वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 ४/१ पृ. २६-२९
  • आनंदी देव, आनंदी लोक!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आनंदी देव, आनंदी लोक!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मुक्‍तिदाता यहोवा
  • ‘आरोहण स्तोत्रे’
  • स्तुतीपात्र देव
  • यहोवाची स्तुती असो!
  • स्तोत्रसंहितेच्या पाचव्या पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • सांत्वन व बोध करणारी देवप्रेरित गीते
    बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते?
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • “यहोवाचा धन्यवाद”—का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 ४/१ पृ. २६-२९

पवित्र शास्त्रीय ठळक मुद्दे स्तोत्रसंहिता १०७ ते १५०

आनंदी देव, आनंदी लोक!

सौख्यानंद हे असे ध्येय आहे ज्याची प्राप्ती बहुतेकांना होत नाही. तरीपण एका छोट्या गटाकरता मात्र सौख्यानंद हा जीवनी मार्ग बनला आहे. याकरता त्यांच्यापाशी कोणती गुरुकिल्ली आहे? खरी उपासना! यहोवा हा आनंदी देव आहे अशी स्तोत्रसंहिता खात्री देतात त्यामुळे त्याची उपासना करण्याद्वारे आम्हाला आनंदी होता येते. याच्या पुराव्यादाखल स्तोत्रसंहिता याचा पाचवा भाग म्हणजे १०७ ते १५० स्तोत्रे यांचे परीक्षण करु या.

मुक्‍तिदाता यहोवा

स्तोत्रसंहिता १०७ ते ११९ कृपया वाचा. बाबेलोनी दास्यत्वापासून मुक्‍तता लाभावी या यहुद्यांनी केलेल्या प्रार्थनेचे उत्तर मिळते, आणि “यहोवाने उध्दारिलेले जन” या परतीचा सोहळा गायनाद्वारे व्यक्‍त करतात. (स्तोत्रसंहिता १०७) या आधीही प्राप्त झालेल्या बऱ्‍याच मुक्‍ततेस्तव दावीद देवास “संगीत स्तोत्र” गातो आणि त्याचा चांगुलपणा व प्रेम यांचे वक्‍तव्य करतो. (स्तोत्रसंहिता १०८, १०९) यहोवाकडिल शक्‍तिच्या प्राप्तीनेच दावीदाचा प्रभु येशू ख्रिस्त हा देवाच्या शत्रूंना अंकित करणार होता. (स्तोत्रसंहिता ११०) यहोवा आपल्या लोकांची सुटका करण्यासोबत त्याचे भय मानणाऱ्‍या सात्विक माणसाला आशीर्वादित करतो. (स्तोत्रसंहिता १११, ११२) बाबेलोनातून मुक्‍ति प्राप्त झाल्यावर यहुद्यांनी मोठ्या वार्षिकोत्सवात हालेल स्तोत्रे वा स्तुतीगीते गायिली. (स्तोत्रसंहिता ११३–११८) ११९ वे स्तोत्र बरेच मोठे आहे व त्यात असणाऱ्‍या १७६ वचनांमध्ये २ वचने सोडली तर इतर सर्व वचनात देवाचे वचन अथवा नियम याचा संदर्भ सापडतो.

◆ १०७:२७—कशी “त्यांची मति अगदी कुंठित” झाली?

भयंकर वादळात सापडलेल्या खलाशाची जशी स्थिती होते त्याप्रमाणे बाबेलात बंदिस्त स्थितीत असताना यहुद्यांची मति खुंटली गेली; त्यांची सुटका करण्याजोगे सर्व मानवी प्रयत्न फोल ठरले. तथापि, या वादळी स्थितीत यहोवाकडे धाव घेतल्यामुळेच त्यांना मुक्‍तता लाभली. त्याने ते लाक्षणिक वादळ शमविले व त्यांना सुरक्षित “बंदरात”, यहुदा प्रदेशी आणून सोडले.–स्तोत्रसंहिता १०७:३०.

◆ ११०:३—“तरुण पहाटेच्या दहिवरांसारखे आहेत” यात कोणती अर्थसूचकता आहे?

दहिवरांचा संबंध आशीर्वाद, उत्पादकता व विपुलता याजसोबत आहे. (उत्पत्ती २७:२८) दहीवर सौम्य, उत्साहवर्धक, जीवन–प्रदायक आणि अगणित असतात. मशीही राजाच्या पराक्रमाच्या दिवशी, त्याचे प्रजाजन स्वतःला त्वरेने, आनंदाने व मोठ्या संख्येने इतक्या प्रमाणात सादर करतात की जणू ते दहिवरासारखे तुल्य वाटतात. आजही देवाच्या संस्थेत अगणित तरुण पुरुष व स्त्रिया उत्साहवर्धक दहिवरांप्रमाणेच देवाची व आपल्या सोबतच्या उपासकांची सेवा करीत आहेत.

◆ ११६:३—“मृत्युची बंधने” कोणती आहेत?

असे दिसते की मृत्युने स्तोत्रकर्त्याला जणू इतक्या जबर बंधनांनी वेष्टिले होते की आता सुटका अशक्यच दिसत होती. शरीराला बंधनांनी आवळून बांधले तर त्याकडून भयंकर यातना किंवा वेदना निर्माण होतात, याकारणास्तव ग्रीक सेप्ट्युजंट आवृत्ती “बंधन” हा इब्री शब्द “वेदना” असा सादर करते. येशू ख्रिस्त वारला त्यावेळी तो सुध्दा मृत्युच्या जबर पकडीत वा वेदनेत होता, आणि यहोवाने येशूला पुनरुत्थित केले त्यावेळी त्याला त्याने “मरणाच्या वेदनापासून सोडवून उठविले.”—प्रे. कृत्ये २:२४.

◆ ११९:८३—स्तोत्रकर्ता “बुधल्यासारखा” कसा होता?

यहोवाकडून समाधान प्राप्त व्हावे म्हणून थांबून असता स्तोत्रकर्ता, वापरला जात नाही त्यावेळी टांगून ठेवल्या जाणाऱ्‍या बुधल्यासारखा बनला होता. धूर बाहेर सोडण्याची सोय नसलेल्या घरात बुधला धुरामुळे काळवंडतो, कोरडा व शुष्क राहतो. असाच परिणाम स्तोत्रकर्त्याला त्याच्या छळकर्त्यांच्या हाती मिळाला. (वचन ८४) त्याची दु:खित स्थिती त्याचा पडलेला व उदास चेहरा यावरुन कळत होती व त्याचे सबंध शरीर इतके परिणामित झाले की जणू त्याचे चैतन्य हरपले होते. (पडताळा स्तोत्रसंहिता ३२:४.) त्यामुळेच त्याला, अडगळीत टांगून ठेवलेल्या व द्राक्षारस सामावू न शकणाऱ्‍या निरुपयोगी बुधल्याप्रमाणे स्वतःची स्थिती झाली आहे असे वाटू लागले होते. तरीही, तो ‘देवाचे नियम विसरला नव्हता.’

◆ ११९:११९—देव दुर्जनास “गाळासारखे” कसे नाहीसे करतो?

ओतीव धातु किंवा जेथे धातु ओततात त्या भट्टीवर साचलेला गाळ निरुपयोगी, कुचकामी व अशुध्द असतो, तो फेकून देतात. धातु गाळणारा सोने वा चांदी यावरील “गाळ” दूर करतो. याचप्रमाणे यहोवा दुष्टांना मळीचा ढिगारा समजतो व त्यांना, त्याची पसंती प्राप्त असणाऱ्‍या मोलवान लोकांपासून दूर करतो.—पडताळा, यहेज्केल २२:१७–२२.

आमच्यासाठी धडा: गतकाळातील यहुद्यांप्रमाणेच आज यहोवाचे साक्षीदार मुक्‍ततेची वाट पाहून आहेत—या खेपेला हर्मगिदोनाच्या वादळातून. (प्रकटीकरण १६:१४, १६) या मोठ्या युध्दाकरवी हे व्यवस्थीकरण देवाच्या नियुक्‍त समयी झाडून दूर सारले जाईल. जे तारणप्राप्तीसाठी यहोवाकडे बघत नाहीत अशांना त्या मोठ्या नाशाच्या लाटेत हेलकावे खात राहिल्यामुळे मोठी निराशाजनक स्थिती प्राप्त होईल. निभावणारे मात्र “यहोवाच्या दयेस्तव . . . त्याचे उपकारस्मरण” करतील. यास्तव आजच्या या शेवटल्या काळी येशूचे अभिषिक्‍त अनुयायी आणि “मोठा लोकसमुदाय” हे दोन्ही गट यहोवावर आपली पूर्ण भिस्त ठेवून आहेत.—स्तोत्रसंहिता १०७:३१; प्रकटीकरण ७:९.

‘आरोहण स्तोत्रे’

स्तोत्रसंहिता १२० ते १३४ वाचा. या १५ स्तोत्रांना “आरोहण” गीते म्हणतात. “आरोहण” याचा तंतोतंत अर्थ काय होतो याबद्दल प्रामाण्यांचे दुमत आहे. तरीपण असे वाटते की ही स्तोत्रे इस्त्राएल आपल्या तीन वार्षिक उत्सवासाठी यरुशलेम या उत्तुंग शहरी आरोहण करतेवेळी गात असत.—स्तोत्रसंहिता १२२:१.

◆ १२०:४—“वीरांचे तीक्ष्ण बाण” व “निखारे” काय होते?

निंदा करणारी जिव्हा ही एखाद्या अस्त्राप्रमाणे किंवा आगीप्रमाणे असू शकते. (नीतीसूत्रे १२:१८; याकोब ३:६) अपराधाबद्दल योग्य शिक्षा करताना निंदा करणारी जिव्हा वीरांच्या बाणाकरवी स्तब्ध केली जाते याकडे यहोवा लक्ष देतो. केरसुणीसारख्या झुडुपाच्या झाडाचा निखारा खूप धगधगत असतो, तो “कपटी जिभे”वर गुदरणाऱ्‍या इश्‍वरी न्यायदंडाची दाहकता सुचवितो.—स्तोत्रसंहिता १०२:२, ३.

◆ १३१:२—जीव “दुध तुटलेल्या बाळकासारखा” कसा होतो?

थानमोड होण्याआधी बाळक आपल्या आहाराच्या तृप्तीकरता आईवर विसंबून असते. अशा या थानमोड झालेल्या बालकाला आपल्या आईच्या बाहूत समाधान, निर्भयता व विरंगुळा मिळतो. विनयशील मार्गाचे अनुकरण केल्यामुळे (वचन १) स्तोत्रकर्त्याला, दूध तोडलेल्या बालकाला आईच्या बाहूत वाटते त्याप्रमाणे “स्वस्थ व शांत” वाटले. यहोवाकरता विनयशीलरित्या थांबून राहणे व त्याच्या इच्छेप्रमाणे करीत राहणे निर्भयता व समृध्द आशीर्वाद आणते.

आमच्यासाठी धडा: यहोवाला आपल्या लोकांना विपत्तीपासून सोडविण्याचे सामर्थ्य असले तरी तो त्यांना सर्व विपत्तीपासून आवरत नाही. खरे पाहता, विपत्तींमुळेच लेखकाला या स्तोत्रांची रचना स्फुरली. तरीपण, देव “तुमची परीक्षा तुमच्या शक्‍तीपलीकडे होऊ देणार नाही,” तर “तिच्यातून निभावण्याचा उपायही करील.” (१ करिंथकर १०:१३) यहोवा आध्यात्मिक विनाशापासून आमचे रक्षण करतो. तो अशा काही घटना घडवून आणतो की ज्याकरवी विपत्ती नाहीशी होते किंवा आमची तो मजबूती करतो ज्यामुळे आम्हाला त्या दबावात टिकून राहता येते. यासाठीच, आम्ही आता आमच्या ख्रिस्ती सभांमध्ये जी ऐक्यता अनुभवीत आहोत ती आम्हास अधिक स्वस्थकारी व लाभदायक ठरते.—स्तोत्रसंहिता १३३:१–३.

स्तुतीपात्र देव

स्तोत्रसंहिता १३५ ते १४५ वाचा. ज्या बनविणारे अगदी त्यासारखेच असतात त्या मूर्त्यांच्या गुणवैधर्म्यात यहोवा हा स्तुतीपात्र व मुक्‍तिदाता देव आहे. (स्तोत्रसंहिता १३५, १३६) बाबेलात होते तरी त्याचे लोक “सीयोनेचे . . . गाणे” विसरले नव्हते. (स्तोत्रसंहिता १३७) दावीद म्हणतो की “पृथ्वीवरील सर्व राजे तुझे [यहोवाचे] उपकारस्मरण करतील.” याशिवाय स्वतःची तो ज्या अद्‌र्भितरितीने स्वतःची घडण झाली त्याबद्दल उल्लास करतो. (स्तोत्रसंहिता १३८, १३९) तो देवाकडे संरक्षणासाठी प्रार्थना करतो व त्याच्या चांगुलपणाची स्तुती गातो. यहोवाबरोबरील चांगले नातेसंबंध केवळ खरा सौख्यानंद देतो हे त्याला ठाऊक आहे.—स्तोत्रसंहिता १४०–१४५.

◆ १३८:२—देवाने आपल्या नावाहून आपल्या वचनाची थोरवी कशी वाढविली?

यहोवा आपल्या नावाआधारे जे काही घोषित करतो त्याची पूर्णता नक्कीच होईल अशी आम्ही खात्री धरु शकतो. तरीपण तो नेहमीच आमच्या आशा अपेक्षा उंचावतो, आणि आमच्या अपेक्षेपेक्षा त्याची पूर्णता खूप पुढे जाते. अशाप्रकारे, आमच्या अपेक्षेपेक्षा भव्य पूर्णता साधून देव आपल्या “वचनांची” थोरवी वाढवितो.

◆ १३९:९—“पहोटेचे पंख” याचा काय अर्थ होतो?

हे उद्‌गार सकाळच्या सूर्यप्रकाशाचे विवेचन करतात, त्याला जणू पंख असून ते आकाशात पूर्वेकडून पश्‍चिमेकडे पसरतात असे म्हणतात. दावीदाने “पहाटेचे पंख” धारण करुन पश्‍चिम दिशेकडे टोकापर्यंत प्रयाण केले तरी तो यहोवाची काळजी व नियंत्रण याखाली राहणार होता.—स्तोत्रसंहिता १३९:१०; पडताळा आमोस ९:२, ३.

◆ १४१:३—“आपल्या मुखावर पहारा असावा” अशी दावीदाची का इच्छा होती?

जीभ कोणती इजा घडवून आणू शकते व अपूर्ण मानवांना खासपणे उद्विग्न स्थितीत मोठ्या निष्ठुरपणे बोलण्याची प्रेरणा का घडते ते दावीदाला ठाऊक होते. मोशे हा सबंध पृथ्वीवर अत्यंत लीन माणूस होता तरी त्याने आपल्या जिव्हेने मरीबाच्या पाण्याच्या प्रसंगी पाप केले. (गणना १२:३; २०:९–१३) या कारणास्तव, घातक भाषण टाळावयाचे आहे आणि आपले अंतःकरण सुस्थितीत ठेवायचे आहे तर ओठावर किंवा मुखावर ताबा ठेवणे जरुरीचे आहे.—याकोब ३:५–१२.

◆ १४२:७—आपला जीव “बंदी”त होता असे दावीदाला का वाटले?

अंधारकोठडीत, बंदीगृहात, सर्व माणसांच्या संपर्कापासून वेगळे असताना जसे वाटते त्याप्रमाणे त्याला आपल्या समस्यांच्या बाबतीत एकाकी असल्याचे वाटत होते. आमचीही अशी भावनिक स्थिती बनते व आमच्या “उजवीकडे” सुध्दा कशाचाही आश्रय नाही असे भासू लागते त्यावेळी मदतीकरता मोठ्या आत्मविश्‍वासाने आम्ही यहोवाचा धावा करु शकतो.—स्तोत्रसंहिता १४२:३–७.

आमच्यासाठी धडा: देव आपणाला “धुंडाळून पाहू शकतो,” आपल्याला व आपल्या मार्गांना “जाणू शकतो” याविषयी दावीदाने १३९ व्या स्तोत्रात आनंद व्यक्‍त केला आहे. पळवाटा शोधण्यापेक्षा दावीदाने यहोवाचे मार्गदर्शन व नियंत्रण याबद्दल अधिक आत्मीयता दाखविली. देवाचे सतत आपल्यावर निरिक्षण आहे हे त्याला ठाऊक होते. अशी ही जाणीव एखाद्याला वाईट मार्गापासून परावृत्त करते एवढेच नसून त्याकरवी त्याचे पूर्ण सांत्वनही होते. यहोवाचे आमच्या कृत्यांकडे लक्ष असते, आमच्या समस्या तो जाणतो व आमची मदत करण्यास तो सदैव तत्पर असतो या गोष्टी आम्हामध्ये निर्भयता व शांतीविषयीच्या सखोल भावना उभारतात. हे आमच्या सौख्यानंदास उपयुक्‍त ठरते.

यहोवाची स्तुती असो!

स्तोत्रसंहिता १४६ ते १५० वाचा. ही स्तोत्रे स्तोत्रसंहितेच्या सबंध पुस्तकाचा मुख्य विषय पुन्हा निनादून सांगतात: “अहो लोकहो, तुम्ही यहोवाचे स्तवन करा.” याचे प्रत्येक स्तोत्र सुरुवातीला व शेवटी हे वैभवी शब्द देते. याचा भव्य कळस १५० व्या स्तोत्रात दिसतो जेथे सर्व निर्मितीला “यहोवाचे स्तवन करा” असे आवाहन देण्यात आले आहे.

◆ स्तोत्रसंहिता १४६:३—मानवी अधिपतींवर का आत्मविश्‍वास ठेवू नये?

मानवी अधिपती मर्त्य आहेत. ते स्वतःला आणि त्यांच्यावर भिस्त ठेवणाऱ्‍यांचा बचाव करण्यास असमर्थ आहेत. तद्वत, मानवी अधिपतींवरील आत्मविश्‍वास हा ओघाओघाने मृत्युप्रत नेतो. पण, “ज्याची आशा आपला देव यहोवा ह्‍यावर आहे तो धन्य.” (स्तोत्रसंहिता १४६:५, ६) मानव एकटा देऊ शकतो त्यापेक्षा श्रेष्ठ प्रतीच्या मार्गदर्शनाची स्तोत्रकर्त्याने गरज हेरली.

◆ १४८:४—“आकाशावरील जले” कोणती आहेत?

असे म्हणण्यात स्तोत्रकर्त्याचा, पृथ्वीहून उंचभागी जलाचा संचय नेणाऱ्‍या आणि वेळोवेळी पृथ्वीवर पावसाच्या रुपाने सिंचन करणाऱ्‍या ढगांचा मतितार्थ असावा. पृथ्वीवर पडणारे पर्जन्याचे पाणी परत समुद्रास जाऊन मिळते. हे चक्र जीवनास अत्यंत महत्वाचे आहे व ते आहे हीच गोष्ट निर्माणकर्त्याची स्तुती वदविते. पृथ्वी व ढग यांच्यामधील अंतराळास आकाश म्हटले जात असल्यामुळे स्तोत्रकर्त्याने या ढगांना “आकाशावरील जले” असे संबोधिले.

स्तोत्रे हे सत्य स्वतःच सुव्यक्‍त करतात: आम्हास खरे आनंदी व्हावयाचे आहे तर यहोवाबरोबर चांगले नातेसंबंध राखण्याची गरज आहे. यामुळेच देवाच्या लोकांचे सर्वतोपरी ध्येय आणि आमच्या अस्तित्वाचा उद्देश स्तोत्रकर्त्याच्या समारोपाच्या आवाहनात अगदी समर्पकपणे मांडला आहे: “प्रत्येक श्‍वासवान प्राणी यहोवाचे स्तवन करो. अहो लोकहो, तुम्ही यहोवाचे स्तवन करा!”—स्तोत्रसंहिता १५०:६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा