यासारखाच आहे?
अरबो-खरबो वर्षांपासून, येशू स्वर्गात आपल्या पित्याला पाहत आला आहे आणि तो त्याच्याकडून बरंच काही शिकलाय. त्यामुळे येशूची विचार करण्याची आणि वागण्याची पद्धत अगदी त्याच्या पित्यासारखी आहे. (योहान ५:१९ वाचा.) खरंतर येशूचे गुण इतके हुबेहूब त्याच्या पित्यासारखे आहेत, की तो म्हणाला, “ज्याने मला पाहिलंय, त्याने पित्यालाही पाहिलंय.” (योहान १४:९) तुम्ही येशूच्या गुणांबद्दल जितकं जास्त जाणून घ्याल तितकीच तुम्हाला यहोवाचीही चांगली ओळख होईल. जसं की, येशू लोकांशी किती दयाळूपणे वागला हे जाणून घेतल्यावर तुम्हाला कळेल की यहोवालाही तुमची खूप काळजी आहे.
२. यहोवावर आपलं खूप प्रेम आहे हे येशूने कसं दाखवलं?
येशू म्हणाला: “माझं पित्यावर प्रेम आहे, हे जगाला कळावं म्हणून पित्याने मला जशी आज्ञा दिली आहे, तसंच मी करतोय.” (योहान १४:३१) पृथ्वीवर असताना येशू नेहमी, अगदी कठीण परिस्थितीतसुद्धा आपल्या पित्याच्या आज्ञेप्रमाणे वागला. यावरून त्याने दाखवून दिलं की त्याचं पित्यावर खूप प्रेम आहे. यहोवावर प्रेम असल्यामुळेच, येशूला लोकांशी त्याच्याबद्दल बोलायला खूप आवडायचं. त्याची इच्छा होती की त्यांनीही यहोवासोबत एक जवळचं नातं जोडावं.—योहान १४:२३.
३. लोकांवर आपलं प्रेम आहे हे येशूने कसं दाखवलं?
बायबल सांगतं की येशूला “मानवांबद्दल . . . खूप जिव्हाळा” आहे. (नीतिवचनं ८:३१) यामुळेच त्याने पृथ्वीवर असताना लोकांना दिलासा दिला आणि त्यांना मदत करण्यासाठी बरेच त्याग केले. त्याने केलेल्या चमत्कारांवरून त्याची ताकदच नाही, तर त्याला लोकांबद्दल किती कळकळ आहे हेही दिसून आलं. (मार्क १:४०-४२) त्याने कधीच भेदभाव केला नाही. उलट तो सर्वांशी मायेने वागला. नम्र मनाच्या लोकांना त्याच्या शब्दांमुळे सांत्वन आणि आशा मिळाली. येशू मानवांसाठी दुःख सोसायला, इतकंच काय तर जीव द्यायलाही तयार होता. कारण त्याचं सर्व मानवांवर खूप प्रेम आहे. पण जे त्याच्या शिकवणींप्रमाणे वागतात त्यांच्यावर तो जास्त प्रेम करतो.—योहान १५:१३, १४ वाचा.
आणखी जाणून घेऊ या
येशूच्या गुणांबद्दल आणखी शिकून घेऊ या. आणि आपणही त्याच्यासारखंच प्रेम आणि उदारता कशी दाखवू शकतो हेही पाहू या.
४. येशूचं त्याच्या पित्यावर प्रेम आहे
देवावर असलेलं आपलं प्रेम आपण कसं दाखवू शकतो हे आपल्याला येशूच्या उदाहरणातून शिकायला मिळतं. लूक ६:१२ आणि योहान १५:१०; १७:२६ वाचा. प्रत्येक वचन वाचल्यावर या प्रश्नावर चर्चा करा:
येशूसारखंच आपणही यहोवावर असलेलं आपलं प्रेम कसं दाखवू शकतो?
येशूचं त्याच्या स्वर्गातल्या पित्यावर खूप प्रेम होतं आणि तो नेहमी प्रार्थनेत त्याच्याशी बोलायचा
५. दुःखात आणि त्रासात असलेल्या लोकांची येशूला काळजी आहे
येशू स्वतःच्या गरजा बाजूला सारून लोकांना मदत करायचा. थकलेला असतानाही, लोकांना मदत करण्यासाठी येशूने स्वतःचा वेळ आणि शक्ती खर्च केली. मार्क ६:३०-४४ वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
येशूला दुसऱ्यांबद्दल काळजी होती हे तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींतून दिसून आलं?—३१, ३४, ४१ आणि ४२ ही वचनं पाहा.
येशूने कोणत्या भावनेने लोकांना मदत केली?—३४ वचन पाहा.
येशूचे गुण हुबेहूब त्याच्या पित्यासारखे आहेत. तर मग येशू ज्या प्रकारे लोकांशी वागला त्यावरून आपल्याला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?
येशूसारखीच आपणही इतरांबद्दल काळजी कशी दाखवू शकतो?
६. येशू उदार आहे
पृथ्वीवर असताना येशूकडे फार काही नव्हतं, पण तरी तो उदार होता. आणि त्याने आपल्यालाही प्रोत्साहन दिलं की आपण उदार असावं. प्रेषितांची कार्यं २०:३५ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
येशूने सांगितल्याप्रमाणे, आपण आनंदी कसे होऊ शकतो?
व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्नावर चर्चा करा.
आपण श्रीमंत नसलो तरी उदारपणे कसं वागू शकतो?
तुम्हाला माहीत होतं का?
बायबल सांगतं की आपण येशूच्या नावाने यहोवाला प्रार्थना केली पाहिजे. (योहान १६:२३, २४ वाचा.) अशी प्रार्थना करून आपण दाखवतो, की यहोवाचे मित्र बनण्यासाठी येशूने आपल्याला जी मदत केली आहे, त्याची आपल्याला कदर आहे.
काही जण म्हणतात: “देवाला काही आपली काळजी नाही.”
येशूचे गुण अगदी त्याच्या पित्यासारखेच आहेत. तर मग येशू ज्या प्रकारे वागला, त्यावरून देवाला आपली काळजी आहे हे कसं दिसतं?
थोडक्यात
येशूचं यहोवावर आणि मानवांवरही प्रेम आहे. त्याचा स्वभाव हुबेहूब त्याच्या पित्यासारखाच आहे. त्यामुळे तुम्ही जितकं जास्त त्याच्याबद्दल जाणून घ्याल, तितकीच तुम्हाला यहोवाची ओळख होईल.
उजळणी
येशूसारखंच आपण यहोवावर असलेलं प्रेम कसं दाखवू शकतो?
येशूसारखंच आपण लोकांवर असलेलं प्रेम कसं दाखवू शकतो?
येशूचा कोणता गुण तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो?
हेसुद्धा पाहा
आपण येशूच्या कोणत्या गुणांचं अनुकरण करू शकतो ते जाणून घ्या.
“येशूसारखं होण्याचा प्रयत्न करा” (येशू—मार्ग, सत्य आणि जीवन)
येशूच्या नावाने प्रार्थना का केली पाहिजे हे वाचा.
येशू कसा दिसायचा याबद्दल बायबल काही सांगतं का?
येशू स्त्रियांशी जसं वागला त्यावरून आपण काय शिकतो?