वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w10 ४/१ पृ. ६-७
  • येशूने देवाबद्दल काय शिकवले?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • येशूने देवाबद्दल काय शिकवले?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्ही येशूला प्रार्थना करावी का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • पित्याला प्रगट करण्यास पुत्र उत्सुक आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • देव आणि येशू ख्रिस्त यांच्याबद्दल अचूक माहिती
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२०
  • आपण येशूला प्रार्थना करावी का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
w10 ४/१ पृ. ६-७

येशूने देवाबद्दल काय शिकवले?

“पुत्रच फक्‍त पित्याला चांगल्या प्रकारे ओळखतो. इतरांनीही पित्याला ओळखावे म्हणून त्याच्याविषयी इतरांना सांगण्याची पुत्राची इच्छा आहे.”—लूक १०:२२, कन्टेंप्ररी इंग्लिश व्हर्शन.

देवाचा ज्येष्ठ पुत्र, पृथ्वीवर येण्याआधी स्वर्गात आपल्या पित्यासोबत अगणित काळापासून होता. (कलस्सैकर १:१५) त्यामुळे त्याला आपल्या पित्याचे विचार, त्याच्या भावना, त्याचे मार्ग अगदी चांगल्या प्रकारे माहीत होते. हा पुत्र पृथ्वीवर येशू म्हणून आला तेव्हा आपल्या पित्याची लोकांना ओळख करून देण्यास तो उत्सुक होता. त्यामुळे या पुत्राला देवाविषयी जे काही सांगायचे आहे ते लक्ष देऊन ऐकल्यावर आपणही देवाविषयी पुष्कळ काही शिकू शकतो.

देवाचे नाव येशूने यहोवा, या देवाच्या नावाला खूप महत्त्व दिले. लोकांना आपल्या पित्याचे नाव माहीत होऊन त्यांनी त्याचा उपयोग करावा, अशी यहोवाच्या या पुत्राची इच्छा होती. स्वतः येशूच्या नावाचा अर्थ “यहोवाकडून तारण आहे” असा होतो. येशूने स्वतःच्या मृत्यूच्या आदल्या रात्री यहोवाला प्रार्थनेत असे म्हटले: “मी तुझे नाव त्यांस कळविले आहे.” (योहान १७:२६) येशूने देवाच्या नावाचा उपयोग केला आणि ते लोकांनाही सांगितले. त्याने असे केले नसते तर लोकांना यहोवाविषयीचे सत्य, त्याच्या नावाचा अर्थ काय होतो हे कसे काय समजले असते बरे?a

देवाचे महान प्रेम येशूने देवाला एकदा प्रार्थना करताना असे म्हटले: “माझ्या बापा, . . . जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीति केली.” (योहान १७:२४) स्वर्गात असताना येशूने देवाचे प्रेम अनुभवले असल्यामुळे, पृथ्वीवर आल्यावर त्याने या प्रेमाचे इतर अनेक सुंदर पैलू लोकांसमोर प्रकट करण्याचा प्रयत्न केला.

यहोवाचे प्रेम खूप मोठे आहे, हे येशूने दाखवून दिले. त्याने म्हटले: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१६) या वचनात, ‘जग’ असे ज्याचे भाषांतर करण्यात आले आहे त्या ग्रीक शब्दाचा अर्थ “पृथ्वी” असा होत नाही. तर मानव किंवा मानवजात असा होतो. देवाने मानवजातीवर इतके प्रेम केले, की विश्‍वासू मानवांना पाप आणि मृत्यूच्या विळख्यातून सोडवण्याकरता तसेच अनंतकाळ जीवनाची आशा मिळण्याकरता त्याने त्याच्या सर्वात लाडक्या पुत्राचे अर्पण दिले. देवाच्या या महान प्रेमाची रुंदी आपल्याला कधीही मोजता येणार नाही किंवा त्याची खोली पूर्णार्थाने कधीही कळणार नाही.—रोमकर ८:३८, ३९.

येशूने एका सांत्वनदायक सत्याची पुष्टी दिली: यहोवा त्याच्या प्रत्येक उपासकावर अतोनात प्रेम करतो. तो एका प्रेमळ मेंढपाळासारखा आहे ज्याला त्याचे प्रत्येक मेंढरू वेगळे व मौल्यवान वाटते, असे येशूने लोकांना शिकवले. (मत्तय १८:१२-१४) भूमीवर पडलेली एकही चिमणी यहोवाच्या नजरेतून सुटत नाही, “तुमच्या डोक्यावरले सर्व केस देखील मोजलेले आहेत,” असे येशूने म्हटले. (मत्तय १०:२९-३१) घरट्यातील एक चिमणी दिसत नाही याची दखल जर यहोवा घेतो तर त्याच्या प्रत्येक उपासकाकडे तो लक्ष देणार नाही का? आपल्या डोक्यावरचे सर्व केस यहोवा मोजू शकतो तर आपल्याबद्दलची कोणतीही गोष्ट, मग त्या आपल्या गरजा असोत, आपल्याला तोंड द्याव्या लागणाऱ्‍या परीक्षा असोत अथवा आपल्या चिंता असोत, त्या त्याला माहीत नसाव्यात का?

