“संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो”
यहोवा म्हणजे उदारतेचे मूर्तिमंत उदाहरण. म्हणूनच “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान” त्याच्याकडून येते असे बायबल म्हणते. (याकोब १:१७) उदाहरणार्थ, त्याने निर्माण केलेल्या गोष्टींचाच विचार करा. त्याने रूचकर अन्न बनवले, बेचव नव्हे; रंगीबेरंगी फुले बनवली, बेरंगी नव्हे; रमणीय सूर्यास्त बनवला, निरस नव्हे. होय, यहोवाने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीतून त्याचे प्रेम आणि त्याची उदारता झळकते. (स्तोत्र १९:१, २; १३९:१४) याशिवाय, यहोवा ज्या सर्व गोष्टी देतो त्याही मोठ्या संतोषाने. यहोवाला त्याच्या सेवकांकरता चांगल्या गोष्टी करण्यात आनंद मिळतो.—स्तोत्र ८४:११; १४९:४.
इस्राएली लोकांना अशी आज्ञा देण्यात आली होती, की त्यांनी देवाप्रमाणे उदार असावे. मोशेने त्यांना सांगितले: “दरिद्री बांधवाबाबत आपले हृदय कठोर करू नको; किंवा आपला हात आखडू नको.” “तू त्याला अवश्य दे, व त्याला देताना तुझ्या मनाला वाईट वाटू देऊ नको.” (अनुवाद १५:७, १०) इतरांना मदत करण्याची इच्छा अंतःकरणातून निर्माण होण्यास हवी होती म्हणून इस्राएली लोकांना उदारतेने वागण्यात आनंद मानायचा होता.
ख्रिश्चनांनाही असाच सल्ला देण्यात आला होता. “देण्यात अधिक आनंद आहे,” असे येशूने म्हटले ते अगदी खरे होते. (प्रेषितांची कृत्ये २०:३५, कॉमन लँग्वेज भाषांतर.) येशूचे शिष्य संतोषाने देण्यात उदाहरणीय होते. उदाहरणार्थ, बायबल असे म्हणते, की सत्य स्वीकारलेल्या जेरुसलेममधील लोकांनी “आपआपली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वाटून” दिले.—प्रेषितांची कृत्ये २:४४, ४५.
पण या मोठ्या मनाच्या यहुदी लोकांना पुढे गरिबीला तोंड द्यावे लागले. अशी ही त्यांची अवस्था कशामुळे झाली होती याविषयी बायबलमध्ये काही सांगण्यात आलेले नाही. प्रेषितांची कृत्ये ११:२८, २९ येथे वर्णन करण्यात आलेल्या दुष्काळामुळे कदाचित त्यांच्यावर ही परिस्थिती आली असावी, असे काही अभ्यासकांना वाटते. पण यहुदी लोकांची हलाकीची परिस्थिती होती हे मात्र नक्की आणि त्यामुळे त्यांच्या आवश्यक गरजा भागवल्या जातील याची पौलाला खात्री करून घ्यायची होती. हे तो कसे करणार होता?
गरजू लोकांसाठी वर्गणी
मासेदोनियापर्यंतच्या मंडळ्यांची पौलाने मदत घेतली आणि यहुदीयामधील गरीब ख्रिश्चनांची गरज भागवली जावी म्हणून त्याने तशी व्यवस्थाही केली. पौलाने करिंथकरांना असे लिहिले: “जी वर्गणी गोळा करावयाची तिच्याविषयी मी गलतीयातील मंडळ्यांना आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्हीहि करा. आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने जसे आपणाला यश मिळाले असेल त्या मानाने आपणाजवळ द्रव्य जमा करून ठेवावे.”a—१ करिंथकर १६:१, २.
रक्कम जमा करून ती लवकरात लवकर जेरुसलेमच्या बांधवांना द्यावी असा पौलाचा उद्देश होता, पण करिंथमधील लोकांचा प्रतिसाद थंड होता. का? यहुदीयामधील बांधवांवर कोसळलेल्या संकटाचे त्यांना काही वाटत नव्हते का? निश्चितच वाटत होते, कारण पौलाला हे माहीत होते, की करिंथकर “विश्वास, भाषण, ज्ञान, प्रत्येक गोष्टीची आस्था” यांत समृद्ध होते. (२ करिंथकर ८:७) पौलाने पहिल्या पत्रात सांगितलेल्या बाकीच्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये कदाचित हे करिंथकर व्यस्त असावेत. पण आता जेरुसलेमची परिस्थिती आणीबाणीची होती. म्हणून पौल या गोष्टीचा उल्लेख करिंथकरांच्या दुसऱ्या पत्रात करतो.
उदारतेचे अपील
मासेदोनियातील लोकांनी मदत कार्याला दिलेल्या उल्लेखनीय प्रतिसादाविषयी पौल पहिल्यांदा करिंथकरांना सांगतो. पौलाने लिहिले: “संकटाच्या बिकट परीक्षेत त्यांचा आत्यंतिक आनंद व त्यांचे कमालीचे दारिद्र्य, ह्यांमध्ये त्यांची औदार्यसंपदा विपुल झाली.” मासेदोनियातील लोकांना वारंवार सांगण्याची गरज पडली नाही. त्याउलट पौल त्यांच्याविषयी म्हणतो, “त्यांनी आम्हाजवळ आग्रहपूर्वक मागितले की, पवित्र जनांची सेवा करण्यात आम्हाला सहकार्य करू देण्याची कृपा व्हावी.” मासेदोनियातील लोकांनी मोठ्या आनंदाने दाखवलेली उदारता खरोखरच उल्लेखनीय होती कारण ते स्वतः त्यावेळी ‘कमालीच्या दारिद्र्यात’ होते.—२ करिंथकर ८:२-४.
मासेदोनियातील लोकांची वाहवा करून पौल करिंथकरांमध्ये चढाओढ लावत होता का? मुळीच नाही, कारण अशाप्रकारचे उत्तेजन योग्य नाही याची त्याला पूर्ण जाणीव होती. (गलतीकर ६:४) याशिवाय, त्याला हेसुद्धा माहीत होते, की करिंथकरांना हिणवून योग्य ते करवून घेण्याची काही गरज नाही. तर, करिंथकरांचे यहुदीयामधील त्यांच्या बांधवांवर प्रेम आहे आणि त्यांना मदत करण्याची त्यांची इच्छा आहे, याची त्याला पूर्ण खात्री होती. कारण “एक वर्षापूर्वी” त्याने त्यांना म्हटले, त्यांनी “प्रथमतः असे करण्यास आरंभ केला, इतकेच नव्हे, तर अशी इच्छा करण्यासहि केला.” (२ करिंथकर ८:१०) मदतकार्याच्या काही बाबीमध्ये करिंथकरांनी स्वतःचे उदाहरण मांडले होते. पौलाने त्यांना असे म्हटले: “मला तुमची उत्सुकता ठाऊक आहे; तिच्यावरून मासेदोनियातील लोकांजवळ मी तुम्हाविषयी अभिमानाने म्हणत आहे. तुमच्या आस्थेने त्यांतील बहुतेकांना उत्तेजन मिळाले आहे.” (तिरपे वळण आमचे.) (२ करिंथकर ९:२) पण आता करिंथकरांना त्यांचा आवेश आणि उत्सुकता दाखवण्याकरता पावले उचलण्याची गरज होती.
म्हणून पौलाने त्यांना असे म्हटले: “प्रत्येकाने आपआपल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे; दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो.” (२ करिंथकर ९:७) करिंथकरांवर दबाव टाकावा, असा पौलाचा उद्देश नव्हता कारण सक्ती केल्याने कोणत्याच व्यक्तीला देण्यात आनंद वाटणार नाही. पौलाने हे गृहीत धरले होते, की त्यांच्याजवळ योग्य हेतू होताच, प्रत्येक व्यक्तीने देण्याचे आधीच ठरविले होते. याशिवाय पौलाने त्यांना म्हटले: “कारण उत्सुकता असली म्हणजे ज्याच्या त्याच्याजवळ असेल तसे ते मान्य होते; नसेल तसे नाही.” (२ करिंथकर ८:१२) होय, उत्सुकता असते तेव्हा—जेव्हा एखादी व्यक्ती प्रेमाने प्रेरित होते तेव्हा—ती जे काही देते ते देवाला मान्य असते, मग ती गोष्ट कितीही छोटी असली तरीही.—पडताळा लूक २१:१-४.
आज संतोषाने देणारे
यहुदीयामधील ख्रिश्चनांकरता करण्यात आलेले मदतकार्य आपल्या काळाकरता एक उत्तम उदाहरण आहे. यहोवाच्या साक्षीदारांनी जगव्याप्त प्रचारकार्याची मोहीम हाती घेतली आहे. या कार्याद्वारे ते आध्यात्मिकरीत्या उपाशी असलेल्या कोट्यवधी लोकांना सकस आहार पुरवतात. (यशया ६५:१३, १४) येशूने दिलेल्या आज्ञेचे पालन करण्याद्वारे ते असे करतात: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.”—मत्तय २८:१९, २०.
हे काम पूर्ण करणे इतके सोपे नाही. मिशनरी गृहांची आणि शंभरापेक्षा अधिक शाखा दफ्तरांची काळजी घेणे याचा यात समावेश आहे. यहोवाच्या उपासकांना एकमेकांना उत्तेजन देण्याकरता एकत्र येता यावे म्हणून त्यांच्याकरता राज्य सभागृह आणि संमेलन गृह बांधण्याचाही या कार्यात समावेश होतो. (इब्री लोकांस १०:२४, २५) काहीवेळा यहोवाचे साक्षीदार, नैसर्गिक आपत्ती कोसळलेल्या ठिकाणीही मदतकार्य पुरवतात.
छपाईच्या कामावर होणाऱ्या अवाढव्य खर्चाचासुद्धा विचार करा. दर आठवड्याला, टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या २,२०,००,००० पेक्षा अधिक प्रती किंवा सावध राहा! मासिकाच्या सुमारे २,००,००,००० प्रती छापल्या जातात. याशिवाय, आध्यात्मिक अन्नाच्या नियमित पुरवठ्यात दर वर्षी कोट्यवधी पुस्तके, ब्रोशर्स, ऑडिओकॅसेट्स आणि व्हिडिओकॅसेट्स तयार केल्या जातात.
हे काम कसे केले जाते? स्वेच्छिक देणग्यांद्वारे. प्रसिद्धी किंवा स्वार्थापोटी नव्हे, तर खऱ्या उपासनेच्या वाढीकरता हे काम केले जाते. अशाप्रकारे देणाऱ्याला आनंद मिळतोच शिवाय देवाचा आशीर्वादही. (मलाखी ३:१०; मत्तय ६:१-४) यहोवाच्या साक्षीदारांची मुलेही मोठ्या उदारतेने आणि आनंदाने देणग्या देतात. उदाहरणार्थ, संयुक्त संस्थांनात तुफानाचा तडाखा बसल्याचे कळल्यानंतर चार वर्षांच्या ॲलीसनने २ डॉलर दान दिले. तिने म्हटले: “माझ्या बँकेत इतकेच पैसे आहेत. मुलांची खेळणी, पुस्तकं आणि बाहुल्या हरवल्या असतील. माझ्या वयाच्या मुलीला पुस्तक घ्यायला तुम्ही हे पैसे वापरा.” मॅकलिन या आठ वर्षांच्या मुलाने, या वादळामध्ये कोणी भाऊबहीण दगावलं नाही, हे कळल्यावर त्याला फार हायसं वाटलं असं लिहिलं. त्याने पुढे म्हटले: “माझ्या पप्पांसोबत हबकॅप्स विकून मी १७ डॉलर कमावले होते. त्या पैशांचं मी काहीतरी घेणार होतो, पण मला वादळात सापडलेल्या भाऊबहिणींची आठवण आली.”—वरील पेटीही पाहा.
‘आपले द्रव्य’ देण्याद्वारे लहानथोर देवाच्या राज्याला प्रथम स्थान देतात तेव्हा यहोवाचे मन खरोखरच आनंदी होते. (नीतिसूत्रे ३:९, १०) अर्थात हे खरे आहे, की सर्व गोष्टी यहोवाच्या मालकीच्या असल्यामुळे कोणी त्याच्या श्रीमंतीत आणखी भर घालू शकत नाही. (१ इतिहास २९:१४-१७) असे असले तरी देवाच्या कार्याला हातभार लावणे हा खरोखरच मोठा सन्मान आहे कारण यहोवावरचे प्रेम व्यक्त करण्याची संधी यामुळे मिळते. अशाप्रकारे कार्य करण्यास ज्या व्यक्तीचे मन प्रेरित झाले आहे त्या प्रत्येक व्यक्तीचे आम्ही फार कृतज्ञ आहोत.
[तळटीपा]
a पौलाने ‘आज्ञा दिली’ म्हणजे त्याने जबरदस्ती किंवा सक्ती केली असे नाही. तर अनेक मंडळ्यांकडून आलेल्या वर्गण्यांची त्याने केवळ पाहणी केली. याशिवाय, पौलाने म्हटले की प्रत्येकाला “आपणाला यश मिळाले असेल त्या मानाने” वर्गणी गोळा करायची होती. दुसऱ्या शब्दांत, देण्यात येणारी वर्गणी खाजगी आणि स्वेच्छिक बाब होती. कोणावर सक्ती करण्यात आली नव्हती.
[२६, २७ पानांवरील चौकट]
काहीजण निवडतात असे
जगव्याप्त कार्यासाठी वर्गण्या देण्याचे विविध मार्ग अनेक जण, “संस्थेच्या जगव्याप्त कार्यासाठी वर्गण्या—मत्तय २४:१४” हे लेबल असलेल्या दान पेटीत पैसे टाकण्यासाठी आधीच काही रक्कम जमा करतात किंवा किती टाकणार याचा अंदाज लावतात. मंडळ्या प्रत्येक महिन्याला ही रक्कम स्थानिक शाखेकडे पाठवतात.
स्वेच्छेने दिलेल्या पैशाच्या देणग्या, थेटपणे Praharidurg Prakashan Society, Plot A/35, Near Industrial Estate, Nangargaon, Lonavla, 410 401 येथील ट्रेजरी ऑफिसमध्ये पाठवल्या जाऊ शकतात. दागिने किंवा इतर मौल्यवान वस्तूंची देखील देणगी दिली जाऊ शकते. या वर्गण्या थेट दान आहेत असा उल्लेख केलेले एक संक्षिप्त पत्र देखील यासोबत पाठवावे.
योजनापूर्वक देणे
थेट पैशाचे दान व पैशाच्या सशर्त देणग्या यांसोबत जगव्याप्त राज्य सेवेच्या लाभासाठी दान करण्याचे इतर आणखी मार्ग आहेत. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो:
विमा:
प्रहरीदुर्ग प्रकाशन सोसायटीला, आयुर्विमा पत्राचा उपभोग घेणारी किंवा सेवानिवृत्ती/निवृत्तीवेतन योजना असे नाव दिले जाऊ शकते.
बँक खाते:
बँक खाते, जमा प्रमाणपत्र किंवा वैयक्तिकाचे सेवा निवृत्ती खाते, स्थानिक बँकेच्या अपेक्षांनुसार, प्रहरीदुर्ग प्रकाशन सोसायटीच्या विश्वस्तासाठी किंवा संस्थेला मृत्यूनंतरचे देय म्हणून दिले जाऊ शकते.
शेअर भाग आणि बंधपत्रे:
प्रहरीदुर्ग प्रकाशन सोसायटीला शेअर भाग आणि बंधपत्रे, थेट दानाकरवी किंवा दात्याला त्याची प्राप्ती सतत मिळेल अशा योजनेकरवी दिली जाऊ शकतात.
स्थावर संपत्ती:
प्रहरीदुर्ग प्रकाशन सोसायटीला विक्रीयोग्य स्थावर संपत्ती, थेट दानाकरवी किंवा दाता त्याच्या किंवा तिच्या जीवनभर त्यावर जगू शकतो, अशी जीवन संपत्ती राखून ठेवण्याद्वारे दिली जाऊ शकते. स्थावर संपत्तीचा लेखी करार करण्याआधी, त्या व्यक्तीने संस्थेशी संपर्क साधला पाहिजे.
मृत्युपत्रे आणि ठेवी:
कायद्याने निष्पादन केलेल्या मृत्युपत्राद्वारे प्रहरीदुर्ग प्रकाशन सोसायटीला मालमत्ता आणि पैसा दिला जाऊ शकतो, किंवा संस्थेला उपभोग घेणारी ठेव करार हे नाव देण्याद्वारे दिला जाऊ शकतो.
“योजनापूर्वक देणे” ही संज्ञा अशा देणग्यांना सूचित करते ज्याकरता दात्याला विशेष अशा काही योजना कराव्या लागतील.
[२८ पानांवरील चौकट]
मुलेही आनंदाने देतात!
मला हे पैसे तुम्हाला द्यायचेत. तुम्ही या पैशांतून आणखी पुस्तकं बनवा. पप्पांना कामात मदत करून मी हे पैसे जमा केलेत. तुम्ही आमच्यासाठी किती किती काम करता.—पामला, वय सात.
आणखी किंग्डम हॉल बांधता यावेत म्हणून मी हे ६.८५ डॉलर पाठवतेय. या उन्हाळ्यात मी लिंबू सरबताची हातगाडी लावली होती. त्यातून मला हे पैसे मिळाले.—सेलेना, वय सहा.
मी एक कोंबडी पाळली. तिनं पिल्लं काढली त्यांत एक कोंबडा होता नि एक कोंबडी. त्यांतली एक कोंबडी मी यहोवाला दिली. तिनं आणखी तीन पिल्लं काढली. ही पिल्लं मी विकली आणि त्यातून मिळालेले पैसे मी यहोवाच्या कामासाठी पाठवत आहे.—ट्येरी, वय आठ.
माझ्याकडे इतकेच पैसे आहेत! याचा चांगल्याप्रकारे उपयोग करा. मी हे पैसे मोठ्या कष्टाने जमा केलेत. हे २१ डॉलर मी पाठवतेय.—सारा, वय दहा.
शाळेच्या कार्यक्रमात मला एकदा पहिलं पारितोषिक मिळालं. त्यामुळे पुढील स्पर्धेसाठी शहरात जावं लागलं. मला तिथंही पहिलं पारितोषिक मिळालं आणि त्यानंतर जिल्हा पातळीवर दुसरं पारितोषिक मिळालं. ही सर्व पारितोषिकं मला रोख रक्कमेच्या स्वरूपात मिळाली. यातील काही पैसे सोसायटीला देण्याची माझी इच्छा आहे. ईश्वरशासित सेवा प्रशालेमध्ये शिकलेल्या गोष्टींमुळेच ही पारितोषिकं मिळवता आली असं मला वाटतं. समीक्षकांसमोर मला मुळीच भीती वाटली नाही.—ॲम्बर, इयत्ता सहावी.
मला हे पैसे यहोवाला द्यायचेत. या पैशांचं काय करायचं ते यहोवालाच विचारा. त्याला सर्व माहीत आहे.—कारेन, वय सहा.
[२५ पानांवरील चित्रं]
यहोवाच्या साक्षीदारांचे काम स्वेच्छिक देणग्यांद्वारे चालवले जाते