ख्रिस्ती कुटुंब वयस्करांना मदत देते
“उतारवयात माझा त्याग करु नको; माझी शक्ती क्षीण होत चालली असता मला सोडू नको.”—स्तोत्रसंहिता ७१:९.
१. अनेक संस्कृतींमध्ये वयस्करांना कशी वागणूक दिली जाते?
“वयस्करांना दिल्या जाणाऱ्या वाईट वागणूकीच्या निरीक्षणात असे दिसून आले की सात मधील जवळजवळ सहा (८६%) लोकांना त्यांच्याच कुटुंबाने वाईट वागणूक दिली,” असे द वाल स्ट्रिट जर्नल याने म्हटले. मॉडर्न मॅच्युरिटी या मासिकाने नमूद केले की: “वयस्करांना दिली जाणारी वाईट वागणूक हा अलिकडील [कौटुंबिक हिंसाचार] आहे, जो आता गुप्तस्थितीतून बाहेर येऊन अमेरिकेच्या वर्तमानपत्रातून प्रगट होत आहे.” होय, अनेक संस्कृतीतील वयस्कर, असभ्य वाईट वागणूकीचे शिकार झालेले आहेत व त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आमचा हा असा काळ, अनेकजन “स्वार्थी, . . . उपकार न स्मरणारी, बेइमानी, ममताहीन” असतील अशांचा आहे.—२ तीमथ्य ३:१-३.
२. इब्री शास्त्रवचनानुसार, यहोवा वयस्करांकडे कसे पाहतो?
२ तथापि, प्राचीन इस्राएलात वयस्करांना अशारितीने वागणूक दिली जात नव्हती. नियमशास्त्रात असे लिहिले होते: “पिकल्या केसासमोर उठून उभा राहा; वृद्धाला मान दे; आपल्या देवाचे भय बाळग; मी परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] आहे.” बुद्धिमान नीतीसूत्राचे ईश्वरप्रेरित पुस्तक आम्हाला सल्ला देते: “तू आपल्या जन्मदात्या बापाचे ऐक, आपल्या वृद्ध झालेल्या आईला तू तुच्छ मानू नको.” ते आज्ञा देते: “माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नको.” मोशेच्या नियमशास्त्राने वयस्कर स्त्री-पुरुषांना आदर आणि मान देण्यास शिकवले. खात्रीने, वयस्करांचा आदर केला जावा अशी अपेक्षा यहोवा करतो.—लेवीय १९:३२; नीतीसूत्रे १:८; २३:२२.
पवित्र शास्त्र काळात वयस्करांची घेतलेली काळजी
३. याकोबाने त्याच्या वृद्ध पित्यासाठी दयाळूपणा कसा दाखवला?
३ आदर हा केवळ शब्दांनी नव्हे तर विचारी कार्यांद्वारे दाखवायचा होता. योसेफाने त्याच्या वृद्ध पित्याबद्दल फार दया दाखवली. त्याची इच्छा होती की याकोबाने कनान ते इजिप्त म्हणजे जवळजवळ ३०० किलोमीटरपेक्षा अधिक दूरचा प्रवास करावा. यास्तव योसेफाने याकोबाला, “मिसरातील उत्कृष्ट पदार्थ लादलेले दहा गाढव आणि धान्य, भाकरी व वाटेसाठी इतर अन्नसामग्री यांनी लादलेल्या दहा गाढवी रवाना केल्या.” याकोब गोशेन येथे आल्यावर योसेफ त्याच्याकडे गेला आणि “त्याच्या गळ्यास त्याने मिठी मारली आणि त्याच्या गळ्यात गळा घालून तो फार वेळ रडला.” योसेफाने त्याच्या पित्याबद्दल गाढ आपुलकी दाखवली. वयस्करांची काळजी घेण्याविषयीचे ते किती प्रेरक उदाहरण!—उत्पत्ती ४५:२३; ४६:५, २९.
४. अनुकरण करण्यासाठी रुथचे उदाहरण का उत्तम आहे?
४ वृद्धांना दया दाखवण्यात अनुकरण करण्याजोगे आणखी एक सुंदर उदाहरण रूथचे आहे. परदेशी असतानाही ती तिच्या यहुदी, वयस्कर विधवा सासू नामीबरोबर जडून राहिली. तिने तिच्या स्वतःच्या लोकांचा त्याग केला आणि दुसरा पती न मिळवण्याची जोखीम तिने पत्करली. नामीने रुथला तिच्या लोकांकडे परत जाण्यासाठी सांगितले तेव्हा, तिने पवित्र शास्त्रात असणाऱ्या अतिशय सुरेख अशा शब्दांनी उत्तर दिले: “मला सोडून जा आणि माझ्यामागे न येता परत जा असा मला आग्रह करु नका; तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन, तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव; तुम्ही मराल तेथे मी मरेन व तेथेच माझी मुठमाती होईल; मृत्यू खेरीज तुमचा माझा कशानेही वियोग झाला तर परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] मला तदनुसार पारिपत्य करो, किंबहुना अधिक करो.” (रुथ १:१६, १७) रुथने, वृद्ध बवाजबरोबर लेवीय विवाह पद्धतीने विवाह करण्याची इच्छा दाखवण्याचा देखील चांगला गुण प्रदर्शित केला.—रूथ, अध्याय २ ते ४.
५. लोकांबरोबर वागताना येशूने कोणते गुण प्रदर्शित केले?
५ येशूने लोकांबरोबर वागताना अशाच प्रकारचे उदाहरण मांडले. तो सहनशील, दयाशील, कृपाळू आणि तजेला देणारा होता. त्याने ३८ वर्षापासून अपंग व चालण्यास असमर्थ असणाऱ्या गरीब मनुष्याविषयी व्यक्तिगत आस्था दाखवली व त्याला बरे केले. त्याने विधवांसाठी विचारीपणा दाखवला. (लूक ७:११-१५; योहान ५:१-९) वधस्तंभावरचे दुःखदायक मरण सहन करीत असताना देखील, कदाचित नुकतेच पन्नाशीत पदार्पण केलेल्या त्याच्या आईची काळजी घेण्याविषयीची खात्री त्याने करून घेतली. येशूची त्याच्या दांभिक शत्रूंव्यतिरिक्त, सर्वांसाठी उत्साहवर्धक सोबत होती. म्हणूनच, तो म्हणू शकला: “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणांवर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवास विसावा मिळेल.”—मत्तय ९:३६; ११:२८, २९; योहान १९:२५-२७.
कोणाकडे लक्ष देण्याची गरज आहे?
६. (अ) विशेष लक्ष देण्याच्या पात्रतेचे कोण आहेत? (ब) कोणते प्रश्न आम्ही स्वतःला विचारले पाहिजेत?
६ काळजी वाहण्याच्या बाबतीत, यहोवा देव आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्ताने चांगले उदाहरण मांडले, यामुळे समर्पित ख्रिश्चनांनी त्यांच्या नमुन्याचे अनुकरण करणे हेच केवळ यथायोग्यतेचे आहे. आमच्यामध्ये अनेक वर्षांपासून कष्टी आणि भाराक्रांत असलेले आमचे वयस्कर बंधू आणि बहिणी त्यांच्या जीवनातील उतारवयात पोहचले आहेत. काही आमचे पालक किंवा आजोबा, आजी असतील. आम्ही त्यांना अगदी कमी समजतो का? आम्ही मोठे आश्रयदाते या आविर्भावाने त्यांच्याबरोबर वागतो का? किंवा आम्ही त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाची आणि बुद्धीची गुणग्राहकता बाळगतो का? हे खरे आहे की, वृद्धापकाळात असामान्य नसलेले वैयक्तिक स्वभाव वैचित्र्य आणि व्यंग आमच्या धीराची परीक्षा घेतील. परंतु स्वतःला विचारा, ‘त्या परिस्थितीत असताना मी त्यांच्यापेक्षा काही वेगळा असेल का?’
७. वयस्कर लोकांबरोबर समभावनेची गरज आहे, हे कोणत्या उदाहरणाद्वारे दिसून येते?
७ वृद्धाबद्दल, एका तरुण मुलीच्या दयाळूपणाविषयी मध्य पूर्वेतील एक हृदयद्रावक गोष्ट आहे. आजी स्वयंपाक घरात मदत करीत होती, अचानक तिच्या हातातून एक चिनी मातीचे ताट खाली पडून फुटले. आपल्या आडमुठेपणाबद्दल तिला अतिशय वाईट वाटले; तिची मुलगी तर आणखीच चिडली. नंतर तिने तिच्या लहान मुलीला बोलावून आजीसाठी दुकानातून मजबूत असे लाकडाचे ताट आणण्यासाठी पाठविले. ही लहान मुलगी लाकडाची दोन ताटे घेऊन आली. तिच्या आईने तिला विचारले: “तू दोन ताटे का आणलीस?” या (मुलीने) नातीने घुटमळत उत्तर दिले: “एक आजीसाठी आणि दुसरे तू म्हातारी झाल्यावर तुझ्यासाठी.” होय, या जगात आम्ही सर्वच वृद्ध होत आहोत. मग आम्हाला कोणी धीराने आणि दयाळूपणे वागविले तर आम्ही त्यांची गुणग्राहकता बाळगणार नाही का?—स्तोत्रसंहिता ७१:९.
८, ९. (अ) आमच्यामधील वयस्करांना आम्ही कसे वागवले पाहिजे? (ब) अलिकडेच ख्रिस्ती झालेल्या काहींनी काय आठवणीत ठेवण्याची आवश्यकता आहे?
८ आमच्या पुष्कळ वयस्कर बंधू आणि बहिणींचा अनेक वर्षांपासून विश्वासूपणाच्या ख्रिस्ती कार्याचा अहवाल आहे हे आम्ही कधी विसरता कामा नये. ते खरोखरच आमच्याकडून त्यांना आदर आणि दयाशील मदत तसेच उत्तेजन मिळण्याच्या पात्रतेचे आहेत. सुज्ञ मनुष्याने अगदी उचितपणे म्हटले: “पिकलेले केस शोभेचा मुगूट होत. धर्ममार्गाने चालल्याने तो प्राप्त होतो.” आणि त्या पिकलेले केस असलेल्या पुरूष व स्त्रियांना आदर दिला पाहिजे. यातील काही वृद्ध पुरूष आणि स्त्रिया अजूनही विश्वासू पायनियर या नात्याने सेवा करीत आहेत, तसेच अनेक पुरूष मंडळीतील वडील या नात्याने निरंतर सेवा सादर करीत आहेत, तर काही फिरत्या पर्यवेक्षकांचे उदाहरणशील कार्य करीत आहेत.—नीतीसूत्रे १६:३१.
९ पौलाने तीमथ्याला सल्ला दिला: “वडील माणसाला टाकून बोलू नको, तर त्याला बापासमान बोध कर. तरुणास बंधूसमान मानून, वडील स्त्रियांस मातासमान मानून, तरुण स्त्रियांस पूर्ण शुद्धतेने बहिणीसमान मानून बोध कर.” (१ तीमथ्य ५:१, २) अलिकडेच जे आदर न दाखविणाऱ्या जगातून ख्रिस्ती मंडळीत आलेले आहेत विशेषपणे त्यांनी प्रीतीवर आधारलेले पौलाचे शब्द हृदयाप्रत नेले पाहिजेत. युवकहो, शाळेत तुम्ही पाहिलेल्या वाईट मनोवृत्तीचे अनुकरण करु नका. प्रौढ साक्षीदारांनी दिलेल्या दयाळू सल्ल्यामुळे रागावू नका. (१ करिंथकर १३:४-८; इब्रीयांस १२:५, ६, ११) तथापि, वयस्करांना, खालावलेल्या आरोग्यामुळे किंवा आर्थिक समस्यांमुळे मदत हवी असल्यास, त्यांना मदत करण्याची प्रमुख जबाबदारी कोणाची असते?
वयस्करांची काळजी वाहण्यात कुटुंबाची भूमिका
१०, ११. (अ) पवित्र शास्त्रानुसार, वयस्करांची काळजी घेण्यामध्ये कोणी पुढाकार घेतला पाहिजे? (ब) वयस्करांची नेहमीच काळजी घेणे का इतके सोपे नाही?
१० आरंभीच्या ख्रिस्ती मंडळीत विधवांची काळजी घेण्याविषयी एक समस्या उद्भवली. अशा गरजा पुरविल्या पाहिजेत हे प्रेषित पौलाने कसे सूचित केले? “ज्या विधवा खरोखरीच्या विधवा आहेत त्यांचा सन्मान कर. कोणा विधवेला मुले किंवा नातवंडे असली तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांबरोबर सुभक्त्यनुसार वागून आपल्या वडीलधाऱ्या माणसांचे उपकार फेडावयास शिकावे, कारण हे देवाच्या दृष्टीने मान्य आहे. जर कोणी स्वकीयांची व विशेषकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे; तो माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणासापेक्षा वाईट आहे.”—१ तीमथ्य ५:३, ४, ८.
११ गरजेच्या वेळी, निकटच्या कौटुंबिक सदस्यांनी वयस्करांना मदत केली पाहिजे.a अशाप्रकारे, प्रौढ मुले त्यांच्या पालकांनी त्यांच्यावर वर्षांपासून केलेले प्रेम, त्यांच्यासाठी केलेले काम आणि त्यांची घेतलेली काळजी याबद्दल गुणग्राहकता दाखवू शकतात. हे सोपे असू शकत नाही. लोक जसे वयस्कर होतात, स्वाभाविकच ते क्षीण होतात आणि काहीजण तर हतबल होतात. इतर जण स्वकेंद्रित आणि कदाचित विचार न करता अवाजवी मागणी करणारे बनतात. परंतु आम्ही लहान मूल होतो तेव्हा, आम्ही देखील स्वकेंद्रित आणि अवाजवी मागणी करणारे नव्हतो का? आणि आमचे पालक आम्हाला मदत करण्यासाठी धावत नव्हते का? आता त्यांच्या वृद्धापकाळामुळे गोष्टी बदलल्या आहेत. म्हणून, कशाची गरज आहे? दयाळूपणा आणि धीराची.—पडताळा १ थेस्सलनीकाकर २:७, ८.
१२. वयस्कर आणि ख्रिस्ती मंडळीतील इतरांची काळजी घेण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता आहे?
१२ प्रेषित पौलाने असा व्यावहारिक सल्ला लिहून कळवला: “तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहा; म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा; एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरूद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा; प्रभूने [यहोवा, न्यू.व.] तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा; पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती ह्या सर्वांवर धारण करा.” मंडळीत आम्ही अशा प्रकारची दया आणि प्रीती दाखवावयाची आहे तर, कुटुंबात ती आम्ही अधिक प्रमाणात दाखवू नये का?—कलस्सैकर ३:१२-१४.
१३. वयस्कर पालक किंवा आजी-आजोबा यांच्या व्यतिरिक्त कोणाला मदतीची आवश्यकता आहे?
१३ काहीवेळा अशाप्रकारची ही मदत पालक आणि आजी-आजोबांपुरतीच नाही, तर इतर वयस्कर नातेवाईकांसाठी सुद्धा जरुरीची असते. काही वयस्करांना मुले नाहीत व त्यांनी अनेक वर्षे मिशनरी सेवेत, वेगवेगळ्या ठिकाणी भेट देण्यासंबंधी केलेली सेवा आणि इतर पूर्ण-वेळेचे कार्य केले आहे. त्यांच्या संपूर्ण जीवनात त्यांनी खरेपणाने राज्य आस्थेस प्रथम स्थान दिले आहे. (मत्तय ६:३३) यास्तव त्यांची काळजी वाहण्याचा आत्मा दाखवणे हे योग्यपणाचे नाही का? वयस्कर असलेल्या बेथेल सदस्यांची वॉचटावर सोसायटी कशी काळजी घेत आहे याविषयी तिचे एक उत्तम उदाहरण आमच्याजवळ आहे. ब्रुकलिन येथील बेथेल मुख्यालयात आणि सोसायटीच्या अनेक शाखा दप्तरात, अनेक वयस्कर बंधू आणि बहिणींची, नियुक्त केलेल्या शिक्षित सदस्यांकडून रोज काळजी घेतली जाते. त्यांचे पालक किंवा आजी-आजोबा असल्याप्रमाणे त्या वयस्करांची ते काळजी घेतात. त्याचवेळी ते वयस्करांच्या अनुभवापासून अधिक शिकत असतात.—नीतीसूत्रे २२:१७.
काळजी घेण्यात मंडळीची भूमिका
१४. आरंभीच्या ख्रिस्ती मंडळीत वयस्करांसाठी कोणती व्यवस्था केली होती?
१४ अनेक देशांमध्ये आज, वयोवृद्ध निवृत्ती वेतनाची पद्धत, (पेन्शन) तसेच वयस्करांसाठी राज्याने पुरविलेली वैद्यकीय सेवा देखील आहे. ख्रिश्चनाला असे करण्याचा हक्क असल्यामुळे ते या योजनांचा पूर्ण फायदा घेऊ शकतात. तथापि, पहिल्या शतकात अशा योजना नव्हत्या. या कारणास्तव, निराश्रित विधवांना मदत करण्यासाठी ख्रिस्ती मंडळीने सकारात्मक पाऊल उचलले. पौलाने स्पष्ट केले: “जी साठ वर्षाच्या आत नसून एकाच पतीची स्त्री झाली असेल, जी चांगल्या कृत्यांसाठी नावाजलेली असेल म्हणजे जिने मुलाबाळांचा प्रतिपाळ केला असेल, पाहुणचार केला असेल, पवित्र जनांचे पाय धुतले असतील, संकटात पडलेल्या लोकांची गरज भागविली असेल, सर्व प्रकारच्या चांगल्या कृत्यांस अनुसरली असेल, अशी नावाजलेली विधवा यादीत नोंदण्यात यावी.” अशाप्रकारे, पौलाने दाखविले की वयस्करांना मदत करण्यात मंडळीची देखील भूमिका आहे. आध्यात्मिक असलेल्या स्त्रीला विश्वासात नसलेली मुले असल्यास ती देखील अशा मदतीसाठी पात्र आहे.—१ तीमथ्य ५:९, १०.
१५. राज्याकडील मदत प्राप्त करण्यासाठी साहाय्य करण्याची गरज का आहे?
१५ वयस्करांसाठी राज्याने पुरविलेली व्यवस्था असलेल्या ठिकाणी सामान्यपणे कागदपत्राचे काम समाविष्ट असते, व यामुळे त्यांना एक प्रकारे भय वाटू शकते. अशा परिस्थितीत, मंडळीतील पर्यवेक्षकांनी वयस्करांना त्यासाठी अर्ज करण्यास, प्राप्त करण्यास किंवा अशा मदतीची बढती देण्याच्या साहाय्याची व्यवस्था केली पाहिजे. कधीकधी परिस्थिती बदलल्यामुळे निवृत्ती वेतनात वाढ होऊ शकते. तथापि, वयस्करांची काळजी घेण्यासाठी इतर अनेक अशा व्यावहारिक गोष्टी आहेत ज्याची व्यवस्था पर्यवेक्षक करु शकतात. त्यातील काही कोणत्या आहेत?
१६, १७. मंडळीतील वयस्करांसाठी कोणत्या विशिष्ट मार्गाद्वारे आम्ही आदरातिथ्य दाखवू शकतो?
१६ आदरातिथ्य दाखवणे ही पद्धत आम्हाला पवित्र शास्त्र काळापर्यंत नेते. मध्य पूर्वेतील अनेक देशात आज देखील, अनोळखी व्यक्तींना चहाचा किंवा कॉफीचा एक कप देण्याद्वारे आदरातिथ्य दाखवले जाते. म्हणून पौलाने जे लिहिले त्यात आश्चर्याचे काही नाही की: “पवित्र जनांच्या गरजा भागवा; आतिथ्य करण्यात तत्पर असा.” (रोमकर १२:१३) आदरातिथ्यासाठी असलेला ग्रीक शब्द, फि․लो․क्षे․निʹयाचा अक्षरशः अर्थ “अनोळखी व्यक्तींबद्दल प्रेम (आवड किंवा दयाळूपणा). जर एखाद्या ख्रिश्चनाने अनोळखी व्यक्तीला आदरातिथ्य दाखवले पाहिजे तर, विश्वासात असणाऱ्यांना त्याने ते विशेषकरून दाखवू नये का? भोजनासाठी दिलेले आमंत्रण अनेकदा वयस्कर व्यक्तिच्या नित्यक्रमात एक आनंदी तात्पुरता बदल असतो. तुमच्या सामाजिक मेळाव्यात तुम्हाला सूज्ञतेचे शब्द आणि अनुभव पाहिजे असल्यास, वयस्करांना समाविष्ट करा.—पडताळा लूक १४:१२-१४.
१७ वयस्करांना उत्तेजन देण्याचे अनेक मार्ग आहेत. राज्यसभागृहाला किंवा संमेलनाला जाण्यासाठी आम्ही गाडीची व्यवस्था केली असल्यास, ज्यांना घेऊन जाता येऊ शकेल अशा काही वयस्कर व्यक्ती आहेत का? त्यांनी, स्वतः तुम्हाला विचारेपर्यंत थांबू नका. त्यांना तुमच्यासोबत येण्याचे निमंत्रण द्या. दुसरी एक व्यावहारिक मदत, त्यांच्यासाठी बाजारहाट करणे ही आहे. शक्य असल्यास आम्ही त्यांना आमच्यासोबत बाजारहाट करण्यासाठी घेऊन जाऊ शकतो का? परंतु आवश्यक असल्यास, अशा ठिकाणांची खात्री करा की जेथे ते आराम करु शकतील व त्यांना विसावा मिळू शकेल. असे करण्यासाठी धीर आणि दयाळूपणाची गरज आहे यात कोणताही संशय नाही, परंतु वयस्कर व्यक्तीची मनापासूनची कृतज्ञता फार मोबदल्याची ठरु शकते.—२ करिंथकर १:११.
मंडळीसाठी एक उत्कृष्ट ठेवा
१८. मंडळीसाठी वयस्कर लोक आशीर्वाद का आहेत?
१८ मंडळीमध्ये पिकलेले केस (तसेच वृद्धापकाळामुळे डोक्याचे केस गळालेल्यांना) पाहणे किती आशीर्वादाचे आहे बरे! मानसिक सामर्थ्य आणि जोम असणाऱ्या तरुणांबरोबर वृद्धांची बुद्धी आणि अनुभव यांची साथ लाभल्यामुळे कोणत्याही मंडळीसाठी हा किती उत्कृष्ट ठेवा आहे. त्यांचे ज्ञान हे विहीरीतून काढलेल्या तजेला देणाऱ्या पाण्यासारखे असते. नीतीसूत्रे १८:४ त्याला अशाप्रकारे सांगते: “मनुष्याच्या तोंडचे शब्द खोल पाण्यासारखे आहेत, ते वाहता ओढा व ज्ञानाचा झरा असे आहेत.” वयस्करांची गरज आहे आणि त्यांची गुणग्राहकता केली जाते हे जाणणे त्यांच्यासाठी किती प्रोत्साहनदायक आहे बरे!—पडताळा स्तोत्रसंहिता ९२:१४.
१९. काहींनी त्यांच्या वयस्कर पालकांसाठी कशाप्रकारे त्याग केले आहेत?
१९ पूर्ण-वेळेची सेवा करणाऱ्या काही जनांना त्यांचा विशेषाधिकार सोडून वयस्कर आणि आजारी पालकांची काळजी घेणे जरुरीचे वाटले. ज्यांनी आधी त्यांच्यासाठी त्याग केला होता त्यांच्यासाठी त्यांनी आता त्याग केला. एक दांपत्य, जे आधी मिशनरी होते, व जे अजूनही आहेत ते त्यांच्या वयस्कर पालकांची काळजी घेण्यासाठी घरी परतले. असे त्यांनी २० पेक्षा अधिक वर्षांसाठी केले. चार वर्षापूर्वी या मनुष्याच्या आईला शुश्रुषा गृहात (नर्सिंग होम) दाखल करावे लागले. पती, [पूर्वीचा मिशनरी] जो आता त्याच्या साठीत आहे, त्याच्या ९३ वर्षे वय असलेल्या आईला रोज भेट देतो. तो स्पष्टीकरण देतो: “मी तिला कसे सोडून देऊ? ती माझी आई आहे!” इतर काही घटनांमध्ये वयस्करांची काळजी घेण्यासाठी मंडळ्या आणि वैयक्तिकपणे काही पुढे आले आहेत जेणेकडून त्यांची (वयस्कर पालकांची) मुले त्यांच्या कामगिरीत टिकून राहू शकतील. असे हे निःस्वार्थी प्रेम देखील फार प्रशंसेच्या लायकीचे आहे. वयस्करांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून प्रत्येक परिस्थिती जाणीवपूर्वकतेने हाताळली पाहिजे. तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता हे तुमच्या वृद्ध पालकांना दाखवा.—निर्गम २०:१२; इफिसकर ६:२, ३.
२०. वयस्करांची काळजी घेण्याच्याबाबतीत यहोवाने कोणते उदाहरण आमच्यासाठी दिले आहे?
२० खरोखर, आमचे वयस्कर बंधू आणि बहिणी, कुटुंब तसेच मंडळीसाठी एक सुंदरतेचा मुगुट आहेत. यहोवाने म्हटले: “तुमच्या वृद्धापकाळापर्यंतही मीच तो आहे; तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हांस वागवीन; निर्माणकर्ता मीच आहे, वागविणारा मीच आहे, मी खांद्यावर वागवून तुमचा बचाव करीन.” ख्रिस्ती कुटुंबात आम्ही आमच्या वयस्कर बंधू आणि बहिणींना अशाचप्रकारे धीर दाखवू आणि त्यांची काळजी घेऊ.—यशया ४६:४; नीतीसूत्रे १६:३१.
[तळटीपा]
a वयस्करांना मदत करण्यासाठी कौटुंबिक सदस्य काय करु शकतात याविषयीच्या सविस्तर सल्ल्यासाठी, डिसेंबर १, १९८७ चे टेहळणी बुरूज पृष्ठे १०-२१ पहा.
तुम्हाला आठवते का?
▫ वयस्करांची काळजी घेण्याबद्दल कोणती पवित्र शास्त्रीय उदाहरणे आमच्याजवळ आहेत?
▫ वयस्करांना आम्ही कशी वागणूक दिली पाहिजे?
▫ कुटुंबातील सदस्य त्यांच्या वयस्कर प्रिय जनांची कशी काळजी घेऊ शकतात?
▫ वयस्करांची मदत करण्यासाठी मंडळी काय करु शकते?
▫ वयस्कर जण आम्हा सर्वांसाठी आशीर्वाद का आहेत?
[१६ पानांवरील चित्रं]
रुथने वयस्कर नामीला दयाळूपणा दाखवला व तिचा आदर केला
[१७ पानांवरील चित्रं]
मंडळीसाठी वयस्कर लोक मोलाचे सदस्य आहेत