स्वर्गीय पिता आपण आधीच्या लेखात पाहिले, की येशू देवाचा एकुलता एक पुत्र आहे. त्यामुळे, या प्रिय पुत्राने यहोवाविषयी बोलताना अनेकदा त्याला ‘माझा पिता’ असे संबोधले. खरेतर, येशू फक्‍त १२ वर्षांचा असताना, मंदिरात त्याने काढलेल्या उद्‌गारांत तो यहोवाला ‘माझा पिता’ असे संबोधल्याचा पहिला लिखित अहवाल आहे. (लूक २:४९) शुभवर्तमान अहवालांत, “पिता” हा शब्द जवळजवळ १९० वेळा आलेला आहे. येशूने यहोवाला कधी, ‘तुमचा पिता,’ ‘आमचा पिता,’ तर कधी ‘माझा पिता’ असे म्हटले. (मत्तय ५:१६; ६:९; ७:२१) यहोवाबद्दल असे आपुलकीचे उद्‌गार काढण्याद्वारे येशूने दाखवून दिले, की पापी व अपरिपूर्ण मानवही यहोवाबरोबर घनिष्ठ व भरवशाची मैत्री जोडू शकतात.

दयाळू व क्षमाशील अपरिपूर्ण मानवांना यहोवाच्या विपुल दयेची खूप गरज आहे हे येशूला माहीत होते. उधळ्या पुत्राच्या दृष्टांतात येशूने यहोवाची तुलना एका प्रेमळ व क्षमाशील पित्याशी केली जो आपल्या पश्‍चात्तापी पुत्राला जवळ घेण्यासाठी आपले दोन्ही हात पसरून उभा आहे. (लूक १५:११-३२) येशूच्या या शब्दांवरून आपल्याला ही खात्री मिळते, की एखाद्या पापी मानवाला क्षमा करण्याची संधी मिळावी म्हणून त्याने पश्‍चात्तापी मनोवृत्ती दाखवावी याची यहोवा वाट पाहत राहतो. मनापासून पश्‍चात्ताप करणाऱ्‍या व्यक्‍तीला क्षमा करण्यास यहोवा आतुर आहे. “त्याप्रमाणे ज्यांना पश्‍चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांबद्दल होणाऱ्‍या आनंदापेक्षा पश्‍चात्ताप करणाऱ्‍या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हाला सांगतो,” असे येशूने म्हटले. (लूक १५:७) अशा दयाळू देवाजवळ कोणाला यावेसे वाटणार नाही?

प्रार्थना ऐकणारा देव पृथ्वीवर येण्याआधी स्वर्गात असताना येशूने आपल्या डोळ्यांनी पाहिले होते, की यहोवा ‘प्रार्थना ऐकतो’ आणि आपल्या विश्‍वासू उपासकांनी केलेल्या प्रार्थनांनी तो संतुष्ट होतो. (स्तोत्र ६५:२) त्यामुळे, पृथ्वीवरील आपल्या सेवेदरम्यान येशूने आपल्या श्रोत्यांना प्रार्थना कशी करायची व कोणकोणत्या गोष्टींबद्दल करायची हे शिकवले. “तुम्ही प्रार्थना करिता तेव्हा . . . व्यर्थ बडबड करू नका,” असा त्याने सल्ला दिला. त्याने लोकांना अशी प्रार्थना करायला सांगितले, की “जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि” देवाच्या इच्छेप्रमाणे होवो. आपणही, दररोजच्या भाकरीसाठी, आपल्या पापांच्या क्षमेसाठी व मोहांचा प्रतिकार करण्यासाठी प्रार्थना करू शकतो. (मत्तय ६:५-१३) एक पिता जसे आपल्या मुलाच्या गरजा पूर्ण करतो तसे आपल्या सेवकांनी विश्‍वासाने केलेल्या प्रार्थनांचे यहोवा उत्तर देतो, असे येशूने शिकवले.—मत्तय ७:७-११.

येशूने लोकांना यहोवाबद्दल, तो कशा प्रकारचा देव आहे याबद्दलचे सत्य लोकांना शिकवण्याचा प्रयत्न केला. पण येशू यहोवाबद्दल आणखी काहीतरी सांगण्यास उत्सुक होता. पृथ्वी आणि मानव यांबद्दल असलेला देवाचा उद्देश पूर्ण करण्याकरता तो कोणत्या माध्यमाचा उपयोग करेल ज्याचा पृथ्वीवरील सर्व लोकांवर चांगला परिणाम घडेल याविषयी सांगण्यास येशू उत्सुक होता. आणि खरेतर, येशूने प्रचार केलेल्या संदेशाचा हाच तर मुख्य विषय होता! (w१०-E ०४/०१)

[तळटीप]

a बायबलच्या मूळ लिखाणात, यहोवा हे नाव सुमारे ७,००० वेळा आले आहे. त्याच्या नावाचा अर्थ, “मला जे व्हायचे असेल ते मी होईन,” असा होतो. (निर्गम ३:१४, NW) म्हणजे, देवाला आपला उद्देश पूर्ण करण्याकरता जे काही व्हावे लागेल ते तो होऊ शकतो. त्याच्या नावावरून ही खात्री मिळते, की देव नेहमीच स्वतःशी खरेपणाने वागेल आणि तो जे काही वचन देतो ते तो जरूर पूर्ण करेल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा