आज यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो?
“मेघातून अशी वाणी झाली की, हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याविषयी मी संतुष्ट आहे; ह्याचे तुम्ही ऐका.”—मत्तय १७:५.
१. नियमशास्त्राचा उद्देश केव्हा पूर्ण झाला?
यहोवाने इस्राएल राष्ट्राला विविध पैलू असलेले नियमशास्त्र दिले होते. त्यांविषयी प्रेषित पौलाने लिहिले: “[ते] केवळ दैहिक विधि आहेत. ते सुधारणुकीच्या काळापर्यंत लावून दिले आहेत.” (इब्री लोकांस ९:१०) पण, जेव्हा इस्राएलच्या शेष लोकांनी नियमशास्त्रातून मिळालेल्या ज्ञानाच्या आधारावर येशूला मशीहा किंवा ख्रिस्त म्हणून स्वीकारले तेव्हा या नियमशास्त्राचा उद्देश पूर्ण झाला होता. त्यामुळेच पौलाने असे म्हटले: “ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ति . . . आहे.”—रोमकर १०:४; गलतीकर ३:१९-२५; ४:४, ५.
२. नियमशास्त्राच्या अधीन कोण होते आणि त्यापासून त्यांची केव्हा सुटका झाली?
२ मग ते नियमशास्त्र आज आपल्याकरता बंधनकारक नाही असा याचा अर्थ होतो का? खरे तर, मानवजातीपैकी अधिकांश लोक पूर्वीही नियमशास्त्राच्या अधीन नव्हतेच, कारण स्तोत्रकर्त्याने म्हटल्याप्रमाणे: “[देव] याकोबाला आपले वचन, इस्राएलाला आपले नियम व निर्णय विदित करितो. कोणत्याहि राष्ट्राबरोबर त्याने असे वर्तन केले नाही; त्याचे निर्णय ती जाणत नाहीत.” (स्तोत्र १४७:१९, २०) आणि मग, जेव्हा येशूच्या अर्पणाच्या आधारावर देवाने नवा करार स्थापित केला तेव्हा इस्राएल राष्ट्रावरही नियमशास्त्राचे बंधन राहिले नाही. (गलतीकर ३:१३; इफिसकर २:१५; कलस्सैकर २:१३, १४, १६) पण, जर हे नियमशास्त्र आपल्यावर बंधनकारक नाही, तर मग यहोवा त्याची सेवा करू इच्छिणाऱ्यांकडून आज काय अपेक्षा करतो?
यहोवा काय अपेक्षा करतो?
३, ४. (अ) यहोवा आज आपल्याकडून काय अपेक्षा करतो? (ब) आपण येशूच्या पावलांवर पाऊल ठेवून का चालावे?
३ येशूच्या सेवाकार्याच्या शेवटल्या वर्षादरम्यान पेत्र, याकोब आणि योहान हे त्याचे प्रेषित हर्मोन पर्वतावर त्याच्यासोबत गेले. त्या ठिकाणी त्यांना येशूच्या वैभवी गौरवाचा भविष्यसूचक दृष्टान्त पाहायला मिळाला आणि त्यांनी स्वतः देवाची वाणी ऐकली: “हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याविषयी मी संतुष्ट आहे; ह्याचे तुम्ही ऐका.” (मत्तय १७:१-५) तर मग, थोडक्यात यहोवा आपल्याकडून आज हीच अपेक्षा करतो, की आपण त्याच्या पुत्राचे ऐकावे तसेच त्याच्या उदाहरणाचे आणि शिकवणुकींचे अनुकरण करावे. (मत्तय १६:२४) म्हणूनच प्रेषित पेत्राने असे लिहिले: ‘ख्रिस्ताने तुम्हासाठी दुःख भोगले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हाकरिता कित्ता घालून दिला आहे.’—१ पेत्र २:२१.
४ आपण येशूच्या पावलांवर पाऊल ठेवून का चालावे? कारण त्याचे अनुकरण करण्याद्वारे आपण देवाचे अनुकरण करत असतो. येशू त्याच्या पित्याला खूप चांगल्याप्रकारे ओळखत होता कारण पृथ्वीवर येण्याआधी त्याला स्वर्गात कोट्यवधी वर्षे देवाचा सहवास लाभला होता. (नीतिसूत्रे ८:२२-३१; योहान ८:२३; १७:५; कलस्सैकर १:१५-१७) पृथ्वीवर असताना येशूने त्याच्या पित्याचे हुबेहूब चित्र लोकांपुढे मांडले. त्याने स्वतः म्हटले: “पित्याने शिकविल्याप्रमाणे मी ह्या गोष्टी बोलतो.” किंबहुना, त्याने यहोवाचे इतके तंतोतंत अनुकरण केले, की तो असे म्हणू शकला: “ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे.”—योहान ८:२८; १४:९.
५. ख्रिस्तीजन कोणत्या नियमाच्या अधीन आहेत आणि हा नियम केव्हा कार्यरत झाला?
५ येशूचे ऐकणे आणि त्याचे अनुकरण करणे म्हणजे नेमके काय? त्यासाठी आपल्याला एखाद्या नियमशास्त्राच्या अधीन राहावे लागेल का? पौलाने लिहिले: ‘मी नियमशास्त्राधीन नाही.’ या ठिकाणी तो इस्राएलासोबत केलेल्या नियमशास्त्राच्या कराराविषयी अर्थात ‘जुन्या कराराविषयी’ बोलत होता. पण आपण “ख्रिस्ताच्या नियमाच्या अधीन” आहोत हे मात्र पौलाने मान्य केले. (१ करिंथकर ९:२०, २१; २ करिंथकर ३:१४) नियमशास्त्रावर आधारित असलेला जुना करार संपुष्टात आल्यानंतर ‘ख्रिस्ताच्या नियमावर’ आधारित असलेला “नवा करार” स्थापन झाला; आणि हा ख्रिस्ताचा नियम आज यहोवाच्या सर्व सेवकांसाठी बंधनकारक आहे.—लूक २२:२०; गलतीकर ६:२; इब्री लोकांस ८:७-१३.
६. ‘ख्रिस्ताच्या नियमाचे’ कशाप्रकारे वर्णन करता येईल आणि आपण त्याचे पालन कसे करतो?
६ जुन्या कराराधीन ज्याप्रकारे नियमशास्त्रातील वेगवेगळ्या नियमांचे विषयांनुसार वर्गीकरण करून ते एका ग्रंथात नमूद करण्यात आले होते, त्याप्रकारे ‘ख्रिस्ताचा नियम’ यहोवाने ग्रंथात लिहून घेतला नाही. ख्रिस्ताच्या अनुयायांकरता असलेला हा नवीन नियम म्हणजे काय करावे आणि काय करू नये याची खूप मोठी यादी नव्हे. पण यहोवाने आपल्या वचनामध्ये आपल्या पुत्राच्या जीवनाविषयी आणि त्याच्या शिकवणींविषयी चार सविस्तर अहवाल नमूद करून ठेवले आहेत. शिवाय, येशूच्या सुरवातीच्या अनुयायांपैकी काहींना प्रेरित करून देवाने त्यांच्याकडून आचरण, मंडळीचा कारभार, कौटुंबिक सदस्यांचे आपसातील व्यवहार आणि इतर विषयांवर बोधपर सूचना लिहून घेतल्या. (१ करिंथकर ६:१८; १४:२६-३५; इफिसकर ५:२१-३३; इब्री लोकांस १०:२४, २५) त्याअर्थी, जेव्हा आपण जेव्हा येशू ख्रिस्ताच्या उदाहरणानुसार आणि शिकवणींनुसार जीवन जगतो आणि पहिल्या शतकातील बायबल लेखकांचा प्रेरित सल्ला ऐकतो तेव्हा आपण ‘ख्रिस्ताच्या नियमाचे’ पालन करत असतो. यहोवा आपल्या सेवकांकडून आज हीच अपेक्षा करतो.
प्रेमाचे महत्त्व
७. आपल्या प्रेषितांसोबत शेवटचा वल्हांडण सण साजरा करताना येशूने आपल्या नियमाचे एकंदर तात्पर्य कशाप्रकारे अधोरेखित केले?
७ नियमशास्त्रामध्ये प्रेमाला महत्त्व नव्हते, असे नाही. पण ख्रिस्ताच्या नियमाचे तर सारच प्रेम आहे, प्रेमावरच तो संपूर्णतः आधारलेला आहे. सा.यु. ३३ मध्ये आपल्या शिष्यांसोबत वल्हांडणाचा सण साजरा करताना येशूने याच गोष्टीवर जोर दिला. प्रेषित योहानाच्या वृत्तान्तानुसार, त्या रात्री आपल्या शिष्यांशी अतिशय कळकळीने बोलताना येशूने प्रेम या शब्दाचा २८ वेळा उल्लेख केला. यावरून त्याच्या प्रेषितांना त्याच्या नियमाचा सारांश किंवा एकंदर तात्पर्य काय हे अगदीच स्पष्टपणे कळून आले. म्हणूनच की काय, या महत्त्वाच्या संध्याकाळी घडलेल्या घटनांचा वृत्तान्त योहानाने असे म्हणून सुरू केला: “वल्हांडण सणापूर्वी असे झाले की, येशूने आता ह्या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून ह्या जगातील स्वकीयांवर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले.”—योहान १३:१.
८. (अ) प्रेषितांमध्ये एकसारखा वाद होत होता हे कशावरून दिसते? (ब) येशूने त्याच्या प्रेषितांना नम्रतेचा धडा कसा शिकवला?
८ अधिकार आणि मोठे स्थान मिळवण्याच्या बाबतीत येशूच्या शिष्यांची अतिशय स्वार्थी मनोवृत्ती होती, तरीसुद्धा येशूचे त्यांच्यावर नितान्त प्रेम होते. अर्थात त्याने त्यांना या प्रवृत्तीवर मात करण्यासाठी बऱ्याचदा मदतही केली होती, पण त्याचे प्रयत्न व्यर्थ ठरले होते. येरुशलेमला येण्याच्या काही महिन्याआधी त्यांनी ‘सगळ्यांहून मोठा कोण याविषयी एकमेकांशी वादविवाद केला होता.’ वल्हांडणाच्या सणाकरता या शहरात येण्यापूर्वी देखील त्यांच्यामध्ये मोठेपणाविषयी पुन्हा एकदा वाद झाला. (मार्क ९:३३-३७, पं.र.भा.; १०:३५-४५) त्यानंतर अखेरच्या वल्हांडणासाठी एकत्र आले असतानाही येरुशलेमच्या माडीवरील खोलीत जे घडले, त्यावरून दिसून आले की त्यांच्यामध्ये हाच वाद अजूनही चाललाच होता. त्या प्रसंगी, सर्वसामान्य रिवाजानुसार इतरांचे पाय धुऊन आदरातिथ्य दाखवण्यासाठी त्यांच्यापैकी कोणीही पुढे आला नाही. त्यांना नम्रतेचा धडा शिकवण्यासाठी, येशूने स्वतः त्यांचे पाय धुतले.—योहान १३:२-१५; १ तीमथ्य ५:९, १०.
९. शेवटल्या वल्हांडणानंतर शिष्यांत पुन्हा वाद झाला तेव्हा येशूने काय केले?
९ इतका मोठा धडा देऊनही, वल्हांडणाचा सण पार पडला आणि येशूने त्याच्या होणाऱ्या मृत्यूच्या स्मारकाची स्थापना केली त्यानंतर पुन्हा काय झाले त्याकडे लक्ष द्या. लूकचा अहवाल असे म्हणतो: “आपणांमध्ये कोण मोठा मानला जात आहे, ह्याविषयीहि त्यांच्यामध्ये वाद झाला.” येशूने आपल्या शिष्यांवर रागावण्याऐवजी किंवा त्यांना ताकीद देण्याऐवजी त्यांना प्रेमळपणे असा सल्ला दिला, की मोठ्या स्थानासाठी हपापलेल्या जगाच्या अधिकाऱ्यांसारखे त्यांनी नसावे. (लूक २२:२४-२७) त्यानंतर त्याने त्यांना जी आज्ञा दिली तीच खरे तर ख्रिस्ताच्या नियमाची मूलभूत आज्ञा आहे. तो म्हणाला, “मी तुम्हास नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीति करावी; जशी मी तुम्हावर प्रीति केली तशी तुम्हीहि एकमेकांवर प्रीति करावी.”—योहान १३:३४.
१०. येशूने त्याच्या शिष्यांना कोणती आज्ञा दिली आणि त्यामध्ये कशाचा समावेश होतो?
१० त्याच संध्याकाळी नंतर येशूने ख्रिस्ती प्रेमाची हद्द दाखवून दिली. त्याने म्हटले: “जशी मी तुम्हावर प्रीति केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीति करावी अशी माझी आज्ञा आहे. आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा कोणाची प्रीति मोठी नाही.” (योहान १५:१२, १३) वेळ आली तर आपल्या अनुयायांनी एकमेकांसाठी आपला जीव देखील द्यावा असे येशू म्हणत होता का? होय, त्याप्रसंगी उपस्थित असणाऱ्या योहानाने याचा असाच अर्थ लावला कारण नंतर त्याने असे लिहिले: “ख्रिस्ताने आपल्याकरिता स्वतःचा प्राण अर्पिला ह्यावरून आपल्याला प्रीतीची जाणीव झाली आहे; तेव्हा आपणहि आपल्या बंधूंकरिता स्वतःचा प्राण अर्पिला पाहिजे.”—१ योहान ३:१६.
११. (अ) आपण ख्रिस्ताचा नियम कशाप्रकारे पूर्ण करू शकतो? (ब) येशूने कोणते उदाहरण मांडले?
११ त्याअर्थी, इतरांना येशूविषयी केवळ शिकवणे म्हणजे ख्रिस्ताच्या नियमाप्रमाणे चालणे नाही. आपण आपल्या जीवनात येशूचा आदर्श अनुसरला पाहिजे, त्याच्यासारखे वागले पाहिजे. हे खरे आहे, की येशू लोकांना शिकवताना अतिशय सुरेख व्याख्याने द्यायचा. पण त्याने केवळ भाषणबाजी केली नाही, तर स्वतःच्या उदाहरणाद्वारे लोकांना धडा दिला. पृथ्वीवर येण्याआधी तो स्वर्गामध्ये एक शक्तिशाली आत्मिक प्राणी म्हणून अस्तित्वात होता, पण पृथ्वीवर येऊन देवाची सेवा करण्याची व मनुष्यांकरता एक आदर्श घालून देण्याची त्याला संधी मिळाली तेव्हा तो स्वेच्छेने पुढे आला. तो नम्र, प्रेमळ आणि विचारी होता तसेच भाराक्रांत आणि गांजलेल्या लोकांच्या मदतीकरता नेहमी तयार असायचा. (मत्तय ११:२८-३०; २०:२८; फिलिप्पैकर २:५-८; १ योहान ३:८) म्हणूनच येशूने आपल्या शिष्यांना असे निग्रहाने सांगितले, की जशी मी तुमच्यावर प्रीती केली आहे तशी तुम्हीही एकमेकांवर करा.
१२. ख्रिस्ताच्या नियमात यहोवावर प्रेम करण्याच्या आज्ञेला दुय्यम स्थान आले नाही असे का म्हणता येईल?
१२ नियमशास्त्रात जी सर्वात मोठी आज्ञा होती—यहोवावरील प्रेम करण्याची आज्ञा—तिला ख्रिस्ताच्या नियमात कोणते स्थान आहे? (मत्तय २२:३७, ३८; गलतीकर ६:२) दुय्यम स्थान? निश्चितच नाही! यहोवावर प्रेम करणे आणि आपल्या ख्रिस्ती बांधवांवर प्रेम करणे या खरे तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जो आपल्या भावावर प्रेम करत नाही तो खऱ्या अर्थाने यहोवावर प्रेम करूच शकत नाही. कारण प्रेषित योहानाने असे लिहिले: “मी देवावर प्रीति करितो, असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे; कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीति करीत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीति करिता येणे शक्य नाही.”—१ योहान ४:२०; पडताळा १ योहान ३:१७, १८.
१३. येशूच्या शिष्यांनी त्याच्या नव्या आज्ञेचे पालन केल्यामुळे काय परिणाम झाला?
१३ मी जसे तुमच्यावर प्रेम केले तसे तुम्ही देखील एकमेकांवर करा अशी नवी आज्ञा आपल्या शिष्यांना देताना येशूने त्यांना सांगितले की याचा काय परिणाम होईल. तो म्हणाला, “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहान १३:३५) येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर शंभरएक वर्षांनी टर्टुलियन नावाच्या इतिहासकाराने सांगितल्याप्रमाणे सुरवातीच्या ख्रिश्चनांच्या आपसांतील प्रेमामुळे अगदी हाच परिणाम घडून आला. गैरख्रिस्ती लोक ख्रिस्ताच्या अनुयायांना पाहून म्हणत, ‘पाहा त्यांचे एकमेकांवर किती प्रेम आहे, एकमेकांसाठी ते आपल्या जीवावरही उदार होतात,’ असे टर्टुलियनने आपल्या लिखाणांत म्हटले आहे. आपण स्वतःला असे विचारू शकतो, ‘मी येशूचा शिष्य आहे हे सहख्रिश्चनांवरील माझ्या प्रेमामुळे दिसून येते का?’
आपल्या प्रेमाची प्रचिती
१४, १५. ख्रिस्ताचा नियम पाळणे कधीकधी कठीण का वाटू शकते, पण त्याप्रमाणे चालण्याकरता आपल्याला कशाने मदत होईल?
१४ ख्रिस्तासमान प्रेम प्रदर्शित करणे यहोवाच्या सेवकांसाठी अनिवार्य आहे. पण काही ख्रिस्ती बांधवांच्या वागण्याबोलण्यातून त्यांचा स्वार्थीपणा दिसून येतो तेव्हा अशा बांधवांवर प्रेम करणे तुम्हाला कठीण वाटते का? बांधवांमध्येही अशाप्रकारची प्रवृत्ती दिसून येण्याची शक्यता आहे, कारण आपण याआधी पाहिल्याप्रमाणे येशूचे प्रेषितही आपला स्वार्थ साध्य करण्याच्या प्रवृत्तीमुळे एकमेकांशी वादविवाद करायचे. (मत्तय २०:२०-२४) गलतीयातील ख्रिश्चनांमध्ये देखील भांडणतंटे होत होतेच. शेजाऱ्यावर प्रेम करणारा अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळतो, असे सांगितल्यानंतर पौलाने गलतीकरांना असे बजावले: “परंतु तुम्ही जर एकमेकांस चावता व खाऊन टाकिता तर परस्परांच्या हातून एकमेकांचा संहार होऊ नये म्हणून जपा.” देहाची कर्मे आणि देवाच्या आत्म्याची फळे यांतील भेद दाखवल्यानंतर पौलाने पुढे असे म्हटले: “आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकांना चीड आणणारे व एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये.” त्यानंतर पौलाने असे आर्जवले: “एकमेकांची ओझी वाहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल.”—गलतीकर ५:१४–६:२.
१५ ख्रिस्ताचा नियम पाळण्याची अपेक्षा करण्याद्वारे यहोवा आपल्याकडून अवास्तव अपेक्षा करत आहे का? अर्थात, कोणी आपल्याला टोचून बोलतो किंवा आपल्या भावना दुखावतो तेव्हा त्याच्याशी प्रेमाने वागणे कदाचित आपल्याला जड जात असेल, तरीसुद्धा, ‘देवाची प्रिय मुले ह्या नात्याने त्याचे अनुकरण करण्यास, व प्रीतीने चालण्यास’ आपण बांधील आहोत. (इफिसकर ५:१, २) आपण नेहमी देवाच्या उदाहरणावर मनन केले पाहिजे, कारण “देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला.” (रोमकर ५:८) आपण जेव्हा दुसऱ्यांना, आणि ज्यांनी आपले मन दुखावले अशांनाही मदत करण्यासाठी पुढाकार घेतो, तेव्हा आपल्याला या जाणिवेने समाधान मिळेल, की आपण देवाचे अनुकरण करत आहोत आणि ख्रिस्ताच्या नियमाचे पालन करत आहोत.
१६. देवाप्रती आणि ख्रिस्ताप्रती आपल्या प्रेमाचा पुरावा आपण कसा देतो?
१६ आपण हे लक्षात ठेवले पाहिजे, की आपण आपल्या प्रेमाची प्रचिती केवळ आपल्या बोलण्याने नव्हे, तर आपल्या कृतीतून देत असतो. येशूला देखील एकदा देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्यास थोडे कठीण गेले. त्याने देवाला प्रार्थना केली: “हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर.” पण त्याने पुढे लगेच असेही म्हटले: “तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.” (लूक २२:४२) येशूला भयंकर त्रास सहन करावा लागला, तरी त्याने देवाच्या इच्छेप्रमाणे केले. (इब्री लोकांस ५:७, ८) तेव्हा, देवाला आज्ञाधारक राहण्याद्वारे आपण आपल्या प्रेमाची प्रचिती देतो आणि दाखवून देतो की देवाच्या मार्गालाच आपण जीवनाचा सर्वोत्तम मार्ग मानले आहे. बायबल म्हणते: “देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय.” (१ योहान ५:३) येशूनेही त्याच्या प्रेषितांना हेच सांगितले: “माझ्यावर तुमची प्रीति असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा.”—योहान १४:१५.
१७. येशूने त्याच्या अनुयायांना कोणती खास आज्ञा दिली आणि ती आज्ञा आजही लागू होते हे आपल्याला कसे कळते?
१७ एकमेकांवर प्रेम करावे, ही आज्ञा देण्याखेरीज ख्रिस्ताने आपल्या अनुयायांना आणखी कोणती खास आज्ञा दिली? त्यांनी प्रचार कार्य करावे अशी त्याने त्यांना आज्ञा दिली, आणि त्यासाठी त्याने त्यांना प्रशिक्षणही दिले होते. पेत्राने म्हटले: ‘त्याने आम्हाला अशी आज्ञा केली की, लोकांस उपदेश करावा व त्यांना साक्ष द्यावी.’ (प्रेषितांची कृत्ये १०:४२) येशूने ही खास आज्ञा दिली होती: “तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.” (मत्तय २८:१९, २०; प्रेषितांची कृत्ये १:८) येशूने हे दाखवून दिले, की ह्या सूचना या ‘अंतसमयातील’ त्याच्या अनुयायांना देखील लागू होतात कारण त्याने असे म्हटले: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” (दानीएल १२:४; मत्तय २४:१४) आपण प्रचार करावा ही देवाचीच इच्छा आहे, यात शंका नाही. पण काही लोकांना कदाचित वाटेल, की हे काम करायला सांगून देव आपल्याकडून अवास्तव अपेक्षा करत आहे. पण खरोखरच तसे आहे का?
हे कार्य इतके कठीण का वाटते?
१८. यहोवाची मागणी पूर्ण करताना आपल्याला दुःख सोसावे लागते तेव्हा आपण काय लक्षात ठेवले पाहिजे?
१८ आपण हे पाहिले आहे, की संपूर्ण इतिहासामध्ये यहोवाने त्याच्या लोकांकडून विविध गोष्टींची अपेक्षा केली. आणि त्यांच्याकडून केलेल्या अपेक्षा जशा वेगवेगळ्या होत्या त्याचप्रकारे त्यांनी ज्या परीक्षांना तोंड दिले त्या परीक्षांचे स्वरूपही भिन्न होते. देवाच्या प्रिय पुत्राला तर सर्वात कठीण परीक्षांचा सामना करावा लागला आणि देवाने सांगितल्याप्रमाणे केल्यामुळे त्याला शेवटी अतिशय क्रूररित्या ठार मारण्यात आले. पण यहोवाने सांगितल्याप्रमाणे करताना आपल्याला दुःख सोसावे लागते तेव्हा आपण हे लक्षात ठेवले पाहिजे, की तो आपल्यावर या परीक्षा आणत नाही. (योहान १५:१८-२०; याकोब १:१३-१५) पाप, दुःख आणि मृत्यू सैतानाच्या बंडामुळे आला आहे; आणि यहोवाच्या सेवकांना त्याच्या अपेक्षा पूर्ण करणे अतिशय कठीण जावे या उद्देशाने तोच अशा कठीण परिस्थिती त्यांच्यापुढे आणतो.—ईयोब १:६-१९; २:१-८.
१९. देवाने त्याच्या पुत्राद्वारे आपल्याकडून अपेक्षिलेल्या गोष्टी करणे हा आपल्याकरता एक बहुमान का आहे?
१९ या अंतसमयात, यहोवाने आपल्या पुत्राद्वारे आपल्या सेवकांना अशी आज्ञा दिली आहे, की त्यांनी सर्व जगात प्रचार करावा आणि केवळ देवाचे राज्य मनुष्याचे सर्व दुःख दूर करू शकते असे घोषित करावे. देवाचे हे राज्य पृथ्वीवरील सर्व समस्या—युद्ध, गुन्हेगारी, गरिबी, म्हातारपण, आजार, मृत्यू—काढून टाकील. या राज्यात संपूर्ण पृथ्वीचे एका निसर्गरम्य बागेत रूपांतर होईल आणि अशा सुंदर परिस्थितीमध्ये मृत लोकांचे देखील पुनरूत्थान करण्यात येईल. (मत्तय ६:९, १०; लूक २३:४३; प्रेषितांची कृत्ये २४:१५; प्रकटीकरण २१:३, ४) अशा अद्भुत गोष्टींची सुवार्ता इतरांना सांगणे हा आपल्याकरता बहुमानच नाही का? तर मग, हे स्पष्ट आहे, की प्रचार करायला सांगून देवाने आपल्याकडून काही अवास्तव अपेक्षा केलेली नाही. आपल्याला येणारा विरोध दियाबल सैतान आणि त्याच्या जगाकडून येतो.
२०. देवाची इच्छा पूर्ण करण्यापासून आपल्याला परावृत्त करण्याचा दियाबलाचा कोणताही प्रयत्न आपण कशाप्रकारे हाणून पाडू शकतो?
२० देवाची इच्छा पूर्ण करण्यापासून आपल्याला परावृत्त करण्याचा सैतानाचा कोणताही प्रयत्न आपण कशाप्रकारे हाणून पाडू शकतो? हे शब्द लक्षात ठेवल्याने: “माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणाऱ्यास मी प्रत्युत्तर देईन.” (नीतिसूत्रे २७:११) स्वर्गातील सुरक्षित वातावरण सोडून येशू आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करण्याकरता या पृथ्वीवर आला तेव्हा यहोवा आपली निंदा करणाऱ्या सैतानाला प्रत्युत्तर देऊ शकला. (यशया ५३:१२; इब्री लोकांस १०:७) मनुष्य या नात्याने येशूने त्याच्यावर आलेल्या प्रत्येक परीक्षेला तोंड दिले, इतकेच नव्हे तर त्याने वधस्तंभावरील मृत्यू देखील सहन केला. आपण त्याच्या उदाहरणाचे अनुकरण केल्यास आपल्याला देखील दुःखाला तोंड देता येईल आणि यहोवाच्या अपेक्षा पूर्ण करता येतील.—इब्री लोकांस १२:१-३.
२१. यहोवाने आणि त्याच्या पुत्राने दाखवलेल्या प्रेमाबद्दल तुम्हाला कसे वाटते?
२१ देवाने आणि त्याच्या पुत्राने आपल्यावर किती महान प्रेम दाखवले! येशूच्या बलिदानामुळे आज्ञाधारक मानवजातीला परादीसमध्ये सार्वकालिक जीवन जगण्याची आशा मिळाली आहे. तेव्हा, या आशेपासून आपले लक्ष विचलित करेल अशा कोणत्याही गोष्टीला आपण आपल्या जीवनात थारा देऊ नये. उलट, आपण प्रत्येकाने यावर मनन करावे की येशूच्या बलिदानामुळे मला कोणकोणते आशीर्वाद मिळाले आहेत; पौलाप्रमाणे आपणही म्हणावे: ‘देवाच्या पुत्राने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरता दिले.’ (गलतीकर २:२०) तसेच आपण आपल्या प्रेमळ यहोवा देवाचे सदैव उपकार मानावेत कारण तो कधीही आपल्याकडून कोणतीच अवास्तव अपेक्षा करत नाही.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ यहोवा आज आपल्याकडून काय अपेक्षा करतो?
◻ येशूने त्याच्या प्रेषितांसोबत घालवलेल्या शेवटल्या संध्याकाळी त्याने प्रेमाच्या महत्त्वावर कसा जोर दिला?
◻ देवावरील आपले प्रेम आपण कसे दाखवू शकतो?
◻ यहोवाच्या अपेक्षा पूर्ण करण्याला आपण एक बहुमान का समजावे?
[२३ पानांवरील चित्र]
येशूने प्रेषितांचे पाय धुण्याद्वारे कोणता धडा शिकवला?
[२५ पानांवरील चित्र]
कोणत्याही प्रकारचा विरोध आला तरी सुवार्ता सांगणे अतिशय आनंददायक आहे आणि हा आपल्याकरता एक मोठा बहुमान आहे