वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ७/१ पृ. ८-१३
  • तुम्ही कोणत्या मेजावरचे खात आहात?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही कोणत्या मेजावरचे खात आहात?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “भुतांच्या मेजाला” टाळणे
  • ‘विश्‍वासू दास’ यहोवाच्या मेजावर अन्‍न वाढतो
  • भुतांच्या मेजावरील विषारी अन्‍नापासून सावध राहा
  • केवळ यहोवाचे मेज टिकेल
  • अनुक्रमणिका
    सावध राहा!—२०२४
  • ईश्‍वरी शिक्षणाविरुद्ध दुरात्म्यांचे शिक्षण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • दुरात्मे—आपण त्यांचा प्रतिकार कसा करू शकतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • युवकांनो—तुम्ही कोणाच्या शिक्षणाकडे लक्ष देता?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ७/१ पृ. ८-१३

तुम्ही कोणत्या मेजावरचे खात आहात?

“तुम्ही ‘यहोवाच्या मेजावरचे’ व भुतांच्याही मेजावरचे खाऊ शकत नाही.”—१ करिंथकर १०:२१, NW.

१. आमच्या समोर कोणते मेज मांडले आहेत, व प्रेषित पौलाने त्याबद्दल आम्हाला कोणता इशारा दिला आहे?

प्रेषित पौलाचे हे प्रेरित शब्द, मानवजातीच्या पुढे दोन लाक्षणिक मेज मांडल्याचे दाखवतात. प्रत्येक मेज, त्यावर ठेवलेल्या लाक्षणिक आहारावरून ओळखता येते. आम्ही सर्व जण एका किंवा दुसऱ्‍या मेजावरचे खात असतो. परंतु, देवाला संतुष्ट करण्याची आपली इच्छा असल्यास, आम्ही त्याच्या मेजावरचे तसेच त्याचवेळी भुतांच्या मेजावरचे थोडे थोडे खाऊ शकत नाही. प्रेषित पौलाने इशारा दिला: “परराष्ट्रीय जे यज्ञ करतात ते देवाला नव्हे तर भुतांना करितात; आणि तुम्ही भुतांचे सहभागी व्हावे अशी माझी इच्छा नाही. तुमच्याने प्रभूचा [यहोवा, NW] प्याला व भुतांचाहि प्याला पिववत नाही; प्रभूच्या [यहोवा, NW] मेजावरचे व भुतांच्याहि मेजावरचे तुमच्याने खाववत नाही.”—१ करिंथकर १०:२०, २१.

२. (अ) प्राचीन इस्राएलाच्या काळात यहोवाचे कोणते मेज अस्तित्वात होते, व शांत्यर्पणाच्या यज्ञबलीत कोण सहभाग घेत? (ब) आज, यहोवाच्या मेजाची सहभागिता करण्याचा अर्थ काय होतो?

२ पौलाचे शब्द आम्हाला, प्राचीन इस्राएल लोक यहोवाच्या नियमशास्त्राच्या अधीन ज्या शांत्यर्पणाचा यज्ञबली वाहत त्याची आठवण करून देतात. देवाच्या वेदीला मेज संबोधले जाई, तसेच बलिदान करण्यासाठी प्राणी आणणाऱ्‍याला यहोवा व याजकांसोबत सहभागिता करी असे म्हटले जाई. कशाप्रकारे? प्रथम, यहोवा त्या अर्पणाची सहभागिता, त्याच्या वेदीवर रक्‍त शिंपडल्यामुळे, व वेदीखालच्या अग्नीने चरबीला भस्म केल्यामुळे करीत असे. दुसरे, याजक (व त्याचे कुटुंब) यज्ञबलीची भाजलेली छाती व उजवी मांडी खाण्याद्वारे सहभागिता करत. तिसरे, बाकीचे उरलेले, अर्पण करणारा सहभागिता करत असे. (लेवीय ७:११-३६) आज, यहोवाच्या मेजावरून खाण्याचा अर्थ, येशू आणि प्रेषितांनी घालून दिलेल्या उदाहरणाप्रमाणे तो अपेक्षित असलेली भक्‍ती आम्ही देणे असा होतो. असे करण्यासाठी, आम्ही यहोवा त्याचे वचन आणि संघटनेकडून पुरवत असलेला आध्यात्मिक आहार घेतला पाहिजे. यहोवासोबत त्याच्या मेजावरून विशेष सहभागितेचा आनंद घेतलेल्या इस्राएल लोकांना, भुतांच्या मेजावर अर्पण वाहण्यास मनाई केली होती. आध्यात्मिक इस्राएल लोक आणि त्यांचे सहकारी, “दुसरी मेंढरे” त्याच ईश्‍वरी मनाईच्या अधीन आहेत.—योहान १०:१६.

३. आमच्या दिवसात, एखादा व्यक्‍ती, भुतांच्या मेजावरील खाल्ल्याबद्दल कशाप्रकारे दोषी होऊ शकतो?

३ आमच्या दिवसात, एखादी व्यक्‍ती भुतांच्या मेजावरचे खाल्ल्याने कशाप्रकारे दोषी होऊ शकते? यहोवा ज्या गोष्टीचा विरोध करतो ती करीत राहिल्याने. भुतांचे मेज, यामध्ये सर्व दुरात्मिक खोट्या प्रचाराचा समावेश आहे. आम्हाला फसविण्यासाठी व यहोवापासून दूर नेण्यासाठी त्याची रचना केलेली आहे. अशा विषाने आपले अंतःकरण आणि मन भरविण्याची इच्छा कोणाची असेल? खरे ख्रिश्‍चन, आज अनेक लोक युद्धाच्या व धनाच्या देवतांना अर्पण करीत असलेल्या यज्ञबलीची सहभागिता करण्याचे नाकारतात.—मत्तय ६:२४.

“भुतांच्या मेजाला” टाळणे

४. आम्ही सर्व जण कोणत्या प्रश्‍नाचा सामना करतो, व आम्ही, जाणूनबुजून भुतांच्या मेजावरचे खाण्याची इच्छा का करु नये?

४ आम्हा सर्वांना ज्या प्रश्‍नाचा सामना करावा लागतो तो हा आहे की, मी कोणत्या मेजावरचे खात आहे? आम्हाला या किंवा त्या मेजावरचे खावयास लागणारच, या वस्तुस्थितीला आम्हाला टाळता येणार नाही. (पडताळा मत्तय १२:३०.) आमची जाणूनबुजून भुतांच्या मेजावरचे खाण्याची इच्छा नसेल. असे करणे, आम्हाला एकच खरा व जिवंत देव, यहोवा याची मर्जी गमावण्यास कारणीभूत ठरू शकते. दुसऱ्‍या बाजूला पाहिल्यास, केवळ यहोवाच्या मेजावरचे अन्‍न घेतल्याने आम्हाला सौख्यानंदाच्या सार्वकालिक जीवनाप्रत निरवले जाते! (योहान १७:३) एक अशी म्हण आहे की, एखाद्या व्यक्‍तीवरून तो काय खातो हे दिसून येते. तर मग, कोणाचेही, चांगले शारीरिक व मानसिक आरोग्य जोपासण्याची इच्छा आहे, त्यांनी त्यांच्या आहारावर लक्ष देण्याची गरज आहे. चरबीयुक्‍त निकस अन्‍न जरी रसायने घालून चवदार तयार केलेले असले तरी, ते आमच्या शारीरिक आरोग्याला चांगले ठेवू शकत नाही. अशाचप्रकारे, दुरात्मिक कल्पनांनी बांधला गेलेला या जगाचा खोटा प्रचार, आमचे मन भ्रष्ट करील अशा लाक्षणिक अर्थाने निकस आहारच आहे.

५. आज आम्ही, भुतांचे शिक्षण घेण्याचे कसे टाळू शकतो?

५ प्रेषित पौलाने भाकीत केले की, शेवटल्या काळी लोक “भुतांच्या शिक्षणाच्या” नादी लागतील. (१ तीमथ्य ४:१) ह्‍या भुतांच्या शिकवणी केवळ खोट्या धार्मिक विश्‍वासातच दिसत नाहीत तर, इतर मार्गात देखील त्या विस्तृत प्रमाणात फैलावलेल्या आहेत. उदाहरणार्थ, आम्ही व आमची मुले कोणती पुस्तके आणि नियतकालिके वाचतो, कोणते दूरदर्शन कार्यक्रम पाहतो, व कोणते खेळ आणि सिनेमा पाहतो त्याचे परिक्षण करून तुलना करण्याची गरज आहे. (नीतीसूत्रे १४:१५) आम्ही मनोरंजनासाठी जर कल्पित कथा वाचत असलो तर, त्या मूर्ख हिंसाचार, बेकायदेशीर लैंगिकता, किंवा गूढ आचरणाला महत्त्व देतात का? प्रशिक्षित होण्यासाठी जर आम्ही अकल्पित कथा वाचत असलो तर, त्या ‘ख्रिस्ताप्रमाणे नसणाऱ्‍या’ जीवनक्रमणाचे व तत्त्वज्ञानाचे विवरण देतात का? (कलस्सैकर २:८) त्यामध्ये निरर्थक कल्पना सादर केल्या जातात की जगाच्या सामाजिक चळवळीत भाग घेण्याचे समर्थन दिले जाते? ते अधिक श्रीमंत होण्याच्या निश्‍चयाला करारी बनवते का? (१ तीमथ्य ६:९) गैरख्रिस्ती असलेल्या फाटाफुटीच्या शिकवणी धूर्तपणे सादर करणारे ते प्रकाशन आहे का? याचे उत्तर होय असल्यास, व आम्ही त्या साहित्याचे वाचन करीत राहिलो किंवा त्याला चित्रपटाच्या रुपात पाहत राहिलो तर, आम्ही भुतांच्या मेजावरचे खाण्याचा धोका पत्करत असतो. आज, बोध करणारे व अत्याधुनिक वाटत असणारे, जगीक तत्त्वज्ञानाला वाढविणारे लाखो साहित्य आहेत. (उपदेशक १२:१२) परंतु खरोखर यातील कोणताही प्रचार नवा नाही; शिवाय सैतानाने हव्वेला ते तिच्या भल्यासाठी आहे असे कावेबाजपणे म्हटले, त्यापेक्षा अधिक ते एखाद्याच्या लाभासाठी व सुधारण्याच्या कामी पडत नाही.—२ करिंथकर ११:३.

६. सैतान आम्हाला त्याच्या दुरात्मिक निकस अन्‍नाची चव घेण्याचे आमंत्रण देतो तेव्हा, आम्ही त्याला कशी प्रतिक्रिया दाखवली पाहिजे?

६ या कारणास्तव, सैतान आम्हाला दुरात्मिक निकस अन्‍नाची चव घेण्याचे आमंत्रण देतो तेव्हा, आम्ही कसा प्रतिसाद दिला पाहिजे? सैतानाने दगडाचे भाकरीत रूपांतर करण्याची येशूची परीक्षा घेत असताना येशूने जी प्रतिक्रिया दाखवली तीच आम्ही देखील दाखवावी. येशूने प्रत्युत्तर दिले: “‘मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर, परमेश्‍वराच्या [यहोवा, NW] मुखातून निघणाऱ्‍या प्रत्येक वचनाने जगेल, असा शास्त्रलेख आहे.’” येशूने सैतानाच्या पाया पडून त्याची उपासना करण्याचे केवळ एक कृत्य केले तर “जगातील सर्व राज्ये व त्यांचे वैभव” त्याने येशूला देऊ केले तेव्हा, येशूने म्हटले: “अरे सैताना, चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘परमेश्‍वर [यहोवा, NW] तुझा देव, ह्‍याला नमन कर, व केवळ त्याचीच उपासना कर.’”—मत्तय ४:३, ४, ८-१०.

७. आम्ही यहोवाचे मेज आणि भुतांचे मेज यावरील यशस्वीपणे खाऊ शकतो असा विचार केल्यास, स्वतःची फसवणूक का करुन घेतो?

७ यहोवाचे मेज व दुरात्मिक शत्रूंनी मांडलेल्या मेजाचा समेट कधीही व्हावयाचा नाही! होय, तसे करण्याचा आधी देखील प्रयत्न केला गेला. एलीया संदेष्ट्याच्या काळातील प्राचीन इस्राएल लोकांची आठवण करा. लोक, यहोवाची उपासना करण्याचा दावा करीत होते, परंतु त्यांचा असा विश्‍वास होता की, बालासारख्या इतर दैवतांनी समृद्धतेचे अभिवचन दिले आहे. एलीयाने लोकांना बोलावून म्हटले: “तुम्ही दोहों मतांमध्ये कोठवर लटपटाल? परमेश्‍वर [यहोवा, NW] हा देव असला तर त्याच्या भजनी लागा; बआल हा देव असला तर त्याच्या भजनी लागा.” खात्रीने मग, इस्राएल लोक ‘दोन दरडींवर हात ठेवत होते.’ (१ राजे १८:२१; मराठी कॉमन लँग्वेज) एलीयाने बालाच्या संदेष्ट्यांना त्यांच्या देवताचे देवत्त्व शाबीत करण्यास आव्हान दिले. जो देव अर्पणावर आकाशातून अग्नी पाठवील तो खरा देव शाबीत होईल. बरेच प्रयत्न केल्यावर देखील, बालाच्या संदेष्ट्यांना अपयश आले. एलीयाने साधी प्रार्थना केली: “हे परमेश्‍वरा [यहोवा, NW] ऐक, तूच देव आहेस . . . याची या लोकांस जाणीव होऊ दे.” लगेच यहोवाकडून आकाशातून अग्नी उतरला आणि पाणी ओतलेल्या होमबलीला त्याने भस्म करुन टाकले. यहोवाच्या देवत्वाच्या प्रदर्शनाची खात्री पटल्यावर स्फुरण चढलेल्या लोकांनी, एलीयाचे आज्ञापालन करुन बालाच्या ४५० संदेष्ट्यांचा वध केला. (१ राजे १८:२४-४०) यास्तव, आज आम्ही यहोवाला खरा देव म्हणून ओळखले पाहिजे व जर आम्ही अद्यापि तसे केले नसल्यास केवळ त्याच्याच मेजावरचे खाण्यासाठी निर्णायकपणे वळले पाहिजे.

‘विश्‍वासू दास’ यहोवाच्या मेजावर अन्‍न वाढतो

८. येशूच्या उपस्थिती दरम्यान त्याच्या शिष्यांची भरवणूक करण्यासाठी तो कोणत्या दासाचा वापर करील असे त्याने भाकीत केले, व त्याच्या दासाचे ओळखचिन्ह काय आहे?

८ प्रभू येशू ख्रिस्ताने, त्याच्या उपस्थितीच्या दरम्यान “विश्‍वासू व बुद्धिमान दास” त्याच्या शिष्यांना आध्यात्मिक अन्‍न देईल असे भाकीत केले: “मी तुम्हास खचित सांगतो की, त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील.” (मत्तय २४:४५-४७) तो दास कोणी एखादा व्यक्‍ती नसून, समर्पित अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचा वर्ग आहे. या दासाने, यहोवाच्या मेजावर अभिषिक्‍त शेष तसेच, ‘मोठ्या लोकसमुदायासाठी’ उत्कृष्ट आध्यात्मिक अन्‍न ठेवले आहे. आता संख्याबलाने ४० लाखापेक्षा अधिक असलेल्या, मोठ्या लोकसमुदायाने अभिषिक्‍त शेषांसोबत यहोवा देवाच्या सार्वत्रिक सार्वभौम सत्तेला व त्याच्या पवित्र नावाचे पवित्रीकरण करणाऱ्‍या त्याच्या राज्याविषयी त्यांची भूमिका घेतली आहे.—प्रकटीकरण ७:९-१७.

९. यहोवाच्या साक्षीदारांना आध्यात्मिक अन्‍न पुरविण्यासाठी, दास वर्ग कोणत्या साहित्याचा वापर करीत आहे, व त्यांच्या आध्यात्मिक मेजवानीचे भविष्यवादित वर्णन कसे केले आहे?

९ हा विश्‍वासू दास वर्ग, सर्व यहोवाच्या साक्षीदारांना आध्यात्मिक पौष्टिक आहार देण्याकरता वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीचा वापर करीत आहे. ख्रिस्ती धर्मजगत तसेच या व्यवस्थिकरणातील सर्वांची, जीवन देणाऱ्‍या आध्यात्मिक आहाराच्या कमतरतेमुळे उपासमार होत असताना, यहोवाचे लोक मेजवानीचा आनंद घेत आहेत. (आमोस ८:११) हे यशया २५:६ मध्ये दिलेल्या भविष्यवाणीच्या पूर्णतेप्रमाणे आहे: “सेनाधीश परमेश्‍वर [यहोवा, NW] ह्‍या डोंगरावर सर्व राष्ट्रांसाठी मिष्टान्‍नाची मेजवानी करीत आहे, उत्कृष्ट मिष्टान्‍नाची व राखून ठेविल्यावर गाळलेल्या द्राक्षारसाची मेजवानी करीत आहे.” तसेच ७ व ८ वचन दाखवते त्यानुसार, ही मेजवानी सर्वकाळ चालत राहील. यहोवाच्या दृश्‍य संघटनेत असणाऱ्‍यांसाठी आता तसेच, भविष्यात देखील तो किती मोठा आशीर्वाद असेल!

भुतांच्या मेजावरील विषारी अन्‍नापासून सावध राहा

१०. (अ) दुष्ट दास वर्गाने कोणत्या प्रकारचे अन्‍न दिले आहे, व त्यांचा काय हेतू आहे? (ब) दुष्ट दास वर्ग त्यांच्या आधीच्या सहदासांना कसे वागवतो?

१० भुतांच्या मेजावरील अन्‍न विषारी आहे. उदाहरणार्थ, दुष्ट दास वर्ग व धर्मत्यागी लोकांनी दिलेल्या अन्‍नाचा विचार करा. ते पौष्टिकता देत नाही किंवा उभारणी करीत नाही; ते आरोग्यदायक नाही. ते असूही शकणार नाही, कारण धर्मत्याग्यांनी यहोवाच्या मेजावरील खाण्याचे बंद केले आहे. याच्या परिणामस्वरूपात, त्यांनी विकसित केलेले नवे मनुष्यत्त्व नाहीसे झाले आहे. त्यांना प्रवृत्त करणारा पवित्र आत्मा नसून, झोंबणारा कडूपणा आहे. ते एकाच हेतुने पछाडलेले आहेत—येशूने भाकीत केल्याप्रमाणे त्यांच्या आधीच्या सहदासांना मारणे हे होय.—मत्तय २४:४८, ४९.

११. एखाद्याच्या आध्यात्मिक अन्‍नाच्या निवडीबद्दल सी. टी. रसेल यांनी काय लिहिले, व त्यांनी, यहोवाच्या मेजापासून दूर गेलेल्यांचे वर्णन कसे केले?

११ उदाहरणार्थ, मागे १९०९ मध्ये वॉचटावर सोसायटीचे तेव्हाचे अध्यक्ष, सी. टी. रसेल यांनी, यहोवाच्या मेजाकडे पाठ फिरवून त्यांच्या आधीच्या सहदासांना गैरवागणूक दिली अशांविषयी लिहिले. ऑक्टोबर १, १९०९ च्या द वॉचटावर मध्ये म्हटले: “संस्था आणि तिच्या कार्यातून स्वतःला वेगळे करून घेणारे, स्वतःही आध्यात्मिकरित्या समृद्ध होऊन किंवा इतरांची विश्‍वासात व आत्म्याच्या फळांमध्ये वाढ करण्याऐवजी, ते त्याच्या उलट कार्य करत आहेत. ज्या कारणासाठी पूर्वी त्यांनी सेवा केली त्याचीच हानी करण्याचा प्रयत्न केला, आणि जवळजवळ ते हळूहळू विस्मृतीत बुडून जातात. अशाप्रकारे, ते स्वतःला आणि याचप्रकारच्या तक्रारी आत्म्याने पछाडलेल्यांना इजा पोंहचवतात. . . . इतरांना, दुसऱ्‍या मेजावर चांगले व उत्तम अन्‍न मिळू शकते किंवा ते स्वतःसाठी चांगले व उत्तम अन्‍न तयार करू शकतात असे वाटत असल्यास—त्यांना तसे करू द्या. . . . त्याच्या ऐवजी आम्ही इतरांना, अन्‍न शोधण्यासाठी व त्यांच्या समाधानाला प्रकाश मिळावा याकरता त्यांना कोठेही व सगळीकडे जाऊ देतो, परंतु आश्‍चर्याची गोष्ट अशी आहे की, आमचे विरोधक वेगळाच मार्ग निवडतात. जगाच्या धाडसी वृत्तीने, ‘मला हवे असलेले सापडले, त्याला मी बरे असल्याचे समजतो’ असे म्हणण्याऐवजी ते, आम्ही जगीक लोकांकडून अपेक्षा देखील करू शकत नाही अशी, क्रोध, मत्सर, द्वेष, झगडे, ‘देहाची व दियाबलाची कर्मे’ प्रकट करतात. ते मूर्खता, सैतानी जलसंत्रास रोग [रेबिज] या वाईट गोष्टींनी भरविले गेल्यासारखे वाटतात. काही जण आम्हांवर प्रहार करतात, व मग आम्हीच त्यांच्यावर प्रहार केल्याचा दावा करतात. ते तिरस्कारणीय लबाडी बोलण्यास व लिहिण्यास आणि नीचपणा करण्यासाठी खालच्या थराला जाण्यास तयार असतात.”

१२. (अ) धर्मत्यागी त्यांच्या सहदासांना कसे मारतात? (ब) धर्मत्यागी लोकांच्या लिखाणाविषयी कुतूहलापोटी स्वतःला भरविणे धोक्याचे का आहे?

१२ होय, धर्मत्यागी लोक, अर्थाचा अनर्थ करण्यासाठी, अर्धसत्य बोलण्यासाठी, उघड खोटेपणाचा अवलंब करणारे साहित्य प्रकाशित करतात. ते, बेसावध जणांना जाळ्यात पकडण्यासाठी साक्षीदारांच्या अधिवेशनात पाहणी करण्याचा देखील प्रयत्न करतात. या कारणास्तव, आमच्या कुतूहलतेपोटी अशी लिखाणे वाचणे किंवा त्यांचे अपशब्द ऐकणे घातक ठरू शकेल! आपल्याला व्यक्‍तिगतपणे याची जोखीम पत्करावी लागणार नाही, असा आपण कदाचित विचार करणार नसलो तरी, धोका तसाच कायम राहतो. का बरे? एक गोष्ट म्हणजे, काही धर्मत्यागी साहित्य खोटेपणाला, “गोड व लाघवी भाषण” व “कपटी शब्द बोलून” सादर करतात. (रोमकर १६:१७, १८; २ पेत्र २:३, पंडिता रमाबाई भाषांतर) तुम्ही भुतांच्या मेजावरून कशाची अपेक्षा कराल? धर्मत्यागी लोक विशिष्ट वास्तविकता सादर करत असले तरीही, त्यांचा कोठेही संदर्भ सापडत नसतो. त्यांचा हेतू केवळ इतरांना यहोवाच्या मेजावरून दूर करण्याचा असतो. त्यांची सर्व लिखाणे केवळ टीकात्मक आणि बदनामी करणारी असतात! त्यातले काहीच उभारणीकारक नसते.

१३, १४. धर्मत्यागी लोकांची फळे व त्यांचा प्रचार काय आहे?

१३ येशूने म्हटले: “त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल.” (मत्तय ७:१६) आता धर्मत्यागी लोकांची व त्यांच्या प्रकाशनांची कोणती फळे आहेत? त्यांच्या प्रचाराला चार गोष्टी चिन्हित करतात. (१) शहाणपणा. इफिसकर ४:१४ म्हणते की, ते “भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्‍या युक्त्या” करतात. (२) गर्विष्ठ चलाखी. (३) प्रीतीचा अभाव. (४) विविध प्रकारात अप्रामाणिकपणा. हे, भुतांच्या मेजावर असलेल्या अन्‍नातील साहित्य आहे, ज्यांची रचना, यहोवाच्या लोकांच्या विश्‍वासाची पायमल्ली करण्यासाठी केली आहे.

१४ दुसराही एक पैलू आहे. धर्मत्यागी लोक पुन्हा कशाकडे वळाले आहेत? अनेक बाबतीत, त्यांनी ख्रिस्ती धर्मजगताच्या अंधकारात व त्याच्या सिद्धांतात पुनःप्रवेश केला आहे जसे की, सर्व ख्रिस्ती लोक स्वर्गात जातील हा विश्‍वास, ते पुन्हा बाळगू लागले आहेत. शिवाय, अनेक लोक, रक्‍त, तटस्थता, आणि देवाच्या राज्याची साक्ष देण्याच्या गरजेविषयी कोणतीही शास्त्रवचनीय भूमिका घेत नाहीत. परंतु आम्ही, मोठ्या बाबेलच्या अंधकारातून बचावून निघालो आहोत, व परत तिच्यात जाण्याचे इच्छित नाही. (प्रकटीकरण १८:२, ४) यहोवाचे निष्ठावंत सेवक या नात्याने, आम्हाला “सुवचने” घेण्यासाठी मदत करणाऱ्‍यांस आता शाब्दिक मार देणारे, तसेच यहोवाच्या मेजाला नाकारणारे, यांच्यापासून निघणाऱ्‍या प्रचाराला पारखण्याची तरी काय गरज आहे?—२ तीमथ्य १:१३.

१५. धर्मत्यागी लोक करत असलेला दोषारोप आपण ऐकतो तेव्हा, सुज्ञ मार्ग घेण्यासाठी पवित्र शास्त्रातील कोणते तत्त्व आम्हाला मदत करते?

१५ काही जण, धर्मत्यागी लावत असलेल्या दोषारोपाला जाणण्यासाठी कुतूहलजनक असतील. परंतु, आम्ही, अनुवाद १२:३०, ३१ मध्ये दिलेल्या तत्त्वाला अंतःकरणाप्रत घेतले पाहिजे. येथे, यहोवाने मोशेद्वारे इस्राएल लोकांना त्यांनी मूर्तीपूजकांना वचनदत्त देशातून हाकून लावून ताबा मिळवल्यावर काय टाळले पाहिजे त्याचा इशारा दिला. “सांभाळ, नाहीतर तुझ्यासमोर त्यांचा पाडाव झाल्यावर तुलाच त्यांचे अनुकरण करण्याचा मोह होईल, आणि ही रा आपल्या देवांची ज्या प्रकारे सेवा करीत होती तशीच आपणहि करावी असे मनात आणून त्या देवांच्या नादी तू लागशील. आपला देव परमेश्‍वर [यहोवा, NW] ह्‍यांच्या बाबतीत तू असे करू नको.” होय, मानवाची कुतूहलता कशी कार्य करते ते यहोवा देवाला माहीत आहे. हव्वा आणि लोटाच्या बायकोची सुद्धा आठवण करा! (लूक १७:३२; १ तीमथ्य २:१४) धर्मत्यागी लोक काय म्हणतात किंवा करतात त्याकडे आपण कधीच कान देऊ नये. त्याऐवजी, लोकांची उभारणी करण्यात, व निष्ठावानपणे यहोवाच्या मेजावरचे खात राहण्यात व्यग्र राहू या!

केवळ यहोवाचे मेज टिकेल

१६. (अ) लवकरच सैतान, त्याचे दुरात्मे, व जगातील रा स्वतःला भरवित असलेल्या लाक्षणिक मेजाचे काय होईल? (ब) भुतांच्या मेजावर खात असलेल्या सर्व मानवांचे काय होईल?

१६ लवकरच मोठे संकट अचानक सुरू होईल, व ‘सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या लढाईचा’ कळस त्वरित गाठील. (प्रकटीकरण १६:१४, १६) यहोवा जसे या व्यवस्थिकरणाचा व जगातील रा खात असलेल्या लाक्षणिक मेजाचा नाश करतो तसा उत्कर्ष गाठला जाईल. त्याचप्रमाणे यहोवा, दियाबल सैतानाच्या संपूर्ण अदृश्‍य संघटनेचे त्याच्या दुरात्म्यांच्या जमावासह उच्चाटन करील. सैतानाच्या आध्यात्मिक मेजावर, म्हणजे भुतांच्या मेजावर जे अजूनही खात राहतील—त्यांच्या नाशासाठी—त्यांना खरोखरच्या अन्‍नाची सहभागिता करण्याकरता नव्हे तर, जेवणातील एका वाढपात वाढली जाणारी मोठी वस्तु व्हावी लागेल!—पाहा यहेज्केल ३९:४; प्रकटीकरण १९:१७, १८.

१७. केवळ यहोवाच्या मेजावरचे खाणाऱ्‍यांना कोणते आशीर्वाद मिळतील?

१७ केवळ यहोवाचे मेज टिकून राहील. जे त्यावरील भोजन गुणग्राहकता बाळगून घेत राहतील, त्यांचे रक्षण केले जाईल व तेथे त्यांना सदासर्वकाळ खात राहण्याची सुसंधी असेल. त्यांना पुन्हा कधीही कोणत्याही प्रकारच्या अन्‍नाचा तुटवडा जाणवणार नाही. (स्तोत्रसंहिता ६७:६; ७२:१६) ते परिपूर्ण आरोग्याने नंदनवनात, यहोवा देवाची सेवा करतील! शेवटी प्रकटीकरण २१:४ मधील चेतना देणाऱ्‍या शब्दांची भव्य रीतीने पूर्णता होईल: “तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” कोणताही विरोध नसल्यामुळे, यहोवा देवाची सार्वत्रिक सार्वभौम सत्ता, मुक्‍त केलेली मानवजात नंदनवन पृथ्वीवर वस्ती करील तसे, सर्व ठिकाणी सदासर्वकाळ राज्य करील. हे बक्षीस प्राप्त करण्यासाठी, आपण सर्वजण आध्यात्मिक अन्‍नाने भरलेल्या केवळ यहोवाच्या मेजावर सहभाग घेण्याचा दृढ निश्‍चय करु या!

तुम्ही कसे उत्तर द्याल?

▫ आम्ही भुतांच्या शिक्षणाने बहकण्याचे कसे टाळू शकतो?

▫ आम्ही, यहोवाचे मेज व भुतांचे मेज या दोहोंवरील यशस्वीपणे का खाऊ शकत नाही?

▫ धर्मत्यागी लोक कोणत्या प्रकारच्या अन्‍नाचे वाटप करीत आहेत?

▫ धर्मत्यागी लोकांच्या आरोपाविषयी कुतूहल बाळगणे धोकादायक का आहे?

▫ धर्मत्याग्यांची कोणती फळे आहेत?

[१० पानांवरील चित्रं]

यहोवाचे मेज उत्कृष्ट आध्यात्मिक आहाराने काठोकाठ भरलेले आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा