वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w17 फेब्रुवारी पृ. ३-७
  • यहोवाचा उद्देश नक्कीच पूर्ण होईल!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाचा उद्देश नक्कीच पूर्ण होईल!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आपल्या निर्माणकर्त्याचा मूळ उद्देश काय होता?
  • यहोवाच्या उद्देशाला कोणत्या गोष्टींमुळे अडथळा निर्माण झाला?
  • खंडणी बलिदानामुळे देवासोबत मैत्रिपूर्ण नातेसंबंध जोडणं शक्य झालं
  • आपल्याला यहोवाकडे पुन्हा येता यावं, यासाठी त्याने स्वतः दरवाजा उघडला आहे
  • शेवटला शत्रू, मृत्यू नाहीसा केला जाईल
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • खंडणी—देवाची सर्वात मौल्यवान भेट
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
  • ‘देवाने आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • खंडणी—देवाची सर्वात अमूल्य भेट
    बायबल नेमके काय शिकवते?
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
w17 फेब्रुवारी पृ. ३-७
एदेन बागेत आदाम आणि हव्वा; सर्प हव्वेशी बोलतो, हव्वा फळ खाते आणि आदामालाही देते

यहोवाचा उद्देश नक्कीच पूर्ण होईल!

“मी बोलतो तसे घडवूनही आणतो, मी योजतो ते शेवटास नेतो.”—यश. ४६:११.

गीत क्रमांक: ४६, ५

तुमचं उत्तर काय असेल?

  • मानवांसाठी यहोवा देवाचा काय उद्देश आहे?

  • यहोवा देवाचा उद्देश अजूनही पूर्ण का झाला नाही?

  • आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी यहोवाने काय केलं?

१, २. (क) यहोवाने मानवांना काय प्रगट केलं आहे? (ख) यशया ४६:१०, ११ आणि ५५:११ या वचनांतून आपल्याला कोणती खात्री मिळते?

बायबलमधील पहिलं वचन अतिशय साध्या शब्दांनी बनलेलं आहे, पण त्याच वेळी ते अतिशय अर्थभरीतही आहे. हे वचन म्हणजे: “प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्‍न केली.” (उत्प. १:१) देवाने निर्माण केलेल्या या विश्‍वातील फार कमी गोष्टी मानवांनी पाहिल्या आहेत आणि या गोष्टींबद्दल त्यांना फार कमी माहिती आहे. उदाहरणार्थ, अवकाश, प्रकाश आणि गुरुत्वाकर्षण. (उप. ३:११) पण या पृथ्वीबद्दल आणि मानवांबद्दल असलेला यहोवा देवाचा उद्देश मात्र मानवांना माहीत आहे. यहोवाने मानवांना स्वतःच्या प्रतिरूपात बनवलं आणि त्यांनी या पृथ्वीवर आनंदाने जीवन जगावं अशी त्याची इच्छा होती. (उत्प. १:२६) मानव यहोवाची मुलं ठरणार होते आणि यहोवा हा त्यांचा स्वर्गीय पिता.

२ उत्पत्तिच्या तिसऱ्‍या अध्यायात आपण वाचतो की यहोवाच्या या मूळ उद्देशाला आव्हान दिलं गेलं. (उत्प. ३:१-७) पण खरंतर असा कोणताही प्रश्‍न किंवा समस्या नाही जी यहोवा देव सोडवू शकत नाही, आणि यहोवाला आपला उद्देश पूर्ण करण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. (यश. ४६:१०, ११; ५५:११) त्यामुळे यहोवा त्याचा उद्देश अगदी योग्य वेळी पूर्ण करेल याची आपण खात्री बाळगू शकतो.

३. (क) बायबलमधील कोणत्या दोन शिकवणींमुळे आपल्याला बायबलमधील संदेश समजण्यास मदत झाली? (ख) या शिकवणींवर आपण आता का चर्चा करणार आहोत? (ग) या लेखात आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

३ मानवांसाठी आणि या पृथ्वीसाठी यहोवाचा उद्देश काय आहे, हे आपल्याला माहीत आहे. तसंच यहोवाच्या उद्देशामध्ये येशूची काय भूमिका आहे हेही आपल्याला माहीत आहे. बायबलच्या मूलभूत सत्यांपैकी ही दोन महत्त्वपूर्ण सत्यं आहेत. जेव्हा आपण बायबल अभ्यास सुरू केला तेव्हा कदाचित यांबद्दलच आपण सर्वात आधी शिकलो असू. या बायबल सत्यांविषयी शिकल्यानंतर इतरांनाही आता त्यांविषयी सांगावं अशी आपली इच्छा आहे, आणि आपल्या सर्वांकडे ही संधी उपलब्ध आहे. विशेषकरून वर्षाच्या या खास वेळी, जेव्हा आपण स्मारकविधीच्या कार्यक्रमासाठी लोकांना आमंत्रित करत आहोत. (लूक २२:१९, २०) आपण आमंत्रित केलेले लोक जेव्हा या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील, तेव्हा देवाच्या सुंदर उद्देशाबद्दल त्यांना अधिक शिकायला मिळेल. त्यामुळे आपल्या बायबल विद्यार्थ्यांची आणि इतर आस्थेवाईक लोकांची या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाप्रती उत्सुकता वाढावी यासाठी आपण त्यांना कोणते प्रश्‍न विचारू शकतो यावर आतापासूनच विचार करणं योग्य राहील. या लेखात आपण पुढील तीन प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत: मानवांसाठी आणि पृथ्वीसाठी देवाचा काय उद्देश आहे? त्याच्या उद्देशाला कोणत्या गोष्टींमुळे अडथळा निर्माण झाला? आणि देवाच्या मूळ उद्देशाचा एका अर्थी बंद असलेला दरवाजा, येशूच्या खंडणी बलिदानामुळे कसा उघडला गेला?

आपल्या निर्माणकर्त्याचा मूळ उद्देश काय होता?

४. सृष्टीमुळे देवाचा महिमा कसा होतो?

४ यहोवा देव हा फार अद्‌भुत निर्माणकर्ता आहे. त्याने जी निर्मिती केली आहे ती सर्वोत्तम दर्जाची आहे. (उत्प. १:३१; यिर्म. १०:१२) मग या सृष्टीतील सुंदरता आणि यांत दिसून येणाऱ्‍या सुव्यवस्थेवरून आपण काय शिकतो? या सृष्टीवरून आपल्याला शिकायला मिळतं की यहोवाने जी निर्मिती केली आहे, ती आपल्या फायद्याचीच आहे; मग ती एखादी लहान गोष्ट असो अथवा मोठी. जेव्हा तुम्ही एखाद्या मानवी पेशीची रचना पाहता, एखादं नवीन जन्मलेलं बाळ पाहता, किंवा एखादा सुंदर सूर्यास्त पाहता तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? नक्कीच आपल्याला फार आश्‍चर्य वाटतं आणि ही सृष्टीची रचना पाहून आपण स्तब्ध होऊन जातो. आपल्याला या गोष्टी आश्‍चर्यकारक वाटतात, कारण यहोवाने आपल्याला अशा क्षमतांनी बनवलं आहे ज्यांमुळे आपण सुंदर गोष्टींची कदर करू शकतो.—स्तोत्र १९:१; १०४:२४ वाचा.

५. या संपूर्ण विश्‍वात सुसंगतता असावी यासाठी यहोवाने काय केलं आहे?

५ यहोवाने त्याच्या या संपूर्ण सृष्टीला फार काळजीपूर्वक काही मर्यादा घालून दिल्या आहेत. त्याने निसर्गात आढळणारे नियम बनवले आणि नैतिक स्तरदेखील ठरवले. सृष्टीतील गोष्टींत सुसंगतता असावी आणि त्या व्यवस्थित रीत्या कार्य करत राहाव्यात, म्हणून यहोवाने सृष्टीला या मर्यादा घालून दिल्या आहेत. (स्तो. १९:७-९) या विश्‍वातील प्रत्येक गोष्टीचं यहोवाच्या उद्देशानुसार ठरलेलं स्थान आणि कार्य आहे. गुरुत्वाकर्षणाचंच उदाहरण घ्या. गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीभोवती असलेलं वातावरण पृथ्वीच्या अवतीभोवतीच राहतं. तसंच यामुळे समुद्रात भरती-ओहोटी येते. विचार करा जर गुरुत्वाकर्षणच नसेल तर पृथ्वीवर जीवन शक्य होईल का? नक्कीच नाही. याचाच अर्थ यहोवाने त्याच्या निर्मितीला घालून दिलेल्या नियमांमुळे आणि मर्यादांमुळे या विश्‍वात सुव्यवस्था टिकून राहते. सृष्टीत दिसून येणाऱ्‍या या सुव्यवस्थेवरून हेही सिद्ध होतं की, पृथ्वीच्या आणि मानवांच्या निर्मितीमागे त्याचा एक उद्देशदेखील आहे. प्रचारकार्यात भाग घेण्याद्वारे आपण लोकांना या अद्‌भुत विश्‍वाच्या निर्माणकर्त्याची ओळख करून घेण्यास मदत करू शकतो.—प्रकटी. ४:११.

६, ७. यहोवाने आदाम आणि हव्वेला कोणकोणत्या चांगल्या गोष्टी दिल्या होत्या?

६ मानवांनी या पृथ्वीवर सदासर्वकाळ जगावं हा यहोवाचा मूळ उद्देश होता. (उत्प. १:२८; स्तो. ३७:२९) पहिल्या मानवी जोडप्याला यहोवाने उदारतेनं अनेक चांगल्या गोष्टी आणि क्षमता दिल्या होत्या. (याकोब १:१७ वाचा.) यहोवाने त्यांना इच्छास्वातंत्र्य दिलं होतं. तसंच, त्यांना तर्क करण्याची, प्रेम करण्याची आणि मैत्रीतून मिळणारा आनंद उपभोगण्याची क्षमतादेखील दिली होती. पहिल्या मानवाशी, आदामाशी यहोवाने संवाद साधला आणि तो त्याला कशा प्रकारे आज्ञाधारक राहू शकतो हे समजावून सांगितलं. यासोबतच स्वतःची, प्राण्यांची आणि तिथल्या भूमीची काळजी कशी घ्यावी हेही आदाम शिकला. (उत्प. २:१५-१७, १९, २०) यहोवाने आदाम आणि हव्वेला चव व स्पर्श ओळखण्याची, पाहण्याची, ऐकण्याची तसंच वेगवेगळे गंध ओळखण्याची क्षमता दिली होती. या क्षमतांमुळे ते त्यांच्या सुंदर घरात, म्हणजेच नंदनवनात जीवनाचा आनंद घेऊ शकत होते. या पहिल्या मानवी जोडप्याकडे समाधानकारक असं कामही होतं. ते त्यांच्या या घरात नेहमी वेगवेगळ्या गोष्टी शिकत राहू शकत होते आणि नवनवीन गोष्टींची माहिती करून घेऊ शकत होते.

७ याशिवाय मानवांबद्दल असलेल्या देवाच्या उद्देशात आणखीही काही गोष्टींचा समावेश होता. या पहिल्या मानवी जोडप्याला परिपूर्ण मुलांना जन्म देण्याची क्षमता यहोवाने दिली होती. तसंच त्यांच्या मुलांनाही पुढे जाऊन मुलं होणार होती. अशा प्रकारे संपूर्ण पृथ्वी ही मानवजातीने व्यापून जाणार होती. यहोवाने ज्या प्रकारे त्याच्या परिपूर्ण मानवी मुलांवर प्रेम केलं, त्याच प्रकारे मानवी पालकांनीही त्यांच्या मुलांवर प्रेम करावं अशी यहोवाची इच्छा होती. त्याने मानवी कुटुंबाला पृथ्वी आणि त्यावरील सर्व चांगल्या आणि सुंदर गोष्टी दिल्या. ही पृथ्वीच सदासर्वकाळासाठी त्यांचं घर राहणार होती.—स्तो. ११५:१६.

यहोवाच्या उद्देशाला कोणत्या गोष्टींमुळे अडथळा निर्माण झाला?

८. देवाने आदाम आणि हव्वेला फळ न खाण्याची आज्ञा का दिली?

८ पण यहोवाच्या उद्देशाप्रमाणे गोष्टी लगेच घडून आल्या नाहीत. यामागे काय कारण होतं? यहोवाने आदाम आणि हव्वेला एक साधी आणि सोपी आज्ञा दिली होती. या आज्ञेमुळे त्यांच्या स्वातंत्र्याला असलेल्या मर्यादेची त्यांना जाणीव राहणार होती. यहोवा देवाने अशी आज्ञा दिली होती की, “बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा; पण बऱ्‍यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्‍या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.” (उत्प. २:१६, १७) देवाने दिलेली ही आज्ञा समजून घेणं आणि तिचं पालन करणं हे त्यांच्यासाठी अवघड नव्हतं. कारण एदेन बागेमध्ये या फळाव्यतिरिक्‍त इतर अनेक चांगल्या आणि चविष्ट गोष्टी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत्या.

९, १०. (क) सैतानाने यहोवावर कोणता खोटा आरोप लावला? (ख) आदाम आणि हव्वेने काय करण्याचा निर्णय घेतला? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

९ पण सैतानाने सर्पाचा वापर करून हव्वेला भूलवलं आणि तिला आपला पिता यहोवा याने दिलेली आज्ञा मोडण्यास प्रेरित केलं. (उत्पत्ति ३:१-५ वाचा; प्रकटी. १२:९) “बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ” खाण्यापासून देव मानवांना मनाई करत आहे, असा सैतानाने दावा केला. एका अर्थाने सैतान असं म्हणत होता की, ‘तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही करू शकत नाही?’ तसंच तो हव्वेला आणखी म्हणाला: “तुम्ही खरोखर मरणार नाही.” पण खरंतर हे साफ खोटं होतं. त्यानंतर सैतानाने हव्वेला हे पटवून देण्याचा प्रयत्न केला की तिला देवाचं ऐकण्याची गरज नाही. सैतान म्हणाला: “देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील.” आदाम आणि हव्वेने ते फळ खाल्ल्याने त्यांना काही विशेष ज्ञान प्राप्त होईल, हे यहोवाला माहीत असल्यामुळे त्याने ते फळ खाण्यास मनाई केली आहे असा सैतानाच्या बोलण्याचा अर्थ होता. शेवटी सैतानाने असं खोटं आश्‍वासन दिलं की, “तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.”

१० आदाम आणि हव्वेला, आपण देवाचं ऐकावं की सर्पाचं याचा निर्णय घ्यावा लागणार होता. दुःखाची गोष्ट म्हणजे त्यांनी देवाने दिलेल्या आज्ञेचं पालन न करण्याचं निवडलं. त्यांनी त्यांचा पिता यहोवा याला नाकारलं आणि सैतानाची बाजू घेतली. त्यामुळे आता ते यहोवाच्या कोणत्याही संरक्षणाशिवाय होते.—उत्प. ३:६-१३.

११. आदाम आणि हव्वेने केलेल्या पापाकडे यहोवा दुर्लक्ष का करू शकत नव्हता?

११ देवाची आज्ञा मोडल्यानंतर आदाम आणि हव्वा परिपूर्ण राहिले नाहीत. एवढंच नाही तर ते देवाचे शत्रू बनले. कारण देवाला वाइटाचा वीट आहे. त्याचे ‘डोळे इतके पवित्र आहेत की दुष्टता त्याच्याने पाहवत नाही.’ (हब. १:१३) आदाम आणि हव्वेने केलेल्या पापाविषयी जर यहोवाने कोणतंही पाऊल उचललं नसतं, तर त्याच्या स्वर्गातील आणि पृथ्वीवरील इतर सृष्टीवर त्याचा विपरीत परिणाम झाला असता. स्वर्गदूत आणि पुढे येणाऱ्‍या मानवजातीला प्रश्‍न पडला असता की, ते यहोवाच्या शब्दांवर भरवसा ठेवू शकतात की नाही. पण यहोवा हा त्याच्या स्वतःच्या स्तरांशी प्रामाणिक राहतो; तो कधीही त्यांचं उल्लंघन करत नाही. (स्तो. ११९:१४२) आदाम आणि हव्वेला इच्छास्वातंत्र्य होतं. पण असं असलं तरी यहोवाशी बंडखोरी केल्याने भोगाव्या लागणाऱ्‍या परिणामांना ते टाळू शकत नव्हते. कालांतराने ते दोघे मरण पावले, आणि ज्या मातीतून त्यांची निर्मिती झाली होती त्याच मातीत ते पुन्हा मिळाले.—उत्प. ३:१९.

१२. आदामाच्या मुलांचं काय झालं?

१२ आदाम आणि हव्वेने मना केलेलं फळ खाल्लं, त्यानंतर यहोवा त्यांना आपल्या कुटुंबाचा एक भाग म्हणून स्वीकारू शकत नव्हता. त्याने त्यांना एदेन बागेतून बाहेर घालवून दिलं. ते पुन्हा तिथं परत कधीही जाऊ शकत नव्हते. (उत्प. ३:२३, २४) त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे परिणाम त्यांना भोगावे लागले. (अनुवाद ३२:४, ५ वाचा.) ते यहोवाच्या गुणांचं पूर्णपणे अनुकरण करू शकत नव्हते. आदामाने स्वतःसाठीच नाही तर त्याच्या येणाऱ्‍या मुलांसाठीदेखील एक सुंदर भविष्य गमावलं होतं. आता तो त्याच्या मुलांना फक्‍त अपरिपूर्णता, पाप आणि मृत्यूच वारशाने देऊ शकत होता. (रोम. ५:१२) सदासर्वकाळ जगण्याची संधी आदामाने त्याच्या मुलांकडून हिरावून घेतली होती. आदाम आणि हव्वेला आता परिपूर्ण मुलं होणं शक्य नव्हतं आणि त्यांच्या मुलांनाही परिपूर्ण मुलांना जन्म देणं शक्य नव्हतं. जेव्हापासून सैतानाने आदाम आणि हव्वेला देवाच्या विरुद्ध बंड करण्यास चिथवलं, अगदी तेव्हापासून सैतान संपूर्ण मानवजातीला देवाविरुद्ध बंड करण्यास चिथवत आहे.—योहा. ८:४४.

खंडणी बलिदानामुळे देवासोबत मैत्रिपूर्ण नातेसंबंध जोडणं शक्य झालं

१३. मानवजातीसाठी यहोवाची काय इच्छा होती?

१३ यहोवाचं आजही मानवांवर प्रेम आहे. आदाम आणि हव्वेने जरी यहोवाला सोडलं असलं तरी त्यांच्या मुलांनी आपल्याशी मैत्री करावी आणि त्यांच्यापैकी कोणीही मरू नये अशी यहोवाची इच्छा होती. (२ पेत्र ३:९) त्यामुळे यहोवा देवाने ताबडतोब पावलं उचलली आणि मानवजातीला त्याच्याशी पुन्हा मैत्रिपूर्ण नातेसंबंध जोडता यावेत म्हणून व्यवस्था केली. स्वतःच्या तत्त्वांच्या विरोधात न जाता यहोवाने ही व्यवस्था कशी केली? चला पाहू या.

१४. (क) योहान ३:१६ या वचनानुसार मानवांना पाप आणि मृत्यूपासून मुक्‍त करण्यासाठी देवाने काय केलं? (ख) लोकांसोबत आपण कोणत्या प्रश्‍नावर चर्चा करू शकतो?

१४ योहान ३:१६ वाचा. आपण स्मारकविधीसाठी आमंत्रित करत असलेल्या लोकांपैकी बऱ्‍याच लोकांसाठी कदाचित हे वचन परिचयाचं असेल. पण येशूने दिलेल्या बलिदानामुळे सार्वकालिक जीवन आपल्याला मिळणं कसं शक्य झालं, या प्रश्‍नाचं उत्तर लोकांना समजावून सांगण्यासाठी या वर्षी होणाऱ्‍या स्मारकविधीच्या वेळी आपल्याकडे संधी उपलब्ध आहे. जेव्हा आपण लोकांना आमंत्रण देऊ आणि नंतर जेव्हा आपण त्यांना भेटू तेव्हा या प्रश्‍नाचं उत्तर समजून घेण्यास मदत करण्याची संधी आपल्याकडे उपलब्ध आहे. खंडणी बलिदानाविषयी जितकी खोल समज त्यांना मिळेल, तितकंच त्यांना हे जाणवेल की यहोवाचं मानवांवर किती प्रेम आहे आणि तो किती बुद्धिमान आहे. मग खंडणी बलिदानाविषयी आपण कोणकोणते मुद्दे त्यांना सांगू शकतो?

१५. येशू आदामापेक्षा वेगळा कसा होता?

१५ यहोवाने अशा एका परिपूर्ण मानवाची व्यवस्था केली जो आपलं जीवन खंडणी म्हणून देऊ शकेल. या परिपूर्ण मानवाला यहोवाला एकनिष्ठ राहावं लागणार होतं आणि लोकांसाठी स्वतःचं जीवन स्वेच्छेने द्यावं लागणार होतं. (रोम. ५:१७-१९) सर्व सृष्टीत जो पहिला, त्या येशूचं जीवन यहोवाने स्वर्गातून पृथ्वीवर स्थलांतरित केलं. (योहा. १:१४) त्यामुळे आदामाप्रमाणेच येशूही एक परिपूर्ण मानव झाला. पण आदामाच्या अगदी उलट, परिपूर्ण मानवाकडून यहोवा ज्या अपेक्षा करतो त्या सर्वांचं येशूने पूर्णपणे पालन केलं. अगदी कठीण परीक्षाप्रसंगातही येशूने देवाचा एकही नियम मोडला नाही.

१६. खंडणी बलिदान ही एक अमूल्य भेट आहे असं आपण का म्हणू शकतो?

१६ एक परिपूर्ण मानव या नात्यानं दिलेल्या बलिदानामुळे येशू सर्व मानवांना पाप आणि मृत्यूपासून मुक्‍त करू शकतो. येशूने ते सर्व केलं जे आदाम करू शकत होता. येशू हा परिपूर्ण होता आणि अगदी पूर्णपणे देवाला एकनिष्ठ आणि आज्ञाधारक राहिला. (१ तीम. २:६) तो आपल्यासाठी मेला, आणि त्याच्या बलिदानामुळे सर्व माणसांना, स्त्रियांना आणि मुलांना सदासर्वकाळ जगण्याची संधी उपलब्ध झाली आहे. (मत्त. २०:२८) येशूच्या खंडणी बलिदानामुळे एका अर्थी देवाच्या उद्देशाचा बंद असलेला दरवाजा उघडला गेला.—२ करिंथ. १:१९, २०.

आपल्याला यहोवाकडे पुन्हा येता यावं, यासाठी त्याने स्वतः दरवाजा उघडला आहे

१७. खंडणीमुळे काय शक्य झालं?

१७ यहोवाने खंडणी बलिदानाची जी तरतूद केली त्यासाठी त्याला स्वतःला फार मोठी किंमत मोजावी लागली. (१ पेत्र १:१९) यहोवा देव आपल्याला खूप मौल्यवान लेखतो, त्यामुळेच त्याने त्याच्या एकुलत्या एका पुत्राला आपल्यासाठी बलिदान म्हणून अर्पण केलं. (१ योहा. ४:९, १०) आणि एका अर्थाने पहिला मानव आदाम याऐवजी येशू आपला पिता झाला. (१ करिंथ. १५:४५) येशूने आपल्याला फक्‍त सार्वकालिक जीवन मिळवण्याची संधी दिली नाही, तर देवाच्या कुटुंबाचा भाग होण्याची संधीदेखील दिली आहे. येशूने दिलेल्या खंडणी बलिदानामुळे मानवजात पुन्हा एकदा परिपूर्ण होऊ शकेल. तसंच स्वतःच्या स्तरांविरुद्ध न जाता यहोवा पुन्हा मानवजातीला त्याच्या कुटुंबामध्ये सामील करू शकेल. जेव्हा यहोवाला एकनिष्ठ राहिलेले त्याचे सर्व विश्‍वासू सेवक परिपूर्ण होतील, तेव्हा तो काळ खरंच किती चांगला असेल! मग शेवटी स्वर्गातील व पृथ्वीवरील सर्व जण एकाच कुटुंबाचा भाग बनतील आणि आपण सर्व जण देवाची मुलं होऊ.—रोम. ८:२१.

१८. यहोवा “सर्वांना सर्वकाही” केव्हा होईल?

१८ पहिल्या मानवी जोडप्याने जरी यहोवाला नाकारलं, तरी यहोवाने मात्र मानवजातीवर असलेलं आपलं प्रेम कमी होऊ दिलं नाही. त्याने त्यांच्यासाठी खंडणी बलिदानाची तरतूद केली. आपण अपरिपूर्ण असलो तरीही यहोवाला एकनिष्ठ राहू शकतो, आणि असं करण्यापासून सैतान आपल्याला रोखू शकत नाही. तसंच खंडणी बलिदानाच्या आधारावर भविष्यात यहोवा आपल्याला पूर्णपणे नीतिमान होण्यास मदत करेल. कल्पना करा “जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्‍वास ठेवतो” त्या प्रत्येकाला जेव्हा सार्वकालिक जीवन प्राप्त होईल, तेव्हा ते जीवन खरंच किती सुंदर असेल! (योहा. ६:४०) आपला बुद्धिमान आणि प्रेमळ पिता त्याचा उद्देश पूर्ण करेल आणि अपरिपूर्ण असलेल्या मानवजातीला परिपूर्ण होण्यास मदत करेल. त्यानंतर यहोवा “सर्वांना सर्वकाही” होईल.—१ करिंथ. १५:२८.

१९. (क) खंडणी बलिदानासाठी असलेली कदर आपल्याला काय करण्यास प्रेरित करते? (“योग्य अशा लोकांना शोधत राहा” ही चौकट पाहा.) (ख) पुढील लेखात आपण काय पाहणार आहोत?

१९ खंडणी बलिदानासाठी आपण मनापासून कदर बाळगतो, आणि ही कदर आपल्याला देवाकडून मिळालेल्या या अनमोल भेटीबद्दल इतरांना सांगण्यास प्रेरित करते. लोकांना ही गोष्ट समजणं गरजेचं आहे की, यहोवाने प्रेमळपणे खंडणीची तरतूद करून संपूर्ण मानवजातीसाठी सदासर्वकाळ जगण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. पण खंडणी बलिदानामुळे फक्‍त सदासर्वकाळ जगण्याची संधीच उपलब्ध झालेली नाही, तर यामुळे एदेन बागेमध्ये सैतानाने जे वादविषय उपस्थित केले होते त्यालादेखील चोख उत्तर मिळालं आहे. यांविषयी आपण पुढील लेखामध्ये पाहू.

एक यहोवाचा साक्षीदार स्मारकविधीचं आमंत्रण देताना

‘योग्य अशा लोकांना शोधत राहा’

दरवर्षी संपूर्ण जगभरात यहोवाचे साक्षीदार लाखो लोकांना स्मारकविधीसाठी आमंत्रित करत असतात. मागच्या वर्षी आपण ४४ कोटी आमंत्रण पत्रिका ५३० पेक्षा जास्त भाषांमध्ये छापल्या होत्या. या वर्षीच्या स्मारकविधीच्या कार्यक्रम पत्रिकांच्या काही प्रती अजूनही तुमच्याकडे शिल्लक आहेत का? तुम्ही स्मारकविधीच्या आधी या पत्रिकांचं वाटप करू शकता का? कदाचित या आमंत्रण पत्रिकेमुळे एखाद्या आस्थेवाईक व्यक्‍तीला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची संधी मिळेल.—मत्त. १०:११.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा