वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w17 ऑक्टोबर पृ. ७-११
  • “कार्यांतून आणि अगदी खऱ्‍या मनाने” प्रेम करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “कार्यांतून आणि अगदी खऱ्‍या मनाने” प्रेम करा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • खरं प्रेम दाखवणं म्हणजे काय?
  • कार्यांतून आणि खऱ्‍या मनाने प्रेम कसं दाखवता येईल?
  • प्रेम—एक मौल्यवान गुण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • प्रीतीने तुमची उन्‍नती होत जावी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • तुमचं प्रेम थंड होऊ देऊ नका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • “त्यात प्रीती श्रेष्ठ आहे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
w17 ऑक्टोबर पृ. ७-११
यहोवाचे साक्षीदार राज्य सभागृहात एकत्र मिळून काम करत आहेत

“कार्यांतून आणि अगदी खऱ्‍या मनाने” प्रेम करा

“आपण शब्दांनी किंवा तोंडाने नाही, तर कार्यांतून आणि अगदी खऱ्‍या मनाने प्रेम केले पाहिजे.”—१ योहा. ३:१८.

गीत क्रमांक: ३, ५०

तुम्हाला आठवतं का?

  • कोणतं प्रेम सर्वश्रेष्ठ आहे?

  • “निष्कपट” प्रेम म्हणजे काय?

  • आपलं प्रेम खरं आहे की नाही हे आपल्याला कसं समजेल?

१. कोणतं प्रेम सर्वश्रेष्ठ आहे? स्पष्ट करा. (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

योग्य तत्त्वांवर आधारित असलेलं प्रेम (अगापे) ही यहोवाकडून मिळालेली अनमोल भेट आहे. तोच या प्रेमाचा स्रोत आहे. (१ योहा. ४:७) तत्त्वांवर आधारित असलेलं हे प्रेम सर्वश्रेष्ठ प्रेम आहे. ज्या मूळ ग्रीक भाषेत बायबल लिहिण्यात आलं त्यामध्ये अशा प्रेमाला अगापे असं म्हटलं आहे. अगापे प्रेमात जिव्हाळ्याची आणि कनवाळूपणाची भावना समाविष्ट असू शकते. पण, त्यात भावनांपेक्षा आणखीही काही सामील आहे. हे प्रेम इतरांच्या हितासाठी निःस्वार्थपणे केलेल्या कार्यांतून दाखवलं जातं. असं निःस्वार्थ प्रेम आपल्याला इतरांसाठी चांगल्या गोष्टी करण्यास प्रवृत्त करतं. हे प्रेम दाखवल्यामुळे आनंद आणि जीवनाला उद्देश मिळतो.

२, ३. यहोवाने मानवांवर असलेलं आपलं निःस्वार्थ प्रेम कसं दाखवलं?

२ मानवांवर आपलं किती प्रेम आहे, हे यहोवाने आदाम आणि हव्वाची निर्मिती करण्याच्या आधीपासून दाखवून दिलं. त्याने मानवांसाठी घर म्हणून पृथ्वीची आणि तिच्यावर असलेल्या सर्व चांगल्या गोष्टींची निर्मिती केली. मानवांना फक्‍त जिवंत राहता यावं म्हणून नाही, तर जीवनाचा आनंदही घेता यावा अशा प्रकारे त्याने या घराची रचना केली. हे सर्व यहोवाने स्वतःसाठी नाही, तर मानवांसाठी तयार केलं. मानवांसाठी असलेलं हे घर बनवल्यानंतरच त्याने पहिल्या मानवी जोडप्याची रचना केली. आणि त्यांना या सुंदर पृथ्वीवर सर्वकाळाचं जीवन जगण्याची आशा दिली.

३ त्यानंतरही यहोवाने मानवांवर असलेलं त्याचं निःस्वार्थ प्रेम सर्वोत्कृष्ट मार्गाने दाखवून दिलं. आदाम आणि हव्वाने यहोवाविरुद्ध बंड केलं, तरी त्यांच्या संततीपैकी काही जण आपल्यावर प्रेम करतील याची यहोवाला पूर्ण खातरी होती. आणि म्हणूनच त्यांना वाचवण्यासाठी यहोवाने खंडणी म्हणून आपल्या पुत्राचं बलिदान दिलं. (उत्प. ३:१५; १ योहा. ४:१०) यहोवाने ज्या वेळी खंडणी बलिदानाचं अभिवचन दिलं, त्याच वेळी त्याच्या दृष्टीने जणू ते पूर्ण झालं होतं. मग, सुमारे ४००० वर्षांनंतर यहोवाने मानवांसाठी आपला एकुलता एक पुत्र दिला. (योहा. ३:१६) खरंच, यहोवाने दाखवलेल्या या प्रेमासाठी आपण त्याचे किती कृतज्ञ आहोत!

४. अपरिपूर्ण असूनसुद्धा आपण निःस्वार्थ प्रेम दाखवू शकतो, हे कशावरून म्हणता येईल?

४ अपरिपूर्ण असतानाही निःस्वार्थ प्रेम दाखवणं शक्य आहे का? हो, असं प्रेम आपण नक्कीच दाखवू शकतो. यहोवाने आपल्याला त्याच्या प्रतिरूपात निर्माण केलं आहे. म्हणजेच, आपण त्याच्या गुणांचं अनुकरण करू शकतो. निःस्वार्थ प्रेम दाखवणं आपल्यासाठी अवघड असलं, तरी ते अशक्य मुळीच नाही. हाबेलने यहोवाप्रती असलेलं आपलं निःस्वार्थ प्रेम दाखवलं. त्याने त्याच्याकडे असलेल्या सर्वोत्तम गोष्टी यहोवाला अर्पण म्हणून दिल्या. (उत्प. ४:३, ४) तसंच, नोहा घोषित करत असलेल्या संदेशाला लोकांनी प्रतिसाद दिला नाही. तरीसुद्धा, त्याने बरीच दशकं देवाच्या संदेशाचा प्रचार केला आणि त्याद्वारे आपलं निःस्वार्थ प्रेम दाखवलं. (२ पेत्र २:५) आणि, अब्राहामने आपल्या प्रिय मुलाचं बलिदान देण्याची तयारी दाखवून हे सिद्ध केलं, की यहोवावर असलेलं त्याचं प्रेम हे कोणत्याही गोष्टीपेक्षा सर्वात जास्त आहे. (याको. २:२१) या विश्‍वासू पुरुषांप्रमाणेच, आपणही प्रेम दाखवलं पाहिजे; अगदी कठीण प्रसंगांचा सामना करत असतानाही.

खरं प्रेम दाखवणं म्हणजे काय?

५. आपण कोणकोणत्या मार्गांनी खरं प्रेम दाखवू शकतो?

५ बायबल आपल्याला सांगतं, की “आपण शब्दांनी किंवा तोंडाने नाही, तर कार्यांतून आणि अगदी खऱ्‍या मनाने प्रेम केले पाहिजे.” (१ योहा. ३:१८) मग, याचा अर्थ आपण शब्दांतून आपलं प्रेम व्यक्‍त करू नये असा होतो का? मुळीच नाही. (१ थेस्सलनी. ४:१८) याचा अर्थ, “माझं तुझ्यावर प्रेम आहे” फक्‍त एवढं म्हणणं पुरेसं नाही, तर आपण ते प्रेम कार्यांतूनही दाखवलं पाहिजे. उदाहरणार्थ, आपल्या एखाद्या बांधवाला किंवा बहिणीला त्यांच्या मूलभूत गरजा भागवणंही कठीण जात असेल, तर केवळ आपले प्रेमळ शब्दच फक्‍त पुरेसे नाहीत. अशा वेळी आपल्याला आणखीही काही करण्याची गरज आहे. (याको. २:१५, १६) त्याच प्रकारे, आपलं यहोवावर आणि आपल्या शेजाऱ्‍यांवर प्रेम आहे. त्यामुळे, राज्याच्या कार्यासाठी “कामकरी” मिळावेत अशी आपण केवळ प्रार्थना करणार नाही, तर प्रचारकार्यात मेहनतही घेऊ.—मत्त. ९:३८.

६, ७. (क) “निष्कपट” प्रेम असणं म्हणजे काय? (ख) खोटं प्रेम दाखविणाऱ्‍या काही व्यक्‍तींची उदाहरणं सांगा.

६ प्रेषित योहानने म्हटलं, की आपण “कार्यांतून आणि अगदी खऱ्‍या मनाने” प्रेम केलं पाहिजे. त्यामुळे, आपलं प्रेम हे “निष्कपट” असलं पाहिजे. (रोम. १२:९; २ करिंथ. ६:६) एखादी व्यक्‍ती प्रेमळ असल्याचा दिखावा करेल. पण, ते प्रेम खरं आणि मनापासून आहे असं म्हणता येईल का? आणि प्रेम दाखवण्यामागचा तिचा हेतू चांगला असेल का? खरं प्रेम हे निष्कपट असतं, मनात कपट असताना प्रेम करणं शक्य नाही. असं प्रेम खोटं असतं आणि त्या प्रेमाला काहीच अर्थ नसतो.

७ आता आपण अशा काही व्यक्‍तींची उदाहरणं पाहू ज्यांनी खोटं प्रेम दाखवलं. एदेन बागेत सैतान हव्वाशी बोलत होता तेव्हा त्याने असं भासवलं, की तो तिच्याच भल्याचा विचार करत आहे. पण त्याने जे काही केलं त्यावरून स्पष्टपणे दिसून आलं, की त्याला तिची काळजी नव्हती. (उत्प. ३:४, ५) दावीद राजाचं उदाहरणं घ्या. अहिथोफेल हा दावीदचा मित्र होता. पण स्वतःच्या स्वार्थासाठी त्याने दावीदला दगा दिला. अहिथोफेलच्या कार्यांवरून दिसून आलं, की तो दावीदचा खरा मित्र नव्हता. (२ शमु. १५:३१) आज, धर्मत्यागी लोक आणि इतर काही जण “गोड बोलून व खुशामत करून” मंडळीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. (रोम. १६:१७, १८) असे लोक कदाचित दाखवतील, की त्यांना इतरांची खूप काळजी आहे. पण खरंतर ते स्वार्थी असतात.

८. आपण स्वतःला कोणता प्रश्‍न विचारला पाहिजे?

८ खोटं प्रेम लोकांना फसवण्यासाठी दाखवलं जातं, आणि असं करणं अतिशय लाजिरवाणं आहे. अशा प्रकारचं प्रेम दाखवून आपण लोकांना फसवू शकतो, पण यहोवाला नाही. येशूने सांगितलं की जे ढोंगीपणाने वागतात त्यांना “कडक अशी शिक्षा” करण्यात येईल. (मत्त. २४:५१) आपण यहोवाचे सेवक असल्यामुळे ढोंगीपणाने वागण्याची आपली मुळीच इच्छा नाही. त्यामुळे आपण स्वतःला विचारायला हवं: ‘माझं प्रेम खरं आहे का, की प्रेम दाखवण्याच्या बाबतीत मी स्वार्थी आणि अप्रामाणिक आहे?’ आपण “निष्कपट” प्रेम कसं दाखवू शकतो, याचे नऊ मार्ग आता आपण पाहू.

कार्यांतून आणि खऱ्‍या मनाने प्रेम कसं दाखवता येईल?

९. खरं प्रेम आपल्याला काय करण्यास प्रवृत्त करतं?

९ आपण करत असलेली कार्यं कोणी पाहत नसलं, तरी आनंदाने सेवा करा. इतरांसाठी प्रेमळ आणि चांगल्या गोष्टी करण्यास आपण नेहमी तयार असलं पाहिजे; मग या गोष्टी दुसऱ्‍यांच्या कधीही लक्षात आल्या नाहीत तरीही. (मत्तय ६:१-४ वाचा.) या बाबतीत हनन्या आणि सप्पीरा यांचा दृष्टिकोन फार चुकीचा होता. आपण दान देत आहोत ही गोष्ट इतरांच्या लक्षात यावी असं त्यांना वाटत होतं. आपण किती दान देत आहोत याबाबत ते खोटं बोलले आणि त्यांच्या ढोंगीपणाबद्दल त्यांना शिक्षाही झाली. (प्रे. कार्ये ५:१-१०) बंधुभगिनींवर आपलं प्रेम असेल, तर त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी करण्यास आपण नेहमी तयार असू. आणि याबद्दल इतरांना कळावं अशी अपेक्षासुद्धा आपण कधी करणार नाही. जे बांधव नियमन मंडळाच्या बांधवांना आध्यात्मिक अन्‍न तयार करण्यासाठी मदत करतात त्यांच्याकडून आपण एक चांगली गोष्ट शिकू शकतो. हे बांधव इतरांचं लक्ष कधीही स्वतःकडे आकर्षित करून घेत नाहीत आणि आपण कोणतं साहित्य तयार करण्यास मदत केली हेसुद्धा ते इतरांना सांगत नाहीत.

१०. आपण इतरांना आदर कसा दाखवू शकतो?

१० इतरांचा आदर करा. (रोमकर १२:१० वाचा.) येशूने आपल्या शिष्यांचे पाय धुण्याद्वारे इतरांचा आदर करण्याच्या बाबतीत एक चांगलं उदाहरण मांडलं. (योहा. १३:३-५, १२-१५) येशूसारखं नम्र होण्यासाठी आणि इतरांचा आदर करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण, अपरिपूर्ण मानवांसाठी इतरांचा आदर करणं नेहमीच सोपं नसतं. उदाहरणार्थ, नम्रता आणि आदर दाखवण्याच्या बाबतीत येशूच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करायचं, हे प्रेषितांना पवित्र आत्मा मिळेपर्यंत पूर्णपणे समजलं नव्हतं. (योहा. १३:७) आपण आपल्या शिक्षणामुळे, श्रीमंतीमुळे किंवा एखाद्या खास नेमणुकीमुळे इतरांपेक्षा चांगले आहोत असा कधीही विचार करत नाही. असं वागण्याद्वारे आपण इतरांना आदर दाखवतो. (रोम. १२:३) तसंच, इतरांची प्रशंसा केली जाते तेव्हा आपल्याला त्यांचा हेवा वाटत नाही. उलट, आपण त्यांच्यासोबत आनंद करतो; मग त्या प्रशंसेसाठी आपण काही प्रमाणात पात्र आहोत असं वाटत असलं तरीही.

११. आपण इतरांची प्रामाणिकपणे प्रशंसा का केली पाहिजे?

११ इतरांची प्रामाणिकपणे प्रशंसा करा. इतरांची प्रशंसा करण्याच्या संधी शोधा. आपल्या सर्वांना माहीत आहे की प्रशंसा केल्याने एकमेकांना “प्रोत्साहन” मिळतं. (इफिस. ४:२९) पण, प्रशंसा करताना आपण ती प्रामाणिकपणे करावी. एखाद्याची खुशामत करण्यासाठी किंवा मग आवश्‍यक सल्ला देण्याची जबाबदारी टाळण्यासाठी आपण प्रशंसा करू नये. (नीति. २९:५) आपण जर एखाद्या व्यक्‍तीची तिच्यासमोर प्रशंसा करत असलो आणि पाठीमागे तिची टीका करत असलो, तर याचा अर्थ आपण ढोंगीपणाने वागत आहोत असा होईल. प्रेषित पौलचं उदाहरण घ्या. बंधुभगिनींवर त्याचं खरं प्रेम खरं होतं. करिंथमधल्या मंडळीला त्याने पत्र लिहिलं, तेव्हा त्याने त्यांच्या चांगल्या कामाची प्रशंसा केली. (१ करिंथ. ११:२) पण, त्याच बंधुभगिनींना जेव्हा सल्ला देण्याची गरज पडली, तेव्हा त्याने तो स्पष्टपणे पण प्रेमळपणे दिला.—१ करिंथ. ११:२०-२२.

गरजू बहिणीला मदत म्हणून देण्यासाठी एक बहीण काही पैसे एका पाकीटात ठेवत आहे

बंधुभगिनींना गरजेच्या वेळी मदत करण्याद्वारे आपण त्यांना प्रेम आणि आदरातिथ्य दाखवतो (परिच्छेद १२ पाहा)

१२. आदरातिथ्य करताना आपलं प्रेम खरं आहे हे कशावरून दिसून येईल?

१२ आदरातिथ्य दाखवा. आपल्या बंधुभगिनींप्रती आपण उदारता दाखवावी अशी आज्ञा यहोवाने आपल्याला दिली आहे. (१ योहान ३:१७ वाचा.) पण आदरातिथ्य दाखवताना आपला हेतू चांगला असला पाहिजे. आपण स्वतःला विचारू शकतो: ‘मी फक्‍त माझ्या जवळच्या मित्रांना किंवा मंडळीत मी ज्यांना महत्त्वाचं समजतो त्यांनाच माझ्या घरी बोलावतो का? किंवा मग, ज्यांच्याकडून मला पुढे काही फायदा होईल अशांचाच मी पाहुणचार करतो का? की, मी अशाही बंधुभगिनींना माझ्या घरी बोलावतो ज्यांना मी ओळखत नाही आणि ज्यांच्याकडून मला काहीही फायदा होणार नाही?’ (लूक १४:१२-१४) पुढील परिस्थितींची कल्पना करा: स्वतःच्या चुकीच्या निर्णयांमुळे एखाद्या बांधवाला मदतीची गरज आहे, किंवा आपण घरी आमंत्रित केलेल्या व्यक्‍तीने कधीही त्याबद्दल आपले आभार मानले नाहीत, तर काय? अशा परिस्थितींतही, यहोवा आपल्याला जे सांगतो त्याचं आपण पालन केलं पाहिजे. यहोवा म्हणतो: “कुरकुर न करता एकमेकांचे आदरातिथ्य करा.” (१ पेत्र ४:९) चांगल्या हेतूने इतरांचं आदरातिथ्य केलं तर आपल्याला खरा आनंद मिळेल.—प्रे. कार्ये २०:३५.

१३. (क) आपल्याला धीर दाखवण्याची गरज केव्हा पडू शकते? (ख) दुर्बळ असलेल्या आपल्या बंधुभगिनींची आपण कशा प्रकारे मदत करू शकतो?

१३ दुर्बळांना मदत करा. बायबल आपल्याला आज्ञा देतं: “दुर्बळांना आधार द्या आणि सर्वांशी सहनशीलतेने वागा.” या आज्ञेवरून, आपलं प्रेम खरं आहे की नाही याची परीक्षा होऊ शकते. (१ थेस्सलनी. ५:१४) अनेक बांधव जे विश्‍वासात ‘दुर्बळ’ होते ते नंतर मजबूत झाले. पण इतर काहींच्या बाबतीत कदाचित आपल्याला आणखी सहनशीलता आणि धीर दाखवावा लागेल. अशा बंधुभगिनींना आपण कशा प्रकारे मदत करू शकतो? त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण बायबलचा उपयोग करू शकतो किंवा आपल्यासोबत प्रचारकार्यात जाण्यासाठी बोलावू शकतो. किंवा मग, ते जेव्हा आपल्या भावना व विचार व्यक्‍त करतात तेव्हा काळजीपूर्वक ऐकू शकतो. आपले बंधुभगिनी विश्‍वासात दुर्बळ आहेत किंवा मजबूत आहेत असा फरक करण्याऐवजी, आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की आपल्या सर्वांमध्येच काही चांगल्या गोष्टी आणि काही कमतरता असतात. प्रेषित पौलनेसुद्धा कबूल केलं की त्याच्यात काही कमतरता होत्या. (२ करिंथ. १२:९, १०) शिवाय, आपल्या सर्वांनाच एकमेकांच्या मदतीची आणि प्रोत्साहनाची गरज असते.

१४. बंधुभगिनींसोबत शांतिपूर्ण नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी आपण काय करण्यास तयार असलं पाहिजे?

१४ शांती प्रस्थापित करा. बंधुभगिनींसोबत आपला शांतिपूर्ण नातेसंबंध असणं फार महत्त्वाचं आहे. आपल्यावर अन्याय झाला आहे किंवा आपल्याविषयी इतरांना काही गैरसमज झाला आहे असं वाटत असलं, तरी शांती टिकवून ठेवण्यासाठी होता होईल ते प्रयत्न करण्याची गरज आहे. (रोमकर १२:१७, १८ वाचा.) किंवा, आपल्यामुळे जर इतरांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर आपण त्यांची माफी मागण्याची गरज आहे. पण माफी मागताना आपण प्रामाणिक असायला हवं. उदाहरणार्थ, “मला माफ कर, पण मला वाटतं तुझा काहीतरी गैरसमज झालाय,” असं म्हणण्याऐवजी, स्वतःची चूक कबूल करून “माझं चुकलं, मला माफ कर,” असं म्हणणं अधिक योग्य ठरेल. खासकरून, वैवाहिक नातेसंबंधात शांती असणं खूप गरजेचं आहे. चारचौघांत असताना आपल्या जोडीदारावर आपलं किती प्रेम आहे हे कदाचित आपण दाखवत असू, पण खासगी जीवनात मात्र त्याच्याशी बोलतही नसू, किंवा टोचून बोलत असू व मारहाण करत असू तर ते चुकीचं ठरेल.

१५. एखाद्याला खऱ्‍या मनाने क्षमा केली आहे हे आपण कसं दाखवू शकतो?

१५ मोठ्या मनाने क्षमा करा. एखाद्याने आपल्याला दुखावलं, तर आपण त्याला क्षमा करतो आणि त्याच्याविषयी मनात कोणतीही कटुता बाळगत नाही. आपण दुखावले गेलो आहोत याची त्या व्यक्‍तीला जाणीव नसते, अगदी तेव्हाही आपण तिला मोठ्या मनाने क्षमा करतो. बायबल आपल्याला सांगतं: “प्रेमाने एकमेकांचे सहन करा. तुम्हाला एकमेकांशी बांधून ठेवणाऱ्‍या शांतीच्या बंधनात, पवित्र आत्म्यामुळे उत्पन्‍न होणारी एकता टिकवून ठेवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा.” (इफिस. ४:२, ३) असं करण्याद्वारे आपण इतरांना मोठ्या मनाने क्षमा करतो. एखाद्या व्यक्‍तीला खऱ्‍या मनाने क्षमा करण्यासाठी, तिने आपल्याविरुद्ध केलेल्या गोष्टींवर विचार करण्याचं आपण सोडून दिलं पाहिजे. कारण, “प्रेम . . . आपल्याविरुद्ध केलेल्या चुकांचा हिशोब ठेवत नाही.” (१ करिंथ. १३:४, ५) आपण जर मनात कटुता बाळगली, तर त्या बांधवासोबत किंवा बहिणीसोबत, तसंच यहोवासोबत असलेला आपला नातेसंबंध बिघडेल. (मत्त. ६:१४, १५) एखादी व्यक्‍ती आपलं मन दुखावते तेव्हा तिच्यासाठी प्रार्थना करण्याद्वारे आपण हे दाखवून देतो की आपण तिला खऱ्‍या मनाने क्षमा केली आहे.—लूक ६:२७, २८.

१६. यहोवाच्या सेवेत मिळणाऱ्‍या खास नेमणुकीकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे?

१६ स्वतःच्या हिताचा त्याग करा. यहोवाच्या सेवेत जेव्हा आपल्याला एखादी खास नेमणूक मिळते, तेव्हा आपण “केवळ स्वतःचे नाही, तर दुसऱ्‍याचे हित” पाहतो. असं करण्याद्वारे आपण इतरांना खरं प्रेम दाखवतो. (१ करिंथ. १०:२४) उदाहरणार्थ, अधिवेशनांत आणि संमेलनांत अटेंडंट म्हणून सेवा करणाऱ्‍या बांधवांना इतरांपेक्षा लवकर सभागृहात जायला मिळतं. त्यामुळे स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबीयांसाठी चांगल्या जागा राखून ठेवण्याचा त्यांना मोह होऊ शकतो. पण, अटेंडंट जेव्हा स्वतःसाठी चांगल्या जागेऐवजी दुसरी एखादी जागा निवडतात, तेव्हा इतरांप्रती असलेलं त्यांचं निःस्वार्थ प्रेम ते दाखवून देतात. त्यांच्या चांगल्या उदाहरणाचं तुम्ही अनुकरण करू शकता का?

१७. एखादी ख्रिस्ती व्यक्‍ती गंभीर पाप करते, तेव्हा खरं प्रेम तिला काय करण्यास प्रवृत्त करेल?

१७ गुप्तपणे करत असलेलं पाप थांबवा आणि ते कबूल करा. काही ख्रिश्‍चनांनी गंभीर पाप करून ते लपवण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचित आपण केलेल्या कृत्याची त्यांना लाज वाटत असेल. किंवा आपण केलेलं पाप इतरांच्या लक्षात येईल तेव्हा त्यांची निराशा होईल अशी त्यांना भीती वाटत असेल. (नीति. २८:१३) पण झालेलं पाप लपवून ठेवल्याने आपण खरं प्रेम दाखवत नाही. कारण, त्यामुळे पाप करणाऱ्‍या व्यक्‍तीला आणि इतरांनाही त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. ते कसं? कदाचित, मंडळीवर यहोवाचा पवित्र आत्मा व आशीर्वाद राहणार नाही आणि त्या मंडळीमध्ये शांती राहणार नाही. (इफिस. ४:३०) म्हणूनच, एखादी ख्रिस्ती व्यक्‍ती जेव्हा गंभीर पाप करते, तेव्हा खरं प्रेम तिला मंडळीतल्या वडिलांशी बोलण्यासाठी आणि त्यांच्याकडून मदत मिळवण्यासाठी प्रवृत्त करेल.—याको. ५:१४, १५.

१८. खऱ्‍या मनाने प्रेम करणं किती महत्त्वाचं आहे?

१८ सर्व गुणांमध्ये प्रेम श्रेष्ठ आहे. (१ करिंथ. १३:१३) या गुणामुळे, येशूचे खरे अनुयायी आणि प्रेमाचा स्रोत असलेल्या यहोवाचं अनुकरण करणारे कोण आहेत हे लोकांना दिसून येतं. (इफिस. ५:१, २) पौलने म्हटलं की त्याच्यामध्ये प्रेमाचा गुण नसेल तर तो काहीच नाही. (१ करिंथ. १३:२) तर मग, आपण प्रत्येक जण फक्‍त “शब्दांनी किंवा तोंडाने नाही, तर कार्यांतून आणि अगदी खऱ्‍या मनाने प्रेम” करत राहू या.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा