वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • bt अध्या. ४ पृ. २८-३५
  • “अशिक्षित आणि सर्वसाधारण” माणसं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “अशिक्षित आणि सर्वसाधारण” माणसं
  • देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “स्वतःच्या सामर्थ्याच्या . . . बळावर” नाही (प्रे. कार्यं ३:११-२६)
  • आम्ही बोलायचं “थांबवू शकत नाही” (प्रे. कार्यं ४:१-२२)
  • “त्या सगळ्यांनी मिळून देवाला मोठ्याने . . . प्रार्थना केली” (प्रे. कार्यं ४:२३-३१)
  • आपल्याला ‘माणसांना नाही तर देवाला’ उत्तर द्यायचं आहे (प्रे. कार्यं ४:३२–५:११)
  • आपल्या गुरूकडून तो क्षमा करण्यास शिकला
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • तो आपल्या धन्याकडून क्षमा करण्याचा धडा शिकतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • त्यानं भीती व शंका यांवर मात केली
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • परीक्षाप्रसंगांतही त्यानं एकनिष्ठा सोडली नाही
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
अधिक माहिती पाहा
देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
bt अध्या. ४ पृ. २८-३५

अध्याय ४

“अशिक्षित आणि सर्वसाधारण” माणसं

प्रेषित धाडसाने कार्य करतात आणि यहोवा त्यांच्या प्रयत्नांवर आशीर्वाद देतो

प्रे. कार्यं ३:१–५:११ वर आधारित

१, २. पेत्र आणि योहान यांनी मंदिराच्या फाटकाजवळ कोणता चमत्कार केला?

दुपार झाली आहे आणि रस्त्यांवर बरीच गर्दी आहे. विश्‍वासू यहुदी आणि ख्रिस्ताचे शिष्य त्या ओसरत्या उन्हात हळूहळू मंदिराच्या अंगणात येत आहेत. लवकरच, ‘प्रार्थनेची वेळ’ होईल.a (प्रे. कार्यं २:४६; ३:१) पेत्र आणि योहान गर्दीतून वाट काढत सुंदर फाटक म्हटलेल्या मंदिराच्या एका फाटकाकडे जाऊ लागतात. त्या सगळ्या गोंगाटात, जन्मापासून लंगडा असलेला एक भिकारी ओरडून लोकांकडे भीक मागत आहे.​—प्रे. कार्यं ३:२; ४:२२.

२ पेत्र आणि योहान जवळ येतात तेव्हा भिकारी नेहमीप्रमाणे गयावया करून त्यांच्याकडेही पैसे मागतो. प्रेषित त्याला पाहून थांबतात, तेव्हा आपल्याला आता पैसे मिळतील अशी भिकाऱ्‍याला आशा वाटते. पण, पेत्र त्याला म्हणतो, “माझ्याजवळ सोनं-चांदी तर नाही, पण जे माझ्याजवळ आहे ते मी तुला देतो. नासरेथचा येशू ख्रिस्त याच्या नावाने मी तुला सांगतो, ऊठ आणि चालायला लाग!” पेत्र त्या लंगड्या माणसाचा हात धरून त्याला उठवतो तेव्हा काय आश्‍चर्य, आयुष्यात पहिल्यांदा तो माणूस आपल्या पायांवर उभा राहतो! लोकांचा आपल्या डोळ्यांवर विश्‍वासच बसत नाही. (प्रे. कार्यं ३:६, ७) खाली वाकून आपल्या बऱ्‍या झालेल्या पायांकडे पाहणाऱ्‍या, आणि अडखळत पहिली पावलं टाकणाऱ्‍या त्या माणसाचं चित्र तुम्ही डोळ्यांपुढे उभं करू शकता का? साहजिकच त्याला इतका आनंद होतो, की तो अक्षरशः उड्या मारू लागतो आणि मोठ्याने देवाची स्तुती करू लागतो!

३. बऱ्‍या झालेल्या लंगड्या माणसापुढे आणि लोकांपुढे कोणती मौल्यवान संधी होती?

३ आनंदाने बेभान झालेले लोक पेत्र आणि योहान उभे असलेल्या ठिकाणी, म्हणजे शलमोनच्या वऱ्‍हांड्याकडे धावतात. अगदी याच ठिकाणी उभं राहून काही काळाआधी येशूनेही लोकांना शिकवलं होतं. आता जो चमत्कार झाला त्याचा खरा अर्थ पेत्र लोकांना समजावून सांगतो. (योहा. १०:२३) तो त्या लोकांना आणि त्या लंगड्या माणसाला एका अशा संधीबद्दल सांगतो जी सोन्याचांदीपेक्षाही मौल्यवान होती. ही फक्‍त शरीराने बरं होण्याची संधी नव्हती, तर पापांबद्दल पश्‍चात्ताप करून त्यांपासून मुक्‍त होण्याची संधी होती. तसंच, यहोवाने नियुक्‍त केलेला “जीवन देणारा मुख्य प्रतिनिधी,” म्हणजेच येशू ख्रिस्त याचे शिष्य बनण्याची संधीही त्यांच्यापुढे होती.​—प्रे. कार्यं ३:१५.

४. (क) लंगड्या माणसाला बरं करण्याच्या त्या चमत्कारामुळे कोणत्या संघर्षाला सुरुवात झाली? (ख) आपल्याला कोणत्या दोन प्रश्‍नांची उत्तरं मिळणार आहेत?

४ आजचा दिवस आठवणीत राहण्यासारखा होता! एक लंगडा माणूस बरा होऊन चालू लागला. तसंच हजारो लोकांना आध्यात्मिक रितीने बरं होण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे आता ते देवाच्या इच्छेप्रमाणे चालू शकत होते. (कलस्सै. १:९, १०) त्या दिवशी जे घडलं, त्यामुळे ख्रिस्ताचे विश्‍वासू सेवक आणि त्या काळातले धार्मिक व राजकीय पुढारी यांच्यामध्ये एका संघर्षाला सुरुवात झाली. कारण हे लोक, येशूने दिलेल्या प्रचार करण्याच्या आज्ञेचं पालन करण्यापासून त्याच्या शिष्यांना अडवण्याचा प्रयत्न करणार होते. (प्रे. कार्यं १:८) “अशिक्षित आणि सर्वसाधारण” समजले जाणारे पेत्र आणि योहान यांनी प्रचार करताना ज्या पद्धतींचा वापर केला आणि जी मनोवृत्ती दाखवली, त्यावरून आपण काय शिकू शकतो?b (प्रे. कार्यं ४:१३) तसंच, त्यांनी आणि इतर शिष्यांनी ज्या प्रकारे विरोधाचा सामना केला, त्याचं अनुकरण आपण कसं करू शकतो?

“स्वतःच्या सामर्थ्याच्या . . . बळावर” नाही (प्रे. कार्यं ३:११-२६)

५. पेत्र ज्या प्रकारे लोकांशी बोलला त्यावरून आपण काय शिकू शकतो?

५ लोकांच्या जमावासमोर उभे असलेल्या पेत्र आणि योहान यांना जाणीव होती, की काही काळाआधी याच लोकांपैकी काहींनी येशूला मृत्युदंड देण्याची ओरडून मागणी केली होती. (मार्क १५:८-१५; प्रे. कार्यं ३:१३-१५) तरीही पेत्रने त्या सर्वांसमोर हे न घाबरता सांगितलं की त्या लंगड्या माणसाला येशूच्या नावाने बरं करण्यात आलं होतं. त्या लोकांसमोर हे बोलण्यासाठी किती धैर्याची गरज होती याचा विचार करा. पण पेत्रने लोकांच्या भीतीमुळे सत्य लपवलं नाही. येशूच्या मृत्यूला काही प्रमाणात ते लोकही जबाबदार होते हे त्याने अगदी स्पष्टपणे सांगितलं. पण ते “अज्ञानामुळे” असं वागले असल्यामुळे पेत्रच्या मनात त्यांच्याविषयी कोणतीच वाईट भावना नव्हती. (प्रे. कार्यं ३:१७) उलट, त्यांना आपले भाऊ समजून तो त्यांच्याशी बोलला आणि राज्याच्या संदेशामुळे त्यांना कसा फायदा होऊ शकतो हे त्यांना सांगितलं. म्हणजेच, त्यांनी जर येशूवर विश्‍वास ठेवून पश्‍चात्ताप केला तर त्यांना यहोवाकडून “तजेला” मिळेल असं त्याने सांगितलं. (प्रे. कार्यं ३:१९) आपणही देवाच्या येणाऱ्‍या न्यायाबद्दल लोकांना न घाबरता आणि स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. पण असं आपण त्यांच्या भावना न दुखावता आणि त्यांच्याबद्दल चुकीचं मत न बनवता केलं पाहिजे. याऐवजी, आपण ज्यांना प्रचार करतो ते पुढे आपले आध्यात्मिक भाऊबहीण बनू शकतात, असा विचार आपण केला पाहिजे. पेत्रसारखंच आपणही राज्याच्या संदेशामुळे होणाऱ्‍या फायद्यांवर जास्त भर देतो.

६. पेत्र आणि योहान यांनी नम्रता कशी दाखवली?

६ प्रेषित मनाने नम्र होते. म्हणूनच, त्यांनी त्या चमत्काराचं श्रेय स्वतःकडे घेतलं नाही. पेत्र जमलेल्या लोकांना म्हणाला: “तुम्ही आमच्याकडे असं एकटक का पाहताय? आम्ही स्वतःच्या सामर्थ्याच्या किंवा देवाच्या भक्‍तीच्या बळावर याला चालायला लावलं असं तुम्हाला वाटतंय का?” (प्रे. कार्यं ३:१२) पेत्रला आणि इतर प्रेषितांना माहीत होतं, की त्यांना देवाच्या सेवेत मिळणारं यश हे त्यांच्या स्वतःच्या शक्‍तीमुळे नाही तर देवाच्या शक्‍तीमुळे मिळत होतं. त्यामुळे त्यांनी या यशाचं श्रेय यहोवा आणि येशू यांना दिलं.

७, ८. (क) आपण लोकांना कोणती संधी देऊ शकतो? (ख) “सगळ्या गोष्टी पुन्हा पूर्वीसारख्या” होण्याचं वचन आज कसं पूर्ण होत आहे?

७ आपण राज्याचा संदेश सांगताना अशाच प्रकारे नम्र मनोवृत्ती दाखवली पाहिजे. आज देव त्याच्या पवित्र शक्‍तीद्वारे ख्रिश्‍चनांना, चमत्कार करून लोकांना बरं करण्याची शक्‍ती देत नाही. पण आपण लोकांना देवावर आणि ख्रिस्तावर विश्‍वास ठेवायला नक्कीच मदत करू शकतो. असं केलं तर पेत्रप्रमाणेच, आपणही लोकांना त्यांच्या पापांची क्षमा मिळवण्याची आणि यहोवाकडून आशीर्वाद मिळवण्याची मौल्यवान संधी देऊ शकतो. दरवर्षी लाखो लोक ही संधी स्वीकारून ख्रिस्ताचे बाप्तिस्मा घेतलेले शिष्य बनत आहेत.

८ “सगळ्या गोष्टी पुन्हा पूर्वीसारख्या होण्याच्या” ज्या काळाविषयी पेत्रने उल्लेख केला होता, त्याच काळात आज आपण जगत आहोत. “देवाने जुन्या काळातल्या आपल्या पवित्र संदेष्ट्यांद्वारे” दिलेल्या वचनाप्रमाणे देवाचं राज्य १९१४ मध्ये स्वर्गात स्थापन झालं. (प्रे. कार्यं ३:२१; स्तो. ११०:१-३; दानी. ४:१६, १७) त्यानंतर थोड्याच काळात ख्रिस्ताने या पृथ्वीवर खरी उपासना पुन्हा सुरू करण्याचं काम हाती घेतलं. यामुळे आज लाखो लोकांना आध्यात्मिक नंदनवनात येऊन देवाच्या राज्याचे नागरिक व्हायला मदत मिळाली आहे. त्यांनी आपलं जुनं, वाईट व्यक्‍तिमत्त्व सोडून “देवाच्या इच्छेप्रमाणे निर्माण करण्यात आलेलं नवीन व्यक्‍तिमत्त्व धारण” केलं आहे. (इफिस. ४:२२-२४) जसं त्या लंगड्या माणसाला देवाच्या पवित्र शक्‍तीद्वारे बरं करण्यात आलं, तसंच हे महान कार्यही देवाच्या पवित्र शक्‍तीमुळेच शक्य होत आहे. पेत्रसारखंच आपणही इतरांना शिकवण्यासाठी देवाच्या वचनाचा धैर्याने आणि प्रभावीपणे वापर केला पाहिजे. लोकांना ख्रिस्ताचे शिष्य बनवण्यात आपल्याला मिळालेलं यश, हे आपल्या शक्‍तीमुळे नसून देवाच्या शक्‍तीमुळेच आहे.

आम्ही बोलायचं “थांबवू शकत नाही” (प्रे. कार्यं ४:१-२२)

९-११. (क) पेत्र आणि योहान यांना मंदिरात शिकवताना पाहून यहुदी अधिकाऱ्‍यांनी काय केलं? (ख) प्रेषितांनी काय करायचं ठरवलं?

९ पेत्रच्या भाषणामुळे आणि बरा झालेला लंगडा माणूस उड्या मारून ओरडत असल्यामुळे खूप गोंधळ उडाला. तेव्हा मंदिराच्या परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी असलेला अधिकारी आणि मुख्य याजक, काय झालं ते पाहायला तिथे आले. ही माणसं कदाचित सदूकी असावीत. या पंथाचे सदस्य श्रीमंत होते आणि त्यांचा राजकारणात दबदबा होता. ते रोमन शासकांसोबत शांतीचे संबंध ठेवायचा प्रयत्न करायचे. परूशी लोक ज्या तोंडी नियमांना खूप महत्त्व द्यायचे त्यांचा सदूकी विरोध करायचे आणि पुनरुत्थानाच्या शिकवणीची थट्टा करायचे.c त्यामुळे जेव्हा त्यांनी पेत्र आणि योहान यांना मंदिरात अगदी बेधडकपणे येशूच्या पुनरुत्थानाबद्दल शिकवताना पाहिलं तेव्हा त्यांना खूप राग आला.

१० त्या संतापलेल्या विरोधकांनी पेत्र आणि योहान यांना तुरुंगात टाकलं. दुसऱ्‍या दिवशी त्यांनी यहुदी उच्च न्यायालयासमोर त्यांना उभं केलं. या प्रतिष्ठित अधिकाऱ्‍यांच्या मते पेत्र आणि योहान ही “अशिक्षित आणि सर्वसाधारण” माणसं होती आणि त्यांना मंदिरात शिकवण्याचा काहीच अधिकार नव्हता. त्यांनी त्या काळातल्या कोणत्याही धर्मगुरूंच्या शाळेतून शिक्षण घेतलं नव्हतं. तरीही ते ज्या धाडसाने आणि आत्मविश्‍वासाने बोलत होते, त्यामुळे न्यायालयातले अधिकारी थक्क झाले. पेत्र आणि योहान इतक्या प्रभावीपणे का बोलू शकले? याचं एक कारण म्हणजे “ही माणसं येशूसोबत असायची.” (प्रे. कार्यं ४:१३) त्यांच्या प्रभूने त्यांना शास्त्र्यांसारखं नाही, तर खऱ्‍या अधिकाराने शिकवलं होतं.​—मत्त. ७:२८, २९.

११ न्यायालयाने प्रेषितांना प्रचार थांबवण्याची आज्ञा दिली. यहुदी लोकांमध्ये न्यायालयाच्या आदेशांना फार महत्त्व होतं. काही आठवड्यांपूर्वी, येशू याच न्यायालयासमोर उभा होता, तेव्हा तिथल्या सदस्यांनी येशूला “मृत्युदंड” द्यायचं ठरवलं होतं. (मत्त. २६:५९-६६) तरी या गोष्टीमुळे पेत्र आणि योहान घाबरले नाहीत. या श्रीमंत, खूप शिकलेल्या आणि प्रतिष्ठित लोकांसमोर उभं राहून, पेत्र आणि योहान यांनी धैर्याने पण आदराने म्हटलं: “आम्ही देवाऐवजी तुमचं ऐकावं, हे देवाच्या दृष्टीने योग्य ठरेल का, हे तुम्हीच ठरवा. पण आमच्याबद्दल विचाराल, तर ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या आणि ऐकल्या आहेत त्यांबद्दल बोलायचं आम्ही थांबवू शकत नाही.”​—प्रे. कार्यं ४:१९, २०.

महायाजक आणि मुख्य याजक

महायाजक हा देवासमोर लोकांचा प्रतिनिधी होता. इ.स. पहिल्या शतकात तो यहुदी न्यायसभेचा (सन्हेद्रिनचा) अध्यक्षही होता. त्याच्यासोबतच इतर मुख्य याजकही यहुदी लोकांचे नेते होते. त्यांच्यात हन्‍नासारखे आधी महायाजक असलेले आणि काही मोजक्याच म्हणजे चार ते पाच कुटुंबांतून निवडले जाणारे प्रौढ पुरुष असायचे. जाणकार एमील शुरर लिहितात, याजकांमध्ये “या थोड्या प्रतिष्ठित कुटुंबांचे सदस्य असणं हीच एक मोठ्या मानाची गोष्ट होती.”

बायबलमध्ये असं दिसून येतं की एक महायाजक आयुष्यभर या पदावर सेवा करायचा. (गण. ३५:२५) पण प्रेषितांची कार्यं यात वर्णन केलेल्या काळात रोमन राज्यपाल आणि रोमच्या अधिकाराखाली राज्य करणारे राजे, आपल्या मर्जीप्रमाणे कधीही महायाजकांना नियुक्‍त करायचे किंवा त्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकायचे. पण, हे मूर्तिपूजक शासक अहरोनच्या वंशातल्या याजकांनाच महायाजक म्हणून निवडायचे असं दिसतं.

१२. आपल्याला आत्मविश्‍वास आणि धैर्य वाढवायला कोणत्या गोष्टीने मदत मिळेल?

१२ तुम्हीही असंच धैर्य दाखवता का? तुम्हाला तुमच्या परिसरातल्या श्रीमंत, खूप शिकलेल्या आणि प्रतिष्ठित लोकांना साक्ष देण्याची संधी मिळते तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? कुटुंबातले सदस्य, शाळातले किंवा कामावरचे सोबती तुमच्या विश्‍वासाबद्दल तुमची थट्टामस्करी करतात तेव्हा काय? तुम्हाला या लोकांना उत्तर द्यायला भीती वाटते का? असं असेल, तर तुम्ही या भीतीवर मात करू शकता. पृथ्वीवर असताना येशूने प्रेषितांना त्यांच्या विश्‍वासाबद्दल इतरांशी आदराने आणि आत्मविश्‍वासाने कसं बोलायचं हे शिकवलं. (मत्त. १०:११-१८) येशूच्या पुनरुत्थानानंतर त्याने शिष्यांना वचन दिलं की “जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीपर्यंत” तो नेहमी त्यांच्यासोबत राहील. (मत्त. २८:२०) येशूच्या मार्गदर्शनानुसार “विश्‍वासू आणि बुद्धिमान दास” आज आपल्यालाही आपल्या विश्‍वासांबद्दल इतरांशी कसं बोलायचं हे शिकवतो. (मत्त. २४:४५-४७; १ पेत्र ३:१५) हे मार्गदर्शन आपल्याला सभांमध्ये मिळतं, जसं की, ‘आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य’ सभा. तसंच, ते बायबल आधारित प्रकाशनांद्वारेही मिळतं, जसं की, jw.org वेबसाईटवर असलेल्या “बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं” यामधले लेख. तुम्ही या मार्गदर्शनाचा पूर्ण फायदा घेत आहात का? असं केल्याने तुमचा आत्मविश्‍वास आणि धैर्य आणखी वाढेल. आणि प्रेषितांप्रमाणेच, बायबलमधून शिकलेल्या सुंदर सत्यांबद्दल इतरांना सांगायला कोणतीच गोष्ट तुम्हाला अडवू शकणार नाही.

एक बहीण तिच्यासोबत काम करणाऱ्‍या स्त्रिला चहाच्या ब्रेकमध्ये प्रचार करत आहे.

तुम्ही शिकलेल्या सुंदर सत्यांबद्दल इतरांना सांगायला कोणतीच गोष्ट तुमच्या आड येऊ देऊ नका

“त्या सगळ्यांनी मिळून देवाला मोठ्याने . . . प्रार्थना केली” (प्रे. कार्यं ४:२३-३१)

१३, १४. आपल्याला विरोधाचा सामना करावा लागला तर आपण काय केलं पाहिजे, आणि का?

१३ तुरुंगातून सुटल्यानंतर लगेच पेत्र आणि योहान मंडळीतल्या इतर बांधवांना भेटले. “त्या सगळ्यांनी मिळून देवाला मोठ्याने . . . प्रार्थना केली” आणि प्रचार करण्यासाठी धैर्य मागितलं. (प्रे. कार्यं ४:२४) देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या शक्‍तीवर अवलंबून राहणं मूर्खपणाचं ठरू शकतं हे पेत्रला चांगल्या प्रकारे माहीत होतं. काही आठवड्यांपूर्वीच पेत्र आत्मविश्‍वासाने येशूला म्हणाला होता: “बाकीचे सगळे तुला सोडून गेले तरी मी तुला कधीही सोडून जाणार नाही!” पण येशूने आधीच सांगितल्याप्रमाणे पेत्रने लोकांना घाबरून आपल्या मित्राला आणि प्रभूला नाकारलं. असं असलं तरी पेत्र आपल्या या चुकीतून धडा शिकला.​—मत्त. २६:३३, ३४, ६९-७५.

१४ तुम्हीही ख्रिस्ताबद्दल साक्ष देत राहण्याचा निश्‍चय केला असेल; पण फक्‍त निश्‍चय करणं पुरेसं नाही. विरोधक जेव्हा तुम्हाला प्रचार करण्यापासून थांबवतात किंवा तुमचा विश्‍वास सोडून द्यायला भाग पाडण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा पेत्रच्या आणि योहानच्या उदाहरणाचं अनुकरण करा. परिस्थितीचा सामना करता यावा म्हणून बळ मागण्यासाठी यहोवाकडे प्रार्थना करा. मंडळीतल्या बांधवाची मदत घ्या. तुमच्यासमोर असलेल्या कठीण समस्यांबद्दल वडिलांना आणि इतर प्रौढ बांधवांना सांगा. त्यांनी केलेल्या प्रार्थनांमुळे तुम्हाला तुमच्या सेवेत टिकून राहण्यासाठी खूप मदत मिळेल.​—इफिस. ६:१८; याको. ५:१६.

१५. ज्यांनी काही काळासाठी प्रचार करणं सोडून दिलं होतं त्यांनी खचून का जाऊ नये?

१५ तुमच्यावरही कधी विरोधकांचा दबाव आला होता का? आणि त्यामुळे तुम्ही काही काळासाठी प्रचार करणं थांबवलं होतं का? असं असलं तर हार मानू नका. येशूच्या मृत्यूनंतर काही काळ प्रेषितांनीही प्रचार करायचं थांबवलं होतं हे आठवणीत ठेवा. पण काही वेळाने त्यांनी पुन्हा प्रचाराला सुरुवात केली. (मत्त. २६:५६; २८:१०, १६-२०) त्याचप्रमाणे तुम्हीही आधी केलेल्या चुकांमुळे खचून जाण्याऐवजी, त्या अनुभवांपासून शिकून इतरांना धीर देऊ शकता.

१६, १७. यरुशलेममध्ये ख्रिस्ताच्या शिष्यांनी जी प्रार्थना केली त्यावरून आपण काय शिकू शकतो?

१६ अधिकारी आपल्यावर अत्याचार करतात तेव्हा आपण कशासाठी प्रार्थना केली पाहिजे? एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, शिष्यांनी आपल्यावर परीक्षा येऊ नयेत अशी प्रार्थना केली नाही. कारण येशू जे म्हणाला होता ते त्यांच्या आठवणीत होतं. तो म्हणाला: “जर त्यांनी माझा छळ केला, तर ते तुमचाही छळ करतील.” (योहा. १५:२०) म्हणूनच या विश्‍वासू शिष्यांनी, विरोधकांच्या धमक्यांकडे “लक्ष दे” अशी यहोवाला प्रार्थना केली. (प्रे. कार्यं ४:२९) फक्‍त स्वतःबद्दल विचार करण्याऐवजी, त्यांच्यावर होत असलेल्या छळामुळे एक भविष्यवाणी पूर्ण होत आहे हे त्यांनी ओळखलं. त्यांना माहीत होतं की मानवी शासक काहीही बोलले, तरी येशूने त्यांना प्रार्थना करायला शिकवल्याप्रमाणे, देवाची इच्छा या ‘पृथ्वीवर नक्कीच पूर्ण’ होणार होती.​—मत्त. ६:९, १०.

१७ देवाची इच्छा पूर्ण करता यावी यासाठी शिष्यांनी यहोवाला अशी प्रार्थना केली: “तुझं वचन पूर्ण धैर्याने सांगत राहायला तुझ्या सेवकांना बळ दे.” त्यांच्या प्रार्थनेचं यहोवाने लगेच उत्तर कसं दिलं? “ज्या ठिकाणी ते सगळे एकत्र जमले होते ती जागा हादरली. आणि ते सगळेच्या सगळे पवित्र शक्‍तीने भरून गेले आणि देवाचं वचन धैर्याने सांगू लागले.” (प्रे. कार्यं ४:२९-३१) यावरून हे कळतं, की कोणतीही गोष्ट देवाची इच्छा पूर्ण होण्याच्या आड येऊ शकत नाही. (यश. ५५:११) आपल्यासमोर कितीही मोठे अडथळे आले किंवा आपले विरोधक कितीही शक्‍तिशाली असले; तरी जर आपण देवाला प्रार्थना केली, तर तो आपल्याला त्याचं वचन धैर्याने सांगत राहायला नक्कीच मदत करेल.

आपल्याला ‘माणसांना नाही तर देवाला’ उत्तर द्यायचं आहे (प्रे. कार्यं ४:३२–५:११)

१८. मंडळीतल्या बांधवांनी एकमेकांची कशी मदत केली?

१८ यरुशलेममध्ये नवीनच स्थापन झालेल्या मंडळीत वाढ होऊन पाहता-पाहता त्यांची संख्या ५,००० पेक्षा जास्त झाली.d ते जरी वेगवेगळ्या पार्श्‍वभूमीचे असले तरी ते “एकदिलाने आणि ऐक्याने” राहत होते. त्यांच्या विचारांमध्ये आणि मतांमध्ये एकता होती. (प्रे. कार्यं ४:३२; १ करिंथ. १:१०) त्यांनी त्यांच्या प्रयत्नांवर आशीर्वाद देण्याची यहोवाला फक्‍त विनंतीच केली नाही; तर त्यांनी एकमेकांना आध्यात्मिक रितीने आणि गरज पडली तेव्हा रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठीही मदत केली. (१ योहा. ३:१६-१८) जसं की, योसेफ नावाचा शिष्य ज्याला प्रेषितांनी बर्णबा हे नाव दिलं होतं, त्याने आपली जमीन विकून सर्व पैसे उदारपणे दान केले. इतर ठिकाणांहून आलेले लोक यरुशलेममध्ये जास्त काळ राहू शकतील आणि त्यांच्या नवीन विश्‍वासाबद्दल आणखी शिकू शकतील, यासाठी हे पैसे वापरण्यात आले.

१९. यहोवाने हनन्या आणि सप्पीरा यांना का ठार मारलं?

१९ हनन्या आणि सप्पीरा या जोडप्यानेही त्यांची जमीन विकून पैसे दान केले. त्यांनी पूर्ण पैसे दान केल्याचं दाखवलं, पण “मिळालेल्या पैशांतून काही पैसे गुपचूप आपल्याजवळच ठेवले.” (प्रे. कार्यं ५:२) यहोवाने या जोडप्याला मृत्यूची शिक्षा दिली. त्यांनी कमी दान दिलं म्हणून नाही, तर त्यामागचा त्यांचा हेतू चुकीचा होता आणि त्यांनी बांधवांना फसवण्याचा प्रयत्न केला होता. ते “माणसांशी नाही तर देवाशी खोटं” बोलले होते. (प्रे. कार्यं ५:४) ज्या ढोंगी लोकांना येशूने दोषी ठरवलं त्यांच्याप्रमाणेच, हनन्या आणि सप्पीराही देवाची मर्जी मिळवण्याचा नाही, तर माणसांकडून प्रशंसा मिळवण्याचा प्रयत्न करत होते.​—मत्त. ६:१-३.

२०. यहोवाची सेवा करण्याबद्दल आपण कोणता धडा शिकतो?

२० आज लाखो यहोवाचे साक्षीदार पहिल्या शतकात यरुशलेममध्ये राहणाऱ्‍या विश्‍वासू शिष्यांप्रमाणेच उदारता दाखवतात. ते स्वेच्छेने दान देऊन जगभरात चाललेल्या प्रचार कामात मदत करतात. कोणालाही या कामासाठी त्यांचा पैसा किंवा वेळ देण्याची जबरदस्ती केली जात नाही. आपण यहोवाची सेवा रडतखडत किंवा जबरदस्तीने करावी असं त्याला वाटत नाही. (२ करिंथ. ९:७) आपण किती दान देतो त्यापेक्षा कोणत्या मनोवृत्तीने देतो हे यहोवा पाहतो. (मार्क १२:४१-४४) हनन्या आणि सप्पीरा यांच्याप्रमाणे आपण कधीही स्वार्थासाठी आणि लोकांची प्रशंसा मिळवण्यासाठी देवाची सेवा करू नये. याऐवजी पेत्र, योहान आणि बर्णबा यांच्यासारखंच देवाबद्दल आणि इतरांबद्दल असलेल्या खऱ्‍या प्रेमामुळे आपण यहोवाची सेवा करू या.​—मत्त. २२:३७-४०.

मासे पकडणारा पेत्र​—एक प्रभावी प्रेषित बनला

बायबलमध्ये पेत्रला चार नावांनी ओळखलं जातं. हिब्रू आणि ग्रीक भाषेत त्याला शिमोन, तर अरामी भाषेत केफा या नावाने ओळखलं जायचं. ग्रीक भाषेत केफा या नावाचा पेत्र असा अनुवाद करण्यात आला. त्याची दोन नावं जोडून, त्याला शिमोन पेत्र या नावानेही हाक मारली जायची.​—मत्त. १०:२; योहा. १:४२; प्रे. कार्यं १५:१४.

प्रेषित पेत्रने माशांची टोपली घेतली आहे.

पेत्रचं लग्न झालं होतं. त्याच्या घरी त्याची सासू आणि त्याचा भाऊ हेही राहायचे. (मार्क १:२९-३१) तो गालील समुद्राजवळच्या बेथसैदा या गावातला होता आणि मासेमारी करायचा. (योहा. १:४४) नंतर तो जवळच्याच कफर्णहूममध्ये राहू लागला. (लूक ४:३१, ३८) गालीलच्या समुद्रकिनाऱ्‍यावर जमलेल्या लोकांशी बोलताना येशू पेत्रच्याच नावेत बसला होता. त्यानंतर लगेच काही वेळाने येशूच्या सांगण्याप्रमाणे जाळं टाकल्यावर पेत्रला खूप मासे पकडता आले. हा चमत्कार पाहून पेत्र घाबरला आणि येशूच्या पाया पडला. पण येशू त्याला म्हणाला: “घाबरू नकोस. कारण आतापासून तू जिवंत माणसं धरणारा होशील.” (लूक ५:१-११) पेत्र आपला भाऊ अंद्रिया, तसंच याकोब आणि योहान यांच्यासोबत मासेमारी करायचा. येशूने दिलेलं आमंत्रण स्वीकारून ते त्याचे शिष्य बनले तेव्हा चौघांनीही आपला मासेमारीचा व्यवसाय सोडून दिला. (मत्त. ४:१८-२२; मार्क १:१६-१८) याच्या एका वर्षानंतर पेत्रही त्या १२ जणांपैकी होता, ज्यांना येशूने “प्रेषित” म्हणून निवडलं, ज्याचा अर्थ “पाठवण्यात आलेले” असा होतो.​—मार्क ३:१३-१६.

येशूने काही खास प्रसंगी पेत्र, याकोब आणि योहान यांना आपल्यासोबत घेतलं. त्यांनी येशूचं रूपांतर होताना पाहिलं. तसंच, त्यांनी त्याला याईरच्या मुलीचं पुनरुत्थान करतानाही पाहिलं. शिवाय, गेथशेमानेच्या बागेत जेव्हा येशू खूप दुःखात होता तेव्हाही ते त्याच्यासोबत होते. (मत्त. १७:१, २; २६:३६-४६; मार्क ५:२२-२४, ३५-४२; लूक २२:३९-४६) अंद्रियासोबत याच तिघांनी येशूला त्याच्या उपस्थितीच्या चिन्हाबद्दल प्रश्‍न विचारला होता.​—मार्क १३:१-४.

पेत्र नेहमी स्पष्टपणे बोलणारा, प्रभावी व्यक्‍तिमत्त्व असलेला आणि थोडा उतावीळ स्वभावाचा होता. बऱ्‍याच वेळा, इतर शिष्य काही बोलण्याआधीच तो बोलायचा. इतर ११ प्रेषितांच्या तुलनेत पेत्रचे शब्द आनंदाच्या संदेशाच्या पुस्तकांत जास्त वेळा आले आहेत. काही वेळा इतर सर्व शिष्य शांत असायचे, पण पेत्र प्रश्‍न विचारायचा. (मत्त. १५:१५; १८:२१; १९:२७-२९; लूक १२:४१; योहा. १३:३६-३८) येशू त्याचे पाय धुऊ लागला तेव्हा पेत्रने त्याला अडवलं. मग, येशूने त्याला योग्यपणे विचार करायला मदत केली, तेव्हा त्याने येशूला आपले पायच नाहीत, तर हात आणि डोकंही धुवायला सांगितलं!​—योहा. १३:५-१०.

एकदा भावनांच्या भरात येऊन पेत्रने येशूला असं पटवून देण्याचा प्रयत्न केला, की येशूला दुःख सहन करावं लागणार नाही आणि मरणाचाही सामना करावा लागणार नाही. पण असा चुकीचा विचार केल्याबद्दल येशूने त्याला कडक शब्दांत ताकीद दिली. (मत्त. १६:२१-२३) पृथ्वीवर येशूच्या शेवटच्या रात्री पेत्र त्याला म्हणाला, की इतर सर्व प्रेषित तुला सोडून गेले तरी मी मात्र तुला कधीही सोडून जाणार नाही. येशूच्या शत्रूंनी त्याला अटक केल्यावर, पेत्रने धैर्य दाखवून येशूला वाचवण्यासाठी आपल्या तलवारीचा वापर केला. नंतर, तो येशूच्या मागेमागे थेट महायाजकाच्या अंगणापर्यंत गेला. मग, थोड्याच वेळात त्याने आपल्या प्रभूला तीन वेळा नाकारलं. पण, आपल्या चुकीची जाणीव झाल्यावर तो ढसाढसा रडला.​—मत्त. २६:३१-३५, ५१, ५२, ६९-७५.

येशूचं पुनरुत्थान झाल्यावर तो गालीलमध्ये प्रेषितांसमोर प्रकट होण्याच्या काही काळाआधी, पेत्रने परत आपला मासेमारीचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला; इतर प्रेषितांनीही असंच केलं. नंतर, येशूला समुद्रकिनाऱ्‍यावर पाहून पेत्रने मागचा-पुढचा विचार न करता पाण्यात उडी मारली आणि येशूजवळ गेला. येशूने प्रेषितांकरता खाण्यासाठी मासे बनवले होते. नाश्‍ता करत असताना, पेत्रला “यांच्यापेक्षा” म्हणजेच समोर ठेवलेल्या माशांपेक्षा आपल्यावर जास्त प्रेम आहे का, असं येशूने विचारलं. येशूने असा प्रश्‍न विचारून, मासेमारीच्या व्यवसायात गुंतण्याऐवजी पूर्ण वेळेची सेवा करण्याचं पेत्रला प्रोत्साहन दिलं.​—योहा. २१:१-२२.

इ.स. ६२-६४ च्या सुमारास पेत्र बाबेलमध्ये म्हणजे आजच्या काळातल्या इराकमध्ये प्रचार करत होता. त्या काळी तिथे बरेच यहुदी लोक राहत होते. (१ पेत्र ५:१३) बाबेलमध्ये असतानाच पेत्रने देवाच्या प्रेरणेने त्याच्या नावाचं पहिलं पत्र लिहिलं आणि कदाचित दुसरं पत्रही त्याने तिथेच असताना लिहिलं असावं. येशूने पेत्रला “सुंता झालेल्यांसाठी प्रेषित होण्याकरता समर्थ केलं.” (गलती. २:८, ९) पेत्रने त्याच्यावर सोपवलेली ही सेवा जिवाभावाने आणि उत्साहाने केली.

योहान​—येशूचा लाडका शिष्य

प्रेषित योहान हा जब्दीचा मुलगा आणि प्रेषित याकोब याचा भाऊ होता. सलोमी ही कदाचित त्याची आई होती. ती येशूची आई मरीया हिची बहीण असावी. (मत्त. १०:२; २७:५५, ५६; मार्क १५:४०; लूक ५:९, १०) या नात्याने योहान येशूचा मावस भाऊ लागत असावा. जब्दीचा माशांचा व्यापार इतका मोठा होता की त्याने त्यासाठी मजूर ठेवले होते, यावरून दिसतं की योहानचं कुटुंब श्रीमंत होतं. (मार्क १:२०) येशू गालीलला गेला तेव्हा सलोमीने त्याच्यासोबत तिथे जाऊन त्याची सेवा केली. येशूच्या मरणानंतर त्याच्या दफनविधीची तयारी करताना त्याच्या शरीराला लावण्यासाठी तिने सुगंधी मसाले आणले. (मार्क १६:१; योहा. १९:४०) कदाचित योहानचं स्वतःचं घर असावं.​—योहा. १९:२६, २७.

The apostle John holding a scroll.

येशूला पाहून, “पाहा, देवाचा कोकरा!” असं बाप्तिस्मा देणारा योहान म्हणाला, तेव्हा अंद्रियासोबत त्याचा जो शिष्य तिथे उभा होता तो जब्दीचा मुलगा योहान असावा. (योहा. १:३५, ३६, ४०) येशूशी ओळख झाल्यानंतर तो येशूसोबत काना इथे गेला. तिथे त्याने येशूला त्याचा पहिला चमत्कार करताना पाहिलं. (योहा. २:१-११) त्यानंतर यरुशलेम, शोमरोन आणि गालीलमध्ये झालेल्या घटनांचं योहानने बारकाईने आणि जिवंतपणे वर्णन केलं. यावरून हे दिसतं की आनंदाच्या संदेशाच्या पुस्तकाचा हा लेखक स्वतः तिथे हजर होता. येशूने त्याला आपला शिष्य बनण्याचं आमंत्रण दिल्यावर याकोब, पेत्र आणि अंद्रिया यांच्याप्रमाणेच त्यानेही लगेच ते स्वीकारलं. त्यासाठी त्याने आपली मासे पकडण्याची जाळी, नाव आणि मासेमारीचा व्यवसाय, सर्वकाही लगेच सोडून दिलं. यावरून त्याचा येशूवर किती पक्का विश्‍वास होता हे दिसतं.​—मत्त. ४:१८-२२.

आनंदाच्या संदेशाच्या पुस्तकांमधल्या अहवालांत पेत्रचा जितक्या वेळा उल्लेख येतो तितक्या वेळा योहानचा येत नाही. असं असलं तरी योहानही उत्साही व्यक्‍तिमत्त्वाचा होता. म्हणूनच कदाचित येशूने त्याला आणि त्याचा भाऊ याकोब याला बोआनेर्गेस असं नाव दिलं होतं, ज्याचा अर्थ “गर्जनेची मुलं” असा होतो. (मार्क ३:१७) योहानला आणि त्याच्या भावाला देवाच्या राज्यात मोठा अधिकार मिळावा अशी मागणी करण्यासाठी, त्यांनी त्यांच्या आईला येशूकडे पाठवलं. यावरून हे दिसतं की सुरुवातीला योहान पद मिळवण्यासाठी महत्त्वाकांक्षी होता. त्याच्या या इच्छेमागे जरी स्वार्थी भावना असली, तरी त्यावरून हे दिसतं की त्याचा देवाच्या राज्यावर पक्का विश्‍वास होता. योहान आणि याकोब यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे येशूने सर्वच प्रेषितांना नम्र होण्याचा धडा दिला.​—मत्त. २०:२०-२८.

येशूचा शिष्य नसलेला एक माणूस जेव्हा त्याच्या नावाने दुष्ट स्वर्गदूत काढायला लागला, तेव्हा योहानने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. यावरून हे दिसतं की तो कडक स्वभावाचा होता. तसंच, एकदा येशूने शोमरोनमधल्या एका गावात काही तयारी करण्यासाठी आपल्या शिष्यांना पाठवलं होतं. पण त्या गावातले लोक मदत करायला तयार झाले नाहीत, तेव्हा योहानने लगेच त्या गावावर ‘स्वर्गातून आगीचा वर्षाव करावा का?’ असं येशूला विचारलं. या दोन्ही वेळी येशू त्याच्यावर रागावला. पण पुढे योहानचा स्वभाव शांत झाला आणि तो दयाळूपणे वागू लागला. (लूक ९:४९-५६) योहानमध्ये जरी असे दोष असले, तरी त्याच्यावर “येशूचं प्रेम होतं.” म्हणूनच, येशूने मरण्याआधी त्याच्या आईला सांभाळण्याची जबाबदारी योहानवर सोपवली.​—योहा. १९:२६, २७; २१:७, २०, २४.

येशूने आधीच सांगितल्याप्रमाणे, योहान सर्व प्रेषितांपेक्षा जास्त काळ जगला. (योहा. २१:२०-२२) योहानने यहोवाची जवळजवळ ७० वर्षं विश्‍वासूपणे सेवा केली. त्याच्या आयुष्याच्या शेवटी म्हणजे रोमन सम्राट डमिशन याच्या शासनकाळात योहानला “देवाबद्दल बोलल्यामुळे आणि येशूबद्दल साक्ष दिल्यामुळे” पात्म बेटावर कैदेत ठेवण्यात आलं. त्या वेळी म्हणजे इ.स. ९६ च्या जवळपास योहानला काही दृष्टान्त झाले, जे त्याने प्रकटीकरणाच्या पुस्तकात लिहून ठेवले. (प्रकटी. १:१, २, ९) असं मानलं जातं, की योहानची सुटका झाल्यावर तो इफिसला गेला. तिथे त्याने त्याच्या नावाचं आनंदाच्या संदेशाचं पुस्तक आणि १, २ आणि ३ योहान या नावाने ओळखली जाणारी पत्रं लिहिली. इ.स. १०० च्या आसपास इफिसमध्येच त्याचा मृत्यू झाला.

a सकाळी आणि संध्याकाळी बलिदानं अर्पण करण्याच्या वेळी मंदिरात प्रार्थना केल्या जायच्या. संध्याकाळची बलिदानं “नवव्या तासाला” म्हणजेच “दुपारी तीन वाजण्याच्या सुमाराला” अर्पण केली जायची.

b “मासे पकडणारा पेत्र​—एक प्रभावी प्रेषित बनला” आणि “योहान​—येशूचा लाडका शिष्य” या चौकटी पाहा.

c “महायाजक आणि मुख्य याजक” ही चौकट पाहा.

d इ.स. ३३ मध्ये यरुशलेम शहरात फक्‍त ६,००० परूशी आणि त्याहीपेक्षा कमी सदूकी असावेत. या दोन पंथांनी येशूच्या शिकवणींचा विरोध करण्याचं हेही एक कारण असावं.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा