वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • bt अध्या. ३ पृ. २०-२७
  • “पवित्र शक्‍तीने भरून गेले”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “पवित्र शक्‍तीने भरून गेले”
  • देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “सगळे शिष्य एकाच घरात जमले होते” (प्रे. कार्यं २:१-४)
  • “प्रत्येक जण शिष्यांना आपल्या भाषेत बोलताना ऐकत होता” (प्रे. कार्यं २:५-१३)
  • “पेत्र . . . उभा राहिला” (प्रे. कार्यं २:१४-३७)
  • “तुमच्यापैकी प्रत्येकाने . . . बाप्तिस्मा घ्या” (प्रे. कार्यं २:३८-४७)
  • त्यांनी यहोवाच्या इच्छेची पूर्ती केली
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • ‘सर्व भाषा बोलणाऱ्‍या राष्ट्रांतील’ लोक सुवार्ता ऐकत आहेत
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • कोणाच्या व कशाच्या नावाने बाप्तिस्मा?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
अधिक माहिती पाहा
देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
bt अध्या. ३ पृ. २०-२७

अध्याय ३

“पवित्र शक्‍तीने भरून गेले”

पेन्टेकॉस्टच्या दिवशी शिष्यांवर पवित्र शक्‍ती ओतण्यात आली आणि त्याचे परिणाम

प्रे. कार्यं २:१-४७ वर आधारित

१. पेन्टेकॉस्टच्या सणाच्या दिवशी यरुशलेममध्ये कसं वातावरण होतं, त्याचं वर्णन करा.

यरुशलेमचे रस्ते आज गजबजलेले आहेत आणि सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे.a लेवी हालेल स्तोत्रं (स्तोत्रं ११३ ते ११८) गात असताना, मंदिराच्या वेदीवरून धूर आकाशात जात आहे. रस्त्यांवर, शहराबाहेरून आलेल्या लोकांची गर्दी आहे. ते एलाम, मेसोपटेम्या, कप्पदुकिया, पंत, इजिप्त आणि रोमb अशा दूरदूरच्या ठिकाणांहून आले आहेत. ते इथे कशासाठी आले आहेत? पेन्टेकॉस्टच्या सणासाठी. या सणाला ‘पहिलं पीक अर्पण करण्याचा दिवस’ असंही म्हटलं जायचं. (गण. २८:२६) इस्राएली लोक जवाची कापणी संपवून, गव्हाची कापणी सुरू करायचे त्या वेळी हा वार्षिक सण साजरा केला जायचा. हा त्यांच्यासाठी खूप आनंदाचा दिवस असायचा.

इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी ज्यांनी आनंदाचा संदेश ऐकला ते कोणत्या भागातून होते हे या नकाशात सांगितलंय. १. प्रदेश: लिबिया, इजिप्त, इथियोपिया, बिथुनिया, पंत, कप्पदुकिया, यहूदीया, मेसोपटेम्या, बॅबिलोनिया, एलाम, मेद आणि पार्थिया. २. शहरं: रोम, आलेक्सांद्रिया, मोफ, अंत्युखिया (सीरियाचं), यरुशलेम आणि बॅबिलॉन. ३. पाण्याची ठिकाणं: भूमध्य समुद्र, काळा समुद्र, तांबडा समुद्र, कास्पियन समुद्र आणि पर्शियन आखात.

यरुशलेम​—यहुदी धर्माचं केंद्रस्थान

प्रेषितांची कार्यं या पुस्तकाच्या पहिल्या काही अध्यायांतल्या घटना यरुशलेममध्ये घडल्या. भूमध्य सागराच्या पूर्वेकडे ५५ किलोमीटर अंतरावर असलेलं हे शहर यहूदीयाच्या मध्यभागी असलेल्या डोंगरांमध्ये आहे. इ.स.पू. १०७० मध्ये दावीद राजाने इथे असलेल्या सीयोन डोंगरावरचा गड जिंकला. त्यानंतर त्याच्या आजूबाजूला जे शहर झालं ते इस्राएल राष्ट्राची राजधानी बनलं.

सीयोन डोंगराच्या जवळच मोरिया डोंगर आहे. पूर्वीच्या यहुदी लोकांच्या मते, इथेच अब्राहाम इसहाकचा बळी देणार होता. ही घटना प्रेषितांची कार्यं या पुस्तकात सांगितलेल्या घटनांच्या सुमारे १,९०० वर्षांआधी घडली. जेव्हा शलमोनने मोरिया डोंगरावर यहोवासाठी पहिलं मंदिर बनवलं, तेव्हा तो डोंगरसुद्धा यरुशलेम शहराचा भाग बनला. यहुदी लोकांच्या जीवनात आणि उपासनेत या मंदिराचं महत्त्वाचं स्थान होतं.

यहोवाच्या या मंदिरात जगभरातून विश्‍वासू यहुदी लोक उपासनेसाठी, बलिदानं अर्पण करण्यासाठी आणि वार्षिक सणांसाठी नियमितपणे यायचे. देवाने त्यांना अशी आज्ञा दिली होती: “वर्षातून तीन वेळा, . . . तुमच्यातल्या सर्व पुरुषांनी, तुमचा देव यहोवा याने निवडलेल्या ठिकाणी त्याच्यासमोर जावं.” (अनु. १६:१६) यहुदी न्यायसभा (सन्हेद्रिन) म्हणजेच यहुदी लोकांचं उच्च न्यायालय आणि देशाचं प्रशासकीय मंडळ यरुशलेममध्येच होतं.

२. इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी कोणत्या चमत्कारिक घटना घडतात?

२ इ.स. ३३ चा हा एक दिवस आहे. नुकतीच उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे. सकाळी सुमारे ९ वाजता अशी एक घटना घडते ज्याबद्दल लोकांना पुढची अनेक शतकं आश्‍चर्य वाटत राहणार आहे. “अचानक आकाशातून सोसाट्याच्या वाऱ्‍यासारखा” किंवा “एका मोठ्या वादळासारखा” आवाज ऐकू येतो. (प्रे. कार्यं २:२; इंटरनॅशनल स्टॅन्डर्ड व्हर्शन) येशूचे १२० शिष्य ज्या घरात जमलेले असतात त्या घरात हा आवाज मोठ्याने घुमू लागतो. त्यानंतर एक चमत्कार होतो. जिभेच्या आकाराच्या, अग्नीसारख्या ज्वाला दिसतात आणि प्रत्येक शिष्याच्या डोक्यावर एकएक ज्वाला येऊन थांबते.c त्यानंतर हे शिष्य “पवित्र शक्‍तीने भरून” जातात आणि विदेशी भाषांमध्ये बोलू लागतात! शिष्य घरातून बाहेर पडतात आणि रस्त्यांवर इतर ठिकाणांहून आलेल्या लोकांना भेटतात, तेव्हा त्या लोकांना खूप आश्‍चर्य होतं कारण हे शिष्य त्यांच्या भाषेत त्यांच्याशी बोलतात. प्रत्येक जण त्यांना “आपल्या भाषेत बोलताना” ऐकतो.​—प्रे. कार्यं २:१-६.

३. (क) इ.स. ३३ चा पेन्टेकॉस्ट खऱ्‍या उपासनेच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा होता असं का म्हणता येईल? (ख) पेत्रच्या भाषणाचा स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या वापरण्याशी काय संबंध होता?

३ ही लक्षवेधी घटना खऱ्‍या उपासनेच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा होता. या घटनेने आध्यात्मिक इस्राएल हे नवीन राष्ट्र, म्हणजेच अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांची मंडळी स्थापन झाली. (गलती. ६:१६) पण पुढे अजूनही काही घडणार होतं. त्या दिवशी जेव्हा पेत्रने जमलेल्या लोकांसमोर भाषण दिलं, तेव्हा त्याने स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्यांपैकी पहिली किल्ली वापरली. प्रत्येक किल्लीमुळे एका वेगळ्या गटाला खास बहुमान मिळणार होते. (मत्त. १६:१८, १९) पहिल्या किल्लीमुळे, यहुदी आणि यहुदी धर्म स्वीकारलेल्या लोकांना आनंदाच्या संदेशाचा स्वीकार करण्याची आणि देवाच्या पवित्र शक्‍तीने अभिषिक्‍त होण्याची संधी मिळाली.d यामुळे ते आध्यात्मिक इस्राएलचा भाग बनले आणि त्यांना मसीहाच्या राज्यात राजे आणि याजक बनण्याची आशा मिळाली. (प्रकटी. ५:९, १०) काही काळानंतर हा सन्मान शोमरोनी आणि पुढे विदेशी लोकांनाही मिळणार होता. इ.स. ३३ च्या दिवशी घडलेल्या या अद्‌भुत घटनांवरून आजचे ख्रिस्ती काय शिकू शकतात?

“सगळे शिष्य एकाच घरात जमले होते” (प्रे. कार्यं २:१-४)

४. आजच्या दिवसांतल्या ख्रिस्ती मंडळीची सुरुवात इ.स. ३३ मध्ये झाली असं आपण का म्हणू शकतो?

४ ख्रिस्ती मंडळीची सुरुवात १२० शिष्यांनी झाली. ते “सगळे शिष्य एकाच घरात,” माडीवरच्या खोलीत “जमले होते.” त्या सर्वांना पवित्र शक्‍तीने अभिषिक्‍त करण्यात आलं होतं. (प्रे. कार्यं २:१) त्याच दिवशी या मंडळीत बाप्तिस्मा घेतलेल्यांची संख्या हजारांच्या घरात गेली. पण ही फक्‍त सुरुवात होती! त्या दिवशी सुरू झालेल्या संघटनेची आजही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. ही संघटना, म्हणजेच आजच्या दिवसांतली ख्रिस्ती मंडळी, देवाचं भय मानणाऱ्‍या स्त्री-पुरुषांनी मिळून बनली आहे. आणि अंत येण्याआधी “सगळ्या राष्ट्रांना साक्ष मिळावी म्हणून,” याच संघटनेद्वारे आज देवाच्या राज्याचा “आनंदाचा संदेश संपूर्ण जगात घोषित केला” जात आहे.​—मत्त. २४:१४.

५. ख्रिस्ती मंडळीद्वारे तिच्या सदस्यांना पहिल्या शतकात, तसंच आजही कोणकोणते आशीर्वाद मिळणार होते?

५ ख्रिस्ती मंडळीद्वारे तिच्या सदस्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन आणि प्रोत्साहनही मिळणार होतं. या सदस्यांमध्ये अभिषिक्‍त बांधवांचा आणि नंतर दुसऱ्‍या मेंढरांतल्या बांधवांचा समावेश झाला. (योहा. १०:१६) रोममधल्या ख्रिश्‍चनांना पत्र लिहिताना पौलने, मंडळीतले बांधव एकमेकांना करत असलेल्या मदतीबद्दल कदर व्यक्‍त केली. तो म्हणाला, “तुम्हाला भेटायची माझी फार इच्छा आहे. म्हणजे, तुम्हाला देवाकडून असलेली एखादी देणगी देऊन मला तुमचा विश्‍वास मजबूत करता येईल. किंवा एकमेकांच्या विश्‍वासामुळे, म्हणजेच माझ्या आणि तुमच्या विश्‍वासामुळे आपल्याला एकमेकांना प्रोत्साहन देता येईल.”​—रोम. १:११, १२.

रोम​—एका साम्राज्याची राजधानी

प्रेषितांची कार्यं पुस्तकात वर्णन केलेल्या काळात, रोमन साम्राज्याची राजधानी असलेलं रोम, हे तेव्हाचं सर्वात मोठं आणि राजकीय दृष्टीने सर्वात महत्त्वाचं शहर होतं. रोमन साम्राज्य यशाच्या शिखरावर होतं, तेव्हा ते ब्रिटनपासून उत्तर आफ्रिकेपर्यंत आणि अटलांटिक महासागरापासून पर्शियन आखातापर्यंत पसरलं होतं.

रोममध्ये अनेक संस्कृतींचे, वंशांचे आणि अनेक भाषा बोलणारे लोक राहायचे. त्यांच्यात वेगवेगळ्या प्रकारचे अंधविश्‍वास होते. शहराला जोडणारे रस्ते चांगल्या स्थितीत असल्यामुळे अनेक प्रवासी आणि व्यापारी वेगवेगळ्या वस्तू घेऊन साम्राज्याच्या कानाकोपऱ्‍यांतून इथे यायचे. शहराजवळ असलेल्या ऑस्टिया बंदरात अनेक जहाजांची ये-जा सुरू असायची. या जहाजांतून रोम शहरासाठी बऱ्‍याच मौल्यवान वस्तू आणि खाद्यपदार्थ आणले जायचे.

इ.स. पहिल्या शतकात दहा लाखांपेक्षा जास्त लोक रोममध्ये राहायचे. त्यांतले अर्धे लोक गुलाम होते. यांत शिक्षा झालेले गुलाम, आईवडिलांनी विकलेली किंवा टाकून दिलेली मुलं, तसंच रोमन सैन्याने लढाईत कैद केलेल्या लोकांचा समावेश होता. या गुलामांमध्ये यरुशलेममधून आणलेले यहुदी लोकही होते. इ.स.पू. ६३ मध्ये रोमन सेनापती पॉम्पे याने यरुशलेमवर विजय मिळवल्यावर त्यांना कैद करून इथे आणण्यात आलं होतं.

शहरातल्या स्वतंत्र नागरिकांपैकी बहुतेक जण खूप गरीब होते. ते गजबजलेल्या वस्त्यांमध्ये अनेक मजल्यांच्या इमारतींत राहायचे आणि सरकारकडून मिळणाऱ्‍या आर्थिक मदतीवर अवलंबून असायचे. पण रोमन सम्राटांनी मात्र जगात कुठेही नव्हत्या अशा अनेक सुंदर इमारती या शहरात बांधल्या. जसं की, नाट्यगृहं आणि मोठमोठे स्टेडियम. यांमध्ये नाटकं, माणसांमधले किंवा हिंसक प्राण्यांशी केलेले सामने आणि रथांच्या शर्यती ठेवल्या जायच्या. हे सर्व सामान्य लोकांच्या मनोरंजनासाठी मोफत आयोजित केलं जायचं.

६, ७. सर्व राष्ट्रांना प्रचार करण्याची येशूने दिलेली कामगिरी आजची ख्रिस्ती मंडळी कशी पूर्ण करत आहे?

६ पहिल्या शतकाप्रमाणे आजही ख्रिस्ती मंडळीचे तेच उद्देश आहेत. येशूने त्याच्या शिष्यांना एक असं काम दिलं जे मुळात सोपं नसलं, तरी खूप आनंद देणारं आहे. तो म्हणाला: “सगळ्या राष्ट्रांच्या लोकांना शिष्य करा आणि त्यांना पित्याच्या, मुलाच्या आणि पवित्र शक्‍तीच्या नावाने बाप्तिस्मा द्या, आणि मी तुम्हाला आज्ञा दिलेल्या सगळ्या गोष्टी त्यांना पाळायला शिकवा.”​—मत्त. २८:१९, २०.

७ आज यहोवाच्या साक्षीदारांच्या ख्रिस्ती मंडळीद्वारे हे काम पूर्ण केलं जात आहे. वेगवेगळ्या भाषांच्या लोकांपर्यंत राज्याचा संदेश पोहोचवणं जरी कठीण असलं, तरी आज यहोवाचे साक्षीदार १,००० पेक्षा जास्त भाषांमध्ये बायबल आधारित साहित्य प्रकाशित करत आहेत. जर तुम्ही ख्रिस्ती मंडळीच्या सभांमध्ये नियमितपणे उपस्थित राहत असाल, आणि प्रचार करण्याच्या व शिष्य बनवण्याच्या कामात उत्साहाने भाग घेत असाल, तर ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. कारण, तुम्ही पृथ्वीवरच्या अशा फार कमी लोकांपैकी आहात, ज्यांना यहोवाच्या नावाबद्दल साक्ष देण्याचा सन्मान मिळाला आहे!

८. मंडळीमुळे आपल्याला कशी मदत होते?

८ आजच्या कठीण काळाचा सामना करताना, आपल्याला आनंदाने यहोवाची सेवा करता यावी, म्हणून त्याने आपल्याला जगभरात पसरलेलं एक मोठं कुटुंब दिलं आहे. पौलने इब्री ख्रिश्‍चनांना असं लिहिलं: “एकमेकांचा विचार करून आपण प्रेम आणि चांगली कार्यं करण्यासाठी एकमेकांना उत्तेजन देऊ या. तसंच, काहींची रीत आहे त्याप्रमाणे आपण एकत्र येणं सोडू नये, तर एकमेकांना प्रोत्साहन देत राहावं आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचं आपण पाहतो, तसतसं हे आणखी जास्त करावं.” (इब्री १०:२४, २५) ख्रिस्ती मंडळी ही यहोवाने केलेली अशी व्यवस्था आहे, ज्यामुळे तुम्ही दुसऱ्‍यांना प्रोत्साहन देऊ शकता आणि तुम्हालाही प्रोत्साहन मिळू शकतं. तेव्हा आपल्या आध्यात्मिक भाऊबहिणींशी जवळचं नातं ठेवा आणि ख्रिस्ती सभांमध्ये उपस्थित राहण्याचं कधीच सोडू नका.

“प्रत्येक जण शिष्यांना आपल्या भाषेत बोलताना ऐकत होता” (प्रे. कार्यं २:५-१३)

येशूचे शिष्य गजबजलेल्या रस्त्यावर यहुदी आणि यहुदी धर्म स्वीकारलेल्या लोकांना प्रचार करत आहेत.

“आपण सगळे त्यांना आपल्या भाषांमध्ये देवाच्या अद्‌भुत गोष्टींबद्दल बोलताना ऐकतोय.”​—प्रे. कार्यं २:११

९, १०. काही जण कशा प्रकारे दुसरी भाषा बोलणाऱ्‍या लोकांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत?

९ इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या यहुद्यांना आणि यहुदी धर्म स्वीकारलेल्या लोकांना किती आनंद आणि आश्‍चर्य वाटलं असेल याची कल्पना करा. त्यांच्यापैकी बहुतेक जणांना कदाचित ग्रीक किंवा हिब्रू भाषा बोलता येत असेल. पण आता त्यांच्यापैकी “प्रत्येक जण शिष्यांना आपल्या भाषेत बोलताना ऐकत होता.” (प्रे. कार्यं २:६) स्वतःच्या मातृभाषेत आनंदाचा संदेश ऐकायला मिळाला, तेव्हा नक्कीच त्या संदेशाने त्यांच्या हृदयाला स्पर्श केला असेल. आज ख्रिश्‍चनांजवळ विदेशी भाषा बोलण्याची अद्‌भुत शक्‍ती नाही. पण तरीसुद्धा, त्यांच्यापैकी बरेच जण वेगवेगळ्या देशांच्या आणि भाषांच्या लोकांपर्यंत राज्याचा संदेश पोहोचवण्यासाठी पुढे आले आहेत. त्यांनी हे कसं केलं आहे? आपल्या मंडळीच्या जवळपास असलेल्या एखाद्या विदेशी भाषेच्या मंडळीत सेवा करता यावी किंवा दुसऱ्‍या देशात जाऊन सेवा करता यावी म्हणून काहींनी नवीन भाषा शिकून घेतली आहे. नवीन भाषा शिकण्यासाठी ते किती मनापासून प्रयत्न करत आहेत हे पाहून बऱ्‍याच लोकांना त्यांचं खूप कौतुक वाटतं.

१० क्रिस्टीनचंच उदाहरण घ्या. तिने आणखी सात साक्षीदारांसोबत, गुजराती भाषेचा कोर्स केला. तिच्या कामाच्या ठिकाणी एक गुजराती बोलणारी तरुण मुलगी तिला भेटली, तेव्हा ती त्या मुलीशी गुजरातीत बोलली. त्या मुलीला याचं फार आश्‍चर्य वाटलं आणि ‘तू गुजरातीसारखी कठीण भाषा शिकण्यासाठी एवढी मेहनत का घेतेस?’ असं तिने क्रिस्टीनला विचारलं. यामुळे क्रिस्टीनला, तिला चांगल्या प्रकारे साक्ष देण्याची संधी मिळाली. तेव्हा ती मुलगी क्रिस्टीनला म्हणाली: “नक्कीच तुमच्याजवळ लोकांना सांगण्यासाठी खूप महत्त्वाची माहिती असेल.”

११. दुसऱ्‍या भाषेतल्या लोकांना राज्याचा संदेश सांगण्यासाठी आपण कसं तयार राहू शकतो?

११ साहजिकच, नवीन भाषा शिकणं आपल्या सर्वांनाच जमणार नाही. तरी, आधीपासूनच थोडी तयारी केली, तर आपणही इतर भाषा बोलणाऱ्‍या लोकांना राज्याचा संदेश सांगू शकतो. तो कसा? याचा एक मार्ग म्हणजे JW लँग्वेज  ॲपचा वापर करून तुमच्या क्षेत्रात जी भाषा सहसा बोलली जाते, त्या भाषेत प्रस्तावनेसाठी काही वाक्यं शिकून घेणं. ती भाषा बोलणाऱ्‍या व्यक्‍तीची आवड वाढेल अशी वाक्यंही तुम्ही शिकून घेऊ शकता. तसंच, jw.org या वेबसाईटवर त्यांच्या भाषेत असलेले वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आणि प्रकाशनं तुम्ही त्यांना दाखवू शकता. या साधनांचा वापर करून पहिल्या शतकातल्या आपल्या भाऊबहिणींसारखा आनंद आपल्याला अनुभवता येईल. त्या वेळी विदेशी राष्ट्रांमधून आलेल्या प्रत्येकाने त्यांना ‘आपल्या भाषेत बोलताना ऐकलं होतं.’

मेसोपटेम्या आणि इजिप्तमध्ये राहणारे यहुदी

येशू ख्रिस्ताच्या काळातल्या यहुदी लोकांचा इतिहास  (इ.स.पू. १७५ ते इ.स. १३५) या जर्मन ग्रंथात असं म्हटलं आहे: “मेसोपटेम्या, मेद आणि बॅबिलोनिया इथे [इस्राएलच्या] दहा वंशांच्या राज्यातल्या आणि यहूदाच्या राज्यातल्या लोकांचे वंशज राहायचे. एकेकाळी त्यांना अश्‍शूरी आणि बॅबिलोनी लोकांनी तिथे हाकलून लावलं होतं.” एज्रा २:६४ मध्ये सांगितल्याप्रमाणे फक्‍त ४२,३६० इस्राएली लोक बाबेलच्या बंदिवासातून यरुशलेमला परत आले होते. ही घटना इ.स.पू. ५३७ मध्ये घडली. फ्लेवियस जोसिफस या इतिहासकाराने म्हटलं की इ.स. पहिल्या शतकात “बॅबिलोनियाच्या आसपास राहणाऱ्‍या” यहुद्यांची संख्या लाखांमध्ये होती. इ.स. तिसऱ्‍या ते पाचव्या शतकांमध्ये या यहुदी लोकांनी बॅबिलोनियन तालमूद हा ग्रंथ तयार केला.

यहुदी लोक इजिप्तमध्येही जवळजवळ इ.स.पू. सहाव्या शतकात होते याचा लेखी पुरावा सापडला आहे. या काळात यिर्मयाने इजिप्तच्या वेगवेगळ्या भागांत राहणाऱ्‍या यहुदी लोकांसाठी एक संदेश दिला. या भागांमध्ये मेम्फिस या भागाचाही समावेश आहे. (यिर्म. ४४:१, तळटीप) ज्या काळात जगावर ग्रीक संस्कृतीचा प्रभाव होता त्या वेळी अनेक यहुदी इजिप्तमध्ये गेले असावेत. जोसिफसने म्हटलं की यहुदी लोक आलेक्सांद्रियाचे सर्वात पहिले रहिवासी होते. काही काळाने शहराचा एक संपूर्ण भाग त्यांना देण्यात आला. इ.स. पहिल्या शतकातला यहुदी लेखक फायलो असं म्हणाला की, त्याचे जवळजवळ दहा लाख देशबांधव इजिप्तमध्ये म्हणजे “लिबिया ते इथियोपिया देशाच्या सीमेपर्यंत राहायचे.”

“पेत्र . . . उभा राहिला” (प्रे. कार्यं २:१४-३७)

१२. (क) इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी घडलेल्या अद्‌भुत घटनेबद्दल योएल संदेष्ट्याने आधीच काय सांगितलं होतं? (ख) पहिल्या शतकात योएलची भविष्यवाणी पूर्ण होईल अशी अपेक्षा का केली जाऊ शकत होती?

१२ मग, बऱ्‍याच देशांतून आलेल्या त्या लोकांशी बोलण्यासाठी “पेत्र . . . उभा राहिला.” (प्रे. कार्यं २:१४) त्याने स्पष्ट केलं की वेगवेगळ्या भाषा बोलण्याची अद्‌भुत शक्‍ती देवानेच शिष्यांना दिली होती आणि या घटनेतून खरंतर योएल संदेष्ट्याने केलेली एक भविष्यवाणी पूर्ण झाली होती. योएलद्वारे देवाने असं सांगितलं होतं: “मी माझी पवित्र शक्‍ती सर्व प्रकारच्या माणसांवर ओतीन.” (योए. २:२८) येशूने स्वर्गात परत जाण्याआधी आपल्या शिष्यांना असं सांगितलं होतं: “मी पित्याला विनंती करीन आणि तो . . . तुम्हाला आणखी एक सहायक देईल.” हा सहायक म्हणजे देवाची “पवित्र शक्‍ती” असल्याचं येशूने सांगितलं.​—योहा. १४:१६, १७.

१३, १४. पेत्रने कशा प्रकारे लोकांच्या मनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, आणि आपण त्याचं अनुकरण कसं करू शकतो?

१३ पेत्रने आपल्या भाषणाच्या शेवटी जमलेल्या लोकांना स्पष्टपणे सांगितलं: “इस्राएलच्या संपूर्ण घराण्याने हे पक्कं ओळखावं, की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर ठार मारलं त्याला देवाने प्रभू आणि ख्रिस्त केलंय.” (प्रे. कार्यं २:३६) ही गोष्ट खरी होती की जमलेल्या लोकांपैकी बहुतेक जण, येशूला ठार मारण्यात आलं तेव्हा तिथे स्वतः हजर नव्हते. तरीही ते यहुदी राष्ट्राचे सदस्य असल्यामुळे काही प्रमाणात तेही या कृत्याला जबाबदार होते. पण असं असूनही पेत्र त्यांच्याशी आदराने बोलला आणि त्याने त्यांना मनापासून विचार करायला लावलं. त्याला त्या लोकांना दोषी ठरवायचं नव्हतं, तर त्यांनी पश्‍चात्ताप करावा अशी त्याची इच्छा होती. जमलेले लोक पेत्रचं भाषण ऐकून रागावले का? नक्कीच नाही. उलट पेत्रचे शब्द त्यांच्या ‘जिव्हारी लागले.’ त्यांनी त्याला विचारलं: “आम्ही काय करू?” पेत्र त्यांच्याशी आदराने बोलल्यामुळे तो अनेकांच्या मनापर्यंत पोचू शकला आणि त्यांनी पश्‍चात्ताप केला.​—प्रे. कार्यं २:३७.

१४ पेत्रप्रमाणेच आपणही लोकांना मनापासून विचार करायला लावण्याचा प्रयत्न करू शकतो. आपल्या प्रचारकार्यात कदाचित घरमालक असे विचार व्यक्‍त करतील, जे बायबलनुसार योग्य नाहीत; पण आपण त्यांचा प्रत्येक चुकीचा विचार लगेच सुधारण्याची गरज नाही. याऐवजी आपण अशा मुद्द्‌यांवर बोलू शकतो जे दोघांनाही पटतात. दोघांचंही एकमत आहे अशा मुद्दयांवर आपण बोललो, तर आपण त्यांच्या भावना न दुखावता त्यांच्याशी देवाच्या वचनावर चर्चा करू शकतो. आपण वाद होईल अशा पद्धतीने न बोलता आदराने बायबलमधलं सत्य सांगतो, तेव्हा नम्र मनाचे लोक सहसा चांगल्या प्रकारे आपलं बोलणं ऐकून घेतात.

पंतमधले ख्रिस्ती

ज्या लोकांनी इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टला पेत्रचं भाषण ऐकलं, त्यांच्यामध्ये आशिया मायनरच्या उत्तरेकडच्या पंत जिल्ह्यातले यहुदीसुद्धा होते. यांच्यापैकी काहींनी आनंदाचा संदेश आपल्या देशात नेला असावा. पेत्रने आपलं पहिलं पत्र पंतसारख्या ठिकाणांमध्ये “विखुरलेल्या” ख्रिश्‍चनांना उद्देशून लिहिलं.g (१ पेत्र १:१) त्याच्या पत्रावरून कळतं, की हे ख्रिस्ती “वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांमुळे दुःख” सोसत होते. (१ पेत्र १:६) कदाचित त्यांच्या विश्‍वासामुळे त्यांना विरोध आणि छळाचा सामना करावा लागत होता.

बिथुनिया आणि पंत या रोमन प्रांताचा राज्यपाल असलेला धाकटा प्लिनी आणि सम्राट ट्रेजन यांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रांतून आपल्याला पंतमधल्या ख्रिश्‍चनांवर आणखी कोणत्या परीक्षा आल्या हे कळतं. पंत इथून इ.स. ११२ मध्ये लिहिलेल्या पत्रात प्लिनी म्हणतो, की ख्रिस्ती विश्‍वास हा “साथीच्या रोगासारखा” आहे आणि याचा धोका स्त्री-पुरुष, लहान-मोठे आणि समाजातल्या सर्वांनाच आहे. ज्यांच्यावर ख्रिस्ती असल्याचा आरोप होता त्यांना प्लिनी आपला धर्म नाकारण्याची संधी द्यायचा. जे असं करायला नकार द्यायचे त्यांना मृत्युदंड दिला जायचा. जे ख्रिस्ताला शाप द्यायचे किंवा दुसऱ्‍या देवीदेवतांसमोर किंवा ट्रेजनच्या पुतळ्यासमोर प्रार्थना करायचे त्यांची सुटका केली जायची. प्लिनीने ही गोष्ट मान्य केली की “जे खरोखर ख्रिस्ती आहेत ते काहीही केलं तरी या गोष्टी करायला तयार होत नाहीत.”

g ज्या ग्रीक शब्दाचं “विखुरलेल्या” असं भाषांतर करण्यात आलं आहे, तो पॅलेस्टाईनबाहेर वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्‍या यहुदी लोकांसाठी वापरला जायचा. यावरून हे दिसतं की पंतमध्ये सर्वात आधी ख्रिस्ती झालेले बरेच लोक यहुदी वंशाचे होते.

“तुमच्यापैकी प्रत्येकाने . . . बाप्तिस्मा घ्या” (प्रे. कार्यं २:३८-४७)

१५. (क) पेत्र काय म्हणाला आणि त्याचा काय परिणाम झाला? (ख) पेन्टेकॉस्टच्या दिवशी ज्या हजारो लोकांनी आनंदाचा संदेश ऐकला, ते त्याच दिवशी बाप्तिस्मा का घेऊ शकले?

१५ इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या त्या अविस्मरणीय दिवशी पेत्र नम्र मनाच्या यहुदी आणि यहुदी धर्म स्वीकारलेल्या लोकांना म्हणाला: “पश्‍चात्ताप करा आणि तुमच्यापैकी प्रत्येकाने . . . बाप्तिस्मा घ्या.” (प्रे. कार्यं २:३८) याचा परिणाम असा झाला, की यरुशलेममधल्या आणि आसपासच्या तळ्यांमध्ये जवळजवळ ३,००० लोकांनी बाप्तिस्मा घेतला.e त्या लोकांनी भावनांच्या आहारी जाऊन लगेच हा निर्णय घेतला होता का? आणि याचा अर्थ बायबल विद्यार्थ्यांनीही बाप्तिस्मा घेण्याची घाई केली पाहिजे का? तसंच, मुलांची तयारी होण्याआधीच त्यांनी बाप्तिस्मा घ्यावा अशी ख्रिस्ती पालकांनी घाई करावी का? नक्कीच नाही. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी ज्या यहुदी आणि यहुदी धर्म स्वीकारलेल्या लोकांचा बाप्तिस्मा झाला, त्यांना देवाच्या वचनाचं चांगलं ज्ञान होतं. तसंच ते यहोवाला समर्पित असलेल्या राष्ट्राचे भाग होते. शिवाय, त्यांना देवाच्या उपासनेसाठी आवेशही होता; त्यांच्यापैकी काही जण तर बराच लांबचा प्रवास करून या वार्षिक सणासाठी आले होते. देवाचा संकल्प पूर्ण होण्यामध्ये येशूची भूमिका काय आहे, याबद्दलचं सत्य स्वीकारल्यामुळे आता ते ख्रिस्ताचे  बाप्तिस्मा घेतलेले शिष्य म्हणून देवाची सेवा पुढेही करू शकणार होते.

यहुदी धर्म स्वीकारणारे कोण होते?

इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी पेत्रचं भाषण ऐकणाऱ्‍यांमध्ये “यहुदी आणि यहुदी धर्म स्वीकारलेले” लोकही होते.​—प्रे. कार्यं २:१०.

ज्या योग्य पुरुषांना रोजचं जेवण वाटण्याच्या “आवश्‍यक कामासाठी” नेमण्यात आलं होतं, त्यांत अंत्युखियाचा नीकलाव हासुद्धा होता. त्याला “यहुदी धर्म स्वीकारलेला” असं म्हणण्यात आलं आहे. (प्रे. कार्यं ६:३-५) यहुदी धर्म स्वीकारलेले लोक विदेशी होते, म्हणजेच ते मुळात यहुदी नव्हते. पण त्यांनी देवाचा आणि इस्राएली लोकांना दिलेल्या नियमशास्त्राचा स्वीकार केल्यामुळे; इतर सर्व देवी-देवतांची उपासना सोडून दिल्यामुळे; त्यांच्यातल्या पुरुषांनी सुंता केल्यामुळे आणि इस्राएल राष्ट्रात सामील झाल्यामुळे त्यांनाही यहुदीच समजलं जायचं.

इ.स.पू. ५३७ मध्ये जेव्हा यहुदी लोकांची बाबेलच्या बंदिवासातून सुटका करण्यात आली, तेव्हा बरेच यहुदी इस्राएलपासून दूर असलेल्या ठिकाणी राहायला गेले. पण तिथेही त्यांनी यहुदी धर्म पाळायचं सोडलं नाही. यामुळे प्राचीन काळातल्या मध्य पूर्वेकडच्या आणि त्याही पलीकडे राहणाऱ्‍या लोकांना यहुदी धर्माची ओळख झाली. जुन्या काळातले लेखक हॉरस आणि सेनेका यांनी लिहिलं, की वेगवेगळ्या देशांतले अनेक लोक यहुदी लोकांकडे आणि त्यांच्या विश्‍वासाकडे आकर्षित झाले आणि त्यांच्यात सामील झाले. हेच, यहुदी धर्म स्वीकारलेले लोक होते.

१६. पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांनी निःस्वार्थ वृत्ती कशी दाखवली?

१६ त्या लोकांवर खरोखरच यहोवाचा आशीर्वाद होता. अहवालात असं म्हटलं आहे: “ज्यांनी ज्यांनी विश्‍वास ठेवला असे सगळे जण सोबत असायचे आणि सगळ्या गोष्टी आपसात वाटून घ्यायचे. आणि ते आपल्या मालकीच्या वस्तू आणि जमिनी विकून, त्यातून मिळणारे पैसे ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे बांधवांमध्ये वाटायचे.”f (प्रे. कार्यं २:४४, ४५) खरंच, अशा प्रेमळ आणि निःस्वार्थ वृत्तीचं सर्व खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी अनुकरण केलं पाहिजे.

१७. बाप्तिस्मा घेण्यासाठी एका व्यक्‍तीने कोणती पावलं उचलली पाहिजेत?

१७ ख्रिस्ती समर्पण करण्याआधी आणि बाप्तिस्मा घेण्याआधी बायबल तत्त्वांवर आधारित काही खास पावलं उचलणं गरजेचं आहे. म्हणजे, एका व्यक्‍तीने देवाच्या वचनाचं ज्ञान घेतलं पाहिजे. (योहा. १७:३) तिने विश्‍वास दाखवणं आणि आधी केलेल्या चुकांबद्दल मनापासून वाईट वाटून पश्‍चात्ताप करणं गरजेचं आहे. (प्रे. कार्यं ३:१९) त्यानंतर तिने स्वतःमध्ये बदल केला पाहिजे. म्हणजेच, तिने चुकीच्या मार्गावरून मागे फिरलं पाहिजे आणि देवाच्या इच्छेप्रमाणे योग्य त्या गोष्टी करणं सुरू केलं पाहिजे. (रोम. १२:२; इफिस. ४:२३, २४) ही पावलं उचलल्यानंतर ती व्यक्‍ती प्रार्थनेत आपलं जीवन देवाला समर्पित करते आणि मग बाप्तिस्मा घेते.​—मत्त. १६:२४; १ पेत्र ३:२१.

१८. बाप्तिस्मा घेतलेल्या येशूच्या शिष्यांकडे कोणता बहुमान आहे?

१८ तुम्ही येशू ख्रिस्ताचे समर्पित आणि बाप्तिस्मा घेतलेले शिष्य आहात का? तर हा तुम्हाला मिळालेला बहुमान आहे हे नेहमी आठवणीत ठेवा. पवित्र शक्‍तीने भरून गेलेल्या त्या पहिल्या शतकातल्या शिष्यांप्रमाणेच, तुम्हीही राज्याबद्दल पूर्णपणे साक्ष देण्याचं कार्य मोठ्या प्रमाणात करू शकता आणि यहोवाची इच्छा पूर्ण करू शकता.

a “यरुशलेम​—यहुदी धर्माचं केंद्रस्थान” ही चौकट पाहा.

b “रोम​—एका साम्राज्याची राजधानी”, “मेसोपटेम्या आणि इजिप्तमध्ये राहणारे यहुदी” आणि “पंतमधले ख्रिस्ती” या चौकटी पाहा.

c जिभेच्या आकाराच्या त्या ज्वाला खरोखरच्या आगीच्या ज्वाला नव्हत्या. शिष्यांना “आगीच्या ज्वालांसारखं काहीतरी  दिसलं” असं या अहवालात म्हटलं आहे. त्यावरून असं वाटतं की शिष्यांच्या डोक्यावर आगीच्या प्रकाशासारखं काहीतरी दिसलं असावं.

d “यहुदी धर्म स्वीकारणारे कोण होते?” ही चौकट पाहा.

e ७ ऑगस्ट, १९९३ या दिवशी कीयेफ, युक्रेन इथे झालेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात ७,४०२ लोकांचा सहा हौदांमध्ये बाप्तिस्मा झाला होता. या सर्वांचा बाप्तिस्मा होण्यासाठी दोन तास, पंधरा मिनिटं लागली.

f या तात्पुरत्या व्यवस्थेमुळे इतर ठिकाणांहून जे लोक यरुशलेममध्ये आले आणि आणखी आध्यात्मिक मार्गदर्शन मिळावं म्हणून तिथेच थांबले, त्यांच्या गरजा पूर्ण व्हायला मदत झाली. ही व्यवस्था तिथल्या बांधवांनी स्वेच्छेने केली. आपण याची तुलना साम्यवादाशी म्हणजे कम्युनिझमशी करू शकत नाही.​—प्रे. कार्यं ५:१-४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा