अध्याय १४
तुम्ही कोणाच्या अधिकाराला ओळखले पाहिजे?
१, २. अधिकाराचे सर्व प्रकार घातक आहेत का? विवेचित करा.
“अधिकार” हा शब्द पुष्कळ लोकांना अप्रिय वाटतो. हे समजण्याजोगे आहे, कारण नोकरीवर, कुटुंबामध्ये आणि सरकारमार्फत अधिकाराचा बहुधा दुरुपयोग केला जातो. बायबल अगदी खरेपणाने म्हणते: “एक मनुष्य दुसऱ्यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करितो.” (उपदेशक ८:९) होय, पुष्कळांनी दुसऱ्यांवर जुलमीपणे व आपमतलबीने वर्चस्व केले आहे.
२ तथापि, सर्वच अधिकार घातक नसतात. उदाहरणार्थ, आपले स्वतःचे शरीर आपल्यावर वर्चस्व गाजवते असे म्हटले जाऊ शकते. ते आपल्याला श्वासोच्छ्वास करण्याची, खाण्याची, पिण्याची व झोप घेण्याची “आज्ञा” देते. हे जाचक आहे का? नाही. ह्या गरजांची पूर्ती करणे हे आपल्या लाभाचे आहे. आमच्या शारीरिक गरजांच्या अधीन होणे हे आपखुषीचे असले तरी, अधिकाराचे असेही काही प्रकार आहेत, ज्यामध्ये स्वेच्छेने अधीन होण्याची गरज असते. अशा काही उदाहरणांचा विचार करा.
सर्वोच्च अधिकार
३. यहोवाला “सेनाधीश प्रभु” असे योग्यपणे का म्हणण्यात आले आहे?
३ बायबलमध्ये यहोवाला ३०० पेक्षा अधिक वेळा “सेनाधीश प्रभु” असे म्हटले आहे. सेनाधीश हा असा असतो ज्याला सर्वोच्च अधिकार असतो. हा दर्जा यहोवाला कशामुळे मिळतो? प्रकटीकरण ४:११ उत्तर देते: “हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस; कारण तू सर्वकाही निर्माण केले, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.”
४. यहोवा स्वतःच्या अधिकाराची अंमलबजावणी कोणत्या मार्गाने करण्याचे पसंद करतो?
४ आपला निर्माणकर्ता असल्यामुळे यहोवाला स्वतःच्या इच्छेनुसार त्याच्या अधिकाराची अंमलबजावणी करण्याचा हक्क आहे. देव “महासमर्थ” आहे याचा विचार करता आम्हाला भयकंपित झाल्यासारखे वाटते. त्याला “सर्वसमर्थ देव” असेही म्हणण्यात आले आहे; ही इब्री भाषेत अशी संज्ञा आहे जी बलिष्ठ असण्याची कल्पना देते. (यशया ४०:२६; उत्पत्ति १७:१) तरीदेखील, यहोवा स्वतःचे सामर्थ्य परोपकारी मार्गाने उपयोगात आणतो; कारण प्रीती हा त्याचा सर्वश्रेष्ठ गुण आहे.—१ योहान ४:१६.
५. यहोवाच्या अधिकाराला अधीन राहणे हे तितके कठीण का नाही?
५ पश्चात्ताप न दाखवणाऱ्यांना तो शिक्षा करील असे यहोवाने बजावून सांगितले असले तरी, तो “खरा देव, विश्वसनीय देव जे त्याच्यावर प्रेम करतात व त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्यासोबत तो आपला करार पाळून त्यांच्यावर दया करतो,” अशा प्रकारची ओळख मोशेला प्रामुख्याने घडली होती. (अनुवाद ७:९, NW) जरा विचार करा! विश्वातील सर्वोच्च अधिकारावर असणारी व्यक्ती आपल्याला त्याची सेवा करण्यासाठी दबाव आणत नाही. उलटपक्षी, त्याच्या प्रेमामुळेच आपण त्याच्याजवळ ओढले जातो. (रोमकर २:४; ५:८) यहोवाच्या अधिकाराला अधीन होणे ही खरी सुखावह गोष्ट आहे, कारण त्याचे नियम नेहमी आमच्या अंतिम लाभाकरता कार्यरत होत असतात.—स्तोत्र १९:७, ८.
६. एदेन बागेत अधिकाराचा वादविषय कसा उद्भवला व त्याचा काय परिणाम झाला?
६ आपल्या पहिल्या पालकांनी देवाच्या सार्वभौमत्वाला धिक्कारले. बरे काय व वाईट काय ते स्वतःच ठरवण्याची त्यांची इच्छा होती. (उत्पत्ति ३:४-६) यामुळे त्यांना त्यांच्या परादीसमय घरातून हाकलून देण्यात आले. यानंतर यहोवाने मानवाला अधिकाराच्या संघटना निर्माण करण्याची अनुमती दिली, ज्यामुळे त्याला जरी अपूर्ण तरी व्यवस्थित समाजात राहणे शक्य होऊ शकेल. हे अधिकार कोणते आहेत, आणि यांना कितपत अधीन राहण्याची देव आम्हाकडून अपेक्षा करतो?
‘वरिष्ठ अधिकारी’
७. ‘वरिष्ठ अधिकारी’ कोण आहेत आणि त्यांचा अधिकार देवाच्या अधिकारापुढे कसा आहे?
७ प्रेषित पौलाने लिहिले: “प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन असावे; कारण देवापासून नाही असा अधिकार नाही.” “वरिष्ठ अधिकारी” कोण आहेत? नंतरच्या वचनातील पौलाचे शब्द ते ‘वरिष्ठ अधिकारी’ मानवी सरकारी अधिकारी असल्याचे स्पष्ट करतात. (रोमकर १३:१-७; तीतास ३:१) यहोवाने मानवाच्या सरकारी अधिकाऱ्यांची निर्मिती केली नाही, तर ते त्याच्या परवानगीमुळे अस्तित्वात आहेत. यामुळेच पौल असे लिहू शकला: “जे अधिकार आहेत ते देवासमोर सापेक्ष पदी उभे आहेत.” हे अशा पृथ्वीवरील अधिकाराबाबत काय सूचित करते? ते देवाच्या अधिकारापुढे दुय्यम स्थानी आणि कनिष्ठ आहेत. (योहान १९:१०, ११) या कारणास्तव, जेव्हा मनुष्याचे नियम व देवाचे नियम यात विरोध उद्भवतो त्यावेळी ख्रिश्चनांनी स्वतःला बायबलने प्रशिक्षित केलेल्या विवेकाद्वारे मार्गदर्शित होऊ द्यावे. त्यांनी “मनुष्यापेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.”—प्रेषितांची कृत्ये ५:२९.
८. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुम्हाला कसा लाभ मिळतो व तुम्ही त्यांना स्वतःची अधीनता कशी दाखवू शकता?
८ तथापि, बऱ्याच वेळा सरकारी वरिष्ठ अधिकारी ‘आपल्या हितासाठी देवाचा सेवक’ म्हणून कृती करतात. (रोमकर १३:४) ते कोणत्या मार्गाने? हे वरिष्ठ अधिकारी कोणकोणत्या मार्गाने सेवा पुरवतात त्यांचा जरा विचार करा. त्यामध्ये पत्रांचा बटवडा, पोलीस व अग्नीसंरक्षण, आरोग्यव्यवस्था व शिक्षण ह्या गोष्टी समाविष्ट आहेत. “ह्या कारणास्तव तुम्ही करहि देता, कारण अधिकारी देवाची सेवा करणारे आहेत व ते ह्याच सेवेत तत्पर आहेत,” असे पौलाने लिहिले. (रोमकर १३:६) तेव्हा, कर किंवा इतर कोणत्याही कायदेशीर कर्तव्याबाबत “चांगले वागण्याची आमची इच्छा” असावी.—इब्रीयांस १३:१८.
९, १०. (अ) वरिष्ठ अधिकारी देवाच्या व्यवस्थेमध्ये कसे बसतात? (ब) वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विरोध करणे हे चुकीचे का होईल?
९ वरिष्ठ अधिकारी, कधीकधी स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करतात. अशावेळी त्यांना अधीन राहण्याच्या आमच्या जबाबदारीतून आम्हाला मुक्तता मिळते का? नाही, ती मिळत नाही. यहोवा या अधिकाऱ्यांची चुकीची कृत्ये बघत असतो. (नीतिसूत्रे १५:३) त्याने मानवी अधिपत्याला सहन केले याचा अर्थ तो त्यांच्या भ्रष्टाचाराकडे डोळेझाक करून आहे असा नाही आणि आपण देखील तसे करावे असे तो अपेक्षित नाही. त्यामुळे, देव लवकरच “या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील” आणि त्यांच्या जागी स्वतःच्या धार्मिक सरकारचे आधिपत्य स्थापन करणार आहे. (दानीएल २:४४) पण, हे घडेपर्यंत वरिष्ठ अधिकारी एक उपयुक्त उद्देश साध्य करतात.
१० पौलाने स्पष्टीकरण दिले की, “जो अधिकाराला आड येतो तो देवाच्या व्यवस्थेस आड येतो.” (रोमकर १३:२) वरिष्ठ अधिकारी ही देवाकडील “व्यवस्था” आहे ते या अर्थी की, ते बहुतांशी सुव्यवस्था राखतात; तसे न झाल्यास सर्वत्र बेबंदशाही व गोंधळ माजेल. यामुळे त्यांचा विरोध करणे अशास्त्रीय व मूर्खपणाचे असेल. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास, तुम्हावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे आणि जखमेवर टाके घालण्यात आले आहेत अशी कल्पना करा. हे टाके जरी शरीरासोबत संयोग होणारे नसले तरी ते काही काळाकरता विशिष्ट हेतू साध्य करतात. त्यांना वेळेआधी काढून टाकणे धोकादायक ठरू शकेल. याचप्रमाणे मानवी सरकारी अधिकारी देवाच्या मूळ उद्देशाचा भाग नव्हते. तथापि, त्याचे आधिपत्य पृथ्वीवर सर्वत्र सुरू होण्याआधी ही मानवी सरकारे समाजाला एकत्र बांधून आहेत आणि सध्याकरता देवाच्या इच्छेच्या एकमतात बसणारे कार्यवहन करतात. या कारणामुळे, आपण देवाच्या नियमाला व अधिकाराला प्राधान्य देत राहून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन राहण्यास हवे.
कुटुंबातील अधिकार
११. मस्तकपदाच्या तत्त्वाचे तुम्हाला कसे स्पष्टीकरण देता येईल?
११ कुटुंब हा मानवी समाजाचा मूलभूत घटक आहे. यामध्ये पतीला व पत्नीला लाभदायक सोबत मिळू शकते आणि मुलांचे संरक्षण होऊन त्यांना प्रौढावस्थेसाठी तालीम देता येते. (नीतिसूत्रे ५:१५-२१; इफिसकर ६:१-४) या उदात्त योजनेचे अशा प्रकाराने संघटन होण्यास हवे, जेथे कुटुंबातील सदस्य शांती व सहमतात राहू शकतील. हे घडवून आणण्याचा यहोवाचा मार्ग मस्तकपदाच्या तत्त्वावर आधारलेला आहे, ज्याचा सारांश करिंथकरांस पहिले पत्र ११:३ मध्ये आढळणाऱ्या या शब्दांत सांगितला आहे: “प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे; स्त्रीचे मस्तक पुरुष आहे, आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे.”
१२, १३. कुटुंबाचा मस्तक कोण आहे आणि येशूने स्वतःचे मस्तकपद ज्या पद्धतीने चालवले त्याकडून काय शिकता येते?
१२ पती हा कुटुंबाचा मस्तक आहे. तथापि, त्याच्यावर देखील एक मस्तक आहे—येशू ख्रिस्त. पौलाने लिहिले: “पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली तशी तुम्हीही आपआपल्या पत्नीवर प्रीति करा; ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले.” (इफिसकर ५:२५) येशूने मंडळीला ज्या पद्धतीने नेहमी वागवले तसे पती आपल्या पत्नीला वागवतो तेव्हा तो ख्रिस्ताच्या अधीन असल्याचे दाखवून देतो. (१ योहान २:६) येशूला फार मोठा अधिकार देण्यात आला आहे; पण तो त्याचा वापर अत्यंत कोमलतेने, प्रीतीने व समंजसपणे करतो. (मत्तय २०:२५-२८) मनुष्य असताना येशूने स्वतःच्या पदाचा कधीही गैरवापर केला नाही. तो “मनाचा सौम्य व लीन” होता व त्याने आपल्या शिष्यांना “दास” नव्हे तर “मित्र” असे संबोधले. “मी तुम्हाला विसावा देईन,” असे त्याने अभिवचन दिले व तेच त्याने करून दाखवले.—मत्तय ११:२८, २९; योहान १५:१५.
१३ येशूचे उदाहरण पतींना शिकवते की, ख्रिस्ती मस्तकपद जुलुमी वर्चस्व गाजवण्याचे पद नव्हे. उलटपक्षी ते आदराचे व स्व-त्यागी प्रेमाचे आहे. याद्वारे, स्वतःच्या सोबत्याला शारीरिक किंवा शाब्दिक रितीने गैरवागणूक देण्याचा प्रश्नच राहत नाही. (इफिसकर ४:२९, ३१, ३२; ५:२८, २९; कलस्सैकर ३:१९) कोणा ख्रिस्ती माणसाने जर स्वतःच्या बायकोला अशी गैरवागणूक दिली तर त्याची इतर कामे कवडीमोल ठरतील, आणि त्याच्या प्रार्थनांना व्यत्यय येत राहील.—१ करिंथकर १३:१-३; १ पेत्र ३:७.
१४, १५. देवाविषयीचे ज्ञान एखाद्या पत्नीला तिच्या पतीच्या अधीन होण्यास कशी मदत करते?
१४ पती जेव्हा ख्रिस्ताच्या उदाहरणाचे अनुकरण करतो तेव्हा त्याच्या बायकोला इफिसकर ५:२२, २३ मधील या शब्दांनुरूप वागणे सोपे जाते: “स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपआपल्या पतीच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे, तसा पति पत्नीचे मस्तक आहे.” पतीने जसे ख्रिस्ताच्या अधीन रहायचे आहे तसेच पत्नीने आपल्या पतीच्या अधीन राहिले पाहिजे. सद्गुणी स्त्री तिच्या ईश्वरी ज्ञानामुळे व उद्योगीपणामुळे सन्मान व स्तुतीला पात्र ठरते असेही बायबल स्पष्ट सांगते.—नीतिसूत्रे ३१:१०-३१.
१५ एखाद्या ख्रिस्ती स्त्रीने तिच्या पतीला दाखवलेली अधीनता सापेक्ष असते. याचा अर्थ हा की, एखाद्या विशिष्ट गोष्टीला अधीनता दाखविताना ईश्वरी कायद्याचा भंग होत असला तर कोणा माणसाचे नव्हे तर देवाचे आज्ञापालन करण्यास हवे. यावेळी सुद्धा, पत्नीने ईश्वरी नियमाखातर घेतलेली दृढ भूमिका “सौम्य व शांत आत्मा” याद्वारे संयमी ठेवण्यास हवी. देवाविषयीच्या ज्ञानाने तिला चांगली पत्नी बनवले आहे हे दिसून आले पाहिजे. (१ पेत्र ३:१-४) हीच गोष्ट, ज्याची पत्नी खऱ्या विश्वासातील नसेल त्या ख्रिस्ती पुरुषाच्या बाबतीत खरी असेल. त्याचे बायबलच्या तत्त्वानुरूप वागणे त्याला चांगला पती बनवणारे ठरले पाहिजे.
१६. येशू युवकावस्थेत असताना त्याने घालून दिलेले उदाहरण मुले कसे अनुसरू शकतात?
१६ इफिसकर ६:१ मुलांची भूमिका स्पष्ट करताना असे म्हणते: “प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे.” ख्रिस्ती मुले येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करतात. तो वाढत असताना त्याच्या पालकांच्या अधीन राहिला. आज्ञाधारक मुलगा म्हणून तो “ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व माणसांच्या कृपेत वाढत गेला.”—लूक २:५१, ५२.
१७. पालक ज्या पद्धतीने अधिकार चालवतात त्याचा त्यांच्या मुलांवर कोणता परिणाम होऊ शकतो?
१७ पालक स्वतःच्या जबाबदाऱ्या ज्या पद्धतीने हाताळतात त्यावर मुले अधिकाराचा आदर करतील किंवा त्याविरुद्ध बंड करतील हे अवलंबून आहे. (नीतिसूत्रे २२:६) या कारणास्तव, पालकांनी स्वतःला हे विचारणे उचित ठरेल की, ‘मी माझा अधिकार प्रेमळपणे चालवतो की कठोरतेने? मी त्यांना मोकळे सोडणारा आहे का?’ ईश्वरी पालकांनी प्रेमळ, विचारशील तरीही ईश्वरी तत्त्वांसंबंधाने दृढ असावे अशी अपेक्षा केली जाते. पौलाने अगदी उचितपणे हे लिहिले: “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका; तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.”—इफिसकर ६:४; कलस्सैकर ३:२१.
१८. पालकीय शिस्त कशी लावण्यात यावी?
१८ पालकांची, मुलांनी आज्ञाधारक असावे व आपणाला आनंद मिळवून द्यावा अशी इच्छा आहे तर त्यांनी मुलांना प्रशिक्षण देण्याच्या पद्धती पडताळून पाहाव्यात. (नीतिसूत्रे २३:२४, २५) बायबलमध्ये शिक्षण देण्याचा मूलभूत प्रकार शिस्त असल्याचे दाखवले आहे. (नीतिसूत्रे ४:१; ८:३३) तिचा क्रोध व क्रूरपणासोबत नव्हे तर प्रेम व सौम्यता यांजबरोबर संबंध जोडण्यात आला आहे. यास्तव, ख्रिस्ती पालकांनी सुज्ञतेने कृती आचरली पाहिजे व मुलांना शिस्त लावताना स्वतःला ताब्यात ठेवले पाहिजे.—नीतिसूत्रे १:७.
मंडळीतील अधिकार
१९. देवाने ख्रिस्ती मंडळीकरता कशी सुव्यवस्थेची तरतूद केली आहे?
१९ यहोवा हा व्यवस्थेचा देव असल्यामुळे तो त्याच्या लोकांसाठी अधिकारयुक्त व सुसंघटित नेतृत्व देईल हे व्यवहार्य आहे. या कारणास्तव, त्याने येशूला ख्रिस्ती मंडळीचा मस्तक म्हणून नेमले आहे. (१ करिंथकर १४:३३, ४०; इफिसकर १:२०-२३) ख्रिस्ताच्या अदृश्य नेतृत्वाखाली देवाने अशी व्यवस्था लावून दिली आहे ज्यामुळे प्रत्येक मंडळीतील नियुक्त वडील कळपाची उत्सुकतेने, स्वेच्छेने व प्रेमळपणे देखरेख करतात. (१ पेत्र ५:२, ३) सेवा-सेवक अशांना विविध मार्गाने साहाय्य देतात आणि मंडळीत मोलाची सेवा सादर करतात.—फिलिप्पैकर १:१.
२०. आपण, नियुक्ती मिळालेल्या ख्रिस्ती वडिलांच्या अधीन का असले पाहिजे व हे का लाभदायक आहे?
२० ख्रिस्ती वडिलांबद्दल पौलाने लिहिले: “आपल्या अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा; कारण आपणांस हिशेब द्यावयाचा आहे हे समजून ते तुमच्या जिवांची राखण करितात; ते त्यांना आनंदाने करता यावे, कण्हत नव्हे; तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही.” (इब्रीयांस १३:१७) देवाने ख्रिस्ती पर्यवेक्षकांना मंडळीतील लोकांच्या आध्यात्मिक गरजांची काळजी वाहण्याची जबाबदारी नेमून दिली आहे हे सुज्ञपणाचे आहे. या वडिलांचा मिळून पाळकवर्ग बनत नाही. ते तर देवाचे सेवक व दास असून आपला धनी येशू ख्रिस्ताने केल्याप्रमाणे सहउपासकांच्या गरजांनुरूप सेवा करतात. (योहान १०:१४, १५) आपल्या प्रगतीसाठी व आध्यात्मिक वाढीसाठी शास्त्रवचनीयदृष्ट्या लायक असणारे लोक आस्था घेऊन आहेत ही जाणीव असल्यामुळे आपल्याला त्यांना सहकार्य करण्याचे व त्यांच्या अधीन राहण्याचे उत्तेजन मिळते.—१ करिंथकर १६:१६.
२१. नियुक्त वडील सहख्रिश्चनांची आध्यात्मिकरित्या कशी मदत करण्याचा प्रयत्न करतात?
२१ कधी कधी मेंढरु चुकते किंवा जगातील घातक घटकांद्वारे त्याला धोका संभवतो. प्रमुख मेंढपाळाच्या नेतृत्वाखाली वडील सहमेंढपाळ या नात्याने त्यांना सोपवून दिलेल्या लोकांच्या गरजांबाबत दक्ष असतात व यांच्याकडे व्यक्तिगत लक्ष देण्यात परिश्रमी असतात. (१ पेत्र ५:४) ते मंडळीच्या सदस्यांना भेटी देतात व उत्तेजनपर बोध करतात. देवाच्या लोकांची शांती भंग करण्याच्या प्रयत्नात दियाबल आहे हे जाणून वडील कोणत्याही समस्येची हाताळणी करताना वरून येणाऱ्या ज्ञानाचा उपयोग करतात. (याकोब ३:१७, १८) ते, येशूने स्वतः ज्याकरता प्रार्थना केली होती ते ऐक्य व विश्वासाची एकता राखण्यासाठी खूप परिश्रम घेतात.—योहान १७:२०-२२; १ करिंथकर १:१०.
२२. अपराधी प्रकरणात वडील कोणती मदत देतात?
२२ कोणा ख्रिश्चनाला दुःख भोगावे लागत आहे किंवा पाप केल्यामुळे तो निराश झाला आहे तर काय? बायबलची आरामप्रदायक सूचना व वडिलांद्वारे त्याच्यासाठी अंतःकरणपूर्वक केलेल्या प्रार्थना त्याला आधात्मिक आरोग्य पुन्हा मिळवून देण्यात मदत करतात. (याकोब ५:१३-१५) पवित्र आत्म्याद्वारे नियुक्त झालेल्या या माणसांना, चुकीचा मार्ग चोखाळत राहणाऱ्यांना किंवा मंडळीच्या आध्यात्मिक व नैतिक शुद्धतेला धोका उभा करणाऱ्यांना शिस्त लावण्याचा किंवा वाग्दंड देण्याचा देखील अधिकार आहे. (प्रेषितांची कृत्ये २०:२८; तीतास १:९; २:१५) मंडळी शुद्ध राखावी याकरता गंभीर अपराधाची माहिती कळवण्याची प्रत्येकावर जबाबदारी आहे. (लेवीय ५:१) गंभीर पातक केलेल्या कोणा ख्रिस्ती जनाने शास्त्रवचनीय शिस्त व वाग्दंड स्वीकारल्यास व खऱ्या पश्चात्तापाचा पुरावा पुरवल्यास त्याला मदत मिळू शकेल. अर्थात, देवाच्या नियमाचा सतत अपश्चात्तापी मार्गाने भंग करीत राहणाऱ्याला बहिष्कृत केले जाते.—१ करिंथकर ५:९-१३.
२३. मंडळीच्या भल्यासाठी ख्रिस्ती पर्यवेक्षक कशाची तरतूद करतात?
२३ राजा येशू ख्रिस्ताच्या वर्चस्वाखाली आध्यात्मिक दृष्टीने प्रौढ असणाऱ्या पुरुषांना देवाच्या लोकांकरता सांत्वन, संरक्षण व तजेला देण्यासाठी नियुक्त करण्यात येईल असे बायबलने आधीच भाकीत केले होते. (यशया ३२:१, २) हे लोक, आध्यात्मिक वाढीकरता सुवार्तिक, मेंढपाळ व शिक्षक या नात्याने पुढाकार घेतील. (इफिसकर ४:११, १२, १६) कधी कधी ख्रिस्ती पर्यवेक्षक समविश्वासूंना वाग्दंड व ताकीद देतील आणि बजावतील सुद्धा; तरीपण देववचनावरील वडिलांच्या हितकारक शिक्षणाचा अवलंब सर्वांना जीवनाच्या मार्गावर टिकून राहण्याला मदत देतो.—नीतिसूत्रे ३:११, १२; ६:२३; तीतास २:१.
अधिकाराविषयी यहोवाचा दृष्टिकोन स्वीकारा
२४. आपली दरदिवशी कोणकोणत्या वादविषयाबद्दल परीक्षा होते?
२४ अधिकाराला अधीनता दाखवण्याबाबत पहिला पुरुष व स्त्रीची चाचणी घेण्यात आली. अशाच परीक्षा आम्हावर दरदिवशी येतात ह्यात काही आश्चर्याचे नाही. दियाबल सैतानाने मानवजातीत बंडखोरीचा आत्मा वाढवला आहे. (इफिसकर २:२) स्वैराचाराचा मार्ग हा अधीनतेपेक्षा श्रेष्ठ आहे हे मोठ्या चतुरपणे भासवण्यात येत आहे.
२५. जगाच्या बंडखोर आत्म्याचा त्याग केल्यामुळे आणि देव जो अधिकार चालवतो किंवा परवानगी देतो त्याला अधीन राहण्यामुळे कोणते लाभ मिळतात?
२५ तथापि, आम्ही जगाच्या बंडखोरीच्या आत्म्याचा त्याग केला पाहिजे. हे करताना ईश्वरी अधीनता समृद्ध आशीर्वाद देते हे आपल्याला आढळून येईल. उदाहरणार्थ, प्रापंचिक अधिकाऱ्यांकडून त्रास ओढवून घेणाऱ्या लोकांना मिळणाऱ्या चिंता व नैराश्य आपल्याला टाळता येईल. कित्येक कुटुंबांत दिसून येणाऱ्या चकमकी आपल्याला कमी करता येतील आणि आपल्याला आपल्या ख्रिस्ती समविश्वासूंचा उबदार व प्रेमळ सहवास अनुभवता येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आमची ईश्वरी अधीनता सर्वोच्च अधिकारी यहोवा देवासोबत चांगल्या नातेसंबंधात परिणीत करील.
तुमच्या ज्ञानाचे परीक्षण करा
यहोवा त्याचा अधिकार कसा गाजवतो?
‘वरिष्ठ अधिकारी’ कोण आहेत आणि आपण त्यांना कसे अधीन राहू शकतो?
कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर मस्तकपदाचे तत्त्व कोणती जबाबदारी आणते?
आपल्याला ख्रिस्ती मंडळीला कशी अधीनता दाखवता येईल?
[१३४ पानांवरील चौकट]
विध्वंसक नव्हे विनम्र
यहोवाचे साक्षीदार त्यांच्या जाहीर प्रचारकार्याद्वारे देवाचे राज्य हेच मानवजातीची खरी शांती व सुरक्षेकरता एकमात्र आशा असल्याचे दर्शवतात. पण हे देवाच्या राज्याचे आवेशी उद्घोषक, ते ज्या सरकारच्या वर्चस्वाखाली रहात आहेत त्यांचे विध्वंसक कदापिही नाहीत. उलटपक्षी, साक्षीदार अत्यंत आदरशील व कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांमधील आहेत. “सर्व धार्मिक पंथांचे सभासद यहोवाच्या साक्षीदारांसारखे असते,” “तर आम्हामध्ये खून, चोऱ्या, बाल गुन्हेगारी, तुरुंग आणि अणुबॉम्ब हे काही प्रकार नसते. घराची दारे कधीच बंद करावी लागली नसती.” असे एका आफ्रिकी देशातील एका अधिकाऱ्याने म्हटले.
हे ओळखल्यामुळे पुष्कळ देशांतील अधिकाऱ्यांनी साक्षीदारांचे प्रचार कार्य कोणाही अडथळ्याविना चालू राहू देण्याची परवानगी दिली. इतर देशांतील अधिकाऱ्यांना जेव्हा समजले की, साक्षीदार चांगला प्रभाव निर्माण करणारे आहेत तेव्हा त्यांनी तेथील बंदी वा प्रतिबंध काढून टाकला. हे, प्रेषित पौलाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहण्याबद्दल जे लिहिले त्यासारखेच आहे: “चांगले ते कर, म्हणजे त्याच्याकडून तुझी प्रशंसा होईल.”—रोमकर १३:१, ३.