अध्याय ५
‘आम्ही देवाला शासक मानून त्याची आज्ञा पाळली पाहिजे’
प्रेषित ठाम भूमिका घेऊन सर्व खऱ्या ख्रिश्चनांसाठी उदाहरण मांडतात
प्रे. कार्यं ५:१२–६:७ वर आधारित
१-३. (क) प्रेषितांना न्यायसभेत का आणण्यात आलं आणि मुख्य मुद्दा कोणता होता? (ख) प्रेषितांनी जी भूमिका घेतली ती आपल्यासाठी इतकी महत्त्वाची का आहे?
यहुदी न्यायसभेचे सर्व न्यायाधीश रागाने पेटले आहेत! येशूच्या प्रेषितांवर या न्यायसभेत खटला चालवला जात आहे. त्यांच्यावर कोणता आरोप आहे? महायाजक आणि न्यायसभेचा अध्यक्ष योसेफ कयफा त्यांना कठोरपणे म्हणतो: “या नावाने लोकांना शिकवू नका अशी आम्ही तुम्हाला सक्त ताकीद दिली होती.” रागाच्या भरात तो येशूचं नावही घेत नाही. कयफा पुढे म्हणतो: “तुम्ही तर संपूर्ण यरुशलेम शहरात तुमच्या शिकवणी पसरवल्या आहेत. आणि या माणसाच्या रक्ताचा दोष आमच्या माथी मारायचं तुम्ही जसं काही ठरवूनच टाकलंय!” (प्रे. कार्यं ५:२८) त्यांची धमकी अगदी स्पष्ट होती: प्रचार थांबवा, नाहीतर. . . .
२ प्रेषित आता काय करणार होते? प्रचार करण्याची आज्ञा त्यांना येशूने दिली होती, ज्याला देवाने हा अधिकार दिला होता. (मत्त. २८:१८-२०) प्रेषित माणसांच्या भीतीने शांत बसणार होते का? की ठाम राहून प्रचार करत राहणार होते? मुख्य मुद्दा हा होता: देवाची आज्ञा पाळावी की माणसांची? क्षणभराचाही उशीर न करता पेत्र सर्व प्रेषितांच्या वतीने बोलतो. त्याचं बोलणं स्पष्ट आणि ठाम होतं.
३ न्यायसभेने धमकी दिली तेव्हा प्रेषितांनी कसं उत्तर दिलं हे जाणून घ्यायला आपण सर्व खरे ख्रिस्ती उत्सुक आहोत. कारण प्रचार करण्याची आज्ञा आपल्यालाही लागू होते. देवाने दिलेली प्रचाराची आज्ञा पाळताना आपल्यालाही विरोधाचा सामना करावा लागू शकतो. (मत्त. १०:२२) विरोधक आपल्या कामावर बंधनं आणण्याचा किंवा त्यावर पूर्ण बंदी टाकण्याचा प्रयत्न करतील. अशा वेळी आपण काय करणार? न्यायसभेत प्रेषितांवर खटला भरण्यापूर्वी ज्या घटना घडल्या आणि त्यांनी जी भूमिका घेतली, त्यावर विचार केल्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होईल.a
“यहोवाच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले” (प्रे. कार्यं ५:१२-२१क)
४, ५. कयफा आणि सदूकी लोक का “ईर्ष्येने पेटून उठले” होते?
४ आपल्याला माहीत आहे की जेव्हा प्रेषितांना पहिल्यांदा प्रचार बंद करण्याचा आदेश दिला गेला, तेव्हा पेत्र आणि योहान म्हणाले: “ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या आणि ऐकल्या आहेत त्यांबद्दल बोलायचं आम्ही थांबवू शकत नाही.” (प्रे. कार्यं ४:२०) या घटनेनंतर पेत्र आणि योहान, तसंच इतर प्रेषितही मंदिरात प्रचार करतच राहिले. प्रेषितांनी “शलमोनच्या वऱ्हांड्यात,” आजाऱ्यांना बरं करणं आणि दुष्ट स्वर्गदूत काढणं यांसारखे अनेक मोठमोठे चमत्कार केले.b नुसती पेत्रची सावली जरी लोकांवर पडली तरी ते बरे व्हायचे! ज्यांचे आजार बरे झाले त्यांच्यापैकी अनेकांनी देवाच्या वचनाबद्दल सत्यही स्वीकारलं. यामुळे “प्रभूवर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या वाढत गेली आणि त्यांच्यात आणखी स्त्रीपुरुषांची भर पडत गेली.”—प्रे. कार्यं ५:१२-१५.
५ कयफा आणि ज्या सदूकी पंथाचा तो सदस्य होता, त्यातले लोक “ईर्ष्येने पेटून उठले” आणि त्यांनी प्रेषितांना तुरुंगात टाकलं. (प्रे. कार्यं ५:१७, १८) सदूकी इतके का रागवले होते? कारण सदूकी लोकांचा पुनरुत्थानावर विश्वास नव्हता आणि प्रेषित सर्वांना येशूच्या पुनरुत्थानाबद्दल सांगत होते. येशूवर विश्वास ठेवला तरच लोकांचा जीव वाचेल असं ते लोकांना शिकवत होते. पण जर लोकांनी येशूला आपला नेता मानलं तर रोमन सरकार त्यांना दंड देईल अशी भीती सदूकी लोकांना होती. (योहा. ११:४८) या कारणामुळेच सदूकी लोकांना प्रेषितांचं प्रचारकार्य थांबवायचं होतं.
६. आज यहोवाच्या सेवकांचा छळ होण्यामागे खासकरून कोणाचा हात आहे, आणि यामुळे आपल्याला आश्चर्य का वाटत नाही?
६ आजही यहोवाच्या सेवकांचा छळ होण्यामागे खासकरून धार्मिक विरोधकांचा हात आहे. आपलं प्रचारकार्य थांबवण्यासाठी हे लोक सरकारी अधिकाऱ्यांवर आणि प्रसार माध्यमांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. या गोष्टीचं आपल्याला आश्चर्य वाटलं पाहिजे का? नाही. आपल्या संदेशामुळे खोट्या धर्माच्या शिकवणी उघड्या पडतात. बायबलमधली सत्यं शिकल्यामुळे नम्र मनाचे लोक अंधविश्वासांपासून आणि चुकीच्या प्रथांपासून मुक्त होतात. (योहा. ८:३२) आणि याच कारणामुळे बऱ्याचदा धार्मिक नेते आपला संदेश ऐकून रागाने पेटून उठतात आणि आपला द्वेष करतात.
७, ८. स्वर्गदूताच्या आज्ञेमुळे प्रेषितांवर कोणता परिणाम झाला असेल, आणि आपण स्वतःला कोणता प्रश्न विचारला पाहिजे?
७ तुरुंगात बसून खटला सुरू व्हायची वाट पाहणाऱ्या प्रेषितांच्या मनात, ‘आपल्या विश्वासामुळे आपल्याला ठार तर मारलं जाणार नाही ना?’ असा विचार कदाचित आला असेल. (मत्त. २४:९) पण त्यांनी कधीच अपेक्षा केली नसेल असं काहीतरी त्या रात्री घडलं. “यहोवाच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले.”c (प्रे. कार्यं ५:१९) नंतर त्या स्वर्गदूताने त्यांना स्पष्ट सूचना दिली: “मंदिरात जा आणि लोकांना जीवनाचा संदेश सांगत राहा.” (प्रे. कार्यं ५:२०) या आज्ञेमुळे, आपण योग्य तेच करत होतो या गोष्टीची प्रेषितांना खातरी पटली. काहीही झालं तरी ठाम राहण्याचा त्यांचा निश्चय, त्या स्वर्गदूताच्या शब्दांमुळे आणखी पक्का झाला असेल. “दिवस उजाडल्यावर,” प्रेषित मोठ्या धैर्याने आणि दृढ विश्वासाने “मंदिरात जाऊन लोकांना शिकवू लागले.”—प्रे. कार्यं ५:२१.
८ आपण सर्वांनी स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे, ‘अशी परिस्थिती जर माझ्यावर आली तर मी धैर्याने आणि विश्वासाने प्रचार करत राहीन का?’ “देवाच्या राज्याबद्दल अगदी पूर्णपणे साक्ष” देण्याच्या महत्त्वाच्या कामात स्वर्गदूत आपल्याला मदत आणि मार्गदर्शन देतात; हे जाणून आपल्याला नक्कीच खूप धैर्य मिळतं.—प्रे. कार्यं २८:२३; प्रकटी. १४:६, ७.
‘आम्ही देवाला शासक मानून त्याची आज्ञा पाळली पाहिजे’ (प्रे. कार्यं ५:२१ख-३३)
“मग त्यांनी त्यांना आणलं आणि न्यायसभेपुढे उभं केलं.”—प्रे. कार्यं ५:२७
९-११. न्यायसभेने प्रचार थांबवायला सांगितलं तेव्हा प्रेषितांनी काय केलं, आणि त्यांनी खऱ्या ख्रिश्चनांसमोर कोणतं उदाहरण मांडलं?
९ कयफा आणि यहुदी न्यायसभेचे इतर न्यायाधीश आता प्रेषितांवर खटला चालू करणार होते. तुरुंगात जे झालं होतं त्याबद्दल माहीत नसल्यामुळे त्यांनी प्रेषितांना आणण्यासाठी आपल्या माणसांना पाठवलं. ती माणसं तिथे गेली तेव्हा प्रेषित तिथे नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. पण “तुरुंगाचे दरवाजे कुलूप लावून नीट बंद केलेले [त्यांना] दिसले आणि दरवाजांवर पहारेकरीही उभे असलेले दिसले.” हे पाहून त्यांना किती आश्चर्य झालं असेल याचा विचार करा. (प्रे. कार्यं ५:२३) थोड्या वेळातच मंदिराच्या अधिकाऱ्याला कळलं की प्रेषित पुन्हा मंदिरात गेले होते आणि ज्या कामाबद्दल त्यांना तुरुंगात टाकलं होतं तेच काम ते करत होते. ते येशूबद्दल साक्ष देत होते! त्यामुळे मंदिराचा अधिकारी आणि त्याची माणसं लगेच मंदिराकडे गेली आणि त्यांनी प्रेषितांना धरून परत न्यायसभेत आणलं.
१० आपण या अध्यायाच्या सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे, त्या चिडलेल्या धार्मिक नेत्यांनी प्रेषितांना, ‘प्रचार थांबवा’ असं स्पष्ट शब्दांत सांगितलं. त्यावर प्रेषितांनी काय केलं? सर्वांच्या वतीने पेत्र धैर्याने बोलला: “आम्ही माणसांपेक्षा देवाची आज्ञा पाळली पाहिजे.” (प्रे. कार्यं ५:२९) अशा प्रकारे प्रेषितांनी सर्व खऱ्या ख्रिश्चनांसाठी एक उदाहरण मांडलं. आपण मानवी शासकांच्या आज्ञेत नक्कीच राहिलं पाहिजे. पण जेव्हा ते आपल्याला देवाने आज्ञा दिलेल्या गोष्टी करू देत नाहीत, किंवा त्याला मान्य नसलेल्या गोष्टी करायची सक्ती करतात; तेव्हा आपण त्यांच्याऐवजी देवाच्या आज्ञेचं पालन करतो. त्यामुळे आजच्या काळात जरी, “वरिष्ठ” अधिकाऱ्यांनी आपल्या प्रचार कामावर बंदी आणली, तरी आपण आनंदाचा संदेश घोषित करण्याचं काम बंद करणार नाही. कारण देवाने आपल्याला ही आज्ञा दिली आहे. (रोम. १३:१) याउलट, आपण सावध राहून देवाच्या राज्याबद्दल पूर्णपणे साक्ष देण्याचे वेगवेगळे मार्ग शोधत राहू.
११ प्रेषितांनी धैर्याने दिलेलं उत्तर ऐकून आधीच चिडलेले न्यायाधीश आणखीनच भडकले. त्यांनी प्रेषितांना “ठार मारायचा” निश्चय केला. (प्रे. कार्यं ५:३३) या धाडसी आणि आवेशी साक्षीदारांना आता त्यांच्या विश्वासासाठी मृत्यूचा सामना करावा लागणार, हे जवळजवळ निश्चित होतं. पण त्यांनी अपेक्षाही केली नव्हती अशा मार्गाने त्यांना मदत मिळाली!
“तुम्ही त्यांच्यावर कधीच विजय मिळवू शकणार नाही” (प्रे. कार्यं ५:३४-४२)
१२, १३. (क) गमलियेलने आपल्या सहकाऱ्यांना कोणता सल्ला दिला, आणि त्यांनी काय केलं? (ख) आज यहोवा आपल्या लोकांना कोणत्या मार्गाने मदत करू शकतो, आणि त्याने आपल्याला “न्यायनीतीने वागल्यामुळे” दुःख सोसू दिलं, तरी आपण कोणती खातरी बाळगू शकतो?
१२ गमलियेल नावाचा एक परूशी न्यायसभेत बोलण्यासाठी उभा राहिला; “तो नियमशास्त्राचा शिक्षक होता आणि सगळे त्याचा आदर करायचे.”d या न्यायाधीशाबद्दल त्याच्या सहकाऱ्यांनाही खूप आदर असावा. कारण त्याने न्यायालयाची कार्यवाही आपल्या हातात घेतली; इतकंच नाही तर त्याने “प्रेषितांना काही वेळ बाहेर पाठवायची आज्ञा दिली.” (प्रे. कार्यं ५:३४) याआधी ज्या लोकांनी बंड केलं होतं, त्यांच्या नेत्यांचा मृत्यू झाल्यावर त्यांनीही बंड करण्याचं सोडून दिलं होतं अशी गमलियेल त्यांना आठवण करून देतो. प्रेषितांचा नेता येशू याचा नुकताच मृत्यू झाला असल्यामुळे गमलियेल न्यायसभेला प्रेषितांसोबत धीराने वागायला सांगतो. गमलियेलचा तर्क पटण्यासारखा असतो; तो म्हणतो: “तुम्ही या माणसांच्या भानगडीत पडू नका, त्यांना जाऊ द्या. कारण ही योजना किंवा हे कार्य माणसांचं असेल तर ते नष्ट होईल. पण जर का ते देवाचं असलं, तर तुम्ही त्यांच्यावर कधीच विजय मिळवू शकणार नाही. शिवाय, तुम्ही खुद्द देवाशी लढणारे ठराल.” (प्रे. कार्यं ५:३८, ३९) न्यायाधीश त्याचा सल्ला ऐकतात. पण तरीही ते प्रेषितांना फटके देण्याची आज्ञा देतात आणि “येशूच्या नावाने न बोलण्याची आज्ञा देऊन” त्यांना जाऊ देतात.—प्रे. कार्यं ५:४०.
१३ त्या काळाप्रमाणे आजही यहोवा त्याच्या लोकांना मदत करण्यासाठी गमलियेलसारख्या प्रतिष्ठित लोकांना उभं करू शकतो. (नीति. २१:१) शक्तिशाली शासकांनी, न्यायाधीशांनी आणि कायदे बनवणाऱ्यांनी आपल्या इच्छेप्रमाणे वागावं यासाठी यहोवा त्याच्या पवित्र शक्तीचा वापर करू शकतो. (नहे. २:४-८) पण “न्यायनीतीने वागल्यामुळे” कधीकधी आपल्याला दुःख सोसावं लागू शकतं. यहोवाने जरी आपल्याला हे दुःख सहन करू दिलं तरी आपण दोन गोष्टींची खातरी बाळगू शकतो. (१ पेत्र ३:१४) पहिली म्हणजे देव आपल्याला सहनशक्ती देईल. (१ करिंथ. १०:१३) दुसरी म्हणजे विरोधक देवाचं कार्य कधीच बंद करू शकणार नाहीत.—यश. ५४:१७.
१४, १५. (क) प्रेषितांना फटके मारल्यानंतर त्यांनी काय केलं, आणि का? (ख) यहोवाचे लोक आनंदाने छळ सहन करतात हे दाखवणारा एक अनुभव सांगा.
१४ फटके देण्यात आल्यामुळे प्रेषितांचा आवेश कमी झाला का? किंवा ते घाबरून गेले का? मुळीच नाही! उलट, “ते आनंदाने न्यायसभेतून बाहेर गेले.” (प्रे. कार्यं ५:४१) वेदना झाल्यामुळे तर कोणालाच आनंद होत नाही. मग हा “आनंद” कशाबद्दल होता? यहोवाला एकनिष्ठ राहिल्याबद्दल आणि येशूच्या पावलांवर पाऊल ठेवून चालल्याबद्दल आपला छळ केला गेला, हे माहीत असल्यामुळे त्यांना आनंद झाला होता.—मत्त. ५:११, १२.
१५ पहिल्या शतकातल्या आपल्या भाऊबहिणींप्रमाणेच, आपल्याला आनंदाच्या संदेशासाठी दुःख सहन करावं लागतं, तेव्हा आपण ते आनंदाने सोसतो. (१ पेत्र ४:१२-१४) आपल्याला धमकावलं जातं, छळलं जातं किंवा तुरुंगात टाकलं जातं, तेव्हा आपल्याला आनंद होतो असं नाही. तर आपली एकनिष्ठा टिकवून ठेवल्यामुळे आपल्याला खूप समाधान मिळतं. हेनरिक डॉरनिक यांच्या उदाहरणावर विचार करा. त्यांनी अत्याचारी सरकारांच्या शासनात वर्षानुवर्षं क्रूर वागणूक सहन केली. ते आपली आठवण सांगताना म्हणतात, की ऑगस्ट १९४४ मध्ये अधिकाऱ्यांनी त्यांना आणि त्यांच्या भावाला यातना शिबिरात पाठवण्याचं ठरवलं. ते अधिकारी म्हणाले: “त्यांना काही करायला लावणं अशक्य आहे. त्यांच्या विश्वासामुळे मरणही आलं तरी त्यांना आनंदच होतो.” ब्रदर डॉरनिक म्हणतात: “मला माझ्या विश्वासासाठी मरण्याची इच्छा नक्कीच नव्हती; पण यहोवाला एकनिष्ठ असल्यामुळे माझ्यावर दुःख आलं तेव्हा मी ते धीराने आणि स्वाभिमानाने सहन केलं, याचा मला आनंद वाटतो.”—याको. १:२-४.
प्रेषितांप्रमाणेच आपणही “घरोघरी जाऊन” प्रचार करतो
१६. प्रेषितांना अगदी पूर्णपणे साक्ष द्यायची होती हे त्यांनी कसं दाखवलं, आणि प्रचारकार्याच्या त्यांच्या या पद्धतीचं आपण कसं अनुकरण करतो?
१६ थोडाही वेळ न घालवता प्रेषितांनी पुन्हा आपलं प्रचारकार्य सुरू केलं. त्यांनी धाडसाने, “दररोज मंदिरात आणि घरोघरी जाऊन” ख्रिस्ताबद्दलचा आनंदाचा संदेश सांगण्याचं काम चालू ठेवलं.e (प्रे. कार्यं ५:४२) या आवेशी प्रचारकांनी पूर्णपणे साक्ष देण्याचा निश्चय केला होता. येशूने सांगितल्याप्रमाणे, त्यांनी लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांचा संदेश सांगितला. (मत्त. १०:७, ११-१४) म्हणूनच तर ते संपूर्ण यरुशलेम त्यांच्या शिक्षणाने भरून टाकू शकले. आज यहोवाचे साक्षीदारही प्रेषितांच्या प्रचारकार्याच्या त्याच पद्धतीचं अनुकरण करतात. आपल्या क्षेत्रातल्या प्रत्येक घरी भेट देऊन आपण हे दाखवतो की आपल्याला पूर्णपणे साक्ष देण्याची इच्छा आहे. तसंच प्रत्येकाला आनंदाचा संदेश ऐकता यावा असं आपल्याला वाटतं. यहोवाने या घरोघरच्या प्रचारकार्यावर आशीर्वाद दिला आहे का? नक्कीच! आज या शेवटच्या काळात लाखो लोकांनी राज्याचा संदेश स्वीकारला आहे. अनेकांनी, यहोवाचे साक्षीदार घरी आले तेव्हाच हा आनंदाचा संदेश पहिल्यांदा ऐकला.
“आवश्यक कामासाठी” योग्य पुरुषांची निवड (प्रे. कार्यं ६:१-६)
१७-१९. मंडळीत फूट पडेल अशी कोणती समस्या निर्माण झाली, आणि ती सोडवण्यासाठी प्रेषितांनी शिष्यांना काय सांगितलं?
१७ या नवीन मंडळीपुढे आता एक समस्या उभी राहिली. या समस्येमुळे निर्माण होणारा धोका जरी स्पष्टपणे दिसून येत नसला, तरी त्यामुळे मंडळीत फूट पडण्याची शक्यता होती. हा धोका काय होता? बाप्तिस्मा घेत असलेले बरेच शिष्य इतर ठिकाणांहून यरुशलेमला आलेल्या लोकांपैकी होते. आणखी ज्ञान घेण्याची इच्छा असल्यामुळे हे लोक यरुशलेममध्येच थांबले होते. त्यांच्या जेवणासाठी आणि इतर गरजांसाठी यरुशलेममध्ये राहणाऱ्या शिष्यांनी स्वेच्छेने दान दिलं. (प्रे. कार्यं २:४४-४६; ४:३४-३७) पण आता एक नाजूक परिस्थिती निर्माण झाली. जेवणाच्या “दररोजच्या अन्नाच्या वाटपात” ग्रीक विधवांकडे “दुर्लक्ष केलं जात होतं.” (प्रे. कार्यं ६:१) पण हिब्रू बोलणाऱ्या विधवांची मात्र चांगली काळजी घेतली जात होती. म्हणजेच खरी समस्या भेदभावाची होती. आणि भेदभाव ही एक अशी समस्या आहे जिच्यामुळे मंडळीत मोठी फूट पडू शकते.
१८ पहिल्या शतकात प्रेषित, नियमन मंडळ म्हणून काम पाहायचे. त्यांनी ओळखलं की आपण देवाचं वचन शिकवायचं सोडून “जेवणाचं वाटप करणं योग्य ठरणार नाही.” (प्रे. कार्यं ६:२) ही समस्या सोडवण्यासाठी त्यांनी शिष्यांना अशा सात पुरुषांना निवडायला सांगितलं जे “बुद्धीने आणि पवित्र शक्तीने भरलेले आहेत.” प्रेषित त्यांना या “आवश्यक कामासाठी” नेमणार होते. (प्रे. कार्यं ६:३) या कामासाठी योग्य पुरुषांची गरज होती कारण प्रश्न फक्त जेवणाच्या वाटपाचा नव्हता; तर त्यांना पैशांचे व्यवहार करणं, सामानाची खरेदी करणं आणि काळजीपूर्वक हिशोब ठेवणं या सर्व गोष्टी कराव्या लागणार होत्या. ज्या पुरुषांना निवडण्यात आलं त्या सर्वांची ग्रीक नावं होती. कदाचित यामुळे ग्रीक विधवांना या बांधवांकडून मदत स्वीकारणं जास्त सोपं गेलं असेल. सुचवलेल्या नावांवर प्रार्थनापूर्वक विचार केल्यानंतर प्रेषितांनी त्या सात पुरुषांना या “आवश्यक कामासाठी” नेमलं.f
१९ जेवणाच्या वाटपाचं काम मिळाल्यामुळे आता हे सात बांधव आनंदाचा संदेश घोषित करण्याच्या जबाबदारीतून मुक्त झाले होते का? नक्कीच नाही! स्तेफन हा त्या सात बांधवांपैकी एक होता. पण तो एक धाडसी आणि प्रभावी साक्षीदार ठरणार होता. (प्रे. कार्यं ६:८-१०) फिलिप्प हाही त्या सात बांधवांपैकी होता आणि त्याला “प्रचारक” असं म्हणण्यात आलं आहे. (प्रे. कार्यं २१:८) यावरून हे दिसतं की ते सात पुरुष पुढेही आवेशाने राज्याचा प्रचार करत राहिले.
२०. आज देवाचे सेवक प्रेषितांचं अनुकरण कसं करतात?
२० या बाबतीतही आज यहोवाचे लोक प्रेषितांच्या उदाहरणाचं अनुकरण करतात. मंडळीत जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी ज्या पुरुषांची नावं सुचवली जातात ते देवाच्या वचनाप्रमाणे वागत आहेत आणि त्यांच्यावर पवित्र शक्ती कार्य करत आहे, हे दिसून आलं पाहिजे. जे पुरुष बायबलमध्ये दिलेल्या आवश्यक पात्रता पूर्ण करतात त्यांना नियमन मंडळाच्या मार्गदर्शनानुसार मंडळ्यांमध्ये वडील आणि सहायक सेवक म्हणून नियुक्त करण्यात येतं.g (१ तीम. ३:१-९, १२, १३) जे या पात्रता पूर्ण करतात त्यांना पवित्र शक्तीद्वारे नियुक्त करण्यात आलं आहे, असं म्हटलं जाऊ शकतं. हे मेहनती बांधव बरीच आवश्यक कामं करतात. उदाहरणार्थ, ज्या वृद्ध भाऊबहिणींना खरोखरच गरज असते त्यांच्यासाठी हे वडील व्यावहारिक मार्गांनी मदतीची व्यवस्था करतात. (याको. १:२७) यासोबतच, काही वडील राज्य सभागृहांच्या बांधकामाचं, अधिवेशनांच्या आयोजनाचं किंवा स्थानिक इस्पितळ संपर्क समितीचंही काम करतात. सहायक सेवकांकडे जरी मेंढपाळ भेटी करण्याची आणि मंडळीला शिकवण्याची जबाबदारी नसली, तरी ते इतर अनेक कामं करतात. अशा सर्व बांधवांनी आपल्या मंडळीतल्या आणि संघटनेत मिळणाऱ्या इतर जबाबदाऱ्यांसोबत राज्याविषयी आनंदाचा संदेश सांगण्याची देवाने दिलेली जबाबदारीही योग्य प्रकारे पूर्ण केली पाहिजे.—१ करिंथ. ९:१६.
“देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला” (प्रे. कार्यं ६:७)
२१, २२. नवीनच स्थापन झालेल्या मंडळीवर यहोवाचा आशीर्वाद होता हे कशावरून दिसतं?
२१ नवीनच स्थापन झालेल्या मंडळीवर बाहेरून छळाची आणि आतून, फूट पडण्याचा धोका निर्माण करणारी समस्या आली. पण यहोवाच्या मदतीमुळे मंडळीने या समस्यांचा सामना केला. यहोवाचा त्या मंडळीवर आशीर्वाद होता हे स्पष्ट होतं कारण असं म्हणण्यात आलं: “देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला आणि यरुशलेममध्ये शिष्यांची संख्या झपाट्याने वाढत गेली. तसंच, याजकांपैकीही बऱ्याच जणांनी विश्वास स्वीकारला.” (प्रे. कार्यं ६:७) प्रेषितांची कार्यं या पुस्तकात या मंडळीच्या वाढीबद्दल सांगितलेल्या अनेक अहवालांपैकी हा फक्त एक अहवाल आहे. (प्रे. कार्यं ९:३१; १२:२४; १६:५; १९:२०; २८:३१) आज जेव्हा जगभरातून आपल्याला राज्याच्या प्रचार कामाच्या वाढीबद्दल अनेक बातम्या ऐकायला मिळतात, तेव्हा आपल्यालाही आनंद होत नाही का?
२२ इ.स. पहिल्या शतकात, रागाने पेटलेल्या धार्मिक नेत्यांनी बांधवांचा छळ करणं थांबवलं नाही. लवकरच बांधवांना आणखी भयंकर छळाचा सामना करावा लागणार होता. आपण पुढच्या अध्यायात पाहणार आहोत, की कशा प्रकारे स्तेफनला या तीव्र छळाचा सामना करावा लागला.
a “सन्हेद्रिन—यहुदी लोकांचं उच्च न्यायालय” ही चौकट पाहा.
b शलमोनचा वऱ्हांडा हा मंदिराच्या पूर्वेकडून प्रवेश करण्याचा छत असलेला मार्ग होता, जिथे यहुदी लोक एकत्र जमायचे.
c प्रेषितांची कार्यं या पुस्तकात स्वर्गदूतांचा जवळजवळ २० वेळा उल्लेख करण्यात आला आहे, त्यांपैकी हा पहिला उल्लेख आहे. याआधी प्रेषितांची कार्यं १:१० या वचनात स्वर्गदूतांचा स्पष्ट उल्लेख नसला, तरी त्यांना “पांढरेशुभ्र कपडे घातलेली . . . माणसं” असं म्हणण्यात आलं आहे.
d “गमलियेल—रब्बींमध्ये नावाजलेला” ही चौकट पाहा.
e “‘घरोघरी जाऊन’ प्रचार करणं” ही चौकट पाहा.
f या बांधवांकडे वडिलांसाठी असलेल्या आवश्यक पात्रता नक्कीच असतील, कारण या “आवश्यक कामासाठी” नेमलं जाणं ही एक मोठी जबाबदारी होती. पण ख्रिस्ती मंडळीत वडिलांना नेमकं कधीपासून नियुक्त केलं जाऊ लागलं, याबद्दल बायबलमध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं नाही.
g पहिल्या शतकात, योग्यता असलेल्या भावांवर मंडळीतल्या वडिलांना नेमायची जबाबदारी होती. (प्रे. कार्यं १४:२३; १ तीम. ५:२२; तीत १:५) आज, नियमन मंडळ विभागीय पर्यवेक्षकांना नेमतं आणि या पर्यवेक्षकांवर मंडळीतल्या वडिलांना आणि सहायक सेवकांना नेमायची जबाबदारी असते.