प्रीतीचा मार्ग कधी टळत नाही
“श्रेष्ठ कृपादानांची उत्कंठा बाळगा. शिवाय एक सर्वोत्कृष्ट मार्ग मी तुम्हास दाखवितो.”—१ करिंथकर १२:३१.
१-३. (अ) प्रीती व्यक्त करायला शिकणे नवीन भाषा शिकण्याप्रमाणे कसे आहे? (ब) कोणत्या कारणांमुळे प्रीती व्यक्त करायला शिकणे आव्हानात्मक होऊ शकते?
तुम्ही कधी एखादी नवीन भाषा शिकण्याचा प्रयत्न केला आहे का? त्याविषयी थोडक्यात सांगायचे म्हणजे ते एक आव्हानच आहे! पण, एखादी भाषा सतत कानावर पडत राहिली तर लहान मूल ती शिकू शकते. त्याचा मेंदू शब्दांचा स्वर आणि अर्थ ग्रहण करतो आणि पाहता पाहता हे चिमुकले बाळ प्रावीण्याने भडाभडा बोलू लागते. परंतु, प्रौढांच्या बाबतीत तसे नाही. अनोळखी भाषेतले फक्त काही शब्द लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला वारंवार त्या भाषेच्या शब्दकोशाकडे धाव घ्यावी लागते. परंतु, कालांतराने आणि खूपदा ती भाषा ऐकल्यावर आपण त्या नवीन भाषेत विचार करू लागतो आणि ती बोलायला सोपीही वाटते.
२ प्रीती व्यक्त करायला शिकणे हे नवीन भाषा शिकण्याप्रमाणेच आहे. हे खरे की, या ईश्वरी गुणाचा काही अंश मानवांमध्ये स्वभावतःच आहे. (उत्पत्ति १:२७; पडताळा १ योहान ४:८.) तरीही, प्रीती व्यक्त करायला शिकण्यासाठी फार प्रयत्न करावा लागतो—विशेषतः आताच्या काळात कारण ममता दुर्मिळ झाली आहे. (२ तीमथ्य ३:१-५) कधी कधी कुटुंबातही असेच घडते. होय, पुष्कळांच्या घरचे वातावरण अतिशय कठोर असते जेथे प्रेमाची भाषा औषधालाही शिल्लक राहिलेली नसते. (इफिसकर ४:२९-३१; ६:४) तर मग, आपण स्वतः जर प्रीतीचा फार क्वचितच अनुभव घेतला असेल, तर प्रीती व्यक्त करायला आपण कसे शिकू शकतो?
३ बायबल आपली मदत करू शकते. पौलाने १ करिंथकर १३:४-८ येथे प्रीती काय आहे याचे फक्त वरवरचे वर्णन दिलेले नाही तर प्रीतीचे हे सर्वात श्रेष्ठ रूप कसे कार्य करते त्याचे हुबेहूब वर्णन दिले आहे. या वचनांचा विचार केल्यावर, या ईश्वरी गुणाचे स्वरूप आपल्याला समजू शकेल आणि तो व्यक्त करण्यास आपली मदत होईल. पौलाने वर्णिलेल्या प्रीतीच्या काही पैलूंचा आपण विचार करू या. आपण त्यांचे तीन विभागात वर्गीकरण करू या: सर्वसाधारणपणे आपले वर्तन; मग, इतरांसोबतच्या आपल्या नातेसंबंधांबद्दल अधिक स्पष्टपणे; आणि शेवटी आपली सहनशीलता.
प्रीती गर्वावर विजय मिळवण्यास मदत करते
४. बायबल आपल्याला हेव्याबद्दल काय सांगते?
४ प्रीतीबद्दल सुरवातीला काही विवेचन मांडल्यावर, पौलाने करिंथकरांना लिहिले: “[प्रीती] हेवा करीत नाही.” (१ करिंथकर १३:४) तथापि, कोणाच्या प्रगतीचा किंवा यशप्राप्तीचा द्वेष करण्यातही हेवा प्रकट होऊ शकतो. अशाप्रकारचा हेवा शारीरिकरित्या, भावनिकरित्या आणि आध्यात्मिकरित्या नाशकारक असतो.—नीतिसूत्रे १४:३०; रोमकर १३:१३; याकोब ३:१४-१६.
५. आपल्याला एखादा ईश्वरशासित विशेष हक्क मिळत नसल्याचे भासते तेव्हा प्रीती हेव्यावर विजय मिळवण्यास मदत कशी करू शकते?
५ हे ध्यानात घेता, स्वतःला विचारा: ‘मला एखादा ईश्वरशासित विशेषाधिकार दिला जात नाही असे भासत असल्यास मला दुसऱ्यांचा हेवा वाटतो का?’ याला तुमचे उत्तर होय असल्यास निराश होऊ नका. बायबलचा लेखक याकोब आपल्याला आठवण करून देतो की, सर्व अपरिपूर्ण मानवांठायी ‘ईर्ष्यावान आत्मा वस्ती करतो.’ (याकोब ४:५) आपल्या भावाबद्दल प्रीती असल्यास तुम्हाला समतोल राखण्यास मदत मिळेल. आनंद करणाऱ्यांसोबत आनंद करायला आणि दुसऱ्या कोणा व्यक्तीला एखादा आशीर्वाद किंवा स्तुती प्राप्त होते तेव्हा तुमचा अपमान झाला असे समजून वाईट मानू नका.—पडताळा १ शमुवेल १८:७-९.
६. पहिल्या शतकातल्या करिंथ मंडळीत कोणती गंभीर स्थिती उद्भवली?
६ “प्रीती बढाई मारीत नाही, फुगत नाही,” असे पौल पुढे म्हणतो. (१ करिंथकर १३:४) आपल्याकडे एखादे कौशल्य किंवा कार्यक्षमता असली तर बढाई मारायची गरज नाही. पुराव्यानुसार असे दिसून येते की, प्राचीन करिंथ मंडळीत प्रवेश केलेल्या काही महत्त्वाकांक्षी पुरुषांची हीच समस्या होती. कदाचित स्पष्टीकरण करून देण्यामध्ये ते निपुण असले असतील किंवा इतर कोणत्या क्षेत्रात कार्यक्षम असले असतील. परंतु, त्यांनी स्वतःकडे लक्ष वेधून घेतल्यामुळे मंडळीमध्ये फूट पडायला कारण मिळाले असावे. (१ करिंथकर ३:३, ४; २ करिंथकर १२:२०) ही स्थिती इतक्या थराला पोचली की, करिंथकर ‘मूढांचे सहन करत होते’ म्हणून पौलाला त्यांना ताडना द्यावी लागली; या मूढांचे पौलाने टीकात्मकपणे ‘अतिश्रेष्ठ प्रेषित’ असे वर्णन केले.—२ करिंथकर ११:५, १९, २०.
७, ८. एकतेचा पुरस्कार करण्यासाठी आपल्याठायी स्वभावतः असलेल्या कौशल्यांचा उपयोग कसा करता येईल हे बायबलमधून दाखवा.
७ आजही अशीच स्थिती निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ, काहींना क्षेत्रातल्या त्यांच्या यशप्राप्तींबद्दल किंवा देवाच्या संघटनेमधील विशेष हक्कांची बढाई मारायची वृत्ती असेल. मंडळीतल्या इतरांकडे नसेल असे कौशल्य किंवा अशी क्षमता आपल्याजवळ असली तरीही आपण गर्व करायला ते कारण आहे का? आपल्याजवळ स्वभावतः असलेले कौशल्य, स्वतःला प्राधान्य देण्यासाठी नव्हे तर एकतेचा पुरस्कार करण्यासाठी उपयोगात आणले पाहिजे.—मत्तय २३:१२; १ पेत्र ५:६.
८ पौलाने असे लिहिले की, एका मंडळीत अनेक सदस्य असले, तरीही “देवाने शरीर जुळविले आहे.” (१ करिंथकर १२:१९-२६) “जुळविले” असे भाषांतर केलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ, रंग जसे एकमेकांत मिसळले जातात तसे मिसळून एकरूप होणे यास सूचित होते. म्हणून मंडळीतल्या कोणाही व्यक्तीला स्वतःच्या क्षमतांबद्दल गर्व वाटू नये आणि इतरांवर त्याने हुकूमशाही करण्याचा प्रयत्न करू नये. देवाच्या संघटनेत गर्व आणि महत्त्वाकांक्षा यांना थारा नाही.—नीतिसूत्रे १६:१९; १ करिंथकर १४:१२; १ पेत्र ५:२, ३.
९. स्वतःचा स्वार्थ पाहणाऱ्या व्यक्तींची कोणती ईशारेवजा उदाहरणे आपल्याला बायबलमध्ये सापडतात?
९ प्रीती “स्वार्थ पाहत नाही.” (१ करिंथकर १३:५) स्वतःच्या पद्धतीने काही घडवून आणण्यासाठी प्रेमळ व्यक्ती कधीच इतरांना काही करायला भाग पाडणार नाही. या बाबतीत बायबलमध्ये इशारेवजा उदाहरणे आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास: दलीला, ईजबेल आणि अथल्या या स्त्रियांविषयी आपल्याला वाचायला मिळते—यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांना आपल्या मर्जीनुसार काही करायला भाग पाडले होते. (शास्ते १६:१६; १ राजे २१:२५; २ इतिहास २२:१०-१२) दावीदाचा पुत्र अबशालोम याचेही उदाहरण आहे. जेरूसलेमला जे लोक न्याय मिळावा म्हणून यायचे त्यांचे तो कान भरत असे की राजाचे दरबार लोकांच्या समस्या सोडवण्यात खास आस्था घेत नाही. मग तो त्यांना स्पष्टपणे सांगे की त्या दरबारात त्याच्यासारख्या प्रेमळ अंतःकरणाच्या व्यक्तीची गरज होती! (२ शमुवेल १५:२-४) अबशालोमला खरे पाहता, दुःखित व्यक्तींबद्दल आस्था नव्हती तर तो स्वतःचा स्वार्थ पाहत होता. स्वतःला राजा नेमून त्याने अनेकांना फितवले. पण कालांतराने अबशालोमचा असा पराभव झाला की त्याचा अंतच झाला. मरण पावल्यावर त्याला धड नीट पुरण्यातही आले नाही.—२ शमुवेल १८:६-१७.
१०. आपण इतरांचेही हित पाहत आहोत हे कसे प्रदर्शित करू शकतो?
१० आज ख्रिश्चनांसाठी हा एक इशारा आहे. पुरुष असो किंवा स्त्री, कदाचित इतरांवर जोरजबरदस्ती करण्याचा आपला स्वभाव असेल. संभाषणाच्या वेळी इतरांवर जोर करून किंवा कोणी वेगळे मत व्यक्त केले की त्यांना खोचक बोलून आपल्या मनानुसार घडवून आणणे आपल्याला सोपे जात असेल. परंतु आपण खरोखर प्रेमळ असलो, तर आपण इतरांचेही हित पाहू. (फिलिप्पैकर २:२-४) आपण इतरांचा फायदा घेणार नाही किंवा इतरांपेक्षा आपले मत महत्त्वाचे असल्यागत देवाच्या संघटनेत आपल्याला जास्त अनुभव असल्यामुळे अथवा जबाबदार स्थान असल्यामुळे शंकास्पद कल्पनांचा पुरस्कार आपण करणार नाही. त्याउलट, बायबलमधील हे नीतिसूत्र आपण लक्षात ठेवू: “गर्व झाला की नाश ठेवलेला; मनाचा ताठा अधःपाताचे मूळ होय.”—नीतिसूत्रे १६:१८.
प्रीतीमुळे शांतीमय नातेसंबंध
११. (अ) परोपकारी आणि गैरशिस्तीने न वागणारी प्रीती आपण कशाप्रकारे प्रदर्शित करू शकतो? (ब) आपण अनीतीत आनंद मानत नाही हे कसे दाखवू शकतो?
११ पौलाने असेही लिहिले की प्रीती “परोपकारी आहे” आणि ती “गैरशिस्त वागत नाही.” (१ करिंथकर १३:४, ५) होय, प्रीती आपल्याला अश्लील भाषा वापरू देणार नाही, कठोरपणे किंवा अनादराने वागू देणार नाही. त्याउलट, आपण इतरांच्या भावनांचा विचार करू. उदाहरणार्थ, एखादी प्रेमळ व्यक्ती इतरजण अडखळतील असे काहीही करण्याचे टाळेल. (पडताळा १ करिंथकर ८:१३.) प्रीती “अनीतीत आनंद मानीत नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते.” (१ करिंथकर १३:६) देवाचा नियम आपल्याला प्रिय असला, तर अनैतिकतेला आपण क्षुल्लक समजणार नाही किंवा देवाला ज्यांचा वीट आहे त्या गोष्टींमध्ये आनंद मानणार नाही. (स्तोत्र ११९:९७) नाशकारक नव्हे तर उभारणीकारक गोष्टींमध्ये आनंद घेण्यास प्रीती आपली मदत करील.—रोमकर १५:२; १ करिंथकर १०:२३, २४; १४:२६.
१२, १३. (अ) कोणी आपले मन दुखावते तेव्हा आपण कशी प्रतिक्रिया दर्शवावी? (ब) योग्य कारणांसाठी बाळगलेल्या रागामुळे देखील आपण मूर्खपणे वागू शकतो हे दाखवण्यासाठी बायबलमधील उदाहरणे द्या.
१२ पौल लिहितो की प्रीती “चिडत नाही” (“सहज चिडत नाही,” सुबोध भाषांतर). (१ करिंथकर १३:५) कोणी आपले मन दुखावले तर राग येणे किंवा चिडणे हे आपल्यासारख्या अपरिपूर्ण मानवांकरता स्वाभाविक आहे. परंतु, दीर्घकाळापर्यंत चिडून राहणे किंवा राग मनात बाळगणे हे चुकीचे ठरेल. (स्तोत्र ४:४; इफिसकर ४:२६) आपण त्यावर नियंत्रण केले नाही तर, योग्य कारणासाठी बाळगलेला रागही मूर्खतेने वागण्यास कारणीभूत ठरेल आणि मग यहोवा आपल्याकडून त्याचा जाब विचारेल.—उत्पत्ति ३४:१-३१; ४९:५-७; गणना १२:३; २०:१०-१२; स्तोत्र १०६:३२, ३३.
१३ काहीजणांनी, इतरांच्या अपरिपूर्णतांचा परिणाम, ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्याच्या निर्णयांवर किंवा क्षेत्र सेवेत भाग घेण्यावर होऊ दिला आहे. आधी, याच लोकांनी विश्वासासाठी उत्तम लढा दिला असेल, कदाचित कुटुंबाकडून विरोध सहन केला असेल, सहकामगारांकडून टीका ऐकून घेतली असेल वगैरे. या समस्यांवर ते मात करू शकले कारण या समस्या विश्वासाच्या परीक्षा आहेत असे त्यांनी समजले आणि ते उचित होते. पण कोणी ख्रिस्ती व्यक्ती काहीतरी अनुचित बोलते किंवा अनुचितपणे वागते तेव्हा काय होते? हीसुद्धा विश्वासाची एक परीक्षा नव्हे का? निश्चितच आहे, कारण आपण असाच मनात राग बाळगला तर “सैतानाला वाव देऊ” शकतो.—इफिसकर ४:२७.
१४, १५. (अ) “नोंद ठेवत नाही” याचा काय अर्थ होतो? (ब) क्षमाशील असण्यामध्ये आपण यहोवाचे अनुकरण कसे करू शकतो?
१४ उचितपणे, पौल पुढे म्हणतो की प्रीती “तिच्याविरुद्ध केलेल्याची नोंद ठेवत नाही.” (१ करिंथकर १३:५, ईजी-टू-रीड व्हर्शन) येथे तो जमाखर्चासंबंधीचा शब्द वापरतो, कदाचित त्यावरून, कोणाची चूक विसरता कामा नये म्हणून खातेवहीत ती लिहून ठेवण्याची क्रिया तो सुचवू पाहत होता. भविष्यात संदर्भ घ्यावा लागणार असल्यागत कोणाच्या मन दुखावणाऱ्या शब्दांची किंवा कृतींची मनात नोंद करून ठेवणे प्रेमळपणाचे आहे का? अशा निर्दयीपणाने यहोवा आपल्यावर बारीक लक्ष ठेवत नाही हे जाणून आपल्याला केवढा आनंद होऊ शकतो! (स्तोत्र १३०:३) होय, आपण पश्चात्ताप केल्यावर तो आपल्या चुका पुसून टाकतो.—प्रेषितांची कृत्ये ३:१९.
१५ या बाबतीत आपण यहोवाचे अनुकरण करू शकतो. आपले मन कोणी दुखावल्यास आपण अति संवेदनशील बनू नये. आपण बारीकसारीक गोष्टी मनाला लावून घेतल्या तर ज्या व्यक्तीने आपले मन दुखावले तिच्यापेक्षा जास्त आपण स्वतःच आपले मन दुखावू. (उपदेशक ७:९, २२) उलट, आपण लक्षात ठेवले पाहिजे की, प्रीती “सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते.” (१ करिंथकर १३:७) अर्थात, कोणाकडूनही सहज फसवले जाण्याइतके भोळे होणे कोणालाही आवडणार नाही पण विनाकारण आपल्या बांधवांच्या हेतूंचा आपण संशय करू नये. शक्य असेल तेव्हा, समोरच्या व्यक्तीचा वाईट हेतू नव्हता असेच आपण समजू या.—कलस्सैकर ३:१३.
प्रीती आपल्याला सहन करण्यास मदत करते
१६. कोणत्या परिस्थितींमध्ये प्रीती आपल्याला सहनशील असण्यास मदत करील?
१६ पौल मग आपल्याला असे सांगतो की, “प्रीती सहनशील आहे.” (१ करिंथकर १३:४) प्रीती आपल्याला कदाचित दीर्घकाळापर्यंत परीक्षासमान परिस्थिती सहन करण्यास मदत करते. उदाहरणार्थ, अनेक ख्रिश्चन कित्येक वर्षांपासून धार्मिक कारणांवरून विभाजित असलेल्या घरांमध्ये राहिले आहेत. इतरजण अविवाहित राहिले आहेत. त्यांना तसे राहायचे होते म्हणून नव्हे तर “प्रभूमध्ये” त्यांना कोणी उचित साथीदार मिळाला नाही म्हणून. (१ करिंथकर ७:३९; २ करिंथकर ६:१४) त्यानंतर, खालावणाऱ्या स्वास्थ्य समस्यांशी झुंज देत असलेले लोकही आहेत. (गलतीकर ४:१३, १४; फिलिप्पैकर २:२५-३०) खरेच या अपरिपूर्ण व्यवस्थीकरणात, कोणाचीच परिस्थिती अशी नाही की त्यांना थोडेही सहन करावे लागत नाही.—मत्तय १०:२२; याकोब १:१२.
१७. सर्वकाही सहन करण्यास आपल्याला कशी मदत मिळेल?
१७ पौल आपल्याला खात्री देतो की, प्रीती “सर्व काही सहन करिते, . . . सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते.” (१ करिंथकर १३:७) यहोवाबद्दल प्रीती असली, तर नीतिमत्त्वासाठी कोणतीही परिस्थिती आपण सहन करू शकतो. (मत्तय १६:२४; १ करिंथकर १०:१३) आपणहून हुतात्म्य ओढवून घेण्याचा आपण प्रयत्न करत नाही. उलट, शांतीमय, सुरळीत जीवन आपल्याला जगायला मिळावे हाच आपला हेतू आहे. (रोमकर १२:१८; १ थेस्सलनीकाकर ४:११, १२) तथापि, विश्वासाच्या परीक्षा सामोऱ्या येतात तेव्हा ख्रिस्ती शिष्यत्व स्वीकारल्याची ही किंमत आहे असे समजून आपण आनंदाने त्या सहन करतो. (लूक १४:२८-३३) सगळे काही सहन करत असता, आपण सकारात्मक मनोवृत्ती बाळगण्याचा प्रयत्न करतो आणि सर्वात कठीण परिस्थितींमध्येही चांगल्याची आशा करतो.
१८. अनुकूल परिस्थितीतही सहनशीलतेची गरज कशी आहे?
१८ केवळ संकटाच्या वेळीच सहनशीलतेची गरज पडते असे नाही. काहीवेळा सहनशील असणे म्हणजे नुसते टिकून राहणे, कठीण परिस्थिती असोत अगर नसोत आपल्या मार्गावर चालत राहणे. सहनशीलतेत उत्तम आध्यात्मिक नित्यक्रम टिकवून ठेवण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, तुमच्या परिस्थितींनुसार तुम्ही क्षेत्रात अर्थपूर्ण सहभाग घेत आहात का? तुम्ही देवाचे वचन वाचून त्यावर मनन करत आहात का आणि प्रार्थनेकरवी तुमच्या स्वर्गीय पित्यासोबत बोलत आहात का? तुम्ही नियमितपणे मंडळीच्या सभांना जाता का आणि सहविश्वासूंसोबत प्रोत्साहनाची देवाणघेवाण होते त्यातून लाभ मिळवत आहात का? असे असल्यास, सध्याची तुमची स्थिती अनुकूल असली किंवा प्रतिकूल असली, तरी तुम्ही मात्र तग धरून आहात. हे करत राहा कारण “आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल.”—गलतीकर ६:९.
प्रीती—“सर्वोत्कृष्ट मार्ग”
१९. प्रीती “सर्वोत्कृष्ट मार्ग” कशी आहे?
१९ या ईश्वरी गुणाला “सर्वोत्कृष्ट मार्ग” असे म्हणून पौलाने प्रीती व्यक्त करण्याच्या महत्त्वावर जोर दिला. (१ करिंथकर १२:३१) कोणत्या अर्थाने “सर्वोत्कृष्ट”? याआधी, पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांमध्ये सर्रासपणे दिसून येणाऱ्या आत्म्याच्या या देणग्यांची पौलाने यादी दिली होती. काहीजणांना भविष्यवाणी करण्याची क्षमता, इतरांना रोग बरे करण्याची शक्ती, तर पुष्कळांना भिन्नभिन्न भाषांमध्ये बोलण्याची क्षमता मिळाली होती. त्या निश्चितच अद्भुत देणग्या होत्या! तरीही पौलाने करिंथकरांना असे म्हटले: “मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या, आणि डोंगर ढळविता येतील इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी काहीच नाही.” (१ करिंथकर १३:१, २) देवाप्रती आणि शेजाऱ्याप्रती प्रीती हा हेतू नसला तर एरवी महत्त्वाची असलेली कृत्येही ‘निर्जीव कृत्ये’ होऊ शकतात.—इब्री लोकांस ६:१.
२०. आपल्याला प्रीती विकसित करायची असल्यास सातत्याने प्रयत्न करणे अगत्याचे का आहे?
२० आपण प्रीतीचा ईश्वरी गुण का विकसित करावा यासाठी येशू आपल्याला आणखी एक कारण देतो. “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा,” असे तो म्हणाला. (योहान १३:३५) “म्हणजे” या शब्दामुळे, प्रीती व्यक्त करायला शिकणे किंवा न शिकणे हे प्रत्येक ख्रिश्चनावर निर्भर करते. सरतेशेवटी, फक्त परदेशात राहिल्यामुळे तेथील भाषा शिकण्यास आपल्याला भाग पाडले जाईल असे नाही. त्याचप्रमाणे, फक्त राज्य सभागृहात सभांना उपस्थित राहिल्यामुळे किंवा सह-ख्रिश्चनांसोबत सहवास राखल्यामुळे आपोआप प्रीती व्यक्त करायला आपण शिकणार नाही. ही “भाषा” शिकून घ्यायला सातत्याने प्रयास करण्याची गरज आहे.
२१, २२. (अ) पौलाने चर्चा केलेल्या प्रीतीच्या एखाद्या पैलूप्रमाणे आपण वागत नसलो तर आपली प्रतिक्रिया कशी असली पाहिजे? (ब) “प्रीती कधी अंतर देत नाही” हे कोणत्या अर्थाने म्हणता येऊ शकते?
२१ काहीवेळा, पौलाने ज्यांची चर्चा केली त्यापैकी प्रीतीच्या एखाद्या पैलूप्रमाणे तुम्ही वागत नसाल. अशावेळा उत्साह गमावून बसू नका. धीराने प्रयास जारी ठेवा. बायबलमधून सल्ला घेत राहा आणि इतरांसोबत व्यवहार करताना बायबलमधील तत्त्वे लागू करत राहा. यहोवाने स्वतः आपल्यासमोर मांडलेल्या उदाहरणाचा विसर पडू देऊ नका. पौलाने इफिसकरांना आर्जवले: “तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीहि एकमेकांना क्षमा करा.”—इफिसकर ४:३२.
२२ कालांतराने नवीन भाषेत स्वतःला व्यक्त करणे सोपे जाते त्याचप्रमाणे प्रीती व्यक्त करणेही सोपे जाईल हे तुमच्या लक्षात येईल. पौल अशी हमी देतो की “प्रीती कधी अंतर देत नाही.” (१ करिंथकर १३:८) आत्म्याच्या चमत्कारिक देणग्यांप्रमाणे प्रीती कधीही नाहीशी होणार नाही. म्हणून हा ईश्वरी गुण सातत्याने व्यक्त करत राहा. पौल म्हणतो त्याप्रमाणे तो “सर्वोत्कृष्ट मार्ग” आहे.
तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकता का?
◻ प्रीती गर्वावर मात करण्यास कशी मदत करू शकते?
◻ मंडळीत शांती वाढवण्यासाठी प्रीती आपली कशा तऱ्हेने मदत करू शकते?
◻ प्रीती आपल्याला सहन करण्यास मदत कशी देऊ शकते?
◻ प्रीती “सर्वोत्कृष्ट मार्ग” कसा आहे?
[१९ पानांवरील चित्र]
प्रीती आपल्याला सहविश्वासूंच्या चुकांकडे दुर्लक्ष करायला मदत करील
[२३ पानांवरील चित्रं]
सहनशीलतेचा अर्थ आपला ईश्वरशासित नित्यक्रम टिकवून ठेवणे