“विपुल फळ” देत राहा
१ लाक्षणिक भाषेचा वापर करून येशूने स्वतःची तुलना खऱ्या द्राक्षवेलीशी केली. आपल्या पित्याला त्याने माळी तर आत्म्याने अभिषिक्त असलेल्या आपल्या अनुयायांना त्याने वेलीचे फळ देणारे फाटे म्हटले. लाक्षणिक माळी कशाप्रकारे कार्य करतो याचे वर्णन करताना, फाट्यांनी वेलीतच राहणे किती महत्त्वाचे आहे यावर येशूने भर दिला. (योहा. १५:१-४) याचा अर्थ, ज्या कोणाचा यहोवासोबत जवळचा वैयक्तिक नातेसंबंध आहे त्याने येशू ख्रिस्त या ‘खऱ्या द्राक्षवेलाच्या’ फळ देणाऱ्या फाट्यासारखे असले पाहिजे. “आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ” तसेच राज्याचे फळ आपण विपुल प्रमाणात देत राहिले पाहिजे.—गलती. ५:२२, २३; मत्त. २४:१४; २८:१९, २०.
२ आत्म्याचे फळ: आपल्या वागण्याबोलण्यातून आत्म्याचे फळ कितपत दिसून येते त्यावरून आपल्या आध्यात्मिक प्रगतीचा अंदाज लावला जाऊ शकतो. देवाच्या वचनाचा नियमित स्वरूपाने अभ्यास व मनन करण्याद्वारे तुम्ही देवाच्या आत्म्याचे फळ आपल्या व्यक्तिमत्त्वात आणण्याचा प्रयत्न करता का? (फिलिप्पै. १:९-११) यहोवाजवळ प्रार्थनेत पवित्र आत्मा मागण्यास संकोच बाळगू नका कारण ज्यांमुळे यहोवाचे गौरव होईल आणि ज्यांमुळे तुमची सातत्याने आध्यात्मिक वाढ होत राहील अशाप्रकारचे गुण आत्मसात करण्यास पवित्र आत्मा तुम्हाला साहाय्य करेल.—लूक ११:१३; योहा. १३:३५.
३ आत्म्याच्या फळात समाविष्ट असलेले गुण संपादन केल्यामुळे आपल्याला सेवाकार्यात अधिक आवेशी होण्यासही मदत मिळेल. उदाहरणार्थ, प्रीती व विश्वास हे गुण आपल्याला सेवाकार्यात नियमित सहभाग घेण्याकरता इतर अनेक कामांतून वेळ काढण्याची प्रेरणा देतील. लोक आपला विरोध करतात तेव्हा शांती, सहनशीलता, ममता, सौम्यता व इंद्रियदमन यांसारखे गुण या विरोधाला योग्य रितीने प्रतिक्रिया दाखवण्यास आपले साहाय्य करतील. आनंदाचा गुण सेवाकार्यात आपल्याला लोक थंड प्रतिसाद देतात तेव्हा देखील समाधान मानण्यास मदत करेल.
४ राज्याचे फळ: आपल्याला राज्याचे फळही उत्पन्न करण्याची इच्छा आहे. यात ‘[यहोवाचे] नाव पत्करणाऱ्या ओठाचे फळ असा स्तुतीचा यज्ञ अर्पण’ करण्याचा समावेश आहे. (इब्री १३:१५) सुवार्तेची आवेशाने व धीराने घोषणा करण्याद्वारे आपण असे करतो. आपल्या वैयक्तिक सेवाकार्यात प्रगती करण्याद्वारे तुम्ही राज्याचे फळ अधिक प्रमाणात उत्पन्न करण्याचा प्रयत्न करत आहात का?
५ आपले विश्वासू अनुयायी वेगवेगळ्या प्रमाणात फळ उत्पन्न करतील असे येशूने सुचवले होते. (मत्त. १३:२३) त्यामुळे आपण स्वतःची तुलना इतरांशी न करता आपल्या परीने जे सर्वात उत्तम ते यहोवाला दिले पाहिजे. (गलती. ६:४) देवाच्या वचनाच्या मदतीने स्वतःच्या परिस्थितीचे प्रामाणिकपणे परीक्षण केल्याने आपल्याला सातत्याने यहोवाचे गौरव करणे व “विपुल फळ” उत्पन्न करणे शक्य होईल.—योहा. १५:८.