गरुडांप्रमाणे पंखांनी भरारी मारणे
नात्सी छळ छावण्यांमध्ये पाच वर्षे काढल्यावर एखाद्याच्या कशा भावना असतील? नाउमेदीच्या? शत्रुत्वाच्या? सूडाच्या?
आश्चर्य म्हणजे अशाच अनुभवातून गेलेल्या एकाने लिहिले: “माझे जीवन माझ्या अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक समृद्ध झाले.” त्याला असे का वाटले बरे? त्याने स्पष्टीकरण दिले: “मला सर्वसमर्थाच्या पंखांखाली संरक्षण मिळाले व मी संदेष्टा यशयाच्या या शब्दांची पूर्तता अनुभवली: ‘यहोवाची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करितील; ते गरुडांप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते चालतील तरी थकणार नाहीत.’”—यशया ४०:३१.
कल्पना देखील करवणार नाही अशा प्रकारचा अत्यंत भीषण छळ सोसल्यामुळे या ख्रिश्चन माणसाची शरीरप्रकृती, कमालीची खालावली होती तथापि, त्याने जणू उंच भरारी मारणारा मनोभाव राखला, असा मनोभाव ज्यावर नात्सी नृशंसता मात करू शकली नाही. दावीदाप्रमाणे त्याला देखील देवाच्या ‘पंखाच्या’ सावलीत आश्रय लाभला. (स्तोत्र ५७:१) या ख्रिश्चनाने आपल्या आध्यात्मिक शक्तीची आकाशात उंचच उंच भरारी मारणाऱ्या गरुडाशी तुलना करताना, संदेष्टा यशयाने वापरलेले रूपक उपयोगात आणले.
तुम्हाला कधी समस्यांच्या दबावाखाली खचल्यासारखे वाटते का? तर मग, तुम्हाला देखील ‘गरुडांप्रमाणे पंखांनी वर उडण्यासाठी’ सर्वसमर्थाच्या पंखांखाली आश्रय मिळवण्याची इच्छा असेल यात काहीही शंका नाही. ते कसे शक्य आहे हे समजण्यासाठी, शास्त्रवचनांत वारंवार लाक्षणिक भाषेत उल्लेख करण्यात आलेल्या गरुडाविषयी थोडी माहिती असणे हिताचे ठरते.
गरुड ध्वजाखाली
प्राचीन काळातील लोक निरीक्षण करीत असलेल्या सर्व पक्षांपैकी, गरुड पक्षी, आपल्या शक्तीसाठी व आपल्या दिमाखदार उड्डाणासाठी कदाचित सर्वाधिक सुप्रसिद्ध होता. बॅबिलोन, पर्शिया व रोमच्या सैन्यांसहित प्राचीन काळातील अनेक सैन्यदल गरुड ध्वजाखाली कूच करीत असत. थोर कोरेशाचे सैन्य यांपैकी एक होते. हा पर्शियन राजा बॅबिलोनी साम्राज्याला गारद करण्यासाठी उगवतीकडून येणाऱ्या हिंस्र पक्षासारखा असेल असे बायबलने भाकीत केले. (यशया ४५:१; ४६:११) हा भविष्यवाद लिहिण्यात आल्यावर दोनशे वर्षांनंतर, युद्धाच्या ध्वजावर गरुडाचे प्रतीक असलेल्या कोरेशाच्या सैनिकांनी, एखादा गरुड आपल्या भक्ष्यावर जोराने प्रहार करतो त्याप्रमाणे बॅबिलोन नगरावर झडप घातली.
अलीकडील काळात, शार्लमॅग्ने व नेपोलियन यांसारख्या योद्ध्यांनी व संयुक्त संस्थाने आणि जर्मनी यांसारख्या देशांनीसुद्धा आपले प्रतीक म्हणून गरुडास निवडले आहे. इस्राएलांना गरुडाच्या किंवा इतर कशाच्याही प्रतिमेस नमन न करण्याची आज्ञा देण्यात आली होती. (निर्गम २०:४, ५) तथापि, बायबल लेखकांनी आपला संदेश स्पष्ट करण्यासाठी गरुडाच्या वैशिष्ट्यांचा अप्रत्यक्षपणे उल्लेख केला. अशा रितीने, शास्त्रवचनांत सर्वाधिक वेळा उल्लेख असलेल्या पक्षाचा अर्थात गरुडाचा, बुद्धी, ईश्वरी संरक्षण व चपळपणा यांसारख्या गुणांचे द्योतक म्हणून उपयोग करण्यात आला आहे.
गरुडाची दृष्टी
गरुडाची तीक्ष्ण दृष्टी पूर्वीपासूनच सर्वामुखी आहे. सोनेरी गरुडाचे वजन क्वचितच पाच किलोग्रॅमपेक्षा अधिक असते; तरीसुद्धा त्याचा डोळा माणसाच्या डोळ्यापेक्षा अक्षरशः मोठा असतो व त्याची दृष्टी कितीतरी अधिक तीक्ष्ण असते. आपले भक्ष्य शोधून काढण्याच्या गरुडाच्या क्षमतेविषयी ईयोबास सांगताना स्वतः यहोवा म्हणाला: “त्याच्या नेत्रांस दूरवर दिसते.” (ईयोब ३९:२७, २९) ॲलिस पॉर्मली, बायबलमधील सर्व पक्षी (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात सांगतात की, “एकदा एका गरुडाला पाच किलोमीटर अंतरावर एका तलावात तरंगत असलेला एक मेलेला मासा दिसला तेव्हा त्याने आडवी झेप घेतली व नेमक्या त्याच ठिकाणी पोहंचला. या गरुडाला, मानव जितक्या अंतरावर पाहू शकेल त्यापेक्षा कितीतरी दूरवर असलेली लहानशी वस्तू दिसली, एवढेच नव्हे तर तीन-मैलांची लांब झेप घेताना देखील त्याने सतत आपली नजर त्या माशावरच खिळवून ठेवली.”
गरुडाच्या सूक्ष्म दृष्टीमुळे, तो यहोवाच्या प्रमुख गुणांपैकी एकाचे, अर्थात बुद्धीचे उचित प्रतीक आहे. (पडताळा यहेज्केल १:१०; प्रकटीकरण ४:७.) ते का बरे? बुद्धी या गुणात, आपण करीत असलेल्या कृत्याचे परिणाम आधीच ताडणे हे गोवलेले आहे. (नीतिसूत्रे २२:३) पुष्कळ अंतरावर असलेली वस्तू पाहू शकण्याच्या क्षमतेमुळे गरुड दुरूनच धोका असल्याचे ताडू शकतो व आवश्यक ती खबरदारी घेऊ शकतो, अगदी तसेच जसे येशूच्या दाखल्यातील सुज्ञ मनुष्याने आपल्या दूरदृष्टीमुळे वादळ येण्याची शक्यता ताडली व आपले घर खडकावर बांधले. (मत्तय ७:२४, २५) आणखी एक सांगण्यासारखी बाब म्हणजे, स्पॅनिश भाषेत, एखाद्याला गरुड म्हणण्याचा अर्थ, त्या व्यक्तीला समजण्याची कुवत व भेद जाणण्याची क्षमता आहे असा होतो.
तुम्हाला कधी गरुडाला जवळून पाहण्याची संधी मिळाली तर तो आपल्या डोळ्यांचा कशाप्रकारे उपयोग करतो याकडे लक्ष द्या. तो तुम्हाला नुसते ओझरते पाहात नाही; उलटपक्षी तो जणू तुमच्या स्वरूपाचे सांगोपांग निरीक्षण करतो. तशाच प्रकारे सुज्ञ पुरुष देखील एखादा निर्णय घेण्यापूर्वी स्वतःच्या उपजत बुद्धीवर किंवा भावनांवर विसंबून राहण्याऐवजी संबंधित बाबींचे काळजीपूर्वक अवलोकन करतो. (नीतिसूत्रे २८:२६) सूक्ष्म दृष्टीमुळे गरुड, बुद्धी या ईश्वरी गुणाचे उचित प्रतीक तर आहेच; पण याव्यतिरिक्त त्याचे दिमाखदार उड्डाण हे देखील बायबल लेखकांकरवी लाक्षणिक भाषेत वापरण्यात आले आहे.
“गरुडाचे आकाशात उडणे”
गरुडाच्या भयंकर वेगामुळे तसेच कोणताही विशिष्ट मार्ग न घेता व कोणताही मागमूस न सोडता तो अनायासाने उडत असल्याचे भासत असल्यामुळे ‘त्याचे आकाशात उडणे’ चित्तवेधक असते. (नीतिसूत्रे ३०:१९) विलापगीत ४:१९ हे वचन, बॅबिलोनी सैनिकांचे पुढीलप्रमाणे वर्णन करताना, गरुडाच्या चपळपणाचा अप्रत्यक्षरीत्या उल्लेख करून म्हणते: “आमचा छळ करणारे आकाशांतील गरुडापेक्षा चपल होते; त्यांनी डोंगरावर आमची पाठ पुरवली, रानात आम्हासाठी दबा धरिला.” आकाशात घिरट्या घालताना गरुडाला आपले भक्ष्य दिसते तेव्हा तो पंख आडवे करून थेट त्याच्यावर झेप घेतो व काही वृत्तांनुसार, असे करताना, तो आपला वेग ताशी १३० किलोमीटर इतका वाढवू शकतो. यास्तव, शास्त्रवचनांत गरुडाला वेगासाठी विशेषतः, लष्करी सैन्याच्या संबंधाने वेगाबद्दल बोलताना पर्यायी शब्द म्हणून वापरले आहे यात काही नवल नाही.—२ शमुवेल १:२३; यिर्मया ४:१३; ४९:२२.
दुसरीकडे पाहता, यशया गरुडाच्या अनायास उड्डाणाचा संदर्भ देतो. “परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करितील; ते गरुडांप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत.” (यशया ४०:३१) गरुडाच्या तरंगत्या उड्डाणामागील गुपित काय आहे? भरारी मारण्याकरता फारसे कष्ट लागत नाहीत कारण गरुड उष्ण हवेच्या झोतांची अर्थात वर उठणाऱ्या उष्ण हवेच्या लोटांची मदत घेतो. हे उष्ण हवेचे झोत अदृश्य असतात, तथापि त्यांना हुडकून काढण्यात गरुड वाकबगार असतो. एकदा का उष्ण हवेच्या झोताचा पत्ता लागला, की मग गरुड आपले पंख व आपली शेपटी पसरतो व त्या उष्ण हवेच्या लोटांत घिरट्या मारतो आणि हा लोट त्यास उंचच उंच घेऊन जातो. पुरेशी उंची गाठल्यावर गरुड अलगद, पुढील उष्ण हवेच्या झोतात जातो जेथे पूर्वीचीच प्रक्रिया पुन्हा होते. अशा प्रकारे, गरुड कमीतकमी शक्ती खर्च करूनही तासन्तास आकाशात तरंगू शकतो.
इस्राएलात, विशेषतः तांबड्या समुद्राच्या किनाऱ्यावरील एझियोन-गेबरपासून उत्तरेकडील दानपर्यंत पसरलेल्या रिफ्ट व्हॅलीच्या प्रदेशात सहसा गरुड आढळतात. विशेषतः, वसंत ऋतूत व शरद ऋतूत म्हणजेच त्यांच्या स्थलांतर करण्याच्या काळात ते मोठ्या संख्येत आढळतात. काही वर्षी तर जवळजवळ १,००,००० गरुड पक्षी मोजण्यात आले आहेत. सकाळच्या वेळेस सूर्यामुळे हवा उष्ण होत असते तेव्हा शेकडो गरुड रिफ्ट व्हॅलीच्या किनाऱ्यावरील उंच पहाडावर उडताना दिसतात.
गरुडाच्या अनायास उड्डाणातून, आपल्याला कार्य करीत राहता यावे म्हणून यहोवाच्या सामर्थ्याकरवी आपली कशाप्रकारे आध्यात्मिक व भावनिक उभारणी होऊ शकते हे सुरेखपणे प्रत्ययास येते. जसा गरुड स्वतःच्या शक्तीने इतकी उंची गाठू शकत नाही तसेच आपणही स्वतःच्या क्षमतांवर अवलंबून राहिल्यास समस्यांना तोंड देऊ शकणार नाही. प्रेषित पौलाने स्पष्ट केले की, “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे.” (फिलिप्पैकर ४:१३) सतत उष्ण हवेच्या अदृश्य झोतांच्या शोधात असणाऱ्या गरुडाप्रमाणे, आपणही आपल्या कळकळीच्या प्रार्थनांकरवी यहोवाची अदृश्य कार्यकारी शक्ती मिळावी म्हणून ‘मागत राहतो.’—लूक ११:९, १३.
स्थलांतर करणारे गरुड सहसा इतर भक्ष्योपजीवी पक्ष्यांचे निरीक्षण करून उष्ण हवेचे झोत हुडकून काढतात. सृष्टपदार्थवेत्ते डी. आर. मॅकिन्टॉश यांनी दिलेल्या अहवालाप्रमाणे, एकदा २५० गरुड व गिधाडे एकाच उष्ण हवेच्या झोतात वरील दिशेने घिरट्या घालताना आढळले. आज खरे ख्रिश्चन देखील, इतर ईश्वरी सेवकांच्या उदाहरणाचे अनुकरण करण्याद्वारे यहोवाच्या सामर्थ्यावर अवलंबून राहण्यास शिकू शकतात.—पडताळा १ करिंथकर ११:१.
गरुडाच्या पंखांच्या सावलीत
गरुड जेव्हा उडायला शिकत असतो तेव्हाचा काळ त्याच्या जीवनातील सर्वात जोखीमपूर्ण काळ असतो. उडण्याचा प्रयास करीत असताना पुष्कळसे गरुड आपला जीव गमावतात. मिसर देशातून प्रयाण केल्यावर इस्राएल राष्ट्र देखील धोक्यात होते, त्या वेळेस ते जणू नुकतेच उडण्यास शिकलेल्या एखाद्या पिलासारखे होते. त्यामुळेच यहोवाने इस्राएली लोकांना उद्देशून म्हटलेले हे शब्द अगदी उचित होते: “मी मिसऱ्यांचे काय केले ते व तुम्हाला गरुडांच्या पंखांवर बसवून मी आपणाकडे कसे आणिले आहे हे तुम्ही पाहिले आहे.” (निर्गम १९:४) सुरवातीला उडण्याचे प्रयत्न करीत असताना, पिलू जमिनीवर पडू नये यासाठी गरुड त्या इवल्याशा पिलाला थोड्यावेळ आपल्या पाठीवर घेतो असे अनेक वृत्तान्तांत सांगितले जाते. पॅलेस्टाइन समन्वेषण त्रैमासिक (इंग्रजी) यात अशा प्रकारच्या वृत्तांवर विवेचन मांडताना जी. आर. ड्राइवर यांनी म्हटले: “स्पष्टपणे, [बायबलचे] हे चित्र, निव्वळ एक कल्पनातरंग नसून वास्तविक सत्यावर आधारित आहे.”
गरुड इतर बाबतीत देखील अनुकरणीय पालक असतात. घरट्यांतील लहान पिलाला ते नियमितपणे अन्न तर देतातच, पण त्याशिवाय माता पक्षीण, नर गरुडाने आणलेल्या मांसाचे काळजीपूर्वक तुकडे करते जेणेकरून पिलू ते सहजरित्या गिळू शकते. त्यांची घरटी सहसा उंच पहाडांवर किंवा वृक्षांवर बांधलेली असल्यामुळे लहान पिलांचा नैसर्गिक शक्तींसोबत थेट संपर्क येतो. (ईयोब ३९:२७, २८) पालकांनी काळजी न घेतल्यास, बायबल प्रदेशांत सामान्य असलेल्या तळपणाऱ्या सूर्याच्या उष्णतेमुळे पिलू मरू शकते. यास्तव, आपल्या नाजुकशा पिलांना सावली देण्यासाठी गरुड पक्षी कधी कधी तासन्तास आपले पंख पसरून ठेवतो.
या कारणास्तव, शास्त्रवचनांत गरुडाचे पंख ईश्वरी संरक्षणाचे प्रतीक मानण्यात आले आहे हे अगदी उचित आहे. यहोवाने इस्राएली लोकांना वाळवंटातील त्यांच्या प्रवासात कशा प्रकारे सुरक्षित ठेवले याचे, अनुवाद ३२:९-१२ या वचनांत वर्णन केलेले आहे: “परमेश्वराचे लोक हाच त्याचा वाटा, याकोब हाच त्याचा वतनभाग. तो त्याला वैराण प्रदेशात व घोंघावणाऱ्या ओसाड रानात सापडला; त्याने त्याच्या सभोवती राहून त्याची निगा राखली, आपल्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे त्याला सांभाळले. गरुड पक्षीण आपले कोटे हालविते, आपल्या पिलांवर तळपत असते, आपले पंख पसरून त्यांवर त्यांना घेते व आपल्या पंखावर वाहते, त्याप्रमाणे परमेश्वरानेच त्याला चालविले.” जर आपण यहोवावर भरवसा ठेवला तर तो आपल्यालाही तसेच संरक्षण पुरवील.
बचावाचा मार्ग
काही वेळा आपण समस्यांना तोंड देतो तेव्हा कदाचित आपल्याला सर्व कठीण परिस्थितींपासून कोठेतरी दूर निघून जावेसे वाटू शकेल. दावीदालाही अगदी असेच वाटले. (पडताळा स्तोत्र ५५:६, ७.) तथापि, यहोवाने या व्यवस्थीकरणात परीक्षा व दुःख सोसताना आपल्याला साहाय्य करण्याचे वचन दिले असले तरीसुद्धा, तो आपल्याला संपूर्ण सुटका देऊ करीत नाही. बायबल आपल्याला हमी देते: “मनुष्याला सहन करिता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही; आणि देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायहि करील, ह्यासाठी की, तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे.”—१ करिंथकर १०:१३.
‘निभावण्याचा उपाय’ किंवा “सुटकेचा मार्ग” (किंग जेम्स व्हर्शन) यात यहोवावर भरवसा ठेवण्याचे शिकणे समाविष्ट आहे. मॅक्स लीबस्टर, ज्यांचे अभिप्राय या लेखाच्या सुरवातीला उद्धृत करण्यात आले होते, त्यांना देखील याचा प्रत्यय आला. छळ छावणीत काढलेल्या वर्षांत त्यांना यहोवाबद्दल ज्ञान मिळाले व ते त्यावर भरवसा ठेवण्यास शिकले. मॅक्स यांना प्रत्ययास आल्याप्रमाणे, यहोवा आपल्याला त्याचे वचन, त्याचा आत्मा व त्याच्या संघटनेमार्फत बळकट करतो. छावणींत असताना देखील, साक्षीदारांनी सहविश्वासू बांधवांना शोधून काढले व त्यांना शास्त्रवचनीय विचारांद्वारे आणि जे बायबल साहित्य उपलब्ध होते त्याकरवी आध्यात्मिक मदत दिली. शिवाय, बचावलेल्या विश्वासू जनांनी पुन्हा पुन्हा ग्वाही दिल्याप्रमाणे यहोवाने त्यांना नेहमीच बळकट केले. मॅक्स सांगतात, “मी सतत यहोवाकडे मदत मागितली व त्याच्या आत्म्याने सदोदित माझा सांभाळ केला.”
आपण कोणत्याही परीक्षेला तोंड देत असलो तरीसुद्धा, आपणही अशाचप्रकारे देवाच्या पवित्र आत्म्यावर अवलंबून राहू शकतो, अर्थात आपण मागत राहिलो तरच. (मत्तय ७:७-११) या ‘सामर्थ्याच्या पराकोटीमुळे’ चैतन्य प्राप्त करून, आपण आपल्या समस्यांच्या दबावाखाली खचून जाण्याऐवजी आपली उभारणी होईल. आपण यहोवाच्या मार्गात चालत राहू तरी थकणार नाही. आपण गरुडांप्रमाणे पंखांनी भरारी मारू.—२ करिंथकर ४:७; यशया ४०:३१.
[१० पानांवरील चित्रं]
तो तुमच्याकडे नुसते ओझरते पाहत नाही