“परूशी व सदूकी ह्यांच्या खमीराविषयी जपून राहा”
येशू ख्रिस्ताने १९ शतकांपूर्वी हे शब्द उद्गारले तेव्हा तो त्याच्या शिष्यांना हानीकारक धार्मिक शिकवणी आणि रुढी यापासून जागृत करत होता. (मत्तय १६:६, १२) मार्क ८:१५ मधील अहवाल स्पष्टपणे म्हणतो: “संभाळा, परूश्यांचे खमीर व हेरोदाचे खमीर ह्याविषयी जपून राहा.” हेरोदाचा का उल्लेख करण्यात आला? कारण काही सदूकी, हेरोदिया पंथ या एका राजकीय गटाचे होते.
अशाप्रकारच्या खास इशाऱ्याची काय गरज होती? परूशी आणि सदूकी दोघेही येशूचे पूर्णपणे विरोधक नव्हते का? (मत्तय १६:२१; योहान ११:४५-५०) होय, ते होते. परंतु त्यांच्यातील काहीजण ख्रिस्ती विश्वास स्वीकारतील आणि मग ख्रिस्ती मंडळीवर त्यांच्या कल्पना लादण्याचा प्रयत्न करतील.—प्रेषितांची कृत्ये १५:५.
शिवाय, ज्या धार्मिक नेत्यांच्या प्रभावाखाली शिष्य वाढले होते ते शिष्य स्वतः त्या नेत्यांच्यामागे जाण्याचा देखील धोका होता. अनेक वेळा अशी धार्मिक पार्श्वभूमी असलेल्यांना, येशूच्या शिकवणीचा अर्थ समजून घेण्यास एक अडखळण ठरले होते.
परूशीवाद आणि सदूकीवाद इतका घातक कशामुळे बनला? येशूच्या दिवसातील धार्मिक परिस्थितीवर दृष्टीक्षेप आपल्याला त्याची कल्पना देईल.
धार्मिक फुट
सा. युगाच्या पहिल्या शतकादरम्यान असलेल्या यहुदी समाजाबद्दल इतिहासकार मॅक्स रेडन यांनी लिहिले: “यहुदी मंडळ्यांचे एकमेकांचे स्वातंत्र्य वास्तविक होते. शिवाय त्यावर अधिक भरही दिला जात असे. . . . अनेक वेळा, मंदिर आणि पवित्र शहरावर अधिक जोर देऊन आदर दिला जाई तेव्हा, मातृभूमीवर ज्या सरकारी शासकांचे राज्य चालू असे त्यांच्याबद्दल तीव्र तिरस्काराची भावना दाखवली जाऊ शकत होती.”
खरोखरच, किती दुःखदायक आध्यात्मिक स्थिती! याला हातभार लावणारी काही कारणे कोणती होती? सर्वच यहूदी पॅलेस्टाईनमध्ये राहत नव्हते. ग्रीक समाजामध्ये याजकांना पुढारी असे समजले जात नव्हते तर त्या संस्कृतीच्या प्रभावाने, यहोवाने केलेल्या याजकपदाच्या व्यवस्थेला जो आदर द्यावयाचा होता त्याला क्षीण करण्यात आपली कामगिरी बजावली होती. (निर्गम २८:२९; ४०:१२-१५) शिवाय, धर्मगुरूंखेरीज इतर शिक्षित लोक आणि शास्त्री यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
परूशी लोक
परूशी किंवा पेरू·शिमʹ या नावाचा अर्थच “वेगळे लोक” असा होतो. परूशी स्वतःला मोशेचे अनुयायी समजत होते. त्यांनी त्यांचा स्वतःचा संघ (इब्री, खवु·राह) बनवला होता. त्या वर्गाचा एक सदस्य होण्याकरता एखाद्याला त्या संघाच्या तीन सदस्यांसमोर लेवीय शुद्धता, ॲम-हारेट्स (अशिक्षित जनसमूह) यांच्यासोबत जवळीक ठेवण्याचे टाळणे आणि काटेकोरपणे दशमांश देण्याविषयी प्रतिज्ञा घ्यावी लागत असे. मार्क २:१६ “परूश्यांतील शास्त्री” यांचा उल्लेख करते. यांच्यातील काही परूशी पारंगत शास्त्री आणि शिक्षक होते तर इतर सामान्य लोक होते.—मत्तय २३:१-७.
परूशी सर्वज्ञ देवावर विश्वास ठेवत. ते असा तर्क करत, की “देव सगळीकडे आहे, त्याची उपासना मंदिरात आणि मंदिराच्या बाहेरही करता येते आणि केवळ अर्पणांनीच त्याचा धावा करू नये. अशाप्रकारे त्यांनी सभास्थानाला उपासना, अभ्यास आणि प्रार्थना करण्याचे स्थान बनवले, तसेच त्याला मंदिरापेक्षा अधिक लोकांच्या जीवनाचे केंद्र आणि मुख्य स्थान बनवले.”—एन्साक्लोपिडिआ ज्युडायका.
यहोवाच्या मंदिराला गुणग्राहकता दाखवण्यात परूशी उणे पडले. हे येशूच्या शब्दांवरून दिसून येते: “अहो, आंधळ्या वाटाड्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही म्हणता, कोणी मंदिराची शपथ घेतली तर त्यात काही नाही, परंतु कोणी मंदिराच्या सोन्याची शपथ घेतली तर मात्र तो बांधला जातो. अहो मुर्खांनो आणि आंधळ्यांनो, ह्यातून मोठे कोणते? ते सोने किंवा ज्याच्या योगाने ते सोने पवित्र झाले ते मंदिर? तुम्ही म्हणता, कोणी वेदीची शपथ घेतली तर त्यात काही नाही, परंतु कोणी तिच्यावरील अर्पणाची शपथ घेतली तर तो बांधला जातो. अहो आंधळ्यांनो ह्यातून मोठे कोणते? अर्पण किंवा अर्पण पवित्र करणारी ती वेदी? म्हणून जो कोणी वेदीची शपथ घेतो तो तिची व तिच्यावर जे काही आहे त्याची शपथ घेतो.”—मत्तय २३:१६-२०.
परूशी त्यांच्या तर्कात इतका विपर्यास करणारे कसे झाले? ते कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत होते? येशू पुढे काय म्हणतो त्याची नोंद घ्या. “आणि जो मंदिराची शपथ घेतो, तो त्याची व त्यात राहणाऱ्याची शपथ घेतो.” (मत्तय २३:२१) या वचनाबद्दल ई. पी. सॅर्न्डझ या विद्वानांनी असे निरिक्षिले: “मंदिरात पवित्र देवाची उपासना केली जात होती म्हणूनच केवळ ते पवित्र होते असे नाही तर तो तेथे होता यामुळे देखील ते पवित्र होते.” (यहुदी धर्म: रितीरिवाज आणि विश्वास, सा. यु. पू ६३—सा. यु ६६) परंतु, यहोवा सर्वत्र होता असा विचार करणाऱ्यांना त्याच्या खास उपस्थितीचे इतके महत्त्व नसेल.
पूर्वनियती आणि इच्छा स्वातंत्र्याच्या मिलाफावर देखील परूशी विश्वास ठेवत होते. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर, “सर्व काही आगाऊ दिसते, तरीदेखील इच्छा स्वातंत्र्य दिले जाते.” तरी सुद्धा ते असे मानत की आदाम आणि हव्वेचे पाप पूर्वनियत केले होते व बोटावरील सर्वात लहानशी काप देखील पूर्वनियत असते.
१८ लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या एका बुरूजाच्या कोसळण्याविषयी येशूने सांगितले तेव्हा त्याच्या मनामध्ये कदाचित अशाप्रकारच्या खोट्या कल्पना असतील. त्याने विचारले: “[ठार झाले] ते यरूशलेमेत राहणाऱ्या सर्व माणसांपेक्षा अधिक अपराधी होते असे तुम्हास वाटते काय?” (लूक १३:४) बहुतेक दुर्घटनांच्या बाबतीत खरे आहे तसे हे देखील परूश्यांनी शिकवलेल्या नशीबामुळे नव्हे तर “कालवश व दैववश” यामुळे आहे. (उपदेशक ९:११) अशाप्रकारचे कल्पित ज्ञानी शास्त्रवचनीय आज्ञांना असे हाताळत असावेत?
ते धार्मिक नवसंप्रदायप्रवर्तक होते
परूश्यांचा असा विचार होता, की प्रत्येक पिढीच्या गुरूंनी आधुनिक उपलब्ध माहितीच्या अनुषंगाने शास्त्रवचनीय आज्ञांचा अर्थ सांगितला पाहिजे. यास्तव, एन्साक्लोपिडिआ ज्युडायका म्हणतो की, त्यांना “त्यांच्या आधुनिक कल्पना आणि तोराह शिकवणींचा मिलाफ करण्यास किंवा तोराहच्या शब्दांमध्ये सूचित केलेल्या त्यांच्या कल्पना शोधण्यास मुळीच कठीण वाटले नाही.”
वार्षिक प्रायश्चिताच्या दिवसासंबंधी, त्यांनी याजकांकडे पापांना क्षमा करण्याचे सामर्थ्य काढून घेऊन त्या दिवसालाच दिले. (लेवीय १६:३०, ३३) त्यांनी वल्हांडण साजरा करताना, निर्गमच्या अहवालाच्या धड्यांचे पाठ वल्हांडण कोकऱ्याची सहभागिता करताना म्हणण्याऐवजी द्राक्षारस आणि मॅटझो यांची सहभागिता करताना पाठ म्हणण्यावर अधिक भर दिली.
कालांतराने, परूशी मंदिरात प्रभावी बनले. त्यानंतर त्यांनी संग्रहाच्या सणादरम्यान शिलोह तळ्यातील पाण्याची मिरवणूक काढून ते ओतण्याच्या विधीचा त्यात समावेश केला. तसेच, सणाच्या अंताला विलो वृक्षांच्या फांद्या वेदीवर आपटणे आणि नियमशास्त्रात काहीच आधार नसलेल्या नियमित दैनंदिन प्रार्थना चालू केल्या.
“शब्बाथाच्या संबंधात असलेल्या परूश्यांनी बनवलेल्या नव्या रिती विशेष उल्लेखनीय होत्या” असे द ज्युईश एन्सायक्लोपिडिआ म्हणतो. एखाद्या पत्नीकडून दिवे लावून शब्बाथाचे स्वागत करण्याचे अपेक्षिले जात असे. एखाद्या कार्यामुळे बेकायदेशीर श्रम होतील असे भासत असल्यास परूशी त्या कार्यावर लगेचच बंदी घालत. त्यांनी वैद्यकीय उपचारांना नियमांच्या चौकटीत बसवले आणि येशूच्या शब्बाथाच्या दिवशी चमत्कारिकरीत्या बरे करण्यावर देखील राग व्यक्त केला. (मत्तय १२:९-१४; योहान ५:१-१६) परंतु, या धार्मिक नवसंप्रदायप्रवर्तकांनी, शास्त्रवचनीय नियमांना कुंपण घालून संरक्षण मिळावे या हेतूने नव्या रीती स्थापन करणे थांबवले नाही.
रद्द करणे
शास्त्रवचनीय नियमांना काढून टाकणे किंवा रद्द करण्याचा अधिकार आपल्याकडे असल्याचा दावा परूश्यांनी केला. त्यांनी केलेला तर्क एका तालमुदिक म्हणीत प्रतिबिंबित होतो: “संपूर्ण तोराह विसरून जाण्यापेक्षा एखादा नियम त्यातून काढून टाकणे बरे.” उदाहरणार्थ, योबेलवर्ष जवळ येण्याच्या काळात कोणतीही व्यक्ती गोरगरीबांना काहीच देत नसे कारण त्या व्यक्तीच्या मनात अशी भीती होती की, तो त्याचे पैसे गमावेल या आधारावर योबेलवर्ष साजरा करण्याचेच थांबवण्यात आले.—लेवीय २५ अध्याय.
इतर उदाहरणांपैकी, एखाद्या स्त्रीने जारकर्म केल्याच्या संशयावरून तिची घेतली जाणारी परीक्षा रद्द करणे तसेच, अज्ञात खुनाची घटना, प्रायश्चित्त प्रक्रियेचे निलंबन रद्द करणे ही आहेत. (गणना ५:११-३१; अनुवाद २१:१-९) थोड्याच वेळा परूशी एखाद्या गरजू पालकांची काळजी घेण्याविषयीच्या शास्त्रवचनीय आवश्यकता नक्कीच रद्द करणार होते.—निर्गम २०:१२; मत्तय १५:३-६.
येशूने ताकीद दिली: “परूश्यांच्या खमिराविषयी म्हणजे त्यांच्या ढोंगांविषयी [दांभिकपणा] संभाळा.” (लूक १२:१) परूशीवाद आणि त्याच्यातील गैरईश्वरशासित मनोवृत्या दुसरे काहीही नसून दांभिकता असू शकेल—आणि निश्चितच अशा गोष्टी ख्रिस्ती मंडळीत आणता येणार नाहीत. तरीदेखील, यहुदी विश्वकोश सदूकी लोकांपेक्षा परूशी लोकांची अनुकूल माहिती देतो. आता आपण आणखी एका पुराणमतवादी गटाचा विचार करू या.
सदूकी लोक
सदूकी हे नाव कदाचित शलमोनाच्या दिवसातील महायाजक सादोक याच्या नावातून घेतले असावे. (१ राजे २:३५, NW, तळटीप) सदुक्यांनी पुराणमतवादी संघ बनवला आणि तो संघ मंदिर आणि याजकपदाच्या जबाबदाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करू लागला. परूश्यांनी शिक्षण आणि धर्मनिष्ठा याच्यायोगे अधिकाराचा दावा केला परंतु, सदुक्यांनी त्यांचा विशेषाधिकार वंशावळ आणि हुद्दा यावर आधारला. त्यांनी परूश्यांच्या नवसंप्रदायप्रवर्तकाचा सा. युग ७० मध्ये मंदिराचा नाश होईपर्यंत विरोध केला.
सदूकी पूर्वनियतीच्या शिकवणीचा नकार करीत याशिवाय, पेंटाट्युखमध्ये [पाच पुस्तकांचा संग्रह] कोणतीही शिकवण उघडपणे उल्लेखिलेली नसल्यास ते तिचा स्वीकार करीत नव्हते मग जरी ती शिकवण देवाच्या वचनात कोठेही सांगितलेली असली तरीही. वास्तविक पाहता, या गोष्टींकडे ते “वादाचे एक कारण असे समजत होते.” (द ज्युईश एन्सायक्लोपिडिआ) यावरून एखाद्याला, येशूला त्यांनी एके प्रसंगी पुनरूत्थानाविषयी आव्हान केल्याचे आठवते.
सात पती असलेल्या एका विधवेच्या उदाहरणाचा उपयोग करून सदुकी म्हणतात: “पुनरूत्थान झाल्यावर ती त्या सात जणांपैकी कोणाची बायको होईल?” त्यांनी उल्लेखिलेल्या त्या गृहीत विधवेला कदाचित १४ किंवा २१ पती असावेत. येशूने स्पष्टीकरण दिले: “पुनरूत्थान झाल्यावर ते लग्न करून घेत नाहीत व त्या लग्नात दिल्या जात नाहीत.”—मत्तय २२:२३-३०.
मोशे व्यतिरिक्त इतर प्रेरित लेखकांना सदुकी आपला नकार दर्शवित होते याची पूर्णपणे जाणीव ठेवून येशूने पेंटाट्युखमधला संदर्भ घेऊन त्याचा मुद्दा शाबीत केला. तो म्हणाला: “मेलेल्यांविषयी सांगावयाचे म्हणजे, ते उठविले जातात ह्या मुद्यावर मोशेच्या ग्रंथात झुडपाच्या प्रकरणात तुम्ही हे वाचले नाही काय की, देवाने मोशेला म्हटले, ‘मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे?’ तो मृतांचा नव्हे तर जिवंतांचा देव आहे.”—मार्क १२:२६, २७.
येशू आणि त्याच्या शिष्यांचे छळकर्ते
सदूकी मशीहाचे आगमन होईपर्यंत थांबून राहण्याऐवजी, इतर राष्ट्रांसोबत व्यवहार करण्यासाठी राज्यकला वापरण्यावर विश्वास करत होते—परंतु त्याच्या येण्यावर त्यांचा विश्वासच नव्हता. रोमसोबत केलेल्या करारानुसार त्यांना मंदिराचा कारभार सांभाळायचा होता व कोणत्याही मशीहाने उलाढाल करावी म्हणून त्याची उपस्थिती त्यांना नको होती. येशू त्यांच्या हुद्दाला एक धोका आहे या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहिल्यामुळे ते त्याला ठार मारण्यासाठी कट रचणाऱ्या परूश्यांना जाऊन सामील झाले.—मत्तय २६:५९-६६; योहान ११:४५-५०.
केवळ राजकीय गोष्टींचा विचार करत असल्यामुळे, सदुक्यांनी तर्कशुद्धतेने रोमशी एकनिष्ठतेचा वादविषय निर्माण केला व ते ओरडू लागले: “कैसरावाचून कोणी आम्हाला राजा नाही.” (योहान १९:६, १२-१५) येशूच्या मृत्यू आणि पुनरूत्थानानंतर, ख्रिस्ती विश्वासाचा प्रसार थांबवण्यात पुढाकार घेणारे सदुकी लोक होते. (प्रेषितांची कृत्ये ४:१-२३; ५:१७-४२; ९:१४) सा. युग ७० मध्ये मंदिराच्या नाशानंतर हा गट नाहीसा झाला.
जागृत राहण्याची गरज
येशूची ताकीद किती उपयुक्त ठरली आहे! होय, आपल्याला “परूशी व सदूकी ह्यांच्या खमीराविषयी जपून” राहिलेच पाहिजे. एखाद्याला केवळ यहुदी पंथ आणि आजच्या ख्रिस्ती धर्मजगतातील वाईट फळांचे निरिक्षण करायचे आहे.
परंतु याच्या अगदी विरूद्धतेत, संपूर्ण जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांच्या ७५,५०० पेक्षा अधिक मंडळ्यांमधील योग्य ख्रिस्ती वडील ‘स्वतःकडे व स्वतःच्या शिक्षणाकडे लक्ष देतात.’ (१ तीमथ्य ४:१६) संपूर्ण बायबल देवाने प्रेरित केले आहे असा ते स्वीकार करतात. (२ तीमथ्य ३:१६) नवसंप्रदायप्रवर्तक आणि स्वतःचे धार्मिक रीतिरिवाज वाढवण्याऐवजी ते एका बायबल-आधारित संघटनेच्या मार्गदर्शनानुरूप ऐक्याने कार्य करतात. ती संघटना बोध देण्यासाठी या मासिकाचा प्रमुख साधन म्हणून उपयोग करते.—मत्तय २४:४५-४७.
याचा परिणाम? संपूर्ण जगभरातील लाखो लोकांना बायबलची समज प्राप्त झाल्यामुळे, आपल्या जीवनात त्याचे अनुकरण केल्यामुळे आणि इतरांना त्याच्याविषयी शिकवल्यामुळे ते आध्यात्मिकरीत्या उंचावले जातात. हे कसे साध्य होते ते पाहण्यासाठी आपण यहोवाच्या साक्षीदारांच्या सर्वात जवळच्या मंडळीस भेट का देऊ नये किंवा या नियतकालिकाच्या प्रकाशकांना का लिहू नये?
[२६ पानांवरील चौकट]
येशूने आपल्या श्रोत्यांचा विचार केला
येशू ख्रिस्ताने स्पष्टपणे शिकवण दिली. त्याचे ऐकणाऱ्यांच्या कल्पनांना त्याने विचारात घेतले. उदाहरणार्थ, त्याने नव्याने “जन्म” घेण्याविषयी निकदेम या परूश्याबरोबर बोलताना असे केले. निकदेमाने विचारले: “म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्याला मातेच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय?” (योहान ३:१-५) परूश्यांचा विश्वास होता की यहुदी होण्यासाठी एखाद्याचा पुनर्जन्म आवश्यक होता व एका रब्बी म्हणीने धर्मांतर केलेल्या व्यक्तीची तुलना “एखाद्या नव्याने जन्मलेल्या मुलासोबत” केली होती तर मग, निकदेम इतक्या घोटाळ्यात का पडला असावा?
जॉन लाईटफुट यांचे अ कॉमेंट्री ऑन द न्यू टेस्टमेंट फ्रॉम द तालमुद ॲण्ड हिब्रायका पुढीलप्रमाणे सूक्ष्मदृष्टी पुरविते: “एखादा इस्राएली होण्याच्या योग्यतेविषयी यहुद्यांचे सर्वसामान्य मत . . . परूश्याच्या मनात इतके बिंबले होते की तो त्याच्या पहिल्या पूर्वग्रहांना सहजपणे काढू शकत नव्हता . . . उलटपक्षी मशीहाच्या राज्यात इस्राएलांना जाण्याचा हक्क आहे तर मग, पुन्हा इस्राएली होण्यासाठी एखाद्याने पुन्हा त्याच्या मातेच्या उदरात जाणे आवश्यक आहे असा तुमच्या वक्तव्याचा अर्थ होता का?’”—पडताळा मत्तय ३:९.
धर्मांतर केलेल्यांसाठी नव्याने जन्म घेणे हे कबूल करताना, पुन्हा एकदा जणू काय उदरात जाणे—ही क्रिया स्वाभाविक यहुद्यांना अशक्य आहे या दृष्टिकोनातून निकदेम पाहत असावा.
आणखी एका प्रसंगी, येशू ‘त्याचा देह खाण्याविषयी आणि रक्त पिण्याविषयी’ बोलला तेव्हा अनेकांनी आक्षेप घेतला. (योहान ६:४८-५५) परंतु, लाईटफुट याकडे अंगुली दर्शवितात की, “यहुदी शाळांमध्ये लाक्षणिक भाषेत ‘खाणे व पिणे’ याचा उल्लेख करणे सर्वसामान्य होते.” त्यांनी याची देखील नोंद केली की तालमुदमध्ये “मशीहाला खाण्याचा” उल्लेख आहे.
यास्तव, परूशी आणि सदुक्यांच्या दृष्टिकोनाचा पहिल्या शतकातील यहुद्यांच्या विचारसरणीवर बराचसा प्रभाव होता. परंतु, येशूने उचितपणे नेहमीच त्याच्या श्रोत्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा विचार केला. त्याला थोर शिक्षक बनवणाऱ्या अनेक कारणातील हे एक कारण होते.